ऑस्कर निमित्ताने

>> Sunday, January 24, 2016




मी शाळेत असताना ऑस्कर आणि ग्रॅमी पारितोषिकांची तेवढ्यापुरती हवा असल्याचं आठवतं. म्हणजे या दोन्ही पारितोषिकांची किर्ती कानावर होती, त्या समारंभांचे हायलाईट्स पहायला मिळत( लाईव टेलिकास्ट आठवत नाही, पण बहुधा नाहीच) , एक दोन चॅनल्स च्या जीवावर चालणाऱ्या  टिव्हीवर माफक प्रमाणात जाहिरात केली जात असे, आणि ऑस्करच्या रात्री उशीराने ( समारंभ त्यांच्याही रात्रीच असल्याने, आपल्या सकाळी ऑलरेडी होऊन गेलेला असायचा, पण पारितोषिकप्राप्त कोण ठरलं, याची विशेष कल्पना नसायची. अर्थात, त्यातले बरेचसे चित्रपट हे आपल्याकडे दिसलेलेच नसल्याने, तेव्हा विजेत्यांचं कौतुकही मर्यादीतच)सगळे भक्तीभावाने समारंभाचा अंश पाहून घेत. त्यावेळी कौतुक असायचं, ते कोण जिंकतं वा हरतं यापेक्षा तो समारंभ कशा पध्दतीने सादर होतो यालाच.
आता अर्थात ही परिस्थिती बदलली आहे. आता त्यांच्याप्रमाणेच आपल्याकडेही गोल्डन ग्लोबच्या निकालाबरोबर ऑस्करचं वारं वहायला लागतं आणि ऑस्कर नॉमिनेशन्स जाहिर झाली की त्याला गती मिळते. त्यांच्याकडे अर्थात हे चित्रपट येऊन गेलेले असतात, त्यामुळे सर्वसाधारण प्रेक्षकाला ते पुन्हा मोठ्या पडद्यावर पहायची संधी मिळणार नसते. आपल्याकडचं चित्र मात्र असं असतं, की यातले माफक चित्रपट हे आधी लागून गेलेले असतात, जसे या वर्षीचे द मार्शन,मॅड मॅक्स: फ्युरी रोड, द ब्रिज ऑफ स्पाईज, किंवा स्टार वॉर्स द फोर्स अवेकन्स. हेदेखील लागतात, ते त्यांच्या दर्जापेक्षा व्यावसायिक शक्यता उघड झाल्यामुळे, पण जसजसा ऑस्कर समारंभ जवळ येतो, तस तसे नामांकनात असणारे अधिकाधिक चित्रपट पडद्यावर यायला लागतात आणि ऑस्कर वातावरणनिर्मिती वाढत जाते. आताही आपण पहातोय, की द हेटफुल एट, डेनिश गर्ल, जॉय हे नुकते प्रदर्शित झाले आहेत, आणि यंदा सर्वाधिक म्हणजे बारा नामांकनं मिळवलेल्या, आणि अनेक नामाकनांनंतर बहुधा लिओनार्डो डिकाप्रिओला आॅस्कर मिळवून देण्याची शक्यता तयार करणाऱ्या आलेहान्द्रो इन्यारितूच्या द रेवेनन्ट पर्यंत अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यामुळे ज्यांना या चित्रपटांमधे रस असेल, त्यांनी सध्या मोठ्या पडद्याकडे नजर ठेवलेली बरी.
अर्थात, यातलं सारच काही पडद्यावर येईल असंही नाही,त्यामुळे जे सहज मार्गाने मिळणार नाही त्याला वाकड्या मार्गाने शोधणारेही अनेक असतील. या प्रकाराकडे , म्हणजे पायरसीकडे, सर्वसामान्यपणे गुन्हा म्हणून पाहिलं जात असलं, तरी मला तो शब्द जरा टोकाचा वाटतो. ऑस्कर नामाकनं पाहून , वेळात ते चित्रपट मिळवून पहाणाऱ्या रसिकांमधे ( यातले अनेक जण तरुण वर्गातले असतात) एक अभ्यासूपणा निश्चित असतो, निदान आपण काय पहातोय याबद्दलचं गांभीर्य तरी. आणि जर का त्यांना सनदशीर मार्गाने हे चित्रपट उपलब्ध होऊ शकत नसतील, तर त्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
पुन्हा सनदशीर मार्गाने उपलब्ध होणाऱ्या चित्रपटांचंही सारं आलबेल आहे अशातला भाग नाही. मला असलेल्या भीतीप्रमाणेच टेरेन्टीनोच्या 'द हेटफूल एट' चित्रपटाला प्रौढांसाठी घोषित करुन वर काटछाट, शब्द म्यूट करणं यासारखे अत्याचारही त्यावर केल्याचं दिसून आलय. प्रौढांसाठी चित्रपट असल्याचा दाखला देऊनही त्यात काटछाट करणं  हा सेन्सॉर बोर्डचा नित्याचा आणि शुध्द मूर्खपणा आहे. वितरकांना, निर्मितीसंस्थांना, जर चित्रपट कमी वयोमर्यादेच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा असेल, तर काटछाट करुन वयोमर्यादेत सवलत देणं हे समजण्यासारखं आहे. पण एकदा का चित्रपट एका वयापलीकडच्या प्रेक्षकांसाठी आहे हे गृहीत धरलं, की त्यात दुरुस्त्या सुचवण्याची हिंमत सेन्सॉरने का करावी? हे सर्रास आणि अनेक महत्वाच्या दिग्दर्शकांबाबतचं त्यांचं धोरण आहे जे नक्कीच निंदनीय मानता येईल. असो.
मध्यंतरी मला कोणीतरी ऑस्करबाबत प्रश्न विचारला होता, की आपला राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट आणि ऑस्कर विजेते चित्रपट यांची तुलना शक्य आहे का? खरं सांगायचं, तर हा प्रश्न फारसा योग्य नाही. कारण ऑस्कर पारितोषिकं आणि आपला राष्ट्रीय पुरस्कार यांमधे एक मूलभूत, धोरणात्मक मानता येईल असा फरक आहे. ऑस्कर पारितोषिकं, ही कायमच व्यावसायिक चित्रपटांची, व्यावसायिक दृष्टीने देण्यात आलेली पारितोषिकं असतात. समांतर वळणाच्या अमेरिकन इंडिपेन्डन्ट चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी 'इंडिपेन्डन्ट स्पिरीट अवॉर्ड' नावाची वेगळी पारितोषिकं असतात, ज्यांचं वितरण ऑस्कर पुरस्कारांच्या आदल्या दिवशी केलं जातं.त्यांचा दृष्टीकोन हा अधिक कलाभिमूख आणि आपल्या  राष्ट्रीय पुरस्कारांमागच्या कलेला अधिक महत्व देण्याच्या भूमिकेशी सुसंगत असतो.
गंमत अशी, की  ऑस्करकडून ती अपेक्षा नसतानाही, गेल्या काही वर्षातली पारितोषिकं पाहाता लक्षात येईल की ऑस्करनेही आपला दृष्टीकोन काहीसा बदलून अधिक मोकळा केला आहे. त्याशिवाय साईडवेज ( २००४ , ऑस्करला पाच नामाकनं, आधारित पटकथा विभागात विजेता,स्पिरीट अवॉर्डमधे उत्कृष्ट चित्रपटासह सहा नामांकनं, सर्वात विजेता) बॉयहूड (२०१४, ऑस्करला सहा नामांकनं, सहाय्यक अभिनेत्री विभागात विजेता , स्पिरीट अवॉर्डमधे पाच नामाकनं, दिग्दर्शन आणि सहाय्यक अभिनेत्री विभागात विजेता) यासारखे चित्रपट आॅस्कर नामांकनातच येऊ शकले नसते. दरवर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनात या दोन अवॉर्ड्समधे कोणी ना कोणी कॉमन असतच. यंदा स्पॉटलाईट, या टॉम मॅकार्थी दिग्दर्शित चित्रपटाची वर्णी दोन्ही ठिकाणी लागलेली आहे. तरीही जर आपल्याला खरोखर नॅशनल अवॉर्ड्सची तुलना करायचीच असेल, तर ती स्परीट अवॉर्ड पेक्षाही ऑस्करच्या परभाषिक चित्रपट पुरस्कारांशी करावी लागेल. जगभरातून अनेक देशांनी  पाठवलेल्या चित्रपटांना निवडताना जे निकष लावले जातात ते खरोखरच केवळ कलामूल्याचे असतात. आणि आपल्याकडे , खासकरून प्रादेशिक चित्रपटांमधून याप्रकारचे चांगले चित्रपट बनत असतात. ते ऑस्करला पाठवतानाची निवड मात्र नेहमी जमतेच असं नाही.
परभाषिक पुरस्कारांच्या मुद्द्यावर आलोच आहे, तर कोर्टविषयी बोलल्याखेरीज पुढे सरकता येणार नाही. या वर्षी आपण ऑस्करकरता पाठवलेला चित्रपट, अर्थात चैतन्य ताम्हणेचा कोर्ट एका नस्त्या वादाचं कारण झाला होता. वाईट याचं वाटतं, की क्वचितच आपण या योग्यतेचा चित्रपट पाठवू शकतो, पाठवतो. दुर्दैवाने या निवड प्रक्रियेत जे वाद घडले, त्यांनी या चांगल्या निवडीवर एक प्रश्नचिन्ह उभं केलं.

आपल्याकडे हल्ली एक सवय लागून गेलीय. 'जे मला स्वत:ला व्यक्तीगत पातळीवर उमजू शकलं नाही, ते सुमार आहे', असं म्हणून टाकायची. पूर्वीही सहजपणे अर्थ न लागणाऱ्या कलाकृती असत, पण ज्यांच्या मनात शंका उपस्थित होई, ते 'आम्हाला हे कळलं नाही',म्हणून थांबत. त्यापलीकडे जाऊन त्याच्या दर्जावर ठाम भाषण करण्याची कोणाला आवश्यकता वाटत नसे. एखादी गोष्ट न समजण्यात गैर काहीच नाही. सगळ्याना सगळं समजतं, सगळं समजायला हवं असं थोडच आहे? काहींना अकाऊंट्समधलं कळत असेल, काहींना वास्तुकलेतलं कळत असेल, काहींना पाकक्रियेतलं कळत असेल, तसच काहींना सिनेमातलं. तरीही चित्र, सिनेमा यासारख्या गोष्टी प्रत्येकाला उस्फूर्तपणे कळतात, त्यासाठी नजर तयार होण्याची गरजच नाही, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. या समजातून, तसच सोशल मिडीआने देऊ केलेल्या कोणत्याही जबाबदारीशिवाय मुक्तपणे मतप्रदर्शन करण्याच्या हौसेमधून हा ठाम नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. ( राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीनंतरही असाच नकारात्मक प्रतिसाद उफाळून आलेला आपल्याला दिसतो. या बक्षीसपात्र चित्रपटांची नावंही आम्ही कधी एेकली नाहीत , यांच्यातले काही प्रदर्शितही झाले नाहीत, मग आता यांना पुरस्कार कसा, असं चवताळून लिहीलेली पत्र दर राष्ट्रीय पुरस्कारानंतर पेपरात आलेली दिसतात. फेसबुक वगैरेवरही या प्रकारची टीका असते). या वेळी आपण हे विसरतो, की ही निवड, मग ती ऑस्करसाठी पाठवण्याच्या चित्रपटाची असो, किंवा राष्ट्रीय पुरस्कारांमधली असो, ही त्या विषयातल्या तज्ञांनी केलेली असते, प्रेक्षकांच्या कौलावर ती केली जात नाही.
यंदाची कोर्टची निवड योग्य होती यात शंकाच नाही. आता कोर्ट ला जेव्हा परभाषिक नामांकनात स्थान मिळालं नाही, तेव्हा या आपलं मत हाच दर्जा मानणाऱ्या लोकांचं आयतं फावलं आणि 'पहा, आम्ही सांगत नव्हतो', असाएक सूर पुढे यायला लागला. हा सूर बाजूला राहूदे. कोर्ट नामांकनात आला नाही त्याची साधी कारणं असू शकतात. एकतर बरोबरचे चित्रपट त्याहून अधिक चांगले असतील, किंवा  दुसरं म्हणजे, त्यांचं या चित्रपटावर एकमत झालं नसेल. जेव्हा अनेक चांगले चित्रपट एकत्रितपणे विचारात घेतले जातात तेव्हा असं होण्याची शक्यता असतेच. माझ्या दृष्टीने मात्र आपल्या बाजूने केलेली ही निवड योग्य होती आणि हाच दर्जा आपण कायम राखला तर आपल्यासाठीही ऑस्कर दूर असणार नाही.
गणेश मतकरी

2 comments:

Vivek Kulkarni January 24, 2016 at 5:06 AM  

एखादा कोर्ट अशा वेळी निवडीला येऊ शकतो. दरवर्षी असे सिनेमे येतीलच असे सांगता येत नाही. प्रादेशिक भाषेत तयार होणारे सिनेमे युनिवर्सल एलेमेंट किती दाखवतात यावर ते अवलंबून आहे. तसेच निवड करणारे पारिभाषिक ऑस्कर सिनेमात काय आहे जे भारतीय सिनेमात नाही याची पडताळणी करत असतील का? ज्यामुळे त्याची निवड करता यावी. श्वासच्या वेळी आजोबा-नातुच्या संबंधाचा मुद्दा निवडीला कारण होता असं म्हटलं गेलं. त्यामुळे पारिभाषिक ऑस्कर मिळणाऱ्या सिनेमांचा अभ्यास आपला कमी पडतोय का? जागतिक सिनेमे बघून त्यावर विद्वतापूर्ण चर्चा करताना त्यात पारिभाषिक ऑस्कर मिळणाऱ्या सिनेमांवर फारशी चर्चा केल्याचं ऐकण्यात किंवा वाचण्यात येत नाही. कदाचित ते सिनेमे बघून आपण कुठल्या पद्धतीचा सिनेमा बनवावा याचा अंदाज येईल. एक निश्चित दिशा कळली तर कथा शोधता येईल. अर्थात या ऑस्कर मिळायलाच पाहिजे या अट्टाहासाने नव्हे तर एक उच्च दर्जाचा सिनेमा पाठवण्यात यावा या अर्थाने. तसेच ऑस्करची पाठवायची निवड प्रक्रिया वेगळी व राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडायची वेगळी त्यामुळे सुवर्ण कमळ विजेता ऑस्करसाठी पाठवलाच जातो असं नाही. उलट तोच पाठवला तर ते योग्य ठरणार नाही का?

ganesh January 24, 2016 at 5:37 AM  

सुवर्ण कमळ विजेता दर वेळी पाठवणं योग्य होणार नाही. कधी होईल कधी नाही. उदाहरणार्थ देऊळ अजिबात योग्य नव्हता. टिंग्या/फॅंड्री / लंचबॉक्स चालले असते यातल्या कोणालाही सुवर्णकमळ नव्हतं.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP