ग्रॅव्हिटी- व्यावसायिक आव्हान

>> Sunday, October 13, 2013



grav·i·ty   (grv-t)
n.
1. Physics
The natural force of attraction exerted by a celestial body, such as Earth, upon objects at or near its surface, tending to draw them toward the center of the body.
2. Grave consequence; seriousness or importance.
3. Solemnity or dignity of manner.
ग्रॅव्हिटी या शब्दाचा उघड आणि सर्वात सोपा अर्थ गुरुत्वाकर्षण असला, तरी त्याचे इतर अर्थही आपल्याला अपरिचित नाहीत. गांभीर्य, बिकट परिस्थिती सूचित करणारा हा शब्द आपण एरवीही आपल्या नकळत अनेकदा वापरत असतो. अर्थात, आपल्या बोलण्यात सुचवली जाणारी गंभीर परिस्थिती, ही 'ग्रॅव्हिटी' चित्रपटाच्या नायिकेपुढे उद्भवलेल्या परिस्थितीच्या जवळपासही पोचणारी नसते. अल्फोन्सो क्वारोन दिग्दर्शित 'ग्रॅव्हिटी' चित्रपटाचं नाव हे अतिशय चपखल आहे कारण ते या शब्दाचा प्रत्येकच अर्थ गृहीत धरतं.
एकपात्री चित्रपट आपल्याला नवे नसले, तरी तसे दुर्मिळ असतात. अर्थात जेव्हा मी एकपात्री म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ शब्दशः घेऊ नये, कारण चित्रपट माध्यमात तुम्हाला खासच प्रयोग करुन पाहायचा नसला, तर शब्दशः एकच पात्र वापरणं अनावश्यक ठरतं. मात्र कथा ही जरुर एकपात्री, एका व्यक्तिरेखेवर फोकस करणारी, प्रत्यक्ष पडद्यावर आणि आशयाच्या दृष्टीनेही त्या विशिष्ट पात्राला चित्रपटाच्या केंद्रस्थानी ठेवणारी असू शकते. याची चटकन आठवण्यासारखीही आणि हल्लीची अनेक उदाहरणं आहेत. तीही हाॅलिवुडमधून आलेली. मून, बरीड, १२७ अवर्स, १४०८, कास्ट अवे, कितीतरी. या सर्वांचं स्वरुप हे एका व्यक्तीचा परिस्थितीशी संघर्ष असं असलं, तरी या प्रत्येक चित्रपटात मांडलेली परिस्थिती, त्या प्रत्येकाचा अवाका आणि त्यांचा वैचारिक दृष्टीकोन यांमधे खूपच फरक आहे. ग्रॅव्हिटीची जात ही १२७ अवर्सच्या जवळ जाणारी आहे, पण त्याची तांत्रिक आणि दृश्य झेप ही वेगळ्याच वर्गात मोडणारी आहे.
आपली हाॅलिवुडबरोबर सतत तुलना सुरु असते. मात्र ती किती फोल आहे, हे ग्रॅव्हिटी सारखा एखादा चित्रपट आपल्या लक्षात आणून देतो. हॅरी पाॅटर मालिकेतल्या एका चित्रपटासारखा ( प्रिझनर आॅफ अझकाबान)तद्दन कमर्शिअल वळणाचा चित्रपट देऊ शकणारा क्वारोनसारखा दिग्दर्शक ( अर्थात त्याने ' इ तू मामा ताम्बिएन' सारखा महत्वाचा मेक्सिकन चित्रपट आणि 'चिल्ड्रन आॅफ मेन' सारखा गडद आॅरवेलिअन विज्ञानपट दिल्याचही लक्षात ठेवायला हवं) , सँड्रा बुलक आणि जाॅर्ज क्लूनी सारखे टाॅप स्टार्स , मनासारखं बजेट आणि थ्री डी फाॅरमॅट असताना नेहमीचा एखादा हमखास फाॅर्म्युला जवळ न करता या सार््यांनी ग्रॅव्हिटीसारखा चित्रपट बनवण्याचा घाट घालणं हे कौतुकास्पद आहे. त्यांना मिळणारं आर्थिक यश हे त्यांच्या कलात्मक यशाचं बायप्राेडक्ट आहे.
ढोबळमानाने पाहायचं तर ग्रॅव्हिटीचं कथानक साधंसं आहे. त्यात दाखवलेला अंतराळमोहिमांना असणारा धोका हा खरा वा कल्पित, अन त्यातल्या नायिकेचं साहस शक्य वा अशक्य कोटीतलं, यावर काही पंडितांचे वाद आहेत, मात्र त्याच्याशी आपल्याला घेणंदेणं नाही. खरोखर अशक्य वळणाच्या कल्पनेच्या भरार््या आपण सतत पाहातो, आणि अखेर हा चित्रपट आहे, डाॅक्यूमेन्टरी नाही, त्यामुळे एकदा चित्रपटाने आपली तार्किक चौकट मांडली की तो त्याबाहेर जात नाही ना, हेच आपल्यापुरतं महत्वाचं. ग्रॅव्हिटी त्याबाहेर जात नाही.
चित्रपटाची सुरुवात होते तीच एका अंतराळ मोहिमेवर. रायन स्टोन ( बुलक) यानाबाहेर कसल्यातरी टेस्ट करुन पाहातेय, तर मॅट कोवाल्स्की ( क्लूनी) हा यानाचा चालक आणि मोहीमेतला एक भारतीय सहकारीही स्पेसवाॅक करताहेत. मागे पसरलेली पृथ्वी . शांत अवकाश, लांबच लांब चालू राहीलेला शाॅट, मुक्तपणे सर्वत्र विहरणारा कॅमेरा, मॅटचे गंमतीदार संवाद याने बेसावध राहिलेल्या आपल्यालाही अंतराळवीरांसारखाच अचानक होणार््या अपघाताचा धक्का बसतो. बर््याच गुंतागुंतीच्या आणि उत्तम ग्राफिक्सनंतर गोष्टी स्थिरावतात तेव्हा यानाच्या चमूमधे रायन आणि मॅट हे दोघच जीवानिशी वाचलेले दिसतात. मात्र त्यांनाही या प्रसंगातून सुटायचं तर  एक लांब पल्ल्याचा प्रवास करणं  आवश्यक असतं, आणि अंगावरल्या, आॅक्सिजनचा साठा संपत आलेल्या स्पेस सूटापलीकडे कोणतीही सामग्री हाताशी नसते.
पटकथेची रचना ही एखाद््या प्रोसिजरल प्रमाणे आहे. अंतराळवीरांच्या कामाचा भाग, त्याच्यासमोरचे प्रोटोकाॅल, प्रवासाचे मार्ग,पृथ्वीवर परतण्याचे टप्पे, अपघातप्रसंगी वापरण्याच्या शक्यता या सार््याचा ती आढावा घेते. उघड ट्विस्ट्स टाळत, ती रायन समोरचा मार्ग तर्कशुध्द पध्दतीने उलगडत नेते. अडचण, त्यावर काढलेला मार्ग, सुटकेच्या दृष्टीने होणारी थोडी वाटचाल, पुन्हा नवी अडचण, हा फाॅरमॅट ग्रॅव्हिटी वापरताना दिसतो. मात्र त्याच्या त्याच्या मांडणीतला साधेपणा हा फसवा आहे. तो इतर वेगवेगळ्या मार्गांनी बॅलन्स केला जातो.
ते करण्याचा पहिला उघड मार्ग म्हणजे तपशील. त्याचं एकूण सादरीकरण इतक्या वास्तव अन अभ्यासपूर्ण  पध्दतीने करण्यात आलय, की बहुतेक प्रेक्षकांसाठी( खास करुन आय मॅक्स मधल्या प्रेक्षकांसाठी) हा प्रत्यक्ष अनुभवाइतपत खरा व्हावा. या प्रत्यक्ष अनुभवात भर पडते ती त्यात मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेल्या रायनच्या पाॅईन्ट आॅफ व्ह्यू शाॅट्सनी. कॅमेराची स्वैर हालचाल सहजपणे त्रयस्थ अन प्रथमपुरुषी अशा दोन्ही नजरांमधून आपल्यापुढे प्रसंग उलगडते. हे वास्तवचित्रण केवळ त्याच्या वैज्ञानिक अंगासाठी महत्वाचं ठरतं असं नाही, तर त्याच्या मानवी बाजूकडे पाहातानाही ते तितकच उपयोगाचं ठरतं. अपघाताच्या डेब्रीत तरंगणारी खेळणी , फोटोग्राफ्सचा वापर यांमधेही हीदृष्टी दिसून येते.
दुसरा मार्ग आहे तो व्यक्तिचित्रणाचा. प्रामुख्याने हे खोलात जाऊन केलं जातं ते रायनचं, तिची पार्श्वभूमी पण आपल्याला सांगितली जाते आणि तिच्यापुरता एक एक्झिस्टेन्शिअल प्रश्नही आपल्यापुढे उभा केला जातो. त्या प्रश्नाचा आणि तिच्या आपल्या आयुष्याकडे पाहाणार््या नजरेचा वेध घेणं हे पटकथेचं एक महत्वाचं काम आहे.
सामान्यतः मी कलावंतांबद्दल वेगळं लिहीणं टाळतो कारण याबद्दलची समज सर्वांनाच असते. इथेही सँड्रा बुलकचा परफाॅरमन्स तिच्या आजवरच्या कारकिर्दीतला सर्वोत्कृष्ट आहे हे बहुतेकांच्या लक्षात येईल. पण  अनेकजण असंही समजतील, की तिला चित्रपटाच्या मजबूत तांत्रिक बाजूची तिला मदत आहे. खरं तर हे उलट आहे. इथे तांत्रिक बाजूची अडचणच अधिक आहे. एक तर प्रत्यक्ष काम करताना सार््या पसार््याचं व्यवधान राखून समोर काही नसताना हिरव्या पडद्यासमोर किंवा आयसोलेशन टँकमधे तरंगत काम करायचं , बर््याचदा स्पेस सूट आणि हेल्मेटमागे लपून आपल्या भावना पोचवायच्या ,अनेक प्रसंगात सहकलाकार नसतानाही प्रसंग पुढे न्यायचे. हे सारं खूप कठीण आहे , आणि मुद्राभिनयापासून बाॅडी लँग्वेजपर्यंत अनेक बाबींचा विचार करत तिने हे करुन दाखवलय.
चित्रपटातल्या अंतराळाचा पसारा हा जसा प्रत्यक्ष दर्शन घडवणारा आहे तसाच सिम्बाॅलिकही आहे. त्यापुढे माणसांचं सर्व प्रकारे खुजं असणं दाखवून देणं हा दिग्दर्शकाच्या योजनेचा भाग आहे.' हिचहायकर्स गाईड टु द गॅलेक्सी' या विनोदी, परंतू अनेक वैज्ञानिक संकल्पनाना ताकदीने वापरणार््या कादंबरीमालिकेत ' टोटल परस्पेक्टिव व्होर्टेक्स' असं एक यंत्र आहे. या यंत्रात बसणार््या माणसाला दाखवलं जातं की विश्वाच्या तुलनेत त्या माणसाचं स्थान किती प्रचंड सूक्ष्म आणि इन्सिग्निफिकन्ट आहे ते. ते पाहाताच माणसाला इतका धक्का बसतो की त्याचं डोकंच ठिकाणावर राहात नाही. त्या यंत्रात बसलेल्या माणसाच्या मनाची काहीशी कल्पना आपल्याला ग्रॅव्हिटीमधल्या स्केलच्या वापरामधून येते. असं असूनही ग्रॅव्हिटी आपल्याला इनसिग्निफीकन्ट समजत नाही. उलट एक प्रकारे तो आपल्या असण्याला अर्थ देऊ पाहातो.
बर््याचदा चित्रपटातलं साउंड डिझाईन हे अदृश्य असतं. ते प्रथमदर्शनी, चित्रपटाच्या गोष्टीकडे लक्ष देताना जाणवत नाही. ग्रॅव्हिटीमधे अंतराळाच्या ध्वनीरहित स्थितीमुळे ते लक्षात येण्याची शक्यता वाढते. आवाज आणि शांतता यांचं प्रमाण, रेडिओ कम्युनिकेशन, ध्वनीमार्फत जवळजवळ संपूर्ण चित्रपटात अदृश्य पृथ्वीचा आणलेला संदर्भ अशा बर््याच गोष्टी इथे फार खोलात न जाताही दिसतात. आणि खोलात जायचं तर जेवढं एेकू तेवढं कमीच आहे.
व्यावसायिक चित्रपटांचा गेली अनेक वर्ष आपल्याकडे एक फाॅर्म्युला होऊन बसलाय. पुरेशी स्टार पाॅवर आणि पुरेसा पैसा असतानाही आपण काही वेगळं करु पाहात नाही. वेगळं करणारे लोक हल्ली आहेतही, मात्र त्यांच्या सेन्सिबिलीटीज अधिकतर समांतर चित्रपटाच्या मार्गाने जाणार््या आहेत. नवा विषय आणूनही, वेगळी मांडणी असूनही तद्दन व्यावसायिक दर्जाचा ,सर्वसामान्य प्रेक्षकाला आपला वाटेलसा चित्रपट आपण अजून करु शकत नाही. वर आपले अभ्यासकही हाॅलिवुडला शिव्या देण्याच्या तयारीत मात्र जरुर असतात.
ग्रॅव्हिटी सारखे प्रयत्न पाहिले की आपल्याला आपण नक्की कुठे कमी पडतोय ते दिसून येतं. आणि हाॅलिवुड मनात आलं तर काय करु शकतं हेदेखील.
-गणेश मतकरी.

2 comments:

Pratham October 15, 2013 at 1:21 AM  

I think that survival and hope are major themes present in Curon's films (I've seen only 3 so far).
In CoM, it is for survival of human race and in HP3, for survival for preserving innocence in face of injustice, harsh truth and Dementors.

आनंद पत्रे January 2, 2014 at 9:14 AM  

Saw Gravity today.. it was awesome and as usual after reading your article understood it even better :) ... I although didn't liked a scene where a drop of water splashes on screen (after a bump on camera) just to show 3D effect.. here camera should be non existent.. is that it or director may have some other things in his mind ?

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP