सेन्सॉर बोर्डाचा स्वैराचार

>> Sunday, December 28, 2008


मध्यंतरी वृत्तपत्रातील एक बातमी वाचून आश्‍चर्य वाटलं. बातमीचा गोषवारा साधारण असा होता, की माईक निकोल्सच्या "क्‍लोजर' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आपल्या सेन्सॉर बोर्डाने बंदी आणली आहे. केवळ काही कट्‌स सुचवून सेन्सॉरचं भागलेलं नाही, तर कोलंबिया ट्रायस्टारच्या मार्केटिंग हेडच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाच्या विषयापासून संकल्पनेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सेन्सॉरचा आक्षेप आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चित्रपटात दाखवलेला स्वैराचार आपल्या प्रेक्षकांना पटणार नाही. त्यामुळे बोर्ड पुनर्विचार करेपर्यंत क्‍लोजर प्रदर्शित होण्याची शक्‍यता नाही.
आश्‍चर्य वाटलं, ते सेन्सॉर बोर्ड स्वतःला अजून नको इतकं गंभीरपणे घेतं, याचं नाही. ते मला आधीपासूनच माहिती होतं. तुम्हीच पाहा, सेन्सॉरच्या अशा बंदीला काय अर्थ आहे? ज्यांना बंदी आलेले चित्रपट पाहायचे आहेत, त्यांना ते डीव्हीडी, व्हीसीडीच्या माध्यमातून पाहाणं सहज शक्‍य आहे. अशा प्रिंट्‌स मिळण्याच्या अनेक जागा आज खुलेआम उपलब्ध आहेत. आज या प्रिंट्‌स पायरेटेड असल्या, तरी उद्या ओरिजिनल असतील, मग सेन्सॉर बोर्ड काय करेल? त्याशिवाय इंटरनेटसारख्या माध्यमावर त्यांची काय हुकमत आहे? थोडक्‍यात, या प्रकारच्या बंदीला फारसा अर्थ उरलेला नाही.
असं असूनही आज बोर्डाकडे अधिकार आहेत, आणि निदान चित्रपटगृहांमध्ये होणाऱ्या प्रदर्शनासंदर्भात ते वापरणं त्यांना शक्‍य आहे. ते कुठे वापरावेत याची मात्र त्यांना काही निश्‍चित जाण असण्याची गरज आहे, आणि कशा प्रकारे वापरावेत याचीही. सेक्‍स आणि हिंसाचाराचं भडक, चाळवणारं चित्रण त्यांनी जर कापलं, तर निदान ते आपल्या अधिकारात आहे, असं म्हणता येईल. पण एखादा प्रौढांचा विषय, प्रौढांना कळेलशा भाषेत, कुठेही गल्लाभरू दृश्‍यांचा वापर न करता मांडता येत असेल, तर त्याला अडकवण्याचं काय कारण असू शकतं? त्यातून विषयाच्या गांभीर्यामुळे त्याला प्रौढांसाठीचं प्रमाणपत्र मिळायला कोणाचीच हरकत नसावी. मग तरी बंदी घालण्याइतकं टोकाचं पाऊल उचलावसं सेन्सॉरला का वाटावं? त्यातून चित्रपट "क्‍लोजर'सारखा, समीक्षकांनी गौरवलेला, ज्यात स्त्री-पुरुष संबंध आणि प्रेमाचं काळाबरोबर बदलणारं रूप, याचा खोलात जाऊन विचार करण्यात आलाय, ज्यात जुलिआ रॉबर्टस, जूड लॉसारख्या मान्यवर "ए'लिस्ट स्टार्सनी काम केलंय, ज्यातल्या क्‍लाईव्ह ओवेन आणि नॅटली पोर्टमनला सहाय्यक भूमिकेतल्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी गोल्डन ग्लोब पारितोषिक मिळून गेलंय अन्‌ त्याच विभागासाठी ऑस्करलाही त्यांचा विचार झालाय. थोडक्‍यात चित्रपट थिल्लर नाही. त्याला जे म्हणायचंय ते तो गंभीरपणे मांडतो, आणि तेही पडद्यावरल्या प्रेमाच्या कन्वेन्शन्समागे न लपता. आश्‍चर्य आहे ते या प्रकारचा गंभीर, विचारप्रवर्तक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचण्यात सेन्सॉरने आडकाठी घालावी याचं.
रोमॅंटिक कॉमेडीसारख्या चित्रप्रकारांमधून हॉलिवूडमध्येही प्रेमकथा लोकप्रिय झाल्या. मात्र त्या होत्या एक प्रकारच्या भाबड्या, निरागस प्रेमाविषयीच्या. त्यातलं प्रेम हे प्रत्यक्षाहून अधिक कल्पनेतलं होतं, सुंदर स्वप्नासारखं. क्‍लोजर ही रोमॅंटिक कॉमेडी नाही, आणि प्रेमकथा तर नाहीच नाही. प्रेम हा त्याच्या विषयाचा भाग आहे. खरे तर प्रेमाचा ऱ्हास हा आजच्या काळात स्त्री-पुरुष संबंध कसा सडून गेलाय, आणि प्रेमाच्या कल्पनेलाच कसं विकृत रूप आलंय हा क्‍लोजरचा विषय. दिग्दर्शक निकोल्स त्यासाठी निमित्त म्हणून दोन जोड्या निवडतो. त्यांच्या भेटीगाठीपासून सुरवात करतो, आणि पुढे पुढे झेपावत ही नाती बिघडताना, नवी नाती तयार होताना, तीही तुटताना दाखवतो. यातली पात्रं प्रेमाचं राजकारण खेळतात. एखाद्‌दुसऱ्याचा पराभव करणं, समोरच्याच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणं, माफ करणं वा तोडून टाकणं, खोटं बोलणं, ब्लॅकमेल करणं हा सगळा त्यांच्या आयुष्याचाच एक भाग आहे. मात्र हे केवळ त्यांचंच आयुष्य नाही. आजच्या आधुनिक पिढीची, त्यातल्या नकोइतक्‍या हुशार माणसांची, सोयीसाठी संबंध बनवणाऱ्या- तोडणाऱ्यांची ही शोकांतिका आहे.
डॅन (जूड लॉ) आणि ऍलिस (नॅटली पोर्टमन) यांची अपघाताने भेट होते. दोघं एकत्र राहायला लागतात. वृत्तपत्रात नोकरी करणारा डॅन एक कादंबरी लिहितो आणि पुस्तकामागे छापण्याचा फोटो काढण्याच्या निमित्ताने त्याची ऍनाशी (ज्युलिआ रॉबर्टस) गाठ पडते. डॅन ऍनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो आधीच ऍलिसबरोबर असल्याने ऍना त्याला तोडून टाकते. पुढे डॅनच कारणीभूत होतो, तो ऍनाची ओळख लॅरीशी (क्‍लाईव्ह ओवेन) करून द्यायला. कालांतराने डॅन/ऍलिस आणि लॅरी/ऍना लग्न करतात. पण डॅन आणि ऍना एकमेकांना विसरू शकत नाहीत. ना ते स्वतः आनंदी राहात ना जोडीदाराला सुखी ठेवत. यातूनच मग पुढे एका जीवघेण्या खेळाला सुरवात होते; ज्यात कोणीच प्रामाणिक नाही, कोणीच इनोसंट नाही आणि कोणीच समाधानी नाही.
हा खेळ केवळ भावनिक पातळीवर राहात नाही, तर शरीरसंबंध हादेखील त्याचा एक अनिवार्य भाग होऊन जातो. लॅरीने घटस्फोटाच्या कागदावर सही करण्यासाठी ऍनाकडून अखेरच्या शरीरसंबंधांची मागणी करून डॅनचा अपमान करणं किंवा ऍलिस लॅरीबरोबर झोपली होती का हे जाणून घेण्यासाठी डॅनने जिवाचा आकांत करणं, अशा प्रसंगांतून या मंडळींची मनोवृत्ती दिसून येते. ही सगळी पात्रं (कदाचित डॅनचा अपवाद वगळता) मुळात सज्जन गणली जाण्यातली. पण प्रेम यांच्या आयुष्याची कशी वाट लावतं ते त्यांचं त्यांनाही कळत नाही.
सेन्सॉर बोर्डाचा यातल्या स्वैराचाराला आक्षेप आहे; पण तो का, हे कळत नाही. लग्नबाह्य संबंध काय इतर चित्रपटांतून येत नाहीत? इंग्रजी सोडा, अनेक हिंदी चित्रपटांतूनही अशा बेभरवशाच्या संसाराचं वर्णन येऊन गेलं आहे. मागे "येस बॉस'सारख्या 100 टक्के करमणूकप्रधान, बाळगोपाळांना आवडलेल्या चित्रपटाची गोष्ट होती, की एक श्रीमंत ऍड एजन्सीवाला आपल्या बायकोचा डोळा चुकवून एका तरुण सुंदर मॉडेलला कह्यात आणायचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या हरकाम्याची तो मदत घेतो आणि नंतर हरकाम्या आणि मॉडेल यांना नवराबायको म्हणून एकत्र राहायची पाळी येऊन ठेपते.
यातल्या बॉसच्या वागण्यात स्वैराचार नाही? यातल्या हरकाम्याचं वागणं गैरलागू नाही? यातल्या चार मुख्य पात्रांचे संबंध तणावपूर्ण नाहीत? मग त्या चित्रपटाचाच न्याय क्‍लोजरलाही का लागू नाही? का शरीरसंबंधांचा मुक्त उल्लेख आणि लटक्‍या विनोदी संवादांची जागा वास्तववादी भ्रष्ट नातेसंबंधांनी घेणं हेच आपल्या संस्कृतिरक्षकांना चालत नाही? मग जूड लॉ आणि ज्युलिया रॉबर्टसने विनोद केले असते आणि क्‍लाईव्ह ओवेन आणि नॅटली पोर्टमनने द्वंद्वगीतं गायली असती तर "क्‍लोजर' सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटला असता का? कोण जाणे.
क्‍लोजर पाहताना एक गोष्ट निश्‍चित कळते, की ही एक शोकांतिका आहे. घडणाऱ्या घटनांमध्ये कोणालाही फार आनंद नाही; असलं तर दुःखच आहे. मला वाटत नाही, की हा चित्रपट पाहून कोणाला या प्रकारचं वागण्याची प्रेरणा मिळेल. याउलट शक्‍यता अशीच आहे, की प्रेक्षकांना यातल्या धोक्‍याच्या सूचना पाहून आपलं वागणंच पुन्हा तपासून घ्यावसं वाटेल.
ज्या स्वैराचाराचा बाऊ करून चित्रपट थांबवण्यात आला, त्या स्वैराचाराच्या तो बाजूने नसून विरोधात आहे, आणि बहुधा हे सेन्सॉर बोर्डाच्या लक्षातच आलेलं नाही.
तात्पर्य, चित्रपट वयात येऊन बरेच दिवस झाले. आता सेन्सॉर बोर्ड वयात येण्याची गरज निर्माण झाली आहे.
- गणेश मतकरी

2 comments:

Yawning Dog January 1, 2009 at 10:49 PM  

कालच पाहिला, एवढा काही आवडला नाही मला, पण यात सेन्सॉरला काय त्रास आहे झेपले नाही.
नाचगाणी टाकली असती म्हणजे सेन्सॉरला चालला असता का प्रश्न मनापासून पटला. दिग्दर्शक आप्ले असते तरी सेन्सॉरने परवानगी दिली असती - करण जोहरचा किंवा राज कपूर
[कितीही ग्रेट वगैरे म्हणले लोकांनी तरी कथानकाची गरज नसतान अंगप्रदर्शन असायचे राज कपूरच्या पिक्चरमधे आणि सेन्सॉरला ते चालायचे पण राव]

Gaurav Patki May 30, 2014 at 10:01 PM  

Hi Sir, commenting on this post too late probably. I have loved the movie. I have a question. Why would Alice hide her real name from Den for so long time. She has already told him that she is a stripper. I find it bit gimmick to give come shock at last. But rest of the movie is superb

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP