स्वच्छ, सुंदर "सनशाईन'

>> Friday, May 2, 2008

छोटी ऑलिव्ह (ऍबिगेल ब्रेस्लिन) टीव्ही बघते आहे. टीव्हीवर रेकॉर्डेड ब्यूटी कॉन्टेस्टचा शेवटचा भाग सुरू आहे. म्हणजे विजेती घोषित करण्याचा. नावाची घोषणा होते आणि सर्वसाधारणपणे सर्व सौंदर्यस्पर्धांमध्ये पाहायला मिळणारा आश्चर्याचा, आनंदाचा अभिनय सुरू होतो, काढल्या जात असणाऱ्या फोटोंसाठी चेहरा शक्य तितका आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न करत. ऍबिगेल हे विस्फारल्या डोळ्यांनी पाहते. मग कार्यक्रम थोडा मागे नेते, नावाच्या घोषणेआधीच्या क्षणापर्यंत, तिथून पुन्हा सुरवात करते. मात्र या खेपेला ती पडद्यावरच्या सौंदर्यसम्राज्ञीबरोबर हालचाल करून तालीम करायला लागते. विजेतेपद मिळवायचं, तर ही नंतर करायच्या अभिनयाची तयारी हवीच! 2007मध्ये गोल्डन ग्लोब मिळवलेल्या आणि ऑस्कर नामांकनात स्थान मिळवलेल्या "लिट्ल मिस सनशाईन' चित्रपटाची ही सुरवात. ही महत्त्वाची अशासाठी, की अतिशय थोडक्या वेळात आणि शब्दांशिवाय ती आपल्याला बरंच काही सांगते. पहिलं म्हणजे चित्रपटाच्या नावात सुचवलेल्या आणि चित्रपटातली महत्त्वाची घटना असलेल्या सौंदर्यस्पर्धेला कथासूत्रातला एक महत्त्वाचा घटक म्हणून पुढे करते. ऑलिव्हच्या निरीक्षणातून आणि तालमीतून या स्पर्धांचं बेगडी स्वरूप स्पष्ट करते. चित्रपटाचा या सौंदर्याच्या कृत्रिम प्रदर्शनाकडे पाहण्याचा उपहासात्मक आणि बोचरा विनोदी दृष्टिकोन समोर आणते आणि त्याचबरोबर गंभीर विषयाकडे चित्रपट तिरकसपणे पाहू इच्छितो, असंही सांगते. ऑलिव्हचं पात्र या स्पर्धांनी कसं झपाटलंय, हे तर दाखवतेच, वर तिच्या रूपाशी स्पर्धकांचा असणारा विरोधाभास समोर मांडून पुढे स्पष्ट होणाऱ्या एका कळीच्या मुद् द् याचीही प्रेक्षकाला पहिली जाणीव करून देते. मायकेल आर्न्टने लिहिलेल्या आणि जोनथन डेटन/ व्हॅलरी फेरीस या पती-पत्नीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा विशेष हाच आहे, की तो प्रत्येक प्रसंगाचा, प्रत्येक संवादाचा शक्य तितका अधिक वापर करतो. जे प्रत्यक्ष दिसत आहे त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. वर सांगितलेल्या प्रसंग हे याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मिस सनशाईन फिल गुड प्रकारातल्या चित्रपट आहे आणि तो प्रेक्षकाला सतत हसवत ठेवतो. सरळ सरळ विनोदी चित्रपटांपेक्षा हे काम कठीण आहे, कारण त्यातल्या व्यक्तिरेखा आणि घटना या जवळजवळ संपूर्णपणे गंभीर म्हणण्यासारख्या आहेत. डिसफंक्शनल कुटुंब या विषयावर अमेरिकेत अनेक चित्रपट बनत असतात. मात्र क्वचितच ते या चित्रपटाइतके परिणामकारक असतात. साधारणपणे याच कल्पनेवरला पण कथानक आणि रचना संपूर्णपणे वेगळी असणारा "अमेरिकन ब्यूटी'देखील "सनशाईन'प्रमाणेच गांभीर्य आणि विनोदाची सांगड घालणारा होता. त्यामुळे त्याची आठवण इथं होणं साहजिक आहे. तरीही या दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे तो नॅरेटिव्ह स्टाईल किंवा निवेदनशैलीचा. ब्यूटीमध्ये ती गडद आणि व्यक्तिरेखांमधल्या दोषाला ठळकपणे समोर आणत राहणारी होती. "सनशाईन' मात्र हे दोष समजून घेऊनही व्यक्तिरेखांच्या सकारात्मक बाजूकडे अधिक लक्ष पुरवताना दिसतो. रिचर्ड (ग्रेग किनाऊर) आहे इथला कुटुंबप्रमुख, जो यशस्वी होण्याचे मार्ग दाखवणारा अयशस्वी मोटिव्हेशनल स्पीकर आहे. आयुष्य हे जिंकणारे आणि हरणारे या दोघांचंच बनलेलं असतं यावर त्याचा ठाम विश्वास आहे. आपण यातल्या दुसऱ्या वर्गात पडतो, हे तो मान्य करू शकत नाही. शेरील (टोनी कोलेट) त्याची पत्नी, जी आपल्या विक्षिप्त कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. ड्वेन (पॉल डानो) आणि ऑलिव्ह ही या दोघांची मुलं. ऑलिव्हला सौंदर्यस्पर्धांचं वेड आहे, तर ड् वेननं मौनव्रत धारण केलंय. शेरीलच्या फ्रॅन्क (स्टीव्ह कारेल) या विद्वान आणि गे भावानं नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं त्याला सध्या या कुटुंबात नाईलाजानं राहावं लागतंय, तर रिचर्डचे वडील (ऍलन आर्किन) हे शिवराळ भाषा आणि हेरॉईनचं व्यसन यामुळे सर्वांच्या काळजीचं कारण बनले आहेत. चित्रपटाचा बराचसा भाग घडतो, तो एका मोडक्या व्हॅननं केलेल्या प्रवासात. ऑलिव्हला "लिट्ल मिस सनशाईन' या सौंदर्यस्पर्धेत भाग घ्यायला नेण्यासाठी केलेला हा प्रवास या कुटुंबाला काय प्रकारे एकत्र आणतो, ते चित्रपटाची कथा सांगते. मात्र कथानक महत्त्वाचं नाही, तर ते सांगण्याची पद्धत महत्त्वाची. सनशाईन ढोबळपणे तीन भागांत विभागलेला आहे. प्रस्तावना, रोड ट्रिप आणि ब्यूटी कॉन्टेस्ट. प्रस्तावनेत व्यक्तिरेखांची ओळख ही अत्यंत थोडक्यात पण प्रभावीपणे (जशी वर सांगितलेली ऑलिव्हची) करून देण्यात येते आणि मग एका मोठ्याशा जेवणाच्या प्रसंगात ते एकमेकांशी कसे रिऍक्ट होतात, हे दाखवलं जातं. दुसऱ्या भागात ऑलिव्ह वगळता इतरांचा संघर्ष दिसतो. स्वतःच्या आयुष्याचा अर्थ लावण्याचा, कुटुंबाबरोबरचा आणि थोड्या त्रयस्थ दृष्टिकोनातून जगाबरोबरचाही. या भागात प्रत्येकाचा विक्षिप्तपणा कसाला लागतो, अनेकांना आत्मपरीक्षण करावं लागतं आणि आपलं बळ कशात आहे, हेदेखील त्यांच्या लक्षात येतं. तिसरा भाग ब्यूटी कॉन्टेस्टचा असला तरी त्यात इतरांनाही ऑलिव्हइतकंच महत्त्वाचं काम आहे. या भागात ते स्वतःला आणि आपल्यातल्या प्रत्येकाला अधिक मोकळ्या मनाने समजून घेतात. जिंकणं किंवा हरणं, यातल्या कशालाच त्यांच्या लेखी फार अर्थ उरत नाही. मात्र स्वत्व जपण्यालाच ते अधिक महत्त्व देतात. चित्रपटाची ही स्वच्छ रचना त्यातले मुद्दे व्यवस्थित पोचवण्यासाठी पुरेशी असली तरी यातला तिसरा भाग हा लेखन/ दिग्दर्शन या दोन्ही दृष्टींनी अधिक कठीण आहे. एकतर ऑलिव्ह स्पर्धेत जिंकेल की नाही, हे चित्रपटाच्या एकूण प्रकृतीकडे (आणि ऑलिव्हच्या स्वतःच्या प्रकृतीकडेही) पाहता रहस्य नाही, त्यामुळे चित्रपट इथं संपणं, हे आणि तो प्रेक्षकांना समाधान वाटेलसा संपवणं सोपं नाही. त्याचबरोबर इथलं छोट्या मुलींच्या सौंदर्यस्पर्धेचं चित्रण हे खूप अस्वस्थ करणारं आणि विचार करायला लावणारंही आहे. ते अतिशयोक्त नाही, हे "बुगी वुगी' किंवा "ताक धिना धिन'सारख्या कार्यक्रमातून वयाला न शोभणारे मेकअप आणि त्याहून न शोभणारे हावभाव करत आपल्या पालकांच्या आशीर्वादानं नाचणाऱ्या मुलांकडे पाहून लक्षात येईल. मात्र ते सर्वांना पचणारं नाही, हे खरं. "सनशाईन'मधली विनोदनिर्मिती ही प्रामुख्यानं व्यक्तिरेखांच्या तपशिलातून आलेली आहे. फ्रॅन्कचं धावणं हे विनोदनिर्मिती करतं, कारण ते त्या कलावंताचं धावणं नसून व्यक्तिरेखेचं धावणं आहे. ही व्यक्तिरेखा खेळाडूची किंवा धावणं हा व्यवसायाचा भाग असलेल्या पोलिसासारख्या कोणाची नाही, तर साहित्याचा अभ्यास असलेल्या विद्वानाची आहे. हा माणूस गरज पडली तर चारचौघांत धावेल, पण मोकळेपणानं नाही. फार जोरातही नाही, हे आपल्याला कळू शकणारं निरीक्षण स्टीव्ह कॅरेल आपल्या हालचालीतून दाखवतो- ज्यामुळे आपल्याला हसू फुटतं. आणखी एका प्रसंगात आजोबांना ड्रग ओव्हरडोसमुळे इस्पितळात ठेवलेले असताना शेरील आपल्या मुलांना जवळ बोलावून गंभीरपणे ते दगावण्याची शक्यता बोलून दाखवते. दोन्ही मुलं तितक्žयाच गंभीरपणे हे ऐकून घेतात. मग मौनव्रत घेतलेला ड् वेन शांतपणे खिशातून पॅड काढून काही खरडतो आणि ऑलिव्हला दाखवतो. त्यावर लिहिलेलं असतं, "गो, हग मॉम.' ऑलिव्ह तत्परतेने उठते, आईला मिठी मारते आणि हा इमोशनल प्रसंग चालू राहतो. इथे ड् वेनचा सल्ला आपल्याला गंभीर प्रसंगातही हसवतो. कारण तो ड् वेनच्या जी ती गोष्ट पूर्णपणे त्रयस्थपणे पाहण्याशी सुसंगत आहे. तो स्वतः इमोशनल होत नाही, मात्र या क्षणी काय करणं गरजेचं आहे ते त्याला अचूक कळतं. ऑलिव्हनं तत्परतेनं केलेलं आज्ञापालनही या भावाबहिणीचं नातं एका पुढल्या टप्प्यावर नेऊन ठेवतं, जे पुढल्या भागात उपयोगी आहे. "सनशाईन'च्या एकूण व्यक्तिनिष्ठ स्वरूपाप्रमाणेच त्याचा संदेशही व्यक्तिनिष्ठच आहे. कोणत्याही वर्गवारीत न बसवता सर्वांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारावं, असं सांगणारा हा संदेश फार नवा नाही, मात्र तो कालबाह्यदेखील नाही. उलट आपल्या वातावरणासाठी तो कदाचित अतिशय वक्तशीर ठरण्याची शक्यता आहे. सध्या प्रसिद्धिमाध्यमांच्या विस्फोटामुळे प्रत्येकानं आपण कोणीतरी खास आहोत, चारचौघांपेक्षा वेगळे आहोत, असं दाखवण्याची स्पर्धाच लावली आहे, आणि हाताला लागेल ती शिडी धरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. टीव्ही चॅनेल्सवर तर या टॅलेन्ट हन्ट् सना ऊत आला आहे आणि हजारो मुलं, तरुण- तरुणी या खेळात सहभागी होताहेत. या मंडळींना "लिट् ल मिस सनशाईन' जणू सांगू पाहतोय, की सामान्य असण्यात काहीच वाईट नाही. केवळ तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. 2007 मधील अतिशय महत्त्वाच्या चित्रपटांमधला हा चित्रपट आहे आणि प्रत्येकानं लक्ष देऊन पाहावासा.
- गणेश मतकरी

2 comments:

Yogesh May 11, 2008 at 9:02 PM  

मस्त आहे हा. १ प्रश्न. ’दे धक्का’ नावाचा एक मराठी चित्रपट येत आहे तो असाच आहे का? निदान ट्रेलरं पाहून तरी वाटतंय.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP