बीफोर मिडनाईट - टिकून राहावंसं नातं

>> Monday, October 21, 2013



वेल, हू सेज द रिलेशनशिप्स हॅव टु लास्ट फाॅरेव्हर?

- सेलिन ( बीफोर सनराईज)

बीफोर मिडनाईट पाहाण्यापूर्वी माझ्या मनात थोडी धाकधूक होती. तिसरे भाग हे अत्यंत निसरडे असतात. भल्याभल्या चित्रत्रयींची त्यांनी वाट लावल्याची उदाहरणं पाहाण्यात आहेत. पण प्रश्न केवळ तेवढाच नव्हता. ज्यांनी 'बीफोर सनराईज' आणि 'बीफोर सनसेट' पाहिले असतील त्यांना माहित असेल की त्यांचं स्वरुप हे दोन्ही चित्रपटांत त्याच दोन व्यक्तिरेखा असूनही परस्परांहून बरचसं वेगळं आहे. दोन्ही चित्रपटांचा शेवट हा सूचक परंतू अनिश्चित आहे. दुसर््या भागाचा चा शेवट हा स्पष्ट हॅपी एन्डींग सुचवतो, त्यामुळे जेव्हा मला तिसरा भाग येणारसं कळलं तेव्हा मी थोडा दचकलो. मला वाटलं, आपण गृहीत धरत होतो की 'बीफोर सनसेट' अखेर या चित्रपटांचे नायक/ नायिका  जेसी /सेलिन एकत्र आले आणि ती दोघं सुखाने राहू लागली. पण मग तिसरा भाग कसा आला? मिलन हा जर सुखांत शेवट मानला ,तर त्यानंतर गोष्ट संपायला नको का? बीफोर मिडनाईटची गंमत हीच की तो आपल्याला चित्रपटांसाठी ( सामान्यत:) अपरिचित प्रदेशात नेतो. 'अॅन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर'ला गोष्ट संपत नाही हे दाखवून देतो.
रिचर्ड लिंकलेटरच्या बीफोर चित्रपटमालिकेतल्या ( मी चित्रत्रयी म्हणणार नाही कारण बीफोर मिडनाईट हा त्यातला अखेरचा भाग ठरु नये असं मला मनापासून वाटतं)  व्यक्तिरेखांच्या वयाचे टप्पे हे ते ते चित्रपट प्रदर्शित होताना माझ्या स्वतःच्या वयाशी समांतर असण्याचा थोडाफार संबंध हे माझे अत्यंत आवडते चित्रपट असण्याशी असू शकेल, कारण त्यामुळे या व्यक्तिरेखांशी मी समरस होऊ शकण्याची क्षमता नैसर्गिकपणेच वाढते, पण केवळ हे एकच कारण त्यामागे असेल असं मला वाटत नाही. तेवढंच असतं, तर सतरा अठरा पुढल्या सर्व वयांमधे या मालिकेचे जे असंख्य चाहाते आहेत त्याचं स्पष्टीकरण काय? पण हेही खरं की या चित्रपटांची एकूण गुणवत्ता गृहीत धरुनही (आणि ती प्रचंडच आहे)त्यापलीकडे पाहाता, त्या त्या  संबंधित वयातल्या प्रेक्षकांवर या चित्रपटांचा प्रभाव अधिक दिसून येतो.
चित्रपट  ज्या ज्या टप्प्यांवर जेसी (इथन हाॅक) आणि सेलिन ( जुली डेल्पी) या (एव्हाना आपले मित्रच बनलेल्या) दोघांशी आपली भेट घडवतात ते सहजीवनाशी संबंधित महत्वाचे टप्पे आहेत. पहिली पूर्ण रोमँटीक भेट, दुसर््या भेटीत प्रेमाची पुनर्प्रचिती पण नात्यांवर हरवत चाललेला विश्वास,  तर तिसरा विवाहानंतर मुलं मोठी होण्याचा आणि प्रेमातला भर कमीअधिक होण्याचा काहीसा असुरक्षित काळ असे हे आपल्याला आजवर दिसलेले तीन टप्पे. तीनही टप्प्यांवरला केवळ एकच दिवस ( दुसर््या भागात, ' बिफोर सनसेट'मधे तर त्यातलेही  केवळ दोन तास)  दर भागात आपल्याला दिसतो. तो दिसतो तो मात्र अतिशय खरा. त्यातला एकही प्रसंग रचलेला वाटत नाही, त्यातलं नाट्य लेखकाने (इथे पहिला भाग वगळता लेखकही लिंकलेटर/हाॅक/डेल्पी हे त्रिकुटच) मुद्दाम घडवलेलं वाटत नाही, दिग्दर्शकाचं चातुर्य कुठेही लक्ष वेधत नाही, संवाद जुळवलेले वाटत नाहीत. आणि तरीही आपण या दोघांमधे पूर्णपणे गुंतून जातो. कसे? या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही स्पष्टीकरणापलीकडे आहे.
हे तीनही चित्रपट पाहाणार््यांच्या हे लक्षात आलं असेल, की प्रत्येक टप्प्यावर ही मालिका काही अधिक उंची गाठण्याचा, अधिक प्रगल्भ आशय मांडण्याचा प्रयत्न करते आहे. पहिला भाग जवळजवळ परीकथेसारखा़, त्यामुळेच अधिकाधिक प्रेक्षकाना आवडणारा. दुसरा भाग वास्तवाशी झगडणारा. त्यातला सेन्स आॅफ लाॅस आपल्यापर्यंत पोचणारा. त्यातलं वास्तव अधिक खरं. त्यातल्या संभाषणांना अधिक धार. तिसरा भाग त्याही पलीकडचा.
बीफोर मिडनाईटमधे रोमान्स हा किंचित मागे सरकलेला आणि त्याची जागा व्यवहाराने घेतलेली. त्याचा आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न, तिचे करीअरसंबंधी प्रश्न, दैनंदीन व्यवहारातले प्रश्न. या सगळ्यात प्रेम बाजूला पडलेलं. ते आहे, हे वेळोवेळी आपल्याला दिसतं, पण वाढत्या ,वेढून टाकणार््या वास्तवापुढे ते टिकेल का, अशी भीतीही वाटत राहाते.
मिडनाईटही आपला ठरलेला चतुर संभाषणांचा,न जाणवणार््या कॅमेराचा अन लांबचलांब चालणार््या शाॅट्सचा पॅटर्न पुढे चालू ठेवतो, मात्र इतर दोन चित्रपटांत नसलेली एक गोष्ट तो इथे करतो, आणि ती म्हणजे पूर्वार्धात इतरही बर््याच आणि हाॅक/ डेल्पीच्याच नैसर्गिकपणे काम करणार््या पात्रांनाही कथेत पेरतो. इथे जेसीला एका नावाजलेल्या लेखकाने ग्रीसमधे सुट्टीसाठी बोलावलय आणि लेखकाचा गोतावळाही बरोबर आहे. या सर्वांवर एकत्रित चित्रीत होणारा लन्चचा प्रसंग चित्रपटाचा हायलाईट म्हणण्यासारखा आहे.
चित्रपट सुरू होतो तो एअरपोर्टवर, जेसी आपल्या मुलाला सोडायला आलाय इथपासून. त्यानंतरच्या लांबचलांब ड्राईव्हमधल्या स्तब्ध कॅमेरासमोरल्या गप्पा आपल्याला आपण बीफोर मालिके़त असल्याचा आनंद देतात.  चित्रपटभरातल्या संभाषणांच्या, गप्पांच्या विषयांमधली जेसीच्या नव्या नाॅव्हेलपासून बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रेमसंबंधातल्या वापरापर्यंतची  आणि जुन्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट चित्रपटांपासून जेसी - सेलीनच्या पेटन्ट काल्पनिक संभाषणांपर्यंतची विविधता आपल्याला नेहमीप्रमाणेच खिळवून ठेवते. उत्तरार्धात जेसी आणि सेलिन रात्रीपुरते एका हाॅटेलवर जायला निघतात आणि चित्रपट आपल्या मुळच्या द्विपात्री रुटीनवर स्थिरावतो. संभाषणं अधिक पर्सनल होतात, विषय नुसते चमत्कृतीपूर्ण न राहाता रोजच्या आयुष्यावर येतात आणि सेलीन जेसीच्या वागण्यातला आजवर चित्रपटात न दिसणारा पैलू समोर येतो. उणीदुणी काढली जातात आणि या प्रेमाचं भविष्य काय, असेल का नाही हा विचार आपल्या डोक्यात आल्यावाचून राहात नाही.
आशयाच्या प्रगल्भतेबरोबर मिडनाईट  इथे आधीच्या चित्रपटांमधे नसलेली आणखी एक गोष्ट पेरतो, ती म्हणजे फिजिकल इन्टीमसीचं चित्रण. चित्रपटाच्या उत्तरार्धात एका मोठ्या प्रसंगात न्यूडिटी आहे आणि ती अशा प्रकारे येते, की सेन्साॅर बोर्डाला मनात आणलं तरी चित्रपटाचा परिणाम घालवल्याखेरीज काढता येऊ नये. या प्रसंगाबद्दल माझी दोन परस्परविरोधी मतं आहेत. केवळ चित्रपटांमधल्या प्रोग्रेशनचा विचार करायचा, तर प्रसंग अतिशय योग्य आहे. जितके यातले संभाषणांचे प्रसंग अस्सल, खरे वाटणारे आहेत त्याच प्रकारे इथली नग्नताही उगाच कलात्मक वगैरे न होता अतिशय कॅजुअल पध्दतीने येते. दोघं एकांतात एकमेकांबरोबर जशी , जेवढी कम्फर्टेबल असतील ,तशीच ती इथेही असतात. इथेही, प्रसंगाचा तोल हा संभाषणावरच नियंत्रित होतो, पण या व्यक्तिरेखांमधला मोकळेपणा , त्यांच्या पर्सनल अवकाशाचं चित्रण इथे पूर्ण होतं. मात्र असं असूनही, हा प्रसंग न्यूडिटी वगळून घेता आला असता, तर तो अधिक प्रेक्षकांपर्यंत पोचायला फायदा झाला असता हे नक्की. आपल्या सेन्साॅर बोर्डाला यातले कलानिकष वगैरे कळण्याची शक्यता शून्य आहे, त्यामुळे आशयाकडे दुर्लक्ष करुन केवळ दृश्यसंवेदनांवर आधारुन कात्री चालवणार््यांकडून हा चित्रपट पास होणं कठीण. आणि प्रसंग पुरता काढणंही अशक्यच. त्यामुळे बीफोर मिडनाईट आपल्याकडे प्रदर्शित होणार असल्याच्या अफवा उठत असल्या तरी तसं खरोखर होणं कठीण.
सहजीवनातल्या महत्वाच्या टप्प्यांचं दर्शन हे एकमेव सूत्र पाहिलं, तर बीफोर मालिकेत दोन महत्वाचे टप्पे बाकी आहेत. मुलं मोठी झाल्यानंतरचा टप्पा आणि प्रत्यक्ष वृध्दत्व. हे भाग प्लान्ड आहेत का हे माहित नाही, पण या चित्रपटांमागचं त्रिकूट जर शाबूत असेल तर त्यांचा विचार नक्कीच या चित्रपटांकडे परतेल. त्यांच्यातल्या एकाही जणाशिवाय मात्र पुढल्या भागांची कल्पनाही करता येऊ नये.
नाती टिकण्याची शाश्वती नसते हे आपण जाणतोच. मात्र आपण आणि ही मालिका यातलं नातं मात्र पुढली अनेक वर्षं टिकावं, असं मला मनापासून वाटतं.
- गणेश मतकरी.

2 comments:

मकरंद October 22, 2013 at 11:52 AM  

Me too waitng for thr next sequel. .
Hope they make one...

Gaurav Patki October 26, 2015 at 1:19 AM  

just watcged midnight, & As u said looking for the next part

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP