भयपटाच्या चौकटीबाहेर

>> Saturday, May 31, 2008

लहानपणी आम्ही एक खेळ खेळत असू. यात राज्य असणाऱ्या मुलाने भिंतीकडे वळून काही विशिष्ट वाक्य (बहुधा असंबद्ध) म्हणायचं, अन् खेळात सामील झालेल्या इतरांनी शक्य तितकं त्याच्या जवळ पोचायचा प्रयत्न करायचा. वाक्य संपून तो वळल्यावर सर्व जण पुतळ्यासारखे स्तब्ध होणं अपेक्षित. जर कोणी हलताना दिसला, तर बाद. नाहीतर त्याने पुन्हा वाक्य म्हणायचं. इतर जण पुन्हा पुढे सरकणार. त्याच्या दिशेने. दिग्दर्शक जे. ए. बायोना दिग्दर्शित "ऑर्फनेज' या स्पॅनिश चित्रपटाची नायिकादेखील स्वतःच्या बालपणीची आठवण जिवंत करण्याच्या प्रयत्नांत असाच एक खेळ खेळते. एका जुन्या पुराण्या अनाथाश्रमाच्या भव्य पण रिकाम्या इमारतीत स्वतःवर राज्य घेऊन. या खेळातले इतर सहभागी तिचे पूर्वाश्रमीचे सवंगडी. ती एके काळी या अनाथाश्रमात असताना तिच्याबरोबरचे मित्रमैत्रिणी. मात्र, हे खेळगडी आजही त्याच वयाचे आहेत. त्यांचा मृत्यू होऊन आज कैक वर्षं लोटली आहेत. आणि एकदा प्राण गेल्यावर त्यांचं वय वाढण्याचा प्रश्नच उद् भवत नाही, नाही का? सध्या "लोकप्रिय भयपट' म्हणून अस्तित्वात असणाऱ्या धक्कादृश्यांच्या मालिकेत वेगळा म्हणून उठून दिसणाऱ्या ऑर्फनेजची खासीयत हीच, की तो प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सोप्या सवयीच्या प्रतिमांची मदत घेत नाही, तर त्यांच्या अंतर्मनाला जोखण्याचा प्रयत्न करतो. सवयीच्या, परिचित घटनांमध्ये काही अनपेक्षित घटक आणून उभा करतो. (उदाहरणार्थ, पार्टीसदृश वातावरणात मधेच डोक्यावर पिशवीसारखा मुखवटा घातलेला मुलगा दूरवर उभा दिसणं), ओळखीच्या नातेसंबंधांना (उदाहरणार्थ पालक आणि मुलं) विविध दृष्टिकोनांतून पाहतो, आणि आपल्या मनाच्या सांदीकोपऱ्यात दडून राहणाऱ्या, कोणतंही स्पष्टीकरण नसणाऱ्या भयकारी संकल्पनांना (उदाहरणार्थ, अंधार, गुहा, रिकाम्या हवेल्या, आप्ताचा मृत्यू) मोकळ्यावर आणतो. किंबहुना यातली भीती अतिशय परिणामकारक असूनही त्याला भयपटांच्या वर्गवारीत बसवणं, हे काहीसं अन्याय्य वाटतं. कारण मग त्याची तुलना केवळ त्या वर्गवारीपुरती मार्यदित होते. ऑर्फनेजला मी उत्तम भयपट म्हणणं पसंत करणार नाही; उत्तम चित्रपट जरूर म्हणेन. ऑर्फनेज सुरू होतो, तो मघा सांगितलेल्या खेळापासूनच. मात्र, या वेळी सर्वंच उपस्थित पात्रं जिवंत आहेत. या लहान मुलांच्या रंगलेल्या खेळातून लॉराला बाहेर बोलावलं जातं. ती आता स्वतःच्या नव्या घरी निघालेली असते. सवंगड्यांपासून दूर. फारच दूर. लवकरच आपण पोचतो, ते वर्तमानातल्या तीस वर्षीय लॉराकडे (बलेन रूदा.) आपला पती कार्लोस (फर्नांडो कायो) आणि दत्तक मुलगा सिमॉन (रॉजर प्रिन्सेप) यांच्याबरोबर ती पुन्हा एकदा आपल्या अनाथालयात पोचली आहे, पण मालक म्हणून. या इमारतीत स्पेशल स्कूल सुरू करण्याचा तिचा इरादा आहे. एकट्या राहणाऱ्या सिमॉनची जेव्हा काही काल्पनिक मित्रांशी मैत्री होते, तेव्हा लॉरा आणि कार्लोस आधी त्याची मानसिक गरज म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, मित्र-मैत्रिणींची संख्या वाढायला लागते, त्यांना नावं येतात, काही संदर्भ येतात जे लॉराच्या भूतकाळाकडे निर्देश करतात. गुंता वाढायला लागतो. आधीच दुर्धर रोगाने आजारी असलेल्या सिमॉनला समजावणं अशक्य व्हायला लागतं आणि अचानक सिमॉन नाहीसा होतो. "ऑर्फनेज' हा स्वतंत्र चित्रपट असला, तरी त्याची मांडणी दुसऱ्या एका चित्रपटाची स्पष्ट आठवण करून देणारी आहे. तो म्हणजे गिलेर्मो डेल टोरोचा "पॅन् स लॅबिरिन्थ.' ऑर्फनेज डेल टोरोनेच सादर केलेला आहे. त्यामुळे लॅबिरीन्थचा इथला प्रभाव हा अपघात नाही. युद्धकाळातल्या आई-मुलीची गोष्ट असलेल्या लॅबिरीन्थमध्ये फॅन्टसीचा वापर हा पाहण्यासारखा होता. फॅन्टसीचा सततचा ट्रॅक एका पात्राभोवती गुंफणं आणि चित्रपटाला दोन पातळ्यांवर सुरू ठेवणं, ही त्यातली किमया होती. इथली गोष्टही आई-मुलाचीच आहे. मात्र, फॅन्टसीऐवजी इथला ट्रॅक आहे तो भयाचा. त्यातल्याप्रमाणेच एका विशिष्ट पात्राभोवती फिरणारा. अखेर त्याचा परिणाम म्हणून लॅबिरीन्थप्रमाणेच इथल्या शेवटालाही दोन दृष्टिकोनातून पाहता येतं. सुखांत आणि शोकांत. प्रत्येक प्रेक्षकाने आपल्यापुरती निवड करावी. बऱ्याचदा भयपटांचा परिणाम हा तेवढ्यापुरता असतो. कारण त्याचं संपूर्ण लक्ष, हे दृश्य भागाकडे असतं. त्यामुळे ते आपल्या कल्पनांचा खोलात जाऊन विचार करत नाहीत. परिणामी त्यांना आपसूकच मर्यादा येते. ऑर्फनेजला अशी मर्यादा येत नाही. कारण मुळात यातलं भूत हे भूतकाळाचं आहे. घडलेल्या घटना या आपण लक्षात ठेवतो. मात्र, त्या खरोखरच तशा घडलेल्या असतात का, हे कोणी सांगावं? कदाचित आपलं मन त्यांना सोयीस्करपणे बदलून घेत असेल, अधिक सोपी, पटण्यासारखी आवृत्ती करून स्वतःचंच समाधान करून घेत असेल. मात्र, कधीतरी अशीही वेळ येऊ शकते, की आपल्या आठवणीशी विसंगत असं काही अनपेक्षितपणे आपल्यासमोर येऊन उभं ठाकेल. आणि आपल्या मनाला त्याचं काही स्पष्टीकरणच देता येणार नाही. या चित्रपटातल्या लॉराचा पेच हा काहीसा या जातीचा आहे. त्यामुळे इथली भुतं ही तिच्या नजरेतून आलेली आहेत. ती प्रत्यक्ष आहेत, का आपल्या आठवणीतल्या विसंगतींना साधण्यासाठी तिच्या मनानं उभारलेल्या प्रतिमा आहेत? इथं चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना आपल्यापुरती निवड करायला सांगतो, दोन्ही शक्žयतांचा पुरेशा तपशिलात विचार करून आणि सोयीस्कर योगायोगांचा अन् फसगतींचा वापर न करता. इथली लॉराची व्यक्तिरेखा निश्चित आकार आणि आलेख असलेली असण्यामागेही हेच कारण आहे. अश्रद्ध म्हणून सुरवात होणारी ही व्यक्तिरेखा टप्प्याटप्प्याने बदलत अधिकाधिक गुंतागुंतीची अन् खरी होत जाते. चित्रपट हा सिमॉनने केलेल्या नव्या मित्रांपासून सुरू झाला तरी त्याचा केंद्रबिंदू हा लॉरा आहे. ऑर्फनेजमध्ये भयपटांच्या चाहत्यांना आवडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. (बॉडी काउंटदेखील आहे, पण तो प्रामुख्याने भूतकाळातला) धक्के आहेत, भुतं आहेत, माफक प्रमाणात (फारच माफक) हिंसादेखील आहे. मात्र, त्याचा मूळ प्रभाव जे पडद्यावर दिसतंय, त्यापेक्षा अधिक त्यातून काय सुचवलं जातंय यावर आहे. भयपट आणि विचार यांचं गेल्या काही वर्षांत जे वावडं आहे, त्यावर ऑर्फनेज हा उतारा आहे. काही चित्रपट पाहताना सल्ला दिला जातो, की डोकं बाजूला ठेवून पाहा. इथं मात्र मी बरोबर विरुद्ध सल्ला देईन. तुम्ही जेवढं डोकं अधिक वापराल तेवढा चित्रपट अधिक भावेल, उमजेल, स्पष्ट होईल.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP