बर्डमॅन (ऑर द अनएक्पेक्टेड व्हर्च्यू ऑफ इग्नरन्स)

>> Sunday, July 21, 2024


ॲन्ड डिड यू गेट व्हॉट यू वॉन्टेड फ्रॉम धिस लाईफ

इव्हन सोआय डिडॲन्ड व्हॉट डिड यू वॉन्ट?

टु कॉल मायसेल्फ बिलव्हेड, टू फील मायसेल्फ बिलव्हेड ऑन द अर्थ.

(रेमन्ड कार्व्हर, लेट फ्रॅगमेन्ट)



 

अमेरिकन आणि जागतिक साहित्यात लघुकथेसाठी मानाचं स्थान पटकवलेल्या रेमन्ड कार्व्हरने लिहिलेल्या आणि त्याच्याच थडग्यावर कोरलेल्या या ओळींपासून मेक्सिकन दिग्दर्शक अलेहान्द्रो इन्यारितूच्याबर्डमॅन (ऑर द अनएक्पेक्टेड व्हर्च्यू ऑफ इग्नरन्स)’ या चित्रपटाची सुरुवात होते. इथे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली, या उताऱ्यातला आशय आणि दुसरी, म्हणजे तो रेमन्ड कार्व्हरने लिहिलेला असणं.


 बर्डमॅनचित्रपटात कार्व्हरला विशेष स्थान आहे. कारण चित्रपटातलं मुख्य पात्र रिगन थॉमस कार्व्हरच्याव्हॉट वुई टॉक अबाउट, व्हेन वुई टॉक अबाऊट लव्हया प्रसिद्ध कथेचं त्याने स्वत:च केलेलं नाट्यरुपांतर ब्रॉडवेसाठी बसवतय, आणि त्यात कामंही करतय. रिगन (मायकल कीटन) हा मूळचा हॉलिवुडचा लोकप्रिय स्टार. एकेकाळी त्याचीबर्डमॅनही सुपरहिरो व्यक्तीरेखा चांगलीच गाजलेली. मात्र अशा व्यावसायिक सिनेमात राम नाही असं समजून त्याने दोन चित्रपट करुन व्यक्तीरेखा सोडली. तेव्हापासून त्याच्या नावावर एकही चाललेला चित्रपट नाही. या नाटकाचं दिग्दर्शन हा करीअर सावरायचा त्याचा अखेरचा प्रयत्न असावा. चित्रपटाच्या सुरुवातीला येणारा उतारा, हा रिगनच्या वागणुकीशी सुसंगत म्हणून वाचता येतो. उतरत्या काळात आणि वयात, त्याला आपण घालवलेलं आयुष्य व्यर्थ असल्याची चिंता वाटतेय. ते तसं नसल्याची, आपण काहीतरी महत्वाचं करुन दाखवल्याची पावती, त्याला त्याच्या चाहत्यांकडून हवीय. त्यांच्या आणि त्याच्या स्वत:च्या नजरेतही त्याला मान हवा आहे.


 दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ती रिगनची मानसिकता. ‘बर्डमॅनला त्याने सोडलय पणबर्डमॅनने त्याला सोडलेलं नाही. त्याच्या डोक्यात या व्यक्तीरेखेचा काहीसा चिडकट आवाज ठाण मांडून बसलेला आहे. सुपरहिरो रुपात सहज यश मिळणं शक्य असताना रिगनने चालवलेली ही कलात्मक धडपड या आतल्या आवाजाला अजिबात मान्य नाही. हा रिगनच्या व्यक्तीमत्वात दडलेला बर्डमॅन रिगनभोवतालचं वास्तवही मॅनिप्युलेट करु शकतो. त्याला अधांतरी तरंगता येतं, नुसत्या नजरेने वस्तू हलवता येतात, आणि जेव्हा नाटकात वाईट काम करत असलेल्या एका कलाकाराला अपघात होतो, तेव्हा तोही आपल्यातल्या बर्डमॅनने घडवला अशी रिगनची खात्रीच असते.


 जेव्हा या कलाकाराला आयत्या वेळी बदलण्याची पाळी येते, तेव्हा सहकलाकार लेज्ली (नेओमी वॉट्स) माईक शायनरचं ( एड नॉर्टन ) नाव सुचवते. माईक अतिशय टॅलेन्टेड पण पूर्णत: बेभरवशाचा नट आहे. तो येतो आणि परिस्थिती अधिकच विस्कटते. चार दिवसांनी असलेल्या अधिकृत पहिल्या प्रयोगाआधीच्या, प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या रंगीत तालमीवजा प्रिव्ह्यूत गोंधळ होत रहातात. रिगनची ॲडीक्ट मुलगी सॅम (एमा स्टोन) हिचं माईकच्या जवळ येणं, माईकने रंगमंचावर केलेला तमाशा, रिगनचं एन्ट्रीआधी नाट्यगृहाच्या बाहेरच्या बाजूला अडकणं, असं बरच काही होतं, आणि हे नाटक रंगमंचावर येणार का नाही, याबद्दल प्रत्येकालाच शंका वाटायला लागते.


 जेव्हा एखादा चित्रपट आपल्याला कथास्वरुपात चटकन कळू शकतो, तेव्हा त्यातल्या अर्थाची खोली आपल्या चटकन लक्षात न येण्याची शक्यता खूप असते. ‘बर्डमॅनया प्रकारातलं उत्तम उदाहरण आहे. त्यात कास्टिंग चॉईस, तंत्राची योजना, अर्थाच्या विविध शक्यता, याची रेलचेल आहे, पण परफॉर्मन्स, चित्रपटाचं करमणूक मूल्य, कथानकातला ताणतणाव, या गोष्टीच तो पहाताना इतक्या प्रभावी ठरु शकतात, की त्यापुढे इतर गोष्टींकडे आपलं लक्षच जाऊ नये. उदाहरणार्थ कार्व्हरच्या कथेचा वापर. बर्डमॅन हे कार्व्हरच्या कथेचं रुपांतर नाही, आणि जरी मूळ कथेतल्या महत्वाच्या घटना आपल्याला पडद्यावरल्या नाट्यरुपात दिसल्या, तरीही ती कथा वाचलेली असणं चित्रपट समजण्यासाठी आवश्यक नाही. संवाद आणि संदर्भातून कथेतला आवश्यक तो भाग, मुख्य कथासूत्र आपल्यापर्यंत पोचवली जातात जी चित्रपटासाठी महत्वाची आहेत. प्रेम म्हणजे नक्की काय, आणि आयुष्यात त्याचं काय स्थान असू शकतं, त्याची विविध रुपं, याबद्दलची चर्चा कथेत आहे. इथे रिगनचं व्यक्तीगत आयुष्य, लेज्ली आणि माईक यांचे संबंध, अशा अनेक जागी कार्व्हरच्या कथेतली सूत्र आपण जोडून पाहू शकतो.


 चित्रपट, दिग्दर्शन, पटकथा आणि छायालेखन या सर्व विभागात ऑस्कर मिळवणाऱ्या बर्डमॅनचं इमॅन्यूएल लूबेझ्कीने केलेलं छायालेखन हे स्वतंत्रपणे अभ्यासण्यासारखं आहे. डिजीटल चित्रीकरण आल्यापासून सिंगल टेकमधे मोठ्या लांबीचे प्रसंग घेणं शक्य झालंय, आणि एकाच टेकमधे पूर्ण सिनेमा चित्रीत केल्याचीही उदाहरणं आहेत. ‘बर्डमॅनप्रत्यक्षात सिंगल टेक फिल्म नाही कारण ती चारपाच दिवसांच्या काळात घडते, आणि प्रहर, दिवस, यांमधे स्पष्ट बदल आहेत. पण दहा मिनिटांच्या लांबीचे प्रसंग संकलनात जोडून जे घडतंय ते एका न तुटणाऱ्या शॉटमधे चालल्याचा परिणाम चित्रपट साधतो. अनेकदा प्रसंगबदल हे एक व्यक्ती चालत एका ठिकाणून दुसरीकडे गेल्याने होतो, आणि ही ट्रान्झिशन्स लक्षपूर्वक पहावीत. पार्श्वभूमीला असणारं म्युझिक पात्रानुसार कसं बदलतं, हे देखील विशेष आहे. या सलग चालणाऱ्या कॅमेराच्या प्रवासाने एक ताण, एक अर्जन्सी तयार होते, जी चित्रपटाच्या फायद्याची आहे.


 एड नॉर्टन (प्रायमल फीअर, फाइट क्लब), एमा स्टोन (इझी ए, ला ला लॅन्ड, पुअर थिंग्ज ) झॅक गॅलिफिनॅकिस (द हॅन्गोवर मालिका), नेओमी वॉट्स (द रिंग, २१ ग्रॅम्स, किंग कॉंग) अशा एकाहून एक उत्तम अभिनेत्यांची रांग या चित्रपटांत आहे, पण त्यातही, मायकल कीटनची रिगनच्या भूमिकेसाठी केलेली निवड, हा इन्यारितूचा मास्टरस्ट्रोक आहे, कारण कीटनच्या पार्श्वभूमीने ही व्यक्तीरेखा अस्सल होते. दिग्दर्शक टिम बर्टननेबॅटमॅनमोठ्या पडद्यावर आणला तेव्हा तरुण मायकल कीटन या सुपरहिरो भूमिकेत होता. ‘बॅटमॅन’(१९८९) आणिबॅटमॅन रिटर्न्स’(१९९२) या दोन चित्रपटांनी तो मोठा स्टार बनला. पण त्यानंतर त्याने ही भूमिका सोडली. पुढली अनेक वर्ष तो लहान मोठ्या भूमिका करत राहिला, पण त्याला पुन्हा ते स्थान कधी मिळालं नाही. सर्वसाधारण प्रेक्षकाला त्याला पाहिल्यावर एखादी क्रिटिकली अक्लेम्ड भूमिका आठवत नसे, तर एकेकाळचा बॅटमॅन हीच त्याची ओळख बनली. त्यामुळे कीटन हा जवळपास खऱ्या आयुष्यातला रिगनच होता, आणि प्रेक्षकांना ही व्यक्तीरेखा समजवून सांगावी न लागता, केवळ कीटनचं त्या जागी असणं हे त्यासाठी पुरेसं होतं. ‘बर्डमॅनहा कीटनसाठी कमबॅक ठरला, आणि यानंतर तो पुन्हा एकदा स्टार म्हणून गणला जाऊ लागला. चित्रपटांत रिगनच्या आतला बर्डमॅन त्याला सुचवतो, की हे सारं सोडून पुन्हा व्यावसायिक सुपरहिरो फिल्म्सकडे वळणं शक्य आहे. ते जरी कीटन ने केलं नाही, तरी पुन्हा एकदा बॅटमॅन साकारण्याची संधीही त्याला २०२३ च्याद फ्लॅशमधे मिळाली.


 कला महत्वाची की व्यवसाय’, ‘रंगभूमी खरी की चित्रपटहे दोन परस्परात गुंतणारे वाद या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत, आणि प्रेक्षक म्हणून आपलं मतही त्यात महत्वाचं आहे. कल्पनेतला बर्डमॅन आणि रिगन यांच्यातला एक, आणि रंगभूमी समीक्षक डिकिन्सन आणि रिगन यांच्यातला एक असे दोन प्रसंग संबंधित बरेच मुद्दे मांडतात.


 बर्डमॅन आणि रिगन यांच्यात घडणारा संवाद जरी बराचसा रिगनच्या डोक्यात चालत असला, तरी चित्रपटांत अनेकदा आपल्याला रिगनच्या सुपरपॉवर्स दिसतात. पण या पॉवर्स फसव्या आहेत, कारण चित्रपट हा रिगनच्या मनात काय आहे, आणि वास्तवात काय घडतंय याची सरमिसळ आपल्यासमोर ठेवतो. प्रत्यक्षात काय झालं असेल याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलं जातं. हे चित्रपट कसं करतो हे मी इथे सांगत नाही कारण ते पहाण्यातच गंमत आहे. याला अपवाद ठरतो तो चित्रपटाचा शेवटचा प्रसंग, जो अनेकांना संभ्रमात पाडून गेला. या प्रसंगाला दोन परस्परविरोधी वाटणारी स्पष्टीकरणं आहेत, आणि तुम्हाला त्यातलं कोणतं स्पष्टीकरण पटतं, वा दिसतय त्याचा तुम्ही काय अर्थ लावता, हे तुम्ही चित्रपट किती लक्षपूर्वक पहाताय यावर अवलंबून आहे.

 - गणेश मतकरी

 

1 comments:

Namesstarting.com July 24, 2024 at 1:01 AM  

I read your blog and I really liked it. I have read another blog similar to this one, I liked the table very much click here

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP