चांगली सुरवात

>> Friday, January 25, 2008
"वेल बिगन इज हाफ डन' म्हणतात ते काही खोटं नाही. चित्रपटांच्या बाबतीत तर `सुरवात` या गोष्टीला फारच महत्त्व आहे. बहुतेकदा या सुरवातीवरून आपल्याला पूर्ण चित्रपटाचा अंदाज तर येऊ शकतोच, तसंच त्यातला दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, कथनाची शैली, दृश्य योजनेमागची कारागिरी असा तपशीलही स्पष्ट होतो. बहुतेक चित्रपट आपल्याला आवडणार का नाही, हे या पहिल्या दहाएक मिनिटांतच कळतं, आणि जर आवडणार असेल, तर त्यांची आपल्यावरली पकडही याच वेळात बसते.परभाषक चित्रपटांत अशा पकडून ठेवणाऱ्या चित्रपटांची मुबलक उदाहरणं सापडतील. उदाहरणार्थ ः रॉबर्ट वाईजच्या रोमिओ ज्युलिएटवर आधारित वेस्ट साईड स्टोरीची सुरवात पाहा.मूळ कथेतल्या राजघराण्यांची वेस्ट साईड स्टोरीमध्ये रूपांतरं झाली आहेत, ती दोन शहरी गुंडांच्या टोळ्यांमध्ये. या टोळ्यांमध्ये वितुष्ट कसं आलं आणि पुढे त्यांची दुश्मनी कशी विकोपाला गेली, हा सर्व भाग इथे पहिल्या मॉन्टाजमध्ये येतो. त्यातून हे म्युझिकल असल्याने या मारामाऱ्याही नृत्यासारख्या बसवलेल्या. हा भाग संपून मूळ कथानक सुरू होण्याआधीच आपल्याला वेस्ट साईड स्टोरीचा पोत पूर्णपणे कळलेला असतो.अर्थात चित्रपपटाची सुरवात ही केवळ कथेबद्दल माहिती याचसाठी वापरली जात नाही, तर हुशार दिग्दर्शक तिचा वेगवेगळा वापरही करू शकतो. हिचकॉकच्या प्रसिद्ध सायकोची सुरवात ही तर प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठीच रचली गेली आहे. बेट् स मोटेल आणि त्याचा विक्षिप्त मालक नॉर्मन बेट् स हे सायकोच्या केंद्रस्थानी आहेत. पण हिचकॉक त्याची सुरवात करतो ती जेनेट लीफच्या व्यक्तिरेखेपासून. तिचं प्रेमप्रकरण, तिनं केलेली चोरी, मग तिला हायवेवर ट्रॅफिक पोलिसांनी अडवणं आणि बेट् स मोटेलवर आसरा घेणं, या घडामोडींमुळे प्रेक्षकाचा समज असा करून दिला जातो, की जेनेट ली ही चित्रपटाची नायिका आहे. मग अचानक तिचा खून होतो, चोरीचे पैसे गाडीबरोबर दलदलीत पोचतात आणि प्रेक्षक संभ्रमात पडतो. हा संभ्रम तयार करणं, हेच या सुरवातीनं केलेलं चोख काम.सलग मांडणीची पद्धतआपल्याकडे या प्रकारच्या विशिष्ट हेतूनं केलेल्या किंवा प्रेक्षकांना बांधून ठेवणारी सुरवात पाहायला मिळत नाही. युवासारख्या काही चित्रपटांचा अपवाद वगळता, याला एक कारण असं, की आपल्याकडे कथाभाग हा सलग एका क्रमानं मांडण्याची पद्धत अधिक प्रचलित आहे. त्यामुळे चित्रपटाची सुरवात ही बहुधा कथेचीच सुरवात असते. आणि अगदी सुरवातीला फार काही घडत नाही. जागतिक चित्रपटांमध्ये नॉन लिनिअर मांडणी ही खूप लोकप्रिय असल्यानं, त्यांना आपल्या चित्रपटाची सुरवात वेगवेगळ्या पद्धतीनं करून पाहण्याची संधी अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.नुकतीच एक फार छान सुरवात पाहण्यात आली. हा चित्रपटही फार उत्तम होता आणि त्याच्या पहिल्या काही मिनिटांतच त्याचं टेक्स्चर, प्रमुख पात्रं, विषय आणि शैली याबद्दल अनेक गोष्टी झटक्यात स्पष्ट झाल्या. ब्राझीलचा सिटी ऑफ गॉड हा 2002 मधील चित्रपट. दिग्दर्शक फर्नांडो मायरेलेस.सिटी ऑफ गॉड हे नाव दोन कारणांसाठी विचित्रं आहे. पहिलं कदाचित अनपेक्षित; पण दुसरं चित्रकर्त्यांना नक्कीच अपेक्षित. सिटी ऑफ गॉड हे थोडं काही वर्षांपूर्वीच्या साहसप्रधान चित्रपटांच्या लाटेतलं वाटतं. म्हणजे किंग सोलोमन्स माईन्स किंवा रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क वगैरे सारखं. एखाद्या खजिन्याच्या जागेचा संदर्भ सांगणारं. खरं तर हा चित्रपट या प्रकारचा नाही, आणि हे खरोखरच एका वस्तीचं नाव आहे.चित्रकर्त्यांना अपेक्षित असणारं, नाव विचित्र ठरवणारं दुसरं कारण असं, की या सिटी ऑफ गॉडचा संबंध देवापेक्षा सैतानाशी अधिक आहे. जी वस्ती या छानशा नावानं ओळखली जाते, ती रिओ डी जानेरोमधील गरीब वस्ती आहे. इथं गुंडगिरी, मारामाऱ्या भरपूर. सामान्य नागरिकांपासून पोलिसांपर्यंत सगळे भ्रष्ट. लहान लहान मुलंदेखील कुणाला गोळ्या घालायला कमी न करणारी. अक्षरओळख नसली तर चालेल; पण इथं राहायचं तर पिस्तूल चालवता यायलाच हवं.गुंडाच्या उदयास्ताची गोष्ट सिटी ऑफ गॉड एका लिटल `झी` नावाच्या कुप्रसिद्ध ड्रगडीलर आणि गुंडाच्या उदयास्ताची गोष्ट सांगतो. पण ती प्रत्यक्ष झीच्या दृष्टिकोनातून नाही, तर रॉकेट (अलेक्झांडर रॉड्रिग्ज) या एका होतकरू फोटोग्राफरच्या नजरेतून. हा रॉकेट जी गोष्ट सांगतो, ती जितकी झीची आहे, तितकीच ती या वस्तीची आहे. त्यासाठी रॉकेट मूळ कथानक सांधणाऱ्या अनेक छोट्यामोठ्या गोष्टी एकत्र करतो. कधी त्या विशिष्ट पात्राच्या असतात वा एखाद्या जागेच्या किंवा स्वतःच घेतलेल्या काही अनुभवांच्या. या गोष्टी एकत्र येऊन चित्रपटाचा आराखडा तयार होतो. चित्रपटाची सुरवात ही कथाप्रधान प्रवृत्ती दाखवते. रॉकेट आणि झीला आपल्यापुढे आणते आणि वस्तीचं एकूण स्वरूपदेखील अधोरेखित करते.या सगळ्याला सुरवात होते, ती एका कोंबड्यापासून. या कोंबड्याला कापण्यासाठी बांधून लिटल झी एका पार्टीची तयारी करत असतो. आपल्यासमोर इतर कोंबड्यांची होणारी परिस्थिती पाहून हा कोंबडा बिथरतो आणि संधी मिळताच पळ काढतो. झी त्याला बघतो आणि पकडण्याचा हुकूम सोडतो. लगोलग सगळे कोंबड्यामागे पळतात. ही पळापळ गल्लीबोळातून सुसाट सुरू होते. आधी नुसत्याच धावणाऱ्यांच्या हातात पिस्तुलं, बंदुका यायला लागतात, शिविगाळ सुरू होते. लवकरच हा ताफा रस्त्यावर एका फोटोविषयी बोलत चाललेल्या रॉकेटपर्यंत येतो. बंदुका रोखलेली ही टोळी ही रॉकेटसमोर उभी ठाकते. इतक्यात मागच्या बाजूला पोलिसच्या गाड्या येतात आणि रॉकेट अक्षरशः या कायद्याच्या दोन बाजूंच्या मध्ये सापडतो. आता आपल्याला रॉकेटच्याच शब्दांत कळतं, की अशी धोबी का कुत्ता बनण्याची परिस्थिती केवळ आत्ताची नाही.तो लहान असल्यापासून हे असंच चाललेलं आहे. आता कॅमेरा पोलिस आणि गुंडाना दाखवत झोकात एक वर्तुळ पूर्ण करतो आणि रॉकेटच्या बालपणी पोचतो. आता वस्ती बैठ्या घरांची. इथल्या मैदानावर रॉकेट उभा आहे. पुन्हा गुंड मुलांच्या शिव्या खात, निरुत्तर.हा सुरवातीचा एपिसोड हा जवळपास एक छोटी गोष्ट वाटण्याइतका सेल्फ कन्टेन्ड तर आहेच, वर यात दिग्दर्शकाचं माध्यमावरलं प्रभुत्व, त्याची तुकड्या तुकड्यात अनेक शॉट्स घेऊन संकलनात गती आणण्याची पद्धत, याही गोष्टी दिसतात. वर्तमानकाळातल्या दृश्यांची किंचित निळसर झाक आणि एकाच हालचालीने कॅमेरा भूतकाळात गेल्यावरचा सेपिया रंग, भर वस्तीतले गल्लीबोळ जाऊन येणारं मैदान यांनी एका क्षणात काळ बदलल्याची जाणीव होते आणि चित्रपटाच्या दृश्य भागाकडून अपेक्षा तयार होतात. पुढल्या भागाबद्दल तयार होणाऱ्या सर्व अपेक्षा सिटी ऑफ गॉड पूर्ण करतो.हिंसाचारया चित्रपटाचा विषय हिंसाचाराचं भरपूर दर्शन घडवणारा आहे. परंतु, हे दर्शन हिंसेला प्रोत्साहन देणारं नाही. प्रेक्षकाला जे धक्कादायक ठरतं ते त्याच्या रक्तरंजित असण्यानं नाही. कारण अनेक खून, मारामाऱ्या असल्या तरी प्रत्यक्ष रक्त दाखवणं दिग्दर्शकानं टाळलं आहे, तर त्यातल्या बंदूकधारी व्यक्तीच्या वयामुळे. यातली अनेक मुलं चौथी-पाचवीत जाण्याच्या वयाची आहेत. एका प्रसंगात झी या मुलांच्या टोळीला धडा शिकवण्यासाठी त्यातल्या दोघांना पकडतो. या सात-आठ वर्षांच्या मुलांच्या पायात गोळ्या घालतो आणि आपल्या बरोबरच्या दहाएक वर्षांच्या मुलाकडे पिस्तूल देऊन सांगतो, की तू मनानं ठरवून या दोघांतल्या कोणाही एकाला मार. या प्रसंगातला मृत्यू थेट दाखवला जात नाही. पायातल्या गोळ्याही बुटांमध्ये मारल्यानं नीट दिसत नाहीत, पण प्रसंगाचा आशय अस्वस्थ करतो.असे अस्वस्थ करणारे प्रसंग सिटी ऑफ गॉडफमध्ये जागोजागी आहेत. या प्रसंगाचा कल्चर शॉक तर पाहणाऱ्याला बसतोच, वर हा चित्रपट सत्य घटनांच्या मालिकेवर (आणि त्यावर लिहिलेल्या पावलो लिन यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर) आधारित असल्यानं, हे सगळं अधिक अंगावर येतं.चित्रपटाची सुरवात ही महत्त्वाची ठरते, जर पुढे येणारा चित्रपट या भागानं करून दिलेल्या प्रस्तावनेला जागला. `सिटी ऑफ गॉड` याचं उत्तम उदाहरण आहे, यात वादच नाही.
-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

3 comments:

Meghana Bhuskute January 26, 2008 at 10:54 PM  

Thanks for the article. I have missed this article somehow.

sharmila Kalgutkar January 27, 2008 at 5:57 AM  

ha blog jakas ahe...meghana bhuskutena hi lihite karave....

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP