द डिसायपल - कला आणि कलोपासक

>> Monday, May 3, 2021

 





(माफक स्पॉयलर्स आहेत, पण खूप नाहीत. तरीही, आधी फिल्म पहाणं ॲडव्हायजेबल)


चैतन्य ताम्हाणेचे दोन मराठी चित्रपट, ‘कोर्ट’ आणि ‘द डिसायपल’, हे मराठी चित्रपट नाहीत. म्हणजे त्यात मराठी भाषेचा वापर असला, तरीही लौकिकार्थाने  ‘मराठी चित्रपट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटांशी ते नातं सांगत नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर मराठी चित्रपटांचा जो ठराविक प्रेक्षक आहे, त्याचा विचार करुन हे चित्रपट बनलेले नाहीत.  ही गोष्ट आपण चांगली किंवा वाईट, अशा अर्थाने पाहू नये, तर ती निव्वळ एक फॅक्ट म्हणून स्वीकारावी, तरच आपण या चित्रपटांचा विचार निरपेक्षपणे करु शकू. आणि तसा तो करावाच, कारण दिग्दर्शकाने हे चित्रपट केवळ स्वत:शी प्रामाणिक राहून केले आहेत. व्यावसायिक तडजोडीची कोणतीही लक्षण त्यांमधे नाही. 


‘कोर्ट’ चित्रपटानंतर उद्भवलेला वाद आपल्यातल्या अनेकांना आठवत असेल. तो वाद उद्भवण्यामागे विषयाबद्दल गोंधळात पडणं हे एक प्रमुख कारण होतं. अनेकांना असं वाटलं की त्यात दाखवलेला खटला हे चित्रपटाचं प्रमुख कथानक आहे, आणि ते गृहीतक डोक्यात ठेवल्याने चित्रपटाचा शेवट त्यांना गोंधळात पाडून गेला. प्रत्यक्षात कोर्टच्या शीर्षकातच तो केसबद्दल नसून न्यायव्यवस्थेबद्दल असल्याचं सुचवलेलं आहे. ‘द डिसायपल’ बद्दलही या प्रकारचा प्रश्न पडणं संभवतं, आणि त्याचं उत्तर जर आपल्याला मिळालं, तर आपला पुढचा प्रवास सोपा होतो. 


चैतन्य ताम्हाणे आपल्या चित्रपटांचा फार गाजावाजा न करता काम करतो, पण त्याच्या नव्या चित्रपटाचं काम सुरु झालय, आणि तो शास्त्रीय  संगीतावर आधारीत आहे, हेदेखील मागेच ऐकू आलं होतं. तेव्हा माझा समज झाला, की कोर्टमधे ज्या पद्धतीने एका व्यवस्थेचा धांडोळा घेण्यात आला होता, तसा इथेही या क्षेत्राच्या अंतरंगात खोल डोकावण्याचा इरादा असेल. आता प्रत्यक्षात तसं आहे का ? तर आहेही आणि नाहीही. कोर्ट ज्या पद्धतीने व्यवस्थेबद्दल होता, क्षेत्राबद्दल होता, तसा डिसायपल नाही, पण तो त्या क्षेत्राबद्दलचा तपशील मात्र फार जबाबदारीने आणि माहीतीपूर्ण पद्धतीने वापरतो. आता प्रश्न हा, की जर तो शास्त्रीय संगीताबद्दलचा नसेल, तर तो आहे कशाबद्दलचा? कोर्ट आणि डिसायपल यातला प्रमुख फरक म्हणजे डिसायपल हा कॅरेक्टर पीस आहे. ते व्यक्तीचित्रण आहे. आणि त्यातही त्या व्यक्तीच्या कोणत्या अंगाबद्दल ते विशेष करुन बोलतं, तर अर्थात शीर्षकात ज्याचा उल्लेख आहे, त्याच. चित्रपटाचा नायक शरद नेरुळकर ( आदित्य मोडक)  हा शिष्य आहे, आणि शिष्य म्हणूनच त्याच्या भूमिकेकडे, आणि भूमिकेपुरतं चित्रपटात पाहिलं जातं. 


याहूनही थोड्या वेगळ्या दृष्टीने ( शिर्षकाचा आणि चित्रपटाचा ) विस्तृत अर्थ घ्यायचा तर तो कलोपासकाविषयी, आणि कलोपासनेविषयी आहे  असा घेता येऊ शकेल. गुरुशिष्यातलं नातं हा चित्रपटाचा भाग आहेच, पण त्यापेक्षा कलाभ्यास करणारा हा शिष्य आहे, त्यामुळे कला आणि त्या कलेच्या संदर्भातली कलोपासकाची भूमिका, या दृष्टीने विषयाकडे पहाता येईल. मग ही कला संगीतकला असण्याचीही गरज नाही. चित्रपटातली निरीक्षणं, अनेक कलाक्षेत्रांना थोड्याफार फरकाने लावता येऊ शकतात. 


कलोपासनेसंबंधीचा महत्वाचा भाग चित्रपटात येतो, तो विदुषी सिंधुबाई जाधव उर्फ माई ( प्रख्यात दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचा आवाज) , या थोर गायिकेने दिलेल्या व्याख्यानांमधून. माई आपल्याला कधीच दिसत नाहीत, पण त्यांच्या ध्वनीमुद्रीत आवाजातून शुद्ध कलेची महती आणि निस्वार्थी उपासनेचं तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलं जातं. ही व्याख्यानं, हा चित्रपटाचा कणा आहे. त्यातला आशय, आणि निर्मनुष्य मुंबईत रात्री बाईकवरुन जाणाऱ्या शरद नेरुळकरच्या स्वप्नवत प्रवासाची दृश्य, संपूर्ण चित्रपटाला एक संदर्भाची चौकट देऊ करतात. यात चित्रपटाचा संदेश आहे, असं मी म्हणणार नाही. डिसायपलसारख्या वास्तववादी चित्रपटाला  ढोबळ संदेशाची आवश्यकता नसते, पण शरदच्या, आणि चित्रपटातल्या इतरही अनेकांच्या जगण्याकडे आपण काय दृष्टीकोनातून पाहू शकतो, हे या आशयामधून अधोरेखित केल जातं.  


चित्रपटाचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. पहिला २००६ च्या आसपासचा, ज्यात शरद विशीत आहे, आणि आपल्या गुरुजींकडे ( अरुण द्रविड) शिकतोय. शास्त्रीय संगीतातलं मोठं नाव होण्याची त्याची इच्छा आहे, आणि त्यावर आपले श्रम पूर्ण केंद्रीत व्हावेत, म्हणून तो धड नोकरीही न करता पूर्ण वेळ रियाजाला देतो. पण कलेत काहीतरी उपजत, काहीतरी दैवी असावं लागतं. जर ते नसेल तर केवळ श्रमाने तुम्ही कुठवर जाल याला मर्यादा असणारच. शरदला अशी मर्यादा आहे. गुरुजींना ते माहीत आहे, आणि वेळोवेळी ते त्याला सांभाळून घेत असले, तरी शरदला त्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. या दिवसातला शरद होतकरु आहे, प्रामाणिक आहे. संगीताचा धंदा करणारे लोक त्याला सहन होत नाहीत. आपल्या वडिलांना ( किरण यज्ञोपवित ) संगीत क्षेत्रात यश मिळालं नसलं, तरी आपण आज ना उद्या यशस्वी होऊ अशी त्याला खात्री आहे. 


चित्रपटाचा पुढला भाग घडतो तो दहाबारा वर्षांनी, जेव्हा शरद बदललाय. त्याच्या दिसण्यात फरक आहे, तसा वागण्यातही. आता तोच संगीताचा वापर अर्थार्जनासाठी करतोय, त्याला आपण कोणी मोठे होऊ याची शाश्वती वाटेनाशी झाली आहे. अजून तो गुरुजींकडे येऊन जाऊन आहे, पण गुरुजींना त्याने ज्या मखरात बसवलं होतं, ते आता उरलेलं नाही. 


शरद, या प्रमुख व्यक्तीरेखेभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो आणि ती फ्लॉड म्हणावी अशी व्यक्तीरेखा आहे, ध्येयवादापासून तडजोडीपर्यंतचा तिचा प्रवास चित्रपटातल्या प्रमुख टप्प्यात दिसतो, पण त्याबरोबर जोडलेले इतरही अनेक मुद्दे इथे पहायला मिळतात. कलेतला भ्रष्टाचार, किंवा अर्थाजनासाठी तिचं विकृतीकरण होणं असा यातला एक मुद्दा मानता येईल. माईंच्या व्याख्यानातले सुरुवातीलाच येणारे विचार ( “शास्त्रीय संगीताला मार्गी संगीत उगीच नाही म्हणत. आणि तो मार्ग प्राप्त करण्यासाठी, त्याग हा करावाच लागणार. जर पैसा कमवायचा असेल, घरदार सांभाळायचं असेल, तर भावगीतं गा, फिल्मची गाणी गा, या वाटेवर चालू नका. या वाटेवर चालायचं असेल, तर एकटं आणि उपाशी रहायला शिका.” ) हे त्यासाठी पायाभूत आहेत, पण पुढे हा मुद्दा अधिक विस्तृत होतो. शरदने नोकरी करण्याला दिलेला नकार, व्यावसायिक पद्धतीचं वाजवून यशस्वी कार्यक्रम देणाऱ्यांवरची टिका, माई/गुरुजी त्या ( पैसे मिळवायच्या) फंदात पडल्याचा उल्लेख, पुढे स्वत: शरदचं बदलणं आणि कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपडणं, संगीतकेंद्री रिॲलिटी शोजचा उल्लेख, हे सगळं त्या एका मुद्द्याशी जोडलेलं आहे


संगीतातल्या रिॲलिटी शोकडे मात्र केवळ कलेचं व्यावसायिकरण या दृष्टीने पहाता येणार नाही. त्यातला बंगाली मुलीचा छोटा ट्रॅक आणखीही एका कारणासाठी लक्षात घेता येईल. मी आधी उल्लेख केलं, ते कलेचं दैवी असणंही हा ट्रॅक अधोरेखित करतो. तीन चार प्रसंगात हा भाग येतो. ही टॅलेन्ट हन्ट सारखी स्पर्धा आहे, जी शरदला वेळोवेळी टिव्हीवर दिसते. तो स्वत: आयुष्यभर संगीतामागे, स्वत:ची ओळख तयार करण्यामागे धावून थकला आहे, पण त्याला ना म्हणावंसं यश मिळालय, ना पैसा. पण त्या टॅलेन्ट हन्टमधली सामान्य घरातली मुलगी शेकडो मुलांमधे येऊन दोन ओळी गाते काय, तिला अचानक प्रसिद्धी, ऐश्वर्य सारं मिळून जातं. तिला मिळत जाणाऱ्या यशाबरोबर शरदच्या निर्विकार चेहऱ्यामागे दडलेल्या चढत्या असूयेचं हे दर्शन आहे, जी कोणत्याही कलाक्षेत्रात विपुल प्रमाणात पहायला मिळते. निसर्गदत्त देणगी आणि नशीब, यांच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोचणारं कोणी, आणि मुळातच कलेचा वरदहस्त नसलेल्यांची व्यर्थ धडपड, या थोडक्या प्रसंगातून लक्षात येते


चित्रपटात अनेक वृत्ती, अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा सामोर येतात. माईंसारख्या गुरुस्थानी असणाऱ्या पण स्वमग्न. गुरुजींसारख्या, माई व्हायच्या प्रयत्नातल्या, पण मागे पडलेल्या, आणि आता परिस्थितीच्या बळी ठरलेल्या. शरदसारख्या मुळातच कलेची मर्यादीत समज असताना झगडणाऱ्या देखील. कोणी कलेला पैशांसाठी वापरणाऱ्या, कोणी निराश होऊन क्षेत्राबाहेर पडणाऱ्या वा फेकल्या जाणाऱ्या, किंवा रिॲलिटी शो मधल्या मुलीसारख्या आपल्यातल्या कलागुणाचं महत्व लक्षात येण्याआधीच प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेल्या. ( सर्जनशील व्यक्तीरेखांचे प्रकार मी इथे उल्लेखले आहेत. पण चित्रपटात  रसिक आणि समीक्षकांच्या व्यक्तीरेखांना, त्यांच्या प्रकारांनाही स्थान आहे, हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात येईलच. ) ‘ डिसायपल’  चित्रपटापुरत्या या साऱ्या व्यक्तीरेखा संगीत क्षेत्रात आहेत, पण याच टाईप्सना आपण प्रत्येक कलाक्षेत्रातच पहातो. मग ते क्षेत्र चित्रकलेचं असेल, साहीत्य असेल, अभिनय, किंवा इतरही काही. हे आपल्या ज्या क्षणी लक्षात येतं, तसा चित्रपटाचा आशय आपल्यासाठी वैश्विक होऊन जातो


चैतन्य ताम्हाणेच्या चित्रपटाची दृश्य भाषा  हीकोर्टचित्रपटाच्या वेळीच वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती. कॅमेरा शक्य तेव्हा स्थिर ठेवत, दृश्य चमत्कृती टाळून, आजच्या गतिमान कॅमेराची सवय झालेल्या रसिकांना त्याने एक मोठा धक्का दिला होता. ‘ डिसायपलमधे ही भाषा थोडी बदलली आहे. दोन्हीकडली दृश्य जे सांगू पहातात, त्यात एक मोठा फरक आहे. कोर्ट मधलं दर दृश्य, हे कथेतल्या  व्यक्तीरेखा प्रसंगात येण्याआधी सुरु व्हायचं, आणि त्या बाहेर पडल्यावर काही सेकंद सुरु असायचं. जणू कथेपलीकडला अवकाश दिग्दर्शक या दृश्यांमधून मांडू पहातो आहे. इथे तसं होत नाही. जाणूनबुजूनच इथला कॅमेरा व्यक्तीरेखांना अधिक धरुन रहातो.वेळोवेळी कॅमेरा गतीमानही होतो, मात्र तो कशा पद्धतीने आणि का व्हायला हवा, याचा पूर्ण विचार दिग्दर्शकाने केल्याचं जाणवतं. व्याख्यानं ऐकत बाईकवरुन जाणाऱ्या शरदच्या प्रवासात हा वापर सर्वात ठळक आहे, पण इतर जागीही आहे.


चित्रपटाच्या शेवटाला कोर्टची आठवण झाल्यावाचून रहायची नाही, जरी हा शेवट कोर्टएवढा संभ्रमात पाडायचा नाही. तो शेवट आठवत असेल त्यांना कोर्टाचं कामकाज थांबण्याचं दृश्य आठवत असेलच. या दृश्यानंतरचा फेड आउट हा जवळपास चित्रपटाचा शेवट वाटणाराच होता. त्या दृश्याची आठवण करुन देणारं एका हॉलचं दृश्य इथेही आहे, ज्यानंतर फेड आऊट होतो, आणि पुन्हा दृश्य उजळतं, तेव्हा आपण एका थोड्या अनपेक्षित जागी असतो. या दोन चित्रपटांमधल्या दृश्यांमधलं साम्य अपघाती नसणार. पण अर्थाच्या दृष्टीने, या दोन्ही प्रसंगाची ट्रीटमेन्ट अर्थाच्या दृष्टीने योग्य वाटणारी आहे


कोर्टप्रमाणेच इथली अभिनयशैली वास्तववादी आहे. काही वेळा ( काही व्यक्तीरेखांबाबतती थोडी फोर्स्ड वास्तववादीही वाटू शकेल, पण त्याने फार बिघडणार नाही. आदित्य मोडक ने शरदचं कुढणं फार परिणामकारक केलय, आणि त्याचा परफॉर्मन्स इथे सर्वात महत्वाचा आहे. दुसरी विशेष लक्षवेधी गोष्ट म्हणजे माईंसाठी असलेला सुमित्रा भावेंचा आवाज. त्यांचा आवाज आपल्याला तसा परिचयाचा नाही, त्यामुळे तो इथे फार खरा वाटतो. त्याचं पूर्ण चित्रपट व्यापून असणं, आपल्याला जाणवत रहातं. या आवाजाचा वापरही वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण तो एकाच वेळी खरा, माईंचा मुद्रीत केलेला आवाज आहे, तसच शरदचा आतला आवाजही आहे. बहुतेक ठिकाणी आपण तो माईंचा आवाज या स्वरुपातच ऐकतो, पण शरद लहान असतानाच्या एका प्रसंगात या आवाजाचं दुहेरी स्वरुप उघड होतं. माईंचं पात्र हे चित्रपटातलं महत्वाचं पात्र आहे. या प्रकारची केवळ आवाजाच्या सहाय्याने उभी केलेली पात्र आपल्याकडे फार चित्रपटात पहायला मिळत नाहीत. ‘लंचबॉक्समधल्या शेजारणीच्या पात्रासारखी काही उदाहरणं आहेत, पण ते पात्र त्यामानाने साधं होतं. माईंच्या व्यक्तीरेखेचं वजन त्याला नाही.


‘द डिसायपल’ हा दृश्य आणि शैली, या बाबतीत ‘कोर्ट’च्या बराच जवळ जाणारा आहे, पण माझ्या मते हा अधिक आव्हानात्मक चित्रपट आहे. निर्मितीसाठी तसाच आस्वादासाठीही. ‘कोर्ट’मधे जर त्याचं मुळात अपरिचित वळणाचं असणं स्वीकारलं, तर तो उलगडायला सोपा चित्रपट होता. तीन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून केलेली मांडणी ही एकदा लक्षात आली, की त्यात गुंतणंही सहज होतं. डिसायपलमधलं आव्हान हे अधिक वरचं आहे. एका साध्याशा व्यक्तिरेखेवर, आणि फार वळणांशिवायच्या पटकथेवर अवलंबून रहात प्रेक्षकाला विचार करायला लावणं हे फार सोपं नाही. ‘कोर्ट’मधे आयरनीमधून येणारा विनोदही मोठ्या प्रमाणात होता. इथे क्वचित काही प्रसंगात ( उदा व्यावसायिक संगीत कार्यक्रमाच्या ठिकाणी सीडी विकण्याचा प्रसंग) त्या पठडीतला विनोद आहे, पण बराचसा चित्रपट गंभीर वळणाचा आहे. 


शास्त्रीय संगीत आपल्याला ऐकताक्षणी कळतच असं नाही, त्यासाठी आपला कान तयार व्हावा लागतो. तो झाला की आपल्याला त्यातल्या जागा दिसायला लागतात, आपण तिथवर पोचू शकतो. ‘ द डिसायपल’ सारख्या चित्रपटांचंही असं असतं. ते आपल्यापर्यंत पोचायचे तर आपली नजर तयार व्हावी लागते. ती जशी तयार होते तसं आपल्यापुढे आशयघन सिनेमांचं एक मोठं दालन खुलं होतं. पण त्यासाठी घाई उपयोगाची नाही. प्रत्येक गोष्टीला हवा तो वेळ द्यावा लागणारच. 

- गणेश मतकरी

18 comments:

RJ SMITA May 4, 2021 at 1:01 AM  

Khoop smarpak. Mala tumchya lekhacha shevat mahatvacha vatala je prapta paristhiti madhye garjecha aahe ha uttam chitrapat samjun ghayala.

पौलमी गानयोग May 4, 2021 at 1:50 AM  

अप्रतिम परीक्षण.. मी खूप जणांचे reviews वाचतेय.. पण हा चित्रपट कसा बघायचा ते हा लेख छान शिकवतो. Thank you

Vikram Patil May 4, 2021 at 2:35 AM  

तुमचं परीक्षण खुप आवडलं. यासारखे चित्रपट आणि तुमची परीक्षणं अनेक वर्षे वाचुन आता कुठं चित्रपट आस्वादाची नजर तयार होते आहे असं वाटतयं. धन्यवाद!

Aditya May 4, 2021 at 3:04 AM  

छान लेख. चित्रपट आस्वाद घेतानाचे अनेक संदर्भ आपण उपलब्ध करून दिले आहेत. धन्यवाद

abhay May 4, 2021 at 9:27 AM  

😂अप्रतिम परीक्षण सिनेमा चे सार आपण समर्पक पणे विशद केले आहे. 👍👍👍

Unknown May 4, 2021 at 11:50 AM  

खूप योग्य पद्धतीने समीक्षण लिहिले आहे..

Keshav May 4, 2021 at 7:33 PM  
This comment has been removed by the author.
Keshav May 4, 2021 at 7:33 PM  
This comment has been removed by the author.
Keshav May 4, 2021 at 7:33 PM  

उत्तम परीक्षण! विशेषत:, शेवटचा परिच्छेद!
मलाही हा चित्रपट पहाताना जाणवत होतं की ज्याला खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीत समजत असेल आणि त्याचबरोबर चित्रपटाच्या माध्यमाची चांगली जाण असेल त्यालाच या चित्रपटाची उंची कळेल!

Keshav May 4, 2021 at 10:05 PM  

प्रतिसाद एडिट करता येत नाही म्हणून खुलासा. प्रतिसादातील मत माझे आहे, लेखकाचे तसे आहे असे ध्वनित होत असल्यास ती चूक झाली आहे.

GaneshPatil May 5, 2021 at 5:27 AM  

खरंय!चित्रपट एकदा समजू लागले की त्या प्रगल्भ अवकाशाची मज्जा औरच आहे. wide शॉट सेट करून तो हळू हळू कॅरेक्टर वर फोकस होतो तेव्हा आपण सभोवतालातून अंतर्मनात जाण्याचा भास होतो, कोर्ट मध्ये संपूर्ण व्यवस्था ही केरेक्टर होती हे त्या स्टील शॉट मधून भिनतं, लव दियाज ह्यात मास्टर आहे त्याचा नोर्ट दि एन्ड ऑफ हिस्ट्री मास्टर पिस आहे,.....

Dhakka lagi bukka May 5, 2021 at 9:38 AM  

वा...अतिशय मार्मिक परीक्षण. धन्यवाद.

Gaurav Jagtap May 8, 2021 at 3:21 AM  

छान बनला आहे सिनेमा, शरद ची भूमिका खूपच अप्रतिम चितारली आहे. 👍

ganesh May 10, 2021 at 12:49 AM  

प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद.

ganesh May 10, 2021 at 12:49 AM  

प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद.

santoshpadmakar May 11, 2021 at 2:14 AM  

या चित्रपटात अनेक अस्पर्शीत असे कंगोरे आहेत आपण त्यातील अनेक गोष्टींचा नेमकेपणा उलगडवला आहे.शरदच्या मर्यादा अधोरेखित करणारे आपले परीक्षण महत्त्वाचे आहे. संगीतच नाहीतर कोणत्याही कलाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाजार घुसला आहे. या ही चित्रपटाचा शेवट चपराक देणारा आहे. घराणी, परंपरा सांगणाऱ्या लोकांच्या पलीकडे अनेक कलाकार आणि कला आहेत ज्यांची मोजदादच नाही. जे कोणताही स्वर लागण्यासाठी, अमुक मैफलीत गाऊ अशी वाट पहात नाहीत. ताम्हाणे खूप सखोल नेत आहेत आपल्याला. आपलीच तयारी कमी पडते असे आहे एकूण... तुम्हाला हे सर्व उलगडले आहे...धन्यवाद

santoshpadmakar May 11, 2021 at 2:16 AM  

या चित्रपटात अनेक अस्पर्शीत असे कंगोरे आहेत आपण त्यातील अनेक गोष्टींचा नेमकेपणा उलगडवला आहे.शरदच्या मर्यादा अधोरेखित करणारे आपले परीक्षण महत्त्वाचे आहे. संगीतच नाहीतर कोणत्याही कलाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाजार घुसला आहे. या ही चित्रपटाचा शेवट चपराक देणारा आहे. घराणी, परंपरा सांगणाऱ्या लोकांच्या पलीकडे अनेक कलाकार आणि कला आहेत ज्यांची मोजदादच नाही. जे कोणताही स्वर लागण्यासाठी, अमुक मैफलीत गाऊ अशी वाट पहात नाहीत. ताम्हाणे खूप सखोल नेत आहेत आपल्याला. आपलीच तयारी कमी पडते असे आहे एकूण... तुम्हाला हे सर्व उलगडले आहे...धन्यवाद

मिलिंद कोलटकर June 4, 2021 at 4:49 AM  

मला नाही भावला तितकासा. कंटाळवाणाच वाटला! अन माईंचे ते विचार एकसुरी अन त्या एकाच दृश्यमालिकेवर – नायक स्कूटरवरून जात असतांना – अन पुनःपुन्हा येतात. ते तर अजूनच धमाल (!) आणतात. विशेषतः ‘बंदीश बँडिट’ पाहिल्यावर मराठीतही असं काही घडतंय म्हणून उत्सुकता होती. ती फोल ठरली!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP