क्‍युरिअस केसचं नक्की काय चुकलं?

>> Sunday, March 15, 2009


क्‍युरिअस केसचं नक्की काय चुकलं हे त्याला मिळालेल्या ऑस्कर पारितोषिकांवरून स्पष्ट होतं. कलादिग्दर्शन, मेकअप आणि व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स ही त्यामानाने दुय्यम अन्‌ तांत्रिक स्वरूपाची पारितोषिकं या चित्रपटाला मिळाली. व्यक्तिरेखांच्या आत्म्याशी समरस न होता बाह्यावरणाशी समरस होणं हे बेंजामिन बटनला महागात पडलं.

डेझी या बॅले नर्तिकेच्या आयुष्यातला एक दिवस. ती आपल्या कार्यक्रमाची तयारी करतेय. त्याच शहरात कुठेतरी एक बाई शॉपिंगला निघाली आहे. जिना उतरताना तिच्या लक्षात येतं, की आपण कोट विसरलोय. कोट घेताघेताच तिचा एक फोन येतो. त्याच शहरात एक माणूस ऑफिसला जायला निघालेला. सकाळी उठायला उशीर झाल्याने, आता त्याला बाहेर पडायलाही उशीर झालेला. घाईघाईतच तो बाहेर पडतो. घरातली कामं पूर्ण करून आता पुन्हा शॉपिंगसाठी बाहेर निघालेल्या बाईच्या टॅक्‍सीसमोर गाडी करकचून ब्रेक लावते. माणूस वाचतो.
शॉपिंगवाली बाई एक पार्सल घेण्यासाठी एका दुकानात पोचते. अपेक्षेप्रमाणे पार्सल तयार नाही. जिने ते तयार करणं अपेक्षित आहे त्या बिचारीचा काल रात्रीच प्रेमभंग झालेला. त्याच दुःखात ती पार्सलविषयी विसरून गेलेली. आता पुन्हा उशीर.
डेझी तालीम आटपून निघते तोच बरोबरच्या मुलीच्या बुटाची लेस तुटते अन्‌ तिला थांबणं भाग पडतं. डेझी अखेर जेव्हा बाहेर पडते तेव्हा सर्व कामं आटपून परतणाऱ्या शॉपिंगवाल्या बाईची टॅक्‍सी नेमकी अशा मोक्‍याच्या जागी असते, की होणारा अपघात अटळ. अपघात अटळ हे खरं, पण तो अटळ होण्यात नक्की किती जणांचा हात होता, अन्‌ किती विविध प्रकारे ! शॉपिंगवाल्या बाईला कोट विसरल्याची आठवण होण्यापासून पार्सल करून देणाऱ्या मुलीचा प्रेमभंग होण्यापर्यंत अनेक व्यक्ती अन्‌ त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांचा पट हा डेझीच्या अपघाताला जबाबदार होणं, ही किती विचित्र गोष्ट! यातली एखादी गोष्ट वेगळी घडती, तर डेझीचं पुढलं आयुष्य वेगळं घडतं का? कदाचित.
वर सांगितलेली प्रसंगमालिका घडते, ती यंदा ऑस्करला 13 विभागात नामांकन मिळालेल्या अन्‌ तीन विभागात पारितोषिक प्राप्त ठरलेल्या दिग्दर्शक डेव्हिड फिंचरच्या "द क्‍युरिअस केस ऑफ बेन्जामिन बटन' चित्रपटात. साधारण दहा एक मिनिटांपलीकडे वेळ ती घेत नाही; पण संपूर्ण चित्रपटातली ही सर्वांत लक्षवेधी आणि आशयापासून सादरीकरणापर्यंत परिपूर्ण अशी दहा मिनिटं. जगण्याबद्दल एक मूलभूत सत्य या प्रसंगमालिकेतून मांडलं जातं. पटकथाकार एरिक रॉथची मोजक्‍या आणि अचूक शब्दांत अन्‌ दृश्‍यरचनेत अवघड कल्पना मांडण्याची ताकद दिसून येते आणि डेव्हिड फिंचर या गिमिकी, परंतु अत्यंत स्टायलिश दिग्दर्शकाची पद्धतही स्पष्ट होते.
हे एकदा सांगितल्यावर उरलेल्या बेन्जामिन बटनवर काय लिहायचं, हा एक मोठाच प्रश्‍न आहे. कारण उरलेल्या भागात पुष्कळ वेळ लावून सांगितलेली, श्रीमंत दृश्‍य शैलीतली परंतु विशेष मुद्दा नसणारी बटनची आत्मकथा मांडण्यामागचा हेतू माझ्या अजून पुरेसा लक्षातच आलेला नाही.
क्‍युरिअस केसबद्दल मला पाहिल्यापासूनच क्युरिसीटी होती, ती मी डेव्हिड फिंचर अन्‌ ब्रॅड पिट या दोघांचाही पूर्वीपासून चाहता असल्याने. "फाईट क्‍लब' आणि "सेव्हन' हे आजच्या समाजाविषयी काही महत्त्वाची निरीक्षणं मांडणारे आणि तरीही त्यातल्या थ्रिलर एलिमेन्टमधून प्रेक्षकाला खिळवून ठेवणारे, ' द गेम' आणि "पॅनिक रूम' हे पूर्णपणे थ्रिलरच्या पातळीवरचे आणि दिग्दर्शकीय क्‍लृप्त्यांनी भरलेले चित्रपट हे फिंचरचं ट्रेडमार्क काम. यानंतरचा "झोडीऍक' हा सिरीअल किलरविषयी असूनही जवळजवळ चरित्रपट म्हणून चालेल असा. सांगितल्याशिवाय फिंचरची ओळख न उघड करणारा, तरीही दर्जेदार. या सर्व चित्रपटांतून फिंचरची प्रतिमा झालेली, ती आजच्या काळात घट्ट पाय रोवलेला, आशय अन्‌ रंजन या दोन्ही पातळ्यांवर कसोटीस उतरणारा दर्जेदार अमेरिकन दिग्दर्शक म्हणून.
ब्रॅड पिटची बिचाऱ्याची ओळखही सुंदर सुपरस्टार म्हणूनच राहिलेली. आपल्या प्रतिमेचा बाजूने आणि विरोधात उपयोग करणं, शोडरबर्गसारख्या दिग्दर्शक मित्रांसाठी " फुल फ्रन्टल'सारख्या चित्रपटात (ज्यात फिंचरही पाहुणा कलाकार होता) स्वतःचीच खिल्ली उडवून घेणं, गाय रिचीच्या स्नॅचमध्ये किंवा शोडरबर्गच्या ओशन्स मालिकेत विनोदी कामही पूर्ण झोकून देऊन करणं अशा गोष्टी पिट सतत करतो. तो स्वतःची प्रतिमा जाणून आहे, मात्र तिच्या प्रेमात पडलेला नाही. आजच्या बुद्धिवान अभिनेत्यांमध्ये तो जरूर आहे. त्यामुळे हे दोघं अन्‌ एफ. स्कॉट फिट्‌झगेराल्डची गोष्ट म्हणजे काही विशेष असेल ही पूर्वकल्पना. अनेकदा पूर्वकल्पना करणं धोक्‍याचं असतं; इथंही तीच 'केस'.
एखादी व्यक्ती ऐंशीच्या घरात जन्माला येणं अन्‌ तिचं वय वार्धक्‍याकडे न जाता उलट्या प्रवासाला निघणं ही कल्पना चमकदार आहे हे निश्‍चितच. गिमिक्‍सची आवड असणाऱ्या फिंचरसारख्या दिग्दर्शकाला तिचं आकर्षण वाटलं यात आश्‍चर्य नाही. पण कल्पना गृहीत धरली की पुढे काय? बरं, ही कल्पना ताटातूट आणि मृत्यू या दोन कल्पनांशी जवळून बांधली गेली आहे. बेन्जामिन (ब्रॅड पिट) अन्‌ त्याची नायिका डेझी (केट ब्लॅन्चेट) यांचा चित्रपटातला प्रवास दोन उलट्या बाजूंनी सुरू होणारा आणि विरुद्ध दिशांना संपणारा आहे हे उघड आहे. त्यामुळे साधारण जवळपासच्या वयातली दहाएक वर्षे सोडता ते एकत्र राहू शकणार नाहीत, हे इथे माहीतच आहे. मात्र हे दुःख उगाळण्यापलीकडे जाऊन त्यावर काही भाष्य होणं गरजेचं नाही का? कारण तसं पाहता वयाचा उलटा प्रवास हा बेंजामिन बटनमध्ये "गिमिक' असण्यापलीकडे जात नाही. त्याचं केवळ शारीरिक वय उलट जातं.
मूळ गोष्टीत त्याची मानसिक जडणघडण ही शारीरिक वयाशी सुसंगत असते. म्हणजे तो म्हातारा दिसत असताना त्याचं वृद्धांशी अधिक पटतं अन्‌ प्रत्यक्ष म्हातारपणी (म्हणजे शरीर तरुण असताना) तो शैक्षणिक महत्त्वाकांक्षा ठेवतो. इथे मात्र त्याचं वय काही असलं तरी मानसिक वयाचा प्रवास हा बाल, तरुण, वृद्ध या पद्धतीनेच जातो. आयुष्यातले महत्त्वाचे टप्पेही, म्हणजे अठरा वर्षांचा असताना घर सोडणं, प्रेमप्रकरण, अधिक पर्मनंट स्वरूपाचे डेझीबरोबरचे संबंध, व्यवसाय अन्‌ अखेर वार्धक्‍य असे सामान्य आयुष्यासारखेच राहतात. त्यामुळे कल्पनेतली ऍब्सर्डिटी ही केवळ वरवरची राहते, जी बेंजामिनचं आयुष्य संपूर्णपणे, सर्वार्थाने बदलू शकत नाही आणि ते जर बदललं नाही तर चित्रपट वेगळा, नवा होऊ शकत नाही.
या प्रकारे नायकाच्या आयुष्याचा प्रवास हा बदलत्या सामाजिक पटलावर दाखवणारे दोन उत्तम चित्रपट हे यापूर्वी येऊन गेले आहेत. झेमेकिसने दिग्दर्शित केलेला 1994 मधला फॉरेस्ट गम्प (ज्याची पटकथादेखील बटन लिहिणाऱ्या एरिक रॉथ यांचीच होती) ज्यात बुद्धीने फार तल्लख नसणाऱ्या भाबड्या फॉरेस्टचा (टॉम हॅंक्‍स) इतिहासाशी समांतर प्रवास होता आणि क्रिस कोलम्बसचं आयझॅक आसिमोव्हच्या बायसेन्टेनिअल मॅनचं चित्ररूप, ज्यात यंत्रमानवाने माणसाच्या स्तराला येण्यासाठी दोनशे वर्षं केलेली काल्पनिक पार्श्‍वभूमीवरली वणवण दाखवली होती. हे दोन चित्रपट हे यातल्या नायकाकडे अधिक सहानुभूतीने पाहणारे होते आणि मूळ कल्पना लक्षात आल्यावरही तिचा बेतीवपणा बाजूला ठेवून व्यक्तिरेखांमध्ये गुंतणं या दोन्ही चित्रपटांत शक्‍य होणारं होतं. बटन हा आपल्या मेकअपच्या प्रयोगांनी व्यक्तिरेखांमध्ये गुंतण्याची शक्‍यताच पुसून टाकतो आणि सतत त्यातल्या विरोधाभासांची लोकांना आठवण करून देतो. अनावश्‍यक स्वरूपाचं वृद्ध डेझीचं विवेचन, हे अधिकच त्रासदायक ठरतं.
क्‍युरिअस केसचं नक्की काय चुकलं हे त्याला मिळालेल्या ऑस्कर पारितोषिकांवरून स्पष्ट होतं. कलादिग्दर्शन, मेकअप आणि व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स ही त्यामानाने दुय्यम अन्‌ तांत्रिक स्वरूपाची पारितोषिकं या चित्रपटाला मिळाली आणि महत्त्वाची कोणाला गेली हे तर आपण जाणतोच! व्यक्तिरेखांच्या आत्म्याशी समरस न होता बाह्यावरणाशी समरस होणं हे बेंजामिन बटनला महागात पडलं. या प्रकारच्या चित्रपटांना ऑस्कर मिळण्याचा प्रीसिडन्ट असूनही, या वेळी ते घडलं नाही. हा निकालातला अन्याय म्हणता येणार नाही. जे झालं ते योग्यच झालं.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP