नवी नाती

>> Thursday, April 24, 2008

रॉबिन विल्यम्सचं करिअर ही कायम बदलत राहणारी गोष्ट आहे. टीव्हीवरच्या कामाचं कौतुक होऊन जेव्हा तो चित्रपटात पोचला, तेव्हा प्रामुख्याने ढोबळ विनोद, नकला वगैरेला वाव असलेल्या भूमिकांमध्ये दिसायचा. पुढे डेड पोएट्स सोसायटीसारख्या हळव्या भावनाप्रधान (म्हणजे आपल्या "मोहब्बते' मधली शाहरूखची भूमिका) भूमिकांत आला. मग विनोद आणि हळवेपणा यांना एकत्र आणून पॅच ऍडम्ससारख्या चित्रपटांत पोचला. मध्यंतरी फ्लबर, जुमान्जी वगैरे मुलांचे चित्रपटही झाले. एव्हाना लोक थकले. (त्यात मीदेखील) हळूहळू रॉबिन विल्यम्स बघवेनासा झाला. त्याचबरोबर त्याचे चित्रपटही. मग अचानक त्याने एक असा बदल केला, जो त्याला मुख्य धारेतून थोडा बाहेर काढणारा होता; पण त्याचे गोते खाणारे करिअर सावरण्यासाठी योग्य ठरणारा. त्याने थोडे वेगळे चित्रपट निवडायला सुरवात केली. हे करताना त्याने आपली जुनी विनोदाची परंपरा चालू ठेवली; पण वन अवर फोटो (2002), इन्सोम्निआ (2002) किंवा फायनल कट (2004) सारख्या चित्रपटांतून त्याने अधिक गडद आशय मांडणाऱ्या, केवळ अभिनयाला आव्हान देणाऱ्या भूमिका करायला सुरवात केली. नुकताच या पठडीतला त्याचा एक चित्रपट पाहण्यात आला. "नाइट लिसनर' (2006). "नाइट लिसनर' हा आर्मिस्टेड मॉपिन यांच्या एका कादंबरीवर आधारित आहे, जी काही अंशी सत्य घटनांवर आधारित असल्याचे मानले जाते. इथे विल्यम्स आहे गेब्रिएल नून हा लेखक. तो रेडिओवर दर रात्रीतून "ऍट नाइट' नावाचा कार्यक्रम सादर करतो. सादरीकरण प्रामुख्याने आधारित असते, ते नूनच्या व्यक्तिगत आयुष्यासंबंधित लिखाणावर. खास करून नुकताच त्याच्या आयुष्यातून निघून गेलेल्या त्याच्या मित्राबरोबर घालवलेल्या दिवसांवर. या काळातले त्याचे आयुष्य आधीच विस्कळित झालेले. ते अधिक विस्कळित होते त्याच्या हाती आलेल्या एका अप्रकाशित पुस्तकामुळे, जे पीट (रॉअरी कलकिन) या चौदा वर्षांच्या मुलाने आपल्या भेदक अनुभवांवर लिहिलेले असते. पीटवर त्याच्या आई-वडिलांकडून अनन्वित अत्याचार झालेले असतात. सायफिलिस आणि एड्सने तो अंथरुणाला खिळलेला असतो आणि फार दिवस जगेलशी आशाही नसते. गेब्रिएलची पीट आणि त्याला दत्तक घेणारी डॉना (टोनी कोलेट) यांच्याशी फोनवरून मैत्री होते. आपले आयुष्य या नव्या मैत्रिणीने पुन्हा मार्गावर येईलसे वाटायला लागते; पण एक दिवस गेब्रिएलला नवा धक्का बसतो. पीट आणि डॉनाचे फोनवरील बोलणे ऐकून त्याचा मित्र हे दोन्ही आवाज एकाच व्यक्तीने काढले असावेत, अशी शंका उपस्थित करतो. गेब्रिएल पीटची बाजू लढवतो; पण आता त्यालाही खात्रीने सांगता येत नाही. ज्या प्रकाशकाने त्याला पीटचे हस्तलिखित देऊ केलेले असते, तोही प्रकरणावर अधिक प्रकाश पाडू शकत नाही, कारण तोही या दोघांना प्रत्यक्ष भेटलेला नसतो. दोन्ही आवाज रेकॉर्ड करून तपासण्यासाठी गेब्रिएल डॉनाला फोन लावतो, तर फोन बंद झाल्याचे कळते. आता फक्त एकच रस्ता उरतो, प्रत्यक्ष शोधावर निघण्याचा. गेब्रिएल तातडीने विमानतळाचा रस्ता धरतो. एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे, की पॅट्रिक स्टेटनर दिग्दर्शित या चित्रपटात रहस्य आहे; पण रहस्य हा चित्रपटाचा प्राण नाही. किंबहुना हे रहस्य काय प्रकारचे असेल, किंवा त्याचा उलगडा कसा होईल, याची पूर्वकल्पना पटकथाच आपल्याला देते. तरीही चित्रपट बांधून ठेवतो कारण तो या उलगड्यावर अवलंबून नाही. गेब्रिएलचे सत्याच्या अधिकाधिक जवळ येणे हा प्रवास चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे तो घडतोही गेब्रिएलच्याच नजरेतून. ज्याप्रमाणे इथे रहस्याला महत्त्व नाही, त्याचप्रमाणे ते शेवटालाही नाही. इथे शेवट सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत बसत नाही. याचा अर्थ तो फसवतो असा मात्र नाही. किंबहुना पीट आणि डॉनाबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा करतो. तरीही पूर्ण सत्य आपल्याला हुलकावणी देते कारण ते गेब्रिएललाही हुलकावणी देते. प्रत्यक्षात पाहायचे तर चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना ही कल्पित आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर चालणारी आहे. त्यामुळे कथानक हे कायम या दोन पैलूंच्या आधारे उलगडत जाते, मात्र अखेरीस चित्रपट असेही सुचवतो, की कदाचित वास्तवाचा आपण गरजेपेक्षा अधिक महत्त्व देतो. जे आपल्या मनाला जाणवते, कदाचित तेच सत्याहूनही अधिक खरे नाही का? मग प्रश्न उरतो, की हा रहस्यपट आहे की नाही. तर नाही. सायकॉलॉजिकल थ्रिलर या अतिशय ढोबळ व्याख्या असणाऱ्या चित्रप्रकारात त्याला बसवता येईल; पण ते "बिफोर सनसेट'ला रोमॅंटिक कॉमेडी म्हणण्यासारखे, म्हणजे दुसऱ्या शब्दात अपुरे ठरेल. नाइट लिसनरचा टोन मात्र रहस्यपट किंवा भयपट यांना चालणारा आहे. कारण सुरवातीचा काही भाग सोडला, तर तो आपल्या वातावरणानेच प्रेक्षकांना श्वास शोधायला लावू शकेलसा आहे. पटकथा उभे करत असणारे नवे नवे प्रश्न, डॉनाच्या व्यक्तिरेखेभोवतालचे गूढ वलय, रिकाम्या खोल्यांनी भरलेल्या घराचे अंधारे कोपरे, सतत एकमेकांकडे संशयाने पाहणाऱ्या व्यक्तिरेखा, या सर्वांचा परिणाम प्रेक्षकाला गुंगवून टाकतो. डॉना आणि गेब्रिएलची पहिली भेट तर आपण एखादा रूपांतरित जपानी भयपट पाहत आहोत की काय, असे वाटायला लावण्याची शक्यता आहे. मात्र हे वातावरण फार मनावर न घेणेच चित्रपट आपल्यापर्यंत अधिक स्पष्टपणे पोचण्यासाठी आवश्यक आहे. आपण आज ज्या जगात राहतो ते बरेचसे गेब्रिएल पीटसारख्या नात्यांना पूरक आहे. जी नाती प्रत्यक्ष भेट न होताच जुळून येतात किंबहुना जी भेट होण्यावर अवलंबून तर नाहीतच, वर कदाचित भेट न होणेच त्यांना टिकवून ठेवणारे आहे. या इंटरनेटच्या युगात आपण कधीच खात्री देऊ शकत नाही, की संगणकाच्या साह्याने आपल्याला भेटणारे नवे सोबती खरे कोण असतील. तरीही हे संगणकाच्या पडद्यारचे नाते आपल्यापुरते शंभर टक्के खरे असते हे काही खोटे नाही. "नाइट लिसनर' हा चित्रपट या नव्या नातेसंबंधाची एक नांदीच आहे, म्हटले तरी चालेल.

- गणेश मतकरी

1 comments:

HAREKRISHNAJI April 25, 2008 at 12:16 AM  

Even I was tired looking at him as you said. But now must watch those movies mentioned by you. Thakx for sharing

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP