वॉल्टझ विथ बशीर - मध्यममार्ग

>> Friday, December 19, 2008

बेरुतमधला रस्ता. फार उत्तम परिस्थितीत नसणा-या पण वस्ती असलेल्या इमारती. दिवसाची वेळ. रस्त्याकडेच्या एका खोलगट जागी इस्रायली सैन्याची एक तुकडी लपलेली. तुकडीवर गोळीबार केला जातोय, तो चहूबाजूंनी शत्रू स्पष्ट दिसत नाही. पण गोळ्या सुटताहेत. तुकडीतले सैनिक लपून-छपून कसेबसे हल्ला परतवण्याचा प्रयत्न करताहेत. पण जमत नाही. इतक्यात या धुवाधार गोळीबारात मीडियाचा एक लोकप्रिय वार्ताहर दाखल होतो. बरोबर जीव मुठीत धरून चालणारा, घाबरलेला कॅमेरामन, पण वार्ताहराला कसलीच भीती वाटत नाही. गोळ्यांच्या बरसातीतून तो मॉर्निंग वॉकला आल्याच्या शांतपणाने वाट काढतो. सैनिक थक्क होऊन बघत राहातात.
जवळजवळ सर्रीअल, सत्य आणि कल्पनेच्या सीमेवरला वाटणारा हा प्रसंग आरी फोलमनच्या वॉल्टझ विथ बशीर (२००८) चित्रपटातला. खरं तर बशीरला चित्रपट म्हणणं योग्य नाही. फिचर फिल्म आणि डॉक्यूमेन्टरी यामधला हा मध्यममार्ग आहे. फोलमनने १९८२च्या लेबनन युद्धात भाग घेतला होता, आणि बेरुतवरल्या चढाईच्या अन् या सुमारास साबरा आणि रातीला या पॅलेस्टीनी वस्त्यांमध्ये केलेल्या नरसंहाराच्या साक्षीदारांपैकी तो एक होता. या घटनांकडे संबंधित अनेकांच्या नजरांतून पाहाणं, हा वॉल्ट्झ विथ बशीरचा विषय. मात्र त्याची मांडणी मात्र सरळ नाही. ना माहितीपटासारखी ना युद्धपटासारखी.शिवाय शंभर टक्के प्रौढ असणा-या विषयासाठी त्याने निवडलेलं माध्यम आहे ते अँनिमेशनचं. अर्थात हे मुलांच्या कार्टुनमध्ये पाहायला मिळतं तसं गंमतीदार अथवा रेखीव अँनिमेशन नाही. तर प्रत्यक्ष चित्रीकरणातून येणा-या प्रतिमांवर संस्कार करून वास्तवाच्या जवळचा परिणाम साधणारी एक शैली मध्यंतरी रिचर्ड लिन्कलेटरच्या वेकींग लाईफ आणि ए स्कॅनर डार्कली या चित्रपटांनी लोकप्रिय केली. त्याच प्रकारातला हा प्रयत्न आहे.
बशीरच्या मांडणीत आणि फॉर्मच्या निवडीत काही निश्चित विचार दिसतो. वरवर पहाता, ही रहस्यपटात शोभेलशी मांडणी आहे. म्हणजे फोलमन काही सरळपणे आपल्या अनुभवांना हात घालत नाही, तर तो सुरुवात करतो, ती आपल्या मित्राला पडलेल्या स्वप्नापासून. बशीरच्या सुरुवातीलाच येणारं हे स्वप्न युद्धाशी थेट संबंधित नाही. पण दृश्यात्मकतेच्या बाजूने पाहायचं तर अतिशय लक्षवेधी आहे. या स्वप्नात फोलमनच्या मित्राला दिसतात ते चवताळलेले कुत्रे. शहरभर पालथं घालून हे कुत्रे मित्राच्या खिडकीखाली पोचतात. आणि त्यांच्याकडे पाहातच तो जागा होतो. त्याचा बदला घेण्यासाठी खिडकीखाली जमलेले सव्वीस कुत्रे हे लेबेनॉनच्या युद्धादरम्यानच्या एका आठवणीचं भूत आहे. मित्राच्या स्वप्नाची हकीकत ऐकताच फोलमनच्या ध्यानात येतं, की आपण स्वतःदेखील या युद्धाचाच एक भाग होतो, मात्र स्वप्न सोडा, या काळातली एक साधी आठवणही आपल्याला नाही. जणू या आठवणी आपण मनात खोलवर दाबून टाकल्या आहेत. एकदा विषय निघताच त्याच्या डोळ्यांसमोर एक प्रतिमा उभी राहाते. समुद्रातून संधी प्रकाशात बाहेर येणारे काही सैनिक आणि फ्लेअर्सच्या प्रकाशात उजळून निघणारे एका निनावी शहराचे भग्नावशेष.

फोलमन या प्रतिमेपलीकडे काहीच आठवू शकत नाही आणि तो तेव्हाच्या सहका-यांना भेटून आपली आठवण जागवण्याचा प्रयत्न करायचं ठरवतो. या सहका-यांच्या भेटी आणि फोलमनचा भूतकाळ म्हणजे वॉल्टझ विथ बशीर. मी सुरूवातीला म्हटलं की हा चित्रपट अन् माहितीपट यांच्या सीमेवरला प्रयत्न आहे. त्याचं कारण हे, की ज्या घटना यातून पुढे येतात, त्या प्रत्यक्ष इतिहासाचा भाग आहेत. पॅलिस्टिनी वसाहतीतला संहार तर इतका खरा आहे, की तिथल्या मृतावशेषांचं प्रत्यक्ष फूटेजही इथे दाखवलं जातं. मात्र फोलमन केवळ एक घटना नोंदवणं या अजेंड्यावर निघाला नाही. त्याचा वैयक्तिक शोध असंच त्याला फिल्मचं स्वरूप ठेवायचं आहे. माहितीपटाला जे सत्याचं बंधन असतं, ते काढून त्याने आशय थोडा अधिक मोकळा केला आहे. आपल्याबरोबर इतरांचे अनुभव अन् युद्धात दिसणा-या विसंगती यादेखील त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. गावातला प्रवेश गुप्त ठेवण्यासाठी सव्वीस कुत्र्यांचा बळी देणं, बोटीवरली अन् रणगाड्यातली नाचगाणी, मशीनगनने बेरूतच्या रस्त्यावर केलेल्या हल्ल्याची वॉल्टझ नृत्याशी तुलना, प्रत्येकाच्या आठवणी, भास, स्वप्नं, त्यांचे वर्तमानातले उद्योग या सर्वांतून फोलमन युद्धातली अँब्सर्डिटी पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. केवळ माहितीपटाचा फॉर्म इथे अपूरा पडला असता. अँनिमेशनचा वापर विविध कल्पनांच्या एकत्रित येण्याला उपयुक्त आहे. वास्तव/स्वप्न/भास/काळातले/स्थलांमधले बदल इथे दृश्य धक्क्यांवाचून आणि वास्तवाचा आभास म्हणून पुन्हा तो काळ रिक्रिएट करण्याच्या खर्चावाचून उभे करता येतात.शैलीमुळे मुळातच टोकाच्या वास्तवाचा आग्रह प्रेक्षकांकडून धरला जात नाही, आणि चित्रकर्त्याला आपली सोय पहाता येते.
वॉल्टझ विथ बशीरमध्ये दिसणारा फोलमनचा शोध हा एका प्रत्यक्षात घडलेल्या घटनेशी जोडलेला जरुर आहे. मात्र त्याची उकल ही त्या दिवशी काय घडलं यापेक्षा यात सहभागी व्यक्तिंना काय अनुभवातून जावं लागलं याविषयी आहे. पर्यायाने त्याचा संबंध हा सैनिकांच्या मानसिकतेशी अधिक आहे. जेव्हा आपण हे समजून घेऊ तेव्हा बशीरमधलं रहस्य हे रहस्य उरणार नाही.
या प्रकारचा अप्रोच हा कदाचित आपणही काही माहितीपटांना वापरू शकू. बाबरी मशिदीसारख्या घटना, जिथे सत्य काय याला महत्त्व उरत नाही, तर ते जगणा-यांच्या मनातल्या घाडामोडीच अधिक महत्त्वाच्या ठरतात.किंवा आताच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा विषय जिथे महत्त्व एका व्यक्तीच्या दृष्टीकोनाला येत नाही. तर सर्व बाजू मिळूनच एका घटनेचे सर्व पैलू तयार होऊ शकतात.ही काही उदाहरणं. आज आपलं माहितीपटांचं/चित्रपटांचं दालनही हळूहळू समृद्ध होतंय. पुढेमागे अशा प्रयोगांची अपेक्षा आपणही नक्कीच करू शकतो.
-गणेश मतकरी.

2 comments:

Yawning Dog December 21, 2008 at 9:45 PM  

vaa pahto ha pan ata...asach nahee pan hyachyavaroon ek picture athavla...seria ka lebnon madhla mulga asto footbaal premee, to anee taychee 3-4 jananchee gang...satatchta yudhhala kantaloon tyache aai vadeel swiss la janar astat anee pudhe kay kay hote hyache far chaan chitran hote
kuthlyataree pardeshee bhashetla hota to,

ganesh December 21, 2008 at 11:56 PM  

mula ani war ya vishayawar kahi far chhaan films ahet. West Beirut ani turtles can fly to name just two.trtles is more harrowing ,but both are very good.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP