हैदर- अस्वस्थ व्हा !

>> Saturday, October 4, 2014



दर्जातलं सातत्य, या एका पातळीवर पाहायचं, तरी विशाल भारद्वाजची शेक्सपिअर चित्रत्रयी थक्क करुन सोडणारी आहे. शेक्सपिअरमधे मुळात व्यावसायिक वळणाचं नाट्य पुरेपूर असलं, तरी तो रुपांतरीत करायला सोपा अजिबातच नाही. त्याच्या नाटकांमधले तपशील, रचनेचे बारकावे, व्यक्तित्रणावरची हुकूमत आणि त्याच्या शोकांतिकांमधे अधिक जाणवणारी, पण सर्वच नाटकात असणारी गुंतवून ठेवणारी कथनशैली या सगळ्याला न्याय देणं सोपं नाही. आॅर्सन वेल्स पासून राल्फ फाईन्स पर्यंत आणि सर लाॅरेन्स आॅलिविएपासून इथन हाॅकपर्यंत  जगभरातल्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी आणि नटांनी आजवर नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमधे शेक्सपिअर समर्थपणे उभा केला आहे. विशाल भारद्वाजचे मकबूल, ओंकारा आणि आता हैदर हे मॅकबेथ, आॅथेल्लो आणि हॅम्लेट या तीन सुप्रसिध्द शोकांतिकांची रुपांतरं मांडणारे चित्रपट, या चांगल्या रुपांतरांत सहजच घेता येतील.
सध्याच्या नव्या हिंदी सिनेमातलं भारद्वाज हे अपवादात्मक नाव आहे.या मंडळींमधल्या बहुतेकांचा हेतू हा काहीशा व्यक्तीगत, गंभीर पण मिनिमल स्वरुपाच्या गोष्टी सांगण्याचा आहे. याऊलट भारद्वाजचे चित्रपट भव्य आणि अभिजात वळणाचे असून प्रयाेगशीलदेखील आहेत. मोठे स्टार्स, नाट्यपूर्ण कथानकं, वादग्रस्त विषय असं सारं असूनही ते कधीही व्यावसायिकतेला वाहिलेले दिसत नाहीत. कलाकृतीचा विचार प्रथम आणि आस्वादकाचा दुय्यम असा या खऱ्या कलावंताचा दृष्टीकोन आहे.
जर भारद्वाजच्या चित्रत्रयीत दर्जात्मक क्रम लावायचा तर मी हैदरला इतर दोन चित्रपटांच्या मधे ठेवेन. ओंकाराचा नंबर सर्वात वर लावीन. याला उघड कारण रसास्वादाची क्षमता हे आहे. ओंकारा ही आॅथेल्लोचं यथार्थ रुपांतर तर होताच वर तो सर्वांना सरसकट आवडेलसा व्यावसायिक चित्रपट होता. गाणी म्हणा, परिचित रुपातले आवडणारे परफाॅर्मन्स, सैफची ( त्याला भलता आत्मविश्वास देऊन गेलेली ) नकारात्मक भूमिका असे सर्वसामान्य प्रेक्षकाला आवडतीलसे घटक असूनही ते उत्तम रुपांतर होतं. इतर दोघांचं वळण हे तितकं व्यावसायिक नाही. हैदर बाबत बोलायचं तर त्याचं काहीसं अव्यावसायिक असणं हे हॅम्लेटशीच जोडलेलं आहे. हॅम्लेट करायला तितका सोपा नाही कारण मुळात ही तशी पॅसिव्ह व्यक्तिरेखा आहे. तो नायक आहे, भला माणूस आहे, पण स्वत:हून तो काही करु पहात नाही. कोणीतरी सांगणं, परिस्थितीने नाईलाज करणं या गोष्टी त्याला काही करायला भाग पाडतात. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष घटनांपेक्षा मानसिक द्वंद्व हा इथला महत्वाचा भाग आहे. आपल्याकडल्या नायकांना सामान्यत: प्रोअॅक्टीव गोष्टी जमतात आणि प्रेक्षकांनाही तीच अपेक्षा असते. नायकाने चार लोकाना बडवून काढलं की आपण खूष होतो. तो आपल्या कृतीच्या योग्यायोग्यतेचा विचार करायला लागणं आपल्याला झेपत नाही. त्यामुळे हैदरचं खरं आव्हान आहे ते हा असा ( टोकाचा) विचारी नायक आपल्यापुढे शक्य तितक्या प्रामाणिकपणे आणणं हे.

दुसरं, आणि तितकच मोठं आव्हान आहे ते विशाल भारद्वाजने निवडलेली गडद पार्श्वभूमी. नव्वदच्या दशकातलं काश्मीर आणि त्याची दुभंगलेली अवस्था ही शक्य तितकी खरी उतरवण्यासाठी भारद्वाजने पत्रकार पीर यांची मदत घेऊन शक्य तितकं अस्सल चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीचा विशेष हा, की ती हैदरच्या मनातल्या गोंधळाला एक वेगळा पैलू देते. काश्मीरच्या जनतेचं कोण आपला नं कोण परका या गोंधळात अडकणं, हे हैदरच्या आपल्याच लोकांनी केलेल्या विश्वासघाताचं आणखी एक रुप ठरतं आणि चित्रपटाचा आशय विस्तारतो.
हैदरची गोष्ट बहुतेकाना परिचित असावी, अर्थात हॅम्लेट माहीत असल्यास. इथला हैदर ( शाहीद कपूर) आपल्या दहशतीच्या छायेतल्या गावी परततो तेव्हा त्याला कळतं की त्याच्या डाॅक्टर वडिलांना दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन भारतीय सेनेने पकडून नेलय. अशातच तो आपल्या आईला ( तबू ) काकाबरोबर ( के के ) नको इतक्या जवळकीने वागताना पाहातो आणि विश्वासघाताच्या जाणीवेने त्रस्त होतो. वेडापिसा होऊन आपल्या वडिलांचा शोध घेणाऱ्या हैदरला  आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या ( श्रध्दा कपूर , त्यातल्यात्यात बेताचा अभिनय) मार्फत एक निरोप मिळतो आणि पित्याच्या मृत्यूला काका कारणीभूत असल्याचं लक्षात येतं. सूडाच्या भावनेने पेटलेला हैदर बदला तर घ्यायचं ठरवतो, पण त्याची मनोवस्थाच त्याला दगा देणार अशी चिन्ह दिसायला लागतात.
हॅम्लेटचं नाव जगातल्या अशा मोजक्या क्लासिक्समधे घेता येईल ज्यांचे अनेक तपशील, ती न वाचणाऱ्या पहाणाऱ्यांनाही माहीत आहेत. रुपांतरांमधून, वेळोवेळी इतरांनी वापरलेल्या संदर्भांमधून आणि एकूण लोकप्रियतेमधून ती सर्वांपर्यंत पोचलेली आहे. ' टु बी आॅर नाॅट टु बी' हे स्वगत आणि हॅम्लेटची हातात कवटी धरलेली मूर्ती तर प्रसिध्द आहेच, वर त्यातला नाटकाचा प्रसंग, हॅम्लेटच्या बापाचं भूत अशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत. यातल्या बहुतेक गोष्टी, चित्रपटाचा वास्तव पार्श्वभूमीचा धागा शाबूत ठेवत आणण्याचा यशस्वी प्रयत्न लेखन/ दिग्दर्शनात दिसतो. बापाच्या भूतासाठी काढलेली पळवाट तर फारच जमलेली आहे आणि प्रथमदर्शनी तिने दचकवलं तरी पुढे ती अधिकाधिक योग्य वाटत जाते. नाटकाची जागा घेणारं 'बिस्मिल' हे गाणं बाॅलिवुड परंपरेत चपखल बसतं हा त्याचा विशेष आहे तसंच मर्यादाही. विशेष अशासाठी , की गाणं आणि सादरीकरण दोन्हीतही ते उत्तम आहे आणि मूळ प्रसंगाचा परिणाम ते साधू शकतं. मर्यादा अशासाठी की एरवीच्या वास्तव प्रकृतीबरोबर हे ( किंवा टु बी आॅर नाॅट टु बी ची रस्त्यातली आवृत्ती देखील) तितकं जात नाही. आणि ज्यांनी कर्ज किंवा ओम शांती ओम पाहिलेत त्याना हे गाणं सहजच त्या दोन चित्रपटांतल्या अशाच प्रसंगांची आठवण करुन देतं.
प्रसंगांप्रमाणेच व्यक्तिरेखांचही इथलं रुपांतर चोख आहे. गर्टरुड ( आई ) आणि क्लाॅडीअस ( काका) पासून रोझान्क्रान्झ आणि गिल्डनस्टर्न ( दोन सलमान ) पर्यंत सर्व महत्वाच्या व्यक्तिरेखाना इथे समांतर पात्रयोजना आहे. बदललेल्या आशयस्वरुपामुळे घटनांच्या कालावधीत थोडं पुढेमागे करण्यात आलय, पण शब्दश: रुपांतर हे इथे अभिप्रेत नाही. या तिन्ही चित्रपटांत मूळ कलाकृतीला नव्या संदर्भांमधे बसवण्यात आलय आणि ते करायचं तर तर असे काही बदल आवश्यक आहेत.
काही जणांना चित्रपटाचा पूर्वार्ध हा संथ वाटतो आणि तो तसा आहे देखील. बरेच बाॅलिवुड चित्रपट कथेत शिरताच घटना घडवायला सुरुवात करुन वेगाचा आभास आणतात कारण सामान्य व्यावसायिक प्रवृत्तीच्या हिंदी चित्रपटांना काॅन्टेक्स्ट आवश्यक नसतो. त्या कथा कुठेही कशाही घडू शकतात. शिवाय घटना घडवणं ,एका पाॅइन्टपासून दुसऱ्यापर्यंत प्रवास करणं , हे प्रमुख सूत्र असतं. तसं इथे करणं शक्य नाही  कारण हैदरने तसं करणं हे त्याच्या मूळ प्रकृतीलाच इजा पोचवणारं ठरलं असतं. इथला पहिला भाग हा पार्श्वभूमी उलगडणं आणि त्या पार्श्वभूमीचं हैदरच्या मनोव्यापारांशी समांतर असणं स्पष्ट करतो. हे पटेलसं करायचं तर वेळ हा लागणार. ज्यांना तो घालवण्याची इच्छा नसेल त्यांनी आपण कोणते चित्रपट काय हेतूने पाहातो यावर पुनर्विचार करणं आवश्यक आहे.
शाहीद कपूर आणि तबू, या दोघांचा हा चित्रपट आहे. लांबी पाहिली तर शाहीदचा, पण तबूशिवाय त्याचा तोल राहाणार नाही. श्रध्दा कपूर वगळता, बाकी सहाय्यक नटसंचही चांगला आहे, पण तो कायम दुय्यमच राहातो. शाहीद चांगला अभिनेता असून त्याला रोमान्स आणि विनोदावर फुकट घालवलं जातं हे आपण जाणतोच.भारद्वाजच्या कमीने मधे शाहीद होता पण ती भूमिका इतकी लक्षवेधी नव्हती. हैदरमधली आहे. लंगडा त्यागीने जशी सैफच्या कारकिर्दीला वेगळी दिशा दिली तशी हैदर शाहीद कपूरच्या कारकिर्दीला देण्याची शक्यता दिसते.
हैदरचा शेवट हा भारतीय प्रेक्षकाची परीक्षा घेणारा आहे. तो सुखांत तर नाहीच , वर वैयक्तिक विध्वंसाची नवी गणितं मांडणारा आहे. बाॅलिवुड वळणाचे शेवट आपण बाजूलाच ठेवू, पण नव्या वळणाच्या गँग्ज ऑफ वसेपूर सारख्या चित्रपटाच्या शोकांतातही एक प्रकारचा विजय गृहीत धरलेला आहे. हैदरमधे या प्रकारचं समाधान नाही. प्रेक्षकाचं अस्वस्थ होणं ,ही यावर संभवणारी त्यातल्यात्यात संयत प्रतिक्रिया. ही कितीही टोकाला जाऊ शकते. पण चित्रपटाने अस्वस्थ करणं, विचार करायला लावणं यात वाईट काय आहे ? वेगळा अनुभव देण्याची खरोखर क्षमता असणारे चित्रपट क्वचित मिळतात. मग जेव्हा ते येतात, तेव्हा त्या अनुभवाला नाकं नं मुरडता सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहीजे. तेव्हा पहा आणि अस्वस्थ व्हा. सततच्या कृत्रिम आनंदावर हादेखील उतारा ठरु शकेल.

- -ganesh matkari

3 comments:

Gaurav Patki October 5, 2014 at 2:28 AM  

I was waiting for update on your blog. Nice movie and superb analysis. Still I get a feel that 1st half could have been presented well (not about the commercial aspects) Anyway I loved a movie a lot.

आनंद पत्रे October 7, 2014 at 7:28 AM  

मला तितकासा भावला नाही. उत्तरार्ध त्यातल्यात्यात. नको इतकी गाणि आणि श्रध्दा कपूर संपूर्ण अनावश्यक. माझ्या अपेक्षाही जरा जास्तच होत्या म्हणा :-(

Unknown October 7, 2014 at 11:23 AM  

Dilemma is the essence of Hamlet. The film is a superb combination of the theatrical and the cinematic where Bharadwaj succeeds in dramatising the conflict face by each of its main characters as well as the State players. Tabo, KK and Shahis have given their best. All cinema lovers must see this film. It rivets and it disturbs. It takes us beyond the usual rhetoric about Kashmir.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP