गोविंद निहलानीना मी मुलाखतीसाठी फोन केला तो थोडा घाबरतच. माझी त्यांच्याशी थोडी ओळख होती. माझ्या ' फिल्ममेकर्स' पुस्तकाचं प्रकाशन त्याच्या हस्ते झालं होतं. माझ्या एका समांतर सिनेमावरल्या लेखासाठी फोटो मिळवताना मी त्याच्याशी संपर्क केला होता. आणखीही काही भेटी झाल्या होत्या. पण आपण त्यांची मुलाखत घेण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली नव्हती. त्याचं एक कारण होतं की मुलाखत घेणं हा मला माझा टाईप वाटत नसल्याने मी कधी गंभीरपणे तसा विचारच केला नव्हता.. मला लांबून गोष्टींकडे पाहायला आवडतं. जवळ जायला मी थोडा रिलक्टन्ट असतो.
पण कल्पना मला आवडली. माझ्या आवडत्या भारतीय दिग्दर्शकांपैकी हे नाव होतं आणि त्यांची आजवरची कामगिरी खूपच मोठी आहे. मी तयार झालो तरी मुलाखतीचा फोकस ठरवण्याचा प्रश्न होताच. गोविंदजी पब्लिक फिगर आहेत आणि वर्षानुवर्ष त्यांच्यावर अनेकदा लिहून आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं बरंच काम, त्यांची मतं हे पब्लिक नाॅलेज आहे. मी ठरवलं की अमुक एक फोकस ठरवायचाच नाही. आपण त्याचं बरंच काम पाहिलय. त्यातल्या विशिष्ट चित्रपटाला न धरता, आणि सामान्यतः खूप प्रकाशात आलेले विषय टाळून आपण बोलायचं. न जाणो, काही इन्टरेस्टिंग गोष्टी हाती लागतील !
मी- या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला चित्रपटांची काही पार्श्वभूमी होती का? म्हणजे या क्षेत्रातल्या कोणाशी कौटुंबिक संबंध, मैत्री वगैरे ?
गोविंदजी- नाही. माझ्या कुटुंबात चित्रपट या गोष्टीला फार महत्व दिलं जात नसे. लहान असताना तर मला फक्त पौराणिक चित्रपटच पाहायला परवानगी असे. मला त्या काळातला एक चित्रपट आठवतो, 'नरसी भगत' नावाचा.त्यात प्रमुख भूमिकेत विष्णुपंत पागनीस होते. (बहुतेक तुकाराम खूपच यशस्वी झाल्यामुळे त्यांनी पागनीसांना या भूमिकेसाठी घेतलं असावं. ) मला हा विशिष्ट चित्रपट आठवतो त्याला एक कारण आहे. इट गेव्ह मी ए सेन्स आॅफ एनलायटनमेन्ट अॅज फार अॅज द सिनेमा इज कन्सर्न्ड.
मी तेव्हा खूपच लहान होतो. चार पाच वर्षांचा. आम्ही तेव्हा कराचीमधे राहायचो. माझ्या काकांबरोबर मी या सिनेमाला गेलो होतो. आता आठवायचं म्हंटलं तर या चित्रपटाचे मला फार तपशील आठवत नाहीत, केवळ एका प्रसंगाचा अपवाद वगळता. प्रसंगात एक लहान मुलगा होता. माझ्या आठवणीप्रमाणे हा लहान मुलगा गात होता, आणि गाता गाता कबुतरांना दाणे टाकत होता. हे पाहाणारा कॅमेरा पुढे सरकला , द कॅमेरा ट्रॅक्स फाॅरवर्ड, देअर इज अ डिझाॅल्व्ह, अँड देन द कॅमेरा ट्रॅक्स बॅक . आताही कबुतरं समोरच होती , पण आता मुलाएेवजी समोर दिसला तो मोठा माणूस, तसाच कबूतरांपुढे दाणे टाकत असलेला.
तो क्षण हा माझ्यासाठी विलक्षण महत्वाचा होता कारण मी लहान असतानाही त्या चित्रपटाने मला समजेलशी गोष्ट मला दाखवली. आपल्या डोळ्यांसमोर पाहाता पाहाता तोच छोटा मुलगा मोठा झाला हे सुचवलं . ये छोटा बच्चा जो है , वो बडा हो गया. हे समजणं मला एक खूप वेगळा आनंद , थ्रिल देऊन गेलं. तो क्षण, आपल्याला समजण्याचा क्षण मी कधीच विसरु शकणार नाही. सिनेमाची शक्ती पहिल्यांदा दिसण्याचा तो क्षण होता.
मी- आपल्याला मोठं झाल्यावर याच क्षेत्रात जायचय हे तुम्ही कधी ठरवलत?
गोविंदजी- माझा एक लांबचा भाऊ, स्टिल फोटोग्राफर होता. त्याचा कॅमेरा मला हाताळायला मिळत असे. दॅट वाॅज माय फस्ट काॅन्टॅक्ट विथ फोटाॅग्रफी. या दरम्यान मी सतत पौराणिक, एेतिहासिक चित्रपट हे पाहातच होतो. त्यातली इमेजरी ही माझ्यावर खूप प्रभाव टाकणारी ठरली. त्यातही विशेष म्हणजे युध्दाच्या प्रतिमा. म्हणजे बघ, त्या काळी एक पध्दत होती, की युध्द सुरू आहे, सैनिक लढताहेत ,हे पार्श्वभूमीला ठेवायचं, आणि त्यावर सुपरइम्पोज करायचा तो क्लोज अप, बहुधा शत्रूसैन्याचा प्रमुख किंवा अशाच कुठल्या तरी खलनायकी व्यतिमत्वाचा , मोठ्यामोठ्याने हसताना... थिएटरमे नही करते, वैसा ! तर या प्रकारच्या प्रतिमा मला खूप एक्सायटिंग वाटायच्या. खूप नाट्यपूर्ण वाटायच्या. मागे म्युझिकही जोरात असायचं. मी या प्रतिमांवर आधारुन चित्र काढायला लागलो. नुसत्या या प्रतिमांवरून नाहीत, तर पौराणिक पुस्तकांमधल्या चित्रांवरूनही.
गोरखपूरजवळ एक प्रेस होता, गीता प्रेस. ते बरीचशी या प्रकारची सचित्र पुस्तकं प्रसिध्द करीत. विथ ब्लॅक अँड व्हाईट इलस्ट्रेशन्स. ती पाहून पाहून मला चित्रकलेची गोडी लागली. त्यावेळपर्यंत आम्ही कराची सोडून उदयपूरला आलो होतो. तिथल्या आमच्या काॅलनीच्या भींतींवर मी चारकोल घेऊन ही चित्रं काढत असे. सो व्हाॅट आय अॅम सेईंग इज, मला यातला व्हिजुअल ड्रामा आवडायचा. आणि एकूणच व्हिजुअल्सशी संबंधित गोष्टी. या सगळ्यातून मी चित्रांच्या जवळ आलो. या सुमाराला चित्रकलेचं पध्दतशीर शिक्षण घेण्याचाही मी थोडा प्रयत्न केला ,पण त्याला मी लगेचच कंटाळलो. फोटाॅग्रफीची आवड मात्र तशीच राहिली.
मॅट्रीक्युलेशननंतर मी काही व्यावसायिक शिक्षण घ्यावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती.साहजिक होतं, कारण तेव्हाची आमची परिस्थिती बेताचीच होती. फाळणीमुळे कराची सोडावं लागलं होतं, त्यामुळे मी जर व्यावसायिक शिक्षण घेऊन नोकरी धरली असती, तर कुटुंबाला एक आधार झाला असता.
या सुमाराला मला एक जाहिरात दिसली ज्यात लिहीलं होतं, ' ए कोर्स इन सिनेमॅटोग्रफी' . नाउ दॅट वर्ड, डिड द ट्रिक ! मी म्हणालो ' सिनेमा' आणि 'फोटाॅग्रफी' ! हे फार छान काॅम्बिनेशन आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या आवडीच्याच आहेत. मी याची अधिक माहिती काढायचं ठरवलं. माझ्या वडिलांचा मात्र याला पूर्ण विरोध होता. कारण मुळात हा व्यवसाय असू शकतोे यावरच त्यांचा विश्वास नव्हता. ते परवानगी देत नसल्याने मला खूपच वाईट वाटायला लागलं.
तेव्हा आमचे फॅमिली गुरु होते, ब्रम्हानंदजी महाराज म्हणून. वडिल म्हणाले की ते जसं सांगतील तसं करायला मी तयार आहे. ते जर म्हणाले की हा मार्ग योग्य आहे, तर माझी हरकत नाही. गुरुजींनी माझी कुंडली पाहिली आणि वडिलांना म्हणाले, की 'पहा, हा मुलगा अशा क्षेत्रात काहीतरी करेल की ज्याचा कला आणि तंत्रज्ञान या दोन्हींशी संबंध असेल. माझ्या मते त्याने योग्य निवडलेलं क्षेत्रं योग्य असावं, त्यामुळे त्याला तू त्याला त्याच्या मनाप्रमाणे करु द्यावस.'
माझ्या वडिलांनी शब्द पाळला. म्हणाले, ते म्हणतायत ना, मग माझी हरकत नाही. अशा रीतीने मी शेवटी माझ्या क्षेत्रापर्यंत पोचलो. माझं प्रत्यक्ष शिक्षण झालं ते बंगलोरच्या श्री जयाचमराजेंद्र पाॅलिटेक्निक काॅलेजमधून.
मी- छायालेखक म्हणून स्वतंत्रपणे पहिला चित्रपट करेपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता?
गोविंदजी- आमच्या शिक्षणाचा एक भाग म्हणून आम्हाला सहा महिने प्रोफेशनल ट्रेनिंग आवश्यक होतं. त्यासाठी स्टुडिओत काम करणं अपेक्षित होतं. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी हे ट्रेनिंग घेत. मी निवड केली ती मुंबई शहराची. आमच्या इन्स्टीट्यूटमधे एक नाव कायम घेतलं जायचं, जवळजवळ लेजंड होतं म्हंटलं तरी चालेल. ते होतं छायालेखक व्ही के मूर्तींचं. ते तिथलेच माजी विद्यार्थी होते. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि माझं खरं शिक्षण तिथे सुरु झालं.
मूर्ती हे खर््या अर्थाने 'गुरू' म्हणता येईल असे होते. त्यांनी मला सुरुवातीपासूनच जाणीव दिली की मला कायम सहाय्यक म्हणून राहायचं नाही आहे, तर स्वतंत्रपणे काम करायचय. त्या दृष्टीने त्यांनी खूप मोलाचं प्रोत्साहन दिलं. त्यांचं काम खूप शिस्तबध्द असायचं.
मी त्यांच्याबरोबर कामाला सुरूवात केली तेव्हा आम्ही दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्तींच्या ' जिद्दी' म्हणून चित्रपटावर काम करत होतो. आम्हा सार््या सहाय्यकांना तेव्हा खूप उत्साह असायचा , शाॅट झाल्याझाल्या लगेचच पुढच्या शाॅटच्या तयारीला लागायचा. ते चक्रवर्तींबरोबर पुढचं काम डिस्कस करत असायचे आणि आम्ही लगेच जाऊन विचारायचो,की ,'पुढला शाॅट काय आहे?' एकदा ते कळलं , की आम्ही शाॅटची तयारी करायला मोकळे!
एकदा ते थोडे वैतागले. म्हणाले, ' बघा, मी जेव्हा डिरेक्टरशी बोलत असतो, तेव्हा जवळपास राहा. आम्ही काय बोलतोय ते एेका, मग तुम्हाला आपोआपच कळेल पुढला शाॅट काय आहे ते. यापुढे मला कधीही पुढल्या शाॅटविषयी विचारायचं नाही. तुम्हाला स्वतःलाच ते माहीत असायला हवं.'
दॅट वाॅज लाईक अ ब्रम्हमंत्र ! त्या दिवसानंतर ते आणि दिग्दर्शक बोलत असताना मी कधीही त्यांच्यापासून लांब गेलो नाही. ही बोलणी एेकणं हा माझ्यासाठी मोठाच लर्निंग एक्स्पिरीअन्स होता. ते चित्रीत करतोय त्या एकूण प्रसंगाविषयी बोलत. आधीचा शाॅट, नंतरचा शाॅट या सार््याचा एकत्रित विचार करत. त्यामुळे ते एेकून मला प्रसंगाची मांडणी कशी असावी हे शिकता आलं. संकलनात हे सुटे शाॅट्स एकत्र कसे येतील, अमुक ठिकाणी क्लोज अप का, तमुक ठिकाणी ट्राॅली का, हे सारं बोललं जाई आणि मला एेकायला मिळे. हे मला मिळणारं शिक्षण हे खूप मूलभूत स्वरुपाचं होतं, नुसत्या सिनेमॅटोग्रफीपुरतं मर्यादित नव्हतं.
या काळात मला दिसलं की मूर्तींना प्रत्येक शाॅटमधे असलेल्या भावनिक ताकदीची पूर्ण कल्पना होती. प्रेक्षकाकडून कशा प्रकारे इमोशनल रिस्पाॅन्स मिळवता येईल हे ते जाणून होते. लाँग शाॅट, मिडिअम शाॅट चालू असताना एकदम जर त्यांनी क्लोज अपला जायचं ठरवलं, तर मी विचार करत असे, ती स्क्रिप्टमधली लाईन पाहात असे, आणि माझ्या लक्षात येई, की अच्छा ! ही भावना प्रेक्षकांपर्यंत थेट पोचवण्यासाठी त्यांनी हा शाॅट निवडला! मी आमच्या इन्स्टीट्यूटमधे जे तंत्र माहीत करुन घेतलं होतं, ते कसं वापरायचं हे मला पाहायला मिळत होतं. हा एक वेगळा अनुभव होता. त्यांच्या एखाद्या वाक्यानेही आम्हाला नव्या दिशा सापडत होत्या. त्यांच्याबरोबर मी दहाएक वर्ष काम केलं जे पुढल्या आयुष्यात माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं.
मी- गिरीश कर्नाडांचा 'काडू' हा तुमचा स्वतंत्रपणे केलेला पहिला चित्रपट होता का?
गोविंदजी- नाही . माझा पहिला स्वतंत्र चित्रपट होता सत्यदेव दुबेंचा' शांतता ! कोर्ट चालू आहे ' ज्याचा मी कॅमेरामन होतो, आणि सहनिर्मातादेखील.
मी- तुम्ही आपल्या पहिल्याच स्वतंत्र चित्रपटात छायाचित्रणाबरोबर सहनिर्मितीची दुहेरी जबाबदारी कशी घेतलीत?
गोविंदजी- कारण मी आणि दुबे एकाच गेस्ट हाउसमधे राहायचो. आमची तिथे मैत्री झाली. मी त्यांच्या नाटकांचं लाईटींग डिझाईन करायला सुरुवात केली.
दुबेनादेखील मी माझ्या आयुष्यावरला मोठाच प्रभाव मानतो. त्याच्यामुळे माझी अनेक मोठ्या माणसांशी ओळख झाली. कलाकार, लेखक, विचारवंत, रंगभूमीशी संबंधित अनेक जण. दुबेंमुळेच माझी तेंडुलकरांशी ओळख झाली, श्यामबाबूंशी (बेनेगल) ओळख झाली.
मी- 'शांतता'ची फिल्म ही तेंडुलकरांच्या नाटकाचं एक्स्टेन्शन असल्यासारखी होती, की ती नव्याने कन्सीव्ह केलेली होती?
गोविंदजी- शांतता पूर्णपणे नव्याने कन्सीव्ह केलेली होती. त्यात नाटकातल्या घटनांआधीचा बराच भागही होता. आउटडोअर दृश्य होती. ट्रेन , शहर, शेतं अशा बर््याच ठिकाणांना सामावून घेतलं होतं.मात्र पात्र शाळेत पोचल्यावर बराच सिमिलर भागही होता.
चित्रणाच्या पहिल्याच दिवशी माझं आणि दुबेंचं बिनसलं. त्यांच्या काही कल्पना असायच्या, माझ्या काही असायच्या, मग वाद व्हायचे. पण संध्याकाळी गप्पा मारायला बसल्यावर मात्र आम्ही फिल्मविषयी बोलायचो. मग हळूहळू गोष्टी स्थिरस्थावर होत गेल्या.
मी-काही वर्षांपूर्वी मला एफ टी आय आय मधे शांतता पाहाण्याची संधी मिळाली होती. आजही ती फिल्म वेगळी वाटते. मात्र ती पाहायला मिळणं दुर्मिळ आहे.
गोविंदजी- ती बनली तेव्हा आम्हाला ती ऋत्विक घटकाना दाखवण्याची संधी मिळाली होती. या काळात त्यांचा मोठा दिग्दर्शक म्हणून गवगवा झालेला होता. आम्हाला तर देवासमानच होते. त्या सुमारास त्यांच्या एका चित्रपटाचं काम मुंबईत सुरू होतं आणि ते आमच्याच होस्टेलवर उतरले होते. आम्ही त्यांना विनंती केली. ते म्हणाले , मी काही पूर्ण चित्रपट थांबू शकणार नाही. मला माझ्या फिल्मच्या कामासाठी निघावं लागेल'. आम्ही म्हणालो ,ठीक आहे. पण त्यांनी पूर्ण चित्रपट पाहिला. संपल्यावर म्हणाले की, ' यू नो, यू हॅव जस्ट मिस्ड मेकिंग ए मास्टरपीस'. म्हणाले, ' तुम्हाला हे नाटकासारखं दिसतय असं सांगणारे खूप जण भेटतील, पण त्यांचं एेकू नका. धिस इज गुड सिनेमा.' ( या दरम्यान सारा वेळ त्याना वाटत होतं की दिग्दर्शक मी आहे आणि कॅमेरामन दुबे. पण आम्ही त्यांना इतके मानत होतो, की त्यांचा हा गैरसमज दूर करण्याची काही आमची हिम्मत झाली नाही.)
मी- तुम्ही श्यामबाबूंच्या पहिल्या चित्रपटाचं, ' अंकूर'चं छायाचित्रण केलत, तेव्हा तुम्हाला आधी त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव होता का? कारण त्यांनी चित्रपटात येण्याआधी जाहिरात क्षेत्रात खूप काम केलेलं होतं.
गोविंदजी- त्यांच्या काही जाहिरातींसाठी मी काम केलं होतं. पण खूप नव्हतं. पण आमची चांगली ओळख होती. दुबेजींकडे आमचा परिचय झाला होता, मी त्यांच्या घरी गेलो होतो.
मी-'अंकूर' बनला त्या काळात आपल्या चित्रपटसृष्टीत कसं वातावरण होतं? 'भुवन शोम' किंवा 'उसकी रोटी' सारखे समांतर चित्रपट याआधी चारपाच वर्ष आले होते , त्यामुळे संकल्पना म्हणून पॅरलल सिनेमा अगदी नवखा नव्हता, पण तरीही तुमचा चित्रपट या सगळ्यांपेक्षाही वेगळा होता.
गोविंदजी- थिंग्ज वेअर हॅपनिंग. 'पथेर पंचाली' झालेला होता. सत्यजित रे लोकांना माहित होते. मृणाल सेनचा चित्रपट आला होता. ऋत्विक घटकांचे चित्रपट आलेले होते. मी जेव्हा शिक्षण पूर्ण केलं त्या सुमारास पुण्याची इन्स्टिट्यूट ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिआ) सुरू झाली. ही सुरू करण्याच्या प्रयत्नामधेही सत्यजित रे सारख्यांचा सहभाग होता. एन एफ डि सी ही सुरू होत होती. तिचं तेव्हाचं नाव फिल्म फिनान्स काॅर्पोरेशन ( एफ एफ सी) होतं. आम्हाला 'शांतता' करतानाही त्यांनी आर्थिक मदत दिली होती. दॅट वाॅज अ पिरीअड व्हेन लाॅट्स आॅफ एक्सायटिंग थिंग्ज वेअर हॅपनिंग. फिल्म सोसायटी चळवळीलाही सुरुवात झालेली होती. मी स्वतः चळवळीत खूप अॅक्टीव होतो.
या चळवळीचा आमच्यासाठी महत्वाचा भाग होता तो त्यात दाखवल्या जाणार््या चित्रपटांनी आणलेला इस्टर्न युरोपिय प्रभाव. त्यात चेकोस्लोवाकिया, खासकरुन पोलंड, किंवा हंगेरी अशा देशांचे चित्रपट होते आणि या चित्रपटांनी आमच्यापुढे वेगळं जगच उघडं केलं. कथावस्तू, त्या सांगण्याची पध्दत, मिलोस फोरमन वगैरेंच्या चित्रपटात दिसणारा विनोदाचा विशिष्ट बाज, आणि कॅमेराचा वापर. कॅमेराचा वापर महत्वाचा कारण त्यावेळी अॅरीफ्लेक्स कॅमरे पहिल्यांदा आले होते, जे बॅटरीवर चालत आणि हातात धरुन वापरण्याइतके हलके, सुटसुटीत होते. हे हातात घेऊन पळणं सहज शक्य होतं. बर््याच इस्ट युरोपिय चित्रपटात हॅन्डहेल्ड शाॅट्सचा खूप वापर असे , आमच्यासाठी ते काहीतरी नवं होतं. या वेळी नागरा साउंड रेकाॅर्डरही आले जे खांद्यावर अडकवून हवं तसं फिरता येत असे. याआधीच्या तंत्रज्ञानाला हे शक्यच नव्हतं.
तंत्रज्ञान बदलत होतं, चित्रपटांचं दृश्यरुप बदलत होतं.
या सगळ्याचा प्रभाव इन्स्टीट्यूटमधून बाहेर येणार््या तरुण दिग्दर्शकांवर, त्यांच्या कल्पनाशक्तीवर पडत होता.
मृणाल सेनने आपल्या आकाश कुसुममधे बर््यच फ्रीज फ्रेम्स वापरून पाहिल्या. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग इतर चित्रपटातही होताना दिसत होते. म्हणजे तंत्रात बदल करुन पाहिले जात होते, तंत्रज्ञानात प्रगती दिसत होती, आमच्या हातात येणारं नवं हलकं इक्वीपमेन्ट नव्या शक्यता घेऊन येत होतं. नव्या कल्पना लढवल्या जात होत्या. काही प्रमाणात डाव्या विचारसरणीचाही प्रभाव होताच. नव्या चित्रपटासाठी तो चांगला काळ होता.
मी- एफ टी आय आय चे तरुण ग्रॅजुएट्स किंवा तुमच्यासारखे काही वर्ष या प्रकारच्या चित्रपटांना वाहून घेणारे लोक यांच्यावर मेन स्टीम चित्रपटांचा काही प्रभाव होता का ?
गोविंदजी- शेवटी हा व्यवसाय आहे, त्यामुळे सर्वच जण तो सारख्याच श्रध्देने करतील असं होणार नाही. काही जण यात वर्षानुवर्ष यात राहीले,तर काहींना व्यावसायिक चित्रपटांत संधी मिळताच ते तिथे गेली. शेवटी हा व्यक्तिगत विश्वासाचा, आवडीनिवडीचा प्रश्न आहे. आता मला काही व्यावसायिक चित्रपट परका नव्हता. मूर्तींबरोबर मी बराच काळ या प्रकारच्या चित्रपटात काम केलेलं होतं. इन फॅक्ट मेन स्ट्रीम चित्रपटांनी मला माझ्या कामाविषयी खूप आत्मविश्वास दिला. प्रत्येक चित्रपटाचा मूड वेगळा, कथानक वेगळं , लोकेशन्स वेगऴी, त्यामुळे या कामाने मला आपल्या चित्रपटांमधला वेेगळेपणा, त्यांच्यातली डायव्हर्सिटी समजली, ज्याचा चित्रपटांत वापरण्यात येणार््या कथनशैलीवरला, त्यामागच्या विचारावरला परिणाम मी समजू शकत होतो.
मी- मेन स्ट्रीम मधे काम करणारे या समांतर सिनेमाकडे कसे पाहात? ते त्याला मानत असत का?
गोविंदजी- अॅट दॅट टाईम, पार्टली. काही प्रमाणात या चित्रपटाचं नक्कीच कौतुक झालं. गुड सिनेमा, पॅरलल सिनेमा, किंवा आर्ट सिनेमा अशा वेवेगळ्या नावाने हा चित्रपट तेव्हा ओळखला जात असे. पण एक वर्ग असा ही होता जो या चित्रपटांना स्लो आणि बोअरींग समजत असे. 'कुछ एन्टरटेनमेन्ट नही है, कुछ नही है ,ये क्या बकवास बना रहे है आप' धिस अॅटीट्यूड वाॅज व्हेरी मच देअर. आणि असं लोक बोलत राहिल्याचा परीणाम काही एका प्रमाणात या चित्रपटांवर जरुर झाला.
मी- नंतरच्या काळातल्या समांतर चित्रपटांसंदर्भात एक शब्दप्रयोग प्रचलित होता. 'मिडल आॅफ द रोड सिनेमा'! या शब्दप्रयोगाबद्दल तुमचं मत काय आहे?
गोविंदजी- 'मिडल आॅफ द रोड सिनेमा' ही टर्म मुळात कुठून आली मला सांगता येणार नाही. कदाचित कोणा पत्रकार, समीक्षकांनी ती वापरात आणली असेल, किंवा अशा काही फिल्ममेकर्सचाही त्यात हात असू शकतो ज्यांचा केवळ आपण करतोय तेच योग्य आणि इतरांचं चूक असा समज असतो. या टर्ममधून असं सुचवलं जात होतं की या समांतर चित्रपटांमधेही काहीतरी कमी आहे. कुठेतरी तडजोड केली जातेय. तुमचा चित्रपटाचा विचार हा शुध्द कलेशी जोडलेला नाही. तुम्ही व्यावसायिक चित्रपटाच्या घटकांना आपल्या चित्रपटात आणून प्रेक्षकांना अधिक पचेलसं काही देण्याचा प्रयत्न करताय.
मी-तुमच्या दृष्टीने ही टिका योग्य होती का? हे असं केलं जात होतं, की नव्हतं?
गोविंदजी- माझ्या मते या प्रकारे काही घटक वापरणं हे काही पाप नाही. मला विचारशील, तर मुळात आपल्या व्यावसायिक चित्रपटाचा उगम हा फोक थिएटरमधे आहे. लोककलांमधे आहे. तिथल्याप्रमाणे इथेही निवेदन, नाट्य, गाणी, नृत्य, विनोद हे सारं एकत्र झालेलं असतं. बरेचसे दिग्दर्शक हे (वेगवेगळ्या विचारप्रणालीचे असले तरीही) याच मूलभूत घटकाना मानणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातला गाण्यासारख्या घटकांचा वापर हा चित्रपटाच्या वास्तवाला निकालात काढतो असं मला वाटत नाही. आज भी गाने आते है, तो लोगोंको क्यों अच्छे लगते है? कहानी तो फिरभी समझमे आती है ना !
हा वापर बहुधा त्या त्या व्यक्तिरेखेच्या भावना व्यक्त करण्यासाठी केलेला असतो. आनंद , विरह ,किंवा अशी कुठलीही भावना. त्या काळात यावर घेतलेला आक्षेप हा प्रामुख्याने आपला व्यावसायिक चित्रपट बाहेरुन पाहाणार््या परदेशी समीक्षकाकडून आला. आणि आपले बरेच दिग्दर्शक या मतांना मानत असत. मला स्वतःला, प्रामुख्याने मेन स्ट्रीम चित्रपटांतून आल्यामुळेच, हे नैसर्गिकच वाटायचं. माझ्या 'आक्रोश' मधेही तीन, चार गाणी होती. लावणी सोडली तर ती पडद्यावर कोणी म्हणताना दाखवलं नव्हतं, पण गाणी होती. ज्या लोकांनी हा ' मिडल आॅफ द रोड' शब्दप्रयोग प्रचलित केला, त्यांच्या दृष्टीने गाणी, ही तडजोड होती.
आपण जर समांतर चित्रपटांची सुरुवात पाहिली, तर लक्षात येईल, की या चित्रपटांनी व्यावसायिक चित्रपटांची प्रत्येक गोष्ट नाकारली. तुमच्याकडे स्टार्स आहेत? मग आम्हाला स्टार्स नकोत. व्यावसायिक चित्रपटात भव्य सेट्स आहेत, सुखावणारी दृश्य आहेत? आम्हाला हे काही नको, आम्ही बाहेर जाऊन रस्त्यात, खर््या लोकेशन्सवर शूट करु. व्यावसायिक चित्रपटात गाणी हवीत? मग आम्हाला ती नकोत. मेन स्ट्री सिनेमाला सुखांत शेवट हवेत? मग आम्हाला त्याची गरज नाही. सो द पेन्ड्यूलम स्वंग टु दी एक्स्ट्रीम. हा व्यावसायिक चित्रपट, आणि हा व्यावसायिक नसणारा चित्रपट असे सरळ भाग पडले. त्या समांतर चित्रपटात सर्व ओळखीचे घटक, हे कटाक्षाने टाळण्यात आले.
पण मग कालांतराने किंचित उलटा प्रवास सुरु झाला. त्याला कारणीभूत होती, प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रमाणात पोचण्याची निकड. तुम्ही जर चित्रपट बनवला, तर तो पाहिला जावा असं वाटणं साहाजिक आहे. मग काही दिग्दर्शकांनी परिचित घटक वापरण्याचे प्रयत्न करुनही पाहिले. काहींनी वेगवेगळे चित्रप्रकार हाताळून पाहिले. काॅमेडी,थ्रिलर, कौटुंबिक जिव्हाळा असे बरेच काही. धिस इज बाउंड टु हॅपन. यू कान्ट हॅव वन टाईप आॅफ सिनेमा आॅल द टाईम. या काळात हे असे शब्दप्रयोग लोकप्रिय झाले.
मी- तुम्ही जेव्हा तुमचं पहिलं दिग्दर्शन असणारा 'आक्रोश' चित्रपट केलात, तेव्हा ती छायाचित्रणापलीकडली पुढली लाॅजिकल पायरी होती, की बेनेगलांबरोबर काम करुन तुम्ही इन्स्पायर झालात?
गोविंदजी- वर्कींग विथ मि. बेनेगल वाॅज व्हेरी इन्स्पायरींग, देअर इज नो डाउट अबाऊट दॅट. पण मी मुळात जो कोर्स बंगलोरला केला होता, तो सिनेमा टेक्निकमधला कोर्स होता. त्यात दिग्दर्शन होतं, संकलन, साउंड रेकाॅर्डींग, अगदी लॅबोरेटरी चालवण्यापर्यंत , फिल्म प्रोसेस करण्यापर्यंत सारच होतं. त्यामुळे त्या दृष्टीने, शिक्षण संपताना मी फिल्ममेकर बनलेलाच होतो. त्यामुळे स्वतःचा चित्रपट बनवावासा वाटणं नैसर्गिकच होतं.
मी खानोलकरांच्या 'चानी' ची कथा एेकली होती, मग ती कादंबरी मिळवून वाचलीही. त्यावर चित्रपट करण्यात मला रस होता. पण खानोलकरांनी ती अण्णासाहेबांना ( व्ही शांताराम) द्यायचं ठरवलं. त्यांनी मग तो बनवला. मला थोडं वाईट वाटलं, पण चित्रपट तर बनवायचा होताच. मग मी दुसरे विषय शोधायला लागलो.
मला वाटतं त्या वेळी तेंडुलकर एन सी पी एची स्काॅलरशिप करत होते, 'व्हायलन्स इन सोसायटी, अॅज एक्स्प्रेस्ड इन थिएटर', या विषयावर. त्यांच्या रिसर्चदरम्यान त्यांना एका भिवंडीत घडलेल्या गोष्टीची माहिती मिळाली. घटना कम्युनल व्हायलन्ससंबंधातली होती. इथल्या काही लोकांनी काही आदिवासी लोकांना धनुष्य बाण घेऊन बोलावलं होतं, आणि दंगलीदरम्यान त्यांना गर्दीत बाण चालवायला सांगितले. त्यांना नक्की कोणी बोलावलं कोणालाच माहित नव्हतं. आदिवासींनी त्या लोकांचं का एेकलं, हेदेखील नक्की कळलं नाही. बहुधा त्यांना दारु वगैरे पाजली असावी आणि म्हणाले असतील, 'मारा बाण', यांनी मारले! दंगल संपली, पोलिस आले, पळापळ झाली, सगळे लोक पांगले. या आदिवासींना नक्की काय करावं, कुठे जावं कळेना. एक आदिवासी पकडला गेला, आणि दंगलीत मारल्या गेलेल्यातल्याएकाच्या शरीरात घुसलेला बाण सापडला. त्यावरुन पोलिसांच्या सारं लक्षात आलं. आता ही घटना तेंडुलकरांनी मला सांगितली. मला ती आवडली. त्यात दिसलेला राजकीय हेतूने करण्यात येणार््या साध्या माणसांच्या सिनिकल एक्स्प्लाॅयटेशनचा मुद्दा मला आवडला, तेंडुलकरांनाही आवडला. मी ती कल्पना घेऊन एन एफ डि सी कडे गेलो. त्यांना मी म्हणालो की अशी अशी घटना आहे त्याचं असं असं रुपांतर करावं अशी माझी इच्छा आहे, तर आपण ते करु शकू का?
एन एफ डी सी मधे मी ज्याना भेटलो ते चांगले गृहस्थ होते. आमच्या प्रकारच्या चित्रपटांविषयी त्यांचं चांगलं मत होतं. ते म्हणाले, 'हे पहा, हा विषय हिंदू- मुस्लिम दंगलींसंबंधातला आहे. संवेदनशील आहे. मी तरी सुचवेन की सुरुवातीलाच या प्रकारचा विषय निवडणं तुम्ही टाळा. काहीतरी वेगळं करा.' मी म्हणालो, ठीक आहे.'
पण हा विषय माझ्या डोक्यातून गेला नाही. एके दिवशी शूटींगहून परतताना केम्स काॅर्नर ब्रिजजवळ मला एकदम कल्पना सुचली. एक आदिवासी असेल, त्याला कुठल्यातरी आरोपावरुन पकडण्यात आलं, आणि कोणातरी वकीलावर त्याची बाजू लढवायची वेळ आली- आणि अटक झाली म्हंटल्यावर ती येणारच ना- तो क्या हो सकता है ? मला ती कल्पना चांगली वाटली. मी तेंडुलकरांना फोन केला. म्हणालो, ' तेंडुलकर आय वाॅन्ट टु सी यू, एक आयडिआ है दिमागमें.' दुसर््या दिवशी भेटलो. ते म्हणाले कल्पना चांगली आहे, लेट मी वर्क आॅन इट. मग त्यांनी आक्रोशचा पूर्ण आराखडा ठरवला, आणि मी म्हणालो, राईट! दॅट्स हाऊ इट हॅपन्ड.
मी- तुमच्या मते, दिग्दर्शकाच्या कामाचा दर्जा हा किती प्रमाणात सिनेमॅटोग्राफरच्या कामावर अवलंबून असतो, आणि वाईस वर्सा?
गोविंदजी- हे सगळं एकमेकांत मिसळलेलं असतं रे ! माझ्यापुरतं जर बोलायचं तर मी असं सांगू शकेन, की माझ्यातला दिग्दर्शक हा नेहमीच माझ्यातल्या कॅमेरामनपेक्षा वरचढ ठरतो. दिग्दर्शकाचा निर्णय हा नेहमीच अधिक वरचा असतो. तुला कदाचित वाटेल की मी कॅमेरामनही असल्याने कदाचित माझ्या बाबतीत तसं नसेल, पण नाही. मला हे पूर्णपणे माहीतेय की आशय अधिक महत्वाचा, व्यक्तिरेखा अधिक महत्वाच्या, लोकेशन लायटिंग वगैरे शंभर टक्के हवं तसं मिळालं नाही, तरी चालू शकतं. त्यामुळे कॅमेरामन मी , हा नेहमी दिग्दर्शक मीचं सगळं सांगणं एेकतो.
मी- तुम्ही जेव्हा चित्रपट बनवायचं ठरवलत तेव्हा तुम्हाला तो अधिक व्यावसायिक धर्तीचा करावा असं कधीच वाटलं नाही का? खासकरुन तुमचा व्यावसायिक चित्रपटाचा एवढ्या वर्षांचा अनुभव असताना.
गोविंदजी- कधीच नाही. आय आॅल्वेज मेक फिल्म्स द वे आय थिंक दे विल वर्क. जर तो प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी गाण्यांसारखे काही घटक घालावेसे वाटले तर तो विचारही मी मूळ संकल्पना ठरवतानाच करतो. एक उदाहरण द्यायचं, तर जेव्हा मी ' तक्षक' चित्रपट बनवला तेव्हा मी लक्षात घेतलं होतं की मी व्यावसायिक चित्रपटातल्या नटाला घेउन तो करतोय, त्यामुळे त्या पूर्ण चित्रपटालाच मी व्यावसायिक ट्रीटमेन्ट दिली. तो माझा पहिलाच व्यावसायिक चित्रपट होता.
मी- 'तक्षक' करायचं कसं ठरलं? कारण तो तुमच्या तोवरच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा होता.
गोविंदजी- माझ्या डोक्यात एका चित्रपटाची कल्पना घोळत होती आणि नेमका तेव्हाच अजय देवगणचा सेक्रेटरी मला भेटायला आला. म्हणाला, ' तुमच्या डोक्यात अजयला चालण्यासारखी काही कल्पना असेल तर अजयला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल.' मी म्हणालो, ' आत्तातरी माझ्याकडे गोष्ट तयार नाही, पण आय विल गेट बॅक टु यू.' मग माझ्या डोक्यातली कल्पना हळूहळू चित्रपटाचा आकार घ्यायला लागली. आणि माझे चांगले मित्र मनमोहन शेट्टी म्हणाले, की तू ही फिल्म केलीच पाहिजेस. त्यांनी मला जवळजवळ ती करायला भाग पाडलं असंही म्हणता येईल. ते म्हणाले ,तू असे एकाच प्रकारचे सिनेमा करणं योग्य नाही. नवं काहीतरी करुन पहा. मी म्हणालो, चलो, करते है ! मग मी अजयला भेटलो आणि म्हणालो ,'अजूनही माझं स्क्रिप्ट तयार नाही, पण आपण करुया'. तो म्हणाला,' जेव्हा तुमचं स्क्रिप्ट तयार होईल तेव्हा मी तयार आहे.' त्याने पूर्ण चित्रपटाला चांगलं सहकार्य केलं. ही इज ए व्हेरी फाईन अॅक्टर अॅन्ड ए व्हेरी गुड ह्यूमन बीईंग.
मी- तुमचं करीअर पाहिलं तर लक्षात येतं की तुम्ही स्वतंत्र पटकथांपेक्षा रुपांतरं अधिक प्रमाणात केलीत. अर्धसत्य, पार्टी, तमस, रुखमावती की हवेली आणि तुमचं बरचसं काम हे पूर्वप्रकाशित मजकूरावर आधारीत आहे. यामागे काही खास कारण आहे का?
गोविंदजी-इट्स ए मॅटर आॅफ टेम्परामेन्ट. तुम्ही स्वतंत्रपणे पटकथा लिहित असाल तर चांगलंच आहे, पण समजा तुम्हाला जे हवय, ते तुम्हाला दुसर््या माध्यमात सापडत असेल तर गैर काय. एखादी लघु कथा, नाटक, कादंबरी ,या सगळ्याला गोष्टींचा सोर्स म्हणून पाहाता येतंच. मी असा विचार करत नाही, की अरे, हे तर नाटक आहे, याचा सिनेमा कसा काय करणार? किंवा नाटकात शब्द अधिक असल्यामुळे त्याचा चित्रपट म्हणून दर्जा कुठेतरी कमी होईल! असं काहीच मला वाटत नाही. माझ्या दुबेंबरोबरच्या मैत्रीमुळे माझा रंगभूमीशी आधीच संबंध आला होता. आय लाईक प्लेज. मी शिक्षणासाठी बंगलोरला गेलो , त्याआधीच मी हिंदी साहित्य वाचायलासुरुवात केलेली होती. मी बर््याचशा बंगाली कादंबर््यांची हिंदी भाषांतरंही वाचली होती. सरत््चंद्र, टागोर, प्रेमचंद यांचं बरंच साहित्य मी या काऴात वाचलं होतं. ही माझी आवड मी वाढवत नेली. नंतरही मी बरचसं जागतिक साहित्य इंग्रजीतून वाचलं. साहित्याचा विद्यार्थी नसलो तरीही. जेव्हा या कलाकृतींचा आत्मा तुम्हाला तुमच्या विचारांशी जुळतोय असं वाटलं तर ही माध्यमांतरं सोपी होतात, चांगली होतात.
कोणत्याही कलाकृतीचा आत्मा हा तिच्या लेखकाचा असतो. मात्र जशी ही साहित्यकृती इतरांकडून वाचली जाते तसं प्रत्येक वाचकाला त्यात काहीतरी नवं दिसतं, नवं सापडतं. नाटकाचंही तेच. प्रत्येक दिग्दर्शक हा एकाच संहितेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनांमधून पाहातो आणि नव्या पध्दतीने तिला सादर करतो. ही कलाकृतीकडे नव्याने पाहाण्याची, तिचा आत्मा तुमच्या नजरेने शोधण्याची आणि मग तुमच्या पध्दतीने ती लोकांपुढे मांडण्याची प्रक्रीया , हे रुपांतर करणं मला आवडतं. मग तुम्ही चित्रपट करता तेव्हा ही कलाकृती तुमची झालेली असते. पण हॅविंग सेड दॅट, आय हॅव ए ट्रिमेन्डस रिस्पेक्ट फाॅर द रायटर्स. ते मूळ आत्मा घडवतात. भीषमजींच्या लेखणीशिवाय मी तमसची कल्पनाही करु शकत नाही. आक्रोश, अर्धसत्य किंवा आघात यांची कल्पना तेंडुलकरांशिवाय करता येणार नाही.
मी- 'तमस' चा विषय निघालाच आहे तर विचारतो, तमस टेलिव्हीजनसाठी का केली?
गोविंदजी- कारण तेव्हा चित्रपटासाठी पैसेच उपलब्ध नव्हते.
मी- मलाही थोडं तसंच वाटलं होतं. तो काळ समांतर चित्रपटांसाठी खूपच अडचणीचा होता ना? रंगीत टिव्ही आल्याने मला वाटतं एकूण चित्रपटसृष्टीच अडचणीत होती. पण केवळ तेच कारण होतं, की विषयाचा मोठा अवाका हेदेखील होतं?
गोविंदजी- मला कळलं होतं की याचा चित्रपट बनवणं परवडणार नाही. तेव्हाच टेलिव्हीजन आॅफर आली आणि मी ती लगेच स्वीकारली. मग वाटलं की खरं तर हे ब्लेसिंग इन डिस्गाइस आहे. जे झालं ते चांगलंच झालं. कारण मला तिथे खूप काही करणं शक्य झालं. खरं तर प्रत्यक्ष चित्रणाच्या वेळी मी त्याच्याकडे टेलिव्हिजन म्हणून पाहिलच नाही. मी १६ एम एम वर चित्रण केलं, फिल्म कॅमेरा वापरला, लायटिंग, सेट, परफाॅर्मन्सेस, सगळंच्या सगळं चित्रपट करत असल्यासारखंच केलं.
मी- समांतर चित्रपटाच्या मर्यादित प्रेक्षकांच्या तुलनेत, टेलिव्हिजनमुळे तमस खूपच मोठ्या प्रेक्षकवर्गापुढे पोचली असणार. तुम्हाला त्याची काही थेट प्रतिक्रिया आली का?
गोविंदजी- त्याकाळात अशी प्रतिक्रिया मोजण्याचं साधन नव्हतं, पण कुठेतरी ही कलाकृती पब्लिक मेमरीचा भाग बनली. आजही ती लोकांच्या लक्षात आहे. हल्लीच ती एका चॅनलवर दाखवली तेव्हाही मला लोकाच्या प्रतिक्रिया मिळाल्या. आजही ती तेव्हासारखीच़ फ्रेश आहे, जराही कालबाह्य वाटत नाही, असंच सगळ्यांचं म्हणणं होतं. एकूणात हे काम मोठं आणि दमवणारं असलं तरी मला खूप समाधान देणारा अनुभव होता. तमस हा माझ्यासाठी एक प्रकारचा 'अॅक्ट आॅफ फेथ' होता. तो बनवताना कोणत्याही तडजोडी नव्हत्या हिशेब नव्हते, मुख्य म्हणजे बाॅक्स आॅफिसचा ताण नव्हता. चले ना चले, जैसे बनाना था, वैसेही बनादिया.
मी- त्यावरुन खूप वाद झाल्याचंही आठवतं !
गोविंदजी- खूपच. बर््याच जणांना कळत नव्हतं की मी हिंदूंच्या बाजूला आहे, की मुसलमानांच्या. पण चांगली गोष्ट ही झाली की त्यावर खूप बोललं गेलं. प्रत्येक पेपरात त्याविषयी लिहून आलं. शिव्या तर शिव्या, पण मनात काही राहिलं नाही. मुद्द्यांवर गंभीरपणे बोललं गेलं.
मी- तुम्ही पुढे अनेक वर्षांनी, याच प्रकारचा जातीय दंगलींचा विषय तुमच्या 'देव' चित्रपटात हाताळलात.
गोविंदजी- नाॅट टू दॅट एक्स्टेन्ट, पण हो. त्याला थोडा वेगळा रंग आला. हिंदूना वाटलं की तो त्यांच्या विरोधात आहे, तर मुस्लिमांना त्याच्या.
मी- तुम्हाला पुन्हा या विषयाकडे का वळावं असं वाटलं? तेही इतक्या वर्षांनंतर?
गोविंदजी- त्या अर्थाने तो जातीयवादी चित्रपटच नाही. माणूस आणि त्याचा काॅन्शन्स यातला तो संघर्ष आहे. पण घटना घडतच होत्या. बाबरी मशीद प्रकरण झालं, गुजरातच्या दंगली झाल्या. या सार््याचं प्रतिबिंब त्यात होतं. हे सगळं मला खूप अस्वस्थ करणारं होतं. पण पहा, मी जेव्हा एखादी थीम घेतो, तेव्हा मी ती एखाद्या व्यक्तिरेखेमार्फत मांडायचा प्रयत्न करतो. घोषवाक्य किंवा थेट संदेश असं काही न करता. फोड करुन , उघड सांगण्याची गरज मला नको वाटते. मी काय सांगायचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला त्या व्यक्तिरेखेशी समरस झाल्यावर आपसूकच कळायला पाहिजे अशीच माझी धारणा असते. 'देव ' त्याचच उदाहरण म्हणता येईल.
मी- हिंसा हा घटक तुमच्या अनेक चित्रपटांमधे दिसून येतो. 'अर्धसत्य', 'द्रोहकाल', ' तमस' यासारख्या तुमच्या अनेक वर्क्समधे तो दिसतो, वेगवेगळ्या रुपात. कधी तो गुन्हेगारी म्हणून असतो, कधी दहशतवाद, तर कधी जातीयवादी संघर्ष. इज दॅट अ डेलिबरेट चाॅईस?
गोविंदजी- मला नक्की सांगता येणार नाही. आय सीम टु बी अट्रॅक्टेड टु द कन्फ्रन्टेशन बिट्वीन स्ट्राँग फोर्सेस. हा संघर्ष अर्धसत्यसारखा 'व्यक्ती विरुध्द व्यवस्था' असा असतो, किंवा इतरही काही रुपात तो असू शकतो. मुळातच मला नाट्यपूर्ण घटना आवडतात.
मी - पण त्याची दृश्य बाजू ?
गोविंदजी- ती वास्तवाकडूनच प्रेरणा घेते.
मी- मला कुतूहल याचंही होतं की तुमच्या पुस्तकांच्या कलेक्शनमधे फ्रॅन्क मिलरची सिन सिटी मालिका, किंवा हिंसा हा ठाशीव घटक असणारी इतरही ग्राफिक नाॅव्हेल्स आहेत. त्यांचा तुमच्या शैलीवर काही प्रभाव आहे का?
गोविंदजी- ती आहेत कारण मला त्यांची शैली आवडते. गेल्या दहा पंधरा वर्षांमधे ती मी जमवलीयत. सिन सिटी सारख्या मालिकेतली ग्राफिक्स ही खूपच प्रभावी आहेत. मात्र माझ्या कामावर प्रभाव असलाच, आणि असू शकतो, तर तो जाणीवपूर्वक आणलेला नाही. सबकाॅन्शसली असू शकतो. तसे आपण चित्रपटही खूप प्रमाणात पाहातोच. अनेकांचं छायाचित्रण इतकं उत्कृष्ट असतं ! या सगळ्याचाही नकळत प्रभाव पडतोच!
मी- गेल्या काही दिवसांत आपल्याकडला चित्रपट बर््याच प्रमाणात बदलतो आहे असं मानलं जातं. तुमच्या मते या बदलात मिडीआचा प्रभाव काय आहे? जेव्हा समांतर चित्रपटांची चळवळ जोरात होती तेव्हा मिडीआने चांगल्या प्रकारे या दिग्दर्शकांची बाजू जनतेसमोर मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर चित्रपट संस्कृतीमधे मिडीआची भूमिका काय असायला हवी असं वाटतं?
गोविंदजी- जेव्हा समांतर सिनेमा लोकांसमोर होता तेव्हा ज्या काही गोष्टींनी त्याला पुढे यायला मदत केली, त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणून आपल्याला मिडिआचं नाव घेणं भाग आहे. त्यावेळी चित्रपटांविषयी लिहीणार््या काही जणांनी, समीक्षकांनी हा चित्रपट खूपच उचलून धरला. आणि जेव्हा मी मिडीआ म्हणतो, तेव्हा मला पर्टीक्युलरली प्रिन्ट मिडीआ, असं म्हणायचय. टिव्हीवरुनही काही प्रमाणात मदत होती, अगदीच नाही असं नाही. पण एेशीच्या दशकाच्या मध्यापर्यंत, प्रिन्ट मिडीआने समांतर चित्रपटाला खूप सहाय्य केलं. एटीजमधे पुढे पुढे हा सपोर्ट कमी झाला, पण तेव्हा चळवळही तितकी जोरात नव्हती. एकूण एन्टरटेनमेन्ट इन्डस्ट्रीसाठीच मिडीआ सपोर्ट खूप महत्वाचा असतो, आणि त्यातही जी वेगळ्या प्रकारची कामं असतात त्यांच्यासाठी तर तो क्रूशल म्हणावा लागतो. तो नसेल तर लोकांपर्यंत हे काहीच पोचणार नाही. आजची गोष्ट तर अशी आहे, की केवळ चित्रपटउद्योग नाहीतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी मिडिआकडेच पाहिलं जातं. या त्यांना आज असलेल्या महत्वाच्या स्थानामुळे आणि त्यांनी हल्ली प्रदर्शित झालेल्या काही नव्या चित्रपटांकडे लक्ष वेधल्याने लोकांमधेही या वेगळ्या चित्रपटांबद्दल एक कुतुहल तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. या चित्रपटांच्या होणार््या कौतुकात, यशात मिडिआचाही महत्वाचा वाटा आहे. आज वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांची चळवळ पुढे चालू राहायची, तर मिडीआकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
मी- त्यावेळची आणि आत्ताची मिडीआ यात काही फरक जाणवतो का?
गोविंदजी- त्यावेळची मिडीआमधली मंडळीही या प्रकारच्या चित्रपटाना खूप कमिटेड होती.पण कदाचित ते त्या चित्रपटांना आलेल्या चळवळीच्या स्वरुपाने असेल. आज वेगळ्या चित्रपटांचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. त्यामुळे जेव्हा कधी वेगळं काही घडतं, तेव्हाच या नव्या प्रकारच्या सिनेमाविषयी बोललं, लिहीलं जातं. पण या चित्रपटांचं प्रमाणही हळूहळू वाढतय. डिजीटल टेक्नाॅलाॅजीमुळेही आणि आजचा प्रेक्षक नवनव्या कलाकारांना, म्हणजे स्टार्स नसणार््या कलाकारांना पाहायला तयार आहे, त्यामुळेही. पण हे चित्रपट चालत रहायचे तर मार्केटींगची गरजही खूप आहे. या अशा अशा नव्या गोष्टी घडतायत हे प्रेक्षकांपर्यंत त्यामुऴेच पोचू शकतं.
मी - आज समांतर चित्रपटांच्या जातीच्या, वेगळ्या चित्रपटांमधे रमणार््या नव्या दिग्दर्शकांबद्दल तुमचं काय मत आहे? अनुराग कश्यप किंवा त्याच्या प्रकारचं काम करणार््या इतरांबद्दल?
गोविंदजी- मला ही खूप पाॅझिटीव्ह डेव्हलपमेन्ट वाटते. समांतर सिनेमा म्हणजे काही एका साच्यातला चित्रपट नाही.आज तुम्ही ( व्यावसायिक गणितात न अडकणारा) चांगला चित्रपट केलात, आणि प्रेक्षकाला आवडेलसा गतिमान ठेवलात, तर त्याला पॅरलल सिनेमा म्हणायला काय हरकत आहे? होतं काय, की आपणच समांतर सिनेमाचा एक फाॅर्म्युला, स्टिरीओटाईप करुन ठेवतो. आपण ठरवतो, की तो संथच असला पाहिजे, त्यात गाणी नकोत, त्याचा आशय खूप वजनदार असला पाहिजे. क्यूं भई? क्या काॅमेडी नहीं मिल सकती? कुंदनने ' जाने भी दो यारों' बनवलीच ना? आयकाॅनिक फिल्म आहे ती. पेसी आणि उत्तम फिल्म आहे . आता जर मी एखादा चित्रपट बनवला ज्यात थ्रिलर एलिमेन्ट आहे, तर तो लगेच व्यवसायिक चित्रपट झाला का? समांतर चित्रपटातही थ्रिलर का असू शकत नाही? परदेशात जेव्हा 'झी' सारखा चित्रपट बनतो, तेव्हा आपण त्याला समांतर चित्रपटाचा दर्जा देतोच ना? आता झी किती पेसी फिल्म आहे !
तुम्ही खरं तर त्यामागचा विचार लक्षात घ्यायला पाहिजे. यू सी, पॅरलल सिनेमा, इज ए स्टेट आॅफ माईन्ड ! विचार करण्याची, मांडण्याची ती एक पध्दत आहे. इट्स अ वर््ल्ड व्ह्यू. अर्थात, हा सिनेमा यशस्वी व्हायचा तर तो प्रेक्षकांना आपलासा वाटायला हवाच.
मला एक कळत नाही, की समांतर सिनेमात काम केलेल्या एखाद्या दिग्दर्शकाने, इतर कोणी कशाला, आपण माझंच उदाहरण घेऊ ना...तर मी आजच्या काळात मी पुन्हा 'आक्रोश' करावा ही अपेक्षा का? तीस वर्षांपूर्वी जे झालं, ते झालं. मी काळाप्रमाणे बदलणार नाही का ? माझी शैली काळाप्रमाणे बदलणार नाही का? माझे कन्सर्न्स काळाप्रमाणे बदलणारनाहीत का? मी काळाबरोबर, इतिहासाबरोबर बदलतोय, पुढे जातोय. आय अॅम मुव्हींग विथ इकाॅनाॅमी, मुव्हींग विथ टेक्नाॅलाॅजी. या सगळ्यातून मी बदलतोय. माझे विचार बदलतायत. मग असं असताना मी चित्रपटाच्या एका फाॅर्मशी ,एका प्रकाराशी का बांधलेला राहू? मी वेगवेगळ्या चित्रप्रकारात चित्रपट बनवण्याचे प्रयोग का करुन पाहू नयेत?
मी- याच विषयाला पुढे न्यायचं तर मला वाटतं तुम्ही सध्या एक मुलांचा अॅनिमेटेड चित्रपट करताय. हो ना?
गोविंदजी- हो , हा चित्रपट, ' कमलू हॅपी हॅपी' खरं तर जवळजवळ पूर्ण झालाय. एक उंटाचं पिल्लू याचं नायक आहे. कमलू आणि त्याचे सारे सखेसोबती यांच्या गंमती जमती, साहस हे सारं या चित्रपटात आहे. आहे. कमलूची इच्छा आहे की आपल्याला उडता यावं,आणि ती तो कशी पुरी करतो हा या चित्रपटाचा विषय आहे, किंवा दुसर््या शब्दात सांगायचं तर 'ड्रिमींग द इम्पाॅसिबल अँड मेकींग इट हॅपन' ही याची थीम आहे. धमाल मसाला फिल्म आहे ही. या प्राॅजेक्टवर माझा बराच वेळ गेला हे खरय, पण मला प्रयोग करुन पाहायचे आहेतच. मला केवळ गंमत म्हणून चित्रपट करायचेत, म्युझिकल करुन पाहायचय. का नाही? सो हे जे स्टीरीओटायपिंग जे आहे, ते जायला हवं, आणि आता, गेल्या काही वर्षांत ते हळूहळू जाताना आपल्याला दिसतय.
मी- तुमच्या दुसर््या एका प्राॅजेक्टची सध्या चर्चा आहे, आणि तो म्हणजे ' अर्धसत्य' चा दुसरा भाग. त्याविषयी काही सांगाल?
गोविंदजी- हो, तसा विचार निश्चीतच आहे. मूळ चित्रपटाचे निर्माते आणि माझे मित्र मनमोहन शेट्टी मला हे कितीतरी वर्ष सांगतायत. पण मला 'अर्धसत्य'ची गोष्ट जशीच्यातशी पुढे न्यावी असं वाटत नाही. त्यामुळे मी अशा फिल्मचा विचार करतोय, जी मूळ चित्रपटाने मांडलेल्या मुद्द्यांबाबत, त्याच्या कन्सर्न्सबाबत सिमिलर असेल, पण त्याच व्यक्तिरेखांचा पुढला प्रवास मात्र ती मांडणार नाही. त्याची गोष्ट वेगळी असेल. 'व्यक्ती विरुध्द व्यवस्था' ही त्याची मुख्य थीम तशीच राहील, पण त्यापलीकडचा तपशील आपण पाहिला तर अर्धसत्य चा मुळ संघर्ष हा कायद्याचे रक्षक असणारे पोलिस, अंडरवल्ड आणि राजकारणी यांच्या हातमिळवणीशी जोडलेला होता. अर्धसत्य नव्याने बनवताना प्रमुख अडचण ही आहे, की ही हातमिळवणी, हे नेक्सस , खूप काॅमन झालय.अनेक चित्रपटांमधे ते दिसतं. आजच्या काळात हे चित्रण वेगळ्या पध्तीने कसं दाखवता येईल, हे माझ्यापुढलं सर्वात मोठं आव्हान आहे. अजूनही त्याबद्दलच माझा विचार चालू आहे. लवकरच त्यातून मार्ग सापडेलसं मला वाटतं. देखेंगे क्या होता है!
मुलाखत संपवून निघताना मला त्यांच्या उत्साहाची कमाल वाटत होती. पण माझ्या हेही लक्षात आलं होतं की गोविंदजींचं सांगून संपलेलं नाही. ही मुलाखत अपुरी आहे आणि पुढेमागे ती पूर्ण करणं आवश्यक होणार आहे. मी तीनेक महिन्यांनी पुन्हा भेटायचं टेन्टेटिवली ठरवलं आणि बाहेर पडलो.
( मुलाखत - गणेश मतकरी)
(mukta shabda diwali ankamadhun)
Read more...