निःशब्द दुःखाची नायिका - मलेना

>> Monday, November 24, 2008



मलेनाच्या आठवणी रेनातो सांगतोय. संपूर्ण चित्रपटात मलेना एकही शब्द बोलत नाही- अपवाद फक्त कोर्टाच्या सीन्सचा आणि रेनातोच्या स्वप्नदृश्‍यांचा. एरवी तिच्या तोंडून येणारे शब्द म्हणजे नावडत्या घटनांच्या प्रतिक्रियाच आहेत. मात्र मलेनाचं हे निःशब्द दुःख आणि मलेनाच्या साह्यार्थ आटलेले समाजाचे शब्द, या दोन्ही गोष्टींतल्या मूकपणातला फरक स्पष्टपणे जाणवतो. ........

कुणालाही पडू नये असं दुःस्वप्न म्हणजे "मलेना'; पण मलेनाला मात्र ते जागेपणी पडतं आणि ती त्यात पार होरपळून निघते. इटलीमधलं छोटंसं गाव सिसिलिया. महायुद्धाचा काळ. मुसोलिनीची राजवट सुरू आहे. ही फॅसिस्ट राजवट सुरू झाल्याचं रेडिओवरून ठिकठिकाणी लोकांना कळतं त्याच वेळी गल्लीतली टवाळ मुलं रस्त्यावरच्या मुंगळ्याला भिंगाच्या साह्यानं सूर्यकिरणांच्या चटक्‍यानं भाजून मारतात आणि मलेना स्कॉर्दियाचं आयुष्य उलगडायला सुरवात होते.
मलेना ही एका सैनिकाची तरुण, सुंदर बायको आहे. तिचा नवरा महायुद्धाच्या आघाडीवर गेलाय. ही गावात एकटी. त्यामुळे गावातल्या समस्त पुरुषांच्या नजरा तिला आपादमस्तक न्याहाळायला मोकळ्या आणि म्हणूनच समस्त स्त्रियांच्या टोमण्यांचीही ती धनीण. रेनातो हा गावातलाच एक पौगंडावस्थेतला मुलगा. तो आणि त्याची गॅंग गावात भटकणे, वर्गात शिक्षकांना त्रास देणे, यासारख्या गोष्टींबरोबरच मलेनाला रस्त्यात जाता- येता बघणे, हाही कार्यक्रम राबवतात. रेनातोच्या शारीरिक बदलानुरूप कल्पनाविलासाकरिता आवश्‍यक असणारी स्त्रीप्रतिमा म्हणजे मलेना! तो मलेनाच्या प्रेमात पडतो. कल्पनेत तिच्याबरोबर संग करतो. शाळेतली मुलं तिच्याविषयी अचकटविचकट बोलतात तेव्हा तो त्यांच्याशी मारामारी करतो. त्याने पाह्यलेल्या चित्रपटातली द्रुष्यं तो आपल्या कल्पनेत आणतो, तिथे तो हिरो आणि मलेना हिरोईन. मलेनाच्या घरात चोरून बघतो, तिचं अंतर्वस्त्र चोरतो- थोडक्यात वयात येणारा मुलगा जे जे काही म्हणून करेल ते सर्व तो करतो- त्याची नायिका आहे मलेना, पण यातलं काहीही मलेनाला कळत नाही. तिचं एकाकी जीवन सुरू आहे.
पण हे जीवन एकांतात नाही. तिचा नवरा युद्धात मेल्याची बातमी आल्यानंतर तिच्याबद्दल सहानुभूती असणारा एक जण रात्री तिच्या घरून बाहेर पडताना गावातल्या एका डेंटिस्टशी मारामारी करतो आणि त्याचं खापर मलेनावर फुटतं. तिच्याविरुद्ध छिनालपणाचा खटला कोर्टात दाखल होतो. संपूर्ण कोर्टात होणारी तिची बदनामी ऐकायला आंबटषौकिनांची गर्दी होते. रेनातो येतो; पण त्याची सहानुभूती मलेनापर्यंत पोचत नाही. तिला खटल्यातून वाचवणारा वकील रात्री तिच्या घरात घुसून आपली "फी' वसूल करतो. रेनातो मूकपणे बघतो!
आघाडीवर नवरा मरण पावल्याची बातमी आणि बॉंबहल्ल्यात वडिलांचा झालेला मृत्यू, यामुळे सर्वस्व गमावलेल्या मलेनाला जगण्यासाठी स्वतःचं शरीर वापरण्याशिवाय पर्याय नसतो. अर्थात गावातल्या सभ्य गृहस्थांनी तिला हा मार्ग केवळ सुचवलाच नाहीये तर त्यापर्यंत घेऊन जाण्यासाठीची सक्रिय मदतही देऊ केलीय. बॊम्ब हल्ल्यात म्रुत्यूमुखी पडलेल्या वडिलांच्या श्रद्धांजली सभेनंतर तिचं चुम्बन घ्यायला लोकांची रांग लागते! ’आम्ही आहोत हे जवळ्जवळ प्रत्येक जण अत्यंत मनापासून सांगतो. ’शेजा़ऱ्यांवर प्रेम करा’ ह्या येशूच्या संदेशाचं पालन करण्यासाठीची कोण ही अहमहमिका! मलेना स्वतःमध्ये संपूर्ण बदल करते. मान खाली घालून साधेपणे वावरणारी मलेना आता ताठ मानेनं बिनधास्तपणे रस्त्यावर चालत चौकातल्या कॅफेटेरियामध्ये बसते आणि सिगारेट काढून तोंडात धरते, तेव्हा ती शिलगावयाला सभ्य गृहस्थांचे हजारो हात लायटरसह पुढे होतात- दिग्दर्शकानं अतिशय तब्येतीनं हा सीन घेतलाय. आता मलेना सगळ्यांसोबत दिसते तशी नाझी सैनिकांसोबतही दिसते. मात्र रेनातोला हे सहन होत नाही-त्या कल्पनेनं तो बेशुद्ध पडतो. त्याच्या घरी मंत्रतंत्र सुरू होतात. पण वयात आलेल्या रेनातोची ’गरज’ त्याला यापूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी मारहाण करणारा त्याचा बाप ओळखतो आणि त्याला घेऊन ’बावनखणी’त जातो! तिथल्या स्त्रीमध्येसुद्धा रेनातो मलेनालाच बघतो.

महायुद्ध संपतं. अमेरिकन सैनिक सिसिलियाला मुक्त करतात. आता मात्र त्या आनंदात सामील झालेल्या गावातल्या सभ्य गृहस्थांच्या सभ्यस्त्रिया कुणाचीही वाट बघत नाहीत. त्या मलेनाला घरातून फरफटत बाहेर आणतात आणि त्यांच्या दृष्टीनं "गावभवानी' असणाऱ्या मलेनाची यथेच्छ धुलाई त्याच कॅफेटेरियात करतात. तिचे कपडे फाडतात, डोकं भादरतात. तिचा आकांत कुणाचंही काळीज चिरून जात नाही. छिनाल म्हणून तिच्या शरीरावर बसणाऱ्या तडाख्यांपैकी एकाही फटक्‍याचा साधा ओरखडाही तिला त्या मार्गाला लावणाऱ्या बघ्यांच्या मनावर उमटत नाही. रेनातो मूकपणे हे दृश्‍य बघतोय. तो हताश आहे; पण काही करूही शकत नाही. तिच्या नकळत का होईना; पण इतरांप्रमाणे त्यानंही तिला वापरूनच घेतलंय आणि इच्छा नसतानाही तो इतर बघ्यांपैकीच एक झालाय.
मलेना गाव सोडून जाते. कालांतरानं तिचा नवरा जिवंत परत येतो. रेनातो मलेनाचा ठावठिकाणा त्याला कळवतो. आता मलेना तिच्या नवऱ्यासोबत पुन्हा त्याच गावात येते आणि सारं गाव त्या दोघांकडे टक लावून बघत राहतं. त्यात रेनातो आणि त्याची मैत्रीणसुद्धा आहेत. "मिसेस स्कॉर्दिया' म्हणून सगळे तिला अभिवादन करतात आणि तीही पूर्वीचं विसरून त्या बायकांशी बोलते. बाजारातून परत जाताना तिच्या पिशवीतली संत्री सांडतात. रेनातो ती उचलायला मदत करतो- दोघांची ही पहिलीच नजरानजर! "गुडलक मिसेस मलेना' एवढं तो म्हणतो. परत जाताना वळून बघतो, मलेनाची चाल मंदावलेली दिसते.
संपूर्ण चित्रपट हा रेनातोच्या आठवणीतल्या रूपात येतो आणि संपताना त्याचं वाक्‍य ऐकू येतं- "माझी आठवण होते का' असं विचारणाऱ्या असंख्य स्त्रियांपैकी आज मला फक्त तिचीच आठवण होते जिनं मला असं कधीच विचारलं नव्हतं.मलेनाला रेनातोची जाणीव कधीच नव्हती. किंबहुना अशा जाणिवा, आठवणी आणि तरल भावनांना गोंजारत बसायला तिला संधीच मिळाली नाही. तिचा वापर झाला. कुणी स्वप्नात केला आणि स्खलित झाले तर कुणी अस्खलितपणे जागेपणी केला आणि तिलाच स्खलनशील ठरवून मोकळे झाले! तिला वखवखलेल्या नजरेनं बघूनही हे मोकळे, तिला धंद्याला लावूनही हे मोकळे, तिची भर चौकात विटंबना झाली तेव्हाही हे मोकळे आणि नवऱ्याबरोबर ती परत आली तेव्हाही तिला "मिसेस स्कॉर्दिया' म्हणून अभिवादन करायलासुद्धा हे मोकळेच! मलेनाच्या पुनर्वसनानं तिचा झालेला अपमान परत कसा यायचा? द्रौपदीच्या विटंबनेची शिक्षा कौरवांना मिळाली; पण तिच्या विटंबनेचे मूक साक्षीदार असणाऱ्या पांडवांना काही इतिहासानं जाब विचारला नाही, ही खरी शोकांतिका. काहीही न करता मिळालेलं मलेनाचं दुःख तिचं तिलाच भोगावं लागतं, हीच जनरीत म्हणायची. एकट्याच्या दुःखाची अनुभूती घेताना हटकून आठवणारा गालिब मलेना बघतानाही आठवतो-


"हम कहॉं के दाना थे किस हुनर में यकतां थे
बेसबब हुआ "गालिब' दुश्‍मन आसमॉं अपना।'


महाकाव्यातली द्रौपदी, महाकवी गालिब आणि कोण कुठली कल्पनेतली मलेना; पण या तिघांच्याही दुःखाची संवेदना जाणिवेच्या एकाच तारेनं छेडली जावी, हा निव्वळ योगायोग की आपल्याच मनाचा हळवेपणा?

- प्रसाद नामजोशी
(point of view या सदरामधून. अप्रकाशित भागासह)

1 comments:

Ruminations and Musings November 28, 2008 at 12:21 AM  

ब्लॉग खूप सुरेख आहे.. एकच विनंती, काळ्यावर पांढ-याऎवजी पांढ-यावर काळे वाचायला जास्त सोपे पडेल.. आत्ता optical illusions सारखे थोड्या वेळात रंग एकमेकांत merge होतात.. Think about this.. !!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP