युद्ध विक्रेत्याची गोष्ट

>> Wednesday, January 23, 2008


जगभर दिवसागणिक फोफावणारा दहशतवाद आपण पाहतोच आहोत. गल्लीतल्या दादांपासून ते जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी धडपडणाऱ्या अतिप्रगत देशांपर्यंत सत्तेची तहान आणि शक्तिप्रदर्शनासाठी वापरले जाणारे विभिन्न मार्गही आता आपल्या परिचयाचे झाले आहेत. हे मार्ग आणि त्यांच्यामागची मानसिकता उलगडून दाखवण्यात केवळ वृत्तपत्रांसारखी वर्तमानात पाय रोवून उभी राहणारी माध्यमंच पुढे नाहीत, तर एरवी करमणूकप्रधान समजल्या जाणाऱ्या चित्रपटांनीही यात महत्त्वाची कामगिरी केली आहे. युद्ध, दहशतवाद आणि गुन्हेगारी यांचा केवळ वरवरचा विचार न करता, त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे अनेक चित्रपट आहेत, जे अंतिमतः याच विषयांना रंजनात्मक करू पाहणाऱ्या चित्रपटांचा तोल राखण्यासाठी उपयोगी पडतात. वेलकम टु साराजावो, बिफोर द रेन किंवा "सेव्हिंग प्रायव्हेट रायन'सारख्या गंभीरपणे सत्तासंघर्षाच्या दारुण वास्तवाकडे पाहणाऱ्या प्रयत्नांबरोबरच काही चित्रपट असेही असतात, जे थोड्या मिस्कीलपणे आपल्या आशयाकडे पाहत असूनही अखेर आपल्या भूमिकेत तितकेच शांतिप्रिय आणि युद्धविरोधी असतील. त्यांचा तिरकस दृष्टिकोन आशयाला बोथट न करता अधिकच भेदक करतो आणि हे सगळं कुठेही विषयाचं अवडंबर न माजवता "द ट्रुमन शो' आणि "गटाका'सारखे दोन विचारप्रवर्तक चित्रपट देणाऱ्या ऍन्ड्रू निकोलचा "लॉर्ड ऑफ वॉर' हा असाच एक चित्रपट.सामान्यतः युद्धविषयक चित्रपट हे ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखांचा आधार घेताना दिसतात. ते मांडत असलेला संघर्षही विशिष्ट चौकटीमधला असतो. लॉर्ड ऑफ वॉरमधली व्यक्तिरेखा आणि तिचा संघर्ष या दोन्ही गोष्टी तुलनेने खूपच वेगळ्या आहेत. इथली प्रमुख व्यक्तिरेखा आहे युरी ऑरलॉव्ह (निकोलस केज). युक्रेनमधल्या निर्वासितांमधून आलेला हा सामान्य नागरिक शस्त्रास्त्रांचा (फिरता) विक्रेता म्हणून कसं नाव मिळवतो आणि आपला धंदा कसा वाढवत नेतो, याची ही गोष्ट. इथला नायक युरी आणि एका परीने खलनायकही तोच.चित्रपटाच्या सुरवातीलाच युरी आपल्याला सांगतो, की जगात साधारण पाचशे पन्नास दशलक्ष शस्त्रास्त्रं आहेत. यावर युरीला पडलेली विवंचना शस्त्रांच्या वाढत्या संख्येविषयी नसून, ती बारामधल्या उरलेल्या अकरा जणांपर्यंत कशी पोचवावीत, ही आहे.वेगळी कथाचित्रपटाला कथा आहे, पण ती ठराविक पठडीतली नाही. म्हणजे ती एका घटनेला केंद्रस्थानी ठेवत नाही किंवा युद्धविषयक चित्रपटांतला साहसाचा फॉर्म्युलाही ती वापरत नाही. युरीची गोष्ट ती एखादं चरित्र मांडल्याप्रमाणे मांडते. त्याला या धंद्यात पडण्याची प्रेरणा मिळाल्यापासून पुढे या कालावधीत अनेक चढउतार होतात. प्रथम युरी आपल्या भावाला मदतीला घेतो; पण त्याचं मन युरीसारखं निर्ढावलेलं नसल्यानं तो लवकरच अमली पदार्थांचा आसरा घेतो आणि युरी एकटा पडतो. सुरवातीला सिमीओन (इआन होम) या शस्त्र खरेदी-विक्रीत वाकबगार माणसाबरोबर काम करण्याची त्याची इच्छा असते; पण सिमीओन त्याला झटकून टाकतो. हे झटकणं सिमोओनला पुढे चांगलंच महागात पडतं.छोट्यामोठ्या नफ्यासाठी धडपडत असताना युरी आवा फोन्टेन (ब्रिजेट मोनाहन) या प्रसिद्ध मॉडेलला पटवतो आणि तिला आपल्या व्यवसायाविषयी अंधारात ठेवून तिच्याशी लग्न करतो. चैनीत राहण्याची सवय असणाऱ्या भावाला आनंदात ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या युरीला मोठा फायदा होतो, तो सोव्हिएत रशिया कोलमडल्याचा. त्यांच्या सैन्यात उच्चपदस्थ असणाऱ्या आपल्या काकाच्या मदतीनं तो पुष्कळ साठा स्वस्तात पदरात पाडून घेतो आणि सिमीओनला मागे टाकतो. आता त्याला दिवस बरे येतात. बोस्निया, लायबेरिया आणि अशा छोट्या-मोठ्या देशांच्या हुकूमशहांकडून त्याच्या मालाची मागणी वाढते.मात्र आवापासून हे सतत लपवून ठेवणं युरीला जमत नाही. जॅक व्हॅलेन्टाईन (इथन हॉक) हा हुशार अधिकारी बराच काळ युरीच्या मागावर असतो. इतर कशाला युरी बधत नाहीसं पाहून तो आवाला सत्य सांगून टाकतो. हे प्रकरण मात्र युरीला जड जाईलसं दिसायला लागतं."लॉर्ड ऑफ वॉर' एकाच वेळी आपल्याला हसवतो आणि सुन्न करतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याची मांडणी आणि युरीची या भयंकर उद्योगाकडे एका साध्या व्यापाऱ्याप्रमाणे पाहायची दृष्टी असणारी व्यक्तिरेखा. दिग्दर्शक ऍन्ड्रू निकोलने घटनांचं प्रत्यक्ष दृश्‍यरूप, त्यातून अभिप्रेत असणारा अर्थ आणि त्यावरील युरीची टिप्पणी यांमधला तोल फार उत्तम राखला आहे. त्यामुळे दिसणाऱ्या घटनांमागची भयानकता आपल्याला जाणवते. युरीच्या दृष्टिकोनाची गंमत वाटते; पण प्रत्यक्षात त्याच्या युक्तिवादाचा फोलपणाही आपल्याला जाणवतो. उदाहरणार्थ चित्रपटाच्या सुरवातीच्या भागात एका युद्धग्रस्त गरीब देशातून बऱ्याचशा बंदूका किलोवर विकून युरी आणि त्याचा भाऊ विटली परत येत असताना एका पडझड झालेल्या जागी त्यांना बंदुकांचे बार ऐकू येतात. दोघे डोकावतात, तर काही बारा-तेरा वर्षांच्या मुलांना भिंतीसमोर उभं करून गोळ्या घालण्याचं काम करणारे त्या देशाचे सैनिक त्यांच्या नजरेला पडतात. विटली मुलांना वाचवायला पुढे सरसावतो; पण युरी त्याला काही करू देत नाही. "ही आपली लढाई नाही' असं सांगून विटलीला तो मागे खेचतो. गोळ्या सुटतात.पुढे एकदा सैन्यानं एका गावाला वेढा घातलेला असताना विटली युरीला सांगून पाहतो, की आपण हत्यारं विकली तर त्याच हत्यारांनी या निरपराध गावकऱ्यांचे बळी घेतले जातील. पुढे तसंच होतं. पण युरीचं म्हणणं, की त्यासाठी केवळ त्याचीच हत्यारं जबाबदार नाहीत, इतरही काही गावांत त्या वेळी हेच घडलं. वर दाखला म्हणून तो हेदेखील सांगतो, "लोक म्हणतात, भल्या माणसांनी निष्क्रियता दाखवली, तर दुष्प्रवृत्ती माजते. खरं तर त्यांनी एवढंच म्हणायला हवं, की दुष्प्रवृत्ती माजते.असमर्थनीय नाहीयुरी आपल्या धंद्यात कमालीचा यशस्वी होतो, कारण त्याच्या वागण्यात दिसणारा सदसद्विवेकबुद्धीचा पूर्ण अभाव. एकदा एक देश शांतिपूर्ण वाटाघाटींवर उतरल्याचं कळताच त्याला भलतंच दुःख होतं. या देशाला निंदनीय ठरवत तो बोस्नियाचं कौतुक करतो. म्हणतो,"व्हेन दे से, दे आर हॅव्हिंग ए वॉर, दे कीप देअर वर्ड.' (आम्ही युद्ध करणार, असं ते म्हणतात, तेव्हा आपला शब्द पाळतात.) कोणतीच गोष्ट भयंकर वाटत नाही, असमर्थनीय वाटत नाही. निकोलस केजने केलेल्या काही भूमिका या केवळ त्याच्या असतात. इतर कुणाचीही या भूमिकेमध्ये आपण कल्पनाही करू शकत नाही. युरीची भूमिका अशा भूमिकांमध्ये गणली जावी.दिग्दर्शकाने दृश्‍य भागही कायम चटपटीत आणि मुद्द्याला धरून ठेवला आहे. सुरवातीच्या श्रेयनामावलीत एक दृश्‍यमालिका आहे, जी बंदुकीच्या गोळीचा प्रवास तिच्याच नजरेतून दाखवते. कारखान्यात तयार होऊन पॅक होण्यापासून ते थेट बंदूकीत बसून कोणत्याशा आफ्रिकन देशातल्या कृष्णवर्णीय लहान मुलाचा कपाळमोक्ष करेपर्यंतचा या दृश्‍यमालिकेचा स्मार्टनेस आणि परिणामकारकता लॉर्ड ऑफ वॉरमध्ये जागोजाग आढळते.या चित्रपटाचा बिनधास्तपणा सर्वच समीक्षकांना आणि प्रेक्षकांनाही मानवायचा नाही. काहींनी याचं प्रचंड कौतुक केलं, तर काहींनी त्याच्या असंवेदनशील (काही जण यालाच संवेदनशीलही म्हणतील) प्रतिमांबद्दल आणि सकारात्मक असल्याचा आभास आणणाऱ्या खलप्रवृत्तीच्या नायकाबद्दल त्याची निंदा केली. त्यात अमेरिकेच्या सरकारी धोरणाबद्दल असणाऱ्या टीकेने त्याला पारितोषिकप्राप्त ठरवला जाणार नाही, हेही उघड होतं. पण ऍन्ड्रू निकोल आणि निकोलस केज यांच्या या प्रयत्नाला आपण दुर्लक्षित करणं बरोबर होणार नाही. तसं केलं तर आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वास्तवाच्या एका तुकड्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होईल.शस्त्रांची उपलब्धता आणि मुबलकता आज किती वाढते आहे, याचं या चित्रपटासंबंधातलंच एक उदाहरण बोलकं आहे. या चित्रपटात दाखवण्यासाठी चित्रकर्त्यांना मोठ्या प्रमाणात बंदुकांची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांनी नकली बंदुका मिळवण्याचे खूप प्रयत्न केले; शेवटी त्यातल्या त्यात फायद्याचं ठरलं ते खऱ्याखुऱ्या बंदुका प्रचंड संख्येनं विकत घेण. त्या सहजपणे मिळण्यासारख्या आणि स्वस्त होत्या! हे उदाहरणही आजच्या परिस्थितीवर एक प्रकारे भाष्य करणारंच आहे. या चित्रपटासारखंच टोकदार.


-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP