फनी' नसलेला फनीगेम्स

>> Friday, June 27, 2008

हॉलिवूड थ्रिलर्समध्ये आपण काय पाहतो? कर्तबगार नायक, महादुष्ट खलनायक. खलनायकानं आपल्या उद्योगांनी नायकाला सळो की पळो करून सोडलेलं. मग नायक अखेरचं बंड पुकारतो आणि खलनायकाच्या हिंसक मार्गांनी जाऊन तथाकथित विजय मिळवतो. पडद्यावरलं हिंसेचं साम्राज्य हे व्यावसायिक हॉलिवूड थ्रिलर्स प्रेक्षकांच्या पचनी पाडतात ते त्यामध्ये करमणूक असल्याचा आभास निर्माण करून. पण खरंच ही करमणूक आहे का? अद्ययावत बंदुकांमधून सुटणाऱ्या गोळ्या, खून, मारामाऱ्या, आकर्षक संवादफेकीतून प्रेक्षकांशी नाळ जोडू पाहणाऱ्या अन् त्याचबरोबर आपलं उद्दिष्ट पुरं करण्यासाठी रक्ताचे पाट वाहायला कमी न करणाऱ्या व्यक्तिरेखा यात करमणुकीचं प्रमाण खरंच किती? एके काळी चित्रपटांमध्येही आक्षेपार्ह असणारा हिंसाचार आज मोठ्या अन् छोट्या पडद्यावरून घराघरात पोचलाय. त्यातल्या अप्रत्यक्ष संदेशाला जबाबदार कोण? हे दाखवणाऱ्या चित्रकर्त्यांची चूक, की ते पाहून घेणाऱ्या प्रेक्षकांची? "चित्रकर्त्यांची'; हे उघड आणि ढोबळ उत्तर असलं, तरी त्यामुळे प्रेक्षक आपला सहभाग झटकून टाकू शकत नाहीत. प्रेक्षक आहेत म्हणून चित्रपट आहे. प्रेक्षकांनीच तो नाकारला तर तो निर्माणच होऊ शकणार नाही.
हॉलिवूडने सर्वमान्यता मिळवून दिलेल्या हिंसकतेला तिच्या निंदनीय स्वरूपात समोर आणलं अन् प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडलं ते 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या मायकेल हानेके यांच्या "फनी गेम्स' या ऑस्ट्रियन चित्रपटानं. नुकतीच पाहण्यात आली ती याच दिग्दर्शकानं काढलेली अमेरिकन आवृत्ती. मूळ चित्रपटाशी पूर्ण प्रामाणिक असणारी. हानेकेचा हा मी पाहिलेला दुसरा चित्रपट. मी आधी पाहिलेला 2005 चा "कॅशे' काहीसा रहस्यपटाच्या जवळ जाणारा होता. मात्र, तो पाहूनही लक्षात येत होतं, की दिग्दर्शकाला सोपी उत्तरं काढण्यात रस नाही आणि पडद्यावर काय घडतंय याइतकंच किंवा त्याहून अधिक महत्त्व तो प्रेक्षकांच्या डोक्यात काय घडतंय याला देतोय. "फनी गेम्स'देखील याच प्रकारात मोडणारा आहे. मात्र, अधिक धक्कादायक, अधिक प्रक्षोभक आणि विचारांचं खाद्य पुरवणारा.
"फनी गेम्स'मध्ये खरं तर "फनी' काहीच नाही. नावात आहे तो उपरोध. करमणुकीच्या नावाखाली खपत असलेल्या क्रौर्याचा पर्दाफाश करणाऱ्या हानेकेनं हे गोंडस नावही यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या स्तंभित करणाऱ्या कारवायांना अधोरेखित करण्यासाठी वापरलं आहे.
इथं वापरण्यात येणारा चित्रप्रकार आहे तो होस्टेज मुव्हीचा. जॉर्ज (टिम रॉथ) आणि ऍना (नेओमी वॉट् स) हे सुखवस्तू जोडपं आपल्या जॉर्जी (डेवोन गीअरहार्ट) या दहा-बारा वर्षांच्या मुलाबरोबर आपल्या गावाबाहेरच्या बंगलीवर सुट्टी घालवण्यासाठी आलं आहे. परिसरात तसे अनेक बंगले आहेत, पण दूर दूर. घरी स्थिरस्थावर होत असताना पीटर (ब्रॅडी कॉरबेट) उगवतो. आपण शेजाऱ्याकडून आल्याचं सांगतो आणि ऍनाकडे थोडी अंडी मागतो. दुर्दैवाने त्याच्या हातून अंडी फुटतात आणि पुन्हा दुसरी देणं ऍनाला भाग पडतं. मग काही ना काही अडचणी येत राहतात आणि ऍनाला या पाहुण्याचा संशय यायला लागतो. लवकरच पॉल (मायकेल पिट) येऊन पीटरला सामील होतो. पांढरे कपडे आणि हातमोजे घातलेले पीटर आणि पॉल वरवर नम्र आणि हसतमुख वाटले तरी प्रत्यक्षात ते या सोज्वळ प्रतिमेपलीकडे आहेतसा भास व्हायला लागतो, जो लवकरच प्रत्यक्षात उतरतो. जॉर्जचा पाय मोडून या कुटुंबाला असहाय अवस्थेत सोफ्यावर बसवलं जातं आणि खेळाला रंग चढायला लागतो.
या प्रसंगापर्यंतचा "फनी गेम्स'चा भाग हा प्रेक्षकाला कथेत चांगलाच गुंगवणारा असला, तरी फारसा अनपेक्षित म्हणता येणार नाही. चित्रपटाच्या वेगळेपणाची पहिली चाहूल लागते ती पॉल थेट आपल्याशी बोलतो तेव्हा. अंधाऱ्या हॉलमध्ये यजमान अन् पाहुणे समोरासमोर बसल्यावर पॉलच्या डोक्यात कल्पना येते ती पैज लावण्याची. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जॉर्ज, जॉर्जी आणि ऍना जिवंत असतील की नाही ही ती पैज. त्याची अन् पीटरची बाजू म्हणजे नक्कीच नसतील. जॉर्ज आणि ऍनाने दुसरी बाजू निवडावी ही त्याची अपेक्षा. एवढं झाल्यावर पॉल सरळ प्रेक्षकांकडे पाहतो आणि त्यांचंही मत विचारतो. ते कोणत्या बाजूनं पैजेत सामील आहेत, हा त्याचा आपल्याला विचारण्यात येणारा प्रश्न. हा प्रश्न आपल्याला खरंच धक्कादायक वाटतो. कारण एव्हाना आपण या कुटुंबाच्या जीवन-मरणाबद्दल खरोखरच अंदाज बांधायला सुरवात केलेली असते. हा प्रश्न ही विचारांची प्रक्रिया आपल्या लक्षात आणून देतो आणि अशा चित्रपटाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किती कॅज्युअल झाला आहे, हे स्पष्टपणे दाखवतो.
"फनी गेम्स' नीट पाहताना आपल्या लक्षात येईल, की ती वरवर दोन विकृत तरुणांनी एका कुटुंबावर केलेल्या अत्याचाराची गोष्ट असली, तरी ती कायमच यात सहभागी असणाऱ्या व्यक्तिरेखांच्या मानसिकतेवर लक्ष केंद्रित करते. प्रत्यक्ष दृश्य परिमाणातून धक्के देण्याचा त्याचा प्रयत्न दिसत नाही. त्यामुळे मुख्यतः सर्व हिंसा ही ऑफस्क्रीन होते. पडद्यावर दिसतात त्या प्रतिक्रिया. मुलाच्या डोळ्यांवर फडकं टाकून आईला कपडे काढायला सांगण्यासारख्या प्रसंगातही प्रत्यक्ष नग्नता येत नाही. आपल्याला हिंसेची भयानकता जाणवून देतानाही या प्रकारच्या बहुसंख्य चित्रपटांमधून स्वीकारलेले राजमार्ग हानेके टाळतो, त्यामुळेच आपण "फनी गेम्स'लाही अशा इतर चित्रपटांच्या वर्गवारीत न बसवता त्रयस्थपणे त्याकडे पाहू शकतो. त्यातला प्रयोग लक्षात घेऊ शकतो.
हिंसाचाराच्या गंभीर घटनांना पडद्यावर दाखवून त्यांना सोपे सुखांत शेवट शोधण्याच्या हॉलिवूडच्या प्रवृत्तीवरही इथे शेवटाकडच्या एका प्रसंगी ताशेरे झाडलेले आढळून येतात. शेवटाकडे एका प्रसंगी बाजू उलटायची परिस्थिती तयार होतेसं वाटतं, आणि पीटर/पॉल पेचात येतात. यावर पॉल उपाय काढतो तो म्हणजे सरळ चित्रपट रिवाईन्ड करण्याचा. हा रिमोट कंट्रोलचा अभिनव वापर आपल्या एका प्रसंगाच्या दोन आवृत्त्या दाखवतो. एक वास्तव, तर एक हॉलिवूड स्पेशल. पुढे यातली एक आवृत्ती निकालात काढली जाते आणि कथानक पुढे जातं. पॉलनं प्रेक्षकांबरोबर केलेला संवाद किंवा चालू चित्रपट रिवाईन्ड करणं यांसारख्या घटना या धंदेवाईक चित्रपटांतून जाणूनबुजून घडवत आणलेल्या क्रौर्याच्या दर्शनाकडे निर्देश करतात. या दर्शनामागची योजनाबद्ध कृत्रिमता समोर आणतात. त्यामुळेच शेवटही हॉलिवूड प्रथेच्या विरोधात जाणारा असला तरी फसवा वाटत नाही.
इथं एक लक्षात घ्यायला हवं, की दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे जॉर्ज/ऍना हे ज्या प्रकारे पीटरने कह्यात ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे प्रेक्षकांना चित्रपटानं कह्यात ठेवलेलं आहे. त्यांच्यापुढे उलगडणारा चित्रपट हा सांकेतिक अर्थानं त्यांचं मनोरंजन करत नाही, तरीही हा प्रेक्षक उठून न जाता चूपचाप चित्रपट पाहतो आहे, त्याच्यावर प्रत्यक्ष कोणतीही सक्ती नसताना. हा त्यानं चित्रपटाला दाखवलेला पाठिंबा आहे. त्यामुळेच या प्रकारच्या चित्रपटाला तो स्वतःही काही अंशी जबाबदार आहे.
1997 च्या आवृत्तीबद्दल बोलताना हानेके एकदा म्हणाला होता, की "एनीवन हू लीव्हज द सिनेमा डझन्ट नीड द फिल्म, ऍन्ड एनीबडी हू स्टेज डझ' दिग्दर्शकाने मांडलेला हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. शेवटी आपल्याला कोणत्या प्रकारच्या चित्रपटाची गरज आहे, हेच महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचा चित्रपट मिळेल हे त्यावरच ठरणार, हेदेखील उघड आहे.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP