संकल्पना आणि विज्ञानपट

>> Friday, June 20, 2008

विज्ञानपट म्हटलं की बिचकणारे अनेक प्रेक्षक आहेत. दोष त्यांचा नाही. हॉलिवूडने गेली काही वर्षं संगणकीय चमत्कारांची रेलचेल असलेल्या आणि सर्जनशीलतेची जागा तंत्रज्ञानाने घेतलेल्या विज्ञानपटांचा असा काही मारा चालवला आहे, की विज्ञानपट म्हणजे काही नेत्रदीपक घटना दाखवणारे, पण तार्किकदृष्ट्या आणि आशयाच्या बाजूने कमकुवत चित्रपट, अशी आपली समजूत होत चालली आहे. मात्र हे खरं असूनही या सर्व चित्रपटांना या समजुतीचा बळी करणं योग्य नाही. काही चित्रपट असेही आहेत, की विज्ञान हे केवळ त्यांच्या मूळ संकल्पनेत आहे. त्यातला घटनाक्रम हा काही वैचारिक मुद्द्यांवर आधारलेला आहे. आणि स्पेशल इफेक्ट्स जवळजवळ नाहीतच. अनेकदा असंही होतं, की अशा चित्रपटाच्या एकूण मांडणीमुळे आणि सखोलतेमुळे हे चित्रपट विज्ञानाबरोबरच सामाजिक आशयालाही स्पर्श करताना दिसतात. उदाहरणादाखल आपण "गटाका' (1997) चित्रपट घेऊ. इथली कल्पना अशी होती, की नजीकच्या भविष्यातल्या प्रथेप्रमाणे जन्मणारं प्रत्येक मूल हे जेनेटिक विज्ञानाच्या मदतीनं सुधारित असलंच पाहिजे. या सुधारण्याच्या प्रक्रिया न करता नैसर्गिकरीत्या झालेल्या मुलांची गणना कनिष्ठ वर्गात केली जाते. त्यांना महत्त्वाच्या पदावर ठेवलं जात नाही, सुखसोयी उपलब्ध होत नाहीत. त्यांची महत्त्वाकांक्षाही छाटून टाकली जाते. गटाकाचा नायक या कनिष्ठ वर्गातला आहे. ज्याला आपल्या मार्गातले अडथळे मंजूर नाहीत. तो एका उच्च वर्गातल्या मुलाकडून त्याची ओळख विकत घेतो, आणि सर्वांना फसवायला सज्ज होतो. यातला वैज्ञानिक भाग आहे तो केवळ जेनेटिक इंजिनिअरिंगला तंत्रज्ञान म्हणून अधोरेखित करणारा आणि समाजाला आलेला किंचित कृत्रिमपणा दाखवणारा. प्रत्यक्षात चित्रपटाची गोष्ट ही सरळच वर्णभेदाचं रूपक म्हणून वाचली जाऊ शकते. नेहमीच्या सायन्स फिक्शनचा चकचकाट इथे अजिबातच नाही. "गटाका' हे उदाहरण एरवीच्या विज्ञानपटांमध्ये वेगळं म्हणून उठून दिसलं, तरी या प्रकारचा हा एकमेव चित्रपट म्हणता येणार नाही. सत्य आणि स्वप्नाची सरमिसळ करणारा "ओपन युअर आईज' अन् त्याचं हॉलिवूड रूपांतर "व्हॅनिला स्काय', परकायाप्रवेशाला एका चमत्कारिक दृष्टिकोनातून सादर करणारा "बीइंग जॉन मालकोविच' (यात जॉन मालकोविच या प्रसिद्ध नटानं स्वतःच्या जनमानसातल्या प्रतिमेचं फार सुंदर आणि धीट विडंबन केलं होतं.याची पोस्टींग ब्लॉगवर फेब्रुवारी महिन्यात आहे. शक्य असल्यास जरूर वाचा) ), सैनिकांच्या आठवणीतल्या भूतकाळाबरोबर खेळणारा "मांचुरिअन कॅंडिडेट' असे अनेक चित्रपट आपण पाहू शकतो. असाच एक चित्रपट नुकताच पाहण्यात आला. अतिशय वेगळा विषय, उत्तम सादरीकरण, रॉबिन विलिअम्सच्या खालच्या पट्टीतल्या उत्तम दुर्मिळ भूमिकांमधली एक असूनही गेल्या वर्षी अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं फार कौतुक झाल्याचं ऐकिवात नाही. त्याचं नाव "फायनल कट'. ओमार नाइम दिग्दर्शित या पहिल्याच चित्रपटातली कल्पना, भविष्यात मृत व्यक्तीच्या आठवणीचं संकलन करणाऱ्या कटर नावानं ओळखल्या जाणाऱ्या संकलकाभोवती फिरते. या काल्पनिक समाजातल्या पद्धतीनुसार साधारण पैसेवाले लोक आपल्या मुलाच्या मेंदूत तो अर्भकावस्थेत असतानाच एक इम्प्लान्ट बसवतात. झोई इम्प्लान्ट नावानं ओळखलं जाणारं हे यंत्र या मुलाच्या शरीराचा एक अविभाज्य भाग बनून जातं. ते करतं काय, तर हे मूल जन्मल्यापासून त्याच्या डोळ्यांसमोर येणारी प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करतं, मृत्यूपर्यंत. पुढे हे सर्व फुटेज कटर्सना दिलं जातं आणि ते या व्यक्तीच्या आयुष्यातल्या हायलाईट् सना एकत्र करून "रिमेमरी' असा दोन तासांचा कार्यक्रम त्यांच्या आप्तापुढे दाखवला, जो या मृत व्यक्तीची शेवटची आठवण ठरेल. शरीरात इम्प्लान्ट असल्याचं ते बसवलेल्या मुलांना एकविसाव्या वर्षापर्यंत सांगितलं जात नाही. कारण त्यांना त्यामागची संकल्पना लहानपणी लक्षात येणार नाही. तिचं महत्त्व मोठेपणी कळण्याची शक्यता अधिक. झोई इम्प्लान्टच्या बाजूनं लोक आहेत, तसेच त्याच्या विरोधातही आहेत. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचे ठरतात ते कटर्स, जे समाजाच्या प्रेमाला आणि रोषालाही पात्र आहेत. या चित्रपटात म्हटलं तर दोन रहस्य आहेत. पहिलं आहे ते हॅकमनच्या भूतकाळाशी निगडित. नऊ वर्षांचा असताना हॅकमनच्या हलगर्जीपणातून एका मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यूने हॅकमनचं पूर्ण जीवन झाकोळून गेलं आहे. पुढे चार्ल्स बॅनिस्टर या वादग्रस्त माणसाच्या झोई फुटेजचं संकलन करताना त्याला एक माणूस दिसतो, जो या मृत मुलाची आठवण करून देणारा आहे. हा माणूस कोण हे इथलं पहिलं रहस्य, तर बॅनिस्टरच्या आयुष्यातल्या काही घटना हे दुसरं. पण तसं पाहायला गेलं, तर हा रहस्यपट नाही. त्यामुळे महत्त्व आहे ते रहस्यांना नाही, तर एखाद्या माणसाचं आयुष्य चित्रित होणं या संकल्पनेला, आणि हॅकमन या व्यक्तिरेखेच्या तपशिलाला. आयुष्य चित्रित करण्याची कल्पना ही खूपच विचार करण्यासारखे प्रश्न उभे करते. ज्यातले बरेचसे ही पटकथा बोलून दाखवते. एक म्हणजे सर्वच गोष्टी चित्रित झाल्या, तर माणसाच्या प्रायव्हसीचं काय? कारण मूळ इम्प्लान्ट लावताना व्यक्तीला कल्पना दिलेली नाही. त्यामुळे हे चित्रीकरण त्याच्यावर लादलेलं आहे. हा प्रायव्हसीचा प्रश्न आज आपल्या समाजात अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. रिऍलिटी शोज किंवा टॅलेन्ट हन्टसारख्या स्पर्धात्मक कार्यक्रमातून मीडिया सामान्य माणसांच्या घराघरात पोचला आहे. एका परीने सर्व समाजच कॅमेराचं लक्ष्य झाल्यानं व्यक्तिगत म्हणण्यासारखं काहीच उरलेलं दिसत नाही. दुसरा प्रश्न असा, की एखाद्याला कळलं, की आपण केलेली प्रत्येक गोष्ट चित्रित होते आहे, तर तो आपलं आयुष्य मोकळेपणानं जगू शकेल का? त्यानं घेतलेले निर्णय हे पुढे चार लोकांत दिसणार असले तर तो तेच निर्णय घेईल का वेगळे? आपल्या आठवणी या खऱ्या कितपत विश्वासार्ह असतात, यावरही हा चित्रपट आपली मतं मांडतो. इथं हॅकमनच्या आयुष्यात लहानपणी घडलेला अपघात त्याच्या आठवणीत आणि चित्रित दृश्यात थोडा वेगवेगळा आहे. हा वेगळेपणा थोडा असला, तरी प्रत्यक्षात त्याचा हॅकमनवर झालेला परिणाम त्याचं आयुष्य व्यापून टाकणारा आहे. त्यामुळेच महत्त्वाचा. आयुष्य रेकॉर्ड करण्याची कल्पना कितीही ओढूनताणून आणलेली वाटली तरी खरी उतरते ती कटर्सच्या व्यक्तिरेखांच्या विचारपूर्वक केलेल्या हाताळणीमुळे. कटर्स हे या मंडळींची आयुष्य पाहू शकतात; पण त्याबद्दल बाहेर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. तसंच कायद्यानं ही मंडळी स्वतःही इम्प्लान्ट बसवलेली असू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी घेतलेला मृत व्यक्तीच्या जीवनाचा आढावा, हा पूर्णतः गुप्त राहतो. थोडक्यात, कन्फेशन घेणारा धर्मगुरू किंवा अपराधी व्यक्तीचा जबाब ऐकणारा वकील यांच्याप्रमाणेच हा कटर व्यक्तीच्या काळ्या बाजूचा अप्रत्यक्ष साक्षीदार आहे, पण त्रयस्थ. इथं कटर्सची तुलना ही प्रतीकात्मक मार्गानं व्यक्तीची पापं स्वतःकडे घेणाऱ्या सिनइटर्सच्या धार्मिक संकल्पनेशीदेखील केलेली आहे. कटर्सचा संपूर्ण काल्पनिक व्यवसाय इथं खरा वाटतो तो मुख्यतः रॉबिन विलिअम्सच्या कामगिरीमुळे. अत्यंत भडक (पॅच ऍडम्स, फ्लबर) संवेदनशील (डेड पोएट् स सोसायटी) आणि एकलकोंड्या, विरक्त (वन अवर फोटो, इनसोम्निआ) भूमिका हा नट सारख्याच प्रभावीपणे करतो. मी त्याच्या तिसऱ्या वर्गात मोडणाऱ्या भूमिकांचा चाहता असल्यानं, मला "फायनल कट' मधली त्याची भूमिका अधिक आवडली असावी. थोडक्यात काय, तर सर्वच विज्ञानपटांना ब्लॅक लिस्ट करण्यात अर्थ नाही. प्रत्येक चित्रप्रकारात जसे चांगले चित्रपट असतात, तसे वाईट. वाईटाचं प्रमाण वाढलं म्हणून चांगलं संपुष्टात येतं असं नाही. उलट त्याच कारणानं ते अधिक लक्षवेधी ठरतं, असंही आपण म्हणू शकतो.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP