द प्रिन्सेस अॅण्ड द वॉरिअर - पूर्वनियोजित योगायोग
>> Sunday, May 9, 2010
आयुष्य म्हणजे काय? निव्वळ एक योगायोगांची मालिका, का कुणा विधात्याने रचलेली एका विशिष्ट हेतूकडे घेऊन जाणारी पूर्वनियोजित साखळी, जिचा प्रत्येक टप्पा हा पुढल्या टप्प्याकडे बोट दाखविणारा आहे? आजवर तत्त्ववेत्यांपासून चित्रकर्त्यांपर्यंत अनेकांनी या दोन्ही बाजूंना आपल्य़ा परीने मजबूत करण्याचा आपल्या कामातून प्रयत्न केला आहे. माझ्या आवडीचे या वादाला पूरक असणारे १९९८चे दोन चित्रपट म्हणजे टॉम टायक्वरचा जर्मन `रन लोला रन` अन् पीटर हॉविटचा अमेरिकन `स्लायडिंग डोअर्स`. हे दोन्ही चित्रपट जर/तरचा अफलातून खेळ खेळणारे. लोला अन् तिचा मित्र मनी यांच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या वीस मिनीटांना तीन वेगवेगळ्या पद्धतीने घडविणारा `रन लोला रन`, तर हेलन क्वेलीच्या एके सकाळी ट्रेन पकडण्या/सुटण्यामधून तयार होणा-या दोन आवृत्त्या दाखविणारा `स्लायडिंग डोअर्स` हे दोन्ही चित्रपट आयुष्याला योगायोग किती वेगळ्या वळणांवर नेतो हे दाखवत असले, तरी दोघांत एक मोठा फरक आहे. लोलाचा युक्तिवाद आहे, तो आयुष्याला केवळ योगायोग म्हणून सोडणारा, तर स्लायडिंग डोअर्सचा शेवट हा पूर्वनियोजित भविष्याकडे बोट दाखवणारा. याचा अर्थ, हे दोन्ही चित्रपट आधी उल्लेखलेल्या वादाच्या प्रत्येकी एक बाजूचं प्रतिनिधित्व करणारे आहेत.
यातल्या रन लोला रनच्या दिग्दर्शकाचा २००० साली केलेला पुढचा चित्रपट म्हणजे ` द प्रिन्सेस अॅण्ड द वॉरिअर`. लोला आणि प्रिन्सेसमध्ये साम्य आहेही अन् नाहीही. आहे अशासाठी की तो प्रमुख भूमिकेत लोलाची भूमिका साकारणा-या फ्रान्का पोटेन्तला घेऊन पुन्हा एकदा योगायोग अन् आयुष्यातल्या लागणा-या अनपेक्षित वळणांचा खेळ मांडतो. नाही अशासाठी की इथे लोलासारखी एम.टी.व्ही संस्कृतीतली भरधाव व्हिज्युअल्स नाहीत, किंवा निवेदनातील जाणीवपूर्वक आणलेली पुनरावृत्ती नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे इथे टायक्वरचा कल, हा पूर्वनियोजिततेकडे झुकत चाललेला दिसतो. आपल्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट कितीही क्षुल्लक असली, तरी `ग्रॅन्ड स्कीम ऑफ थिंग्ज`मध्ये तिला काही ना काही स्थान निश्चित आहे असा विचार प्रिन्सेसमध्ये डोकावतो.
चित्रपटाची नायिका सिसी (फ्रान्का पोतेन्त) एका सायकिएट्रिक वॉर्डमध्ये नर्स आहे. इथले सर्व पेशन्ट तिच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अवलंबून आहेत. नायक बोदो (बेनो फरमान) हा निवृत्त सैनिक मात्र आयुष्यातल्या एका शोकांत घटनेनंतर भलत्या मार्गाला लागलेला. सध्या त्याचा भाऊ अन् तो मिळून एक बँक दरोड्याची योजना आखतायत. रन लोला रनची नक्कीच आठवण होईल अशा एका प्रसंगात पोलिसांपासून पळणा-या बोदोमुळे एक अपघात ओढवतो. या अपघाताचा बळी असते सिसी, जी गुदमरल्या अवस्थेत ट्रकखाली अडकून राहते. आपणच अपघाताला कारणीभूत आहोत हे लक्षात न येणारा बोदो या ट्रकखाली लपतो, अन सिसीची जीव वाचवायला कारणीभूत ठरतो.
जीवदान मिळालेल्या सिसीला या योजनेमागे दैवी हात दिसतो . अन् ती बोदोचा पिच्छा पुरवायला लागते. मात्र बोदोला सिसीचं गळ्यात पडणं समजत नाही. शिवाय पूर्वीच्या कटू आठवणी विसरून सिसीला आपलं म्हणणं त्याला शक्य होणार नसतं. लोलाप्रमाणेच टायक्वरने या चित्रपटातही थ्रिलर्समध्ये शोभण्यासारखे घटक, पार्श्वभूमी यांचा वापर केला आहे. अपघात, मनोरुग्णालयातलं वातावरण, आत्महत्या/खून/खूनाचा प्रयत्न, बँक दरोडा अशा अनेक गोष्टींमध्ये झटपट थ्रिलरचा वास आहे, मात्र पटकथा किंवा दिग्दर्शनात या प्रकारची रचना दिसून येत नाही. इथे गतीला महत्त्व नाही, तर विचारांना आहे. अन् ते स्पष्ट होण्यासाठी जिथे गतीचा त्याग करणं आवश्यक आहे, तेथे तो करायला दिग्दर्शकाची ना नाही. `प्रिन्सेस`मध्ये तयार होणारा तणाव हा प्रामुख्याने व्यक्तिरेखांच्या भावनांमधून तयार होणारा अन् त्यांच्यात जोडल्या जाणा-या वा तुटणा-या नात्यांमधून बळकट होणारा आहे.
इथे अॅक्शनला वाव असून तो वापरण्यात आलेला नाही. पटकथेचा सर्वात वेधक भाग आहे, तो सिसी अन् बोदो यांना एकत्र बांधणा-या योगायोगांचा, जे सिसीवर एका मैत्रिणीने सोपवलेल्या साध्या कामापासून सुरू होऊन थेट बोदोच्या पूर्वायुष्यातल्या कळीच्या प्रसंगांपर्यंत पसरलेले दिसून येतात. त्यांच्या गुंतागुंतीच्या मांडणीने सिसीचा सारं पूर्वनियोजित असल्याचा संशय तर जस्टीफाय होतोच,वर आपण नकळत आपल्या आयुष्यातल्या योगायोगांचाही त्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतो.
जवळ जवळ पाऊण चित्रपट हा काहीशा स्टायलाईझ्ड पण वास्तववादी शैलीत घडविल्यानंतर शेवटाकडे मात्र ` द प्रिन्सेस अॅण्ड द वॉरिअर` मेटाफिजिकल होतो. मात्र हे मेटाफिजिकल होणं दुर्बोध नाही. तर आशयातून सुचवल्या जाणा-या कल्पनांनाच प्रत्यक्ष दाखविल्यासारखं याचं स्वरूप आहे. या चित्रपटाविषयी मागे एकदा वाचनात आलं होतं, की शेवटाकडचा भाग हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जाऊ शकतो. अन् त्याचा अर्थही त्याप्रमाणे बदलत जातो. हे विधान मला मात्र पटलं नाही. याउलट तो मला खूपच स्पष्ट वाटला. दुसरा एक अर्थ इथे काढला जाऊ शकतो, नाही असं नाही, पण तो संहितेतल्या घटनांचा विपर्यास होऊ शकेल.
सध्या टायक्वर आणि पोतेन्त हे दोघंही हॉलीवूडमध्ये आल्याने बरेच `मेन स्ट्रीम` झालेले दिसतात. टायक्वरचा `इन्टरनॅशनल` गेल्या वर्षी प्रदर्शित झाला, अन् पोतेन्तही अनेक चित्रपटात छोट्यामोठ्या (बहुदा छोट्याच अधिक) भूमिका करताना दिसते. मात्र मेन स्ट्रीम झाल्याचा म्हणावा तसा फायदा दोघांनाही झालेला नाही. टायक्वरच्या आधीच्या चित्रपटांइतकी झेप इंटरनॅशनलने घेतली नाही, बहुदा त्याच्या सांकेतिक `थ्रिलर` असण्यानेच. टायक्वरचा पुढला घोषित चित्रपट मात्र त्याच्या पूर्वीच्या कामाला साजेसा असण्याची शक्यता आहे. डेव्हिड मिचेलच्या `क्लाऊड अॅटलस` या कादंबरीचं रुपांतर असणारा हा चित्रपट, मूळ कादंबरीच्या एकात एक जाणा-या कथामालिकेसारख्या स्वरुपाने, अन् मेट्रीक्स चित्रत्रयीचे दिग्दर्शक असणा-या वाचोस्की बंधूंच्या निर्मितीशी संबंधित असण्याने टायक्वरला आपली ताकद सिद्ध करण्याची संधी देईल अशी अपेक्षा आहे.
-गणेश मतकरी.

3 comments:
run lola run was awesome flick !! need to watch P&W and sliding doors !!!
Thanks for nice info on movies !!!
Regards
Deepak Parulekar
Mumbai
sliding doors vishayi aikale hote pan aata to baghel...run lola run atishay sunder cinema aahe..tyach director cha tyach theme varcha ha cinema aata baghaylach hava..chan parikshan aahe
thanks deepak and sumya
Post a Comment