दहशतवाद,युटीव्हीची चित्रत्रयी आणि बॉलीवूड
>> Tuesday, April 7, 2009
आमीर, मुंबई मेरी जान आणि अ वेड्नसडे या तीन चित्रपटांचे गेल्यावर्षीच्या पडत्या काळात ठामपणे उभं राहून दाखवणं काय सांगत होतं? आज काळ बदलतोय, चित्रपटही बदलण्याची आवश्यकता आहे हे ? का दिग्दर्शकांनी मल्टीप्लेक्सला चिकटवण्यासाठी एक प्रोडक्ट बनवण्यापेक्षा आपला आतला आवाज ऐकण्याची गरज आहे हे ? मुंबईवर सर्वात मोठा दहशतवादी हल्लाही गेल्यावर्षी अखेरीस झाला आणि या प्रश्नाला प्रामाणिकपणे पडद्यावर प्रामाणिकपणे पडद्यावर मांडणा-या तीन कलाकृतीही नेमक्या त्याच्या अलीकडच्या काळात आल्या... त्या तीनही चित्रकृतींबद्दलचा तेव्हाच लिहिला गेलेला, पण अनेक अडचणींमुळे प्रकाशित करायचा राहिलेला हा लेख.
बॉलीवूडची सध्याची स्थिती काय आहे, ते आपण जाणतोच, स्टार्सना वाजत- गाजत आणणारा प्रत्येक चित्रपट पडतो आहे. मोठे बॅनर, भव्य निर्मिती, गाणी बजावणी या सगळ्या त्याच त्याच पणाचा एक कंटाळा प्रेक्षकांना आलेला दिसतो आहे, आणि जर या मोनोटनीपासून सुटून काही वेगळं पाहण्याची संधी मिळाली तर ती घेण्याची तयारीही वाढताना दिसते आहे. ज्या कृत्रिमतेचा वास्तवाशी संबंध न ठेवता कथानकांना निर्वातात घडविण्याच्या संकल्पनेचा, फॉर्म्यूलांचा अन् अजब तर्कशास्त्राचा हिंदी चित्रपटांना का कोण जाणे, पण अभिमान होता, त्या सर्व गोष्टीच आज वर्ज्य मानण्याची वेळ आलेली दिसते.
हे आत्ताच का झालं, अन् या आधी का नाही या बोलण्यात अर्थ नाही. कदाचित चित्रपटांची अचानक वाढलेली संख्या आणि सर्वांमधली त्याच त्या घटनांची पुनरावृत्ती हे त्यामागे कारण असेल. कदाचित पूर्वीच्या फॉर्म्युला चित्रपटातूनही दिसणारा प्रामाणिकपणा अदृश्य होऊन डोक्याने कमी असणा-या कॉर्पोरेट हाऊसेसकडून पैसा उकळणं हा एकमेव हेतू ब-याच चित्रपट निर्मितीच्या मुळाशी असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात येऊ लागलं असेल. कदाचित पेज थ्री कल्चरच्या वृत्तपत्रांपासून टी.व्ही, रेडियोपर्यंत सर्व ठिकाणांहून होणा-या मा-यामुळे आज ग्लॅमर या शब्दाला अर्थच उरला नसेल. कदाचित विदेशी चित्रपटांच्या मुबलक उपलब्धतेने आपण कुठे कमी पडतोय, हे प्रेक्षकांना जाणवायला लागलं असेल. कदाचित वेगळंही कारण असू शकेल. असेल ते असो, पण प्रेक्षकांमध्ये एक हिंमत तयार व्हायला लागलेली दिसते आहे. दोन वर्षांपूर्वीच्या राम गोपाल वर्माच्या शोलेचं पहिल्या खेळाबरोबर पडणं, टशनसारखा मल्टीस्टारर लोकांनी नाकारणं, त्याचबरोबर तारे जमी पर सारखी स्टारला दुय्यम भूमिकेत आणणारी निर्मिती डोक्यावर घेतली जाणं.अशी अनेक उदाहरणं या विधानाला पुष्टी देणारी, म्हणून पाहता येतील. गेल्यावर्षी आलेली दहशतवादाच्या मुद्दयाला उचलून धरणारी चित्रत्रयी हे मात्र सर्वात महत्वाचं आणि प्रमुख उदाहरण.
आमीर, मुंबई मेरी जान आणि अ वेड्नसडे ही अधिकृतपणे चित्रत्रयी नाही, तरी तसा उल्लेख करण्यामागे काही निश्चित कारणे आहेत.
चित्रत्रयीमध्ये येणारे चित्रपट नेहमीच एका कथानकाला पुढे नेणारे असण्याची गरज नसते, तर त्याचा विषय सारखा असू शकतो. एका विशिष्ट गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून पाहाणं किंवा तिचे वेगवेगळे पैलू अधोरेखित करणं, हेदेखील या चित्रपटांमधून संभवतं. आमीर, मुंबई मेरी जान आणि अ वेड्नसडे या तीनही चित्रपटांचा विषय हा मुंबईतल्या स्फोटांच्या मालिका आणि त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष होणारा परिणाम, हा आहे. शहरी दहशतवादाचे विभिन्न मुद्दे या चित्रपटांमधून येतात. दहशतवाद्यांचा दृष्टीकोन माफक प्रमाणात आमीरमध्ये येत असला, तरी त्याचा नायत हा एक प्रकारे या दहशतवादाचा मानसिक बळी आहे. दहशतवादी कारवायांमुळे उठणा-या धार्मिक पडसादांना तर तो स्वतः मुस्लिम असल्याने त्याला सामोरं जावं लागतंय, वर या दहशतवाद्यांची अपेक्षाही तो त्यांना समजून घेऊ शकेल, आणि त्यांच्याच उद्दिष्टांकडे सहानुभूतीने पाहील अशी होते.
मुंबई मेरी जानमध्ये या दहशतवाद्यांच्या बाजूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं, आणि स्फोटांच्या आघातानंतर समाजाच्या प्रातिनिधिक घटकांवर होणा-या परिणामांकडे पाहीलं जातं. अ वेड्नसडेमध्येही आपल्याला दिसतो या समाजाचाच प्रतिनिधी, मात्र थोडा अधिक प्रोअँक्टिव्ह मोडमध्ये. सहन करणा-या कंटाळलेला, दहशतवादाच्या विरोधात थेट उभं राहण्याची तयारी करणारा. या तिघांमधलं आणखी एक साम्य म्हणजे त्यांची निर्मितीसंस्था यु.टी.व्हीने या तीनही चित्रपटांची निर्मिती तीन नवदिग्दर्शकांकडून करून घेतली आहे. आमीरचा दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि अ वेड्नसडेचा दिग्दर्शक नीरज पांडे यांचेन हे पहिलेच चित्रपट आहेत. निशिकांत कामतचा जरी हा अगदी पहिला चित्रपट नसला, तरी हिंदीतला हा पहिलाच प्रयत्न आहे. या तीनही चित्रपटांच्या दिग्दर्शकांचं आपापल्या कथानकांकडे ताजेपणे पाहणं, त्यांनी वरवरच्या छानछोकीपणापेक्षा आशयाकडे अधिक लक्ष पुरवणं आणि त्यांना एकत्र आणण्यात एकाच संस्थेचा हात असणं, ज्यांनी वितरणातही त्यांना जवळजवळ प्रदर्शित करणं, या सर्व गोष्टीचं या निर्मितीमागे काही योजना असल्याचं सुचवितात. या तीन चित्रपटांना चित्रत्रयी म्हणतो, ते तेवढ्याचसाठी.
यावर्षी जे मोजके चित्रपट लक्षात आले, प्रेक्षकांना आवडले, त्यात या तीन चित्रपटांचे नाव घेणे आवश्यक आहे. यातले सगळेच सारख्या प्रमाणात यशस्वी झाले, असं म्हणता येणार नाही. म्हणजे अ वेड्नसडे सर्वात अधिक चालला किंवा मुंबई मेरी जानला हवा तितका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. हे सत्य आहे. मात्र यातला कोणताही चित्रपट दुर्लक्षित राहिलेला नाही. त्याने स्वतःचा प्रेक्षक हा हक्काने मिळवला.
विषयाचं साम्य वगळता, या तीन चित्रपटांमध्ये काही गोष्टी निश्चित अशा होत्या, ज्या त्यांना एकमेकांसारखं होऊ देणार नाहीत. इथे सर्वात उत्तम बांधलेली पटकथा होती वेड्नसडेची. मात्र त्याचबरोबर ती अधिक सांकेतिकदेखील होती. तिचा फॉर्म हा ओळखीचा होता, आणि तथाकथित रहस्यही चाणाक्ष प्रेक्षकांपुढे लपण्याची शक्यता नव्हती. अ वेड्नसडेच्या पटकथेचा सर्वात मोठा गुण म्हणजे तिने घटना घडविण्यात ठेवलेला वेग, प्रेक्षकाला विचार करायला उसंत मिळणार नाही याकडे लक्ष देणं आणि लांबी मर्यादित ठेवणं. या प्रकारचे चित्रपट जितके लांबतात, तितकी त्याची बांधणी सैल पडत जाते. इथे ते होण्याला वेळच मिळत नाही. अभिनेत्याच्या प्रतिमांचा व्यक्तिरेखा शब्दांशिवाय उभ्या करण्यासाठी केलेला वापर हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. आशयात वैविध्य असून, आणि घटनांच्या वास्तवाशी काही प्रमाणात संबंध असूनही वेड्नसडे हा अखेर एक थ्रिलर. त्यातल्या घटना या ख-या घडण्याची शक्यता नाही. जवळजवळ विशफूल थिंकींगचा नमुना मात्र काळाशी सुसंगत विचार मांडणारा. केवळ करमणुकीवर समाधान न मानणारा. अधिक महत्त्वाकांक्षी ध्येय असणारा.
आमीरचाही एक प्रकार साधारण हाच. म्हणजे वास्तवाशी सुसंगत असूनही. इथल्या वास्तवदर्शनाची जवळजवळ पूर्ण जबाबदारी सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय यांच्या खांद्यावर. मुंबईच्या सुंदर रुपड्यापलीकडे जाऊन गल्लीबोळातलं गुन्हेगारी वातावरण अगदी ख-यासारखं उभं करण्याचा हा यशस्वी प्रयत्न. कथेचा जीव त्यामानाने लहान. तिला कथा म्हणण्यापेक्षा कल्पना म्हणणं उत्तम.
या दोन्ही थ्रिलर वळणारी जाणा-या चित्रपटांपेक्षा मुंबई मेरी जान अधिक वास्तव, यातल्या व्यक्तिरेखा नायक- नायिका या साच्यातही न बसणा-या, कितीतरी अधिक अस्सल. त्यातला प्रश्नदेखील एखाद्-दुस-या नायकांच्या करामतीपलीकडे जाणारा, प्रत्यक्ष मुंबईतल्या सामान्य माणसाशी थेट बोलू पाहणारा. त्याला न उत्तराची गरज, ना व्यक्तिरेखांना बंदिस्त आलेख देण्याची. केवळ प्रेक्षकांनी अंतर्मुख व्हावं, इतकीच दिग्दर्शकांची अपेक्षा. या तीनही चित्रपटांतला हा खरा चित्रपट.
या तीन चित्रपटांचे गेल्या वर्षीच्या पडत्या काळात ठामपणे उभं राहून दाखवणं काय सांगत होतं? आज काळ बदलतोय, चित्रपटही बदलण्याची आवश्यकता आहे हे ? का दिग्दर्शकांनी मल्टीप्लेक्सला चिकटवण्यासाठी एक प्रोडक्ट बनवण्यापेक्षा आपला आतला आवाज ऐकण्याची गरज आहे हे ? का निर्मिती संस्थांनी आपली आर्थिक गणितं बाजूला ठेवून आणि बुकींगवाले(?) स्टार्स अधिकाधिक कोटींच्या कॉन्ट्रॅक्टखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न सोडून आपण कसली निर्मिती करतोय याकडे लक्ष पुरवावं हे ? का परकीय चित्रपटांमधून तांत्रिक गुपितं, अन् दिग्दर्शकीय सफाईचा आभास उचलण्यापेक्षा त्यांची ज्या ज्या गोष्टींत बुडून जाऊन काम करण्याची पध्दत स्वीकारावी हे ? का प्रेक्षकाला आज मूर्ख बनवणं सोपं नाही हे?
मला वाटतं हे सगळं आणि इतरही बरंच काही, अर्थात चुका या सुधारता येतात. जेव्हा त्या चुका आहेत हे मान्य केलं जाईल तेव्हाच. आपला चित्रपट उद्योग आपल्या मिजाशीतून जेव्हा बाहेर येईल तेव्हाच तो ही काही अनप्लेझंट पण आवश्यक निरीक्षणं करू शकेल, आणि तो तसा येईल ही कल्पनादेखील अतिशयोक्त वाटणारी. निदान आज तरी!
- गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment