गतिमान वॉचमेन

>> Friday, April 10, 2009


वॉचमेन ग्राफिक नॉव्हेलमध्ये उत्कृष्ट मानली जाते. सुपरहिरोसारख्या व्यक्तिरेखा वास्तव जगात आल्या तर काय होईल, हे पाहण्याचा प्रयत्न वॉचमेनद्वारे केला गेला. या नॉवेलवर आधारित हा चित्रपट सुपरहिरोंचा असला तरी मुलांचा नाही. सर्वांना तो आवडेल याची खात्री नाही, पण एक वेगळा चित्रपट पाहिल्याचं समाधान तो देईल, हे निश्‍चित.

वॉचमेन' भारतात प्रदर्शित झाला याचं मला फारच आश्‍चर्य वाटलं. अर्थात सुपरहिरो असणारे आणि तिकिट खिडकीवर यशस्वी होणारे चित्रपट हे आपल्याकडे हमखास येतात. यामुळे त्यापलीकडे फार खोलात जाऊन विचार न करता आंधळेपणाने "वॉचमेन' उचलण्यात आला असेल तर आश्‍चर्य वाटू नये. मात्र त्याचं येणं ही फार चांगली गोष्ट म्हणावी लागेल; खासकरून ग्राफिक नॉव्हेल्सच्या चाहत्यांकरता.
डी. सी. ने "वॉचमेन' ही बारा भागांची मालिका 1986/87 च्या सुमारास प्रसिद्घ केली. लेखक होता प्रसिद्ध ऍलन मूर (व्ही फॉरव्हेन्डेटा, लीग ऑफ एक्‍स्ट्रॉऑर्डिनरी जंटलमेन) आणि चित्रकार डेव्ह गिबन्स. तेव्हा आणि नंतर ग्राफिक नॉव्हेल म्हणून प्रसिद्ध झाल्यावर "वॉचमेन'ने अमाप लोकप्रियता मिळवली आणि आजही ते सर्वोत्कृष्ट ग्राफिक नॉव्हेल्समधलं एक परिमाण मानलं जातं.
"वॉचमेन'मध्ये सुपरहिरो व्यक्तिरेखा असल्या तरी त्या मुलांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेल्या नाहीत. सुपरहिरोसारख्या व्यक्तिरेखा जर वास्तव जगात अस्तित्वात असल्या तर काय होईल, हे पाहण्याचा हा एक गंभीर प्रयत्न आहे. हे जग त्यातल्या सामाजिक अन्‌ राजकीय समस्यांनी ग्रासलेलं आहे, आणि सुपरहिरोंच्या अडचणीही कल्पनारम्य असण्यापेक्षा वास्तवाशी प्रामाणिक आहेत. भ्रष्टाचार, सेक्‍शुअल हरॅसमेंट यांसारख्या तुलनेने छोट्या गोष्टींपासून अणुयुद्धाकडे झुकणारं जग आणि राजकीय नेतृत्वाच्या कमजोरीसारख्या मोठ्या प्रश्‍नापर्यंत अनेक बाबींना "वॉचमेन' स्पर्श करतो. त्याचं नाव "हू वॉचेस द वॉचमेन?' या मूळ रोमन वाक्‍प्रचारापासून स्फूर्ती घेणारं आहे. यातले वॉचमेन आहेत सुपरहिरोज, ज्यांतल्या बहुतेकांवर सरकारने बदलत्या काळाबरोबर बंदी घातलेली आहे, वा त्यांना सरकारी गुप्त कामगिऱ्यांमध्ये गुंतवलेलं आहे. मात्र ते आपल्यावर नजर ठेवत असतील तर त्यांच्यावर नजर कोण ठेवणार, हा प्रश्‍न या ग्राफिक नॉव्हेलच्या केंद्रस्थानी आहे.
"वॉचमेन'चं रूपांतर करण्याचे प्रयत्न वीसेक वर्षे चालले आहेत आणि फ्रॅन्क मिलरच्या "300'चं रूपांतर करणाऱ्या झॅक स्नायडरने त्याचं रूपांतर करायला घेणं, हेच स्वागतार्ह पाऊल होतं. मात्र आपल्याकडच्या प्रेक्षकाला "वॉचमेन' हा प्रकार मुळातच माहीत नसल्यानं, शिवाय ग्राफिक नॉव्हेल्सही फार प्रमाणात इथं न पोचल्यानं या चित्रपटाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं, हा प्रश्‍न तयार होणं स्वाभाविक आहे.
ग्राफिक नॉव्हेल्स ही मुळात कॉमिक बुक्‍सपासून सुरू झालेली असली तरी कॉमिक्‍समध्ये क्वचित दिसणारा गंभीर आशय आणि प्रौढ वाचकाला डोळ्यांसमोर ठेवून आणलेली रंजकता ही इथं नित्य दिसते. सर्वच ग्राफिक नॉव्हेल्स मोठ्यांसाठी असतात असं नाही. लोकप्रिय सुपरहिरोंचा किंवा मुलांचा वाचक वर्ग डोळ्यांसमोर ठेवून रचनेच्या मोठ्या कथानकांनाही या वर्गात स्थान मिळतं; पण नील गायमन (सॅंडमॅन मालिका), फ्रॅन्क मिलर (सिन सिटी मालिका), आर्ट स्पिगलमन (माऊस), मर्जाने सतरापी (पर्सी पोलिस), आणि ग्राफिक नॉव्हेल्सचा मूळ पुरुष विल आइस्नर (ए कॉन्ट्रॅक्‍ट विथ गॉड, द बिल्डिंग, न्यू यॉर्क - द बिग सिटी) या आणि अशा अनेकांनी या कल्पनेला कॉमिक्‍सच्या चौकटीपलीकडे नेलेलं आहे. ऍलन मूरदेखील यातलंच एक महत्त्वाचं नाव.
मात्र हा तपशील माहीत नसलेला प्रेक्षक "वॉचमेन' पाहून गोंधळात पडण्याचीच शक्‍यता अधिक. एकतर चित्रपट सुपरहिरोंचा असला तरी तो मुलांचा नाही, हे सेन्सॉर सर्टिफिकेटवरूनच स्पष्ट व्हावं. त्यात प्रौढांसाठी असणारी साहसकथा समजून तो पाहावा, तर यातल्या सुपरहिरोंच्या भूमिकाही तथाकथित सुपरहिरोपेक्षा वेगळ्या. एका सुपरव्हिलनचे जगाला नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न आणि धीरोदात्त नायकांनी त्यावर काढलेला तोडगा, हा आकारच इथं नाही. सुपरव्हिलन नाही आणि खलनायकी व्यक्तिविशेष नायकांमध्येही आलेले. नायक ओळखीचे नाहीत, म्हणजे सुपरमॅन- बॅटमॅन वगैरे नाहीत. त्यातून आहेत तेही बहुतेक जण निवृत्त झालेले; मात्र समाजापासून वेगळे पडलेले. जणू सरकारने बंदी आणल्यावरही एक अदृश्‍य मुखवटा त्यांना जनतेपासून वेगळा ठेवतोय. त्यामुळे ज्याला "वॉचमेन'ची पार्श्‍वभूमी माहीत नाही तो प्रेक्षक, आपण नक्की काय पाहतोय याचा योग्य परस्पेक्‍टिव न मिळाल्याने गांगरणार, एवढं नक्की. आणि अखेरची अडचण म्हणजे प्रचंड मोठं कथानक.
"वॉचमेन'ची बारा प्रकरणं जर आपण पाहिली, तर ती प्लॉटिंगनं खचाखच भरलेली आहेत. पुस्तक एका सुपरहिरोच्या मृत्यूनं सुरू होतं आणि मृत नायक अन्‌ त्याच्या बरोबरीचं वजन असणाऱ्या सहा-सात सुपरहिरो व्यक्तिरेखा, इतरही छोटे-मोठे सुपरहिरो अन्‌ बाकी पात्रं, अशी याची प्रचंड मोठी कास्ट आहे. नायक नवे असल्यानं ते कोण आहेत, कसे आहेत हे दाखवणारं "ओरिजिन' छापाचे भूतकाळदेखील कथेत गुंफलेले आहेत. प्रत्येक प्रकरणाबरोबर काही लेखी पानांमध्ये एका नायकाच्या आत्मचरित्राचे भाग, काही उपकथानकाचं स्पष्टीकरण देणाऱ्या बातम्या, मुलाखती, ऑफिस मेमो अशा प्रकारचं इतर साहित्य आहे, आणि एक पात्र वाचत असलेल्या समुद्री चाच्यांविषयीच्या कॉमिक बुकचा भागही आहे. खुनाचं रहस्य म्हणून सुरू होऊन पुढे अणुयुद्धापर्यंत पोचणारी भलीमोठी गोष्टही आहे.
स्नायडरनं यातलं बहुतेक सर्व- म्हणजे समुद्री चाच्याचं कॉमिक वगळता इतर सर्व- चित्रपटात आणलंय, त्यामुळे चित्रपट भरधाव आणि थकवणारा आहे. माझ्यासारख्या "वॉचमेन'ची पारायणं केलेल्यालाही ही सांगितली जाणारी माहिती, कथानकं, उपकथानकं अंगावर येण्याची परिस्थिती काही क्षणी तयार होते, तर ज्यांना मूळ कथानक माहीत नाही त्यांचं काय होईल, हे वेगळं सांगायला नको. "वॉचमेन' पुस्तकही कथानक अति करत असलं, तरी ते आपण अंतराअंतरानं वाचू शकतो, आधीची पानं संदर्भासाठी परत पाहू शकतो. चित्रपट अर्थातच ती संधी आपल्याला देत नाही.
वॉचमेन घडतो 1985 च्या आसपास; पण एखाद्या समांतर विश्‍वात जिथल्या अमेरिकेत अजून निक्‍सन सत्तेवर आहे. चित्रपटाची पहिली श्रेयनामावली ही दृश्‍य चमत्कृती म्हणून मी पाहिलेल्या सर्वोत्तम टायटल सिक्वेन्सेसमधली एक म्हणावी लागेल. 1930-40 च्या सुमारास अमेरिकेत झालेला सुपरहिरोंचा उदय आणि आतापर्यंत इतिहासात घडत गेलेले बदल, हे इथं छोट्या छोट्या स्लोमोशन फ्रेम्समध्ये दाखवले जातात. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर लाईफ मासिकात आलेलं सेलर आणि नर्स मधलं चुंबनदृश्‍य (इथं चुंबन घेणारी व्यक्ती मात्र बदलण्यात आली आहे), केनेडीचा मृत्यू (त्याच्या खुन्यासकट दाखवलेला), व्हिएतनाम युद्धाच्या निषेधातलं मॉन्कचं आत्मदहन अशा महत्त्वाच्या घटना इथं येतात आणि या नव्या विश्‍वाची बदललेली पार्श्‍वभूमी तयार होते.
मुख्य कथानक सुरू होतं ते "कॉमेडिअन' नावानं ओळखल्या जाणाऱ्या एडी ब्लॅक (जेफ्री डीन मॉर्गन) याच्या खुनापासून. सरकारसाठी काम करणारा कॉमेडिअन, कोणताही बदल न स्वीकारणारा बंडखोर रॉरशॅक (जॅक अर्ल हेली) अन्‌ परमाणू अपघातानं सुपर पॉवर्स दिलेला डॉमॅनहॅटन (बिली कुडरूप) हे तिघंच अजून सुपरहिरोपण टिकवून आहेत. त्यांतल्या कॉमेडिअनचा बळी हा रॉरशॅकला संशयास्पद वाटतो, आणि कोणी इतरही सुपरहिरोंचा बळी घेण्याच्या तयारीत नाही ना, हे शोधण्यासाठी तो इतरांची भेट घेण्याचं ठरवतो. नाईट आडल (पॅट्रिक विल्सन) या बॅटमॅनसदृश रात्री संचार करणाऱ्या नायकानं निवृत्ती तर स्वीकारलेली असते; मात्र या आयुष्याला त्याच्या लेखी फार अर्थ नसतो. सिल्क स्पेक्‍टर (मॅलिन एकरमन)चं डॉ. मॅनहॅटनबरोबरचं लग्न अखेरच्या टप्प्यात असतं आणि ओझिमान्डीअसनं (मॅथ्यू गुड) स्वतःची ओळख वापरून औद्योगिक साम्राज्य उभारलेलं असतं. यांतल्या कोणालाही रॉरशॅकच्या आरोपात तथ्य दिसत नाही. पण तो आता गप्प बसणार नसतो.
चित्रपटाची रचना अन्‌ बारा भागांत येणाऱ्या कॉमिक मालिकेची रचना यांमध्ये फरक असतो. याचं सोपं कारण म्हणजे कॉमिकला एका मोठ्या आर्कबरोबर 12 छोट्या क्‍लायमेक्‍सेसची आवश्‍यकता असते. याउलट सिनेमाला एकच आर्क असावी लागते. सेट अप, मध्य आणि शेवट असे तीन भाग महत्त्वाचे ठरावे लागतात, ज्यांची गती चढती असावी लागते. मूळ नॉव्हेलशी प्रामाणिक राहिल्यानं त्या प्रकारचा गतिबदल इथं होऊ शकत नाही. वॉचमेन गतिमान राहतो; पण सतत सारख्या गतीनं तो आपल्याला थकवतो, यामागे हेदेखील एक कारण आहे.
मात्र यावर उपाय आहे. आपण सांगितलेल्या दर घटनेचा तपशिलात विचार न करता जर ढोबळपणे जे घडतंय ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर ते सहज शक्‍य आहे. कदाचित पहिल्या फटक्‍यात आपल्या सर्व गोष्टी लक्षात येणार नाहीत; मात्र उत्तरार्धात या कोड्याचे तुकडे एकत्र लागायला लागतील आणि तोवर आपण आशा सोडली नसली तर चित्रपट चांगलाच गुंतवून ठेवेल.
दृश्‍यात्मकतेसाठीही हा या वर्षीच्या सर्वोत्तम चित्रपटांतला एक ठरावा. रॉबर्ट रॉड्रिग्जने "सिन सिटी'साठी फ्रॅन्क मिलरच्या पुस्तकांना जसंच्या तसं पडद्यावर आणण्याचा प्रयोग 2005 मध्ये केला. दिग्दर्शक दृश्‍याची रचना ठरवताना छोट्या चित्रांमधून एक आकृतिबंध तयार करतात, ज्याला स्टोरी बोर्ड म्हटलं जातं. रॉड्रिग्जनं मूळ पुस्तकं ही संहिता आणि स्टोरी बोर्ड या दोन्ही भूमिकांमधून वापरली. स्नायडरनेही "300'मध्ये याच प्रकारचा मूळ चित्रांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. "वॉचमेन'मध्येही तोच प्रयत्न आहे; मात्र इथे तो अधिक कठीण आहे. मिलरची शैलीही व्यक्तिरेखांवर फोकस करणारी अन्‌ इतर गोष्टी ढोबळ ठेवणारी होती. "वॉचमेन'मध्ये मात्र ज्या गोष्टीत तपशीलच तपशील आहे; किंबहुना व्यक्तिरेखांइतकंच महत्त्व त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना आहे. कॉमेडिअननं लावलेल्या स्माईली बॅचचा प्रवास, या मोटीफची पटकथेतल्या वेगवेगळ्या वेळी होणारी पुनरावृत्ती, भिंतीवर रंगवलेली "हू वॉचेस द वॉचमेन'सारखी ग्राफिटी, रोरशॅकच्या मुखवट्यावरले सतत बदलणारे (आणि मानसशास्त्रीय चाचणीतल्या सूचक चित्रांची आठवण करून देणारे) शाईसारखे डाग, मंगळावर डॉ. मॅनहॅटनने बनवलेलं घड्याळसदृश यान यांसारख्या अनेक गोष्टी इथं पाहण्यासारख्या आहेत.
त्यातल्या सर्व गोष्टी लक्षात यायच्या तर चित्रपट अतिशय काळजीपूर्वक पाहावा लागेल, तोही किमान तीन वेळा, अन्‌ त्यानंतरही सर्वांना सर्व गोष्टी कळण्याची गरज आहेच असंही नाही. हा तपशील जरी पूर्ण कळला नाही, तरी त्याचं अस्तित्व सतत जाणवणार आहे, दृश्‍य मांडणीला खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतं.
"वॉचमेन'ला कोणत्या वर्गात बसवायचं, हे ठरवणं कठीण काम आहे. त्याचा प्रेक्षक वर्ग कोणता, हेही संदिग्ध आहे; मात्र याची काळजी न करता तो पाहणं शक्‍य आहे. सर्वांना तो आवडेल याची खात्री नाही, पण एक वेगळा चित्रपट पाहिल्याचं समाधान तो देईल, हे निश्‍चित.
-गणेश मतकरी

2 comments:

Yawning Dog April 19, 2009 at 8:23 PM  

जराशी लांबड वाटली वॉचमन म्हणजे. मला रॉरशॅक सगळ्यात जास्त आवडला - त्याला बघुन उगाच नाना पाटेकरची आठवण होते

ganesh April 21, 2009 at 6:26 AM  

ugach nahi. attitude.
lambad watna sahjik ahe, its crammed with story /ideas /information...it becomes sort of too much after a while.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP