ज्याची त्याची श्रद्धा
>> Thursday, April 2, 2009
श्रद्धा किंवा भक्ती हा विषय मालिका किंवा चित्रपटांतून साधेपणानं मांडणं ही फार कठीण गोष्ट आहे. आज आपण टीव्हीवर किंवा चित्रपटांतून या विषयाचे अनेक ढोबळ,बटबटीत नमुने पाहतो. अनेक मालिकांमध्ये देवादिकांना वेठीला धरणा-या भक्तांच्या आणि त्यांच्या अडचणींकडे पर्सनली लक्ष देणा-या दैवतांच्या कहाण्या पाहायला मिळतात. चित्रपटही यात मागे नाहीत. संतोषी माँ पासून साईबाबांपर्यंत चमत्कार हा एक कलमी कार्यक्रम असणारे चित्रपट थोडे नाहीत. त्याचबरोबर मैने आजतक तुमसे कुछ नही माँगा म्हणत नव्या मागण्यांची यादी देणारे नायक किंवा कोणत्याही वैद्यकीय इलाजाशिवाय दृष्टी येणा-या त्यांच्या आयांचे नमुने आपल्याला नवीन नाहीत. त्यातून देव ही एक शक्ती मानून श्रद्धेकडे निरपेक्ष भावनेने पहायची यातल्या कोणाची तयारी नसते. तिथेही गटबाजी आलीच. कोणत्या देवाला चांगला टिआरपी आहे, कोणत्या टेरीटरीत कोणत्या दैवताला बुकींग आहे. स्वर मंडळींनी नाचत गात जाऊन कोणाला साकडं घालणं तिकीट खिडकीवर लाभाचं ठरेल, यासारखे अर्थपूर्ण विचार त्या, त्या दैवाला चमकवताना दिसून येतात. या सर्व गोष्टींनी या भावनेला संवंग करून सोडलेलं आहे. तिथे पावित्र्य, तरलता कुठे पहायला मिळेनाशी झाली आहे.
आपल्याकडे नाही, पण आपल्या इतक्याच हिशेबी मानल्या जाणा-य़ा हॉलीवूडमधून आलेलं या विषयावरच्या चांगल्या चित्रपटाचं उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. जो श्रद्धेला योग्य ती सन्मान्य जागा देऊ करतो. दैवताचा प्रोपोगंडा करणं, उघड टाळीबाज चमत्कार करणं,हदयपरिवर्तनासारखे ओळखीचे उपाय शोधणं यासारख्या कोणत्याही सापळ्यात तो अडकत नाही. कथानकातल्या संघर्षात तडजोड करीत नाही, सोप्या पळवाटा काढत नाही. चित्रपटाचं नाव हेन्री पूल इज हिअर, दिग्दर्शक मार्क पेलिंग्टन.
चित्रपटाचा हेन्री पूल (ल्यूक विल्सन) नुकताच नव्या घरात रहायला आला आहे. हेन्री एकलकोंडा आहे. शेजा-या पाजा-यांमध्ये मिसळणारा नाही. काही नोकरीधंदाही करणारा नाही. अस्वस्थपणे पाहून रडण्यापलीकडे फार काही तो करताना दिसत नाही. अर्थात हे स्वाभाविक आहे. कारण तो इथे येऊन वाट पाहत आहे,केवळ मरणाची. डॉक्टरांनी काही दिवसांची दिलेली मुदत संपण्याची.
जणू हा प्रॉब्लम कमी असल्यासारखी एक नवी अडचण त्याच्यासमोर उभी ठाकते. त्याला नको असताना इस्टेट एजंटने करून दिलेल्या प्लास्टर कामाच्या रुपाने. हेन्रीची शेजारीण एस्परेंझा (आड्रियाना बराजा) हिला म्हणे या प्लास्टरवरल्या डागात येशू ख्रिस्ताचा चेहरा दिसतो. हेन्रीला तो दिसत नाही. प्रेक्षकांनाही बहुतेकवेळा नाही. पण एस्परेंझा गप्प बसत नाही. ती समविचारी अनुयायांना तर गोळा करतेच, वर फादर सालाजार यांच्या मदतीने हा खराखुरा चमत्कार असण्याचं सिद्ध करायच्या मागे लागते. हेन्री या घटनेने अधिकच वैतागतो. तो स्वतः तर या तथाकथित चमत्कारावर बिलकूल विश्वास ठेवणारा नसतो. शिवाय आपल्या आहे त्या परिस्थितीत घराचं श्रद्धास्थान होणं हा त्याला एक क्रूर विनोद वाटतो. अशातच भिंतीला हात लावलेल्या मंडळींना, माफक चमत्कारी अनुभव यायला लागतात. त्याच्या शेजारी राहणारी मुलगी मिली (मॉर्गन लिली) जी वर्षभरात एक अक्षर न बोलता गप्प गप्प राहणारी असते, भिंतीचा एक स्पर्श तिला पुन्हा माणसात आणतो. तिची आई डॉन (राधा मिशेल) या घटनेने हेन्रीच्या जवळ येते, पण हेन्रीची मनःस्थिती ती समजू शकते आणि त्याचा मताचा आदरही करते. मात्र एस्परेंझाचे उपद्व्याप वाढत जातात आणि आता हळूहळू डॉनच्या प्रेमात पडायला हेन्रीचा रागदेखील.
हेन्री पूल इज हिअरचा विशेष हा की वरवर पाहता धार्मिक/अध्यात्मिक छटा असणा-या विषयातही तो तर्कशास्त्र सोडत नाही. मिली जेव्हा नॉर्मल होते. तेव्हा डॉनला हा बदल चमत्कारी वाटतो. मात्र तो म्हणतो हा चमत्कार कसा, हा तर योगायोग आहे. जरी तिचा स्पर्श आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातला बदल एकावेळी घडून आला असला, तरी प्लास्टरवरच्या डागात अशी शक्ती कुठून येणार. पुढे मिलीला भिंतीला हात लावण्याचा सल्ला दिल्याचं एस्परेंझाने मान्य करताच हेन्री तिच्यावरही वैतागतो. मात्र मिलीमधला बदल हा एस्परेंझाच्या युक्तीवादाला दुजोरा देणारा असतो. एस्परेंझा या घटनेचा संदर्भ हा मिलीच्या श्रद्धेशी लावते. अखेर तुम्हाला येणारा अनुभव हा तुमच्या एखाद्या गोष्टीवर असणा-या विश्वासावर अवलंबून आहे. जर हा विश्वास तुमच्या मनात तयार होऊ शकला, तर त्याचा परिणामही तुमच्या आय़ुष्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, असं चित्रपट सुचवितो. पण मग प्रश्न असा उरतो, की हेन्री पूलचं काय? मूळात अश्रद्ध माणूस हा केवळ आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी सश्रद्ध होऊ शकेल ? किंबहुना तसं होणं त्याला शक्य आहे का ? आणि जर श्रद्धेशिवाय त्याने भिंतीला हात लावला तर त्याचा फायदा कसा होईल ?
हेन्रीचा घडणा-या घटनांवर विश्वास नाही. कारण त्या त्याच्या अनुभवात, त्याच्या तर्कशास्त्रात बसत नाहीत. त्यांना तो कोणतंही स्पष्टीकरण लावू शकत नाही. मात्र ख-या आयुष्यातही दर गोष्टीला स्पष्टीकरण असतंच असं नाही, नाही का ? हेन्री पूलचा विशेष हा, की तो प्रत्येक पात्राला आपली श्रद्धा जपाण्याचं स्वातंत्र्य देतो. तो एस्परेंझाला ज्याप्रमाणे हेन्रीच्या बाजूला वळवत नाही, त्याचप्रमाणे हेन्रीलाही तडजोड करायला लावत नाही. एस्परेंझा, हेन्री आणि डॉन ही पात्रं अनुक्रमे आस्तिक,नास्तिक आणि त्रयस्थ वृत्तीचं प्रतिनिधित्त्व करतात. प्रेक्षकांतला प्रत्येक जण यातल्या कोणत्या ना कोणत्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाशी समरस होऊ शकतो आणि ब-याच प्रमाणात इतर दोघांच्या बाजूदेखील त्याच्यापर्यंत पोहोचतात.
हेन्री पूल पहाण्यासाठी तुम्ही एखाद्या विशिष्ट विचारसरणीवर विश्वास ठेवणारे असण्याची गरज नाही. त्याची कल्पना ही युनिव्हर्सल म्हणण्यासारखी आहे. समाजातल्या सर्व थरातल्या अन् प्रकारच्या प्रेक्षकांना तो सहजपणे पाहता येईल. कोणत्याही फॉर्म्यूलाचा वापर टाळून हे करून दाखवणं नक्कीच सोपं नाही.
-गणेश मतकरी
1 comments:
सिनेमा पाहिला आणि परिक्षण पटलं. "एस्परेंझा, हेन्री आणि डॉन ही पात्रं अनुक्रमे आस्तिक,नास्तिक आणि त्रयस्थ वृत्तीचं प्रतिनिधित्त्व करतात। प्रेक्षकांतला प्रत्येक जण यातल्या कोणत्या ना कोणत्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाशी समरस होऊ शकतो आणि ब-याच प्रमाणात इतर दोघांच्या बाजूदेखील त्याच्यापर्यंत पोहोचतात." - अगदी बरोबर. सिनेमा रिकमेंड केल्या बद्दल धन्यवाद.
Post a Comment