सिरीआना

>> Monday, September 15, 2008


आपला देश हा एक "मर्यादित लोकशाही असलेला देश आहे' असं म्हणावसं वाटतं ते इथल्या कलाविष्कारांवर पडणाऱ्या बंधनांमधून. काही प्रमाणात साहित्यकृती सोडल्या तर इतर सर्वच कलाप्रकार म्हणजे नाटकं, चित्रपट, चित्रकला वगैरेंना आपली मतं मांडताना नको इतकं सावध रहावं लागतं. धर्म, जात, राजकीय पक्ष, सरकारी यंत्रणा यातलं कोणीही कशावरही आक्षेप घेऊ शकतं आणि अशा वेळी या तथाकथित आविष्कार स्वातंत्र्य असलेल्या कलाकाराला वाचवण्यासाठी आपली लोकशाही बिलकूल पुढे सरसावत नाही. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे, हे बहुधा कोणाला माहीत तरी नसावं किंवा आपल्या संपूर्ण समाजानेच हे एक पुस्तकी विधान मानून त्याकडे दुर्लक्ष केलं असावं. "रंग दे बसंती'ला पास करताना सेन्सॉर बोर्डाने सैन्यातल्या अधिकाऱ्यांना पाचारण करणं हे झालं यातलंच एक उदाहरण. पण गेली अनेक वर्षं आपल्याकडे अनेक गोष्टींना अनेक पातळ्यांवर विरोध होतो आहे. शेवटी तो कलाविष्कार आहे. चला तर पाहा, नाही तर सोडून द्या, असं म्हणणं जणू आपल्या रक्तातच नाही.
अमेरिकेसारख्या देशाच्या कलाविष्काराकडे पाहण्याच्या उदार धोरणाचं महत्त्व पटतं ते अशा वेळी. मायकेल मूर ने त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात केलेला ...फॅरेनाईट आणि तेलाच्या राजकारणावर एक पटेलशी थिअरी सादर करणारा "सिरीआना' हे केवळ त्यांच्यासारख्या देशातच होऊ शकतात. अर्थात ऍकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सेसचं धोरण मात्र फारसं उदात्त नसल्याने ऑस्कर नामांकनात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी या दोघांचाही विचार झाला नाही. फॅरेनाईटचा.... होण्याची गरजही नव्हती. मात्र सिरीआन या नामांकनात जरूर चालला असता. तो अगदीच दुर्लक्षित वाटू नये म्हणून सहायक भूमिकेतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक जॉर्ज क्लूनीला दिलं गेलं.
"सिरिआना' हा काही वर्षांपूर्वी ऑस्कर मिळवणाऱ्या "ट्रॅफिक' चित्रपटाच्या लेखकाने लिहिलाय आणि दिग्दर्शनही केलाय. ज्यांनी ट्रॅफिक पाहिलाय, त्यांना यातला गोष्ट सांगण्याचा प्रकार ओळखीचा वाटेल. अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित "ट्रॅफिक'मध्येही तीन-चार सुट्या गोष्टी होत्या, ज्या कधी एकमेकांशी थेट जोडल्या जात, तर कधी नाही. मात्र या सर्व घटकांना जोडून ड्रग ट्रॅफिकिंगचं संपूर्ण चित्र उभं करण्यात चित्रपट यशस्वी ठरला होता.
इथला विषय आहे जागतिक राजकारण. आपल्याला या राजकारणाच्या सुट्या सुट्या बाजू दिसतात; मात्र या सर्व एकमेकांशी संबंधित आहेत अथवा नाहीत हे स्पष्ट होत नाही. गल्फमधली तेलाचा साठा असणारी राष्ट्रं आणि अमेरिकेचे त्यांच्याशी असलेले राजकीय संबंध, तेल विकत घेणाऱ्या अमेरिकन ऑईल कंपन्या, अमेरिकेत हेरखात्यांनी चालवलेला दहशतवाद्यांचा शोध, अरब दहशतवाद्यांच्या कारवाया या सर्वांना एकत्र जोडणारा धागा शोधण्याचा सिरीआनाचा प्रयत्न आहे. या सर्व जागतिक घडामोडींना एकत्र आणणारा मोठा कॅनव्हास हे सिरीआनाचं वैशिष्ट्य आहे. पण त्यामुळे एरवीच्या हॉलिवूड फिल्म पाहणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट थोडा जड जाण्याची शक्यता आहे. उघड करमणुकीपेक्षा एखाद्या बातमीचा पाठपुरावा केल्याचा सिरीआनाचा रोख आहे. आणि आपणही तो तितक्याच गंभीरपणे पाहावा अशी अपेक्षा आहे. त्यातले सर्व तपशील कळण्याची गरज नाही, पण मूळ धाग्याकडे दुर्लक्ष झालं तर प्रभाव निश्चितच कमी वाटेल.
सिरीआना 100 टक्के सत्य सांगितल्याचा आव आणत नाही. रॉबर्ट बेट यांच्या "सी नो इव्हिल ः द ट्रू स्टोरी ऑफ ए ग्राऊंड सोल्जर इन द सीआयएज वॉर ऑन टेररिझम' या पुस्तकाने प्रेरीत आहे, पण त्यावर आधारित नाही. मात्र तो सत्याच्या जवळ असावा हे जाणवतं. त्याचं कथानक चार तुकड्यांत विभागलं आहे आणि हे चारही तुकडे केवळ शेवटच्या काही वेळात एकमेकांशी सांधले जातात.
पहिला आहे बॉब बार्नसच्या बाल्फमधल्या कारवायांचा कथाभाग. बॉब सी.आय.ए.चा माणूस आहे. उघड न सांगण्याजोग्या गुप्त कामगिऱ्या त्याच्यावर सोपवल्या जातात. अशातच एक कामगिरी फसते आणि त्याच्यावरच उलटते. या परिस्थितीत त्याला मदत करायचं बाजूला ठेवून सरकार त्यालाच बळीचा बकरा करतं.
दुसरा भाग आहे दोन अमेरिकन ऑईल कंपन्यांच्या मर्जरचा आणि संबंधित राजकारणाचा. तिसऱ्या भागात गोष्ट आहे ती नासिर या गल्फमधल्याच एका राजपुत्राची. त्याला तेलाचा पैसा वापरायचा आहे तो आपल्या देशात सुधारणा करण्यासाठी. मात्र नासिरची दूरदृष्टी अमेरिकन सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणारी नाही. म्हणून ते नासीरला डावलून त्याच्या मूर्ख धाकट्या भावाला राज्यावर आणण्याची योजना आखतात.
आणि चौथ्या भागात आहेत ते दोन बेकार. (म्हणजे नोकरी नसलेले या अर्थी) पाकिस्तानी, ज्यांना अरब देशातच राहायचंय. मिळणाऱ्या कटू वागणुकीने हे निराश होतात आणि अखेर सहानुभूती मिळेल तिथे आसरा घेतात.
काही चित्रपटांचा भर हा करमणुकीवर नसून आशयाच्या गांभीर्यावर असतो. सिरीआना अशातलाच एक आहे. मुलांना तर तो समजण्याची फारच कमी शक्यता असल्याने प्रौढ आणि विचार करणारा प्रेक्षक ही त्याची गरज आहे.
- गणेश मतकरी

3 comments:

suchi September 25, 2008 at 11:44 AM  

ingraji cinemavishayi adhik kahi kalnyas madat hotey. thank you.

ganesh September 26, 2008 at 12:20 AM  

thanks, you seem to be a recent visitor. right? or at least not commented till now

hrishikesh July 11, 2010 at 7:09 AM  

" काही चित्रपटांचा भर हा करमणुकीवर नसून आशयाच्या गांभीर्यावर असतो. सिरीआना अशातलाच एक आहे. मुलांना तर तो समजण्याची फारच कमी शक्यता असल्याने प्रौढ आणि विचार करणारा प्रेक्षक ही त्याची गरज आहे. "

bahutek yala-ch " ADULT " Film mhanat asavet ..... :D :D :P :P

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP