भयपटाच्या चौकटीबाहेर

>> Saturday, May 31, 2008

लहानपणी आम्ही एक खेळ खेळत असू. यात राज्य असणाऱ्या मुलाने भिंतीकडे वळून काही विशिष्ट वाक्य (बहुधा असंबद्ध) म्हणायचं, अन् खेळात सामील झालेल्या इतरांनी शक्य तितकं त्याच्या जवळ पोचायचा प्रयत्न करायचा. वाक्य संपून तो वळल्यावर सर्व जण पुतळ्यासारखे स्तब्ध होणं अपेक्षित. जर कोणी हलताना दिसला, तर बाद. नाहीतर त्याने पुन्हा वाक्य म्हणायचं. इतर जण पुन्हा पुढे सरकणार. त्याच्या दिशेने. दिग्दर्शक जे. ए. बायोना दिग्दर्शित "ऑर्फनेज' या स्पॅनिश चित्रपटाची नायिकादेखील स्वतःच्या बालपणीची आठवण जिवंत करण्याच्या प्रयत्नांत असाच एक खेळ खेळते. एका जुन्या पुराण्या अनाथाश्रमाच्या भव्य पण रिकाम्या इमारतीत स्वतःवर राज्य घेऊन. या खेळातले इतर सहभागी तिचे पूर्वाश्रमीचे सवंगडी. ती एके काळी या अनाथाश्रमात असताना तिच्याबरोबरचे मित्रमैत्रिणी. मात्र, हे खेळगडी आजही त्याच वयाचे आहेत. त्यांचा मृत्यू होऊन आज कैक वर्षं लोटली आहेत. आणि एकदा प्राण गेल्यावर त्यांचं वय वाढण्याचा प्रश्नच उद् भवत नाही, नाही का? सध्या "लोकप्रिय भयपट' म्हणून अस्तित्वात असणाऱ्या धक्कादृश्यांच्या मालिकेत वेगळा म्हणून उठून दिसणाऱ्या ऑर्फनेजची खासीयत हीच, की तो प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सोप्या सवयीच्या प्रतिमांची मदत घेत नाही, तर त्यांच्या अंतर्मनाला जोखण्याचा प्रयत्न करतो. सवयीच्या, परिचित घटनांमध्ये काही अनपेक्षित घटक आणून उभा करतो. (उदाहरणार्थ, पार्टीसदृश वातावरणात मधेच डोक्यावर पिशवीसारखा मुखवटा घातलेला मुलगा दूरवर उभा दिसणं), ओळखीच्या नातेसंबंधांना (उदाहरणार्थ पालक आणि मुलं) विविध दृष्टिकोनांतून पाहतो, आणि आपल्या मनाच्या सांदीकोपऱ्यात दडून राहणाऱ्या, कोणतंही स्पष्टीकरण नसणाऱ्या भयकारी संकल्पनांना (उदाहरणार्थ, अंधार, गुहा, रिकाम्या हवेल्या, आप्ताचा मृत्यू) मोकळ्यावर आणतो. किंबहुना यातली भीती अतिशय परिणामकारक असूनही त्याला भयपटांच्या वर्गवारीत बसवणं, हे काहीसं अन्याय्य वाटतं. कारण मग त्याची तुलना केवळ त्या वर्गवारीपुरती मार्यदित होते. ऑर्फनेजला मी उत्तम भयपट म्हणणं पसंत करणार नाही; उत्तम चित्रपट जरूर म्हणेन. ऑर्फनेज सुरू होतो, तो मघा सांगितलेल्या खेळापासूनच. मात्र, या वेळी सर्वंच उपस्थित पात्रं जिवंत आहेत. या लहान मुलांच्या रंगलेल्या खेळातून लॉराला बाहेर बोलावलं जातं. ती आता स्वतःच्या नव्या घरी निघालेली असते. सवंगड्यांपासून दूर. फारच दूर. लवकरच आपण पोचतो, ते वर्तमानातल्या तीस वर्षीय लॉराकडे (बलेन रूदा.) आपला पती कार्लोस (फर्नांडो कायो) आणि दत्तक मुलगा सिमॉन (रॉजर प्रिन्सेप) यांच्याबरोबर ती पुन्हा एकदा आपल्या अनाथालयात पोचली आहे, पण मालक म्हणून. या इमारतीत स्पेशल स्कूल सुरू करण्याचा तिचा इरादा आहे. एकट्या राहणाऱ्या सिमॉनची जेव्हा काही काल्पनिक मित्रांशी मैत्री होते, तेव्हा लॉरा आणि कार्लोस आधी त्याची मानसिक गरज म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, मित्र-मैत्रिणींची संख्या वाढायला लागते, त्यांना नावं येतात, काही संदर्भ येतात जे लॉराच्या भूतकाळाकडे निर्देश करतात. गुंता वाढायला लागतो. आधीच दुर्धर रोगाने आजारी असलेल्या सिमॉनला समजावणं अशक्य व्हायला लागतं आणि अचानक सिमॉन नाहीसा होतो. "ऑर्फनेज' हा स्वतंत्र चित्रपट असला, तरी त्याची मांडणी दुसऱ्या एका चित्रपटाची स्पष्ट आठवण करून देणारी आहे. तो म्हणजे गिलेर्मो डेल टोरोचा "पॅन् स लॅबिरिन्थ.' ऑर्फनेज डेल टोरोनेच सादर केलेला आहे. त्यामुळे लॅबिरीन्थचा इथला प्रभाव हा अपघात नाही. युद्धकाळातल्या आई-मुलीची गोष्ट असलेल्या लॅबिरीन्थमध्ये फॅन्टसीचा वापर हा पाहण्यासारखा होता. फॅन्टसीचा सततचा ट्रॅक एका पात्राभोवती गुंफणं आणि चित्रपटाला दोन पातळ्यांवर सुरू ठेवणं, ही त्यातली किमया होती. इथली गोष्टही आई-मुलाचीच आहे. मात्र, फॅन्टसीऐवजी इथला ट्रॅक आहे तो भयाचा. त्यातल्याप्रमाणेच एका विशिष्ट पात्राभोवती फिरणारा. अखेर त्याचा परिणाम म्हणून लॅबिरीन्थप्रमाणेच इथल्या शेवटालाही दोन दृष्टिकोनातून पाहता येतं. सुखांत आणि शोकांत. प्रत्येक प्रेक्षकाने आपल्यापुरती निवड करावी. बऱ्याचदा भयपटांचा परिणाम हा तेवढ्यापुरता असतो. कारण त्याचं संपूर्ण लक्ष, हे दृश्य भागाकडे असतं. त्यामुळे ते आपल्या कल्पनांचा खोलात जाऊन विचार करत नाहीत. परिणामी त्यांना आपसूकच मर्यादा येते. ऑर्फनेजला अशी मर्यादा येत नाही. कारण मुळात यातलं भूत हे भूतकाळाचं आहे. घडलेल्या घटना या आपण लक्षात ठेवतो. मात्र, त्या खरोखरच तशा घडलेल्या असतात का, हे कोणी सांगावं? कदाचित आपलं मन त्यांना सोयीस्करपणे बदलून घेत असेल, अधिक सोपी, पटण्यासारखी आवृत्ती करून स्वतःचंच समाधान करून घेत असेल. मात्र, कधीतरी अशीही वेळ येऊ शकते, की आपल्या आठवणीशी विसंगत असं काही अनपेक्षितपणे आपल्यासमोर येऊन उभं ठाकेल. आणि आपल्या मनाला त्याचं काही स्पष्टीकरणच देता येणार नाही. या चित्रपटातल्या लॉराचा पेच हा काहीसा या जातीचा आहे. त्यामुळे इथली भुतं ही तिच्या नजरेतून आलेली आहेत. ती प्रत्यक्ष आहेत, का आपल्या आठवणीतल्या विसंगतींना साधण्यासाठी तिच्या मनानं उभारलेल्या प्रतिमा आहेत? इथं चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना आपल्यापुरती निवड करायला सांगतो, दोन्ही शक्žयतांचा पुरेशा तपशिलात विचार करून आणि सोयीस्कर योगायोगांचा अन् फसगतींचा वापर न करता. इथली लॉराची व्यक्तिरेखा निश्चित आकार आणि आलेख असलेली असण्यामागेही हेच कारण आहे. अश्रद्ध म्हणून सुरवात होणारी ही व्यक्तिरेखा टप्प्याटप्प्याने बदलत अधिकाधिक गुंतागुंतीची अन् खरी होत जाते. चित्रपट हा सिमॉनने केलेल्या नव्या मित्रांपासून सुरू झाला तरी त्याचा केंद्रबिंदू हा लॉरा आहे. ऑर्फनेजमध्ये भयपटांच्या चाहत्यांना आवडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. (बॉडी काउंटदेखील आहे, पण तो प्रामुख्याने भूतकाळातला) धक्के आहेत, भुतं आहेत, माफक प्रमाणात (फारच माफक) हिंसादेखील आहे. मात्र, त्याचा मूळ प्रभाव जे पडद्यावर दिसतंय, त्यापेक्षा अधिक त्यातून काय सुचवलं जातंय यावर आहे. भयपट आणि विचार यांचं गेल्या काही वर्षांत जे वावडं आहे, त्यावर ऑर्फनेज हा उतारा आहे. काही चित्रपट पाहताना सल्ला दिला जातो, की डोकं बाजूला ठेवून पाहा. इथं मात्र मी बरोबर विरुद्ध सल्ला देईन. तुम्ही जेवढं डोकं अधिक वापराल तेवढा चित्रपट अधिक भावेल, उमजेल, स्पष्ट होईल.
-गणेश मतकरी

Read more...

वास्तवाचा तुकडा - टिंग्या

>> Friday, May 30, 2008

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या दोन बैलांनी धुमाकूळ घातलाय हे सर्वश्रुत आहे. गावच्या माजलेल्या बैलाभोवती दंतकथाचं मोहोळ निर्माण करणारा "वळू' आणि माणुसकीचा युनिव्हर्सल संदेश देणारा "टिंग्या' हे उमेश कुलकर्णी आणि मंगेश हाडवळे या दोन तरुण दिग्दर्शकांचे उल्लेखनीय प्रथम प्रयत्न. समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांचं अमुक एका प्रमाणात लक्ष वेधून राहिलेले. दोन्ही यशस्वी असले तरी दोघांनी जणू यशाची विभागणी केलेली. मुक्ता आर्टससारख्या मातब्बर संस्थेच्या पाठिंब्याने "वळू' जाहिरात अन् प्रत्यक्ष प्रदर्शन यामध्ये बाजी मारून गेला आणि शैलीदार दिग्दर्शन तसंच सहज विनोदी संवादांच्या आधाराने प्रेक्षकांमध्येही त्याने हवा तयार केली. त्यामुळे यंदाच्या कोणत्याही मराठी चित्रपटाच्या तुलनेत त्याने नफा अधिक मिळवला. दुर्दैवाने पारितोषिकं आणि इतर सन्मानाबाबत त्याची फार उपेक्षा झाली. अनेक ठिकाणी त्याला नामांकन नाकारण्यात आली, काही चित्रपट महोत्सवांनी त्याला डावलला आणि काही वेळा उघडपणे कमी दर्जाच्या निर्मितींना त्याच्या वर स्थान देण्यात आलं. हे असं का ते मला कळलं नाही. विचार करूनही कळत नाही. "वळू'मध्ये काहीही चुका नाहीत किंवा तो यंदाचा सर्वोत्तम चित्रपट आहे असं मला उघडच म्हणायचं नाही. त्याची पटकथा सदोष असल्याचं तर मी वऴूच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. मात्र त्याची संकल्पना, दिग्दर्शनातले प्रयोग आणि मांडणीतली चतुराई या गोष्टी निश्चितच दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. पारितोषिक नाकारणं आपण समजू शकतो, कारण ते एकाच उत्तम सर्वोत्तम निर्मितीला देण्यात येतं. पण नामांकन, चित्रपट महोत्सवातले प्रवेश, याबाबतही जेव्हा उदासीनता दिसून येते, तेव्हा परीक्षकांच्या किंवा निवड समितीच्या हेतूबद्दल वा ज्ञानाबद्दल शंका उपस्थित होऊ शकते. याच्या बरोबर विरुद्ध केस "टिंग्या'ची. त्याची आर्थिक बाजू "वळू'हून कमी प्रमाणात लढवण्यात आली असली, तरी त्याच्या दर्जाचा मात्र सर्व ठिकाणी यथोचित सन्मान झालेला आहे. अनेक पारितोषिकं मिळवणारा "टिंग्या' सर्वत्र गाजतो आहे. आता प्रश्न असा, की ज्या संबंधितांना "टिंग्या'चा दर्जा लक्षात येतो, ते "वळू'च्या दर्जाबद्दल नको इतके उदासीन का? की बैलाचे दोन सिनेमे आहेत ना, मग कोणता तरी एकच निवडा!' असा काही चमत्कारिक निकष इथे लावला गेलाय? असो. निदान "टिंग्या'कडे दुर्लक्ष करण्यात आलं नाही, हे काय कमी आहे? इराणी वास्तववादाशी आणि मजिद मजिदीसारख्यांच्या चित्रपटांशी नातं सांगणारा "टिंग्या' हा अनेक दृष्टींनी गुणी चित्रपट आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा टिंग्या (शरद गोयेकर) आणि त्याचा चितंग्या हा बैल यांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. टिंग्याला पार्श्वभूमी आहे ती शेतकऱ्यांच्या सध्याच्या बिकट अवस्थेची. टिंग्याच्या वडिलांनी आधीच सावकाराकडून कर्ज काढलेलं आहे, जे फेडणं त्यांना जड जातंय. अशातच शेतीसाठी वापरण्याचा त्यांचा बैल चितंग्या एका खड्ड्यात पडतो अन् जायबंदी होतो. शेतीचं कामकाज ठप्पं होतं. पैशांच्या चिंतेनं ग्रासलेल्या वडिलांच्या मनात चितंग्याला खाटकाला विकायचे विचार घोळायला लागतात. मात्र चितंग्याला थोरल्या भावासारखा मानणारा टिंग्या याला विरोध करण्यासाठी आपली कंबर कसतो. ज्यांनी नजीकच्या भूतकाळातले इराणी चित्रपट पाहिले असतील, त्यांना "टिंग्या'मध्ये अनेक साम्यस्थळं सापडतील. साधी, आडवळणांनी न जाणारी कथा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणता येतीलशा कुटुंबांमधली माणसं, अत्यंत अस्सल वातावरण, नट असल्याची शंकाही येणार नाही अशा जिवंत व्यक्तिरेखा आणि एकाच वेळी प्रादेशिक अन् जागतिक वाटणारा विषय, अशा अनेक घटकांबाबत हे म्हणता येईल. इराणमध्ये अनेकदा नॉन ऍक्टर्स वापरण्याची, म्हणजेच सराईत अभिनेत्यांना न घेता भूमिकेत चपखल बसणाऱ्या कोणालाही घेण्याची प्रथा अनेक वर्षं आहे. मंगेश हाडवळेने पूर्णपणे नॉन ऍक्टर्स घेतलेले नाहीत, मात्र हे चेहरे खूप ओळखीचे नाहीत आणि विठ्ठल उमप किंवा चित्रा नवाथेसारख्या ओळखीच्या चेहऱ्यांच्या बाबतीतही त्यांना दिलेल्या बेअरिंगमुळे किंवा रंगभूषा/ वेशभूषेमुळे त्यांच्या पडद्यावरच्या वावरात आपल्याला ओळख जाणवत नाही. प्रमुख भूमिकेतला शरद गोयेकर तर नवाच आहे. एकुणात काय, तर रशिदाच्या भूमिकेतली लहान मुलगी सोडता कोणीही अभिनय करतोय वा सांगितलेले संवाद म्हणतोय असं वाटत नाही. इथे जे दिसतंय ते खरं असल्याचीच आपली भावना होते. टिंग्याचा विषय हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा संदर्भ असलेल्या भीषण सामाजिक वास्तवापासून ते बैलबाजारासारख्या स्थळांच्या तपशिलापर्यंत पूर्णतः आपल्या मातीतून येणारा असला तरी त्याचा विषय हा अखेर मूलभूत मानवी भावभावनांशी नातं सांगणारा आहे, ज्या जगाच्या पाठीवर कुठंही बदलू शकत नाहीत. त्यामुळे त्यातली भारतीय पार्श्वभूमी जरी त्याला प्रादेशिक बाज देत असली, तरी जगभरातल्या कोणालाही तो समजायला कठीण नाही. त्याला जे म्हणायचंय ते तो माणुसकीच्या भाषेत सांगतो आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की ज्याप्रमाणे तो आपल्या प्रेक्षकांना आवडतो आहे त्याचप्रमाणे तो विदेशी रसिक, आणि त्यांचे समीक्षक/ अभ्यासक यांनाही आवडण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना त्याला मिळालेल्या पारितोषिकांमधल्या विदेशी परीक्षकांच्या सहभागावरूनही हे सिद्ध होतंय. त्यामध्ये भारतीय चित्रपटांकडून अपेक्षित असणारा तथाकथित बॉलिवूडी मसाला नसला तरी तो त्यातल्या आशयासाठी सर्वांना आवडेल हे स्पष्ट आहे. अर्थातच निदान माझ्या नजरेतून यंदा ऑस्कर स्पर्धेत पाठवण्यासाठी हा योग्य उमेदवार आहे. या प्रकारचा चित्रपट (उदाहरणार्थ चिल्ड्रन ऑफ हेवन) यापूर्वी ऑस्कर नामांकनात आलेला आहे आणि या प्रकारच्या ज्यूरीमध्ये दिसणारं छोटेखानी, मानवतेचा संदेश देणाऱ्या विषयांचं आणि जिवंत व्यक्तिरेखांचं प्रेम तर आपण जाणतोच. चतुर मांडणी अन् तंत्रचमत्कारांना विटलेल्या या मंडळींना हा वास्तवाचा तुकडा पकडून ठेवण्याची क्षमता ठेवून आहे. अर्थात आपल्याकडे चालणाऱ्या राजकारणापुढे अशी रास्त निवड होण्याची शक्यता कितपत आहे, हा प्रश्न विचार करण्याजोगा. पण असं घडलं तर आपण नामांकनात येण्याच्या शक्यतेत लक्षणीय वाढ होईलसं मात्र वाटतं. "टिंग्या' तांत्रिक बाजूंत थोडा अधिक सफाईदार होऊ शकला असता. छायाचित्रणात थोडी अधिक कारागिरी येऊ शकली असती. संगीताचा वापर थोडा अधिक संयत होऊ शकला असता. मात्र एकूण परिणाम पाहायचा, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. मंगेश हाडवळेचा हा पहिलाच चित्रपट आहे. शिवाय तो दिग्दर्शक बनला आहे तो अनुभवातून; तंत्रशुद्ध शिक्षणातून नव्हे. त्यामुळे त्याला पारंगत होण्यासाठी काही काळ लागला तर समजण्यासारखं आहे. त्यामुळे तांत्रिक सफाई हा त्याच्यासाठी काळजीचा मुद्दा असण्याची गरज नाही. मात्र आपल्या पुढल्या प्रोजेक्टची निवड हा मात्र जरूर असायला हवा. पहिल्याच चित्रपटात या प्रकारचं यश आणि अमुक शैलीचा छाप बसणं, या दोन्ही गोष्टी एका परीनं धोकादायक आहेत, कारण त्या या दिग्दर्शकाकडून वारेमाप अपेक्षा तयार करतात, जे त्याची पुढल्या कामाची निवड आपसूकच कठीण बनवतं. त्याच्या दृष्टीनं पाहायचं, तर ते तितकंसं न्याय्य नाही. प्रेक्षकांनी त्याला उद्योगात सरावायला, चुका करायला, त्यापासून शिकायला वेळ द्यायला हवा. मात्र अनुभव सांगतो, की हा वेळ दिला जात नाही. प्रेक्षकांना आपल्या अपेक्षा पूर्ण होतीलशी खात्री असते, अन् कोणत्याही सबबी ते ऐकून घेत नाहीत. त्यामुळे सध्या आपण या तरुण दिग्दर्शकाचं अभिनंदन करू आणि त्याला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. त्यांची गरज त्याला पडेलच.
- गणेश मतकरी

Read more...

अप्रतिम गाणी आणि रसरशीत अनुभव

>> Tuesday, May 27, 2008

वास्तव आयुष्यातल्या व्यक्तींवर आधारित असणारे चरित्रपट अधिक आव्हानात्मक असतात. कारण नाट्यमयतेसाठी पदरचे प्रसंग घालणं धोक्याचं असतं. प्रेक्षकाला अखेरपर्यंत धरून तर ठेवायचं असतं, पण त्यासाठी "सिनेमॅटिक लिबर्टी' तर घेता येत नाही! अशा परिस्थितीतही "वॉक दी लाईन' एक चांगला सिनेमा आहे. त्याला कारणीभूत आहे, जोकिन फिनिक्स आणि रीज विदरस्पून या दोघांचा खणखणीत अभिनय आणि गोष्टीत वापरलेली अर्थवाही गाणी. प्रसिद्ध अमेरिकन गायक जॉन कॅश आणि त्याच्यासोबत कार्यक्रम करणारी, अखेरीस त्याच्या प्रेमात पडलेली गायिका जून कार्टर-कॅश यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा. जॉन (जोकिन फिनिक्स) एका गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा. कामधंद्याच्या शोधात तो गाव सोडून शहराकडे निघतो. तेव्हा त्याच्यापाशी संगीतावरचं अफाट प्रेम असतं आणि मोठ्या भावाच्या अपघाती मरणाला कारणीभूत ठरल्याचा अपराधी गंडही. हा गंड आणि वडिलांच्या कडक स्वभावाचा, तिरस्काराचा एक धाक जन्मभर जॉनची पाठ सोडत नाहीत. त्यात प्रेमात पडून घाईघाईनं केलेलं लग्न. बायको विवियन (जिनिफर गुडविन) आणि मुलांची जबाबदारी. जॉनची अनेक बाजूंनी होत असलेली घुसमट. त्याला वाट मिळते, ती संगीतातूनच. धीर गोळा करून केलेलं त्याचं पहिलंवहिलं रेकॉर्डिंग गाजतं आणि जॉन रातोरात स्टार होतो. प्रसिद्धी, पैसा, यश... आणि पाठोपाठ आलेली ड्रग्स-दारू अशी व्यसनंही. त्याच सुमारास त्याच्या आयुष्यात जून कार्टर (रीज विदरस्पून) ही गायिका येते. तिचा मनमोकळा खेळकर स्वभाव, जॉनचं संगीत समजून घेण्याची क्षमता, त्याला ठराविक अंतरावर थांबवण्याची-आवरण्याची तिची ताकद, खंबीरपणा... यातून तो तिच्यात गुंतत जातो. त्या दोघांच्या एकत्र येण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे "वॉक दी लाईन'ची गोष्ट. खुद्द जून कार्टर-कॅश यांनीच रीज विदरस्पूनची या भूमिकेसाठी निवड केली होती. रीजनं ती सार्थ ठरवली आहे. तिचा खंबीर स्वभाव, जॉनवरचं प्रेम, त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांचीही वाटणारी काळजी. त्यातून त्याला सावरण्याची धडपड... सगळंच अप्रतिम. तसंच जॉनचं काम करणाऱ्या जोकिन फिनिक्सचंही. त्याच्या स्वभावातला उत्कटपणा, जूनसाठी वेडावून जाणं, तिच्या आधारासाठी तडफडणं आणि एकीकडे संसाराच्या जबाबदारीनं दुभंग होत जाणं.... जोकिननं मूर्तिमंत साकारलं आहे. मात्र जूनची व्यक्तिरेखा जशी आतून ताकद घेऊन येणारी वाटते, तसं जॉनचं होत नाही. त्याच्या कलावंतपणाला न्याय देताना, माणूस म्हणून तो काहीसा खलत्वाकडे झुकला आहे. त्याचा हट्ट, आकांत, बेफिकिरी यांना निव्वळ स्वार्थाची छटा आली आहे. अर्थात हे जोकिनचं अपयश नव्हे, हे मान्य करायलाच हवं.
जोकिन आणि रीज यांनी स्वतःच गायलेली गाणी नुसतीच गाणी नाहीत. त्यांच्या सहज अर्थवाही शब्दातून त्या दोघांची मनं व्यक्त होत राहतात. त्यांची उत्कट नाती विणली जातात. गोष्ट पुढे जात राहते. तुरुंगातल्या आपल्या चाहत्यांसाठी जॉनने फल्कन तुरुंगात सादर केलेला कार्यक्रम म्हणजे या गायक-दांपत्याच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा भाग. तिथल्या कैद्यांच्या उत्कट प्रतिसादातून जॉनचा सच्चा सूर आणि त्याचं जूनवरचं प्रेम आपल्यापर्यंत पोचत राहतं. हा सच्चा सूर असलेली गाणी आणि त्या दोघांचाही रसरशीत अभिनय यासाठी तरी " वॉक द लाईन' पाहायलाच हवा.
-मेघना भुस्कुटे

Read more...

विसंवादाचं अस्वस्थ रूप

>> Thursday, May 22, 2008

एका गोष्टीनुसार कोणे एकेकाळी संपूर्ण मानवजातीची भाषा एकच होती. त्यामुळे अर्थातच सर्व मानवजात एकत्र येऊन सर्वशक्तीनिशी कोणतंही काम करून दाखवू शके. अशातच एकदा मेसोपोटेमियात मानवानं आव्हान दिलं ते थेट स्वर्गाला. त्यांनी स्वर्गापर्यंत पोचेलसा मनोरा बांधायला घेतला. हा मनोरा म्हणजे टॉवर ऑफ बेबल पुरा होण्याआधीच देवानं हालचाल केली आणि अनेक भाषा उत्पन्न केल्या. त्यामुळे या मनोऱ्यावर काम करणाऱ्यांना एकमेकांमध्ये संवाद साधणंच शक्य होईना. मानवजात जगभरात विखुरली गेली आणि मनोरा अर्धवटच राहिला. हा विसंवाद पुढं मानवजातीत कायमच राहिला. मात्र, त्याची मुळं खोलवर पसरत गेली. विविध देशांमध्ये त्यांच्या राजकीय धोरणांमुळे, सामाजिक परिस्थितींमुळे तो वाढत तर गेलाच आहे, वर एका समाजाच्या, एका कुटुंबाच्या लोकांपर्यंत, समाजाच्या छोट्यात छोट्या घटकांपर्यंत पोचला आहे.
कम्युनिकेशन ब्रेकडाऊन किंवा सर्व स्तरांमधला वाढता विसंवाद हे प्रमुख कथासूत्र असणाऱ्या बेबलचं नाव महत्त्वाचं आहे. कारण ते यातल्या कथाभागाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं हे सांगतं. विसंवादातून उत्पन्न होणारा गोंधळ म्हणजे "बेबल.'
दिग्दर्शक आलिआन्द्रो गोन्जालेस इनारित् आणि पटकथाकार गिलेर्मो आरिआगा यांचा एकत्रितपणे केलेला हा तिसरा चित्रपट. याआधीचे त्यांचे चित्रपट म्हणजे "आमोरस पेरोस' ज्यावरून मणीरत्नमचा युवा प्रेरित होता आणि "ट् वेन्टीवन ग्रॅम्स' हे दोन चित्रपट आणि बेबल यांच्यामध्ये एक महत्त्वाचं साम्य आहे, ते रचनेचं. तीनही चित्रपटांची कथानकं ही अधिक छोट्या गोष्टींमध्ये विभागण्यात आली आहेत आणि या गोष्टींचं आणखी विभाजन करून त्यांना कालक्रमात पुढेमागे फिरवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपटांचे परिणाम हे एखाद्या जिग सॉ पझलप्रमाणे आहेत, जिथं सुरवातीचे काही तुकडे आपल्याला केवळ गोंधळून टाकण्यापलीकडे काहीच करत नाहीत. मात्र, यथावकाश अधिक तुकडे समोर आल्यावर आपली नजर स्पष्ट व्हायला लागते आणि चित्र आकार घ्यायला लागतं. तीन चित्रपटांतला सर्वांत गुंतागुंतीचा होता ट् वेन्टीवन ग्रॅम्स, तर आशयाच्या दृष्टीनं अधिक प्रभावी आहे बेबल. या तिघांना रचनात्मक चित्रत्रयी म्हणणं वावगं ठरणार नाही.
बेबल उलगडतो चार संबंधित गोष्टींमधून. पहिली आहे ती मोरोक्कोमधल्या गरीब शेतकऱ्याच्या मुलांची. या शेतकऱ्याने आपल्या शेळ्यांच्या कळपाला लांडग्यांपासून वाचवण्यासाठी एक बंदूक विकत घेतली आहे. मुलं ही बंदूक वापरतात ती चुकीच्या टारगेटवर, ज्याचा परिणाम हा शोकांत होतो. दुसरी गोष्ट आहे रिचर्ड (ब्रॅड पिट) आणि सुझन (केट ब्लॅंन्चेट) या पती-पत्नीची. ही दोघं जात असणाऱ्या बसमध्ये शिरलेली गोळी सुझनच्या मानेजवळ जखम करते आणि आधीच एका दुःखातून बाहेर पडलेल्या या दोघांवर जीवावरचं संकट येतं. तिसरी गोष्ट आहे अमेलिया (एड्रिआना बाराझा) सांभाळत असलेल्या रिचर्ड आणि सुझनच्या दोन मुलांची (एली फॅनिंग आणि नेथन गॅम्बल). रिचर्ड/सुझन मोरोक्कोत अडकल्यानं अमेलियाला स्वतःच्या मुलाच्या लग्नाला मेक्सिकोत जाता येत नाही. कारण मुलांकडे पाहणारे कोणी नाही. मग ती आणि तिचा भाचा सान्तिआगो मुलांना घेऊन निघतात; पण परत येताना मेक्žसिकोच्या सीमेवरल्या पोलिसांना संशय येतो आणि परिस्थिती बिघडते.
या तीन गोष्टी ढोबळपणे एकमेकांना जोडलेल्या असल्या तरी चौथी त्यामानानं खूपच वेगळी आहे. तिचा संबंध या घटनांशी आहे, पण दूरचा. ही गोष्ट आहे जपानमध्ये राहणाऱ्या चिएकोची (रिंको किकोची). चिएको ऐकू आणि बोलू शकत नाही. आवाजात बुडून गेलेलं जग तिच्यासाठी परकं आहे. तिच्या आईनं आत्महत्या केली आहे, तर वडिलांशी तिचा संवाद उरलेला नाही. खरं तर कोणाशीच.
चिएकोची व्यक्तिरेखा ही यातल्या कथासूत्राला संपूर्णपणे व्यक्त करणारी प्रमुख व्यक्तिरेखा आहे, किमान आशयदृष्ट्या. संवादाचा अंत हा तिच्याबाबतीत पूर्णपणे झालेला आहे. ती जगाला समजून घेऊ शकत नाही, ना जग तिला. दिग्दर्शक भोवतालचं ध्वनिप्रदूषित जग तिच्या नजरेतून आणि त्रयस्थपणे दाखवताना आवाज घालवतो आणि पुन्हा आणतो. हे प्रसंग अतिशय परिणामकारक आहेत आणि त्यातली क्लृप्ती साधी वाटली तरी विचार थेटपणे पोचवणारी आहे. या प्रसंगामधली बदलत्या दृष्टिकोनाबरोबर होणारी आवाजाची ये-जा चिएकोच्या जगाची अंशतः कल्पना देऊन जाते.
बेबलमध्ये अमेरिका, मेक्सिको, मोरोक्को आणि जपान या चार ठिकाणांमध्ये विभागलेल्या एकाच घटनेच्या तुकड्यांमधले गोंधळ तर संपर्क नसल्याने, असून वापरता न आल्याने, सरकारी धोरणांमुळे आणि अपसमजांमुळे- गैरसमजांमुळे होतात, पण त्याखेरीज चित्रपटात महत्त्वाचा ठरतो तो व्यक्तिगत पातळीवर वाढत जाणारा विसंवाद. रिचर्ड आणि सुझन हे दोघे त्यांच्या लहान मुलाच्या अपमृत्यूने हळवे झाले आहेत, पण ते एकमेकांशी बोलत नाहीत. नुसतेच कुढत राहतात. मोरोक्कोमधल्या शेतकऱ्याला त्याची मुलं काय करू शकतात हे ठाऊक नाही आणि मुलंही घडलेल्या घटनेनंतर त्याला विश्žवासात घेत नाहीत. अमेलिया आपल्या अडचणी ना रिचर्डपर्यंत धडपणे पोचवू शकत, ना आपल्या भाच्यापर्यंत आणि चिएकोचं तर आईच्या मृत्यूनंतर सगळं जगच हरवलेलं आहे. तिचे वडील तिला समजू शकत नाहीत आणि इतर जगावरचा तिचा राग आणि संपर्काची नड दाखवून देण्यासाठी तिला चुकीचे मार्ग अवलंबावे लागतात. बेबलमधलं हे जवळच्या माणसांचं अनोळखी होणं ही आजच्या आधुनिक समाजवास्तवाची सर्वांत मोठी शोकांतिका आहे.
अनपेक्षित परिणाम
विसंवादाखेरीज आणखी काही सूत्रांनाही इनारित् नं जवळ आणलं आहे. पहिलं म्हणजे आपल्या वागण्याचे अनपेक्षित परिणाम. इथं मोरोक्कोमधल्या शेतकऱ्यानं आपल्या कळपाच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलल्याचा परिणाम हा मेक्सिकोच्या उजाड प्रदेशात दोन अमेरिकन मुलांच्या मृत्यूची शक्यता तयार करतो. यातली कोणतीच गोष्ट जाणूनबुजून केली जात नाही. प्रत्येकानं घेतलेले निर्णय हे त्याच्यापुरते असतात. मात्र, त्याचा परिणाम दिसतो वेगळ्याच ठिकाणी. छोट्याशा हालचालीचे हे दूरगामी अकल्पित परिणाम अपघाती जरूर वाटतात, पण रचलेले नाहीत. ही शक्यता आपल्याला आपल्या वागण्याचा विचार एका वेगळ्या पातळीवर करायला लावते. या दोन प्रमुख कल्पनांबरोबरच आधुनिकतेमधून येणारा एकटेपणा, कायद्यानेच सामान्यांना गुन्हेगार ठरवणं, माणसं ओळखण्यात होणारी चूक, दुःखाची विविध रूपं आणि ती व्यक्त होण्याच्या पद्धती यासारखी अनेक छोटी सूत्रं दिग्दर्शक पुढे आणतो.
बेबलचं दृश्य रूप हे त्यातल्या बदलत्या पार्श्वभूमीने, वास्तववादी चित्रणानं आणि देशोदेशीच्या कलावंतांनी एकत्र येण्याने बनलं आहे, जे हल्लीच्या दोन चित्रपटांची आठवण करून देतं. स्टीफन गगान यांचा सिरीआना (2005) आणि शोडरबर्गचा "ट्रॅफिक' (2000). आर्थिक राजकारण, दहशतवाद, राजकीय धोरण आणि सामान्यांचं आयुष्य एकदुसऱ्याशी संबंधित असल्याचा दावा करणारा सिरीआना आणि ड्रग ट्रेडच्या विविध बाजू दाखवणारा ट्रॅफिक हे दोन्ही चित्रपट त्या-त्या वर्षीच्या उत्तम चित्रपटात होते. ऑस्कर नामांकनातही होते आणि ट्रॅफिक तर पारितोषिकप्राप्तही ठरला.
हॉलिवुडचा नवा चित्रपट एकेकाळच्या स्टुडिओ चित्रपटांहून किती पुढं गेला आहे, हे बेबल पाहून लक्षात येईल. आपल्याकडे आजही असा मोठा प्रेक्षकवर्ग आहे जो हॉलिवुडच्या गुजऱ्या जमान्यातच रमतो आणि स्टुडिओच्या कारकिर्दीलाच सुवर्णकाळ मानतो. आखीवरेखीव आणि हमखास करमणुकीपेक्षा अधिक देण्याचा आजच्या हॉलिवुडचा प्रयत्न हा स्टुडिओ कारकिर्दीहून नक्कीच वरचढ आहे आणि हे सर्व थरांवर मान्य होण्याची गरज आहे. भूतकाळात रमण्यापेक्षा हा प्रगतिशील वर्तमानकाळच चित्रपटसृष्टीला पुढं नेणारा ठरेल.
-गणेश मतकरी

Read more...

गोष्टीपलीकडे...

>> Monday, May 19, 2008

रोड मुव्ही हा चित्रप्रकार महत्त्वाचा असला तरी अलीकडे बराच बदनाम झाला आहे. 1969 च्या इझी रायडरपासून मोटारसायकल डायरीजपर्यंत काही चांगले सिनेमे या चित्रप्रकाराने जरूर दिले असले तरी एकूण हा प्रकार फारच उथळ व्हायला लागला आहे. हे खरंच. खासकरून हॉलीवूडमध्ये तारुण्याच्या उंबरठ्याचे प्रवास, सेक्शुअल स‌जेशन्स, प्रवासाशी स‌मांतर रेखाटलेलं व्यक्तिरेखांचे ढोबळ आलेख आणि अपेक्षित शेवट यामुळे या जॉनरपासून अपेक्षा न ठेवण्याचीच वृत्ती प्रेक्षकांमध्ये वाढायला लागली आहे. या प्रकारची चौकट वापरून त्यात स्वतःचे वेगळ रंग भरणारा सिनेमा म्हणून नाव घ्यावं लागेल ते अँड युअर मदर टू ( y mama tambien) या सिनेमाचं.
2001मध्ये हा सिनेमा बनवला. तेव्हा दिग्दर्शक आल्फान्सो क्वारोन यांचे दोन अमेरिकन सिनेमे बनवून झाले होते, मात्र ही निर्मिती अमेरिकेत न करता त्यांनी मेक्सिकोची वाट धरली. कारण अनेक. एकतर त्यांचा चित्रपट हा जितका त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांविषयी होता, तेवढाच मेक्सीकोविषयी होता. दुसरं म्हणजे त्यांना ज्या प्रमाणात लैंगिकतेचा वापर करायचा होता. तेवढा अमेरिकन रेटिंग सिस्टिमच्या तावडीतून सुटण्यासाठी नव्हता. आणि तिसरं म्हणजे त्यांना स्टुडियोचा वरचष्मा नको होता.


हा सिनेमा ब-याच प्रमाणात दोन स्तरांवर उलगडतो. पहिला स्तर आहे तो सांकेतिक वळणांचा. पण तोही पूर्णपणे नाही. इथे दिसते ती हुलियो (गायेल गार्शिया बर्नाल) आणि टेनोच (दिएगो लूना)
यांनी लुईजा (मॅरेबिल वर्दो) या त्यांच्याहून वयाने मोठ्या ,पण बिनधास्त मुलीबरोबर केलेल्या प्रवासाची कथा. हुलियो आणि टेनोच ही श्रीमंत, वाया गेलेली मुलं आहेत. अमली पदार्थांचा नाद आणि सेक्स या गोष्टींपलिकडे त्यांना काही दिसत नाही. त्यांचं आयुष्य केवळ या दोन विषयांभोवती फिरतं. त्यांच्या मैत्रिणींबरोबर त्यांचे शरीरसंबंध आहेतच. पण शरीराचा केवळ एका मुलीइतका संकुचित वापर करणं त्यांना मंजूर नाही. स‌बब ते स‌तत नव्या संधीच्या शोधात असतात. लुईजाशी एका लग्नात त्यांची गाठ पडते. टेनोचच्या एका लांबच्या भावाची ती पत्नी असते. मुलांच्या लाळघोटेपणाला ती दाद देत नाही. त्यांनी दूरवरच्या एका रम्य स‌मूद्रकिना-यावर नेण्याचं दिलेलं आमंत्रणही ती हसून ऎकून घेते. पण विसरून जाते. तर तिला आठवतं ते नव-याचा बाहेरख्यालीपणा स‌मोर आल्यावर ही मुलं, नव-याच्या दुष्कर्माला तिने दिलेलं उत्तर ठरणार असतात. ती लगेचच टेनोचला फोन करून येण्याचं मान्य करते आणि प्रवास सुरु होतो.सिनेमात सेक्सला भरपूर वाव आहे. आणि त्याचं पुरेसं स्पष्ट चित्रण हे कारणाशिवाय नुसतं आंबटशाैकिनांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही. दोन बायकांचं संकुचित जग दाखविण्यासाठी नात्यानात्यातला फरक दाखविण्यासाठी, शरीरसंबंधांकड़े पाहण्याचे विविध दृष्टिकोन चित्रित करण्यासाठी, असा वेगवेगळ्या कारणांनी योजलेला हा वापर आहे. कुणाला हा मोकळेपणा खटकू शकेल, पण त्या प्रसंगातून दिग्दर्शकाला काय सुचवायचं आहे,याचा विचार केल्यास तसं होण्याची शक्यता कमी.
सिनेमाचा दुसरा स्तर आहे, तो मेक्सिकोमागचं मेक्सिको दाखविणारा. एक आर्थिकदृष्ट्या संपन्न असणा-या उन्मत्त स‌माजामागे अनेकदा दुर्लक्षित अर्थदुर्बल घटक असतात, ज्यांचं अस्तित्त्व श्रीमंत स‌माज मान्य करीत नाही. किंवा त्याच्या लेखी ते अस्तित्त्वातच नसतं. असं सुचविणारा हा स्तर आहे. हा सिनेमात येतो, तो प्रसंगांचं जोडकाम करणा-या निवेदकामार्फत किंवा स‌मोर चाललेल्या दृश्यांच्या पार्श्वभूमीला घडणा-या , पण प्रमुख पात्रांच्या नजरेस न पडणा-या दृश्यांमधून. इथला निवेदक पूर्णपणे त्रयस्थ आहे. त्याला जशी प्रमुख पात्रांची माहिती आहे. तशीच आजूबाजूला इतरांचीही असावी. कधी ती त्याच्या बोलण्यात येते तर कधी नाही. पण त्याला ती जाणवत असल्याचं दिसून येतं. उदाहरणार्थ मंडळी स‌मुद्रकिना-यावर पोहोचल्यावर तिथे जवळ राहणा-या कोळी कुटुंबांकडून त्यांचं आदरातिथ्य केलं जातं. थोड्या पैशांच्या मोबदल्यात त्यांच्या राहण्या जेवण्याचा प्रश्न सोडवला जातो. इथे निवेदक आपल्याला कळवतो, की लवकरच हा रम्य किनारा एक मोठी हॉटेल कंपनी विकत घेईल. या कोळी कुटुंबाचा रोजगार जाईल. कुटुंबप्रमुख नोकरी शोधायला शहराची वाट धरेल. आणि अखेर परत येऊन या जागी उभारलेल्या हॉटेलात एक सामान्य नोकरी पत्करेल. ही छोटी चार वाक्यांत येणारी गोष्ट आपल्याला एका आर्थिक स्थित्यंतराची चाहुल देऊन अनेकांची प्रातिनिधिक परिस्थिती मांडते.
या प्रकाराची माहिती किंवा बड्या बापांच्या बेट्यांच्या हाैशी प्रवासादरम्यान मागे दिसत राहणारी लष्कर, अपघात, मोर्चे,रोडब्लॉक्स यांची दृश्यही एका वेगळ्या जगाला आपल्यापुढे आणतात. या दोन जगातली वाढती दरी तर आपल्यापुढे येतेच, वर आपल्या क्षुल्लक लहरींना नको इतकं महत्त्व देणारी तरुण पिढी किती उथळ आहे. हेदेखील स‌मोर येतं.
केवळ गोष्टीपलीक़डे पाहणा-यांना अँड युअर मदर टू हा इंग्रजीतर भाषेतील सिनेमांसाठी आँस्कर नामांकनात (लगान होता त्याच वर्षी) का होता, हे कळलंच नाही. त्यासाठी त्यांनी गोष्टीपलीकडे पाहण्याची आवश्यकता आहे. हा सिनेमा जे सांगतोय असं वाटतं, त्यापलीकडे जाऊन काहीतरी सांगणारा आहे. आपण किती ऎकू शकतो, हे आपल्यावर आहे.
-गणेश मतकरी

Read more...

दोन युद्धपट

>> Wednesday, May 14, 2008

माझ्या एका मित्राची अशी आवडती थिअरी आहे, की भारतीयांचा इतिहास इतर देशांच्या मानाने कमी रक्तरंजित असल्याने आणि युद्धात प्रत्यक्ष सामील होण्याच्या वेळा क्वचित आल्याने युद्धपट (आणि काही प्रमाणात इतर गंभीर चित्रपटदेखील) बनवण्याला लागणारा अनुभव आपल्या दिग्दर्शकांमध्ये कमी पडतो. साहजिकच आपल्याला युद्धपट हाताळता येत नाहीत. यावर दाखला म्हणून तो हिटलरची कारकीर्द, व्हिएतनाम युद्ध यासारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक कालावधींवर आधारित उत्तम चित्रपटांची उदाहरणे देतो आणि समोरच्याला गप्प करून टाकतो. मला हे फारसे पटत नाही. हे म्हणजे आपल्याला युद्धपट बनवता येत नाहीत हे नव्हे, ते तर उघडच आहे, पण आपला युद्धविषयक अनुभव कमी पडतो. कारण इंग्रजीची हुकूमत ही फार लोकांचा बळी घेणारी नसली तरी मानसिक अत्याचार करणारी जरूर होती. (मायकेल मूरच्या "बोलिंग फॉर कोलंबाईन' या ऑस्करविजेत्या डॉक्युमेंटरीमध्ये तर रक्तरंजित इतिहासाचे तुलनात्मक उदाहरण म्हणून इंग्रजांच्या भारतावरच्या अत्याचाराचा उल्लेखही आढळतो.) त्याशिवाय इंग्रजांबरोबर महायुद्धात घेतलेला भाग किंवा स्वातंत्र्यानंतरची युद्धे, फाळणीनंतर पाकिस्तानबरोबर बिघडत गेलेले संबंध अशा गोष्टी होत्या. नाही असे नाही, पण काही कारणाने आपल्या चित्रकर्त्यांचे आणि युद्धपटाचे गणित जमले नाही ते नाहीच. हे सगळे आठवायचे कारण, दोन चित्रपट. युद्धाविषयी सामान्य नागरिकांवर, खासकरून मुलांवर होणाऱ्या परिणामांविषयी असलेले हे चित्रपट; पण त्यांना युद्धपट म्हणता येणार नाही. यातला एक आहे बाहमन गोबादीचा "टर्टल्स कॅन फ्लाय', तर दुसरा झियाद दोईरीचा "वेस्ट बेरूत'! युद्धामुळे जनजीवनावर झालेला परिणाम आणि मुलांचा दृष्टिकोन, तसेच प्रमुख भूमिका. हे सोडले, तर मात्र हे एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे चित्रपट आहेत. दोघांचा परिणाम मात्र एकच... अस्वस्थ करणारा. गोबादी मुळात यशस्वी डॉक्युमेंटरी बनवणारा दिग्दर्शक. त्याची "लाइफ इन फॉग' ही इराणमध्ये बनलेली सर्वांत प्रसिद्ध डॉक्युमेंटरी मानली जाते. पुढे प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक किआरोस्तमी यांच्याबरोबर सहायकाचे काम केल्यावर गोबादी चित्रपटाकडे वळला. त्याच्या पहिल्याच "ए टाईम फॉर ड्रंकन हॉर्सेस' चित्रपटाचे कान महोत्सवात चांगले स्वागत झाले. "टर्टल्स...' हादेखील त्याच्या पहिल्या चित्रपटाच्याच प्रकारात मोडणारा चित्रपट आहे, मात्र थोडा अधिक विदारक. हा घडतो इराक आणि टर्कीच्या सीमेवरल्या एका निर्वासितांच्या छावणीत. छावणी म्हणजे झोपडीवजा घर, टाकाऊ लोखंडी सामानाचे ढीग आणि त्यातून धावणारी मुले... यातली अनेक युद्धामुळे अपंग झालेली. कोणाला हात नाहीत, तर कोणाला पाय. तरी बालसुलभ उत्साहाने ही मंडळी सर्वत्र धावपळ करताना दिसतात. यांचा नेता बारा-तेरा वर्षांचा सॅटेलाईट (सोरान एब्राहिम) हा या छावणीतल्या मोठ्यांपेक्षा अधिक कर्तबगार वाटणारा. इराकमधली सद्दामची राजवट अमेरिका उलथून टाकेल असे मानून त्या बातमीची वाट पाहणारा, आपली सजवलेली सायकल घेऊन फिरणारा, मुलांना असणारे शेतातले सुरुंग वेचून देण्याचे एकुलते एक काम वाटून देणारा आणि नंतर या सुरुंगांच्या बदल्यात भाड्याने बंदुका आणणारा. डिश अँटेना लावून टीव्हीवरच्या कार्यक्रमांची सोय करणारा. सॅटेलाईटचे आग्रिन या मुलीवर प्रेम आहे, पण ती त्याला दाद देत नाही. एका तीनेक वर्षांच्या मुलाला काखोटीला मारून ती सॅटेलाईटला चुकवत फिरते. हा तीन वर्षांचा मुलगाही आग्रिन आणि तिचा दोन्ही हात नसलेला भाऊ हेन्कोव (हर्ष फैजल) यांचा भाऊ असावा असे वाटते. नंतर कळते, की तो आग्रिनचा मुलगा आहे. इराकी सैनिकांनी केलेल्या बलात्कारातून झालेला. आग्रिनला तो नकोसा वाटतो; आणि जगणंही. "टर्टल्स...'ला खरे तर चित्रपट आणि डॉक्युमेंटरी यांचे मिश्रण म्हणावे लागेल. कारण त्याचे एकूण स्वरूप हे कथा सांगण्यापेक्षा या लोकांच्या जगण्याचे चित्र उभे करण्याचे आहे. यातले कलाकार उघडच सराईत अभिनेते नसून, या प्रकारचे आयुष्य खरोखरीच जगणारे कुर्दी रहिवासी/ निर्वासित आहेत. गोबादीला चित्रपटाला राजकीय रंग आणण्यात रस नाही. त्यामुळे "टर्टल्स...' ना सद्दामच्या विरोधात आहे, ना बुशच्या. तो कोणतीही बाजू न घेता त्रयस्थपणे परिस्थिती मांडतो. तिची भीषणता आपल्याला अधिक जाणवते, तीही त्यामुळेच. "वेस्ट बेरूत' मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात चित्रपटासारखा आहे. 1975 च्या सुमारास लेबनॉनमध्ये राहणाऱ्या तीन मुलांची गोष्ट हा रेखीवपणे सांगतो. पण हा रेखीवपणा प्रामुख्याने संहितेच्या पातळीवरचा आहे. प्रत्यक्ष दृश्यांमध्ये वास्तववाद जाणवण्यासारखा आहे. तारेक (रामी दोईरी, दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ) आणि ओमार (मोहंमद कामास) हे जवळचे मित्र. त्या वेळी फ्रेंचांच्या ताब्यात असणाऱ्या आणि श्रीमंत शहर समजल्या जाणाऱ्या बेरूतमधल्या फ्रेंच शाळेत जाणारे. 13 एप्रिल 1975 नंतर इथे युद्धाला तोंड फुटते आणि शाळा बंद होते. आपल्याला अचानक मिळालेल्या स्वातंत्र्याचा सुरवातीला या दोघांना आनंदच होतो. त्यांची मे (रोलाडाल अमीन) या मुलीशी मैत्री होते अन् तिघे उनाडक्या करायला लागतात. कारेकचे आई-वडील हे आनंदी जोडपे आहे, पण युद्धग्रस्त बेरूतमध्ये राहण्याच्या तणावाने त्यांच्यात कुरबुरी वाढायला लागतात, आर्थिक तणावही वाढतात. आणि या तिघांचे बालपण लवकरच संपून जाते. वेस्ट बेरूतमध्ये युद्धाची पार्श्वभूमी आहे, पण महत्त्व व्यक्तिरेखांत अधिक आहे. युद्धाच्या सुरवातीपासून त्याचे वाढत जाणारे गांभीर्य याचा मुलांवर आणि तारेकच्या पालकांवर होणारा परिणाम एका चढत्या आलेखाद्वारे व्यवस्थित मांडण्यात येतो. हा आलेख दिग्दर्शकाला महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनांमध्ये त्याने थोडा फेरफारही केला आहे. त्यामुळे चित्रपटाचा परिणाम निश्चित वाढतो. गंमत म्हणजे दोइरी हा क्वेटीन टेरेंटिनो या विक्षिप्त लोकप्रिय दिग्दर्शकाच्या तीन चित्रपटांचा कॅमेरामन असूनही त्याच्यावर टेरेंटिनोच्या अतिशय संसर्गजन्य शैलीचा जराही प्रभाव दिसत नाही. वेस्ट बेरूतची तुलना त्रुफॉंच्या "फोर इंड्रेड ब्लोज' या पहिल्या चित्रपटाशी केलेली आहे आणि तीच अधिक रास्त आहे. "टर्टल्स...' आणि "वेस्ट बेरूत' या दोन्ही चित्रपटांमध्ये तपशिलाला मात्र विलक्षण महत्त्व आहे आणि ते या मुलांची आयुष्ये खऱ्या अर्थाने जिवंत करते. "टर्टल्स...'मध्ये असणारा सुरुंग काढून विकण्याचा धंदा, हेन्कोकचे भविष्य वर्तवणे किंवा सॅटेलाईटला तळ्यात न सापडणारे लाल मासे जसे महत्त्वाचे आहेत, तसेच वेस्ट बेरूतमध्ये ओमारच्या कॅमेऱ्यातली फिल्म डेव्हलप करण्याचा प्रयत्न, वेश्यागृहाला मुलांनी दिलेली धावती भेट, शेजाऱ्यांची भांडणे यासारख्या गोष्टींना महत्त्व आहे. हे छोटे प्रसंग, यातल्या व्यक्तिरेखा आपल्यापर्यंत अधिक चांगल्या रीतीने पोचवतात. आपल्यावर ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले असे आपण म्हणतो, पण या कालावधीवर आपल्याकडे कितीसे चित्रपट आले? जे थोडेफार आले ते बहुधा कोणा ना कोणा थोर व्यक्तीच्या चरित्राचा भाग म्हणून आले. पण या वेळी सामान्य माणसाचे काय चालले होते? हा आपला इतिहास आपल्या दिग्दर्शकांना नाट्यपूर्ण वाटत नाही, का ज्याप्रमाणे इंग्रजांचे पुतळे काढून आणि जागांची नावे बदलून आपण इतिहास पुसण्याचा व्यर्थ प्रयत्न चालवला आहे त्याप्रमाणेच आपण चित्रपटांमध्येही ब्रिटिशांना अनुल्लेखाने मारणार आहोत? मला माझ्या मित्राची थिअरी पटत नाही ती यासाठीच. आपल्याला कमी आहे ती इतिहासाची नाही, तर तो मांडू शकणाऱ्या संवेदनशील, सर्जनशील कलावंतांची. सत्य समोर आणण्यापेक्षा ते विसरून मनोरंजनाचे रंगीत फुगे फुगवण्यातच आपल्याला रस आहे, अन् कदाचित त्यामुळेच आपला चित्रपट-उद्योग दिवसेंदिवस अधिक बेगडी होत चालला आहे. केवळ युद्धपटांपुरता नव्हे, तर एकूणच.
-गणेश मतकरी

Read more...

कथेपलीकडे जाऊ पाहणारा "वळू'

>> Sunday, May 11, 2008

काही वर्षांपूर्वी "श्वास' नामक चित्रपटाने "मराठी चित्रपटसृष्टी' असा काहीसा प्रकार अस्तित्वात असल्याची जाणीव लोकांना करून दिली आणि आपल्या चित्रोद्योगात एक नवीन चैतन्य आणून दिलं. तथाकथित बॉलिवूडलासुद्धा याची दखल घ्यायला लागली आणि "श्वास'पासून मराठी चित्रपटसृष्टीनं कात टाकली, असा प्रवाद प्रचलित झाला. खरं तर ही अतिशयोक्ती. कारण दर्जाच्या दृष्टीनं पाहायचं तर आपल्याकडं फार मोठा फरक पडला नाही. डोंबिवली फास्ट, आम्ही असू लाडके, रेस्टॉरंट यांसारखे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके खरेखुरे चांगले चित्रपट सोडले तर अधिक करून आनंदच होता. हे चित्रपट बनवणाऱ्या निशिकांत, अभिराम, सचिनसारख्या तरुण दिग्दर्शकांबरोबरच सुमित्रा भावे, अमोल पालेकर यांच्यासारखे काही ज्येष्ठ दिग्दर्शकही कार्यरत होते, आहेत. मात्र या काही मंडळींच्या प्रामाणिक कामगिरीबरोबर इतरांच्या मध्यम वा दर्जाहीन कामाचं प्रमाण खूप जास्त आहे. "श्वास'मुळे अनेक निर्माते-दिग्दर्शक पुढे झाले ही गोष्ट खरी, पण पुढे होणं हे पुरेसं नाही. अखेर महत्त्व आहे ते पडद्यावर काय येतं त्याला. जे चित्र आजही फार आशादायक नाही. अशा परिस्थितीत पुण्याच्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून चित्रपट प्रशिक्षण घेतलेल्या उमेश कुलकर्णीच्या "वळू'मुळे पुन्हा एकदा धामधूम होऊन मराठी चित्रपटांचं कौतुक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रॉटरडॅमच्या चित्रपटमहोत्सवासाठी झालेली वळूची निवड, मुक्ता आर्टस् नं वितरणासाठी घेतलेली पहिली मराठी निर्मिती, वेगळा विषय, तांत्रिक हुशारी आणि उत्तम अभिनय, अशा अनेक बाबतींत वळूनं आगमनातच लक्ष वेधून घेतलं आहे. शहरी प्रेक्षकांपर्यंत तो सहज पोचेलशा मोक्याच्या जागा काबीज करून वितरकांनी तो पाहिला जाईल, हीदेखील काळजी घेतली आहे. एकूण वातावरण उत्साहाचं आहे. प्रीमिअरच्या वेळी मी तो पाहिला तोही अशाच उत्साहाच्या वातावरणात. वळूचं कथानक घडतं ते कुसावडे या महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावात. या गावात वळू मोकाट सुटलेला आहे. देवाच्या नावानं सोडलेल्या या बैलाला आवर घालणं कोणालाच जमलेलं नाही. अखेर ही जबाबदारी येऊन पडते ती स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी) या फॉरेस्ट ऑफिसरवर. वरच्यांच्या दबावामुळे हातातलं महत्त्वाचं काम सोडून त्याला कुसावड्याला निघावं लागतं अन् जंगली जनावरं पकडणाऱ्याला बैल पकडण्याची जोखीम स्वीकारावी लागते. गावात त्याला सामोऱ्या येतात त्या अनेक इरसाल व्यक्तिरेखा. जीवन्या (गिरीश कुलकर्णी) तर आल्याआल्याच त्याचा ताबा घेतो. गड्डमवारच्या भावाच्या हाती असलेल्या कॅमेऱ्यानं अन् त्याच्या डॉक्युमेंटरी बनवण्याच्या विचारानं भारून गावचे सगळेच लोक कॅमेऱ्यासमोर चमकण्यासाठी वळूची काहीबाही माहिती देतात; मात्र ती परिस्थिती स्पष्ट न करता अधिकच गोंधळायला लावणारी असते. दरम्यान, सरपंच (मोहन आगाशे) आणि गावचं तरुण नेतृत्व आबा (नंदू माधव) यांच्यातला वाद अधिकच पेटतो आणि आबाच आपल्या साथीदारांसह वळूला पकडण्याची तयारी करतो. दरम्यान, लक्षात येतं, की वळूला प्रत्यक्ष पकडणंही गड्डमवारला आधी वाटलं तेवढं सोपं नाही. मात्र तो हे आव्हान स्वीकारायचं ठरवतो. वळूमध्ये (केवळ मराठी चित्रपटातच नव्हे, तर एकूणच) स्वागतार्ह वाटण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. वातावरणनिर्मिती आणि व्यक्तिचित्रण यांचा सर्वांत आधी खास उल्लेख हवा. गावाची पार्श्वभूमी, त्यातल्या अनेक छोट्या-मोठ्या व्यक्तिरेखा यांचं थोडक्यात पण स्पष्ट केलेलं चित्रण ही पटकथेची जमेची बाजू आहे. भटजी (दिलीप प्रभावळकर) आणि त्याची पत्नी (निर्मिती सावंत), सांगी (अमृता सुभाष), सखूबाई (ज्योती सुभाष) यांसारख्या पडद्यावर फार काळ नसणाऱ्या व्यक्तिरेखाही या ठळक रेखाटनामुळे लक्षात राहण्याजोग्या झाल्या आहेत. या व्यक्तिरेखांसाठी घेतलेली मंडळीही त्याला निश्चितच जबाबदार आहेत. छोट्यात छोट्या भूमिकांसाठीही दिग्दर्शकानं निवडलेली माणसं ही अभिनयासाठी नावाजलेली आणि इतरत्र मोठ्या भूमिका करणारी प्रथितयश मंडळी आहेत. त्यांनी या भूमिका स्वीकारण्यातही त्यांची नवीन करून पाहण्याची आवड अन् दिग्दर्शकावरला (पर्यायानं फिल्म इन्स्टिट्यूटवरला?) विश्वास दिसतो. गावचं चित्रणही तपशिलात अन् अस्सल झालेलं आहे. देऊळ, माळ, गावकरी भेटण्याच्या जागा, हागणदारी अशी अनेक ठिकाणं इथे बेमालूम उतरली आहेत. एकूणच वातावरण त्यातल्या गावकऱ्यांसह एखाद्या मिरासदारांच्या गोष्टीप्रमाणे मिस्कील पण खरंखुरं वाटणारं आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि छायाचित्रकार सुधीर पळसणे यांनी तांत्रिक बाजूही उत्तम सांभाळल्या आहेत. दृश्यांची रचना, छायाप्रकाशाचा, अवकाशाचा प्रसंगानुरूप करण्यात आलेला वापरदेखील लक्षात राहण्याजोगा आहे. किंबहुना एकूण दृश्यरूपाबाबतच हे म्हणता येईल. मात्र या सर्व चांगल्या गोष्टी असूनही काही खटकणाऱ्या गोष्टींचा उल्लेख हा आवश्यक वाटतो. ज्यांचा संबंध हा प्रामुख्याने संहितेशी आहे, जिचा व्यक्तिचित्रणाचा भाग उत्तम असला तरी कथानकाचा आलेख हा फसवा वाटतो. इथं पडणारा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गावात सुटलेला बैल हा खरा की रूपक? खरं तर रूपकाचा वापर असलेल्या पटकथा या वास्तव आणि रूपकात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर पोचायला हव्यात. मात्र ते क्षणभर बाजूला ठेवू. प्रश्न पडण्याचं एक कारण म्हणजे बैलाचा प्रचंड त्रास असल्याचा अन् सहा महिन्यांपासून अधिक काळ तो सुरू असल्याचा इथं उल्लेख आहे. हे रूपक असेल तर आपण ही गोष्ट समजून घेऊ; पण वास्तव असेल तर बैलानं इतका काळ पसरवलेली दहशत ही पटण्यासारखी नाही. त्यातून इथं गावकऱ्यांच्या कथांमधून दहशत पसरवणारा बैल हा प्रत्यक्षात फारच शांत दिसतो, इतका की जो उपद्रव करेलशी शंकाही येऊ नये. इथं पटकथा आणखी एक गोष्ट सुचवते, ती म्हणजे बैल खरा शांतच असावा अन् आख्यायिका गावकऱ्यांच्या डोक्यातून आल्या असाव्यात. यासाठी एका प्रसंगी आपल्याला बैलाचा निरुपद्रवीपणा दाखवलाही जातो आणि त्याच्या बाजूनं बोलणारी सखूबाई, आजा आणि वेडी ही तीन पात्रंही उभी केली जातात. मात्र पुढे एकदा सखूबाईच म्हणते, की गावकऱ्यांनी त्रास दिल्यानंच बैल बिथरला. मग जर तो बिथरला, तर त्याचा बिथरलेपणा हा दृश्यांमध्ये दिसून का येत नाही? नाही म्हणायला एकदा त्यानं सायकल तोडल्याचं किंवा आज्याला मारल्याचं वा आणखी काहीबाही सांगितलं जातं, मात्र जेव्हा हे प्रत्यक्ष दाखवलं जात नाही तेव्हा हीदेखील कोणा उचापत्या गावकऱ्याची खोडी असेलसं वाटायला लागतं. थोडक्यात म्हणजे, बैल निरुपद्रवी आहे आणि गावचे गोष्टी रचतायत, बैल गावकऱ्यांमुळे खरोखरचा पिसाळलाय, का गावकरी प्रामाणिक आहेत आणि बैल हा नैसर्गिकपणेच बिथरलाय, याविषयी पटकथा ठाम निर्णय देत नाहीत. बरं, असं मानलं, की वळू हे विचारस्वातंत्र्याचं रूपक आहे आणि समाज त्याच्यावर दडपण आणू पाहतोय, तर समाजानं केलेला अन्याय हा संदिग्ध असता कामा नये. स्पष्ट हवा. फॉरेस्ट ऑफिसर हा वास्तवात हतबल होऊ शकेल; पण जेव्हा तो विचारस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्यांचं प्रतीक म्हणून उभा राहतो तेव्हा तो गोंधळात पडलेला दिसणं हे रूपकात्मकतेलाच मारक ठरणारं आहे. इथं तो प्रवृत्ती म्हणून उभा राहणं गरजेचं आहे. बरं, पटकथेतलं राजकारणही फार ढोबळ आहे. सरपंच आणि आबा यांच्यामध्ये सुरवातीला दिसून येणारा तिढा हा शेवटपर्यंत तसाच राहतो. चाली-प्रतिचाली सोडा, याच्या स्वरूपातही बदल होत नाही. त्यातून एक बाजू तर पूर्ण वगळल्यासारखी वाटते. ती म्हणजे धर्माची. वळू हा देवाच्या नावानं सोडलेला बैल असल्याचं चित्रपट सांगतो. गावातल्या एकुलत्या एका देवळाचा एकुलता एक भटजी इथल्या व्यक्तिरेखांमधला एक आहे. मग त्याला वळूबद्दल काहीच म्हणायचं नाही का? गावकऱ्यांच्या धोरणातला महत्त्वाचा भाग भटजीच्या भूमिकेवर अवलंबून नाही का? मात्र इथं भटजीला दिलेली भूमिका नगण्य आणि हास्यास्पद आहे. का, ते कळायला मार्ग नाही. मध्यंतरापर्यंतचा भाग हा गावकऱ्यांच्या गोष्टींनाच दिलेला असल्यानं कथा इथं पुढं सरकत नाही अन् चित्रपट स्टॅटिक होतो आणि तो खेळता ठेवायची जबाबदारी येते ती नट मंडळींवर. मात्र अभिनयाची बाजू अन् उत्तम लिहिलेले संवाद हा भाग सुसह्य करतात. पटकथेमुळे चित्रपटात शिरलेल्या दोषांसकटही "वळू' हा दुर्लक्ष करण्याजोगा चित्रपट नाही. त्याच्यामागं असणारा विचार, त्यातून काही सांगण्याचा केलेला प्रयत्न, हा अपघाती नाही, तर जाणीवपूर्वक केलेला आहे. त्याला रंजनमूल्य तर आहेच, मात्र तेदेखील केवळ हसवण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या हास्यठेकेदाराच्या पलीकडं जाणारं आहे. त्याचा हेतू अधिक संमत, अधिक प्रामाणिक आहे. उमेश कुलकर्णीचा गाजलेला लघुपट "गिरणी' आणि आता वळू पाहिल्यावर हे सहजपणे लक्षात येतं, की हा दिग्दर्शक केवळ कथा सांगण्यावर समाधानी नाही, तर आपल्या चित्रपटामधून अधिक काही देण्यावर त्याचा कटाक्ष आहे. वळूला जर प्रसिद्धी/ वितरणाला शोभेसा प्रतिसाद मिळाला तर कदाचित अशा लक्षवेधी प्रयत्नांकडे ओढा सुरू होईल. (अर्थात, हा केवळ ग्रामीण चित्रपट आहे असं समजून ग्रामीण विनोदी चित्रपटांची लाट येण्याचा धोकाही समोर आहेच.) निदान या वेळी तरी वळूपासून प्रेरणा घेऊन मराठी चित्रपट खरोखरच कात टाकतील, ही सदिच्छा.
-गणेश मतकरी

Read more...

नात्यांची रहस्यकथा

>> Tuesday, May 6, 2008

ज्यांनी कुरोसावाचा राशोमान पाहिला असेल, त्यांना एकच घटना भिन्न दृष्टिकोनातून कशी बदलते हे लक्षात आलं असेल. राशोमानमधली घटना होती, ती एका संभाव्य बलात्कार आणि खूनाची. इथे प्रत्येक स‌हभागी व्यक्तिरेखेच्या नजरेप्रमाणे घटनेचा रोख बदलत जातो. स‌त्याचं ते पाहणा-याच्या नजरेप्रमाणे बदलणं दाखविणा-या राशोमानची खास बाब होती, की त्यात घटनांना त्रयस्थपणे कधीच दाखवण्यात येत नाही. त्या कायम कोणाच्या निवेदनातून येतात. याचं कारण म्हणजे दिग्दर्शकाला खरं काय घडलं यात रस नसून केवळ ती घटना पाहणा-यास आहे.
दिग्दर्शिका लेटीरिआ कोलोम्बानीच्या ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट चित्रपटाचाही व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनाशीच खेळ चालतो. मात्र इथे घटना प्रत्यक्ष निवेदनातून येत नाहीत. घडलेल्या घटनांचं दोन वेगळ्या पद्धतीने संकलन करून इथे एक कथा रचली जाते. कदाचित प्रेमाने आलेल्या नैराश्याची.कदाचित आणखी कस‌ली तरी.
इथली प्रमुख पात्र दोन. अँजेलिक (औड्री टोटो) ही चित्रकलेची तरुण विद्यार्थिनी आणि लुईक (सँम्युएल -ल- बिहान) हा एक यशस्वी कार्डीओलॉजिस्ट. अँजेलिकचं लुईकवर प्रेम आहे. लुईकचं लग्न झालंय. पण तो घटस्फोट घेणार असल्याचं त्याने अँजेलिकला सांगितलंय.अँजेलिकवर एका स‌मवयस्क डॉक्टरचं एकतर्फी प्रेम आहे. पण ती त्याला प्रतिसाद देत नाही. ती लुईक आपल्या एकटीचा कधी होईल याचीच वाट पाहण्यात मग्न आहे.
ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट संपूर्ण पाहिला तर लक्षात येईल की त्याचा विषय फारसा नवा नाही. तो आधी अनेक चित्रपटांमध्ये यशस्वीपणे मांडला गेला आहे. इथली गंमत आहे तो ज्या पद्धतीने मांडण्यात आला आहे त्यात. चित्रपट सुरू होतो, तो अँजेलिकने फुलांच्या दुकानातून एक सुंदर गुलाब निवडण्यापासून. जो ती आपल्या प्रियकराला पाठवून देते. तो गुलाब घेतल्यावर आणि बरोबरची चिठ्ठी वाचल्यावर लुईकच्या चेह-यावर उमटणारी स्मितरेषा ही प्रेक्षकांना या दोघांच्या नात्याबद्दल बरंच काही सांगून जाते. तेही संवादाशिवाय. या प्रसंगाला आपण दिग्दर्शिकेने निवडलेल्या शैलीचा प्रतिनिधी म्हणू शकू. इथे काय घडतंय, आणि त्याचा अर्थ कसा लावायचा, हे ब-याच अंशी प्रेक्षकांवर सोडलेले दिस‌ते. जो अर्थ अभिप्रेत आहे, तो स‌र्ववेळी बरोबर असेल याची मात्र काहीच शाश्वती नाही.
चित्रपटाच्या अर्ध्यावर त्याची गोष्ट जवळजवळ संपते आणि तो पुन्हा पहिल्या, म्हणजे गुलाबाचं फुल निवडण्याच्या प्रसंगावरून सुरू होतो. या खेपेला आपल्याला थोडी अधिक किंवा थोड़ी वेगळी माहिती दिली जाते. जी आपण पाहिलेल्या गोष्टींचे आतापर्यंतचे स्पष्ट न झालेले काही पैलू उलगडून दाखवेल. या प्रकारची कथनशैली केवळ चित्रपटातच शक्य होणारी म्हणावी लागेल. कारण प्रत्यक्षात एका क्रमाने जाणा-या गोष्टीचा स‌र्व भाग चित्रित करून दिग्दर्शिकेने त्यातलं काय कधी प्रेक्षकांना दाखवायचं आणि काय लपवून ठेवायचं यामध्ये निवड केलेली आहे. विशिष्ट प्रसंगांचा संदर्भ आल्याने इथे प्रसंगांचा पूर्ण अर्थच बदलून गेलेला आपल्याला दिसतो. तो त्यामुळेच.
ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट त्यातल्या वेगळेपणासाठी आणि रचनेतल्या प्रयोगासाठी उल्लेखनीय असला तरी तो कथेच्या पातळीवर पूर्ण स‌माधानकारक नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे त्याचा दुसरा भाग हा जवळजवळ आधी घातलेल्या कोड्याचं स्पष्टीकरण असल्यासारखा येतो. आणि ते स्पष्टीकरण कोणत्या प्रकारचं अस‌णार ते कळल्यावर मग दर प्रसंगाला पूर्ण करण्याची तेवढी गरज वाटत नाही, कारण एक दोन प्रसंगांमधूनच अँजेलिक आणि लुईक यांच्या संबंधाचा अर्थ आपल्याला लागतो. जो पुढे बदलत नाही, केवळ अधिक माहिती दिल्यासारखा उलगडतो.
चित्रपटाची वर्गवारी करायची झाल्यास रोमान्स किंवा थ्रिलर या दोन्ही चित्रप्रकारात करावी लागेल. पण अंतिमतः ही वर्गवारी अपुरी ठरेल. कारण रोमान्स‌चा भास होऊनही तो रोमँटिक नाही, हे त्यातला आशय सांगतो, तर थ्रिलर हे त्याच्या एकूण कथेशी प्रामाणिक वर्गीकरण असलं, तरी ते रचनेच्या बाबतीत चपखल न बसणारं आहे. हा चित्रपट ही नात्यांची रहस्यकथा आहे. त्यातलं रहस्य कोणाला किती आवडेल, ते ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर आहे. मात्र ते आवडलं, न आवडलं तरी त्याचा चित्रभाषेशी संबंधित वेगळेपण मात्र लपणारा नाही. संकलन ही चित्रपटातील किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे हा चित्रपट पाहून आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
-गणेश मतकरी

Read more...

स्वच्छ, सुंदर "सनशाईन'

>> Friday, May 2, 2008

छोटी ऑलिव्ह (ऍबिगेल ब्रेस्लिन) टीव्ही बघते आहे. टीव्हीवर रेकॉर्डेड ब्यूटी कॉन्टेस्टचा शेवटचा भाग सुरू आहे. म्हणजे विजेती घोषित करण्याचा. नावाची घोषणा होते आणि सर्वसाधारणपणे सर्व सौंदर्यस्पर्धांमध्ये पाहायला मिळणारा आश्चर्याचा, आनंदाचा अभिनय सुरू होतो, काढल्या जात असणाऱ्या फोटोंसाठी चेहरा शक्य तितका आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न करत. ऍबिगेल हे विस्फारल्या डोळ्यांनी पाहते. मग कार्यक्रम थोडा मागे नेते, नावाच्या घोषणेआधीच्या क्षणापर्यंत, तिथून पुन्हा सुरवात करते. मात्र या खेपेला ती पडद्यावरच्या सौंदर्यसम्राज्ञीबरोबर हालचाल करून तालीम करायला लागते. विजेतेपद मिळवायचं, तर ही नंतर करायच्या अभिनयाची तयारी हवीच! 2007मध्ये गोल्डन ग्लोब मिळवलेल्या आणि ऑस्कर नामांकनात स्थान मिळवलेल्या "लिट्ल मिस सनशाईन' चित्रपटाची ही सुरवात. ही महत्त्वाची अशासाठी, की अतिशय थोडक्या वेळात आणि शब्दांशिवाय ती आपल्याला बरंच काही सांगते. पहिलं म्हणजे चित्रपटाच्या नावात सुचवलेल्या आणि चित्रपटातली महत्त्वाची घटना असलेल्या सौंदर्यस्पर्धेला कथासूत्रातला एक महत्त्वाचा घटक म्हणून पुढे करते. ऑलिव्हच्या निरीक्षणातून आणि तालमीतून या स्पर्धांचं बेगडी स्वरूप स्पष्ट करते. चित्रपटाचा या सौंदर्याच्या कृत्रिम प्रदर्शनाकडे पाहण्याचा उपहासात्मक आणि बोचरा विनोदी दृष्टिकोन समोर आणते आणि त्याचबरोबर गंभीर विषयाकडे चित्रपट तिरकसपणे पाहू इच्छितो, असंही सांगते. ऑलिव्हचं पात्र या स्पर्धांनी कसं झपाटलंय, हे तर दाखवतेच, वर तिच्या रूपाशी स्पर्धकांचा असणारा विरोधाभास समोर मांडून पुढे स्पष्ट होणाऱ्या एका कळीच्या मुद् द् याचीही प्रेक्षकाला पहिली जाणीव करून देते. मायकेल आर्न्टने लिहिलेल्या आणि जोनथन डेटन/ व्हॅलरी फेरीस या पती-पत्नीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा विशेष हाच आहे, की तो प्रत्येक प्रसंगाचा, प्रत्येक संवादाचा शक्य तितका अधिक वापर करतो. जे प्रत्यक्ष दिसत आहे त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. वर सांगितलेल्या प्रसंग हे याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मिस सनशाईन फिल गुड प्रकारातल्या चित्रपट आहे आणि तो प्रेक्षकाला सतत हसवत ठेवतो. सरळ सरळ विनोदी चित्रपटांपेक्षा हे काम कठीण आहे, कारण त्यातल्या व्यक्तिरेखा आणि घटना या जवळजवळ संपूर्णपणे गंभीर म्हणण्यासारख्या आहेत. डिसफंक्शनल कुटुंब या विषयावर अमेरिकेत अनेक चित्रपट बनत असतात. मात्र क्वचितच ते या चित्रपटाइतके परिणामकारक असतात. साधारणपणे याच कल्पनेवरला पण कथानक आणि रचना संपूर्णपणे वेगळी असणारा "अमेरिकन ब्यूटी'देखील "सनशाईन'प्रमाणेच गांभीर्य आणि विनोदाची सांगड घालणारा होता. त्यामुळे त्याची आठवण इथं होणं साहजिक आहे. तरीही या दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे तो नॅरेटिव्ह स्टाईल किंवा निवेदनशैलीचा. ब्यूटीमध्ये ती गडद आणि व्यक्तिरेखांमधल्या दोषाला ठळकपणे समोर आणत राहणारी होती. "सनशाईन' मात्र हे दोष समजून घेऊनही व्यक्तिरेखांच्या सकारात्मक बाजूकडे अधिक लक्ष पुरवताना दिसतो. रिचर्ड (ग्रेग किनाऊर) आहे इथला कुटुंबप्रमुख, जो यशस्वी होण्याचे मार्ग दाखवणारा अयशस्वी मोटिव्हेशनल स्पीकर आहे. आयुष्य हे जिंकणारे आणि हरणारे या दोघांचंच बनलेलं असतं यावर त्याचा ठाम विश्वास आहे. आपण यातल्या दुसऱ्या वर्गात पडतो, हे तो मान्य करू शकत नाही. शेरील (टोनी कोलेट) त्याची पत्नी, जी आपल्या विक्षिप्त कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. ड्वेन (पॉल डानो) आणि ऑलिव्ह ही या दोघांची मुलं. ऑलिव्हला सौंदर्यस्पर्धांचं वेड आहे, तर ड् वेननं मौनव्रत धारण केलंय. शेरीलच्या फ्रॅन्क (स्टीव्ह कारेल) या विद्वान आणि गे भावानं नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं त्याला सध्या या कुटुंबात नाईलाजानं राहावं लागतंय, तर रिचर्डचे वडील (ऍलन आर्किन) हे शिवराळ भाषा आणि हेरॉईनचं व्यसन यामुळे सर्वांच्या काळजीचं कारण बनले आहेत. चित्रपटाचा बराचसा भाग घडतो, तो एका मोडक्या व्हॅननं केलेल्या प्रवासात. ऑलिव्हला "लिट्ल मिस सनशाईन' या सौंदर्यस्पर्धेत भाग घ्यायला नेण्यासाठी केलेला हा प्रवास या कुटुंबाला काय प्रकारे एकत्र आणतो, ते चित्रपटाची कथा सांगते. मात्र कथानक महत्त्वाचं नाही, तर ते सांगण्याची पद्धत महत्त्वाची. सनशाईन ढोबळपणे तीन भागांत विभागलेला आहे. प्रस्तावना, रोड ट्रिप आणि ब्यूटी कॉन्टेस्ट. प्रस्तावनेत व्यक्तिरेखांची ओळख ही अत्यंत थोडक्यात पण प्रभावीपणे (जशी वर सांगितलेली ऑलिव्हची) करून देण्यात येते आणि मग एका मोठ्याशा जेवणाच्या प्रसंगात ते एकमेकांशी कसे रिऍक्ट होतात, हे दाखवलं जातं. दुसऱ्या भागात ऑलिव्ह वगळता इतरांचा संघर्ष दिसतो. स्वतःच्या आयुष्याचा अर्थ लावण्याचा, कुटुंबाबरोबरचा आणि थोड्या त्रयस्थ दृष्टिकोनातून जगाबरोबरचाही. या भागात प्रत्येकाचा विक्षिप्तपणा कसाला लागतो, अनेकांना आत्मपरीक्षण करावं लागतं आणि आपलं बळ कशात आहे, हेदेखील त्यांच्या लक्षात येतं. तिसरा भाग ब्यूटी कॉन्टेस्टचा असला तरी त्यात इतरांनाही ऑलिव्हइतकंच महत्त्वाचं काम आहे. या भागात ते स्वतःला आणि आपल्यातल्या प्रत्येकाला अधिक मोकळ्या मनाने समजून घेतात. जिंकणं किंवा हरणं, यातल्या कशालाच त्यांच्या लेखी फार अर्थ उरत नाही. मात्र स्वत्व जपण्यालाच ते अधिक महत्त्व देतात. चित्रपटाची ही स्वच्छ रचना त्यातले मुद्दे व्यवस्थित पोचवण्यासाठी पुरेशी असली तरी यातला तिसरा भाग हा लेखन/ दिग्दर्शन या दोन्ही दृष्टींनी अधिक कठीण आहे. एकतर ऑलिव्ह स्पर्धेत जिंकेल की नाही, हे चित्रपटाच्या एकूण प्रकृतीकडे (आणि ऑलिव्हच्या स्वतःच्या प्रकृतीकडेही) पाहता रहस्य नाही, त्यामुळे चित्रपट इथं संपणं, हे आणि तो प्रेक्षकांना समाधान वाटेलसा संपवणं सोपं नाही. त्याचबरोबर इथलं छोट्या मुलींच्या सौंदर्यस्पर्धेचं चित्रण हे खूप अस्वस्थ करणारं आणि विचार करायला लावणारंही आहे. ते अतिशयोक्त नाही, हे "बुगी वुगी' किंवा "ताक धिना धिन'सारख्या कार्यक्रमातून वयाला न शोभणारे मेकअप आणि त्याहून न शोभणारे हावभाव करत आपल्या पालकांच्या आशीर्वादानं नाचणाऱ्या मुलांकडे पाहून लक्षात येईल. मात्र ते सर्वांना पचणारं नाही, हे खरं. "सनशाईन'मधली विनोदनिर्मिती ही प्रामुख्यानं व्यक्तिरेखांच्या तपशिलातून आलेली आहे. फ्रॅन्कचं धावणं हे विनोदनिर्मिती करतं, कारण ते त्या कलावंताचं धावणं नसून व्यक्तिरेखेचं धावणं आहे. ही व्यक्तिरेखा खेळाडूची किंवा धावणं हा व्यवसायाचा भाग असलेल्या पोलिसासारख्या कोणाची नाही, तर साहित्याचा अभ्यास असलेल्या विद्वानाची आहे. हा माणूस गरज पडली तर चारचौघांत धावेल, पण मोकळेपणानं नाही. फार जोरातही नाही, हे आपल्याला कळू शकणारं निरीक्षण स्टीव्ह कॅरेल आपल्या हालचालीतून दाखवतो- ज्यामुळे आपल्याला हसू फुटतं. आणखी एका प्रसंगात आजोबांना ड्रग ओव्हरडोसमुळे इस्पितळात ठेवलेले असताना शेरील आपल्या मुलांना जवळ बोलावून गंभीरपणे ते दगावण्याची शक्यता बोलून दाखवते. दोन्ही मुलं तितक्žयाच गंभीरपणे हे ऐकून घेतात. मग मौनव्रत घेतलेला ड् वेन शांतपणे खिशातून पॅड काढून काही खरडतो आणि ऑलिव्हला दाखवतो. त्यावर लिहिलेलं असतं, "गो, हग मॉम.' ऑलिव्ह तत्परतेने उठते, आईला मिठी मारते आणि हा इमोशनल प्रसंग चालू राहतो. इथे ड् वेनचा सल्ला आपल्याला गंभीर प्रसंगातही हसवतो. कारण तो ड् वेनच्या जी ती गोष्ट पूर्णपणे त्रयस्थपणे पाहण्याशी सुसंगत आहे. तो स्वतः इमोशनल होत नाही, मात्र या क्षणी काय करणं गरजेचं आहे ते त्याला अचूक कळतं. ऑलिव्हनं तत्परतेनं केलेलं आज्ञापालनही या भावाबहिणीचं नातं एका पुढल्या टप्प्यावर नेऊन ठेवतं, जे पुढल्या भागात उपयोगी आहे. "सनशाईन'च्या एकूण व्यक्तिनिष्ठ स्वरूपाप्रमाणेच त्याचा संदेशही व्यक्तिनिष्ठच आहे. कोणत्याही वर्गवारीत न बसवता सर्वांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारावं, असं सांगणारा हा संदेश फार नवा नाही, मात्र तो कालबाह्यदेखील नाही. उलट आपल्या वातावरणासाठी तो कदाचित अतिशय वक्तशीर ठरण्याची शक्यता आहे. सध्या प्रसिद्धिमाध्यमांच्या विस्फोटामुळे प्रत्येकानं आपण कोणीतरी खास आहोत, चारचौघांपेक्षा वेगळे आहोत, असं दाखवण्याची स्पर्धाच लावली आहे, आणि हाताला लागेल ती शिडी धरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. टीव्ही चॅनेल्सवर तर या टॅलेन्ट हन्ट् सना ऊत आला आहे आणि हजारो मुलं, तरुण- तरुणी या खेळात सहभागी होताहेत. या मंडळींना "लिट् ल मिस सनशाईन' जणू सांगू पाहतोय, की सामान्य असण्यात काहीच वाईट नाही. केवळ तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. 2007 मधील अतिशय महत्त्वाच्या चित्रपटांमधला हा चित्रपट आहे आणि प्रत्येकानं लक्ष देऊन पाहावासा.
- गणेश मतकरी

Read more...

उल्लेखनीय, पण गोंधळलेला

>> Thursday, May 1, 2008

यू कॅन नेव्हर रूईन ऍन आर्किटेक्ट बाय प्रूव्हिंग दॅट ही इज ए बॅड आर्किटेक्ट. बट यू कॅन रूईन हिम बिकॉज ही इज ऍन एथेइस्ट, ऑर बिकॉज समवन सूड हिम, ऑर बिकॉज ही स्लेप्ट विथ सम वुमन, ऑर बिकॉज ही पुल्स विंग्ज ऑफ बॉटलप्राईज. यू विल से इट डझन्ट मेक सेन्स? ऑफ कोर्स इट डझन्ट. दॅटस व्हाय इट वर्क्स. एल्सवर्थ टू ही, फाउंटनहेड

ऍन रॅन्डच्या फाऊन्टईड मधल्या वास्तुकला समीक्षकाचे उद् गार, ते वाचल्यापासून माझ्या डोक्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यामागचं कारण हे केवळ त्यांच्या चमत्कृतीत नसून, त्यांना असणाऱ्या वास्तवाच्या पक्क्या बैठकीत आहे. एखाद्या कलाकाराच्या किंवा कलाकृतीच्या दर्जाची शहानिशा करताना आपण त्या कलाकृतीचा (किंवा कलाकाराचा) वस्तुनिष्ठपणे केवळ दर्जाचाच विचार करू शकतो का? मला वाटतं अनेकदा आपण चिकटवलेले गुणदोष हे आपल्या मनातले, अनुभवातले किंवा इतरत्र भेटलेलेही असू शकतात. सामान्यतः लोकप्रिय होणाऱ्या चित्रपटांमध्ये अशी अनेक उदाहरणे सापडतील. ज्यांच्या कौतुकाला चित्रपटबाह्य कारणं जबाबदार आहेत. जे. पी. दत्ताचा बॉर्डर चालला तो उत्तम चित्रपट म्हणून नव्हे, तर त्या वेळच्या युद्धजन्य परिस्थितीने निर्माण केलेल्या देशभक्तीच्या लाटेमुळे. आशुतोष गोवारीकरचा "स्वदेस' चालला तो त्यात उठणाऱ्या ब्रेनड्रेनच्या विरोधातल्या आवाजामुळे, आणि पुन्हा देशप्रेमाच्या आलेल्या उमाळ्याने. या दोन्ही चित्रपटांमध्ये गुण होता तो ते मनापासून केले होते आणि लोकांना पटणारा संदेश देत होते हा. मात्र दर्जात्मक उणिवा या दोन्ही चित्रपटांत वारेमाप होत्या. सध्या याच प्रकारे अचूक संदेशाच्या लाटेवर बसून लोकप्रिय झालेली एक निर्मिती चित्रपटगृहामध्ये दिसून येते. ती म्हणजे "खुदा के लिये.' गेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासूनच तिची जोरदार हवा आहे. मात्र या प्रसिद्धीमागची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची संधी मात्र आताच मिळते आहे. लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शोएब मन्सूरला दोन गोष्टींत पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील. पहिली म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा, अन् दुसरी त्याचं धैर्य. पाकिस्तानात वास्तव्य करणाऱ्या, अन् मुस्लिम समाजाचाच घटक असणाऱ्या मन्सूरने या प्रकारे धर्मव्यवस्थेला आव्हान देणारा चित्रपट बनवणं, याला खरोखरच धाडस म्हणावं लागेल. मात्र इथं एक गोष्ट अध्याहृत आहे, की आपण पाकिस्तानचा चित्रपट हा मुळातच मागासलेला समजतो. तंत्रानं अन् आशयानं. त्यामुळे त्यांनी काही अर्थपूर्ण आशय असणारा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करणं, हाच आपल्यासाठी सुखद धक्का. मग मुख्य कौतुक, ते या धक्क्याचंच. इथलं कथानक आहे ते दोन भावांवर येणाऱ्या संकटाचं. (किंवा धर्मसंकटाचं म्हटलं तरी चालेल.) हे भाऊ म्हणजे आधुनिक मुसलमान समाजाचे प्रतिनिधी. मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात टिकून राहिलेल्या कुटुंबातले. काळाबरोबर राहू पाहणाऱ्या, आधुनिक पेहरावातल्या देवधर्माकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन जवळ करणाऱ्या मुसलमानांचा प्रश्न हा इथे दोन परस्परविरोधी नजरांमधून मांडला जातो. सांकेतिक अन् पारंपरिक पद्धतीनं धर्माचा अर्थ लावू पाहणारे इतर पाकिस्तानी त्यांना धर्माची विटंबना करणारे मानतात, तर दुसऱ्या बाजूने मुसलमानांकडे दहशतवादी म्हणून पाहणारा पाश्चिमात्य समाजही त्यांच्या या रूपाकडे संशयानं पाहतो. लाहरोमधल्या मन्सूर (शान) आणि सरमद (फुआदखान) या भावांच्या जवळजवळ स्वतंत्र गोष्टी इथं सरमिसळ करून सांगितल्या जातात. सरमद एका अतिशय ओव्हरऍक्टिंग करणाऱ्या मौलवीच्या नावानं भरकटतो, अन् गोऱ्या मडमेबरोबर लग्नाशिवाय राहणाऱ्या, पण मुलीनं गोरा जावई शोधताच उपरती झालेल्या आपल्या काकाच्या हाकेला धावून त्या मुलीशी, म्हणजे मेरीशी फसवून लग्न करतो. इकडे सरमद अन मेरी अफगाण बॉर्डरवरच्या एका छोट्या गावात जबरदस्तीचा संसार करत असताना मन्सूर शिकागोमध्ये एक गोरी (या पाकिस्तान्यांना गोऱ्याचं काय एवढं आकर्षण बुवा?) मुलगी मिळवतो, मात्र त्याच्या दुर्दैवानं अकरा सप्टेंबर 2001 च्या हलकल्लोळानंतर तो पोलिस किंवा तत्सम सरकारी संघटनेच्या कचाट्यात सापडतो. मग छळ, छळ आणि थोडा अधिक छळ. "खुदा के लिए' माझ्या मते सगळ्यात कमी पडतो तो व्यक्तिचित्रणात. ज्या मन्सूर आणि सरमदची ही गोष्ट आहे, त्यांना एक टाईप म्हणून रंगवल्यावर पुढे त्यांना कोणत्याही प्रकारची खोली तो देऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना अपरिहार्यतेपेक्षा फटकळ योगायोगांचाच वास येतो. आता सरमद मौलवीच्या सांगण्याने बदलतो अन् स्वतः संगीतकार असताना संगीताला निषिद्ध मानण्यापासून ते आईने बुरखा घालण्याचा हट्ट करण्यापर्यंत अनेक गोष्टी करतो. कथेच्या पातळीवर हे असं घडणं मी मान्य करतो; मात्र प्रसंगातून, संवादातून आणि मुख्य म्हणजे युक्तिवादातून हे बदलणं स्पष्ट आणि पटण्यासारखं व्हायला नको का? इथं मौलवी जे सल्ले देतो, त्यांना या अमुक गोष्टी धर्मबाह्य आहेत अन् अमुक नाहीत या पलीकडे जाऊन कारणमीमांसा दिली जात नाही. मग त्या सरमदला पटतात कशा? कारण जरी तो स्वतंत्र विचाराच्या कुटुंबातून आला असला, तरी त्यानं त्याच्याच म्हणण्याप्रमाणे धर्मग्रंथ वाचलेले आहेत. तो पाकिस्तानातच राहत असल्यानं इतर लोक काय प्रकारे अन् का वागतात, तेही तो जाणून आहे. मग अचानक हे हृदयपरिवर्तन होण्यामागे कारण काय? तेही इतक्या टोकाचा, की मौलवीची आज्ञा राखून मेरीशी विवाह करताना तो साधा माणुसकीचा विचारही करत नाही. व्यक्तिरेखेच्या वागण्यामागचा कार्यकारणभाव अगदी महत्त्वाचा असतो, कारण नाहीतर या घटना केवळ पटकथेच्या सोयीसाठी घडल्यासारख्या वाटतात. इथेही तेच होतं. काही प्रमाणात हीच गोष्ट मन्सूरची. एक तर तो लो बजेट बॉलिवूड शैलीतलं प्रेमप्रकरण करून शिकागोत विवाहबद्ध होतो. या दरम्यान त्याला आपल्या भावाचं, अन् मेरीचं काय चाललंय याची फार पर्वा नसावी, कारण तो कधी ही माहिती काढण्याच्या प्रयत्नातही दिसत नाही, किंवा ही माहिती नसल्याने अस्वस्थ होत नाही. तो संगीत शिक्षण (पुन्हा धर्मांधांना टोला) आणि प्रेमप्रकरण यात मश्गूल दिसतो. अन एकदा का तो दहशतवादी म्हणून पकडला गेल्यावर तर पंचाईतच होते, कारण मग मन्सूरच्याही हातात फार काही राहत नाही. पहिल्या गोष्टीतल्या मौलवीशी स्पर्धा करणारा ओव्हरऍक्टिंग करणारा एक गोरा अधिकारी इथे मन्सूरला टॉर्चर करण्यासाठी आणला जातो. (खरं तर वेगळ्या टॉर्चरची गरज नाही, त्याचा अभिनय हाच पुरेसा टॉर्चर आहे.) अन् पुढे येणारा प्रत्येक प्रसंग हा एकाच प्रसंगाच्या अनेक आवृत्त्यांमधला एक बनून जातो. मौलवी अन् गोरा अधिकारी या व्यक्तिरेखा जर इथे हाडामांसाच्या बनू शकल्या असत्या, तर चित्रपटाला काही निश्चित परिमाण येऊ शकलं असतं. मात्र ते होत नाही ते संहिता अन कलाकार या दोघांना असणाऱ्या मर्यादांमुळे. अखेरच्या प्रसंगामधला नासीरउद्दीन शाहचा मौलवी ते देऊ शकतो; कारण त्याच्याकडे करण्यासारखा काही युक्तिवाद आहे, शिवाय तो उत्तम अभिनेता आहे. मात्र ही भूमिका दुर्दैवाने फारच छोटी आहे. शोएब मन्सूरच्या पटकथेला ज्याप्रमाणे मर्यादा आहेत, त्याचप्रमाणे त्या इतर अनेक गोष्टींनाही आहेत. दिग्दर्शक म्हणून वेगळ्या भूमिकेत शिरून तो पटकथा सुधारून तर घेऊ शकतच नाही. वर त्याचं दिग्दर्शनही ठिकठाकच्या पलीकडे जात नाही. तो टीव्हीमधून आला असल्यानं असेल कदाचित; पण क्लोजअपस् वर त्याचा अधिक ताबा आहे. जेव्हा प्रसंग मोठ्या जागांमध्ये किंवा ऍक्शनला वाव देणारे असतात तेव्हा त्याचा ताबा सुटतो. उदाहरणादाखल चित्रपटाच्या सुरवातीचा नववर्ष कार्यक्रमाच्या तयारीवेळी होणाऱ्या हल्ल्याचा प्रसंग किंवा मेरीच्या पलायनप्रयत्नाचा प्रसंग घेता येईल. इथे घेतलेले शॉट्स हे यांत्रिकपणे, अमुक अमुक गोष्टी आवश्यक असल्याने घेतल्यासारखे वाटतात. त्यांना एक प्रकारचा प्रवाहीपणा असायला हवा, जो इथे गायब आहे. स्वतंत्र शॉट्सची संख्याही प्रसंगाच्या गरजेपेक्षा कमी आहे, अन् संकलनात ते वाचवण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला दिसत नाही. हा सराईतपणाचा (चांगला सराईतपणा; बनचुकेपणा असा अर्थ इथे अभिप्रेत नाही.) अभाव इथं इतरही ठिकाणी दिसतो. अभिनयात, छायाचित्रणात आणि एकूणच. मग चित्रपट जर एवढ्या मूलभूत अंगामध्ये कमी पडत असेल तर त्याचं कौतुक केलं जाण्यामागे काय कारण असावं? मला वाटतं, हा प्रयत्न मनापासून केलेला आहे, हे कुठंतरी आपल्यापर्यंत पोचतं अन् मग आपण त्याचंच कौतुक करतो. प्रत्यक्ष चित्रपटाचं नाही, तर या प्रकारचा चित्रपट निघू शकला याचंच. ही कल्पना आपल्याला आवडते अन् तिच्याविषयी आपण बोलतो, प्रत्यक्ष चित्रपट राहतो बाजूला. "खुदा के लिए' मध्ये एक वाक्य आहे, "सगळे मुसलमान हे दहशतवादी नसतात; मात्र सगळे दहशतवादी मुसलमान असतात.' त्याच सुरात बोलायचं तर सगळे चांगले चित्रपट मनापासून केलेले असतात; पण सगळेच मनापासून केलेले चित्रपट चांगले नसतात. "खुदा के लिए' बद्दल तरी माझं हेच मत आहे.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP