संदिग्ध वास्तवातली घुसमट

>> Monday, March 9, 2009



फिलिप के डिकची संपूर्ण विज्ञानलेखनाची कारकीर्द एका प्रातिनिधिक शब्दात मांडायची तर क्लॉस्ट्रोफोबिया हा शब्द डोळ्यासमोर येतो. त्याच्या सर्व पात्रांचं अस्तित्व हे आधुनिक समाजव्यवस्थेचा बळी असतं अन् या व्यवस्थेशी समरूप होऊ न शकल्याने होणारी घुसमट हा विषय त्याच्या अनेक कादंबऱयांच्या केंद्रस्थानी असतो, असं म्हणता येईल. फिलिप के डिकचं विपूल विज्ञानसाहित्य हे दुर्दैवाने तो असताना फार लक्षवेधी ठरलं नाही. मात्र मृत्यूनंतर हे नाव केवळ साहित्यासाठीच नाही, तर त्या साहित्यावर आधारित चित्रपटांसाठी महत्त्वाचं ठरलं. ब्लेडरनर (मूळ कादंबरी डू अँड्राइड्स ड्रीम आँफ इलेक्ट्रिक शीप) , टोटल रिकॉल (मूळ कथा वुई कॅन रिमेम्बर इट फॉर यू होलसेल), मायनॉरिटी रिपोर्ट (मूळ कथा मायनॉरिटी रिपोर्ट), या चित्रपटांनी केवळ विज्ञानपटातच नव्हे तर एकूण चित्रपट इतिहासात आपलं नाव अजरामर केलं, अन् आपल्याबरोबर फिलीप के डिकचं देखील. आजही अनेक दिग्दर्शक त्याच्या कथा- कादंब-यांवर चित्रपट बनविण्याचे मनसुबे रचताहेत.
फिलिप के डिकच्या सर्व साहित्यात दोन गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात. ज्या त्यांच्या रुपांतरासाठी अडचणीच्या ठरतात. घटनांपेक्षा संकल्पनांवर भर ही त्यातली पहिली गोष्ट. या गोष्टीमुळे त्यांच्या विज्ञानकथा विचारांना प्रचंड चालना देणा-य़ा ठरतात. मात्र कथानक ही चित्रपटाची मूलभूत गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे तिस-या अंकाचा किंवा शेवटाचा अभाव. डिक अखेरपर्यंत आपल्या वैचारिक बैठकीला सोडत नाही. त्यामुळे त्याच्या गोष्टीचा शेवटही घटनांना वेग आणणारा असत नाही. साहजिकच त्याच्या गोष्टी रुपांतरित करताना शेवटचा भाग हा जवळजवळ नव्याने लिहावा लागतो, जो दर वेळी कथानकाच्या मूळ संकल्पनेशी सुसंगत असतोच असं नाही( पाहा मायनॉरिटी रिपोर्ट) तरीही त्याच्या संकल्पनांची आणि आशयाची भूलच एवढी मोठी असते की, रिडली स्कॉट, स्टीवन स्पीलबर्गसारखे नावाजलेले दिग्दर्शकही या लेखकाच्या प्रेमात असतात. स्कॉटचा ब्लेडरनर, स्पीलबर्गचा मायनॉरिटी रिपोर्ट आणि व्होरावेनचा टोटल रिकॉल हे आशय अन् संकल्पनांना स्थान देऊन बनले, पण त्यांनी गोष्टींच्या मूळ आकाराशी मोठ्या प्रमाणात तडजोड केली. २००६ च्या ए स्कॅनर डार्कलीमध्ये रिचर्ड लिन्कलेटरने प्रयत्न केला, तोही तडजोड टाळण्याचा.
स्कॅनर मुळातच रुपांतर करायला कठीण कादंबरी आहे. एकतर ती बरीचशी चर्चात्त्मक आहे. दुसरं म्हणजे तिच्यात नाट्यपूर्ण घटना या इतर गोष्टींच्या तुलनेत कमी आहेत, आणि तिसरं म्हणजे इतरांप्रमाणेच, तिच्यातही शेवटाचा गोंधळ आहे. लिन्कलेटर हे नाव व्यावसायिक दृष्टीने फार लोकप्रिय म्हणता येणार नाही. कारण मुळात हा इंडि किंवा इन्डिपेन्डन्ट फिल्ममेकर आहे. बॅ़ड न्यूज बेअर्स किंवा स्कूल आँफ रॉकसारखे काही चित्रपट त्याने व्यावसायिक चौकटीत यशस्वीपणे पार पाडून दाखविले आहेत, हे खरं. पण त्याचं महत्त्वाचं काम हे त्याच्या बीफोर सनराईज/बीफोर सनसेट, वेकिंग लाईफ, स्लॅकर्स किंवा टेप यासारख्या अधिक व्यक्तिगत स्वरूपाच्या इन्डिपेन्डन्ट किंवा हॉलीवूडबाहेर केलेल्या चित्रपटांत दिसून येते. स्कॅनर हा व्यावसायिक अन् इन्डिपेन्डन्ट चित्रपटाची वैशिष्ट्य एकत्र करण्याचा प्रकार असावा, लिन्कलेटरला व्यावसायिक नटमंडळींचं वावडं नाही. कारण इथन हॉक, उमा थर्मन यासारख्या अनेक मोठ्या स्टार्सनी त्याच्या छोट्या चित्रपटांतही पूर्वीपासून कामे केली आहेत. इथे किआनू रिव्हज, रॉबर्ट डाऊन ज्युनिअर, विनोआ रायडर हजेरी लावतात, पण आपल्या मूळ स्वरूपात नव्हे. स्कॅनर एकत्रितपणे दोन प्रकारचे प्रयोग करतो. एक तर तो फिलिप के डिकच्या पुस्तकाला व्यावसायिक फॉर्म्यूलात बसवण्याचा प्रयत्न न करता आहेन तसं वापरतो आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष चित्रीकरणाला अँनिमेशन शैलीत आणण्याचं रोटोस्कोपिंग हे तंत्र वापरतो. लिन्कलेटरनं याआधी गोष्टींचा पूर्णपणे अभाव असलेल्या द वेकिंग लाईफमध्ये रोटोस्कोपिंग वापरलं होतं. कदाचित स्कॅनरची पूर्वतयारी म्हणून. मात्र दोन्ही ठिकाणी ते वापरण्याला कारण आहे. दोन्ही चित्रपटात वास्तवाची संदिग्धता अपेक्षित आहे. जी या अर्धवास्तव दृश्यात्मकतेत शक्य होते.
स्कॅनरमधला समाज हा सब्स्टन्स डी या अमली पदार्थाच्या संपूर्ण अमलाखाली आहे, जवळजवळ सगळेच या ड्रगवर अवलंबून आहेत. सामान्य नागरिकांपासून पोलिसांपर्यंत. त्यामुळे त्यांचं वास्तवच पूर्णपणे भासमय होऊन गेलेलं आहे. बॉब आर्क्टर (किआनू रिव्हज) हा गुप्तपोलीस आहे. गुप्तपोलीस हा जवळजवळ विस्मरणात चाललेला शब्द इथे वापरण्याचं खास कारण म्हणजे इथे बॉबची ओळख ही खरोखरच गुप्त आहे. पोलीस म्हणून तो एक स्क्रॅबल सूट नावाचा पूर्ण शरीर झाकणारा पोषाख घालतो, जो बाह्यांगावर हजारो स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा बदलत ठेवेल. अन् बॉबच्या आवाजालाही थोड्याफार प्रमाणात बदलत राहील. त्यामुळे आँन ड्य़ुटी असताना फ्रेड हे नाव वापरणारा बॉब प्रत्यक्षात कोण आहे, हे त्याच्याबरोबरच्या अधिका-यांनाही माहिती नाही.
आता योगायोगानं बॉबवरच जबाबदारी दिली जाते ती त्याच्याच घरावर नजर ठेवण्याची, जिथे तो बॅरीस (रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर) आणि लकमन (वुडी हॅलरसन) या मित्रांबरोबर अन् डॉना (विनोआ रायडर) या ड्रग डिलर मैत्रिणीबरोबर राहतो. बॉबचं मुळचं गुंतागुंतीचं आयुष्य आता अधिकच गोंधळाचं होतं.
पॉईंट आँफ रेफरन्स हरवलेल्या समाजाचं चित्रण हा स्कॅनरचा विशेष आहे. पुस्तकातही आणि चित्रपटातही. त्याची प्रकृती ही रहस्यपटाची म्हणता येईल. अन् त्यात नाही म्हणायला रहस्य आहेदेखील. मात्र रहस्याचा उलगडा हा समाजचित्रणाच्या तुलनेत दुय्यम म्हणावा लागेल. आपल्याकडे अजूनही अँनिमेशन (मग ते कोणत्याही शैलीतील असेना) हे बाल चित्रपटांशी जोडलं जातं. स्कॅनरसारखे चित्रपट हे या माध्यमाच्या शक्यता पडताळून पाहणारे आहेत, म्हणूनच ते पाहिले जाणं आवश्यक आहे. त्यातला आशय सुबोध असावा या आग्रहाशिवाय.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP