प्यार वाली लव्ह स्टोरी- रोमिओ, जुलिएट आणि दुनियादारी
>> Saturday, October 25, 2014
( स्पॉयलर वॉर्निंग- खासच अनइमॅजिनेटीव्ह वाचका प्रेक्षकासाठी या लेखात कदाचित काही स्पॉयलर असू शकतील. पण फार ढोबळ स्वरुपाचे. )
मी पुणे मिरर साठी मराठी चित्रपटांचं परीक्षण करत नसतो, तर ' प्यार वाली लव्ह स्टोरी' नामक सिनेमा पाहिला असता की नाही, मला माहीत नाही. बहुधा नसताच पाहिला. रिव्ह्यू लिहायचे नसले की आपल्याला हवं ते पाहाण्याचं, खरं तर नको ते नं पाहाण्याचं स्वातंत्र्य असतं, जे फारच आकर्षक आहे. मात्र त्यात एक तोटा असतो. केवळ हवं ते पाहिल्यामुळे आपलं बिग पिक्चरकडे दुर्लक्ष होतं. आपण आपल्या आवडत्या चित्रपटांमंधे रमून एकूण चित्रपटसृष्टीचं काय चाललय हे विसरुन जाण्याची शक्यता तयार होते. मी मुळात मिररची असाईनमेन्ट स्वीकारली त्यामागच्या कारणांत बिग पिक्चरकडे लक्ष ठेवता यावं, आपण नक्की कुठे आहोत नी कुठे जातोय हे स्पष्ट दिसावं, हे एक प्रमुख कारण होतं.
स्पष्ट बोलायचं तर मराठी चित्रपटाकडे पाहाता, एका चांगल्या चित्रपटाला दोन बरे आणि सात वाईट हे प्रमाण सध्या तरी दिसतय, जे तसं माझ्या अपेक्षेप्रमाणेच आहे. प्यार वाली लव्ह स्टोरी यातल्या कोणत्या वर्गात बसतो हे मला अतिशय निपक्षपातीपणे विचारलं तर मी त्याला तिसऱ्या गटांत टाकणं टाळेन आणि दुसऱ्या गटात घेईन. थोडक्यात , तो बरा चित्रपट मानेन.
चित्रपटांचं परीक्षण करताना मी अनेकदा चित्रकर्त्याला अपेक्षित प्रेक्षक कोण आहे याला महत्व देतो, जे अनेकांना पटत नाही, पण ते योग्य आहे. परीक्षण हे सर्वसामान्य प्रेक्षकाला चित्रपट काय प्रकारचा आहे हे कळावं आणि तो पहावा किंवा नाही, हे ठरवण्याची सोय व्हावी यासाठी असतं. त्यावर जर मी वैयक्तिक आवडीनिवडी लादल्या, तर ते योग्य होणार नाही. मागे एका मोठ्या वर्तमानपत्रात लिहीणाऱ्या विदुषी केवळ आपली आवड ( म्हणजे नातेसंबंधावर आधारीत आणि कलात्मक चित्रपट) सोडून सर्वाना झोडायच्या . त्यांचा स्टार वॉर्सच्या तिसऱया भागाचा रिव्ह्यू हा परीक्षण कसं करु नये याचा सर्वोत्तम नमुना म्हणून माझ्या मनावर कोरलं गेलाय. केवळ त्यांना नातेसंबंधावरला चित्रपट आवडतो म्हणून स्टार वॉर्स मालिका वाईट ठरत नाही. तिचा स्वतंत्र प्रेक्षक आहेच. तो कोण आहे या नजरेतून ते परीक्षण आवश्यक नाही का? त्या चित्रप्रकाराच्या ,शैलीच्या जवळ जाऊन चित्रपट पहाणं हे योग्य. असो. 'प्यार वाली लव्ह स्टोरी'ला कोणता प्रेक्षक अपेक्षित आहे असा विचार केला तर उत्तर मिळेल, दुनियादारीचा. आणि हा फारच प्रचंड प्रेक्षकवर्ग आहे यात शंका नाही.
आपल्या यशस्वी दिग्दर्शकांचं समीक्षकांना मूर्ख ठरवणारं एक आर्ग्युमेन्ट नेहमी असतं, ते म्हणजे आम्ही एन्टरटेनर्स आहोत आणि आम्ही अभ्यासकांसाठी नाही तर सामान्य माणसांसाठी चित्रपट बनवतो. यात मोठा गोंधळ आहे, तो म्हणजे समीक्षकांना ( आणि परीक्षकांनीही) करमणूकप्रधान चित्रपट आवडत नाहीत हा समज. फक्त त्यांची एक माफक अपेक्षा असते की चित्रपटांनी करमणूक करतानाही लोकांना मूर्ख समजू नये. या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय जाधवदेखील चित्रपटातल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करताना सामान्य माणसाचा कौल घेणार हे उघड आहे. मात्र या चित्रपटात ते एकवेळ चालून जाऊ शकेल कारण यात पूर्ण चित्रपटाला बांधणारी एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे त्यात घेतलेला रोमिओ अॅन्ड जुलिएट या अजरामर नाट्यकृतीचा आधार. हा आधार चित्रपटाचा एकूण प्रभाव टिकवतो, वाढवतो, आणि चित्रपटाला सुसह्य करतो.
दुनियादारी प्रमाणेच प्यार वाली देखील पिरीअड फिल्म आहे मात्र पिरीअड तितका जुना नाही, नव्वदच्या दशकातला आहे. मुंबईतल्या एका छोटेखानी वस्तीत चित्रपट घडतो. इथे हिंदू मुसलमान गुण्यागोविंदाने पण स्वतंत्र चाळीत रहातात. मुसलमानांमधला दादा आहे कादर ( उपेन्द्र लिमये) तर हिंदूंमधे पश्या ( समीर धर्माधिकारी) . पश्याचं नंदिनीशी ( उर्मिला कानिटकर कोठारे) लग्न ठरतं आणि पश्याचा भाऊ अमर ( स्वप्नील जोशी) त्यात सामील व्हायला येतो. अमर येताक्षणीच कादरच्या बहिणीच्या , आलियाच्या ( सई ताम्हनकर) प्रेमात पडतो. तीही यथावकाश त्याच्या प्रेमात पडते. पण पुढे काही हालचाल होईपर्यंत आलियाच्या वडीलांनी तिचं लग्न दुसऱ्याशी ठरवलेलं असतं. लग्नाच्या धामधुमीतच मुंबईतल्या दंगलींना तोंड फुटतं आणि परिस्थिती अधिकच बिघडते.
मरणानंतर अनेक शतकं उलटल्यावरही शेक्सपिअरचा जागतिक चित्रपटांवरचा, त्याच्यावेळी अस्तित्वातही नसलेल्या या माध्यमावरचा प्रभाव पाहिला की चक्रावायला होतं. नुकत्याच आपल्याकडे येऊन गेलेल्या राम लीला आणि हैदर नंतरच हे माहितीतलं तिसरं शेक्सपिअर रुपांतर, तेही फक्त यावर्षातलं. शेक्सपिअरला आहे तसा घ्या वा त्यातल्या प्रमुख संकल्पना वापरा, तपशील / संवाद मुळासारखे ठेवा वा बदलून टाका, त्याचा परिणाम हा रहातोच. इथेही तो आहेच. जाणवण्यासारखा.
'प्यार वाली लव्ह स्टोरी' चा प्रेक्षक, हा करमणूकप्रधान चित्रपटाचा प्रेक्षक आहे हे तर झालंच, पण तो चित्रपटाकडून अतिशय किमान अपेक्षा ठेवणारा प्रेक्षकही आहे. त्याला चित्रपटात नेहमीचा मसाला , म्हणजे कॉमेडी, हाणामाऱ्या, प्रेम, गाणीबजावणी वगैरे लागतं पण ते ढोबळ स्वरुपाचं. संहितेत काही विचार, कलामूल्य असण्याची त्याला गरज भासत नाही. चटका लावणाऱ्या शोकांतिकेचं 'प्यार वाली लव्ह स्टोरी' असं गुलछबू नाव असण्यात काही गैर वाटत नाही कारण मुळात ते नाव त्यांनाच आकर्षित करण्यासाठी दिलेलं आहे हे तो जाणून आहे. त्याला चित्रपटाकडून ना कलात्मक दृष्टी अपेक्षित आहे, ना सोफेस्टिकेशन. उलट टाळीबाज संवाद, व्यक्तिरेखेबरोबर नं जाणारे विनोद, प्रत्येक दृष्यातली रंगाची आतषबाजी , क्षणभर उसंत नं देणारं ढणाढणा संगीत, हे सारच त्यांना चालणार आहे. त्याबद्दल त्यांची तक्रार नाही.
आता मुळात चित्रपटात हे सारं इतक्या ढोबळ पध्दतीने का मांडलं , यावर 'प्यार वाली' चा एक्स्क्यूज काय असावा? तर हे सारं असं मांडलय, कारण या मांडणीला तयार प्रेक्षक उपलब्ध आहे. समजा सिनेमा अधिक संयत असता , व्यक्तिरेखा अधिक खोल असत्या, संवाद वरवरचे नसून अर्थपूर्ण असते, तर तो चालला असता याची काय गॅरेन्टी? त्यापेक्षा जे गेल्या चित्रपटात यशस्वी ठरलं आहे ते चालू दे. फॉर्म्युला तसाच राहू दे. इफ इट अेन्ट ब्रोक, डोन्ट फिक्स इट.
'प्यार वाली' बरा आहे की नाही, तो चालणार का नाही, यापेक्षा मला वाटतं ही जुन्याला धरुन रहाण्याची वृत्ती हा इथला खरा कळीचा प्रश्न आहे ज्यावर आपण स्वतंत्रपणे विचार करायला हवा. हा केवळ आपल्याकडेच आहे असं नाही. हिंदी व्यावसायिक चित्रपटांमधे तर तो आपल्याहूनही अधिक बिकट स्वरुपात आहे. प्रेक्षक अमुक प्रकारचा आहे या निरीक्षणावरुन त्याच त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत राहायची असेल, तर चित्रकर्त्यांच्या सर्जनशीलतेचा उपयोग काय? आणि प्रेक्षक सुधारत नाही ही जबाबदारीदेखील अखेर चित्रकर्त्यांचीच नाही का? प्रेक्षकांना जर ठराविक वळणाच्याच गोष्टी पहायला मिळाल्या तर तो सुधारणार तरी कसा?
असं असूनही, मी 'प्यार वाली लव्ह स्टोरी'ला अगदी बाजूला टाकणार नाही. त्याच्या मूळ कथासूत्रामुळे वा आणखी कशाने, पण आजकाल चित्रपटीय रोमान्सच्या नावाखाली आपल्याला ज्या फुटकळ चित्रपटांना पहावं लागतं त्यापेक्षा या चित्रपटाची प्रवृत्ती ही मूळातच अधिक जोरकस आहे. कथानकाची वीण फार पक्की नसली तरी वीण आहे. कलाकार चांगले आहेत, त्यातल्या बहुतेकाना करायला काही आहे. मला सर्वात अधिक आवडलं ते उर्मिला कानिटकर कोठारेचं छोटेखानी काम. या व्यक्तिरेखेत सातत्य नाही, आणि तिची चित्रपटाच्या सुरुवातीची प्रतिमा पुढे ढेपाळत जाते, पण तो दोष संहितेचा आहे, अभिनेत्रीचा नाही. इतर नटसंचही चांगलाच आहे. पटकथा, दिग्दर्शनाने जर निश्चित मागणी केली असती , तर ती पूर्ण करण्याची ताकद असणारा .
'प्यार वाली' याच नट आणि तांत्रिक संचात अधिक उंची गाठू शकला असता का? निर्विवादपणे. पण ती गाठायची तर परिचीत प्रेक्षकांच्या सेफ्टी नेटचा आधार सोडण्याची तयारी हवी. चित्रपट आशयघन नसेल तर हरकत नाही पण करमणुकीतही काय दर्जात्मक सुधारणा होऊ शकते हे पडताळून पहाता आलं पाहीजे. निदान ते होऊ शकतं असा विश्वास पाहिजे. आज तो फार कमी मराठी चित्रपटांमधे दिसतो. तो अधिक दिसायला लागेल तेव्हा चित्रपटांचं प्रमाणही बदलायला लागेल. पण या झाल्या जरतरच्या गोष्टी. आजचं काय, हा प्रश्न उरतोच !
- ganesh matkari
1 comments:
Ganesh
Nice Review
Post a Comment