चित्रपटाची कथनशैली- एक टिपण
>> Tuesday, March 25, 2014
हा या ब्लाॅगवरचा टिपिकल लेख नाही. किंबहुना, तसं पाहिलं तर हा मुळात लेखच नाही, हे आहे एक टिपण. गेल्या महिन्यात मी आणि माझ्या काही मित्र मंडळीनी ठरवलं, की स्टडी ग्रुपसारखं, महिन्यातून एकदा नियमितपणे भेटायचं आणि चित्रपटाविषयी इन्फाॅर्मल चर्चा करायची. कधी काही विशिष्ट चित्रपटांविषयी, कधी चित्रपटरचनेमागच्या घटकांविषयी, तर कधी त्याहूनही जनरस. चर्चेसंबंधात चित्रपटातले काही भाग दाखवायचे, कोणी प्रेझेन्टेशन्स करायची, काही मटेरिअल सर्क्युलेट करायचं, वगैरे.
गेल्या वेळी आम्ही भेटलो तेव्हा जे बोललो, त्यातल्या मुद्द्यांचा, हा गोषवारा. ( हे मुद्दे जरी परिचित असले, तरी टिपण काढण्यासाठी मी संदर्भ म्हणून मी फिल्म: ए क्रिटिकल इन्ट्रोडक्शन या मारीआ प्रामागिओर आणि टाॅम वाॅलिस यांच्या पुस्तकातलं 'नॅरेटीव फाॅर्म' प्रकरण वापरलय, पण टिपण हे भाषांतर नाही)
चित्रपटासंबंधात आणि एकूणच कथाप्रधान माध्यमांमधे विचार करण्याचा अतिशय मूलभूत स्वरुपाचा मुद्दा म्हणजे निवेदन, गोष्ट सांगण्याची पध्दत/ रचना , अर्थात कथनशैली. किंवा दुसर््या शब्दात सांगायचं तर पटकथेमागची भूमिका. गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोचवताना सर्वात स्पष्टपणे ती कशी पोचू शकेल आणि ती पोचताना काय पध्दतीने मांडली तर चित्रकर्त्यांना हवा तो परिणाम अचूक मिळेल, याचा विचार म्हणजेच कथनशैलीचा विचार. या शैलीने कथेतल्या महत्वाच्या टप्प्यांकडे तर लक्ष पुरवलंच पाहिजे, मात्र तेवढंच नाही. कथानकाचा एकूण आलेख, त्यातले अपेक्षित चढउतार, व्यक्तिरेखांचे तपशील आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात कथेनुसार येणारं ( वा नं येणारं) परिवर्तन, आशयाच्या थेट वा प्रतीकात्मक पातळ्या आणि या सगळ्याच्या एकत्र येण्यामधून थीम किंवा चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली कल्पना प्रेक्षकांपर्यंत पोचणं हा एकूण नॅरेटीवचा अवाका असतो. अखेर सर्वाधिक महत्व आहे ते ही कल्पना पोचण्याला, इतर बाबी कमीजास्त झाल्या तर हरकत नाही.
मागे मी हिचकाॅकने दिलेलं एक व्याख्यान वाचलं होतं. त्यात ही थीम पोचवण्याबाबत त्याने एक छान उदाहरण दिलं होतं. त्याने आपण काय प्रकारे पटकथा बनवतो ती प्रक्रिया खूप खोलात जाऊन सांगितली होती. तिची सुरुवात होती असं एक वाक्य ठरवण्यापासून, जे चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना अचूक मांडेल. त्यानंतर मग इतर गोष्टींची भर. या कल्पनेचा विस्तार, व्यक्तिरेखा ठरवणं, मुख्य घटना/ प्रसंगांची योजना, संवाद वगैरे. पुढे मग निर्मिती. नटसंचाची निवड , छायाचित्रण, संकलन , इत्यादी. त्याचं म्हणणं होतं, की या सार््या भल्या मोठ्या प्रक्रियेतून गेलेल्या या चित्रपटाविषयी जर कोणी तो पाहिलेल्या प्रेक्षकाला विचारलं, तर तो जे वाक्य सांगेल, ते त्या प्रक्रियेच्या सुरुवातीला घेतलेल्या वाक्याशी तंतोतंत जुळणं, हे आवश्यक, असं झालं तरच तो चित्रपट मूळ कल्पनेला न्याय देऊ शकला असं म्हणता येईल. ही मूळ कल्पना, हा कथनशैलीचा महत्वाचा भाग. पटकथेला , चित्रपटीय कथारचनेला दिशा देणारा.
अर्थात, हे सारं झालं संकल्पनेच्या पातळीवर. प्रत्यक्षात नॅरेटीव म्हणजे काय, तर एकामागून एक घडणार््या , विशिष्ट कालावधी आणि अवकाश यांच्याशी जोडलेल्या, काळजीपूर्वक आखलेली रचना असणार््या घटनांची, प्रसंगाची मालिका. ही रचना तर्कशुध्द हवी, प्रसंग अमुकच का? ते घडण्यामागे अन विशिष्ट पध्दतीने घडण्यामागची कारणं काय असावीत? याचा विचार अत्यावश्यक. टाळता नं येण्यासारखा. बहुधा ही कथानकं मानवी जीवनाशी, प्रेक्षक समरस होऊ शकेल अशा व्यक्तीरेखांशी जोडलेली असतात, त्यामुळे या व्यक्तीरेखांचा प्रवास, त्यांच्यात होणारे बदल, त्यांनी आखलेल्या योजना आणि चित्रपटाच्या अखेरीला त्यांचं यशस्वी होणं (वा नं होणं), त्यांच्या मार्गात येणार््या अडचणी, संघर्ष या सार््याला कथानकात आपसूकच महत्व येतं, जे चित्रपटाची रचना, मांडणी ठरवताना लक्षात घ्यावं लागतं.
टाॅडोरोव या रशियन चित्रपट अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्य परिस्थितीत येणारा अडथळा आणि ती बदलून जाणं , हे सर्वच ( किंवा बहुतेक सर्व म्हणू हवं तर) चित्रपटांच्या मुळाशी असतं. त्यामुळे शेवटी परिस्थिती 'जैसे थे' करणं, ही या कथानकांसाठी अत्यावश्यक बाब बनते. ते होण्यासाठी आवश्यक तो घटनाक्रम म्हणा, पात्र म्हणा, पात्रांचे दृष्टीकोन म्हणा, यांच्या वापरातून चित्रपटाची रचना आपोआपच आकाराला येते. अर्थात परिस्थिती पूर्वीसारखी करणं याचा अर्थ लिटरली घेऊ नये, ते साध्य वेगवेगळ्या पध्दतीने आणि आशयाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर होऊ शकतं.
याची उदाहरणं मुबलक आहेत, उदाहरणार्थ, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'क्वीन' चित्रपटाची सुरुवात, रानीचं ठरलेलं लग्न मोडल्याने होते. मात्र कथानकाच्या मांडणीच्या दृष्टीकोनातून महत्वाचा अडथळा लग्नं मोडणं हा नसून, यामुळे रानीचं आत्मविश्वास हरवून बसणं हा आहे. त्यामुळे तो परत येणं, हे या निवेदनाला पुढे नेणारं सूत्र आहे. जर लग्न मोडणं आणि जुळणं यावर कथानकाचा भर असता, तर केवळ कथानकाची रचनाच बदलली नसती, तर यातली विजयची व्यक्तिरेखाही वेगळ्या पध्दतीने रंगवण्यात आली असती.
आता कथानकाचं सूत्र आणि दिशा ठरली की त्याचा ढोबळ आराखडा स्पष्ट होतो, प्रमुख व्यक्तिरेखाही ठरतात, तरीही गोष्ट पुढे नेताना अनेक पटकथा रचना अधिक सखोल करु शकतात. आत्ताच उल्लेख केलेल्या क्वीनकडे आपण त्यामानाने सोपी सरळसोट पटकथा म्हणून पाहू शकतो. ( त्यात गैर काहीच नाही, हा पटकथाकार आणि दिग्दर्शकाच्या निवडीचा प्रश्न आहे.) ती गोष्ट रानीची आहे आणि तिचीच राहाते. यात इतर अनेक पात्र येतात, पण त्यांना स्वतंत्रपणे फार महत्व नाही, जे आहे, ते राणीशी असणारं त्यांचं कनेक्शन हेच. त्यामुळे पटकथा त्यांच्यावर रेंगाळत नाही, त्यांना स्वतंत्रपणे महत्व देत नाही. याउलट काही पटकथा या प्राथमिक गोष्ट ठरुनही ,अनेक उपसूत्र तयार करतात आणि स्वतंत्रपणे या उपसूत्रांना वेगळा ग्राफ देऊ शकतात. उदाहरणार्थ , पीटर जॅक्सनच्या ' लाॅर्ड आॅफ द रिंग्ज' मालिकेत माउंट डूमच्या ज्वालामुखींत टाकून शक्तीशाली अंगठीचा नाश करणं, ही मुळातली गोष्ट म्हंटली, तरी त्या कामगिरीवर निघालेल्या चमूतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेची कहाणी ही स्वतंत्र उपकथानकं आहेत. या सार््या कथानकांना स्वतंत्रपणे न्याय दिला जातो आणि या चित्रपटाचा परिणाम हा या गुंतागुंतीच्या रचनेमुळे अधिक प्रगल्भ होतो. मात्र अशा चित्रपटात मध्यवर्ती कथानक आणि उपकथानकं यांचा तोल हा महत्वाचा असतो. तो सुटला तरी परीणामात घट होण्याचीही तितकीच शक्यता असते.
चित्रपट हा आपली चित्रपटापुरती कथा साधारणपणे दीड ते तीन तासात सांगतो, मात्र हा झाला प्रत्यक्ष चित्रपटाचा कालावधी, त्यात सांगितलेल्या कथानकाचा काळ हा त्याहून कितीतरी मोठा , काही तासांपासून ते अनेक वर्ष व्यापणाराही असू शकतो. ( अपवाद अर्थातच 'निक आॅफ टाईम' सारख्या रिअल टाईम चित्रपटांचा, ज्यांचा पडद्यावरला कालावधी आणि कथानकाचा कालावधी हा एकच आहे. अर्थात रिअल टाईम चित्रपटही त्या दोनतीन तासांपलीकडे जाणार््या मोठ्या कथेचा भाग असू शकतातच. उदाहरणार्थ लिंकलेटरच्या 'बीफोर' चित्रत्रयीचा मधला भाग 'बीफोर सनसेट' हा असाच रिअल टाईम आहे.पॅरीसमधे बुक सायनिंग टूरनिमित्त आलेल्या नायकाला विमानतळावर जायला निघण्यासाठी जो थोडा वेळ उरलेला आहे, त्यात तो घडतो. मात्र त्याची कथा ही बीफोर सनराईज पासून सुरु झालेली आहे. हा चित्रपट घडण्याआधी नऊ दहा वर्षं !) हा मोठा कालावधी मर्यादित वेळात बसवायचा, तर चित्रकर्त्यांना कथेतले महत्वाचे प्रसंग निवडून उरलेला भाग गाळावा लागतो. काय गाळलं जातं आणि काय मांडलं जातं यावर चित्रपटांचा फोकस ठरतो.
अनएडीटेड मोठी कथा आणि चित्रपटासाठी केलेली त्याची संक्षिप्त आवृत्ती, याला अनुक्रमे फॅब्युला आणि सुझेत असे शब्दप्रयोग आहेत. कठीण वाटले तर तत्काळ विसरुन जा, कारण ते शब्द महत्वाचे नाहीत तर महत्व आहे ते, ते काय सुचवतात याला. यालाच सोपे परिचित शब्द वापरायचे तर कथा आणि प्लाॅट असे वापरता येतील. प्लाॅट हा कथेवर आधारलेला असतो मात्र सरसकट सगळी गोष्ट म्हणजे प्लाॅट नव्हे. डाऊनफाॅल हा चित्रपट हिटलरच्या अखेरच्या दहा दिवसांवर आधारित आहे. या कथेत हिटलरची पूर्ण कारकिर्द गृहीत धरलेली आहे . केवळ सत्तेचा शेवट म्हंटलं तर तो केवळ या दहा दिवसातला नाही, आधीपासून त्याची सुरुवात आहे. मात्र आराखडा, प्लाॅट म्हणून चित्रपट मांडतो ते हेच शेवटचे दिवस. याएेवजी दिग्दर्शकाने मांडणीचं वेगळं सूत्र पकडलं असतं तर हा वेगळा चित्रपट झाला असता.
आता एक लक्षात घ्यायला हवं की केवळ प्रसंग गाळून संक्षेप करणं म्हणजे प्लाॅट नाही, तर अनेकदा उरलेल्या घटना काय पध्दतीने मांडल्या जातात याला खूप महत्व येतं. आॅर्सन वेल्सच्या सिटिझन केन चित्रपटाची सुरुवात केनच्या मृत्यूने होते, मग त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या ( आणि पब्लिक नाॅलेज असलेल्या) घटनांचा धावता आढावा न्यूजरीलमार्फत घेतला जातो. यानंतर जेव्हा एक वार्ताहर केनने मृत्यूसमयी उच्चारलेल्या 'रोजबड' शब्दामागचा अर्थ शोधायला लागतो तेव्हा कथा नव्या क्रमाने आणि वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून उलगडते. कधी एक प्रसंग अनेकदा सांगितला जातो, तर काही प्रसंग पूर्ण गाळले जातात. वेल्सने केलेली ही प्रसंगांची निवड आणि रचना या चित्रपटाचा प्लाॅट ठरवते. या चित्रपटाला काय सांगायचंय ते आपल्याला सरळसोट गोष्टीने कळलच नसतं. ते कळतं, या विशिष्ट रचनेमुळे. केनप्रमाणेच रचनेला अतिशय महत्व असणारी इतरही उदाहरणं आहेत. कुरोसावाचा राशोमाॅन, टायक्वरचा रन लोला रन, किंवा बेनेगलांचा ' सूरज का सातवाँ घोडा' ही त्यातली काही.
सामान्यत: नॅरेटीवचे तीन भाग, तीन अंक असल्याचं मानलं जातं. सुरुवात ( सेट अप किंवा एक्स्पोझिशन) मध्य ( काॅनफ्लिक्ट/ संघर्ष)आणि शेवट ( रेझोल्यूशन). अॅरीस्टाॅटलच्या काव्यशास्त्रापासून ही परिचित रचना आपण पाहातो आहोत. चित्रपट अभ्यासक क्रिस्टीन थाॅम्सन यांनी या रचनेत एक बदल सुचवून त्याची विभागणी चार अंकात केली आहे. त्यांनी हा बदल खासकरुन हाॅलिवुड चित्रपटांची रचना अभ्यासून सुचवला आहे, पण बाॅलिवुडसाठीही तो योग्य आहे. त्यांनी मध्यावर , म्हणजे आपल्या परंपरागत मध्यांतराच्याच जागी उत्कर्षबिंदू आणून मधला अंक तोडला आहे. त्यामुळे मधल्या अंकाचे 'उत्कर्षबिंदूकडे जाणारा' आणि 'क्लायमॅक्सकडे जाणारा' असे दोन भाग पडतात.
एकदा का आपण संघर्षापर्यंत आलो की चित्रपट नेहमीच अधिक रंगतात, पण खरा कठीण असतो तो पहिला अंक, ज्याने प्रेक्षकांना कथेत गुंतवावं अशी अपेक्षा असते. एकदा का तो गुंतला, की पुढली कामगिरी त्यामानाने सरळ असते. हा सुरुवातीचा भाग चित्रपट आपापल्या जातकुळीप्रमाणे वेगवेगळ्या पध्दतीने हाताळतात. '१२ इअर्स ए स्लेव' सारखे कथाप्रधान चित्रपट त्यातल्या परिस्थितीवर आणि घटनांच्या दिशेवर फोकस करतात, ' क्वीन' सारखे व्यक्तीप्रधान चित्रपट त्या व्यक्तीच्या स्वभावाचे कंगोरे मांडण्यावर फोकस ठेवतात, तर ' मेमेन्टो' सारखे गुंतागुंतीची रचना असणारे चित्रपट प्रेक्षकाला पॅटर्न लक्षात येईल अशा पध्दतीची मांडणी करतात. दृष्टीकोन भिन्न असला तरी हा सारा सेट अपचाच भाग.
कथनशैलीचे काही लोकप्रिय संकेतांवर आधारलेले प्रकार आहेत, जे तीन अंकी रचनोला क्वचित छेद देताना दिसतात. त्यातलेच काही प्रकार याप्रमाणे.
१. टु पार्ट स्ट्रक्चर किंवा दोन अंकात विभागणी - या चित्रपटांतल्या घटना स्पष्टपणे दोन तटात विभागल्या जातात. यांमधे अनेकदा लिंक असते, मात्र दर भागाचा आलेख स्वतंत्र असतो. कुब्रिक चा ' फुल मेटल जॅकेट' असा ट्रेनिंग कॅम्प आणि रणभूमी यात स्पष्ट विभागला जातो.
२. फ्रेमिंग डिव्हाईस- यात मूळ कथानकाला अधिक गहिरा अर्थ देण्यासाठी एका वेगळ्या कथेची चौकट लावली जाते. ही फ्रेम अनेकदा सेट अप सारखी वापरली जाते आणि मुख्य घटना या फ्रेममधल्या व्यक्तींनी केलेलं निवेदन, या दृष्टीकोनातून मांडल्या जातात. मूळ घटनांना मनोरुग्णाचं निवेदन म्हणून उलटा अर्थ देणारा ' कॅबिनेट आॅफ डाॅ कॅलिगरी' किंवा माणुसकीबद्दल प्रगल्भ विचार मांडणारी ' राशोमाॅन' मधली फ्रेम ही याची चांगली उदाहरणं.
३. अनरिलाएबल नॅरेशन- यातली निवेदकाची भूमिका हीच मुळात फसवी असते, त्यामुळे घटनांबद्दल प्रेक्षकाला सांगितलं जातं ते, आणि सत्य या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं हे चित्रपट मांडतात. संपूर्ण चित्रपटालाच संशयास्पद ठरवणारा' द युज्वल सस्पेक्ट्स' हे याचं टोकाचं उदाहरण, पण स्टीवन किंगच्या दिर्घकथेवर आधारलेल्या सीक्रेट विंडो सारखे काही चांगले मध्यममार्गी चित्रपटही आहेत.
४. एपिसोडीक चित्रपट- हे चित्रपट एखाददुसर््या उत्कर्षबिंदूशी जोडलेलं एकच एक कथानक सांगत नाहीत. यात सुटी सुटी प्रकरणं असतात ज्यांना अनेकदा म्हणावी अशी गोष्ट नसते. 'पथेर पंचाली' किंवा '४०० ब्लोज' सारखे ते एकेका व्यक्तीच्या आयुष्याशी जोडलेले असू शकतात, किंवा लिन्कलेटरच्या ' स्लॅकर' किंवा ' वेकिंग लाईफ ' सारखी ती विविध व्यक्तींबरोबरच्या संभाषणांची मालिकाही असू शकते. .
हे सारे प्रकार हे तीन/चार अंकी रचनेला पर्याय म्हणून अस्तित्वात आले असले तरी या प्रत्येक प्रकारात मुबलक चित्रपट आहेत. हे एखाद दुसर््या चित्रपटांपुरते मर्यादित प्रकार नाहीत.
साहित्य आणि चित्रपट ही दोन्ही माध्यमं कथा संागण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात आणि अनेकदा यातल्या एका माध्यमात लोकप्रिय ठरलेली कलाकृती दुसर््या माध्यमात वापरली गेल्याचं आपल्याला दिसतं. अशा वेळी कथनशैली बरोबरच निवेदकाची भूमिका हा विषय महत्वाचा ठरतो. साहित्यात फस्ट पर्सन किंवा थर्ड पर्सन आॅम्निशन्ट हे निवेदनाचे दोन मूलभूत प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात निवेदक हे कथेतलंच पात्र असतं आणि ते कथा त्याच्या दृष्टीकोनातून झाली तशी सांगतं. दुसर््या प्रकारातला निवेदक कथाबाह्य असतो, आणि त्याच्या नजरेतून काही लपत नाही. तो सोयीस्करपणे विविध पात्रांच्या जवळ जाऊ शकतो आणि त्याला योग्य वाटेल त्या पध्दतीने तो कथा पुढे नेतो.
चित्रपट हे बहुधा यातल्या कुठल्याच एका निवेदनशैलीला वापरु शकत नाहीत. रेमन्ड चॅन्डलरच्या कादंबरीवर आधारीत 'लेडी इन द लेक' हा अतिशय क्वचित वापरल्या जाणार््या प्रथमपुरुषी निवेदनाचं उदाहरण आहे ज्यात कॅमेरा प्रत्यक्ष निवेदकाची जागा घेऊन कथा सांगतो. या प्रकाराला खूप मर्यादा पडतात आणि थोड्या वेळाने कंटाळा यायला लागतो. हल्लीची या जातीची उदाहरणं म्हणजे 'ब्लेअर विच प्रोजेक्ट' नंतर आलेल्या 'रेक' किंवा ' पॅरानाॅर्मल अॅक्टिविटी' सारखे चित्रपट ज्यांमधे कॅमेरा हेच पात्र बनतं. या निवेदनाला प्रथम पुरुषी म्हणता येईल, पण ते साहित्यातल्या निवेदनापेक्षा थोडं वेगळं. अलीकडच्या काळात कन्सोल गेमिंग मधलं कथन हे बरचसं प्रथम पुरुषी आणि चित्रपटांच्या जवळ जवळ जाणारं झालं आहे. त्यांमधे दिसणारं सोफिस्टीकेटेड कथन पाहाता त्यांना खरं तर चित्रपटांचेच हायब्रीड मानावे लागतील.
तरीही, पारंपारिक चित्रपटात निवेदन हे बहुधा काही पात्रांना प्राधान्य देणारं आणि त्यांच्या आजूबाजूला चित्रपट घडवणारं असतं. हे साहित्यासारखं खरंखुरं निवेदन नाही पण त्या पात्रांना केंद्रस्थानी ठेवत असल्याने याला रिस्ट्रिक्टेड नॅरेशन म्हणता येतं. क्वचित हे चित्रपट सर्वज्ञानी भूमिका घेऊन पात्रांना माहीत नसलेल्या गोष्टीही प्रेक्षकांच्या सोयीसाठी आपल्यापर्यंत पोचवतात , उदाहरणार्थ केनच्या रोजबडचं गुपित ते शोधणार््या वार्ताहराला कळत नाही, पण दिग्दर्शक ते आपल्याला दाखवतो.मात्र हे क्षण क्वचित येणारे असतात.
चित्रपटाची कथनशैली ज्यांवर अवलंबून असते, त्यातले हे काही घटक. यात सारंच आल्याचा दावा मी करणार नाही, किंबहुना सांगितलय त्याहून कितीतरी अधिक बाकी आहे असंच म्हणेन. पण कथनशैली या गुंगवणार््या विषयाची, त्यातल्या काही भागाची ही एक झलक , असं आपण म्हणू शकतो.
- ganesh matkari
5 comments:
हे टिपण खरोखर फर सुंदर पद्ध्तीने लिहिलं आहे. अभ्यासपूर्ण असूनही कुठेही बोजड भाषा न वापरल्यामुळे वाच्नीय आणि माहितीपूर्ण झालंय. हॉलिवुड आणि बॉलिवुडचे संदर्भ दिल्यामुळे वाचकाला अहजतेने सम्जायला मदत होते. पटकथा लेखकाला प्रेक्षकाचं मन सम्जून घेण्यासाठी काय करायला पाहिजे याचा उत्तम अंदाज येतो.
सुनील सुळे
Fabula आणि Suzet हे साहित्यातले दोन शब्द आणि संकल्पना चित्रपटात सुद्धा वापरतात हे माहित नव्हते. साहित्य समीक्षेत त्यांना Russian Formalism मुळे खूपच महत्व आले आहे.
कथनशैली कशी असावी याचा पूर्ण अधिकार पटकथाकार आणि दिग्दर्शकाला असेल तर कधी-कधी ते किती घातक ठरते हे यशवंतराव चव्हाणमध्ये आपण बघितलेच आहे. तसेच क्वीनमध्ये ते पूर्णपणे चित्रपटाच्या फेव्हरमध्ये म्हणजेच पटकथाकार आणि दिग्दर्शकाची मुल्यदृष्टी विषयाला न्याय द्यायला योग्य असायला हवी असे म्हणणे चूक ठरणार नाही कदाचित.
अतिशय अप्रतिम लेख आहे हा. अत्यंत सोप्या शब्दात आणि प्रत्येक वाक्यागणिक काहीतरी नवीन देत जाणारा लेख. इतक्या नेमक्या शब्दात विश्लेषण करणारे विशेषतः सिनेमासंबंधीचे फार कमी लेख मराठीत वाचायला मिळतात.
कथनशैली हा खरोखरच अतिशय गुंगवणारा विषय आहे. तुम्ही पुस्तकातल्या ज्या प्रकरणाचा संदर्भ दिला आहे ते मी अलीकडेच वाचल होत. परंतु ते वाचल्या नंतर इतर अनेक गोष्टी समजल्या तरी 'कथनशैली' ह्या संकल्पने बाबत पुरेशी सुस्पष्टता आली नव्हती. तुम्ही तुमच्या टिपणाच्या सुरुवातीलाच ती सरळपणे उलगडून मांडल्यामुळे आता त्याचा नेमका अर्थ लक्षात आला. विषयावरची पकड, मुद्देसूद दिलेली माहिती, वेगवेगळी उदाहरणं, आणि सोपी भाषा ह्यामुळे तुमची मांडणी फार आवडली. ह्या गोष्टींबद्दल आधी वाचलं होत पण तुमच्या लेखामुळे त्या आता अधिक चांगल्या समजल्या. ह्या प्रकारच तुमच आणखी लिखाण इथे वाचायला मिळाल तर नक्की आवडेल.
thanks all
Post a Comment