साच्याबाहेरचा कालप्रवास

>> Friday, November 21, 2008


कालप्रवासाचा विषय केंद्रस्थानी ठेवून ऍक्शन, विनोदी चित्रपट हे हॉलिवूडसाठी नवे नाहीत; पण या साच्याबाहेर पडून कालप्रवासाचा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन "द लेक हाऊस' आणि "प्रिमॉनिशन' या चित्रपटात पाहायला मिळतो. कालप्रवासाबाबतच कोणत्याही वैज्ञानिक स्पष्टीकरणाचे ओझे या चित्रपटांमध्ये नाही, हे अजून विशेष!

सॅंड्रा बुलकचे सलग दोन चित्रपट हे कालप्रवासाशी संबंधित असणे, मात्र तरीही ते हॉलिवूडच्या यशस्वी बॉक्स ऑफिस गणिताच्या चौकटीत न बसणारे असणे, हे विशेषच म्हणायला हवे. दर्जेदार; पण सर्व मसाल्याने भरपूर असणारे अत्यंत यशस्वी कालप्रवासी हॉलिवूडपट म्हणजे "टर्मिनेटर' मालिका आणि "बॅक टु द फ्युचर' मालिका. अनुक्रमे ऍक्शन आणि विनोदासाठी गाजलेले हे चित्रपट आपल्या अपेक्षित प्रेक्षकवर्गाचा पूर्ण अभ्यास करून बनवलेले होते. आणि त्यांच्या निर्मितीत असणारा जेम्स कॅमेरोन आणि स्टीवन स्पीलबर्ग यांचा हात पाहता ते फारसे आश्चर्यकारक नाही. बुलकच्या "द लेक हाऊस'बद्दल किंवा त्यानंतर आलेल्या "प्रिमॉनिशन'बद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही.
"द लेक हाऊस' आपल्याकडे प्रदर्शित झाला होता आणि फार गाजावाजा न होताही तो पाहिलेल्यांना लक्षात आले असेल, की तो नेहमीच्या फॉर्म्युलात बसणारा नव्हता. समांतर आणि व्यावसायिक यांच्या सीमेवरल्या या चित्रपटात "स्पीड' मधली प्रसिद्ध जोडी पुन्हा अवतरली होती. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे शेवटचा प्रसंग सोडता बुलक आणि किआन रीव्हज आमनेसामने येतील, असा प्रसंगच इथे नव्हता. साउथ कोरिअन चित्रपटावर आधारित असलेल्या या चित्रपटात एक प्रेमकथा सांगितली होती. एका घरात दोन वर्षांच्या अंतराने राहणाऱ्या दोन व्यक्तींची. ती दोघे संवाद साधू शकतात ती केवळ एका मेलबॉक्सच्या साह्याने, ज्यात ठेवलेली पत्रे काळाच्या नियमांना झुगारून देऊन दुसऱ्याच्या हाती पडू शकतात. "लेक हाऊस'मध्ये कच्चे दुवे अनेक होते; पण शेवट हा त्यातला सर्वांत मोठा. तरीही हा चित्रपट पाहण्यासारखा होता, तो मध्यवर्ती कल्पना पटेल अशा पद्धतीने पडद्यावर आणल्याने आणि दोन प्रमुख अभिनेत्यांच्या कामामुळे.
नुकताच बुलकचा दुसरा चित्रपटही पाहण्यात आला- "प्रिमॉनिशन'. "लेक हाऊस'ची वर्गवारी "रोमान्स' या चित्रप्रकारात होऊ शकते. "प्रिमॉनिशन'चे मात्र तसे नाही. काळाशी चाललेला खेळ हा इथे सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मात्र याला सायन्स फिक्शनही म्हणता येत नाही. कारण यातल्या घटनांना वैज्ञानिक स्पष्टीकरण (मग ते काल्पनिक का असेना) मिळू शकत नाही. एका प्रसंगात ते देण्याचा केलेला प्रयत्नही हास्यास्पद वाटतो. त्यामुळे घटनाक्रमामागे स्पष्टीकरण न शोधता त्याचे तसे असणे गृहीत धरणे, हाच चित्रपट पाहण्याचा योग्य मार्ग आहे. एकदा का तो अवलंबला, की मग मात्र "प्रिमॉनिशन' आवडू शकतो.
काळ हा एक ठराविक मार्गाने पुढे जातो. सोमवार नंतर मंगळवार, मग बुधवार वगैरे. "प्रिमॉनिशन'ची नायिका लिंडा हॅन्सन (सॅंड्रा बुलक) हिच्या आयुष्यात मात्र एका विशिष्ट कालावधीसाठी हा क्रम बदलून जातो. एका गुरुवारी नेहमीप्रमाणे घरची कामे उरकताना तिच्या घरी गावचा शेरीफ येतो. आणि सांगतो, की तिच्या बाहेरगावी गेलेल्या नवऱ्याला म्हणजे जिम (जुलिअन मॅकमोहन) ला काल अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. लिंडाला मोठा धक्का बसतो. मात्र मुलींना शांत करणे, स्वतःच्या आईला कळवून तिला बोलावून घेणे वगैरे गोष्टी ती उरकायला लागते. दुसऱ्या दिवशीची सकाळ ही मात्र अधिकच धक्कादायक असते. कारण आता जिम जिवंत असतो. एवढेच नाही, तर आता वारही मागे गेलेला असतो. गुरुवारनंतर शुक्रवार न उजाडता, ती आधीच्या सोमवारवर येऊन पोचलेली असते. यानंतरचा प्रत्येक दिवस हा वेगळ्याच क्रमवारीने येणारा असतो, मात्र या दिवसांचा केंद्रबिंदू असतो बुधवार. जिमच्या अपघाताचा दिवस. लिंडाला काय घडतेय हे कळायला, त्यावर काही उपाय आहे का हे शोधायला आणि स्वतःला वेडी न म्हणवून घेता मदत मिळवायला बराच वेळ लागतो आणि बुधवार तिच्या आयुष्यात उगवण्याआधी यावर मार्ग काढणे अशक्य होऊन बसते.

एकदा का यातले काळाचे पुढेमागे होणे हे आपण पार्श्वभूमी म्हणून लक्षात घेतले, की चित्रपट दोन प्रमुख प्रश्न उपस्थित करतो. एक नैतिक तर दुसरा घटना घडण्यामागच्या मूलभूत प्रक्रियेच्या स्वरूपासंबंधीचा. एखाद्याचा मृत्यू होणार हे माहीत असून केवळ तो थांबवायचा प्रयत्न न करणे हे व्यक्तीला नैतिकदृष्ट्या खुनी ठरवेल का हा पहिला, तर एखादी घटना थांबवण्याचा प्रयत्नच ती घटना घडण्याला कारणीभूत होऊ शकतो का, हा दुसरा. चित्रपटात हे दोन प्रश्न पुरेसे महत्त्वाचे आहेत. आणि चित्रपटाच्या शेवटाकडचा भाग या प्रश्नांभोवतीच गुंफलेला आहे हे खरेच, पण तरीही चित्रपटाची मांडणी पूर्णपणे निर्दोष नाही.
मांडणीतला दोष प्रामुख्याने दिसतो तो त्याच्या रहस्यावर नको इतके लक्ष केंद्रित करण्यात. जिमचा मृत्यू आणि त्याच्या आगे मागे येणारे प्रसंग महत्त्वाचे आहेत; पण त्यांचा विचार हा जिम आणि लिंडाच्या नातेसंबंधाला केंद्रस्थानी ठेवून व्हायला हवा. त्या ऐवजी दिग्दर्शक मेनान यापो यांचे लक्ष हे दिवसांचा क्रम, प्रत्येक दिवसाचे शेवट आणि सकाळ, त्यांचे आपापसांत जोडले जाणे, इतर व्यक्तिरेखा, त्यांच्यावर संशय आणण्याची पद्धत, याकडेच अधिक गेलेले दिसते. त्यामुळे चित्रपटाचे स्वरूप हे थोडे गुन्हेगारी तपास कथेसारखे होताना दिसते.
त्याबरोबरच लिंडाची व्यक्तिरेखा गोष्टी समजून घ्यायला आणि त्यावर पावले उचलायला फार वेळ लावते. आणि काही वेळा चुकीचे निष्कर्षदेखील काढते. ती स्वतःहून पुढाकार घेऊन काही करण्यापेक्षा असहायपणात अधिक वेळ घालवते. त्यामुळे घटनांना वेग असूनही चित्रपट संथ वाटतो. त्यातून एकदा का सुरवातीला काय घडणार हे लक्षात आले, की त्यात काही फार नवीन माहितीची भर घातली जात नाही. किंवा काही अनपेक्षित वळणेही पटकथेत येत नाहीत. शिवाय लिंडाला माहीत नसलेली एक गोष्ट प्रेक्षकाला माहीत असते, ती म्हणजे हा चित्रपट आहे. त्यामुळे ती वास्तव गतीने विचार करत ज्या मुद्द्यांपर्यंत येते, त्यापर्यंत प्रेक्षक चित्रपटाचे लॉजिक वापरून आधीच पोचतो. त्यामुळे प्रेक्षक हा बहुतेकदा कथेच्या किंवा पात्रांच्या पुढे असतो, हा चित्रपटाचा एक मोठाच दोष म्हणावा लागेल.
"प्रिमॉनिशन'चा प्रेक्षकवर्ग नक्की कुठला, याबद्दल मला कुतूहल आहे. "लेक हाऊस' आवडणाऱ्यांना हा आवडू शकेल; पण मुळात "लेक हाऊस' फार लोकांना आवडला होता, असे वाटत नाही. सामान्य प्रेक्षक हा टाइम ट्रॅव्हल असणाऱ्या चित्रपटाकडून तो सायन्स फिक्शन किंवा ऍक्शन या चित्रप्रकारातच असल्याची अपेक्षा ठेवतात. आणि या प्रकारांची मनोरंजन मूल्ये चित्रपटात असावीत, अशी त्यांची कल्पना असते. "प्रिमॉनिशन'चा कालप्रवास हा नेहमीच्या कालप्रवासासारखा तर नाहीच, वर तो सांकेतिक साच्याचा आधार घेत नसल्याने, या हमखास प्रेक्षकवर्गाचा उपरा वाटू शकतो. याउलट वेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहणाऱ्यांना त्याचे तपशिलावर रेंगाळणे आणि तात्त्विक किंवा काव्यात्म पातळीवरून कथानकाचा विचार न करणे खटकू शकेल.
मला स्वतःला "लेक हाऊस' आणि "प्रिमॉनिशन' हे दोन्ही चित्रपट आवडले. आवडण्याचे मुख्य कारण हेच, की ते साच्याबाहेर विचार करताना दिसतात. दोघेही कालप्रवासाच्या कल्पनेकडे वेगळ्या नजरेने आणि त्यातले वैज्ञानिक स्पष्टीकरणाचे ओझे काढून टाकून पाहणारे आहेत. शैलीबाबतीतले त्यांचे चाचपडणे हे विषयाच्या नव्या सादरीकरणामुळेच होते आहे; पण नवे रस्ते शोधणाऱ्यांनी चाचपडायलाही आपली हरकत नसावी. अखेर त्यामुळेच आपल्याला वेगळे काही पाहायला मिळण्याच्या शक्यता तयार होतात. काही वेळी नावीन्य हे परफेक्शनहून अधिक मोलाचे असू शकते.
- गणेश मतकरी

1 comments:

Anonymous,  December 1, 2008 at 7:30 AM  

lake house malahi aavadala hota.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP