क्यूरिअस केस ऑफ स्लमडॉग मिलिअनेअर
>> Sunday, March 1, 2009
ऑस्कर निकालाच्या आदल्या दिवशी अचानक निकाल फुटल्याची बातमी आली. अॅकेडमी वरिष्ठांच्या सही-शिक्क्यासह जाहीर झालेल्या निकालाकडे सर्वाचंच लक्ष वेधलं अन् विविध वादांना तोंड फुटायला लागलं. अॅकेडमीने ही यादी खोटी असल्याचं सांगून हात वर केले, पण आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले. ही यादी खरी वाटायला काही प्रमाणात तिचा अस्सल असल्याचा कागदोपत्री आव जरी कारणीभूत असला तरी मला वाटतं खरं कारण होतं ते इथे जाहीर झालेल्या विजेत्यांच्या नावातंच. ही नाव तंतोतंत बांधलेल्या अंदाजांशी जुळणारी होती आणि दुसऱ्या दिवशी खरी यादी येताच दिसून आलं, की खरोखरच अनेक नावं या दोन्ही ठिकाणी उपस्थित होती.
या वर्षीच्या निकालाचं ‘प्रेडिकटेबल’ असणं हे वैशिष्टय़ म्हणावं लागेल. नामांकनं जाहीर होताच काही तांत्रिक पारितोषिकं वगळता कोणाला काय मिळणार हे लख्खं दिसायला लागलं आणि सवरेत्कृष्ट अभिनेता ही कॅटेगरी वगळता इतर कोणत्याच प्रमुख नामांकनात स्पर्धा उरली नाही. अगदी सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठीही खरी स्पर्धा दोनच नावांत होती, ‘मिल्क’मधला शॉन पेन आणि ‘रेसलर’मधला मिकी रोर्क. पेनला हल्लीच ‘मिस्टीक रिव्हर’साठी ऑस्कर मिळाल्याने आणि रोर्क अलीकडच्या काळात चित्रसृष्टीबाहेर फेकला जाऊनही पुनरागमनात चमकल्याने रोर्कचं पारडं थोडं जड होतं, पण शेवटी पेननेच बाजी मारली.
सर्वाधिक महत्त्वाची पारितोषिकं मिळवून या वर्षीचा मोठा विजेता ठरला तो म्हणजे आपल्याकडे विनाकारण वादग्रस्त ठरलेला स्लमडॉग मिलिअनेअर यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करणाऱ्या या छोटय़ाशा निर्मितीचा योग हा जवळपास तिच्या नायकासारखाच निघाला. अशक्य अडचणींवर कुरघोडी करणाऱ्या जमालसारखंच तिचंही नशीब टोकाचं उत्तम निघालं.
खरं तर स्लमडॉगच्या विजयात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, मात्र त्याच्या वादग्रस्त ठरण्यात जरूर आहे. आपल्याकडे कोण कशाला कधी आक्षेप घेईल याचा काही भरवसाच उरलेला नाही. त्यातून स्लमडॉगबद्दल उठणारे आक्षेप तर इतक्या वेगवेगळ्या स्तरांमधून उमटले, की त्यांच्या विविधतेचंच कौतुक वाटावं. कोणाचा भारतातली गरिबी दाखवायला विरोध, तर कोणाचा नायकाच्या धर्माला. कोणाचा बॉलीवूड शैली असल्याने चित्रपटात नावीन्य काय, असा प्रश्न तर कोणी डॅनी बॉइलच्या ब्रिटिश असण्याचा काढलेला तिरकस अर्थ!
या सर्व आक्षेपांनी, प्रश्नांनी अन् लावलेल्या चुकीच्या सूराने चित्रं असं उभं केलेलं, की स्लमडॉगचा सन्मान हा बॉलीवूड अन् भारत यावर एकत्रितपणे केलेला अन्याय आहे, आणि केवळ गोरा दिग्दर्शक हे त्याच्या यशाचं एकमेव कारण आहे. आपल्या दिग्दर्शकांनी जर हा चित्रपट केला असता, तर त्यांचं कुठेही कौतुक होण्याची काहीच शक्यता नव्हती.
या सगळ्या गढूळलेल्या वातावरणात जेव्हा भारतीय प्रेक्षक स्लमडॉग पाहतो, तेव्हा बहुतेकदा तो स्वतंत्रपणे मोकळ्या मनाने आस्वाद घेण्याच्या तयारीत नसतो, तर मनातल्या मनात तो आतापर्यंत चित्रपटाविषयी जे जे ऐकलं त्याचा अर्थ लावत असतो. बऱ्याचदा स्लमडॉगला मिळालेल्या अनेक सन्मानांनी त्याची कल्पना ही ऑस्कर मिळविणारी टिपिकल भव्य निर्मिती असेल, अशी झालेली असते, पण चित्रपट पाहायला लागताच त्याला जाणवतं, की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, बरचसं बॉलीवूड छापाचं. मग तो गोंधळतो अन् आपण ऐकलेले चित्रपट विरोधी सूर त्याला आठवायला लागतात. मग तो फारसा विचार करीत नाही, पटकन निष्कर्ष काढून मोकळा होतो, जो बहुधा चित्रपटाचं अवमूल्यन करणारा असतो.
स्लमडॉग जसा आहे तसा का आहे इथपासून, त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात पारितोषिकं का मिळाली इथपर्यंत सर्व प्रश्नांना सोपी उत्तरं / स्पष्टीकरण आहेत आणि आपण धर्म / देश / आर्थिक स्तरासारख्या गोष्टीनं गुंतवता निरपेक्षपणे पाहिला तर तो सहज आवडण्यासारखाही आहे.
डॅनी बॉइलची स्वत:च्या सिनेमाविषयी काही निश्चित बैठक आहे. १९९४ मधल्या ‘शॅलो ग्रेव्ह’पासून तो दिग्दर्शनात उतरला आणि तेव्हापासूनच त्याची स्वत:ची अशी एक निश्चित शैली ठरून गेली. शॅलो ग्रेव्ह हा म्हटलं तर एका गुन्ह्य़ासंबंधातला चित्रपट होता, म्हटलं तर एक गडद फार्स होता. एका फ्लॅटमध्ये एकत्र राहणारे तिघंजण. दोन मुलं, एक मुलगी. संबंध फक्त मैत्रीचे. तिघं एका चौथ्याला पेइंगेस्ट म्हणून घेतात, ज्याचा तडकाफडकी ड्रग ओव्हरडोसने मृत्यू होतो. मात्र मरताना तो एक पैशानी भरलेली बॅग मागे ठेवून जातो. हा अचानक धनलाभ या तिघांच्या आयुष्यात जी उलथापालथ घडवितो त्याचं चित्रण म्हणजे शॅलो ग्रेव्ह.
या चित्रपटात बॉइलने अशा काही गोष्टी केल्या ज्या त्याच्या पुढल्या अनेक चित्रपटांत कायम राहिल्या आणि त्या पुढे बॉइलच्या शैलीचा ट्रेडमार्ग बनून गेल्या. आताच्या ‘स्लमडॉग मिलिअनेअर’पर्यंत या गोष्टींचा सातत्याने केलेला वापर त्याच्या चित्रपटात दिसून येतो. त्याचे चित्रपट घडण्याला गरज असते ती एका व्यक्तिसमूहाची जो अत्यंत सामान्य आहे. त्यांच्यात कोणत्याच प्रकारचं वैशिष्टय़ नाही. किंबहुना या व्यक्तीही तपशिलात चितारलेल्या थ्री डिमेन्शनल व्यक्तिरेखा नाहीत, तर हे आहेत टाइप्स. अनेक चित्रपटांत वापरले गेलेले, पण अजून वापरले जाण्याच्या शक्यता असलेले. बॉइल हे टाइप्स उचलतो आणि त्यांना एखाद्या अशक्य परिस्थितीत आणून टाकतो. मग या परिस्थितीबरोबर ते कसे रिअॅक्ट होतात हे पाहणं, हा त्याचा चित्रपट. आता आपल्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटात तो हीच गोष्ट करून वेगळेपणा कसा राखू शकला, तर विविध सांकेतिक चित्रप्रकारांचा (जॉनरचा) वापर करून.गुन्हेगारी (रॉलो ग्रेव्ह / ट्रेनस्पॉटिंग), विज्ञानपर (सनशाईन), झोम्बी किंवा वॉकिंग डेड आणि अॅपोकॅलिप्टिक चित्रपटाचं मिश्रण (२८ डेज लेटर) रोमॅन्टिक कॉमेडी (ए लाइफ लेस ऑर्डिनरी) असे हे प्रकार आहेत.
जेव्हा तो या चित्रप्रकारांचा वापर करतो तेव्हा तो शक्य तितकी या चित्रप्रकाराची मूळ वैशिष्टय़ं कायम ठेवतो. त्यामुळे हे चित्रपट त्यांच्या चित्रप्रकारातले म्हणूनही सहज ओळखता येतात. हे केल्यानंतर मात्र तो स्वत:ची काही ठेवणीतली सूत्रं त्यात मिसळतो आणि बदल साधतो. ब्लॅक ह्य़ुमरचा सततचा वापर नेहमीच बॉइल करताना दिसतो. हा विनोद इतका गडद आहे, की तो दर वेळी तो हसवेल असंही नाही, मात्र तो प्रसंगाची अॅब्सर्डिटी अधोरेखित जरूर करील. श्ॉलो ग्रेव्हमधला प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रसंग, लक्षावधी रुपये अचानक मिळाल्यावर मुलांनी केलेले गुंतवणुकीचे प्रयत्न, ट्रेनस्पॉटिंग आणि नंतर स्लमडॉगमधली टॉयलेट उडी या सर्व विनोदाचा वापर हा टिपिकल बॉइल आहे. इतर चित्रपटांमधले प्रसंग जर इंग्लंडचा अपमान करीत नसले (आणि तसा ते करीत असल्याची तक्रार कुठेही नोंदविलेली दिसत नाही.) तर स्लमडॉगदेखील भारताचा अपमान करतो असं म्हणायला जागा नाही. हा विनोद वेगळ्या प्रकारचा आहे; पण चित्रपटात सातत्याने वापरलेला आहे- टेक्श्चरशी आणि बॉइलच्या इतर चित्रपटांशी सुसंगत असा. विनोदाबरोबरच हिंसेचा अचानक अंगावर येणारा उद्रेक हे दुसरं साम्यस्थळ. यासाठी बॉइलला त्याची पात्रं गुन्हेगारी वळणाची असण्याची गरज वाटत नाही. कारण ही हिंसा ही दुसऱ्याला इजा पोहोचविण्यासाठी नाही, तर स्वरक्षणासाठी किंवा काही प्रसंगी व्यक्तिरेखेच्या जाणिवांचा एक स्वाभाविक भाग असल्यासारखी वापरली जाते.
फॉल्स एण्डिंग हेदेखील बॉइल नेहमी घडवितो. बहुतेक वेळा त्याचे चित्रपट वरवर सुखान्त वाटणाऱ्या शेवटाशी संपतात, पण विचार केल्यावर लक्षात येतं की, हा खरा सुखान्त नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. आता जरी सारं काही ठीक असलं, तरी हा आभास आहे. चित्र कधी पालटेल सांगता येणार नाही. स्लमडॉगच्या सुखान्त शेवटाला बॉलीवूड हॅपी एण्डिंगचं व्यवच्छेदक लक्षण मानणाऱ्यांनी हा विचार केला आहे का, की स्लमडॉगचा शेवट खरोखर आनंदी आहे का?
ही बॉइलच्या चित्रपटांची पाश्र्वभूमी जर लक्षात घेतली तर एक गोष्ट स्पष्ट होते, की तो एरवी जसा एक-एक चित्रप्रकार हाताळतो, तसाच इथे त्याने ‘बॉलीवूड फिल्म’ हा एक चित्रप्रकार म्हणून, जॉनर म्हणून हाताळलेला आहे. ज्याप्रमाणे ‘सनशाइन’ सायन्स फिक्शन म्हणून ओळखला जातो किंवा ‘ए लाइफ लेस ऑर्डिनरी’ रोमॅण्टिक कॉमेडी म्हणून ओळखला जातो, तसाच ‘स्लमडॉग’ बॉलीवूड वैशिष्टय़ांसाठी ओळखला जातो. त्याचं तसं असणं हा योगायोग वा अपघात नाही, तर ही हेतूपुरस्सर केलेली योजना आहे.
यावर स्वाभाविकपणे एक प्रश्न असा संभवतो की, आपण जर सामान्य प्रेक्षकाच्या- जो बॉलीवूडपलीकडचे फार चित्रपट पाहत नाही- अशा प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याला बॉइलचा करिअर ग्राफ माहीत असण्याची शक्यता मर्यादित आहे. मग त्याच्या दृष्टीने-स्लमडॉग वेगळा कसा? अन् त्याला भाराभर पुरस्कार मिळत असताना आपल्या बिचाऱ्या बॉलीवूडला कोणी विचारत नाही, असं का?
माझ्या मते, स्लमडॉग वेगळा कसा, हे समजायला बॉइलचा सिनेमा माहीत असण्याची गरजच नाही. जरा जागरूकपणे तो काय दाखवतोय, हे पाहिलं तर त्याचा वेगळेपणा कळण्यासारखा आहे. जरी स्पष्ट शब्दांत मांडता आला नाही, तरी हा आणि टिपिकल बॉलीवूड सिनेमा यांत काहीतरी निश्चित फरक आहे, हे सर्वानाच कळायला काही हरकत नाही. आणि केवळ ही जाणीव होणं, हेदेखील पुरेसं आहे.
एक गोष्ट उघड आहे की, स्लमडॉगमध्ये बॉलीवूडच्या अनेकानेक जागा येतात. बालपणीचं प्रेम, दोन भावांमधल्या परस्परविरोधी प्रवृत्ती, कोठा संस्कृती, भेटणं-बिछडणं, अंडरवर्ल्डची दादागिरी या सगळ्या गोष्टी- ज्या आपण इतरत्र अनेकदा पाहिल्यात- त्या इथेही आहेत. शिवाय परीकथेसारखं नायकाला त्याच्या प्राक्तनाकडे घेऊन जाणंही आहे. मात्र याबरोबरच एक असा ट्रॅकदेखील आहे- जो या सगळ्याला छेद देत राहतो. तो ट्रॅक आहे वास्तवाचा. बॉलीवूडची वळणं घेतानाच दिग्दर्शक अशा अनेक जागाही शोधताना दिसतो जिथे तो बॉलीवूडला पॉझवर टाकून, अशा प्रसंगी खरं काय होईल, याचा विचार करतो. इथल्या भिकाऱ्याचे डोळे काढण्याचा प्रसंग आपल्याला बॉलीवूडमध्ये दिसणार नाही. नायकाच्या भावाने नायिकेला बरोबर ठेवून नायकाला खोलीबाहेर हाकलण्याचाही नाही. दंगली, पोलीस टॉर्चर यासारख्या प्रसंगांची भीषणताही इथे दिग्दर्शक चटकन्, पण थेटपणे दाखवतो. मागे मी एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात वाचलं होतं की, स्लमडॉगमध्ये दाखवलेला पोलीस टॉर्चर किती चुकीचा आहे, आणि खरं तर असं आपल्याकडे होत नाही. मला वाटतं, मरिन लाइन्स पोलीस स्टेशनवरल्या बलात्काराची घटना अजून पुरती विसरली गेली नसताना अशी बेजबाबदार विधानं करू नयेत. स्लमडॉगमधलं वास्तव दर्शन हे वाढवून सांगितलेलं नाही. जे आहे ते खरंखुरं आहे. मात्र स्लमडॉगने या वास्तवात फॅण्टसीचं पाणी मिसळून वास्तवाचा परिणाम थोडा पुसट केलाय. किंवा कोणी असंही म्हणेल की, स्लमडॉगने फॅण्टसीत वास्तवाचं विष ओतून परिणाम थोडा गडद केलाय. शेवटी दोन्हींचा अर्थ तोच. आपण कोणत्या बाजूने पाहतोय, एवढाच फरक. मात्र ही वास्तव आणि फॅण्टसीची सरमिसळ हा स्लमडॉगचा वेगळेपणा आहे, हे निश्चित.
एकदा हे लक्षात घेतलं की, पुरस्काराचं कोडंही उलगडायला मदत होते. खरं तर हा चित्रपट सन्मानप्राप्त ठरायला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर बॉइलचा दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे बॉलीवूडबद्दलचं परदेशी वाढणारं कुतूहल. गेल्या आठ-दहा वर्षांत बॉलीवूड (की हिंदी चित्रपट उद्योग?) आणि हॉलीवूड (की अमेरिकन फिल्म इंडस्ट्री?) ही एकमेकांच्या खूप जवळ आलेली आहेत आणि त्यामध्ये एक प्रकारची सांस्कृतिक देवाणघेवाणदेखील सुरू झालेली आहे. रेहमानसारखे तंत्रज्ञ-कलाकार तर गेली अनेक र्वष त्यांच्याकडे माहीत आहेत, कामंही करताहेत. आपला चित्रपट त्यातल्या नाचगाणी मसाल्यासह परिचित आहे. आणि आता तर संयुक्त चित्रपटनिर्मितीलाही सुरुवात झालेली आहे. असं असूनही आपला (‘लगान’चा काही प्रमाणात अपवाद वगळता) कोणताही चित्रपट त्यांच्याकडे खूप कौतुकप्राप्त ठरलेला नाही. याला एक कारण असं मानता येईल की, जरी आपला मसाला त्यांना परिचित असला तरी आपली पाल्हाळीक मांडणी मात्र फार आवडणारी नाही. काही मर्यादित चित्रपट विद्वान एक शैली म्हणून तिचा अभ्यास करीतही असतील, पण त्यांच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचायचं तर एक परिचित स्वरूप याला आणणं आवश्यक आहे. तेही एरवीची सर्व वैशिष्टय़ं जशीच्या तशी ठेवून. वेळ आटोक्यात आणणं, पटकथेचा पसरटपणा कमी करणं, गाणी ठेवूनही त्यांचं प्रमाण आटोक्यात आणणं, या सगळ्या गोष्टी कोणीतरी करण्याची गरज होती. बॉइलने ते केलं आणि म्हणून स्लमडॉग हा बॉलीवूडची अब्रिज्ड आणि पचायला सोपी आवृत्ती म्हणून ताबडतोब उचलला गेला.
आपले दिग्दर्शक हे करू शकले असते असं नाही. याचं कारण- आपल्या दिग्दर्शकांच्या कुवतीत नसून, त्यांच्या डोळ्यांसमोर कोणता प्रेक्षक आहे, यात दडलेलं आहे. आपले दिग्दर्शक हे (अजून तरी) आपल्या प्रेक्षकांसाठी चित्रपट करतात. त्यामुळे ‘फुल मॉण्टी’सारख्या उत्तम चित्रपटासाठी गाजलेल्या पटकथाकार सायमन बोफॉयने ज्या प्रकारचे बदल विकास स्वरूपच्या कादंबरीत केले, ते त्यांना करताच आले नसते. बोफॉयने ‘क्यू अॅण्ड ए’ कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेली कल्पना- म्हणजे ‘क्विझ शो’मधल्या प्रश्नाच्या निमित्ताने एका मुलाचं आयुष्य समोर उभं करणं- ही कायम ठेवली. तसंच घटनांची त्रिस्तरीय मांडणीही कायम ठेवली, जी आळीपाळीने मुलाच्या आयुष्यात पोलीस स्टेशनवर (कादंबरीत वकिलाच्या खोलीत) आणि ‘क्विझ शो’त डोकावत राहते. मात्र हे सोडून त्याने प्रश्नोत्तरांचे-अर्थातच जमालच्या नावापासून स्वतंत्र घटनांपर्यंत सर्व तपशील- बदलले. जमालच्या आयुष्याची एक भरधाव बॉलीवूड शोकेस केली आणि पटकथेची गती एपिसोडिक न वाटू देणं, शब्दबंबाळ न करता जेवढय़ास तेवढे संवाद वापरणं, अनावश्यक लांबण न लावणं- अशा युक्त्यांमधून एक कॉम्पॅक्ट पटकथा घडविली. तो हे करू शकला, कारण भारतीय प्रेक्षकांना अमुक चालतं, अमुक नाही, या समजुतींनी तो बांधला गेला नव्हता. तो सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या प्रेक्षकाला जे चालेल ते आणू पाहत होता. अखेर आपल्याकडेही ज्यांनी पूर्वकल्पनांची ओझी अंगावर न घेता तो पाहिला, त्यांना तो आवडला. आपल्या पटकथाकारांनीही यापासून काही धडा घ्यायला हरकत नसावी.
हे सगळं असूनही एक लक्षात घ्यायला हवं की, हे जमून येणं हा एक मोठा योगायोग होता. बॉइलने अशा प्रकारचा प्रेक्षक मिळविण्याची योजना करून तो मिळाला असता, असं सांगता येत नाही, किंवा एखादी अधिक महत्त्वाकांक्षी निर्मिती यावर्षी मैदानात उतरली असती तरीही तो टिकला नसता. त्याचं यश हे खरं तर त्याने अशा कोणत्याही प्रकारच्या हिशेबी योजनांमध्ये न पडता मनाला येईल तेच आणि आजवर करीत होता तेच प्रामाणिकपणे आणि त्याच मार्गावरून पुढे जाऊन केलं, यातच आहे.
या वर्षी आपल्या सर्व कलाकार- तंत्रज्ञांना ऑस्कर मंचावर पाहणं ही आनंदाची गोष्ट होती. हॉलीवूड हे आशयघन जागतिक चित्रपटांशी तुलना करण्याचं ठिकाण नसलं तरी ते व्यावसायिक चित्रपटांचा ‘लास्ट वर्ड’ आहे, हेदेखील खरं. आपण नुसतीच हॉलीवूडला नाकं न मुरडता ऑस्करकडे पुढली पायरी म्हणून पाहिलं पाहिजे. तंत्रज्ञ- कलाकारांनी हे आपण करू शकतो, हे सिद्ध केलेलंच आहे. आता दिग्दर्शक-पटकथाकारांची पाळी आहे. त्यादृष्टीने आपला चित्रपटही येत्या काळात घडत जावा, अशी अपेक्षा आहे.
-गणेश मतकरी
(लोकसत्तामधून)
8 comments:
Tumcha blog kharach khup vachniy ahe.Tyabaddal vadach nahi....
pan... blog cha color khup trasdayak aahe ... you should use white background with black text... kinva aata che black bg tasech theun font cha color white na thevta... gray karava...
khup vel post vachlyavar ti black bg var asleli white akshare... dolyat khuptat...
you can refer to content rich site and their colors and fonts
Thnx very much
Ganesh - Dev D pahilas ka? Tyachyavar var agadee post nahee jamale taree pan tuze chhotekhanee mat/parikshan/vishleshan aikayla avadle mala.
thanks harshal.
the color issue is largely debated and unfortunately we are not reaching any consensus. personally, i think black looks good, but thats me.i normally like the color.
yd,
if you have seen earlier comments, i have expressed my stand on dev d.however, if i see it, i will definitely post a response.
्मी हा लेख लोकसतामधे वाचल्यानंतर आवडल्याचे आपल्याला कळाविणार होतो. पण राहीलच.
thanks harekrishnaji,
actually now there is so much written about slumdog, readers may be sceptical about even serious articles. i did receive a good response for this one though.
हा लेख लोकसत्तामध्ये वाचल्यावरच आवडला होता. मात्र ग्रॅन टोरिनोला अंतिम पाचांमध्येही स्थान नसण्याचे कारण मला अजिबात समजलेले नाही. तुमचे यावर मत वाचायला आवडेल. ईस्टवूडचा या पिक्चरमधला रोल ऑस्करवर्दी नव्हता असे कोण म्हणू शकेल?
we have to always consider that oscar nominations are not always for that particular work. academy members are usually in the know, and sometimes the judgment gets based on previous preformances.cases in point being departed oscar for scorsese and judi dench oscar for shakespeare in love. vice versa, if the actors are celebrated enough ,specially in the recent past, they are also skipped even if deserving. with the same logic, sean penn though deserving was never considered a serious threat to mickey rourke.eastwood for many years is one of the most celebrated figures and has received many deserved nominations and awards.see lists on mystic river, million dollar baby, flags of our fathers and letters from iwo jima.considering these comparitively, though v good, torino is a minor film, and academy members may have chosen to favour others, when they could.does it make sense?i hope so..
hi ganesh, tumchya uttara baddal aabhar... blogcha background color black mastach ahe ... mi font color jo white hota tyabaddal lihile hote...pan mala vatta to color atta tumhi gray kelay...
thanxxx... ata changle vattay.
Post a Comment