विद्यार्थी आणि हिंसा
>> Monday, September 29, 2008
गोष्ट सांगणारे चित्रपट खूप असतात. प्रेक्षकांनाही बहुधा तेच पाहण्याचा सराव असतो, आणि त्यात एकदा का गुंतलं की बाहेरच्या दुनियेला तात्पुरता विसरता येतं. त्यामुळे चित्रपटाच्या वास्तव विसरायला लावणारा ड्रग म्हणून पाहणा-यांना ते सेफ वाटतात. एकदा का चित्रपटांनी सांकेतिक कथनशैली (किंवा निवेदनशैली) सोडली की मग त्यांच्याकडून अपेक्षा कोणती करायची, हे कळेनासं होतं.
कथाप्रधान नसणा-य़ा चित्रपटांमध्ये लक्ष वेधून घेणाऱा, आणि आपल्या चित्रपटांमध्ये जवळजवळ पाहायलाच न मिळणारा प्रकार म्हणजे व्यक्तिप्रधान चित्रपट. व्यक्तिप्रधान म्हणजे कुणा थोर माणासाचं चरित्र मानणारे नव्हेत.पण आपल्या चार चाैघांसारख्याच कुणा व्यक्तिरेखांकडे अधिक बारकाव्याने पाहाणारे, त्यांच्या प्रेरणांचा अर्थ लावून बघणारे,त्यांना समजून घेणारे, या चित्रपटांना सतत प्रेक्षकांना बांधून घालण्याची आणी त्यांना पुढे काय? या उत्कंठावर्धक प्रश्नाला वेसण घालण्याची गरजच भासत नसल्याने त्यांना या इतर गोष्टी करायला भरपूर वेळ असतो. अनेकदा असे चित्रपट हे नेहमीच्या करमणुकीला वाहून घेणा-या सिनेमाहून वेगळे, अधिक प्रगल्भ असतात. २००३चा मॅथ्यू यमन होगने दिग्दर्शित केलेला युनायटेड स्टेट्स ऑफ लेलन्ड याच प्रकारात मोडतो.
हल्ली आपल्याकडे शाळकरी मुलांमध्ये वाढत असलेली हिंसक प्रवृत्ती पाहायला मिळाली असली, तरी अमेरिका या समस्येची जन्मदात्री म्हणावी लागेल. आर्थिक सुबत्ता,वाढता एकलकोंडेपणा, स्वातंत्र्याच्या स्वैर कल्पना आणि हत्यारांची सहज उपलब्धता यामुळे इथे ही वृत्ती वाढली आहे. कोलम्बाईन शाळेत दोन मुलांनी केलेल्या गोळीबाराला या प्रकारातलं सर्वात ठळक उदाहरण म्हणून आठवावं लागेल. कोलम्बाईनचे पडसादही अनेक चित्रपटांमध्ये उमटले. मायकेल मूरचा बोलिंग फॉर कोलम्बाईन हा या प्रकरणाकडे तिरकसपणे पाहणारा गनकन्ट्रोल कायद्याबद्दलचा माहितीपट, गस व्हान सांतचा शाळेतल्या हिंसाचाराच्या उद्रेकाआधीची वीसेक मिनिटे वेगवेगळ्या विद्यार्थांच्या नजरेतून दाखविणारा एलिफन्ट (पाहा मार्च महिन्यातील या चित्रपटाची पोस्ट)
किंवा अशीच एक घटना आणि त्यापुढे पंधरा वर्षानंतरची संबंधित व्यक्तिंची आयुष्य चितारणारा वादिम पेरेलमनने दिग्दर्शित केलेला लाईफ बिफोर हर आर्टस ही सर्व उदाहरणं आपल्या परीने लक्षवेधी आहेत.
युनाईटेड स्टेट्स ऑफ लेलन्डचा संबंध थेटपणे कोलम्बाईनशी लागू शकत नाही, जरी त्यात गुंतलेले अनेक विषय, हे त्या प्रकरणाची आठवण करून देणारे आहेत. उदाहरणार्थ विद्यार्थी दशेतल्या लेलन्डने (रायन गोंसलिंग) वरकरणी कोणत्याही कारणाशिवाय केलेली, आपल्या मैत्रिणीच्या मतिमंद भावाची हत्या. लेलन्ड केवळ एकच खून करतो, आणि त्यामागे असलेलं तत्व हे या प्रकारच्या इतर चित्रपटांपेक्षा पुष्कळ वेगळं आहे, हे मान्य. तरीही त्यांची आठवण होणं स्वाभाविक आहे.
लेलन्ड हा हुशार,संवेदनशील आहे, जरी काहीसा विक्षिप्त, स्वतःसकट सर्वांकडे त्रयस्थपणे न गुंतता पाहाणारा,तो एका प्रसिद्ध लेखकाचा (केवीन स्पेसी) मुलगा आहे. मात्र आई-वडील विभक्त झालेले. लेलन्ड आईकडे राहतो. फ्रान्समधल्या वडिलांशी तो वर्षोनुवर्षे बोललेलादेखील नाही. गुन्हा घडण्याच्याआधीचा लेलन्ड आणि नंतरचा लेलन्ड यात फरक नाही. आपल्या हातून वाईट गोष्ट घडली हे तो समजू शकतो, पण त्याला सांकेतिक स्पष्टीकरण शोधणा-या समाजाचा उपहास त्याला कळत नाही. तुरुंगात त्याचा शिक्षक असतो होतकरू लेखक पर्ल. (ड़ॉन चिआडल) पर्ल या प्रकरणात रस घेतो, तो पुस्तकासाठी विषय मिळेल या आशेने, आणि तसा तो मिळतोही. हळूहळू लेलन्डची पर्लशी मैत्री होते, दोघे एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला लागतात. मात्र लेलन्डच्या वागण्याचं कारण मात्र पर्लला हुलकावण्या देत राहतं.
एलिफन्टसारखा चित्रपट आणि युनायटेड स्टेट्स ऑफ लेलन्ड काही समान मुद्यांना स्पर्श करतात. पालक आणि मुलांमधला कम्युनिकेशन ब्रेकडाऊन, मुलांचं स्वतंत्र जग आणि त्यातले चढउतार अशा जागा दोन्ही ठिकाणी आहेत. मात्र दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. एलिफन्ट प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं भाष्य न करता आणि बाजू न घेता केवळ एक दिवसाचं त्रयस्थपणे चित्रण करून या घटनांचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न करतो. याउलट लेलन्डमध्ये त्याच प्रकारची सामाजिक परिस्थिती दिसून आली, तरी लेलन्डच्याच युक्तिवादानुसार या परिस्थितीचा त्याच्या वागण्याशी थेट संबंध लागू शकणार नाही. एलिफन्टमधली मुलं ज्याप्रकारे डिस्कनेक्ट आहेत, त्याप्रकारे लेलन्ड डिस्कनेक्ट नाही. उलट त्याची भूमिका वाजवीपेक्षा अधिक कनवाळू आहे.
अखेर परिणामाच्या दृष्टीने पाहायचं तर युनाईटेड स्टेट्स ऑफ लेलन्ड हा सर्वांवर एकसारखा परिणाम करणार नाही. वेगवेगळ्या प्रेक्षकांना त्याची वेगवेगळी बाजू आवडू शकते. किंवा नावडूही शकते. मला स्वतःला यातल्या लेलन्डपेक्षा पर्ल आणि लेलन्डच्या वडिलांच्या भूमिका पटल्या. गुन्ह्याचं स्पष्टीकरण विचार करायला लावणारं होतं. पण पूर्ण चित्रपट पेलेल या वजनाचं नव्हतं.
शिवाय चित्रपटाचा शेवटही अधिक प्रगल्भ काही न सुचल्याने सोपा मार्ग निवडल्यासारखा वाटला.
मात्र असं असूनही चित्रपट जरूर पाहण्यासारखा आहे. यातलं वर्तमान अजून आपल्यापर्यंत पूर्णपणे पोचलेलं नसलं, तरी पोचण्याच्या वाटेवर आहे. त्या वर्तमानाची ही एक नांदीच आहे म्हणा ना!
-गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment