वेकिंग लाइफ- स्वप्नजगत

>> Wednesday, August 26, 2009



रिचर्ड लिन्कलेटरच्या बीफोर सनराइझ चित्रपटातील सेलीन ही नायिका म्हणते की, कधी कधी मला वाटतं, म्ही म्हातारी झाली आहे आणि मला माझे तरुणपणाचे दिवस आठवताहेत. माझं आजचं जगणं वास्तवातलं नसून मी त्या आठवणींचाच एक भाग आहे. सेलीन आणि जेसी या बीफोर सनराईझ-बीफोर सनसेटमधल्या प्रमुख व्यक्तिरेखा, त्यांची या कल्पनेवरची चर्चा पुढे चालू ठेवतात ती लिन्कलेटरच्याच वेकिंग लाइफ या चित्रपटातून. इथेही ते आपल्या आयुष्य़ाची तुलना स्वप्नावस्थेशी करतात आणि कदाचित आपला संपूर्ण जन्मच एक स्वप्न असेल अशीही कल्पना करून पाहातात.
या संभाषणाला आणि या विशिष्ट मुद्दयांना वेकिंग लाइफमध्ये फार महत्त्व आहे. कारण आपण पडद्यावर जे पाहतो आहोत त्याचा अर्थ समजून घ्यायला ही चर्चा आपल्याला मदत करते. वेकिंग लाइफ नाव असूनही या चित्रपटाचा जागृतावस्थेशी काहीही संबंध नाही. कारण तो घडतो तो जवळजवळ पूर्णपणे स्वप्नात, आणि हे स्वप्न कुणाचे आहे ते आपल्याला दाखवलं जातं, पण नायकाची (वायली विगिन्स) आपल्याला ओळख करून दिली जात नाही. स्वप्नातही त्याची प्रत्यक्ष भूमिका केवळ श्रोत्याची आहे. संभाषणाची जबाबदारी घेतात ते इतर जण.
हा चित्रपट तीन बाबतीत एरवीच्या चित्रपटांहून संपूर्णपणे वेगळा आहे. पहिली गोष्ट म्हणजे कथेचा पूर्ण अभाव, दुसरी त्याची संवादी रचना आणि तिसरी म्हणजे त्याचं दृश्यरुप.
इथला नायक पाहत असलेलं हे स्वप्न वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते त्याच्या आशयासाठी. त्याचं स्वरूप आहे ते अनेकविध कल्पनांनी भरलेल्या एखाद्या भांडारासारखं. जीवन, तत्त्वज्ञान, संवेदना, प्रेरणा, मृत्यू, लाइफ आफ्टर डेथ, संवाद, विसंवाद, संशोधन, साहित्य अशा अनेक विषयांना तो स्पर्श करतो. नव्याने इथे अनेक व्यक्तिरेखांना भेटतो. त्यांची या सगळ्यांविषयीची मते ऐकतो. ती एकताना त्याला जाणवतं की, या प्रकारचं एका प्रसंगातून दुस-यात फिरणं, ख-या आय़ुष्यात आपल्याला शक्य नाही, म्हणजे कदाचित हे स्वप्न असेल. पण जाणवणं म्हणजे जागं होणं नाही. ते न जमल्याने तो बिचारा स्वप्नातच अडकून पडतो.
वेकिंग लाईफच्या दृश्यशैलीमध्ये बालचित्रपट डोकावतात. लिन्कलेटरने येथे अँनिमेशन तंत्राचा वापर केला आहे. मात्र त्यासाठी केलेले काम हे पूर्णपणे कल्पित नाही. त्याने चित्रपट संपूर्ण चित्रित करून त्याला संगणकात आणून मग अँनिमेटर्सना काम करायला मुभा दिलेली आहे. त्यामुळे दिसणारी पात्रं कमी अधिक प्रमाणात कार्टूनसारखी असली तरी परिणाम हा प्रत्यक्ष चित्रण आणि अँनिमेशन यांच्यामधला आहे. स्वप्नाप्रमाणे भासमय अवस्था तयार करण्याकरीता दिग्दर्शकाने वेगवेगळ्या शैलीचे अँनिमेशन,सतत हालणारी पार्श्वभूमी, रंगसंगतींमध्ये प्रयोग यांसारख्या क्लृप्त्या प्रभावीपणे वापरल्या आहेत.
असं ऐकलंय की, कान महोत्सवात जेव्हा वेकिंग लाइफ दाखविला गेला, तेव्हा दिग्दर्शक रिचर्ड लिन्कलेटर उपस्थित होता. चित्रपट प्रदर्शित करण्याआधी त्याने जाहीर विचारणा केली, की प्रेक्षकांमधील कोणी ड्रग्जघेतले आहे का ? काही हात वर झाले. त्यावर लिन्कलेटरने सांगितले की चित्रपट तुमच्यासाठीच आहे. इतर प्रेक्षकांनी कृपया समजून घ्यावा.
भासमय अवस्थेचं हे विचारप्रवर्तक उल्लेखनीय उदाहरण केवळ दृश्यात्मकतेसाठीच नाही. दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनासाठी, त्यातल्या विचारमालिकेसाठी आणि माध्यमाला बहाल झालेल्या स्वातंत्र्यासाठीदेखील. असं म्हणता येईल की, हा प्रयोग लिन्कलेटरच्या पुढल्या चित्रपटाची पूर्वतयारी म्हणून बनवण्यात आला. प्रसिद्ध कथालेखक फिलिप के डीक यांच्या कादंबरीवर आधारित ए स्कॅनर डार्कलीसाठी त्याला हीच अँनिमेशन शैली वापरायची होती. आणि त्या आधी मेन स्ट्रीम निर्मितीमध्ये ट्रायल-एरर करून पाहाण्यापेक्षा ते एखाद्या लो बजेट आर्ट फिल्ममध्ये करणे केव्हाही अधिक चांगले होते. पण त्यामुळे वेकिंग लाइफचं महत्त्व कमी होत नाही. केवळ या चित्रपटासंदर्भात पाहिले तर हा महत्त्वकांक्षी आणि चपखल प्रयोग आहे. निवेदनाचा सूर आणि शैली एकरूप झाल्याचे याहून चांगले उदाहरण नसेल.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP