नात्यांचा कलात्मक शोध

>> Tuesday, April 29, 2008

रॉबी या सातवर्षीय उनाड छोक-याची पहाट रोज कस‌ल्याशा गूढ आवाजाने भीतीदायक ठरत अस‌ते. कुतूहल शमविण्यासाठी एका विचित्र क्षणी त्या आवाजाचा माग काढत घराजवळच्या बसस्टॉपजवळ तो स्वतःला नेतो. तेथे वाट पाहणारा माणूस दिशादर्शकावर रुपयाचं नाणं वाजवताना त्याला दिसतो. वेळ पुढे घालविण्यासाठी आपण असं करत असल्याचं स्पष्टीकरण रॉबीच्या प्रश्नावर तो देतो. मग आपली बस आल्यानंतर तेच नाणं रॉबीच्या हातावर टेकवतो. आता वेळ पुढे घालविण्याची जबाबदारी आपल्यावर आली, या भावनेने रॉबी त्या दिशादर्शकावर नाणं वाजवू लागतो, आणि स‌मोर उगवणारा सूर्य त्याला वेगात वर येताना दिसू लागतो.
लेखक,दिग्दर्शक मिरांडा जुलैच्या `मी अँड यू अँड एव्हरीवन वी नो` या चित्रपटातील ही घटना अगदीच क्षुल्लक वाटावी, पण रॉबीच्या आकलनविश्वावर भयंकर परिणाम करणारी, शिवाय दिग्दर्शनाच्या कलाकुसरीमुळे या चित्रपटाचा परमोच्चबिंदू ठरलेली. लांबलचक नाव धारण केलेला हा चित्रपट एकट्या रॉबीचीच गोष्ट सांगत नाही, तर सुमारे डझनभर पात्रांच्या स‌मस्येला हात घालतो. आजच्या वेगवान जीवनशैलीने स‌माजापुढे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचे गंभीर परिणाम यात दाखवतो . मात्र या परिणामांकडे पाहण्याची नजर तिरकस ठेवल्याने भरपूर मनोरंजनासोबत हा चित्रपट आपल्या प्रस्थापित संकेतांना सातत्याने धक्केही देऊ पाहतो.
कलात्मकतेची उंची गाठूनही पुरेसा प्रेक्षकवर्ग मिळविण्यात अपयशी ठरलेला 2001 मधील `सेंटर आँफ दी वर्ल्ड ` हा सिनेमा मध्यंतरी अपघाताने पाहण्यात आला होता. प्रेटी वूमनचा वास्तववादी अवतार अशी संभावना (आणि काहीअंशी कौतुकही) या चित्रपटाबाबत झाली होती. वरवरचं संक्षिप्त रूप सोडलं तर प्रेटी वूमनच्या जातकुळीशी कणाचाही संबंध नसल्याचे हा चित्रपट पाहत असताना जाणवलं होते.शिवाय हा चित्रपट स्मरणात राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे, चित्रपटाला नसलेला शोकांत किंवा सुखांत असा अनिश्चित शेवट. ज्याला हवा तसा तो घ्यावा ही भूमिका दिग्दर्शक आणि त्याच्या दिमतीला असणा-या तीन पटकथाकारांनी घेतली होती. हा संदर्भ येथे देण्याचे कारण, या चित्रपटाच्या विचित्र शेवटाला कारणीभूत ठरलेली पटकथाकार मिरांडा जुलै हिने सेंटर आँफ दी वर्ल्डच्याच कथारचनेचा मी अँड़ यू.. मध्ये केलेला भिन्न वापर. सेंटर आँफ दी वर्ल्डमधील दोन पात्रांमधून पिढीगणीक बदलत जाणारी मूल्य व वाढत असलेला एकाकीपणा यांवर करण्यात आलेल्या निर्देशावर अनेकअंगी विचार आणि सजावटीसाठी आपल्या कलात्मक जाणिवांची उत्स्फुर्त उधळण यातून मी अँड यू..चा आराखडा तयार झाला आहे.
कान चित्रपट महोत्सवामध्ये नव्या दिग्दर्शकांना दिल्या जाणा-या पारितोषिकाकरता पदार्पणातच मी अँड यू..साठी 2005 साली मानकरी ठरलेल्या मिरांडा जुलैचं याआधीचं काम पाहिलं तर थक्क व्हायला होतं. गेल्या दहा वर्षांमध्ये लघूकथा, पटकथा,हॉशी लघूपट.संगीत, अभिनय या प्रत्येक प्रांतात तिने उल्लेखनीय कामगीरी केलेली दिस‌ते. ( पाहा यू ट्यूबवर ः Getting Stronger Every Day, The Amateurist सारखे तिचे अनुक्रमे 7 आणि 14 मिनिटांचे लघूपट किंवा No one belongs here more than you या कथासंग्रहाची भन्नाट वेबसाईट ) मी अँड यू..मध्ये एकसरळ कथानक नाही. त्याऎवजी खूप सा-या घटनांच्या तुकड्यांना एकत्र जोडले आहे. काही अत्यंत क्षुल्लक वाटाव्यात अशा आजूबाजूला कायम घडताना दिसणा-या, तर काही वरवर साध्या वाटल्या तरी अर्थगर्भपूर्ण घटना घेऊन जे काही सांगायचंय ते चटकन स‌मजेलशा पद्धतीने मांडत जायचा दृष्टिकोन मिरांडा जुलै हिने स्वीकारला आहे. त्यासाठी आपल्या लघूकथांमधील विचित्र काल्पनिक घटना, पात्रांमधील संवाद, डाय-यांमधील नोंदी, स‌हज सुचलेल्या कवितेच्या ओळी, व्हिडियो आर्टीस्ट म्हणून काम करताना आलेले प्रत्यक्ष अनुभव यांचा वापर केला आहे. विशेष म्हणजे या गोष्टींनी चित्रपट सोपा करत जाण्याचा प्रकार येथे मारक ठरण्याऎवजी भलताच यशस्वी होत गेला आहे.
कॅमेरा काही सेकंदात एका हॉशी व्हिडीयो आर्टीस्टला कलामग्न अवस्थेत ज्या खुबीने पकडतो तितक्याच स‌हजतेने रॉबीच्या कुटुंबाची विभक्त होण्याची प्रक्रिया दैनंदिन घाडामोडींइतकी सामान्य वाटावी अशी दाखवतो. घटस्फोटामुळे रॉबी आणि त्याच्या भावाची जबाबदारी अचानक अंगावर पडलेला विक्षिप्त रिचर्ड (जॉन हॉक्स), एल्डर कॅब चालवणारी आणि फावल्यावेऴात लघूपट तयार करणारी ख्रिस्टीना (मिरांडा जुलै), पहिल्या सेक्स प्रँक्टीससाठी कुणी गिनीपीग सापडतोय का, हे शोधणा-या वयात आलेल्या दोन मैत्रिणी, त्यांच्याविषयी रोज सार्वजनिक ठिकाणी अश्लील मजकूर लिहिणारी तथाकथित व्यक्ती, 20 वर्षांनी होणाऱया आपल्या लग्नाला लागणारा हुंडा आत्तापासून जमवावा असा विचार करणारी आठ वर्षाची पोक्त मुलगी, ख्रिस्टीनाचं काम न पाहताच नाकारणारी स्थानिक कलादालनाची प्रमुख, तिच्या एल्डर कॅबमधून प्रवास करणारा वृद्ध गृहस्थ, रॉबी व वयाने दुप्पट असलेला त्याचा भाऊ वापरत असलेला संगणक, रिचर्ड काम करतो ते शूज शोरूम हे यातले म्हटले तर मुख्य घटक. कारण चित्रपटाचा बहुतांशी भाग याभोवती फिरत राहिला तरीही कुणा एका दोघांवर स्थीर राहत नाही. पण यातील प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न एकच असल्याचं उमजू लागल्यावर या स‌गळ्यांमध्ये प्रेक्षक काही क्षणातच गुंतू लागतो.
आधीच सैरभैर असलेल्या रिचर्डच्या मनात आपल्या मुलांचे चांगले संगोपन करायचे आहे. मात्र ते कसे, याबाबत गोंधळ उडाल्याने आणि त्यासाठी केले जाणारे स‌र्व प्रयत्न तोकडे पडल्यामुळे मुलांपासून तो आपोआप लांब जाऊ लागतो. या मुलांनीही आई-वडिलांच्या घटस्फोटाला रुटीन घटना म्हणून स्वीकारलंय. घरात आधीपासूनच पालकांशी कोणताच संवाद नसल्याने त्यांनी एकटेपणावर मात करण्यासाठी इंटरनेटवर अश्लील चँटींगचा आधार घेतलाय. रॉबीसारख्या सात वर्षाच्या मुलाचं चँटींगवरचं अश्लील संभाषण अत्यंत लाजीरवाणं आणि धक्कादायक असं , पण त्यातल्या एकाही वाक्याचा अर्थ त्याला माहिती नाही. यू अँड मी.. मध्ये मिरांडा जुलै स‌र्वच माध्यमांमधून नव्या पिढीला अकाली आलेल्या आलेल्या प्राैढत्वाकडे बोट दाखवते. उदा. एका क्षणी रॉबी एका पुठ्ठ्यांच्या खोक्याला लाथेने मारतो. लाथा मारताना त्याचे उच्चार मात्र पॉर्न फिल्मच्या वातावरणाशी परिचीत असे येतात. ही पॉर्न फिल्म त्याने कुठून मिळविली,कधी पाहिली त्याचा शोध दिग्दर्शक घेत नाही. तिच्यातून रॉबीवर झालेला परिणाम थेट दाखवणे तिला महत्त्वाचे वाटते. दुस-या एका सुरुवातीच्याच घटनेत अधिकृत घटस्फोट झाल्यानंतर आपण कधीतरी एकत्र होतो, याची आठवण मुलांच्या मनात कायम राहावी यासाठी रिचर्ड जाहीरपणे आपला हात जाळून घेतो ही घटना पाहताना मूर्खपणा वाटावी, पण नात्यांच्या दुराव्यातून आधीच्या पिढीचं स्वतःवरचं नियंत्रण सुटत चालल्याची ओळख करून देण्यास पुरेशी ठरलेली.
घटनांच्या जोडणीतूनच ख्रिस्टीना आणि रिचर्ड यांची दुकानात अचानक झालेली भेट. त्यांच्यात घडणारे अप्रतिम संवाद, फुलता फुलता शेवटापर्यंत विखुरलेल्या अवस्थेतच राहिलेली ख्रिस्टीनाची प्रेमकथा, दोन मैत्रिणींनी रॉबीच्या मोठ्या भावाला प्रँक्टीस सेक्ससाठी तयार करणं आणि रॉबीनं चँटींग करणा-या बाईला बागेत भेटायला जाणं या स‌र्व गोष्टी प्रत्येकाला आपल्या अवती भवती असणा-या जगाचं वेगळंच आकलन करून देतात. धक्कादायक असलं तरी आजच्या स‌माजाचं वास्तव रुप आपल्यासमोर मांड़ू पाहातात. त्यामुळेच प्रत्येकाच्या प्रश्नांचे स्वरूप चव्हाट्यावर आणताना वापरलेला विनोद हसवतो, तितकाच त्यातील गांभीर्याकडे अधिक लक्ष देण्यास भाग पाडतो.
मी अँड यू..चे वैशिष्ट म्हणजे तो मध्येच पाहताना आधी काय घडलंय याची गरज भासत नाही. कुठूनही पाहिलात तरी सुरुवातच वाटू शकेल अशी सोपी मांडणी अडकवून ठेवण्यास पुरेशी ठरते. यातील कित्येक प्रसंग, संवाद वेगळे काढले तर कलात्मक जाहिरात म्हणून खपून जातील इतके प्रभावी आहेत. नात्यांचा सूक्ष्मदर्शकातून शोध घेताना अंगिकारलेली कलात्मकता चित्रपटातून दाखविणे ही एरव्ही कठीण गोष्ट अस‌ली तरी कलात्मकतेच्या ओघात वाहून न जाता मी. एँड यू...ने साधलेला सूवर्णमध्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
-पंकज भोस‌ले

Read more...

नवी नाती

>> Thursday, April 24, 2008

रॉबिन विल्यम्सचं करिअर ही कायम बदलत राहणारी गोष्ट आहे. टीव्हीवरच्या कामाचं कौतुक होऊन जेव्हा तो चित्रपटात पोचला, तेव्हा प्रामुख्याने ढोबळ विनोद, नकला वगैरेला वाव असलेल्या भूमिकांमध्ये दिसायचा. पुढे डेड पोएट्स सोसायटीसारख्या हळव्या भावनाप्रधान (म्हणजे आपल्या "मोहब्बते' मधली शाहरूखची भूमिका) भूमिकांत आला. मग विनोद आणि हळवेपणा यांना एकत्र आणून पॅच ऍडम्ससारख्या चित्रपटांत पोचला. मध्यंतरी फ्लबर, जुमान्जी वगैरे मुलांचे चित्रपटही झाले. एव्हाना लोक थकले. (त्यात मीदेखील) हळूहळू रॉबिन विल्यम्स बघवेनासा झाला. त्याचबरोबर त्याचे चित्रपटही. मग अचानक त्याने एक असा बदल केला, जो त्याला मुख्य धारेतून थोडा बाहेर काढणारा होता; पण त्याचे गोते खाणारे करिअर सावरण्यासाठी योग्य ठरणारा. त्याने थोडे वेगळे चित्रपट निवडायला सुरवात केली. हे करताना त्याने आपली जुनी विनोदाची परंपरा चालू ठेवली; पण वन अवर फोटो (2002), इन्सोम्निआ (2002) किंवा फायनल कट (2004) सारख्या चित्रपटांतून त्याने अधिक गडद आशय मांडणाऱ्या, केवळ अभिनयाला आव्हान देणाऱ्या भूमिका करायला सुरवात केली. नुकताच या पठडीतला त्याचा एक चित्रपट पाहण्यात आला. "नाइट लिसनर' (2006). "नाइट लिसनर' हा आर्मिस्टेड मॉपिन यांच्या एका कादंबरीवर आधारित आहे, जी काही अंशी सत्य घटनांवर आधारित असल्याचे मानले जाते. इथे विल्यम्स आहे गेब्रिएल नून हा लेखक. तो रेडिओवर दर रात्रीतून "ऍट नाइट' नावाचा कार्यक्रम सादर करतो. सादरीकरण प्रामुख्याने आधारित असते, ते नूनच्या व्यक्तिगत आयुष्यासंबंधित लिखाणावर. खास करून नुकताच त्याच्या आयुष्यातून निघून गेलेल्या त्याच्या मित्राबरोबर घालवलेल्या दिवसांवर. या काळातले त्याचे आयुष्य आधीच विस्कळित झालेले. ते अधिक विस्कळित होते त्याच्या हाती आलेल्या एका अप्रकाशित पुस्तकामुळे, जे पीट (रॉअरी कलकिन) या चौदा वर्षांच्या मुलाने आपल्या भेदक अनुभवांवर लिहिलेले असते. पीटवर त्याच्या आई-वडिलांकडून अनन्वित अत्याचार झालेले असतात. सायफिलिस आणि एड्सने तो अंथरुणाला खिळलेला असतो आणि फार दिवस जगेलशी आशाही नसते. गेब्रिएलची पीट आणि त्याला दत्तक घेणारी डॉना (टोनी कोलेट) यांच्याशी फोनवरून मैत्री होते. आपले आयुष्य या नव्या मैत्रिणीने पुन्हा मार्गावर येईलसे वाटायला लागते; पण एक दिवस गेब्रिएलला नवा धक्का बसतो. पीट आणि डॉनाचे फोनवरील बोलणे ऐकून त्याचा मित्र हे दोन्ही आवाज एकाच व्यक्तीने काढले असावेत, अशी शंका उपस्थित करतो. गेब्रिएल पीटची बाजू लढवतो; पण आता त्यालाही खात्रीने सांगता येत नाही. ज्या प्रकाशकाने त्याला पीटचे हस्तलिखित देऊ केलेले असते, तोही प्रकरणावर अधिक प्रकाश पाडू शकत नाही, कारण तोही या दोघांना प्रत्यक्ष भेटलेला नसतो. दोन्ही आवाज रेकॉर्ड करून तपासण्यासाठी गेब्रिएल डॉनाला फोन लावतो, तर फोन बंद झाल्याचे कळते. आता फक्त एकच रस्ता उरतो, प्रत्यक्ष शोधावर निघण्याचा. गेब्रिएल तातडीने विमानतळाचा रस्ता धरतो. एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे, की पॅट्रिक स्टेटनर दिग्दर्शित या चित्रपटात रहस्य आहे; पण रहस्य हा चित्रपटाचा प्राण नाही. किंबहुना हे रहस्य काय प्रकारचे असेल, किंवा त्याचा उलगडा कसा होईल, याची पूर्वकल्पना पटकथाच आपल्याला देते. तरीही चित्रपट बांधून ठेवतो कारण तो या उलगड्यावर अवलंबून नाही. गेब्रिएलचे सत्याच्या अधिकाधिक जवळ येणे हा प्रवास चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे तो घडतोही गेब्रिएलच्याच नजरेतून. ज्याप्रमाणे इथे रहस्याला महत्त्व नाही, त्याचप्रमाणे ते शेवटालाही नाही. इथे शेवट सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत बसत नाही. याचा अर्थ तो फसवतो असा मात्र नाही. किंबहुना पीट आणि डॉनाबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा करतो. तरीही पूर्ण सत्य आपल्याला हुलकावणी देते कारण ते गेब्रिएललाही हुलकावणी देते. प्रत्यक्षात पाहायचे तर चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना ही कल्पित आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर चालणारी आहे. त्यामुळे कथानक हे कायम या दोन पैलूंच्या आधारे उलगडत जाते, मात्र अखेरीस चित्रपट असेही सुचवतो, की कदाचित वास्तवाचा आपण गरजेपेक्षा अधिक महत्त्व देतो. जे आपल्या मनाला जाणवते, कदाचित तेच सत्याहूनही अधिक खरे नाही का? मग प्रश्न उरतो, की हा रहस्यपट आहे की नाही. तर नाही. सायकॉलॉजिकल थ्रिलर या अतिशय ढोबळ व्याख्या असणाऱ्या चित्रप्रकारात त्याला बसवता येईल; पण ते "बिफोर सनसेट'ला रोमॅंटिक कॉमेडी म्हणण्यासारखे, म्हणजे दुसऱ्या शब्दात अपुरे ठरेल. नाइट लिसनरचा टोन मात्र रहस्यपट किंवा भयपट यांना चालणारा आहे. कारण सुरवातीचा काही भाग सोडला, तर तो आपल्या वातावरणानेच प्रेक्षकांना श्वास शोधायला लावू शकेलसा आहे. पटकथा उभे करत असणारे नवे नवे प्रश्न, डॉनाच्या व्यक्तिरेखेभोवतालचे गूढ वलय, रिकाम्या खोल्यांनी भरलेल्या घराचे अंधारे कोपरे, सतत एकमेकांकडे संशयाने पाहणाऱ्या व्यक्तिरेखा, या सर्वांचा परिणाम प्रेक्षकाला गुंगवून टाकतो. डॉना आणि गेब्रिएलची पहिली भेट तर आपण एखादा रूपांतरित जपानी भयपट पाहत आहोत की काय, असे वाटायला लावण्याची शक्यता आहे. मात्र हे वातावरण फार मनावर न घेणेच चित्रपट आपल्यापर्यंत अधिक स्पष्टपणे पोचण्यासाठी आवश्यक आहे. आपण आज ज्या जगात राहतो ते बरेचसे गेब्रिएल पीटसारख्या नात्यांना पूरक आहे. जी नाती प्रत्यक्ष भेट न होताच जुळून येतात किंबहुना जी भेट होण्यावर अवलंबून तर नाहीतच, वर कदाचित भेट न होणेच त्यांना टिकवून ठेवणारे आहे. या इंटरनेटच्या युगात आपण कधीच खात्री देऊ शकत नाही, की संगणकाच्या साह्याने आपल्याला भेटणारे नवे सोबती खरे कोण असतील. तरीही हे संगणकाच्या पडद्यारचे नाते आपल्यापुरते शंभर टक्के खरे असते हे काही खोटे नाही. "नाइट लिसनर' हा चित्रपट या नव्या नातेसंबंधाची एक नांदीच आहे, म्हटले तरी चालेल.

- गणेश मतकरी

Read more...

अस्वल झालेला माणूस

>> Sunday, April 20, 2008

हिरवळीचा प्रदेश. थोड्या अंतरावर दोन भली थोरली अस्वलं रेंगाळतायत. आता केसांच्या झिपऱ्या कपाळावर येणारा एक माणूस फ्रेममध्ये शिरतो आणि कॅमेऱ्याशी बोलायला लागतो. हा टिमोथी ट्रेडवेल. एक विक्षिप्त पर्यावरणवादी. 1991 ते 2003 ही सुमारे तेरा वर्षं ट्रेडवेल अलास्कामधल्या ग्रिझली अस्वलांनी व्यापलेल्या जागी जात असे- प्रत्येक वर्षातले दोन-तीन महिने. हा काळ तो जंगलात तंबू ठोकून राहत असे, दिवसभर अस्वलांच्या संगतीत काढत असे, कोणत्याही हत्याराशिवाय! ट्रेडवेलनं या अस्वलांचं पारध्यांपासून रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती आणि त्यासाठी या हिंस्र अस्वलांबरोबर राहणं त्याला गरजेचं वाटत होतं. यात धोकाही मोठा होता; कारण ही अस्वलं वेळप्रसंगी कोणाला मारायला कमी करत नाहीत आणि चवताळलेल्या अस्वलापासून पळणं तर अशक्यच, तरी ट्रेडवेल या अस्वलांबरोबर राहिला- जणू त्यांच्यातलाच एक होऊन. आताही कॅमेऱ्यात पाहून बोलणाऱ्या आणि स्वतःला असणाऱ्या भयंकर मृत्यूच्या संभाव्य धोक्याची कल्पना देणाऱ्या ट्रेडवेलच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही; कारण त्याला या धोक्याची कल्पना आहे; पण तसं खरोखरंच होईल यावर त्याचा विश्वास नाही. वर्नर हरझॉग या जर्मन दिग्दर्शकानं ट्रेडवेलवर बनवलेल्या "ग्रिझली मॅन' या डॉक्युमेंटरीची सुरवात अशी होते. ट्रेडवेलनं सुमारे पाच वर्षांमध्ये व्हिडिओ कॅमेरावर चित्रित केलेल्या शंभराहून अधिक तासांच्या मुद्रणामधून या डॉक्युमेंट्रीचा बराच, म्हणजे अर्ध्याहून अधिक भाग येतो; पण हा माहितीपट म्हणजे एरवी डिस्कव्हरी चॅनेल किंवा नॅशनल जॉग्रफिकवर पाहायला मिळणाऱ्या मानव आणि प्राणी यांच्या खेळीमेळीच्या दृश्यांचं संकलन नव्हे. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेवट. माहितीपटाचा नव्हे, तर ट्रेडवेलचा. 2003 मधल्या आपल्या अखेरच्या अलास्का फेरीच्या शेवटी ट्रेडवेलला भयंकर मरण आलं- ज्या धोक्याबद्दल तो कॅमेऱ्याला सांगत होता त्यापासूनच. एका अस्वलानं त्याला शरीराचे तुकडे तुकडे करून मारलं. त्याच्या एमी ह्यूगेबार्ड या मैत्रिणीलाही. दुसऱ्या दिवशी या अस्वलाला मारल्यावर त्याच्या शरीरात या दोघांचे अवशेष मिळाले. संपूर्ण "ग्रिझली मॅन' या शोकांताच्या सावलीत आहे आणि ते साहजिकही आहे. एक तर ही पुरेशी प्रसिद्धी मिळालेली घटना आहे. दुसरं म्हणजे हा मृत्यू अगदी अनपेक्षित नसला, तरी त्याच्याशी संबंधित घटना या विशिष्ट प्रकारे घडण्याचाही त्यामागं हात आहे. उदाहरणार्थ, ही घटना आहे ती हिवाळ्याच्या सुरवातीची, ज्या वेळी खरं तर ट्रेडवेल अलास्कात नसे. दर वर्षीप्रमाणे तेव्हाही तो परत जायला निघाला होता; पण विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी काही भांडण झाल्याकारणानं पुन्हा माघारी आला. यानंतर त्यानं जेव्हा परत जायचं ठरवलं त्याच्या केवळ एक दिवस आधी त्याचा मृत्यू ओढवला. म्हणजे त्याचं परत येणं हे जणू आपल्या मृत्यूला भेटण्यासाठीच होतं. "ग्रिझली मॅन' एरवीच्या माहितीपटांपेक्षा वेगळा होण्याचं कारण हेही आहे, की त्याचा आवाका, हा केवळ एका विषयापुरता मर्यादित नाही, तर त्याचा विस्तार तिहेरी आहे. यातला पहिला भाग आहे तो ट्रेडवेलच्या वाइल्ड लाइफ चित्रणाचा. हे चित्रण नेहमीच्या प्राणिजगतावरच्या माहितीपटांसारखंच असलं, तरी दर्जेदार आहे. अस्वलांबरोबर राहण्याचा ट्रेडवेलचा अट्टहास, काही कोल्ह्यांबरोबरची मैत्री, अस्वलांच्या मारामाऱ्या अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण जागा इथं आहेत. दुसरा भाग हा सर्वांत गुंतवणारा आहे आणि तो आहे ट्रेडवेलच्या मनोविश्लेषणाचा. ट्रेडवेल एक गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व होता; किंबहुना त्याचा तऱ्हेवाईकपणाही दिवसेंदिवस वाढत चालला होता. आता हेच पाहा, ट्रेडवेलच्या मते तो पारध्यांपासून अस्वलांना वाचावायला जात असे; पण मुळात या भागात अस्वलांच्या अवैध शिकारीचं प्रमाण अत्यल्प होतं. त्यामुळे त्यांना संरक्षणाची गरज मुळातच नव्हती. अस्वलांबरोबर राहण्यात त्याला आपलेपणा वाटत नसे; पण अनेकांच्या मते हे वागणं बेजबाबदारपणाचं होतं. त्याची जर अस्वलांना सवय झाली, तर अस्वलांना प्रत्येकच माणूस हा त्याच्याप्रमाणे वाटू शकतो आणि पुढंमागं शिकाऱ्यांपासूनही ते बेसावध निरुपद्रवी राहण्याची शक्यता तयार होते; मात्र ट्रेडवेलला हे तर्कशास्त्र मान्य नाही. ट्रेडवेल हा स्वतःच्या मर्जीनं पर्यावरणवादी बनला असला, तरी त्याला या प्रकारची पार्श्वभूमी नाही. मूळचा तो वाईट संगतीला लागलेला कॉलेज ड्रॉपाऊट. अस्वलांची संगत हे त्याच्या मनानं शोधलेलं पलायनवादी उत्तर. त्यानं आपल्या चित्रीकरणात कॅमेऱ्याशी मारलेल्या अनेक गप्पा आहेत. त्या ऐकताना असं लक्षात येतं, की त्याच्या दृष्टीनं अस्वलांचं जग हे त्याला अधिक जवळंच वाटायला लागलेलं आहे आणि माणसांचं जग हे अधिक भ्रामक. ही दरी अधिकाधिक रुंदावत चालली आहे आणि ट्रेडवेल अस्वलांच्या जगात हरवत चालला आहे. हा मुद्दा इतरांच्या मुलाखतीतही जाणवण्यासारखा आहे. त्यांच्या मते ट्रेडवेलचं वागणं, चालणं अधिकाधिक अस्वलासारखं व्हायला लागलंय. त्याच्या प्रतिक्रिया या माणसांसारख्या कमी आणि प्राण्यांसारख्या अधिक होताहेत. सरकारला दिलेल्या शिव्या चित्रित करणं, पाऊस पडावा म्हणून देवांना वेठीला धरणं, आपल्या अमेरिकन असण्याची लाज वाटून ऑस्ट्रेलियन असल्याचं भासविण्याचा प्रयत्न करणं यांसारख्या गोष्टीही ट्रेडवेलच्या मानसिक संतुलनाबद्दल शंका उत्पन्न करतात. "ग्रिझली मॅन'चा तिसरा भाग केंद्रित आहे तो ट्रेडवेलच्या भयानक अंतावर. ट्रेडवेलच्या बोलण्यात येणारे मृत्यूचे संदर्भ, ट्रेडवेलच्या वाढलेल्या पाहुणचारादरम्यान त्याच्या नेहमीच्या अस्वलांचं हायबर्नेशनला जाणं आणि नव्या अनोळखी अस्वलांनी ती जागा घेणं, ऑटोप्सी करणाऱ्या डॉक्टर्सची जबानी या गोष्टींवरही हरझॉंग रेंगाळतो. या घटनेचा अस्वस्थ करणारा भाग म्हणजे तिचं ध्वनिमुद्रण. अस्वलानं हे बळी घेतेवेळी ट्रेडवेलचा कॅमेरा चालू होता; मात्र लेन्स झाकलेली होती. त्यामुळे काही चित्रित झालं नाही, तरी आवाज मात्र रेकॉर्ड झाले. हरझॉग आपल्याला हे आवाज प्रत्यक्ष ऐकवत नाही. (आणि ते आपल्याला ऐकवणारही नाहीत.) मात्र तो स्वतः ती टेप ऐकताना आणि त्याची त्यावरची प्रतिक्रिया आपल्याला दिसते. एका परीनं पाहायचं तर हे थेट ऐकायला न मिळणं ऐकायला मिळण्याहून अधिक भयंकर आहे; कारण केवळ या मुद्रणाची शक्यताच आपल्या डोक्यात एक धक्कादायक चित्रं उभं करते, जे आपल्याला पाहवणारं नाही. ट्रेडवेल आणि हरझॉग यांचे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन परस्परविरोधी आहेत. ट्रेडवेलचा दृष्टिकोन हा पूर्णतः सकारात्मक आहे, तर हरझॉगचा नकारात्मक, अपरिहार्यतेला कवटाळणारा. त्यामुळे निवेदनात आपल्यासमोर सतत दोन बाजू येत राहतात, ज्यातली कोणतीही निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला राहतं. "ग्रिझली मॅन'ला केवळ डॉक्युमेंटरी म्हणणं पुरेसं नाही. तिचा एकूण परिणाम आणि विषयाची चौकट ही तुलनात्मकदृष्ट्या चित्रपटांहून अधिक उजवी आहे;मात्र ती सर्वांनाच पाहवेल असं मात्र नाही. ही निसर्गाची बाजू अधिक निष्ठुर आहे. एरवीच्या गोंडस चित्रणापलीकडे जाणारी, निसर्गाच्या समतोलाकडे बोट दाखवणारी, आणि शंभर टक्के खरीखुरी.

-गणेश मतकरी

Read more...

काही "फास्ट' निरीक्षणं

>> Friday, April 18, 2008

मी "डोंबिवली फास्ट' तसा उशिराच पाहिला. लवकर पाहिला नाही. कारण त्यावर आपण लिहिणार नाही, असं मला वाटत होतं. आता न लिहिण्यामागं कारण हे की तो ज्या "फॉलिंग डाऊन'वर आधारित आहे त्याविषयी मी साप्ताहिक स‌काळमध्ये 2005 मध्ये तपशिलात लिहिलं होतं.( पाहाः मागची पोस्ट) त्यामुळे "डोंबिवली फास्ट'वर लिहिताना तेच मुद्दे लिहावे लागतील असं काहीसं मला वाटत होतं. चित्रपट पाहिल्यावर मात्र वाटलं, की रूपांतरित असला, तरी हा महत्त्वाचा चित्रपट आहे. खास करून मराठी चित्रपटांच्या सध्याच्या चमत्कारिक परिस्थितीत तर अधिकच; त्यामुळे त्यावर काही निरीक्षणं मांडणं आवश्यक आहे. मराठी चित्रपटांची परिस्थिती चमत्कारिक अशासाठी म्हणावी लागेल, की सध्या मराठी चित्रपट बदलत चालल्याची एक अफवा पसरलेली आहे. खरं तर यात तथ्य नाही. "श्वास' भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आल्यानं एकदम मराठी चित्रपटांकडे भारताच्या एकूण चित्रसृष्टीचं लक्ष काही प्रमाणात वेधलं गेलं आणि अनेक निर्मात्यांनी मराठी चित्रपटांना हात घातला हे खरं, पण संख्या म्हणजे दर्जा नाही. आज मराठी चित्रपटांची निर्मिती मुबलक होते आहे, पण यातले बहुसंख्य चित्रपट हे सामान्य आणि दर्जाहीन आहेत. परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्या चित्रपटांचं कठीण आहे; त्यामुळेच कोणी चाकोरीच्या बाहेर पडून निराळा चित्रपट काढला तर त्यांचं याबद्दल कौतुक होणं आवश्यक आहे. मग तो रूपांतरित असला तरीही. आपल्याला हे माहीत आहेच, की आपल्याकडल्या अनेक चित्रपटांची कथानकं ही निर्वातात घडतात. म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचं, तर त्यांना कोणताही संदर्भ नसतो. स्थलकालाचं गणित हे या चित्रपटांना लागूच पडत नाही. "डोंबिवली फास्ट' मात्र याला अपवाद आहे. त्याला चित्रकर्त्यांनी मुंबईचा एक समर्पक संबंध जोडला आहे. तो केवळ शहरी नाही, तर स्पेसिफिकली मुंबईकरांच्या मानसिकतेच्या आणि आयुष्याच्या अनेक छटा या चित्रपटाच्या नावापासूनच आपल्याला दिसतात. त्यांच्या वागण्याला आलेली कृत्रिमता, असणारी गती, टोकाची सहनशीलता या गोष्टी तर इथं आहेतच. वर रेल्वे प्रवासाचं जे दिव्य इथल्या लाखो लोकांना रोज पार पाडावं लागतं त्याचाही कथावस्तूत सहभाग आहे. या प्रवासाचा ताण दिग्दर्शक निशिकांत कामत इथं पहिल्या मॉन्टाजमध्ये दाखवून देतो आणि नायकाच्या मानसिक संतुलनाची या रुटिनमुळे झालेली परिस्थिती, ही मुख्य कथानकाकडे वळण्यासाठी स्प्रिंगबोर्डसारखी वापरतो. रेल्वेचा हा ट्रॅक (पन इन्टेन्डेड) मूळ चित्रपटात नाही. तिथला नायकही आधीपासूनच थोडा मानसिकदृष्ट्या अस्थिर व्हायला लागलेला आहे, पण त्यांचं मूळ हे त्यांच्या मोडलेल्या संसारात आहे, इथं तसं नाही. दिग्दर्शकाचं दुसरं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे त्यानं चित्रपटातल्या सामाजिक अन्यायाविरूद्ध उभा राहणारा नायक आणि कुटुंब कलहानं डोकं फिरलेला नायक यांचं प्रमाण बदललं आहे; त्यामुळे इथलं माधव आपटेचं बंड हे अधिक बंडाप्रमाणे आहे; तर मूळ चित्रपटात तो साइड इफेक्ट आहे. डोंबिवली फास्टचं कथानक फार घडामोडी असणारं नाही. माधव आपटे (संदीप कुलकर्णी) हा सरळमार्गी माणूस. धावपळीचं आयुष्य, घरातले वाद यातही समाधानी राहण्याचा प्रयत्न करणारा. आपली तत्त्वं जपून राहणारा; मात्र समाजात ज्या त्या जागी करावी लागणारी तडजोड त्याला सहन होत नाही. बायकोचं असमाधान, मुलीच्या ऍडमिशनसाठी मागितलेलं डोनेशन, ऑफिसमधला भ्रष्टाचार या सगळ्यांचा परिणाम घेऊन एकदा त्याचं डोकं फिरतं आणि तो कायदा हातात घेतो. कोल्ड्रिंकवर एक रुपया जास्त घेणाऱ्याचं दुकान बॅटनं फोडण्यापासून सुरू झालेला हा लढा अनेक सामाजिक अन्यायांना स्पर्श करत अधिकाधिक वरच्या थरावर जात राहतो. काही बाबतीत चित्रपटाचा आशय विचारप्रवर्तक असला तरी डोंबिवली फास्ट उघडच कमी पडतो. यातला मोठा भाग आहे तो पटकथा संवादाचा. माणसाच्या रागाचा जेव्हा भडका उडतो, तेव्हा तो राग किती काळ डोक्यात खदखदत राहील याला मर्यादा आहेत. "फॉलिंग डाऊन'मध्ये हा राग चित्रपटभर राहतो. याचं कारण हा पूर्ण चित्रपट, नायकाच्या आपल्या वेगळ्या राहणाऱ्या पत्नीकडे जातानाच्या काही तासांच्या वाटचालीत घडतो. त्याची निघतानाची मनःस्थिती, वाटेत भेटणारे लोक आणि स्वतःवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव यामुळे हा राग टिकतो, वाढत जातो. डोंबिवली फास्टमध्ये दुपारी कोल्ड्रिंकवाल्याशी भांडण आणि दुचाकी तोडल्यानंतर आपटे नाहीसा होतो आणि उगवतो एकदम रात्र पडल्यानंतर. मधल्या वेळात तो काय करतो कुणास ठाऊक; मात्र इथं त्याचा पारा मात्र तेवढाच चढलेला दिसतो. बॅटही हातात असते. पुढे त्याला पोलिसांनी पकडूनही राग कमी होत नाही. हा राग टिकतो सुमारे दोन दिवस, जे एरवी अशक्य आहे. चित्रपटाचा कालावधी काही तासांवरून दोन दिवसांवर नेण्यामागे एक उघड कारण आहे. आपटे निर्माण करत असलेल्या प्रश्नांची पोच राजकारण्यांपर्यंत गेलेली दाखवणं आणि त्यांनी हे प्रश्न निकालात काढण्यासाठी टोकाचा पवित्रा घेणं या गोष्टी कथेत बसवणं दिग्दर्शकाला गरजेचं वाटलं. या घडामोडींनी चित्रपटाला एक वजन येईल आणि त्यातल्या सामाजिक अन्यायाचा मुद्दा अधोरेखित होईल अशी कल्पना असावी, पण त्याचा परिणाम म्हणजे पटकथेचं विस्कळित होणं. प्रसंग प्रवासात घडणं काढून टाकल्यानं होणारा आणखी घोळ म्हणजे आपटेच्या हालचालींनाही सुसूत्रता उरत नाही. पोलिस कोठडीतूनही त्याला सहज सोडतात. मग तो डोंबिवलीलाही जातो, पण घरी जात नाही. कंपाउंडमध्येच भांडतो आणि पुन्हा निघतो तो परत उलट्या दिशेला फाऊंटनपर्यंत. शिवाय चित्रपट संपताना क्लायमॅक्स डोंबिवली फास्ट गाडीत हवा, म्हणून आपटे पुन्हा डोंबिवलीला निघतो. हे सगळं घडताना त्याच्या शोधातला इन्स्पेक्टर (संदेश जाधव) मात्र फाऊंटन ते डोंबिवलीमधल्या कोणत्याही स्थळी काही मिनिटांत पोचू शकतो. इन्स्पेक्टर अनासपुरेची इथली व्यक्तिरेखा ही फारच टु डिमेन्शनल आहे. हा माणूस कर्तबगार आहे आणि त्याला मनातून आपटेचं वागणं पटतं हे तर उघड आहे; पण या दोन गोष्टी एकदा समोर आल्या की मग या व्यक्तिरेखेची वाढ होत नाही. मूळ चित्रपटातला या भूमिकेचा ग्राफ हा अभ्यास करण्यासारखा आहे. पत्नी आणि वरिष्ठांच्या दबावाखाली असणारा फॉलिंग डाऊनमधला इन्स्पेक्टर (रॉबर्ट डुबॉल) हे नायक बिलचंच (मायकेल डग्लस) दुसरं रूप आहे. त्याचा प्रवास नायकाला समांतर जाणारा आहे आणि नायकाच्या बंडापासून स्फूर्ती घेणाराही. संवादांपुरतं बोलायचं तर चित्रपट अतिशय ओव्हर रिटर्न आहे. पात्रं अनावश्यक गोष्टी पुन्हा पुन्हा बोलतात. खास करून आपटेची बायको. हे पात्र इतकं कटकट करणारं न दाखवताही मुद्दा पोचू शकला असता. याच पद्धतीनं प्रत्येक वेळी आपटेकडे नवं हत्यार आल्यावर "आता त्याच्याकडे अमुक अमुक आहे' असं बोलण्याची गरज नाही किंवा आपटेचं फाऊंटनच्या रस्त्यावरलं स्वगतही छान चित्रित केलं, तरी अनावश्यक आहे. या सर्व बडबडीला स्क्रिप्टिंगमध्येच कात्री लावायला हवी होती. निशिकांत कामत आणि छायाचित्रकार संजय जाधव यांनी चित्रपटात शैलीदार सफाई मात्र आणली आहे. आपटेचा दिनक्रम दाखवणाऱ्या अधिकाधिक वेगवान होत गेलेल्या मॉन्टाजपासूनच हे दोघं प्रेक्षकाची पकड घेतात. मराठी चित्रपटात इतकं चांगलं काम क्वचितच पाहायला मिळतं. काही वेळा मात्र छायाचित्रण खटकेल इतकं शैलीदार होताना दिसतं. उदाहरणार्थ आपटेचा एन्काउंटर करण्याची ऑर्डर अनासपुरेला मिळते. तो प्रसंग आपण केवळ पाहतो. आपलं लक्ष अडकतं ते कॅमेरा मूव्हमेंटवर आणि बोलणाऱ्या व्यक्तिरेखांकडे दुर्लक्ष होतं. पोलिस स्टेशनमधल्या सर्व प्रसंगांत, सर्व प्रहरीइतका प्रचंड अंधार दिसतो की रात्र आणि दुपार यात फरकच वाटू नये. अशा काही जागा सोडता हे चित्रण पहिल्या दर्जाचं आहे. डोंबिवली फास्ट पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते, की यातल्या माधव आपटेला येणाऱ्या अडचणी, तो समाजाच्या ज्या थरातला आहे त्या थरातल्या प्रत्येक प्रेक्षकाला आणि इतर थरातल्या अनेकांना पटणाऱ्या आहेत; त्यामुळे आपण आपटेच्या भूमिकेशी काही प्रमाणात समरसही होतो, पण चित्रपटाचा शेवट तर नकारात्मक आहे. म्हणजे सामान्यांना कितीही वाटलं, तरी त्यांच्या हातात काहीच नाही. असा या चित्रपटाचा संदेश म्हणावा का? की इन्स्पेक्टरला वाटणारी अस्वस्थता, हा याचा माफक सकारात्मक शेवट म्हणायचा? मला वाटतं, की आपटेचा विचार समाजापर्यंत पोचला हे दाखवणारी एखादी गोष्ट चित्रपटाच्या शेवटी दिसली असती, तर कदाचित ते अधिक परिणामकारक ठरलं असतं. हे एखाद्या संवादातूनही करता आलं असतं, पण त्यामुळे या व्यक्तिरेखाला न्याय मिळाला असता. जो आता मिळत नाही. कदाचित चित्रपटाच्या शेवटालाही "फॉलिंग डाऊन'चा आधार न घेता, स्वतंत्रपणे त्याचा विचार होणं आवश्यक होतं. जे इथं होत नाही. 2006मध्ये ब्लफमास्टर आणि जिंदानंतर पाहण्यात आलेलं हे तिसरं चांगलं रूपांतर; मात्र या तीनही चित्रपटांच्या प्रकारात खूपच फरक आहे. ब्लफमास्टर किंवा जिंदा हे केवळ करमणूकप्रधान होते. आशयाला महत्त्व असणारा आणि आपल्याकडे चपखल बसवणारा विचार मांडणारा डोंबिवली फास्ट मात्र अधिक काळाबरोबरचा आहे; त्यामुळेच अधिक महत्त्वाचा.
-गणेश मतकरी

Read more...

पडता पडता

>> Tuesday, April 15, 2008

एक टळटळीत दुपार. एक छोटंसं दुकान, जनरल स्टोअर्स प्रकारातलं, जिथं एका वर्गात न बसणाऱ्या; पण गृहोपयोगी वस्तू विकल्या जातात. दुकानाच्या गल्ल्यावर एक कोरियन माणूस बसलेला. आता एक गिऱ्हाईक येतं. अमेरिकन, गोऱ्या कातडीचा, मध्यमवर्गीय, डोळ्याला चष्मा, केस बारीक कापलेले, हातात एक ब्रीफकेस आणि पांढऱ्या शर्टवर लावलेला टाय. हा माणूस अतिशय सामान्य दिसणारा; पण काहीसा वैतागलेला. एखाद्या विशिष्ट गोष्टीवर बहुधा नाही, पण एकूणच. या माणसाला सुटे पैसे हवेत बाहेरच्या पब्लिक फोनमध्ये टाकण्यासाठी. जवळपास अर्धा डॉलर. गल्ल्यावरचा कोरियन असा कोणाला सुटे वगैरे देत नाही. तो आपल्या जेमतेम इंग्रजीत गोऱ्याला फर्मावतो, की काहीतरी वस्तू घेतली तरच सुटे मिळतील. गोरा शांत राहण्याचा प्रयत्न करत एखादी विकत घेण्याजोगी वस्तू शोधतो. कोकचा कॅन. याची किंमत असते पंचाऐंशी सेंट्स, म्हणजे डॉलरमधले उरलेले पैसे फोनला पुरेसे नाहीत. गोरा पुन्हा आपल्या मध्यमवर्गीय शांतपणाने हे दुकानदाराला सांगून पाहतो, तर तो त्याच्यावरच ओरडायला लागतो. "हवा तर घे, नाहीतर चालू लाग.' गोरा बधत नाही म्हटल्यावर कोरियन गल्ल्याखालून एक बेसबॉल बॅट काढतो आणि गिऱ्हाइकावर उगारतो. आता मात्र गोऱ्याचा ताबा सुटतो. त्याला हे समजूच शकत नाही, की आपली साधी मागणी पुरी न करता, हा वेगळ्या देशातून आलेला, आपली भाषाही धड बोलता न येणारा माणूस आपल्यावर हात उचलतोय ते कशासाठी? साधा फोन करण्यासाठी आपल्याला या मनधरण्या कराव्या लागतायत त्या कशासाठी? आणि या कोकसारख्या साध्या साध्या वस्तूंसाठी आपण अव्वाच्या सव्वा पैसे मोजतोय ते कशासाठी? हा सगळा राग उफाळून गोरा बेसबॉल बॅट हिसकावून घेतो आणि भेदरलेल्या कोरियनाला चार दणके देतो. दुकानातल्या जीवनावश्यक, पण जाहिरात कंपन्यांनी भाव चढवून ठेवलेल्या वस्तूंची नासधूस करतो. एव्हाना प्राण कंठाशी आलेला कोरियन या अचानक कन्झ्युमर राईट्सची जाणीव झालेल्या गिऱ्हाइकाला तो कोकचा कॅन अर्धा डॉलरला देऊन टाकतो आणि सुटकेचा निःश्वास सोडतो. हा प्रसंग आहे, जोएल शूमाकरच्या "फॉलिंग डाऊन' चित्रपटातला. चित्रपट तसा जुना, म्हणजे 1993 मधला; पण आजही खिळवून ठेवणारा. खरंतर आज अधिकच, कारण सामान्य माणसावरलं वाढतं दडपण आणि त्याला सहन करायला लागणारे लहान-मोठे अन्याय दाखवणाऱ्या या चित्रपटातल्या अनेक दृश्यांशी आपण 93 पेक्षा आज अधिक समरस होऊ शकतो. कारण आज आपण जवळजवळ त्यांच्याइतकेच अमेरिकनाईज्ड झालो आहोत. शूमाकर हा तसा चमत्कारिक दिग्दर्शक आहे. म्हणजे याला छान मोठं बजेट, भव्य विषय वगैरे दिले, की तो त्या चित्रपटांची वाट लावतो. बॅटमॅन ऍण्ड रॉबिनसारख्या चित्रपटाने तर तो जवळपास इंडस्ट्रीबाहेर फेकला जाईल की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती; पण मुळात काही हा वाईट दिग्दर्शक नाही. त्याचे चांगले चित्रपट हे बहुधा मध्यम बजेट, वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा आणि विषयाच्या निवडीतली हुशारी दाखवणारे असतात. व्हिएतनामच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये घडणारा टायगर लॅन्ड किंवा एका निनावी रस्त्यावरल्या टेलिफोन बूथ वर घडणारा "फोन बूथ' या कॉलिन फारेल ची प्रमुख भूमिका असणाऱ्या दोन चित्रपटांबरोबरच "फॉलिंग डाऊन'चं नावंही मी या दिग्दर्शकाच्या चांगल्या चित्रपटांमध्ये घेईन. पण असं असूनही हे म्हणणं भाग आहे, की हिचकॉकच्या शब्दांत सांगायचं तर शूमाकरचे चांगले चित्रपटदेखील "रेफ्रिजेटर मूव्ही' असतात. म्हणजे चित्रपटगृहात आपल्याला ते आवडून जातात; पण घरी आल्यावर रेफ्रिजेटरमधून खाण्याचे पदार्थ काढत विचार करताना आपल्याला त्यातल्या चुका दिसायला लागतात. "फॉलिंग डाऊन'मधल्या चुका कळायला तशी रेफ्रिजरेटरपर्यंत जायचीही गरज नाही. त्यात प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या चुका आहेत. पहिली म्हणजे चित्रपटाचं ठरलेलं नाही की तो ब्लॅक कॉमेडी आहे की थ्रिलर. आणि दुसरं म्हणजे त्याचा तोचतोचपणा. मी मघा त्याचा आजच्या काळाशी संदर्भ लावला तो त्यातल्या ब्लॅक कॉमेडीच्या सूत्राला धरून. इथला हिरो बिल (मायकेल डग्लस) एके सकाळी बिथरतो. ट्रॅफिक जॅममध्ये अक्षरशः माश्या मारत, घामाने निथळून निघत, बंद पडलेल्या एअर कंडिशनिंगला शिव्या देत, आजूबाजूच्या माणसांच्या त्याच्यासारख्याच व्यर्थ जगण्याकडे पाहताना त्याला सगळं सहन होईनासं होतं आणि गाडी आहे तिथं टाकून बिल निघतो. कोणीतरी ओरडून तो कुठं चाललाय, असं विचारतं. त्याला तो "घरी' म्हणून उत्तर देतो. त्याच्या या "घरा'पर्यंतच्या प्रवासात त्याला भेटणारे लोक, हे आज सामान्य माणसाला ज्या परिस्थितीत जगावं लागतंय त्याची झलक दाखवणारे असतात. वस्तू महाग विकून गिऱ्हाइकावर डाफरणाऱ्या कोरियन दुकानदाराप्रमाणेच चाकूचा धाक दाखवून खंडणी मागणारे गुंड असतात. गावाहून येऊन परत जायला पैसे नसल्याचं सांगणाऱ्या संभावित भिकाऱ्याप्रमाणेच तीन मिनिटं उशीर झाल्याकारणाने ब्रेकफास्ट द्यायला नाकारणारे मॅकडोनल्ड् ससदृश दुकानाचे चालक असतात आणि शहरातली मोक्याची जागा हडपून गॉल्फ कोर्स बांधणाऱ्या धनिकाप्रमाणेच बंगले उठवणारे प्लॅस्टिक सर्जनही असतात. ही सर्व मंडळी आपल्याला आज या ना त्या स्वरूपात भेटणारी आहेत आणि यांच्याशी जसं वागावं असं आपल्याला मनापासून वाटतं, तसंच बिल वागतो, आणि आपलं एक स्वप्नच पूर्ण करतो. त्यासाठी तो हिंसेला उत्तर अधिक हिंसेने देतो आणि उपहासगर्भ विनोदाने हे सगळं शोभवून नेतो, हा झाला ब्लॅक कॉमेडीचा भाग. मात्र एक सामान्य माणूस या प्रकारे हिंसक बंड करून उठेल, हे दिग्दर्शकाला किंवा निर्मात्यांपैकी कुणाला अति वाटलं असेल, ज्यामुळे ते या नायकाचं सामान्य असणं कमी करून त्याला माफक मनोरुग्ण असल्याची पार्श्वभूमी जोडतात. म्हणे या बिलचं सुरवातीच्या प्रसंगातलं "घरी' जाणं, हे फसवं आहे. बिल जिथं निघालाय ते आहे त्याच्या बायको आणि मुलीचं घर, जिथं घटस्फोटानंतर तो जाऊ शकत नाही. कोर्टानं त्याला तशी आज्ञाच दिलीय. त्याचं तिथं जाणंच धमकीवजा आहे, आणि त्याला थांबवण्यासाठी बायकोनंही पोलिसांना बोलावून ठेवलंय. बिलला एकदा आपण भडक डोक्याचा आणि घटस्फोटानंतर भ्रमिष्ट झालेला म्हटलं, की आपण त्याला सामान्यांपासून वेगळा काढतो, ज्यामुळे त्याच्या समाजकंटकांबरोबरच्या वागण्यातली गंमत कमी होऊन जाते. पुन्हा प्रश्न उरतो तो हा, की बिल मनोरुग्ण कशानं झाला? समाजाच्या आधुनिक वळणांमधून तयार होणाऱ्या नवनव्या समस्यांनी त्याचा बळी घेऊन त्याचं डोकं फिरवलं, ज्याचा अंतिम परिणाम त्याच्या घटस्फोटात झाला, की आधी घटस्फोट झाला, ज्याचा परिणाम म्हणून बिल आजच्या समाजात रहायला नालायक ठरला? आपण यातलं पहिलं उत्तर ग्राह्य मानलं तर चित्रपट ब्लॅक कॉमेडीकडे झुकतो, दुसरं मानलं तर थ्रिलरकडे. मात्र शूमाकर यांचं स्वतःचंच ठरत नाही, की तो कोणत्या अंगाला झुकावा, त्यामुळे अंतिम परिणाम गोंधळाचा होतो. "फॉलिंग डाऊन'चा एक विशेष म्हणजे त्यात एका पेंडरगास्ट नावाच्या पोलिसाचा ट्रॅक आहे, जो बिलला पकडण्याचा प्रयत्न करतोय. स्वतंत्रपणे अशा ट्रॅकमध्ये खास काही नाही, कारण तो अशा परागंदा नायकांच्या अनेक चित्रपटांत असतो. "थेल्मा ऍण्ड लुईस' मधली हार्वे कायटेल ची भूमिका याच प्रकारची होती आणि अलीकडच्या "कॅच मी इफ यू कॅन' मधली "टॉम हॅन्क्स'चीदेखील. मात्र इथे विशेष हा आहे, की बिल आणि पेंडरगास्ट (रॉबर्ट डुवॉल) यांचे प्रश्न जवळपास एकसारखे आहेत. दोघांनाही समाजाला तोंड देणं सोपं जात नाही. दोघांच्याही नोकरीची परिस्थिती बिकट आहे. दोघांचंही आपल्या बायकोबरोबरचं नातं स्फोटक आहे. मात्र बिल जसा एका गर्तेत कोसळत जातो, तसं जाणं पेंडरगास्टला मंजूर नाही. तो या प्रश्नांची उत्तरं इतर चार माणसांसारखीच तडजोडी करत शोधतो. आपण "फॉलिंग डाऊन'कडे कोणत्या नजरेने पाहतो, यावर तो आपल्याला आवडतो अथवा नाही, हे ठरेल. आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी हे पारडं कोणत्याही बाजूला झुकू शकतं. एक मात्र खरं, की चित्रपट आवडला न आवडला तरी काही प्रमाणांत अस्वस्थ करणारे प्रसंग यात प्रत्येकाला पाहायला मिळतील. मला सर्वांत अस्वस्थ केलं, ते यातल्या अखेरच्या प्रसंगानं. ज्यात "पेंडरगास्ट' "बिल'वर पिस्तुल रोखतो आणि "बिल'च्या लक्षात येतं, की या वाईट माणसांनी भरलेल्या समाजात आपल्यासारखा सरळ जगण्याचा प्रयत्न करणारा माणूसच आज वाईट ठरलाय. पुढे चित्रपट एका फिल्मी क्लायमॅक्सकडे जातो; पण आपल्या लक्षात राहतो, ते यातल्या नायकाच्या चेहऱ्यावरचा संभ्रम, जो आजच्या मध्यमवर्गाच्या गळचेपीचंच जणू दृश्यरूप आहे.

-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP