दृश्य, शब्द आणि भाषा

>> Sunday, January 10, 2016



'चित्रपट हे दृश्य माध्यम आहे', असं गेली अनेक वर्ष एेकतोय. अर्थात, त्यात खोटं काहीच नाही. व्हिजुअल लॅंग्वेज हा चित्रपटाचा एक महत्वाचा भाग आहे. साहित्यात ज्या गोष्टींचं वर्णन करायला कितीतरी वेळ लागतो, त्या गोष्टी चित्रपटाची एक फ्रेम सहज उभी करुन टाकते. सत्यजित राय पासून टेरेन्स मलिकपर्यंत याप्रकारची बोलकी दृश्ययोजना  असणारे चित्रपट अनेकांनी केले . तरीही, केवळ आशयघन चित्रचौकटी, हीच काही चित्रभाषेची उदाहरणं म्हणता येणार नाहीत. भाषा म्हंटली  की नुसते शब्द पुरेसे नाहीत, तिचं व्याकरणही आलच. मग या चौकटींबरोबरच, कॅमेराचा एकूण वापर, दृश्यांमधलं ट्रान्झिशन, क्लोज अप ते एक्स्ट्रीम लॉंग शॉट पर्यंत अनेकविध दृश्यरचनांचा अर्थपूर्ण वापर, हे सगळच आलं. चित्रपटाचं हे एक महत्वाचं अंग आहे, यात वाद नसावा. मात्र हे एकच अंग आहे का? तर नाही.

चित्रपट दृश्य माध्यम असल्याचं विधान जरी खरं असलं, तरी ते विधान वापरण्यात , वापरणाऱ्यांच्या  सवयीचा भाग आहे. काहीही दाखवणं शक्य असलं, तरी सारच दाखवायला हवं, असा त्याचा अर्थ असू नये. दिग्दर्शक काय दाखवतो, कोणत्या पध्दतीने दाखवतो आणि काय दाखवणं टाळलं जातं, या सगळ्यातूनच कोणत्याही चित्रपटाची योजना ठरते. दृश्ययोजनेबरोबरच ध्वनीचा चित्रपटातला वापर हा जवळजवळ तुल्यबल असू शकतो. आपल्याकडे प्रेक्षक, समीक्षकांपासून दिग्दर्शकांपर्यंत सर्वाना एक सवय आहे ती ध्वनीच्या , खासकरुन आवाजाच्या ( त्यात शब्द आले, पण केवळ शब्द नाही. माणसं आवाज अनेक पध्दतीने वापरु शकतात. आपल्याला स्पष्ट न कळणाऱ्या कुजबुजीपासून कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळीपर्यंत चित्रपटातला आवाज अनेक दृष्टीने वापरला जातो)  वापराला कमी लेखण्याची.

दृश्यांना मूळातच एक फायदा होता. तो म्हणजे सिनेमा अवतरल्यापासून पहिली तीस चाळीस वर्ष माध्यमावर दृश्यांचीच सत्ता होती. या काळात अनेक प्रतिभावंत दिग्दर्शकांनी हे माध्यम त्या अनुषंगाने पुढे नेलं. ध्वनीच्या आगमनानंतर सुरुवातीच्या वर्षांमधे काही प्रमाणात चित्रपट शब्दात अडकला हे खरं, पण त्याला कारणं होती. एकतर तांत्रिक अडचणींनी ध्वनीमुद्रण स्टुडिओबाहेर शक्य होईना आणि प्रेक्षकांसाठी बोलपट म्हणजे बोलणारी माणसं हे समीकरण बनलं. मात्र ही नव्याची नवलाई ओसरल्यावर चित्रपटांनी आवाज, संगीत आणि साउंड इफेक्ट्स या साऱ्याचाच किती उत्तम वापर केला , हे आपण अनेक चित्रपटांमधे पाहू शकतो.

सामान्यत: दृश्य आणि ध्वनी, यांचा त्यांच्याकडे स्वतंत्रपणे लक्ष न वेधता केलेला कथानिवेदनाला पूरक वापर, हा चित्रपट सर्वसाधारण प्रेक्षकापर्यंत पोचण्यासाठी महत्वाचा असतो. पण याला बरेच अपवाद आहेत. अनेकदा संकल्पनेच्या गरजेनुसार, दिग्दर्शक एका अंगावर अधिक भर देऊन दुसऱ्याचा कमीत कमी वापर करतात. हा वापर मुद्दाम केलेला आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एकदोन उदाहरणं पहायची, तर शेन करुथच्या प्रायमर( २००४) सारख्या फिल्मकडे पाहाता येईल. प्रायमर ही ७००० डॉलर्स च्या बजेटवर ( म्हणजे मराठी चित्रपटांहूनही कमी) केलेली सायन्स फिक्शन जातीची फिल्म होती. कालप्रवास हा तिचा विषय होता. आता मुळात या चित्रपटात विज्ञानाधारीत भव्य दृश्यांना वाव तरी कुठे होता? मग चित्रपटाची सारी वातावरणनिर्मिती आणि दृष्टीकोन उभा करण्यासाठी दिग्दर्शकाने विज्ञानाधारीत बडबड वापरली. त्या बडबडीतून खरोखरचं विज्ञान शोधणाऱ्यांच्या हाताला काही लागणार नाही, पण प्रेक्षक चित्रपटात अडकतो तो या बडबडीच्या जोरावर. याच प्रकारे शब्दाला महत्व येतं, ते एका खोलीत घडणाऱ्या ट्वेल्व अॅंग्री मेन (१९५७) किंवा एक्झाम (२००९) सारख्या चित्रपटात, ज्यात दृश्यभाषेचा वापर असला तरी मर्यादीत आहे. मग प्रेक्षक लक्ष देतो ते काय सांगितलं जातय याकडे. अशा चित्रपटांमधली बडबड ही प्रेक्षकाला खटकत नाही  कारण प्रेक्षकासाठी ती चित्रपटाचा महत्वाचा भाग असते.

याचच उलट्या बाजूच उदाहरण नुकतच पाहीलं ते म्हणजे मायरोस्लाव स्लॅबोशपिट्स्की या दिग्दर्शकाचा युक्रेनिअन सिनेमा, द ट्राईब  (२०१४)मधे  . कॅन चित्रपट महोत्सवात तीन महत्वाची पारितोषिकं मिळवलेल्या या चित्रपटाविषयी मी काही वाचलं नव्हतं, पण अचानकच मला तो सापडला इंटरनेटवर पहायला मिळणाऱ्या असंख्य याद्यांमधल्या एकीत. संकल्पना प्रभावी वाटून मी ट्राईबची ट्रेलर पाहिली, तर तीही खास होती. चार पाच दृश्यांचे तुकडे होते. पण त्यांना जोडणारी वाक्य आपल्यासारख्या सवयीने चित्रपट पहाणाऱ्यांना दचकवणारी होती. ती साधारण अशी.

' ही फिल्म साईन लेंग्वेज मधे आहे. त्यात सबटायटल्स किंवा व्हॉइस ओव्हरचा वापर नाही. कारण प्रेम- आणि द्वेष- दाखवण्यासाठी वेगळ्या भाषेची आवश्यकता नसते.'

चित्रपटांमधे खरेखुरे प्रयोग क्वचित पहायला मिळतात, त्यामुळे या प्रकारचा शब्द गाळूनच टाकण्याचा प्रयोग मी चुकवणं शक्यच नव्हतं. फिल्म पाहिली आणि थक्कच झालो. त्यात केवळ संवाद नव्हते असं नाही, तर संगीतही टाळून त्यातल्या वास्तवाची प्रखरता अधिकच तीव्र केली होती.

एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी. साईन लॅंग्वेजमधला चित्रपट म्हणजे मूकपट नाही. त्याला भाषा आहे. यातली पात्र सतत एकमेकांशी चिकार बोलत असतात. फक्त ती जे बोलतात, त्याचा तपशील आपल्याला कळत नाही. आपण जे घडतय त्याचे साक्षीदार असतो, त्यांच्या डोक्यात काय चाललय याची पुसटशी कल्पनाही आपल्याला असते, पण चित्रपट माध्यमात भाषा आल्यापासून आपल्या आकलनात जी स्पष्टता आहे,ती इथे कुठेतरी हरवून जाते.

यापूर्वी मी काही महोत्सवांमधून आपल्याला न कळणाऱ्या भाषेतला चित्रपट सबटायटल्स उपलब्ध नसताना पहाण्याचा पराक्रम केलेला आहे. हा अनुभव थोडाफार त्याच प्रकारचा. फरक एवढाच, की भाषेबद्दल प्रेक्षक अनभिज्ञ असणं हा या चित्रपटांच्या योजनेचा भाग कधीच नव्हता. इथे मात्र तो तसा आहे. ट्राईबचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे अपंगांविषयी असूनही, त्यात दिसणारं क्रौर्य.

आपल्याकडे, किंवा आपल्याकडेच का, जगभरातच अपंगांविषयी असणाऱ्या चित्रपटात त्यांच्याकडे एका सहानुभूतीने पाहिलेलं दिसतं. मिरॅकल वर्कर(१९६२) ,ब्लॅक (२००५) , चिल्ड्रन ऑफ ए लेसर गॉड (१९८६) , कोशीश( १९७२) , बियॉंड सायलेन्स(१९९६)  ,खामोशी (१९९६) , अशी अनेक उदाहरणं पहाता येतील. अर्थात- त्यातली तुलना ही हट्टीकट्टी माणसं आणि अपंग यांमधली असते. ट्राईबमधले सारेच जणं मुके, बहीरे. तो घडतो एका शाळेच्या पार्श्वभूमीवर. शाळेचे शिक्षक / संचालक बोलू, एेकू शकतात का माहीत नाही.एखादा असला तर असेल, पण इतर नाही. कारण ते आपसातही खुणांच्या भाषेतच बोलतात. ही शाळा नावापुरती शाळा. प्रत्यक्षात ती चालते एका गुन्हेगारी संघटनेप्रमाणे. इथे गुंडगिरी, मारामाऱ्या, वेश्याव्यवसायापासून सारं चालतं. आपल्याला या जगाची ओळख होते ती एका नव्या विद्यार्थ्याच्या नजरेतून.पण हा बिचाराही लगेचच त्या विश्वात अडकतो आणि खोल गर्तेत खेचला जातो.

हा चित्रपट पाहून गोल्डींगची भेदक कादंबरी लॉर्ड ऑफ द फ्लाईज ( किंवा तिचं पीटर ब्रुकने केलेलं चित्रपट रुपांतर,१९६३ )आठवणं सहज शक्य आहे. लहान मुलांसारख्या एरवी निरुपद्रवी वाटणाऱ्या आशयसूत्रातून तिथे जशी क्रूर हुकूमशाही व्यवस्था उभी रहाते तशीच इथे ती अपंगांच्या विश्वातून उभी रहाते. प्रेक्षक या विश्वाचा भाग कधीच बनू शकत नाही. दिग्दर्शकाची नजर, आपल्याला कळण्यासारख्या भाषेचा अभाव आणि त्याने योजलेली कॅमेराची भाषा काळजी घेते की आपण केवळ एका असहाय्य निरीक्षकाच्या भूमिकेत राहू. यातले स्थिर कॅमेरातून त्रयस्थपणे या जगात डोकावणारे शॉट्स ( जे क्वचित येणाऱ्या बोलू शकणाऱ्या व्यक्तिरेखाना आवाजाच्या टप्प्याबाहेर ठेवतात) कोर्ट चित्रपटाची आठवण करुन देतात, पण त्याबरोबरच इथे सतत पात्रांना ट्रॅक करणारा हलता कॅमेराही लांबचलांब चालणाऱ्या शॉट्समधून त्याच चतुराईने वापरला जातो.

इथे एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. न कळणारी भाषा एरवी चित्रपटात आली, तर ती सर्वसाधारण प्रेक्षकाला कळेलशा भाषेतल्या सबटायटल्समधून आपल्यापर्यंत पोचवली जाते. मग इथे ते टाळण्यामागे प्रेक्षकाला उपरं ठेवणं हे एकच कारण असेल का? कारण एरवी खुणांच्या भाषेलाही सबटायटल्स देता आली असतीच की ! आता हा प्रश्न काही मला एकट्याला पडलेला नाही. अनेकांनी यातून अनेक अर्थ काढले आहेत. माझ्या मते दिग्दर्शक यातून आपल्यालाही जाणीव करुन देतोय की सामान्य माणसांच्या भाषेपासून  दूर असणाऱ्या समाजाच्या छोट्या घटकाला ( ट्राईबला?) कायम आपल्यात वावरताना काय वाटत असेल ? त्यांचं उपरेपण त्यांना कसं जाणवत असेल?
जी गोष्ट आपण एरवी गृहीत धरतो तिचा संपूर्ण अभाव आपल्याला कसं भांबावून सोडतो त्याचं हे एक बोचरं आणि परीणामकारक उदाहरण आहे. हा विदारक चित्रपट पहाताना आपण या विश्वाचा भाग बनू शकलो नाही तरी त्यांना काही प्रमाणात समजून घेऊ शकतो, ते त्यामुळेच.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP