रन लोला रन

>> Wednesday, December 10, 2008



``We shall not cease
from exploration
and the end of
all our exploring .......
will be to arrive
where we started
and know the
place for the first time.''
टि. एस. इलियटच्या या ओळींनी चित्रपटाला सुरवात होते.

फायनल इयरच्या फायनल प्रोजेक्‍ट फिल्मचं फायनल स्क्रिप्ट माझ्या होस्टेलच्या खोलीवर लिहिण्याचं काम करत आम्ही पाच मित्र रात्री जागवायचो, तेव्हाची ही गोष्ट आहे. आम्ही दोघांनी एक सीन लिहिला, की इतर तिघांनी तो किती फालतू आहे, हे सिद्ध करायचं. असं करत भारतासाठी आता ऑस्करचा दुष्काळ संपणार, या थाटात आम्ही पटकथा संपवून "अलका'ला सिनेमा टाकायला गेलो. "बॉल इज राऊंड अँड गेम लास्टस नाइन्टी मिनिट्‌स, रेस्ट ऑल इज थेअरी' या प्रसिद्ध जर्मन फुटबॉलपटू स्टेप हर्बर्गर याच्या अवतरणानं चित्रपटाच्या सुरवातीलाच आम्ही जे हादरलो, ते तो संपल्यानंतर पुढची पंधरा मिनिटं कुणीच कुणाशी काही बोलेना! शेवटी आमच्यातल्या एका मोरूनं तोंड उघडलं (इतका वेळ ते पिचकारी कुठं टाकावी याचा विचार करत बंद होतं!) ""याला म्हणतात स्क्रीन प्ले! नाहीतर आपण जे लिहिलंय ते म्हणजे-'' (त्यानं नेमके जे शब्द वापरले, ते इथं लिहिता येतील; पण परंपरा आडवी येते!) तात्पर्य, आम्ही लिहिलेलं स्क्रिप्ट बाद केलं. पुढचे पाच दिवस काहीच लिहिलं नाही आणि नव्यानं (पुढच्या ऑस्करसाठी!) लिहायला सुरवात केली! ज्या चित्रपटानं आम्हाला चक्रावून टाकलं होतं त्याचं नाव होतं "रन लोला रन!'

त्या वेळी लोलाचा वाटणारा हा चित्रपट आज जेव्हा नव्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी बघतो तेव्हा लक्षात येतं, की हा लोलाचा चित्रपट नाहीच. हा आहे दिग्दर्शकाचा चित्रपट. लोला ही या चित्रपटातल्या अनेक शक्‍यतांपैकी एक आहे. आणि चित्रपटातल्या प्रत्येक पात्राला जशा अनेक शक्‍यता आहेत, तशाच लोलाच्या अस्तित्वालाही आहेत. म्हणूनच लोलाचं धावणं हे आपण अनेक शक्‍यतांमागे जे पळत असतो, त्याचं प्रतीक बनतं आणि सुरवातीला व्हिमजिकल वाटणारी ही कल्पना अगदी सहज वाटायला लागते.

लोलाचा मित्र आहे मनी. तो एका गुंडाकडे कामाला आहे आणि त्याच्या हातून एक लाख मार्क्‍स असलेली पिशवी हरवते- कदाचित त्याच्या शेजारी असणाऱ्या भिकाऱ्याकडे ती असेल- पण पुढच्या वीस मिनिटांत जर ती गुंडाला दिली नाही, तर तो आपला खून करेल, असा फोन मनी लोलाला करतो आणि हातातला रिसिव्हर क्रेडलवर आपटून मनीला मदत करायला लोला धावत सुटते!

लोला वडिलांकडे जाते, पैसे मागते. ते "नाही' म्हणतात. "तू माझी खरी मुलगी नाहीस आणि मी आता तुम्हाला सोडून दुसरं लग्न करणार आहे,' असं तिला ऐकवून हाकलतात. लोला पळत मनी आहे तिथं जाते. दोघं मिळून तिथलंच एक स्टोअर लुटतात. पैशाची पिशवी घेऊन बाहेर येतात, पोलिसांच्या हातून सुटलेली गोळी लोलाला लागते, ती कोसळते. तिला मनीबरोबरचा संवाद आठवतो, "तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का' या प्रश्‍नातून प्रश्‍न-उत्तरं सुरू होतात; ती संपत नाहीत. रस्त्यावर पडलेल्या लोलाचा क्‍लोजअप दिसतो - मनीच्या हातून सुटलेली पैशांची पिशवी खाली पडताना दिसते - लोला किंचाळते "स्टॉप!' - खाली पडणारी पिशवी आणि खाली पडणारा टेलिफोन रिसिव्हर यांचे इंटरकट्‌स दिसतात- फोन आपटतो- लोला पळू लागते- एक शक्‍यता संपते!

मनीला वाचवण्याची आता दुसरी शक्‍यता दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. फोन आपटून पुन्हा लोला पळतेय. बापाच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकीदाराच्या कमरेचं पिस्तूल वापरून जबरदस्तीनं पैसे घेते; पिशवीत भरते, बाहेर येते. तोपर्यंत पोलिसांनी ऑफिसला वेढा घातलाय. दारावर बंदुका रोखल्याहेत. लोला घाबरते, पण तेवढ्यात एक ऑफिसर तिला बाजूला करतो आणि सगळे पुन्हा दारावर बंदुका रोखून उभे राहतात! दरोडेखोर म्हणून लोलाची शक्‍यता कुणीच विचारात घेत नाही! लोला पळते, मनीपाशी पोचते; पण रस्ता क्रॉस करणाऱ्या मनीला एक ऍम्ब्युलन्स धडक मारते. लोलाच्या हातून पैशाची पिशवी खाली पडते. आता मनीला लोलाबरोबरचा संवाद आठवतो. नव्या शक्‍यतांचं काहूर माजतं- हेही त्याला नकोय. तो "नाही' म्हणून ओरडतो - पुन्हा खाली पडणारी पैशाची पिशवी- खाली पडणारा टेलिफोन रिसिव्हर - दुसरी शक्‍यता संपते. फोन क्रेडलवर आपटतो आणि लोला धावू लागते!

रस्त्यावर धावणाऱ्या लोलाकडे बघणाऱ्या आणि यापूर्वीच्या दोन्ही शक्‍यतांमध्ये अपघात झालेल्या माणसाशी या वेळी लोला बोलते, त्यामुळे अपघात होत नाही. परिणामी तो गाडी घेऊन निघून जातो. लोलाच्या वडिलांचा तो मित्र आहे. लोला त्याच्या ऑफिसमध्ये पोचायच्या आत तो पोचतो आणि त्यांना घेऊन बाहेर पडतो. त्यांची लोलाशी भेट होत नाही. लोला आता कॅसिनोत जाते. मनीचा जीव वाचवायला वीस मिनिटं तिच्याकडे असतात. ती आपल्याजवळचे शंभर माक्‍स्‌र्‌ जुगारात लावते - "वीस' या आकड्यावर तिला भरपूर पैसे मिळतात. ते ती पिशवीत भरून पुन्हा धावू लागते. तिकडे मनीला, ज्या भिकाऱ्याजवळ तो पैशांची पिशवी विसरला असतो तोच भिकारी दिसतो. तो त्याच्या मागे पळून आपले पैसे परत मिळवतो. लोला कॅसिनोत झालेला उशीर भरून काढण्यासाठी अँब्युलन्समध्ये चढते- तिथं बापाच्या ऑफिसमधला चौकीदार हार्टअटॅकने आडवा असतो! लोला पोचते; पण मनी नसतो. ती हतबल होते- तेवढ्यात गुंडाच्या कारमधून तो उतरतो. त्याला पैसे देऊन सहीसलामत परत आलेला मनी लोलाजवळ येतो. तिच्या हातातली पिशवी बघून म्हणतो - "या पिशवीत काय आहे?' - तिसरी शक्‍यता संपते!

वीस-वीस मिनिटांच्या या तीन शक्‍यता दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टीविषयी लिहायचं तर कदाचित वीसपेक्षा जास्त पानं लागतील! लोला धावतांना ज्यांना धडकते त्यांच्याही भविष्यातल्या शक्‍यता दिग्दर्शक स्नॅपशॉट्‌सच्या माध्यमातून दाखवतो. तिन्ही वेळा लोला त्यांनाच धडकते आणि प्रत्येकदा वेगवेगळ्या शक्‍यता दिसतात. त्या एकमेकांपेक्षा अगदी टोकाच्या वेगळ्याही असू शकतात. पहिल्या शक्‍यतेत डिपार्टमेंटल स्टोअर्स लुटणाऱ्या लोलाला पिस्तुलाच्या सेफ्टी लॉकबद्दल मनी सांगतो; मात्र दुसऱ्या शक्‍यतेत बापाला लुटणाऱ्या लोलाला त्याची माहिती असते! वडिलांचं सेक्रेटरीशी असलेलं अफेअरही तीन वेगवेगळ्या शक्‍यतांवर संपतं!

या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे लोलाचं पळणं. प्रत्येक शक्‍यतेसाठी जीवाच्या आकांतानं पळणारी लोला एवढंच काय ते सत्य. उरलेल्या सर्व शक्‍यता बदलत्या, चांगल्या, वाईट. पुन्हापुन्हा दिसणारी तीच ती माणसं. पण दर वेळी त्यांचा बदललेला ऍटिट्यूड. हे की ते, चांगलं की वाईट, खरं की खोटं या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या शक्‍यता तेवढ्या बदलतात आणि त्यांच्यामागे आपण त्या लोलासारखे फक्त पळत असतो. एकाच प्रश्‍नाच्या हजार शक्‍य उत्तरांमागे लोलाला पळवणाऱ्या या जर्मन दिग्दर्शकानं सुरेश भटांच्या मराठी ओळी कदाचित वाचल्या नसतील; पण त्यांचा अर्थ त्याला नक्कीच ठाऊक असेल-

एक साधा प्रश्‍न आणि लाख येती उत्तरे
हे खरे, ते खरे, ते खरे की हे खरे?


- प्रसाद नामजोशी




(या चित्रपटावरील आणखी एक लेख - थेट रचनेतलं कौशल्य- वाचा मार्च महिन्यातील लेखांमध्ये)

2 comments:

Yawning Dog December 10, 2008 at 7:08 AM  

लोलाचे पळणे काय मस्त चित्रित केले आहे ना, एकदम लाईव्हली आहे.
Kudos to Franka Potente

सचिन उथळे-पाटील December 11, 2008 at 4:27 AM  

Realy nice movie.

Please change the Black background color.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP