"द टेकिंग ऑफ पेलहॅम 123' - वरचढ थ्रिलर

>> Wednesday, October 7, 2009

थ्रिलर्स हे कोणत्या उंचीला पोचू शकतात, हे बऱ्याचदा त्यातल्या गुंतागुंतीइतकं किंवा कथानकाच्या वेगाइतकंच अवलंबून असतं, ते प्रेक्षकाला त्यातल्या व्यक्तिरेखा किती खऱ्या वाटताहेत यावर. "द टेकिंग ऑफ पेलहॅम 123' सामान्य थ्रिलर्सपेक्षा वरचढ अनुभव देऊ शकतो.

थ्रिलर्ससाठी प्रसिद्ध असणारे आणि आपल्या स्कॉट फ्री प्रॉडक्‍शन्ससाठी भरपूर यशस्वी चित्रपटांची रांगच्या रांग लावणारे बंधू रिडली आणि टोनी स्कॉट यांच्या कामात अनेक साम्य दिसून येतात. स्टंट्‌स/ इफेक्‍ट्‌सची गर्दी, गतिमान संकलन, कोणत्याही प्रसंगासाठी "लॉंग टेक्‍स'चा वापर न करता छोट्या-छोट्या कमी लांबीच्या शॉट्‌सची लावलेली मालिका, आशयघनतेपेक्षा पैसे वसूल करमणुकीवर दिलेला भर, या सर्व गोष्टी दोघांच्याही चित्रपटात आहेत. मात्र रिडलीचे चित्रपट हे सातत्याने अधिक ग्राउंडब्रेकिंग ठरलेले दिसतात. तिकीट खिडकीवर दोघांची कामगिरी सारखंच यश मिळवणारी असली तरी रिडलीचे अनेक चित्रपट हे हॉलिवूडच्या इतिहासातदेखील आपलं स्थान मिळवणारे आहेत. एलिअन (1979), ब्लेडरनर (1982), ब्लॅक टेन (1989), ग्लॅडिएटर (2000) ही काही उदाहरणं पाहूनही ते लक्षात येईल. यातल्या प्रत्येक चित्रपटाने आपल्या जेनेरिक चौकटीला मर्यादा न मानता काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि इतर अनेक चित्रपटांना प्रभावित केलं होतं. याउलट टोनीचे टॉप गन (1986), क्रिम्सन टाइड (1995), मॅन ऑन फायर (2004), देजा व्हू (2006) सारखे चित्रपटदेखील ब्लॉकबस्टर वर्गात असले, तरी उत्तम रचलेले ऍक्‍शनपट यापलीकडे त्याची मजल जाऊ शकत नाही. रिडलीच्या चित्रपटांनी थ्रिलरचा ढोबळ सांगाडा ठेवूनही भयपटांपासून (एलिअन) ऐतिहासिक चित्रपटांपर्यंत (किंगडम ऑफ हेवन, ग्लॅडिएटर) अनेक चित्रप्रकार प्रभावादाखल वापरले. टोनीचा असे काही वेगळे प्रयत्न करायलाही नकार दिसतो. त्यातल्या त्यात "टॉप गन' किंवा "क्रिम्सन टाइड'वरला युद्धपटांचा प्रभाव, हा थोडा माफक प्रयोग.
प्रेक्षकांना गुंगवणारा चित्रपट
मात्र असं असूनही दोन्ही बंधूंचे बहुतेक चित्रपट हे प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अन्‌ आलेल्या प्रेक्षकांना गुंगवून सोडण्यात पारंगत आहेत. टोनी स्कॉटचा "द टेकिंग ऑफ पेलहॅम 123' देखील त्याला अपवाद नाही. पेलहॅम 1974 च्या याच नावाच्या चित्रपटाचा रिमेक आहे, जो मुळात जॉन गुडीच्या कादंबरीवर आधारित होता. दुर्दैवाने मी मूळ चित्रपटही पाहिलेला नाही आणि कादंबरीही वाचलेली नाही. सबब, मी माझी निरीक्षणं केवळ स्कॉटच्या चित्रपटापुरती मर्यादित ठेवणार आहे.
"ऍक्‍शन'चं चित्रीकरण आणि संकलन ही नेहमीच या दिग्दर्शकाची खासीयत राहिली आहे. "पेलहॅम' हा लोकल ट्रेनच्या अपहरणावर आधारित असल्याने आपली सफाई तो इथेही वापरेल, अशी अपेक्षा ठेवण्यात वावगं काही नाही. मात्र गंमत अशी, की चित्रपटात मुळात ऍक्‍शनचा भाग खूप कमी आहे. बराचसा चित्रपट हा एक गुन्हेगार आणि एक सामान्य माणूस यांच्यामध्ये घडून येणाऱ्या, अनेकांचं जीवनमरण अवलंबून असणाऱ्या चर्चेवर केंद्रित झालेला आहे. ही चर्चा करणारी दोन माणसंदेखील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसलेली आहेत आणि एकमेकांपेक्षा वरचढ चढण्याचा दोघांचा प्रयत्न हा केवळ शाब्दिक आणि मानसिक चापल्यावर बेतलेला आहे. मग ऍक्‍शन आहे कुठे, तर दोन ठिकाणी सरळ सरळ आपल्याला परिचित ऍक्‍शन आहे, ती अपहरणकर्त्याने मागितलेल्या पैशाच्या डिलिव्हरीसाठी योजलेल्या प्रसंगमालिकेत. गजबजलेल्या शहरात थोडक्‍या वेळात एका कोटी यू.एस. डॉलर्स घेऊन जाणाऱ्या सरकारी गाड्या अन्‌ पोलिस संरक्षण यांच्या प्रवासात ही ऍक्‍शन खूप प्रमाणात आहे. थोड्या वेळात कामगिरी पुरी करण्याने वाढणारा तणाव, अपघात, स्टंट्‌स या सर्व गोष्टी या भागात आहेत. मात्र ही एकतर्फी ऍक्‍शन आहे. म्हणजे या गाड्यांच्या ताफ्याला विरोध करणारी दुसरी शक्ती नाही. नैसर्गिक अडचणी येतील तेवढ्याच.
ऍक्‍शनला दुसरा वाव आहे, तो स्कॉटच्या खास शैलीतल्या झपाट्याने फिरणाऱ्या कॅमेरात, डोळ्यांना त्रास होईल इतक्‍या झपाट्याने जोडल्या जाणाऱ्या शॉट्‌समध्ये आणि कॉम्प्युटर ग्राफिक्‍सच्या मदतीने दृश्‍याला आणून दिलेल्या ऊर्जेमध्ये.
शाब्दिक चकमक
पेलहॅमची गोष्ट अपहरणपटाची असते. त्या पद्धतीचीच, म्हणजे थोडकी आहे. पेलहॅम 123 नामक लोकल ट्रेनवर काही रहस्यमय व्यक्तिरेखा चढतात आणि गाडीवर ताबा मिळवून दाखवतात. त्यांचा प्रमुख रायडर (जॉन ट्रावोल्टा) हा कंट्रोल स्टेशनशी संपर्क करतो आणि एका तासाच्या आत एक कोटी डॉलर हजर करण्याची मागणी करतो. कंट्रोल स्टेशनवर फोन उचलणारा असतो गार्बर (डेन्झेल वॉशिंग्टन). गार्बर मुळात उच्च हुद्यावर काम करणारा, पण लाच घेतल्याच्या संशयावरून त्याची तात्पुरती रवानगी झालेली, ती या कंट्रोलरच्या जागेवर. पहिल्या काही मिनिटांतच रायडरला गार्बरच्या बोलण्यात ओळखीचा सूर सापडतो आणि पोलिसांच्या प्रतिनिधीपेक्षा तो गार्बरशी बोलत राहणेच पसंत करतो. लवकरच बोलणं केवळ "त्या' घडीच्या पलीकडे पोचतं. एकदुसऱ्याचे स्वभाव, अंतस्थ हेतू, आशा-अपेक्षा त्यात डोकावायला लागतात आणि हा शब्दांचा खेळ रंगायला लागतो. मध्यंतरी पैसे रायडरपर्यंत पोचायला निघालेले तर असतात, मात्र मध्यान्हीच्या ट्रॅफिकमध्ये ते वेळेत पोचणं जवळपास अशक्‍य असतं.
एका सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनाचं झालेलं अपहरण, आमनेसामने न येता संपर्क साधणारा अपहरणकर्ता आणि दोन तृतीयांश भाग चालणारं अपहरण नाट्य तर उरलेला भाग खलनायक विरुद्ध नायकाच्या प्रत्यक्ष सामन्याचा दिलेला.
हे "द टेकिंग ऑफ पेलहेम 123'चं वर्णन दुसऱ्या एका लोकप्रिय चित्रपटाची आठवण करून देणारं वाटतं का? चटकन आठवत नसेल तर सांगतो, हे "स्पीड'चं वर्णनदेखील होऊ शकेल. अर्थात हे दोन चित्रपट उघड तुलना होणारे नाहीत. कारण दोघांतला महत्त्वाचा फरक हा वाहनाच्या निवडीत आणि धमकीच्या स्वरूपात आहे, ज्यामुळे स्पीड हा गेल्या काही वर्षांतल्या उत्तम ऍक्‍शनपटात गणला जातो. मी त्याची आठवण करून देण्याचं कारण आहे, ते अपहरण नाट्य अन्‌ प्रत्यक्ष सामना याच्या प्रमाणात असणाऱ्या साम्यामुळे, ज्याची तुलना इथं होऊ शकेल. स्पीडप्रमाणेच इथेही जोपर्यंत नायक अन्‌ खलनायक एकमेकांसमोर येत नाहीत आणि अपहृतांचे प्राण धोक्‍यात असतात, तोपर्यंतचा भाग खूपच रंगतो. एकदा का रायडर आणि गार्बर आमनेसामने आले, की नाट्य परिचित होतं. स्कॉटनेही हा भाग थोडा अंडरप्ले केला आहे. त्यामुळे पहिल्या भागाचं महत्त्व अधोरेखित झालं तरी शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटतो.
थ्रिलर्स हे कोणत्या उंचीला पोचू शकतात, हे बऱ्याचदा त्यातल्या गुंतागुंतीइतकं किंवा कथानकाच्या वेगाइतकंच अवलंबून असतं, ते प्रेक्षकाला त्यातल्या व्यक्तिरेखा किती खऱ्या वाटताहेत यावर. प्रेक्षक नेहमीच खऱ्या व्यक्तिरेखांची अधिक कदर करतो, अन्‌ ज्या क्षणी त्या खऱ्या वाटणं संपतं, तेव्हा प्रेक्षकाची सहानुभूती तर कमी होतेच, वर कथानकही त्याला पुरेसं गुंतवू शकत नाही. पेलहॅम बराच वेळ आपल्याला बांधून ठेवतो. कारण रायडर अन्‌ गार्बर हे जवळजवळ पाऊण चित्रपट अस्सल वाटतात. त्यांच्यातले दोष, आयुष्यातले लहान-मोठे असमाधान, कुठेतरी फसवलो गेल्याची भावना, सच्चाई, दुटप्पीपणा विशिष्ट प्रमाणात दोन्ही व्यक्तिरेखात जाणवतो, जो आपल्याला पटण्याजोगा आहे. रायडरचा दुय्यम अजंडा मात्र त्याच्या व्यक्तिरेखेला उपयुक्त ठरत नाही, अन्‌ शेवटाकडे रायडरचं कॅरीकेचर होऊन जातं. हा शेवटचा काही काळ आपण जर टोनी स्कॉटला सवलत द्यायला तयार असलो तर "द टेकिंग ऑफ पेलहॅम 123' सामान्य थ्रिलर्सपेक्षा वरचढ अनुभव देऊ शकतो.
-गणेश मतकरी

8 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 8, 2009 at 1:57 AM  

हं! तुम्ही चित्रपटाबद्दल इतकं छान लिहिता की पाहिल्याशिवाय रहावत नाही. चित्रपट वाईट असला तरी वाईट कसा आहे हे बघण्यासाठी तरी मी तुम्ही उल्लेख केलेले चित्रपट पहातेच. पहायला हवा तर, 'टेऑपे १२३'! मला रेन्नी हार्लीन चे चित्रपट सुद्धा आवडतात. त्याचा जिना डेव्हीस स्टारर ’द लॉन्ग किस गुडनाईट” मी अकरा वेळा पाहिला आहे. शिवाय ’कथरोट आयलंड' पण छान होता. नवीन आलेला ’ट्वेल्व्ह राऊंड्स’ पण मस्त!

ganesh October 8, 2009 at 4:05 AM  

harlin is in the same category as tony scott but maybe a notch or two below.i have seen his die hard 2,cliffhanger,long kiss goodnight and deep blue sea. they are all good action but thats it. i hear 12 rounds is the same.but havent seen that one yet.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 8, 2009 at 7:27 AM  

TOP 123 पाहिला. TOP!! आवडला! शेवट थोडा गडबड आहे खरा पण कथानकाने गती चांगली पकडून ठेवली आहे.

भानस October 8, 2009 at 12:29 PM  

मोगरा फुललाशी शंभर टक्के सहमत. तुमची समिक्षा/कौतुक आलेले सगळे सिनेमे मी आवर्जून व तातडीने पाहतेच. मला व्यक्तीश: थ्रिलर-ऎक्शन व ड्रामा ह्यात मोडणारे सिनेमे आवडतात. काही कॊमेडीही अप्रतिम असतात. अतिरंजीत व अतिटेक्नॊलॊजी वापरून केवळ अशक्य वाटणारे सिनेमे मात्र नकोसे होतात.
सुदैवाने मी जोसेफ सार्जंट दिग्दर्शीत रॊबर्ट शॊचा जुना टेकिंग पेलहॆम १९७४ व हा नवीन १२३ ही पाहिला आहे.
तुमचा आढावा एकदम पर्फेक्ट.

ganesh October 8, 2009 at 10:07 PM  

thanks bhanas, since i have not seen the original,maybe you can tell me if and how its diffrent from this one.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 9, 2009 at 1:59 AM  

अरे! जुना पण आहे? चला, आता तो पण पाहिन. भानस, जुन्या चित्रपटाचं वर्ष सांगितल्याबद्दल धन्यवाद!

गणेशजी, चित्रपट चौकशी केल्यावर उपलब्ध झाला म्हणून लगेच पाहून घेतला. एकदम फिल्लमबाज आहे मी.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 27, 2009 at 2:02 AM  

जुना ’पेलहॅम १२३’ किंचित संथ गतीन पुढे सरकतो असं वाटलं. फण छान वाटला.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP