युद्ध, प्रेम आणि बरंच काही
>> Sunday, August 9, 2009
विन्को बेसाम यांनी दिग्दर्शित केलेल्या "विल नॉट स्टॉप देअर' या चित्रपटात काय आहे विचारण्यापेक्षा काय नाही हे सांगणं कदाचित अधिक सोपं ठरावं. अनेक चित्रप्रकार आणि अनेक विषयांचं हे एक अफलातून मिश्रण आहे.
कार्लोवी वारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मी सहभागी असलेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीच्या ज्युरी मंडळाने विल नॉट स्टॉप देअर' या क्रोएशियन/ सर्बियन चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटांत का केली नाही याला तत्त्वतः अनेक कारणं आहेत. सगळीच कारणं सर्वांना पटतील असं नाही; पण काही निश्चित पटतील. स्पर्धांमध्ये अनेकदा वेगवेगळ्या मतांचे, वेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेले लोक या निर्णयप्रक्रियेत सामील असल्याने अनेकदा काही विशिष्ट स्पर्धकांचा बळी गेल्याची उदाहरणं आपण नेहमीच पाहतो.
या चित्रपटाच्या बाबतीत मात्र माझ्या मते तसं झालं नाही. तुलनेनं विजेते स्पर्धक काही ना काही बाबतीत अधिक उजवे नाहीत; परंतु लक्षवेधी जरूर ठरले. परिणामी आम्ही निवडलेल्या तीन चित्रपटांत आम्ही या चित्रपटाची निवड केली नाही. असं असूनही या महोत्सवातल्या सर्वांत आवडलेल्या चित्रपटांविषयी मला जर कोणी विचारलं तर या छोट्याशा यादीत "विल नॉट स्टॉप देअर' जरूर असेल. (विन्को बेसाम यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात काय आहे विचारण्यापेक्षा काय नाही हे सांगणं कदाचित अधिक सोपं ठरावं. अनेक चित्रप्रकार आणि अनेक विषयांचं हे एक अफलातून मिश्रण आहे.)
चित्रपटाची सुरवात एखाद्या विनोदी चित्रपटाला शोभणारी आहे; पण या व्यक्तिरेखा ज्या भेदक राजकीय/ सामाजिक पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या आहेत, त्यांचा पुसटसा निर्देश करणारी, सर्बिया अन् क्रोएशियामध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन् हल्ली संपुष्टात येऊनही विस्मरणात न गेलेल्या युद्धाचा संदर्भ हा इथे महत्त्वाचा आहे; मात्र नक्की किती महत्त्वाचा हे चित्रपट एवढ्यात कळू देणार नाही.
चित्रपटाचा विनोदी बाज टिकवला जातो तो प्रामुख्याने त्यातल्या निवेदकाच्या भूमिकेमुळे. डुरो (प्रेड्राग वुसोविक) हा आहे लो बजेट अश्लील चित्रपटात काम करणारा; पण कुटुंबवत्सल अभिनेता. तो सर्बिअन किंवा क्रोएशियन नसल्याने या देशांकडे अन् त्यामुळेच व्यक्तिरेखांकडे त्रयस्थपणे पाहू शकतो. एक दिवस डुरोकडे मार्टिन (इवान हर्सर्ग) हा तरुण निवृत्त सैनिक येतो. त्याला तपास आहे तो डुरोबरोबर "रेड रायडिंग हूड'च्या अश्लील आवृत्तीत काम केलेल्या डेसा या सर्बिअन अभिनेत्रीचा (नाडा सार्गिन). डुरो त्याच्या व्यवसायाविषयी अनभिज्ञ पत्नीला मार्टिन आपला नवा मॅनेजर असल्याचं सांगतो अन् त्याला घेऊन आपल्या निर्मात्याची गाठ घेतो. इथे डेसाचा पत्ता तर लागतोच, वर योग्य किमतीला ती विकाऊ असल्याचंही सांगितलं जातं. जगण्याविषयी निरिच्छ अन् सदैव नशेत असलेल्या डेसाला मार्टिन विकत घेतो आणि घरी घेऊन येतो. मूळचाच अबोल मार्टिन डेसाशीही फार बोलत नाही; मात्र तिला चांगलं वागवायला लागतो. एकदा तिला सर्बिआतल्या तिच्या जुन्या घरीही घेऊन जातो.
विनोदी भाग संपून रोमॅंटिक भाग सुरू झाला, तरी प्रेक्षकांनाही मार्टिनच्या हेतूबद्दल डेसाइतकंच कुतूहल असतं; कारण या दोघांची नक्की गाठ कुठे पडली किंवा डेसाला विकत घेण्यासाठी मार्टिननं इतक्या सहजपणे पैसे कसे उभे केले, अशा प्रश्नांची उत्तरं माहीत नसतात. मग चित्रपट हळूहळू एकेक गोष्ट उघड करायला लागतो. डेसाचं पूर्वीचं आयुष्य, मार्टिनची सरहद्दीवर एका विशिष्ट कामगिरीसाठी असणारी नेमणूक आणि त्याला अतिशय आनंदात असणाऱ्या त्या वेळच्या डेसाचं बंदुकीच्या स्कोपमधून नित्य होणारं दर्शन या सगळ्याला एक आकार यायला लागतो आणि कथेची गुंतागुंत वाढायला लागते.
"विल नॉट स्टॉप देअर'चं प्लॉटिंग ही त्यातली सर्वांत मोठी गंमत आहे. ज्या गतीनं तो चित्रप्रकारांचे रूळ बदलतो, त्याचं सराईत चित्रकर्त्यालाही आश्चर्य वाटावं. युद्धाची भेदक पार्श्वभूमी, व्यक्तिरेखांच्या भूतकाळाचं रहस्य आणि निवेदकाचा सर्वच घटनांकडे पाहण्याचा निरलस दृष्टिकोन या मात्र चित्रपटातल्या स्थायी गोष्टी आहेत, ज्या सुरवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहतात. प्रत्येकाच्या जीवनातलं पाप- पुण्याचं स्थान आणि पापाचं परिमार्जन करून मोक्ष मिळण्याची शक्यता हा विषय चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे, असं म्हणता येईल; मात्र चित्रपटात सतत घडत राहणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतून पडणाऱ्या प्रेक्षकाला त्यात कुठेही उपदेश असल्याचा आभास होण्याची शक्यता नाही.
मनोरंजक चित्रपटांमधून गांभीर्याचा आव न आणता सहज केलेलं प्रबोधन हे बऱ्याच वेळा प्रेक्षकांना न जाणवताही त्यांच्या अंतर्मनापर्यंत थेट पोचणारं असतं. त्यामुळे उघड संदेश देणाऱ्या चित्रपटांहून थोडं अधिकच श्रेष्ठ; मात्र या सहजतेला जर सराईतपणाचा वास यायला लागला, तर काही प्रमाणात त्याचा हेतू मागं पडल्यासारखं वाटतं; कारण मग परिचित वाटेला जाणारा चित्रपट प्रेक्षकांच्या अनुभवाला अन् विचारालाही एक मर्यादा घालून देतो. विल नॉट स्टॉप देअरच्या शेवटाकडे काहीसा हा धोका तयार होतो; कारण मग व्यक्तिरेखा स्वतःच मनाला योग्य वाटणारे निर्णय घेणं बंद करून चित्रपटाला सुनिश्चित शेवट देण्याच्या तयारीला लागतात. यावर एक शेवटचा उपाय म्हणून दिग्दर्शक कथासूत्र संपल्यावरही चित्रपटाचा अर्धसुखांत शेवट लांबवून पाहतो; मात्र ते काही खरं नाही. हुशार प्रेक्षकांच्या नजरेला नेमका शेवट कोणता हे कळल्याशिवाय राहत नाही; मात्र शेवटाकडच्या काही मिनिटांमुळे मी चित्रपटालाच निकालात काढणार नाही हे निश्चित.
या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल दिग्दर्शक ब्रेसान यांच्या काही कल्पना आहेत. त्यातली युद्धाची पार्श्वभूमी ही एका परीनं ताजी आहे आणि काही जणांच्या मते आताच या प्रकारचा चित्रपट करणं योग्य नाही. दिग्दर्शक मात्र म्हणतो, की जोपर्यंत जनतेच्या मनावरच्या जखमा भळभळत्या आहेत तोवरच हे विषय मांडणं महत्त्वाचं आहे. त्यातले मुद्दे, आशयाचं गांभीर्य हे या काळातच अधिक जाणवणारं आहे. जेव्हा लोकांना या संघर्षाचा विसर पडेल, ते भावनेच्या आहारी न जाता त्रयस्थपणे हे चित्रपट पाहायला लागतील तेव्हा खरंतर या चित्रपटांची गरजच संपुष्टात येईल. हा दृष्टिकोन 9/11 च्या संहारानंतर पॉल ग्रीन ग्रास (युनायटेड 9-3) किंवा ऑलिव्हर स्टोन (वर्ल्ड ट्रेड सेंटर) यांसारख्या दिग्दर्शकांनी काठाकाठानं न जाता व्यावसायिक चित्रपटांच्या माध्यमातूनच विषयाला थेट तोंड फोडलं त्याची आठवण करून देणारा आहे.
"विल नॉट स्टॉप देअर' आपल्यासाठी म्हणजे "भारतीयांसाठी' अधिकच जवळचा का वाटणारा आहे हे वेगळं सांगायला नकोच. दोन शेजारी देश, त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे चाललेलं युद्ध आणि आलेला कडवटपणा आणि जणू तो विसरण्याचा प्रयत्न करणारी प्रेमकथा ही आपल्याला नक्कीच आपल्या शेजाऱ्यांची आठवण करून देईल यात शंका नाही.
स्पर्धेमध्ये बहुतेक वेळा व्यावसायिक मूल्यं आणि मनोरंजन याला अधिक महत्त्व येणारी निर्मिती ही मागं पडतं आणि अधिक महत्त्वाकांक्षी, अधिक धाडस दाखवणारी किंवा सांकेतिक कथारचनेचा आधार टाळून काही वेगळं करू पाहणारी निर्मितीही पुढे जाते; मात्र स्वतंत्रपणे या निर्मितीदेखील महत्त्वाच्या असू, ठरू शकतात याचं हे एक उदाहरण.
- गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment