ब्लाॅगची आठ वर्षे - काही आठवणनोंदी

>> Wednesday, January 20, 2016

आठ वर्षांपूर्वी हा ब्लाॅग सुरू करण्यापूर्वी मी मुंबई सकाळमध्ये, बेलापूर कार्यालयात, संपादकीय विभागात काम करीत होतो. पानेक संपल्यावर रात्री दीड वाजता घरी जाण्याचा मार्ग नसल्याने पावणेचारच्या गाडीपर्यंत तेथेच वाचन करत बसायचो किंवा तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या यू ट्युब नामक संकेतस्थळाचा वापर गाणी पाहत ऐकण्यासाठी करायचो.
 मी तेथे हाॅलीवूड चित्रपटांची परीक्षणे आपण काही थोर काम करीत असल्याच्या थाटात लिहीत होतो.  मेघना भुस्कुटे हिच्याकडून गणेश मतकरी यांचे समीक्षण कसे उत्तम असते, अन् ते किती गोष्टी एका लेखातून देतात याची माहिती मिळाली. त्यावेळी मग सकाळच्या अद्ययावत स्मार्ट अर्काइव्हमध्ये (साप्ताहिक सकाळ सुंदर असतानाचा) सगळा डेटा असल्याची खबर लागली. आणि सकाळच्या पुढच्या सगळ्या नाईट्स गणेशचे लेख वाचण्यात गेले. आपण सिनेमावर किती फोकना़डोत्तम लिहीत होतो याची जाणीव झाली.
आॅरकुटवर गणेश यांच्याशी ओळख झाली. तो काळ डीव्हीडी क्रांतीचा होता. पुढच्या काही दिवसांत डीव्हीडी, सिनेमे यांची चर्चा झाली. तेव्हा सिनेमा पॅरेडेसो नावाचा ब्लाॅग मी तयार केला होता. माझ्या सिनेमावरच्या लिखाणाचा. तो रद्द करून त्याजागी गणेशचे आर्टिकल्स टाकणे सुरू केले. मला माहिती होतं या लेखनातून मला जे मिळतंय, तेच  साप्ताहिक सकाळ परिघाबाहेरच्या लोकांनाही मिळेल. अन् झालंही तसंच.
त्यादरम्यानच डीव्हीडी पायरसीमुळे सिनेमा आकलन विस्तारत होतं. यू ट्युबमध्ये सिनेमा अपलोडीकरण वाढत होतं आणि फोकनाडवजा लिहायला वगैरे जमू लागलं होतं. मी कुठेही डीव्हीडी शोधत असायचो. मुंबई, ठाणे उपनगरांतील डीव्हीडी अड्डे तयार झाले होते. ब्लाॅग नियमित झाला होता. गणेशचे अड्डेही माहिती झाले होते. अन् त्यांच्यासोबत डीव्हीडी, सिनेमा, लेखनचर्चा यांची देवाणघेवाण होत होती. टोरण्ट्स नसण्याच्या काळात रस्त्यावर भलतीच चांगली डीव्हीडी मिऴाल्यास दोन दिवस तरंगणं व्हायचं. डॅनी बाॅयल यांच्या स्लमडाॅग मिलिआॅनेरचे आॅस्कर पक्के झाल्याच्या काळात रस्त्यावर उघड्या ठेवल्या जाणा-या सेमी पोर्न सिनेमाच्या गठ्ठ्यात मला त्याचा शॅलो ग्रेव्ह हा पहिला सिनेमा सापडला होता. पाहिल्या-पाहिल्या गणेशजवळ सुपूर्द केला. त्यावर चौकटीबाहेरच्या सिनेमावरचा लेख झाल्यानंतर डीव्हीडी शोधाचे श्रम वसुल झाले. तोच आनंद नोव्हेंबर (कळकट्ट जुनाट डीव्हीडींच्या ठाण्यातील एका गाडीवरील गठ्ठ्यातून)
 रिस्टकटर्स - ए लव्ह स्टोरी(थायलंडमधून आणलेल्या संग्रहातून), द किंग आणि वन्स (फोर्टातील अड्ड्यातून) या  चित्रपटावरच्या ब्लाॅगवरील धारदार लेखांच्या बाबतीतही आला. या ब्लाॅगमुळे माझं ज्ञान ठोकून-ठाकून वाढवता आलं, हा इथल्या वाचकांपेक्षा माझा अधिकचा फायदा आहे.
ब्लाॅग सुरू केला त्यावेळचा डीव्हीडी क्रांतीचा जोम आता ओसरलाय. नेटफ्लिक्स , टोरंट, टोरबाॅक्स, हब असे कैक पर्याय सिनेमावेड्यांसाठी या आठ वर्षांच्या काळात दाखल झालेत. परदेशी व देशी चित्रपटांवर फेसबुकपासून ब्लाॅगवर लेखन जोमाने येतंय.
सिनेमा साक्षरीकरणाचे मूलभूत काम या ब्लाॅगने आठ वर्षांत  केले. पुढल्या वर्षांतही हा ब्लाॅग सिनेदिशादर्शक म्हणून भूमिका बजावू शकेल, याची खात्री आहे. या ब्लाॅगची वाट पाहणा-यां सगळ्यांचे आठ वर्षे सोबत केल्याबद्दल आभार . गेले संपूर्ण वर्ष संथावस्थेचे टोक गाठलेला ब्लाॅग यंदा  (पन्नास आठवड्यांच्या हमीसह)  निश्चितपणे सक्रिय राहणार आहे.
-पंकज भोसले, ब्लाॅगएडिटर

ब्लाॅगला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  गणेश यांचा रुपवाणीतील  लेख येथे वाचायला मिळेल. 


मराठीचे दिवस




मी मराठी फिल्म्सचे रिव्यू नियमितपणे लिहायला लागलो, त्याला आता वर्ष होऊन गेलं. त्याआधीचं माझं लिखाण हे प्रामुख्याने इंग्रजी आणि जागतिक सिनेमा, त्यानंतर काही प्रमाणात हिंदी आणि त्याहूनही कमी मराठी चित्रपटांबद्दलचं असं होतं. तसं ते साहजिकही होतं, कारण मुळात मी लिहायला सुरुवात केली तेव्हा , म्हणजे १९९७ मधे, मराठी सिनेमा असून नसल्यासारखा होता. तथाकथित विनोदी चित्रपटांचं वेड संपत आलं होतं, काही निर्माते , दिग्दर्शक धकवून मराठी चित्रपट काढत होते, पण त्यांना काही डिमान्ड नव्हती. कोणाला ते पहाण्यात फार रसही नव्हता. भावे, सुकथनकर, पटेल, पालेकर अशी गंभीरपणे काम करणारी मंडळी होती, पण त्यांचं काम तसं थोडकं होतं, आणि त्यातलही बरचसं सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचत नसे.

खरं तर प्रेक्षकाचा मराठी सिनेमा या गोष्टीवरुन विश्वासच उडाला होता. आणि त्याला तरी दोष कसा देणार? गेल्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी सिनेमाची जी झेप दिसली होती , त्याच्या बरोबर उलटा प्रवास आपण शतकाच्या उत्तरार्धात करुन दाखवला होता. त्याची कारणं हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल, त्यामुळे मी त्यात पडणार नाही, पण एक मात्र म्हणेन की परिस्थिती आशादायक नव्हती. मी लिहायला लागलो ते मुळातच इंग्रजी सिनेमाची परीक्षणं ,या प्रकारचं, पण माझी खात्री आहे, की कोणी मला मराठी चित्रपटांवर लिहायला सांगतं, तर कदाचित समीक्षेपासून मी चार हात दूरच राहिलो असतो.
पुढे पुढे, म्हणजे , २००४ नंतर मराठी चित्रपट कसा सुधारत गेला आणि श्वासपासून त्याला एक लेजिटिमसी कशी आली, मराठी सिनेमांचं नाव कसं देशभरात पोचलं, आणि चित्रपटसृष्टीत कसा उत्साह संचारला हे आपल्याला माहितच आहे. हा उत्साह थोडा धोकादायक होता, कारण त्यामुळे उद्योगाला फुगवटा आला हे खरं असलं, कामाचा दर्जा काही प्रमाणात सुधारला हेही निश्चित असलं, तरी संख्या आणि दर्जा यांचं प्रमाण व्यस्त आहे , हा मुद्दा बराचसा दुर्लक्षित राहिला. आधी संदीप सावंत, आणि पाठोपाठ सचिन कुंडलकर, निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, रवी जाधव, मंगेश हाडवळे अशा तरुण आणि कलात्मक तसंच व्यावसायिक प्रकारचे चित्रपट हाताळणाऱ्या पिढीमुळे आपण सहजच राष्ट्रीय पुरस्कारात पोचलो. पण या सर्वांचा सिनेमा म्हणजे काही संपूर्ण मराठी सिनेमा नव्हता. आणि आजही नाही.
जेव्हा आपण सहजच मराठी सिनेमाचं कौतुक करतो, तेव्हा त्याचे पुरस्कार, तो हाताळत असणारे विषय, महोत्सवांमधली उपस्थिती आणि काही निवडक चित्रपटांचे आर्थिक उच्चांक,  याची चर्चा होते, पण त्याचा एकूण प्रभाव काय आहे, त्याचा प्रेक्षक कोण आहे? ( आणि त्याहून महत्वाचं म्हणजे किती आहे?) आपण ज्यांची नावं घेतो ते चित्रपट हे मराठी चित्रपटांचं खरं रिप्रेझेन्टेशन होऊ शकतील का? असे अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर संभवतात,ज्यांचा पुरेसा विचार होत नाही, केला जात नाही. जेव्हा मी नियमितपणे मराठी चित्रपटाचं परीक्षण करत नव्हतो, तेव्हाही मला हे प्रश्न पडत होतेच, पण त्यांचा फार विचार करण्याची गरज वाटत नव्हती. मराठी चित्रपटाचं कौतुक होतय याचा आनंद होता, शिवाय पहायचे असले तर वर उल्लेखलेल्या काही किंवा त्याच्याच जातकुळीतल्या इतर दिग्दर्शकांचे चित्रपट एक आशादायक चित्र रंगवण्यासाठी पुरेसे होते.
पुणे मिररने मला मराठी चित्रपटांची परीक्षणं करायला सांगितलं तेव्हा ते स्वीकारण्यामागे, हे वरवरचं चित्र डोळ्यासमोर अधिक स्पष्टपणे उभं रहावं, हा एक हेतू होता. आवडत्या दिग्दर्शकांचे, केवळ नाव मिळालेले चित्रपट नं बघता सरसकट बरं,  वाईट , दर्जेदार, अभिरुचीहीन, प्रेक्षकप्रिय , एलिटीस्ट असं सारच पाहिलं तर एक वास्तव अंदाज डोळ्यापुढे येईल अशी माझी अपेक्षा होती. आता वर्षभरानंतर तो काही प्रमाणात आलाय, असं मी म्हणू शकतो. त्यादृष्टीने मी नित्य पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं देऊन पहाणार आहे. अर्थात, ही उत्तरं वैयक्तिक स्वरुपाच्या निरीक्षणांवर आधारित आहेत आणि त्याच फ्रेमवर्कमधून त्यांच्याकडे पहायला हवं. जारगन किंवा आकडेवारी यांना दूर ठेवूनच ती मांडली आहेत.
कोणालाही पडेलसा पहिला प्रश्न म्हणजे आजचं मराठी चित्रपटाचं नेमकं स्वरुप काय?
मी म्हणेन, की आजचा मराठी सिनेमा हा बराचसा गोंधळलेल्या स्थितीत आहे, जरी ही परिस्थितीदेखील शतकाच्या सुरुवातीच्या दिवसांपेक्षा फारच चांगली म्हणावी लागेल. तेव्हा मुळात फार कमी चित्रपट बनत होते, जे बनायचे त्यांनाही प्रेक्षक नव्हता आणि एकूण चित्र हे निराशाजनक होतं. आजच्या चित्रपटात वरवर पहाता तरी सुबत्ता असल्याची लक्षणं आहेत. आज वर्षाला सहजच शंभराहून अधिक मराठी चित्रपट बनतायत, दर आठवड्याला दोन तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होतायत आणि नवनव्या चित्रपटांच्या मुहूर्तांच्या, चित्रीकरणाच्या बातम्या येतायत. झी , व्हायाकॉम यासारखे मोठे निर्माते / वितरक, तसंच इतर कॉर्पोरेट संस्थाही या चित्रपटांमधे रस घेऊन आहेत, राष्ट्रीय पुरस्कारांत दहाबारा पुरस्कार तर हमखास ठरलेलेच आहेत.
या सगळ्याला वरवर म्हणायचं ते का, तर हे सारं, म्हणजे चांगल्या निर्मितीसंस्थांच्या सहभागापासून पुरस्कारांपर्यंत आणि व्यावसायिक यशापासून ते प्रेक्षकांच्या समाधानापर्यंत सारच होतय, ते जेमतेम दहा पंधरा टक्के चित्रपटांपुरतं. बाकी सगळा आनंदच आहे. गेल्या वर्षभरातल्या मराठी चित्रपटांकडे पाहिलं तर काही उत्तम ,अगदी सर्वच बाबतीत दर्जेदार ( कोर्ट, फँड्री, रेगे इत्यादी) , काही ब्लॉकबस्टर वर्गातले ( टिपी २, लय भारी इत्यादी ), काही व्यवसायाच्या चांगल्या शक्यता असणारे आणि आशयाला महत्व देणारे ( डॉ प्रकाश बाबा आमटे, हॅपी जर्नी, कॉफी आणि बरच काही, एलिझबेथ एकादशी, पोस्टर बॉईज इत्यादी) आणि काही वेगळा प्रयोग करु पहाणारे ( बायोस्कोप, बहुधा हा एकच, कोर्ट दुसऱ्यांदा पकडायचा नसेल तर) असे काही  लक्षणीय म्हणा, लक्षवेधी म्हणा चित्रपट आले ( ही पूर्ण यादी नाही , दोनचार इतरही असतील) ,पण त्याबरोबर अनेक चित्रपट असेही आले की जे लक्षातही राहू नयेत. ज्यांना एकतर आपलं जुनच दळण दळायचं होतं, किंवा त्या निर्मात्यांना हात साफ करण्यासाठी हिंदी पेक्षा मराठी निर्मिती स्वस्त वाटत होती ( अमराठी निर्मात्यांमधे हा प्रकार खूप) , किंवा ज्यांचा आपल्या चित्रपटाच्या दर्ज्यापेक्षा संख्येवर भर होता , किंवा ज्यांनी पुरेसा विचार न करता काहितरी करायचं म्हणून करायला घेतलं होतं. मराठी चित्रपटांची एक गंमत आहे, अॅपेरन्टली निर्मितीसाठी कोणालातरी  पटवणं हे काम तितकं कठीण नाही. त्यामुळे हे चित्रपट उभे तर रहातात, निर्मात्यांची आपलं नाव पडद्यावर पहाण्याची हौसही होते, पण निर्मितीइतकाच वा त्याहून अधिक पैसा चित्रपटात घालणं सर्वांना झेपत नाही, किंवा एकदा आपल्या नावाने चित्रपट झाल्यावर त्यावर पुन्हा इतका खर्च वर्थ वाटत नाही, जे असेल ते असो, पण यातले अनेक चित्रपट हे प्रदर्शनाच्या वेळी गडबडतात हे खरं.
चांगल्या चित्रपटातही सर्वाना चांगला किंवा समान प्रतिसाद मिळतो असं नाही. झी सारख्या भरभक्कम संस्था ज्याच्या पाठिशी उभ्या असतात, ते चांगलं मार्केटिंग/ वितरण करु शकतात, चित्रपटगृहात सिनेमा टिकवू शकतात. हे सिनेमे मुळात चांगले असले, तरी त्याना माउथ पब्लिसिटी, चांगली चित्रपटगृह यांचा फायदा मिळतो, तो प्रामुख्याने मोठ्या संस्थांच्या मदतीने. आता साहजिक आहे, की अनेक चित्रपट चांगले असले तरीही या संस्था साऱ्यांना सारखी मदत करु शकत नाहीत. मग ज्यांना त्याची मदत होत नाही, त्यांना चित्रपटगृहात म्हणावं तसं यश मिळत नाही.

मी यातल्या अनेक निर्मितीप्रमुखाना, दिग्दर्शकाना बोलताना एेकलय, की मार्केटींग वगैरे पहिल्या खेळापर्यंतच असतं, पुढे चित्रपट चांगला असला तर चालतोच. हे अर्धसत्य आहे. कारण चित्रपट कुठे लागतो, त्याचं पी आर किती होतं, जाहिरात किती होते यावर तो पहिल्या आठवड्यात किती चालतो हे अवलंबून असतं. मार्केटिंग वगैरे होऊनही चित्रपट चांगला नसला तर पडू शकेल, पण  केवळ चांगला चित्रपट हा इतर मदतीशिवाय चालणं हे जवळजवळ अशक्यच असतं.

आता पुढला प्रश्न हा, की जर चांगला असूनही चित्रपट भक्कम मदतीखेरीज चालायचं नाव घेत नसेल, तर यात प्रेक्षकांचा दोष किती? कारण राजकारण्यांच्या लोकांची अस्मिता जागृत करणाऱ्या भाषणांपासून , चित्रपटाला मिळालेल्या पुरस्काराच्या यादीपर्यंत एकाही गोष्टीने जर प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळत नसेल , आणि भक्कम मदत मिळालेला - जाणकारांनी कौतुक केलेला चित्रपटही थिएटरमधे पाहून आल्यावरही, केवळ त्यातून पारंपारिक वळणाची करमणूक होत नाही या कारणाने चित्रपटाला सोशल नेटवर्कवर जाहिर शिव्या देण्यात हा प्रेक्षक काहीच गैर समजत नसेल, तर यात प्रेक्षकांचा दोष नाही तरी कसं म्हणायचं?

'फिल्म सोसायट्यांचं एक आवडतं वचन आहे, की आपण चांगले प्रेक्षक बनेपर्यंत आपला चित्रपट सुधारणार नाही'. या वचनावर माझा विश्वास नाही. प्रेक्षक सुधारणं आणि चित्रपट सुधारणं या एकाच सुमाराला, हळूहळू घडणाऱ्या क्रिया आहेत. एक संपूर्ण बदलेपर्यंत दुसरीने ढिम्म हलू नये असं होणं बरोबर नाही, तसं व्हायचंही नाही. त्यामुळे प्रेक्षक आधी बदलणार नाही, हे आलच. मात्र आपला चित्रपट बदलत असल्याचं लख्ख दिसत असताना, त्याच्यापुढे काय अडचणी आहेत हे ठाऊक असतानाही जर प्रेक्षकाने या बदलत्या चित्रपटाला मदत करण्यासाठी काहीच हालचाल नं करणं, आपली करमणूकीची व्याख्या बदलायचा जराही प्रयत्न न करणं हा हलगर्जीपणा आहे. त्यातही आज चित्रपट बदलल्यावर उद्या त्यांनी बदलावं असंही कोणाचं म्हणणं नाही. पण नाही म्हंटलं तरी आता श्वासला दहा बारा वर्ष होऊन गेली. अजूनही आपल्या प्रेक्षकाला आजूबाजूचं चित्र बदलल्याचं लक्षातच येत नसेल, तर कमाल आहे.
मध्यंतरी माझा एक मित्र म्हणाला की मराठी प्रेक्षकांच्या डोक्यातून करमणूक हा शब्द काढून टाकून त्याजागी आस्वाद हा शब्द घालायला हवा, तरच काही बदल संभवेल. त्याचं हे म्हणणं तंतोतंत खरं आहे. ते करायचं कसं, एवढाच प्रश्न आहे. प्रेक्षकांचा हा निरुत्साह, चित्रपटांमधला बदल दहा पंधरा टक्क्यांच्या वर नं सरकण्यामागचं एक महत्वाचं कारण मानता येईल. मागणी तसा पुरवठा, आणि पुरेशी मागणी नसताना चांगल्या सिनेमाची बाजारपेठ अचानक विस्तारणार तरी कशी, नाही का?
प्रेक्षकांनी उत्तम चित्रपटांना दिलेली वाईट वागणूक मी अलीकडच्या दोन चित्रपटांच्या वेळी पाहिली. पहिला नागराज मंजुळेचा फॅन्ड्री, आणि दुसरा चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट. फॅन्ड्रीला मार्केटींग स्ट्रॅटेजीमधे प्रेमकथा असल्याचं भासवलं गेलं हे खरं आहे, त्यामुळे त्या अपेक्षेने आलेला प्रेक्षक थोडा वैतागला हे खरच, ( त्या अपेक्षेने येऊनही फँड्री आवडलेला प्रेक्षक होता , शिवाय महत्वाचं म्हणजे अशा वेगळ्या प्रकारच्या चित्रपटाला प्रेक्षक आला, चित्रपट चालला, त्यामुळे मार्केटींग स्ट्रॅटेजी अगदीच फसली नाही, हेही इथे नमुद करायला हवं)  पण त्यामुळे त्यांनी समोर दिसणाऱ्या , अनेक पुरस्कार मिळालेल्या आणि समीक्षकांनी कौतुक केलेल्या चित्रपटाला नावं ठेवणं हे एका मोठ्या प्रेक्षकवर्गाला फार काही कळत नसल्याचच लक्षण आहे. प्रेक्षकांना कलाकृती स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क आहे यावर माझं दुमत नाही, किंवा लोकांना मारुनमुटकून काय बरं काय वाईट सांगायला लागावं असही मला वाटत नाही. मात्र इतकं सांगावसं वाटतं, की सर्वच जाणकार जर एखादी गोष्ट मनापासून सांगत असतील, तर केवळ आपली करमणुकीची आजवरची व्याख्या वेगळी आहे या कारणापायी कलाकृतीच्या सिध्द होण्याजोग्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणं हे काही पटण्यासारखं नाही. जाणकारांकडे दुर्लक्ष हा तर मराठी प्रेक्षकाचा खाक्याच म्हणायला हवा. कारण फँड्रीमधे प्रेक्षक चित्रपटाची उणीदुणी काढणारा प्रेक्षक कोर्टला एक पायरी आणखीच वर गेला.
कोर्ट प्रदर्शित झाला तेव्हा त्याची किर्ती फारच मोठी होती. व्हेनिस पासून अनेक मोठ्या महोत्सवातल्या पुरस्कारांना त्याने पटकावलं होतंच, वर आपल्या देशातला सर्वोत्कृष्ट मानाचा चित्रपट पुरस्कार म्हणजे सुवर्ण कमळ, हाही त्याने पटकावला होता. कोर्टबद्दल उत्तम परीक्षणं यायलाही लगेच सुरुवात झाली, त्याचबरोबर नवं काही पहाण्याची तयारी , समज आणि पेशन्स असलेल्या बऱ्याच प्रेक्षकांकडून सोशल नेटवर्कवरही त्याचं कौतुक करण्यात आलं. आता हे पाहून सवयीच्या गोष्टीपलीकडे काहीही पहाण्याची तयारी नसलेला प्रेक्षक बिथरला आणि ' आम्हाला चित्रपट आवडला नाही असं म्हणण्याचा अधिकार नाही का ?'  असा एक चुकीचा सूर लावला गेला. कोर्ट यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात पहिला दुसरा असेल. पण आपल्याकडे ना त्याला हवं तसं वितरण मिळालं, ना पुरेसा प्रेक्षक. हे आता नित्याचच झालय. त्यामुळे एक गोष्ट नक्की. आपल्याकडे मराठी चित्रपटात लक्षणीय फरक हवा असेल, तर प्रेक्षकाच्या मानसिकतेत निश्चित बदल हवा, त्याला पर्याय नाही.
सामान्यत: समीक्षकांवर एक टिका होते, ती म्हणजे समांतर वळणाच्या चित्रपटाला डोक्यावर घेतलं जातं, व्यावसायिकला बाजूला ठेवलं जातं किंवा नकारात्मक तरी लिहिलं जातं. हे काही खरं नाही. समांतर वळणाचे काय, वेगळे विषय असणारे काय किंवा व्यावसायिक काय, सर्व प्रकारच्या चित्रपटांमधे चांगलं वांईट असतच. टिका होते ती या अंगांना धरुन, सरसकट विशिष्ट प्रकारावर नाही. आजचा मराठी चित्रपटही या दोन्ही प्रकारांना ओळखतो. आणि का ओळखणार नाही? त्यांचं अस्तित्व एक उद्योग म्हणून टिकण्यासाठी या दोन्ही विचारधारा आवश्यक आहेत. मात्र या विचारधारांना कोणते निकष लावायचे, याचा मात्र काही वेळा गोंधळ उडताना दिसतो. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकाचाच नाही, तर समीक्षकांचाही.
गंभीर किंवा सेन्सेशनल विषय असलेल्या चित्रपटाचं त्याच्या गुणवत्तेचा विचारच न करता कौतुक करायचं, असा  एक पायंडा आहे , जो धोकादायक अाहे. त्याचप्रमाणे रंजनाची व्याख्या काय याबद्दलही मोठाच गोंधळ आहे. एखादा चित्रपट तुम्हाला गुंतवत असेल, तर त्याला रंजन म्हणता येणार नाही का? त्यासाठी पारंपारिक रचनेचा किंवा नाच गाणी विनोद अशा घटकांचा आधार कशाला घ्यायला हवा? किंवा याचाच कॉन्वर्स म्हणजे हा आधार घेणारा चित्रपट हा बाय डिफॉल्ट रंजक म्हणता येऊ शकतो का? असे प्रश्न अजूनही आपल्याला सोडवता आलेले नाहीत. गुणवत्ता केवळ संदर्भाने कळत नाही. हा चित्रपट त्या दुसऱ्या सारखा आहे, आणि तो दुसरा चित्रपट तर गाजला होता, म्हणजे  तर्काच्या आधाराने हा चित्रपटही चांगलाच असावा, असं समीकरण मांडणं योग्य नाही. जेव्हा कोर्टसारखा एखादा चित्रपट येतो आणि त्याची तुलना करण्यासारखं मराठी चित्रपटांमधे काहीच नसतं तेव्हा आपण गडबडतो. मग इतरांचं एेकून त्याला आंधळेपणाने चांगलं म्हणतो, किंवा आपली पारंपारिक निरीक्षणं वापरुन चित्रपट फसला असं म्हणतो. हे व्हायला नको, त्याएेवजी दर चित्रपटाबद्दल स्वतंत्र मत घडवणाऱ्या एका इन्स्टीन्क्टची आपल्याला आवश्यकता आहे, जो लवकरात लवकर तयार झाला पाहिजे. त्याशिवाय आपण सगळेच चाचपडतो आहोत.
मराठी चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात येतो, तेव्हा तो चालेल का पडेल याचं गणित हे अनेकदा स्पष्ट दिसत असतं. बहुतेक मराठी चित्रपट चित्रपटगृहात फार कमाई करु शकत नाहीत. यात मी वर म्हंटल्याप्रमाणे वितरणाचा अँगल तर आहेच, पण त्याच्याशी जोडलेला आणि प्रेक्षकांकडून सतत बोलला जाणारा आणखी एक अँगल आहे, आणि तो म्हणजे चित्रपटांची संख्या. सोशल नेटवर्कवर हा  प्रश्न मला अनेकदा विचारण्यात येतो की मराठी प्रेक्षकाची आर्थिक क्षमता ही महिन्याला सरासरी दोन तीन मराठी चित्रपट पहाण्याची आहे. आता जर महीन्याला दहा पंधरा चित्रपट प्रदर्शित व्हायला लागले तर आम्ही ते पहायचे कसे? आणि मग ते पडले तर प्रेक्षकांच्या माथी खापर का?
प्रश्न काही प्रमाणात रास्त आहे पण पूर्णपणे नाही. आपल्याकडल्या मराठी माणसाची महिन्याला केवळ दोन तीन टॅक्स फ्री  सिनेमे पहाण्याइतकी बेताची परिस्थिती आहे असं वाटत नाही. शिवाय खान कंपनी आणि इतरांचे जे हिंदी चित्रपट सुपरहिट होतात ते पूर्णत: अमराठी प्रेक्षकांच्या जीवावर असंही वाटत नाही. त्यामुळे दोन तीन, या आकड्याचा संबंध परवडण्यापेक्षा चॉईसशी असावा. मात्र तो आकडा फारच कमी आणि काळजी करण्यासारखा आहे, कारण चित्रपटमहामंडळापासून ज्येष्ठ निर्मात्यांपर्यंत अनेकांचे सर्व चित्रपटांना वितरणासाठी समाधानकारक तारखा, वेळा मिळाव्यात या दृष्टीने प्रयत्न चालले असले, तरी त्यांचं गणित सहज सुण्यातलं नाही. वर्षाला शंभर सव्वाशे चित्रपट येत असले, वर्षाला बावन्नच आठवडे असले आणि त्यातलेही काही परीक्षांच्या वेळा, सणवार, मोठे हिंदी रिलीज यांनी खाऊन टाकलेले असले, तर दर आठवड्याला दोन तीन चित्रपट प्रदर्शित होण्यावाचून इलाजच उरत नाही. अशा वेळी प्रेक्षकाला काय पहावं , काय नाही, याचा विचार करता आला, तर काही चांगल्या चित्रपटांना मदत होण्याची आणि सुमार चित्रपट आपोआप वगळले जाण्याची शक्यता आहे. असे ते कायम वगळले गेले तर प्रेक्षकाना काय आवडतं काय नाही याचं एक चित्र उभं राहू शकतं, पण निवडीत सुस्पष्टता नसल्याने ते होताना दिसत नाही.
चुकीच्या वेळा हा चित्रपटाना कायमच सतावणारा प्रश्न. आणि कदाचित मराठी आशयपूर्ण मराठी चित्रपटांचं मोठं नुकसान करणारा. मध्यंतरी चित्रपटाना संध्याकाळची वेळ मिळावी असा एक फतवा  सांस्कृतिक मंत्र्यांनी काढून पाहिला, पण तो मल्टीप्लेक्स मालकानी आणि हिंदी निर्मात्या वितरकांनी इतक्या चतुराईने गुंडाळला की कोणाला काही कळलच नाही. मराठीला प्राईम टाईम निश्चित मिळायला हवा पण खरं तर दुपार पासून रात्रीपर्यंत साराच प्राईम टाईम असतो अशा घोषणेने त्यांनी मराठी चित्रपटांकडे आपलं लक्ष आहे हेही दाखवलं आणि परिस्थितीत काहीही बदल होणार नाही हेदेखील पाहिलं. इतर राज्यांमधेही व्यावसायिक चित्रपटांचं वर्चस्व असतं आणि आशयाला महत्व देणारा चित्रपट मागे असतो, पण निदान ते सारं त्यांच्याच भाषेतलं असतं. आपल्याकडला सर्व कारभार हा हिंदी धार्जीणा आहे ज्यामुळे मराठी चित्रपटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतय. अर्थात , सरकार यावर मार्ग काढील या भ्रमात आपण नं राहिलेलच बरं.
आता या सगळ्या बिकट परिस्थितीत मराठी चित्रपट निघत रहातायत याचं कौतुक करावं, का त्यातले बहुसंख्य दर्जेदार नाहीत याचं दु:ख करावं? आणि ज्यांना आपण दर्जेदार म्हणतो त्यांचा दर्जाही कोणत्या फुटपट्टीवर मोजायचा?  हे सारे जागतिक पातळीवरचे चित्रपट मानले जावेत का? आणि जाणार नसले तर त्यांचं मूल्यमापन कसं करायचं?
मला विचाराल तर सर्व चित्रपटांची तुलना जागतिक चित्रपटांबरोबर करुच नये. प्रत्येक चित्रपटाची त्या माळेत जाऊन बसण्याची महत्वाकांक्षा नसते, अनेकदा त्यांना तशी गरजही वाटत नाही. ऑस्करला नॉमिनेटेड दर सिनेमा हा जागतिक वळणाचा असतो का? नाही ना? त्यांचे वेगळे नियम असतात. तसच कोणत्याही मराठी चित्रपटाने आपला प्रेक्षक ओळखणं आणि त्यांना मूर्ख न समजता , त्यांना जुनाच माल नव्या वेष्टनात न विकता , प्रामाणिकपणे काही देणं, हे पुरे आहे. आता गेल्या वर्षी प्रेमकथा या सदरात बसणारे इतके चित्रपट आले पण त्यातला प्रकाश कुंटेचा कॉफी आणि बरच काही लक्षात राहिला तो त्याच्या साधेपणाने, उस्फूर्तपणाने. अभिजित पानसेचा गुन्हापट  रेगे लक्षात राहिला तो त्यात वर्तमानाची जाण दिसल्याने, रचनेतल्या कौशल्याने. या चित्रपटांना आपण नक्कीच चांगले चित्रपट म्हणू शकतो. त्यासाठी लगेच जागतिक सिनेमा गाठण्याची गरज नाही.
गेल्या वर्षी खराखुरा जागतिक चित्रपट म्हणावासा एकच चित्रपट होता आणि तो म्हणजे कोर्ट. तो सर्वाना आवडला नसेलही आणि अनेकाना नाही आवडला हे खरच आहे, पण त्याची दृष्टी ही खरोखरच वर्षभरातल्या एकाही मराठी सिनेमासारखी नव्हती. त्याला गोष्ट सांगायची नव्हती तर व्यवस्थेवर नजर टाकायची होती आणि ती सांगताना प्रेक्षकाना परिचित वाटावं म्हणून कोणतीही तडजोड करण्याची त्याची तयारी नव्हती. गतिमान कॅमेरा आणि क्लोजअप्सच्या युगात फिक्स्ड कॅमेरावर पकडलेल्या त्याच्या वाईडस्क्रीन फ्रेम्सच खूप काही सांगून गेल्या . त्याची खरीखुरी माणसं  वाटणाऱ्या नॉनअॅक्टर्सची निवड, प्रसंगाच्या आगेमागे असलेल्या अवकाशाचा शोध, अनपेक्षित शेवट, हे सारंच एका अतिशय टोकाच्या नियंत्रणाखाली होतं. तो यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणावा का? कदाचित !
गेल्या दहा वर्षांच्या टप्प्यात आपण इथवर येऊन पोचलो आहोत. संख्यात्मक वाढ जोरात पण दर्जात्मक परिस्थिती काळजी करण्यासारखी. जी आहे तीदेखील वितरणातल्या मोठ्या माशांच्या मदतीने उभी असणारी. आता पुढे काय? निर्मिती - वितरणातल्या कॉर्पोरेट सेक्टरच्या मते आजचं  चित्र खूप आशादायक आहे. आज जिथे दोन तीन मोठ्या कंपन्या आहेत तिथे उद्या पाच सहा होतील. आज जर त्यांच्या छत्राखाली दहा सिनेमे बनत असतील तर उद्या पंचवीस बनतील. आज जे वितरण करतायत ते उद्या निर्मिती करतील, अशा रितीने मराठी सिनेमाचा दुसरा सुवर्णकाळ लवकरच आपल्यापुढे अवतरेल. असं झालं तर आनंदच आहे, पण तसं होईलशी मला खात्री नाही.
जेव्हा मोठ्या संस्था क्षेत्रात उतरतात, तेव्हा त्यांना दर गोष्टीवर त्यांचं नियंत्रण लागतं. मग त्यांचा क्रिएटीव इंपुट हा ग्राह्य मानावा लागतो, त्यांच्या गणितात बसणाऱ्या गोष्टींवरच काम करावं लागतं, ते म्हणतील ते मानावं लागतं. हे सारं करुन आपला टिव्ही उद्योग पैशांनी किती श्रीमंत झाला हे आपण पहात असलो तरी त्याच्या वैचारिक बाजूचं कसं भजं झालं हेही आपण पाहिलय. दिग्दर्शक हा चित्रपटाचा कॅप्टन आहे. पुढल्या वाटचालीतही तो अग्रस्थानी राहून त्याच्या नेतृत्वाखालीच जर गोष्टी घडल्या, तर आपला चित्रपट लवकर सुधारेल. त्यासाठी आपल्याकडे अनेक उत्तम दिग्दर्शक आहेत , त्यांच्याकडे दृष्टी आहे, कल्पना आहेत, पेट प्रोजेक्ट्सही असतालच. पण का कोण जाणे मराठी चित्रपटाची येऊ घातलेली भरभराट दिग्दर्शकाच्या भूमिकेला तोच मान देईल का, याबद्दल मी साशंक आहे. आणि जर का कलावंताचं कलाकृतीवरचं नियंत्रण जाऊन ते लोकशाही तत्वावर गेलं, वा चुकीच्या हुकूमशहाकडे गेलं, तर त्याचं काय होईल हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही.
हे शक्य आहे की कोणाला हा अतिशय निराशावादी दृष्टीकोन वाटेल. असेलही. काय होईल ते लवकरच कळेल. घोडामैदान जवळ आहे.
- गणेश मतकरी

3 comments:

Vikrant Kelkar January 20, 2016 at 7:58 AM  

best.
Nostalgia.
i subscribed lokprabha for articles of bhosale sir and sakal for matkari sir.

Vivek Kulkarni January 23, 2016 at 3:27 AM  

मराठी प्रेक्षकांनी वैचारिक कम्फर्ट झोन मधनं बाहेर येणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला सिनेमाकडून काय हवं आहे मनोरंजन की काही तरी वेगळं बघितल्याचा अनुभव हे ठरवणं गरजेचं आहे. ते होत नाही. माझे काही मित्र आता वैताग आणणारे मराठी सिनेमे बघत नाहीत. शाळा-कॉलेजात बघितलेला सिनेमा व आता नोकरी-व्यवसाय निमित्ताने आलेला जगाचा अनुभव ते सिनेमातल्या पात्रांशी ताडून बघायला लागतात तेव्हा त्यांना मनोरंजनात्मक सिनेमातला फोलपणा चटकन जाणवायला लागतो. त्यांनी बऱ्याचदा तसं बोलून दाखवलंय. वर्तमानपत्रात येणारे रिव्ह्यूज वाचून सिनेमा बघायचं का नाही हे ठरवणारे खूप आहेत जे नंतर सिनेमा बघून त्यावर चर्चा करतात. अर्थात यात सुद्धा झेपणाऱ्या सिनेमातील वेगळेपणा इतपतच राहतं. कोर्ट सारख्या सिनेमाला मात्र सरसकट कंटाळवाणा असाच सूर होता. दिग्दर्शकाने तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने वापरल्यात ही बाब शिकण्यासारखी आहे हे नको होतं. तसेच संकलनावर भर दिलेला, झटपट पुढे कथानक सरकणाऱ्या सिनेमामुळे असाच सिनेमा असतो ही भावना कोर्टमधलं चित्रीकरण न कळण्यासारखं राहिलं. सिनेमा बघण्या व्यतिरिक्त त्याबद्दल किंवा इतर सिनेमांबद्दल वाचून जगात काय चाललंय हे जाणून न घेणे सुद्धा चांगल्या सिनेमाचं आकलन करायला अपुरं पडतंय. अगदी दिवाळी अंकात सिनेमाविषयी लेख असतात ते सुद्धा न वाचणं यांच्याकडून केलं जातं. मग चांगल्या व दर्जेदार सिनेमाबद्दल सरसकट शेरेबाजी केली जाते. हायवेच्या प्रिमिअरसाठी गिरीश कुलकर्णी लातूरला आले होते तेव्हा त्यांनी हीच बाब अधोरेखित केली की प्रेक्षकांनी आता थोडं पुढे येउन प्रदर्शित सिनेमा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ते लवकरात लवकर झालं तर निर्माता-दिग्दर्शकांना हायसं वाटेल.

Unknown January 23, 2016 at 9:57 PM  

Thanks Vikrant. Vivek, court was a highly entertaining film. audience did not get it is just another sign of their refusal to think.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP