शैलीदार मेमेन्टो, बाळबोध गजनी

>> Thursday, January 15, 2009



मी असं मानतो, की प्रत्येक विषयाला स्वतःची अशी आयडिअल निवेदन शैली असते. ती त्या विषयाची गरज असते. चित्रपट जर त्यातल्या सर्व अंगांसह प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा, तर तो अमुक एका प्रकारे सांगणं हे आवश्‍यक असतं. त्यात केलेला बदल, केलेली तडजोड ही चित्रपटाचा परिणाम अनेक पटींनी कमी करू शकते.
आपल्याकडे निवेदनशैलीत फार प्रयोग केलेले पाहता येत नाहीत. "युवा'सारखं एखादं अपवादात्मक उदाहरण सोडलं तर नॉन लिनिअर मांडणी ही आठवावी लागेल, अशी परिस्थिती. बहुतेक कथानकं ही सरळ रेषेत गोष्ट सांगणारी. अथपासून इतिपर्यंत. त्यामुळेच बहुधा उलटा, म्हणजे इतिपासून अथपर्यंत जाणारा "मेमेन्टो' आपल्याकडे पचणार नाही, असा गजनी (का गजिनी?) कर्त्यांचा ग्रह झाला असावा.
आपल्याकडे सर्वांत मोठा गोंधळ असा असतो, की रूपांतरकर्त्यांना एखादा विदेशी चित्रपट आवडतो, त्यामागची कल्पना आवडते. ती आपल्या लोकांपर्यंत पोचवावीशी वाटते, मात्र ती कशी पोचवावी हे काही कळत नाही. एकतर सनदशीर मार्गाने हक्क घेण्याची पद्धत आपल्याकडे अजूनही रूढ नाही. दुसरं म्हणजे आपल्या प्रेक्षकाला काय चालेल आणि काय नाही, याबद्दल चित्रकर्त्यांचे घोर गैरसमज आहेत. आपल्याकडे सध्या जगभरचे चित्रपट सहज पाहणारा प्रेक्षक आहे. मात्र त्याचं अस्तित्व अमान्य करून बाळबोध मसाला असलेला चित्रपट बनवणंच आपले निर्माते दिग्दर्शक जाणतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने क्रिस्टोफर नोलान (गेल्या वर्षी गाजलेल्या डार्कनाईटचा दिग्दर्शक) चा "मेमेन्टो' जसाच्या तसा करणं अशक्‍य. मग या अडचणीवर उपाय काय? खरं तर उपायच नाही. मेमेन्टो हा केवळ जसाच्या तसा रूपांतरित करण्याचा चित्रपट होता. त्यातले बदल हे त्यातल्या आशयाची खोली पचवू शकणार नाहीत, हे उघड होतं. आता का, ते सांगतो.
नायक लिओनर्ड शेल्बी (गाय पिअर्स) याचा आपल्या पत्नीच्या मारेकऱ्याचा शोध, हेच मेमेन्टोचं सूत्र आहे. मात्र या चित्रपटाकडे केवळ एक क्राईम किंवा सस्पेन्स चित्रपट म्हणून पाहणं मूर्खपणाचं ठरेल. मेमेन्टो सुरू होतो, तो नायकाने घेतलेल्या बदल्यापासून. समोर पडलेल्या मृतदेहाचा नुकताच काढलेला पोलोरॉइड फोटो नायकाच्या हातात वाळत असताना. कथेचा घटनाक्रम हा काळानुसार मांडला तर हा प्रसंग शेवटाकडे यायला हवा. इथं मात्र हा सुरवातीला येतो आणि कथा एक एक प्रसंगाने मागे जायला लागते. पटकथा अशी उलट्या क्रमाने मागं जात असताना तिला आणखी एक ट्रॅक जोडला जातो, तो लिओनार्डच्या फोनवर चाललेल्या एकतर्फी संभाषणाचा. हा दुसरा ट्रॅक मात्र सरळ रेषेत जातो आणि तो लिओनार्डच्या आजारावर, "शॉर्ट टर्म मेमरी लॉस' या कंडिशनवर प्रकाश टाकतो. "शॉर्ट टर्म मेमरी लॉस' म्हणजे नव्या आठवणी करू शकण्याची क्षमताच नाहीशी होणं. पत्नीचा जेव्हा मृत्यू झाला, तीच नायकाची अखेरची आठवण आहे, कारण तेव्हा झालेल्या इजेतूनच त्याची आजची परिस्थिती उद्‌भवली आहे. तो घडणाऱ्या गोष्टी काही वेळच लक्षात ठेवू शकतो, त्यानंतर त्याची मेमरी रिसेट बटण दाबल्यासारखी पुसली जाते. यावर उपाय म्हणून तो नोट्‌स घेतो, अंगावर माहिती गोंदवून ठेवतो, सतत फोटो काढतो, अन्‌ त्यावर आपली निरीक्षणं टिपवून ठेवतो. या निरीक्षणानुसार योजना आखतो, आपला बदला पूर्ण करण्याच्या.
मघाशी मी म्हणालो, की प्रत्येक विषयाला आयडिअल निवेदनशैली असते. मेमेन्टोचा उलटा प्रवास, ही या विषयाला आयडिअल शैली आहे ती दोन कारणांसाठी. पहिलं म्हणजे ही शैली प्रेक्षकाला नायकाच्या जागी आणून ठेवते. नायकाला जशी पुढल्या योजनेची कल्पना आहे, मात्र भूतकाळ त्याच्यासाठी पुसलेला आहे, तसंच प्रेक्षकाला पुढल्या घटनांची (त्याने त्या आदल्या प्रसंगात पाहिल्याने) कल्पना आहे, मात्र आधी काय झालंय हे तो जाणू शकत नाही. ही मांडणी प्रेक्षकांसाठी हे कोडं अधिक वास्तव बनवते आणि त्याला अधिक गुंतवून ठेवते.
दुसरं कारण आहे ते आशयाशी संबंधित. मेमेन्टोचा अजेन्डा केवळ एका गुन्ह्याशी जोडलेला नाही, तर मानवी स्वभाव, व्यक्तीची स्वतःची अशी ओळख आणि आठवणीचं स्वरूप यावर तो भाष्य करतो. चित्रपटाचा प्रवास हा गुन्हेगार कोण, याकडे जाणारा नाही जरी त्या प्रश्‍नाचं उत्तरही तो निश्‍चित देतो, तर या भाष्याशी संबंधित असणाऱ्या उलगड्याकडे जाणारा आहे. मेमेन्टोचा शेवट न सांगता, याहून अधिक सांगणं शक्‍य नाही, अन्‌ प्रत्यक्ष शेवटाविषयी बोलण्याचा गुन्हा मी करू इच्छित नाही.
आमीर खान जेव्हा मुलाखतीत म्हणतो, की "गजनी' हा "मेमेन्टो'वर आधारित नाही, तेव्हा तो खोटं बोलत नाही, मात्र हे अर्धसत्य आहे. गजनीचं मूळ मेमेन्टोमध्येच आहे, तसंच ज्याला आपण सेटअप म्हणू, ती चित्रपटाची मूळ बैठकही मेमेन्टोने प्रभावित आहे. मात्र दाक्षिणात्य दिग्दर्शक ए. आर. नुरूगादोस यांनी निवेदनशैली बदलून अन्‌ आपला, खरं तर दक्षिणेतला- प्रेक्षक ध्यानात ठेवून जी रचना केली आहे, ती चित्रपटाला बऱ्यापैकी वेगळा बनवते. मात्र त्यामुळे आशय संकुचित होणं, कथेमध्ये अनेक लूपहोल्स राहणं आणि शेवटी त्याची एक दाक्षिणात्य सामान्य मसालेदार सूडकथा बनणं, ही "गजनी'ची खरी शोकांतिका ठरते.
"गजनी' आणि "मेमेन्टो'त मूळ फरक आहेत ते असे. मेमेन्टोच्या निवेदनशैलीबद्दल तर मी सांगितलंच. गजनीकर्त्यांना वाटतं, की हा उलटा चित्रपट लोकांना पचणार नाही, म्हणून ते नायकाच्या सूडाचा प्रवास सरळ रेषेत घडवतात. मात्र सतत शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला, सूडाच्या कल्पनेने झपाटलेला नायक त्यांना नको आहे. त्यांना गोंडस दिसणाऱ्या आमीर खानची दाक्षिणात्य नायिका आसिनबरोबर चाललेली प्रेमकहाणी दाखवायची आहे, मग ती उरलेल्या भागाच्या टेक्‍श्चरबरोबर गेली नाही तरी बेहत्तर. मग चित्रपट सुरू होतो, तो जवळजवळ इन्क्रिडेबल हल्क सारखी शक्ती असणाऱ्या; पण पंधरा मिनिटांत आठवणी पुसल्या जाणाऱ्या संजय सिन्घानिया (आमीर खान) नामक नायकापासून, जो वरवर पाहता लिओनार्डच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व गोष्टी करतो आहे (अगदी शरीर गोंदवण्यापासून ते पोलोरॉईड कॅमेराचा सतत वापर करण्यापर्यंत). चित्रपट थोडा झाल्यावर एका मठ्ठ पोलिसाकडून आणि नंतर काही वेळाने तितक्‍याच मठ्ठ मेडिकल स्टुडंटकडून (जिया खान) चित्रपट संजयची जुनी डायरी वाचवून घेतो आणि संजय - कल्पनाची (आसिन) गोष्ट आपल्याला सांगतो. ही गोष्टच "गजनी'चा अर्ध्याहून अधिक भाग व्यापते. आणि खरं तर तीच सूडकथेहून अधिक वेधकही ठरते. याचं कारण म्हणजे चित्रकर्त्यांना या व्यक्तिरेखा घडवण्याचा अधिक अनुभव आहे. प्रेक्षकांना त्यांच्याबरोबर समरस होता येईल, असं ते पाहू शकतात. याउलट सूडकथेबद्दल त्यांचे इतके गोंधळ आहेत की विचारू नका.
"मेमेन्टो' हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणजे काय, नायकाची परिस्थिती नक्की कशी आहे, तो काय प्रकारे नोट्‌स घेतो आहे, आपलं आयुष्य एका चौकटीत ठेवण्यासाठी काय उपाय योजतो आहे, हे सांगण्यात खूप वेळ खर्च करतो आणि एक तर्कशुद्ध घटनाक्रम उभा करतो. त्यातही काही लूपहोल्स तयार होतात. उदाहरणार्थ नायकाला असलेली माहिती त्याला कुठून मिळाली, या माहितीतले काही धागे विस्कळित का, इत्यादी. मात्र या प्रश्‍नांना समाधानकारक (अर्थात प्रेक्षकांचं "विलींग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ' गृहीत धरून) उत्तरं आहेत, जी शेवट आपल्याला दाखवून देतो. "गजनी' यातलं काहीच करत नाही.
संजय अनेक गुंडांना लीलया लोळवतो; पण तो या गुंडांपर्यंत पोचला कसा, गुन्ह्याची त्याला काय माहिती आहे (खरं तर त्याला पूर्ण माहिती हवी, कारण त्याचा मेमरी लॉस, हा त्याने खलनायकाचा चेहरा पाहिल्यावर आणि नाव ऐकल्यावर ओढवलेला असल्याने, त्याला गुन्हेगार मुळातच माहीत हवा.) हे स्पष्ट नाही. "गजनी'सारखं चमत्कारिक नाव मुंबईत किती जणांचं असेल? त्यातून इथला गजनी तर फार मोठा माणूस आहे. मग गजनीचा शोध इतका मुश्‍कील का? एका वृत्तपत्राच्या ऑफिसातला फोन त्याला खलनायकाचा पत्ता मिळवून देऊ शकतो, मग नायक एवढे दिवस करतोय काय? त्यातून त्याची पंधरा मिनिटांची मेमरीदेखील फार लवचिक आहे. कधी ती प्रत्यक्ष पंधरा मिनिटं टिकते, तर कधी ती कितीतरी वेळ जशीच्या तशीच राहते. ती तशी राहिली नाही, तर नायक दीड वर्ष लिहिलेली डायरी पंधरा मिनिटांच्या आत कसा वाचू शकेल? आणि ती वाचल्यावर जर लगेचच मेमरी रिसेट होणार असेल, तर ती वाचण्यात मुद्दा तो काय?
हे सर्व तर गोंधळाचं आहेच, पण या सर्वांच्या पलीकडे जाणारा एक प्रश्‍न दोन्ही चित्रपटांमध्ये अध्याहृत आहे. तो म्हणजे, जर घेतलेला सूड नायक आठवणीतच ठेवू शकणार नसेल, तर तो घेण्यात काय मुद्दा? मेमेन्टोमध्ये या प्रश्‍नाला एक अतिशय योग्य उत्तर आहे जे त्याला थ्रिलरच्या चौकटीबाहेर काढतं. गजनीमध्ये या प्रश्‍नाला उत्तरच नाही. किंबहुना या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणं आणि तो प्रेक्षकांना पडणार नाही अशी आशा करणं, इतकंच गजनीकर्ते करताना दिसतात.
थोडक्‍यात सांगायचं, तर "गजनी' हा "मेमेन्टो'हून फारच खालच्या दर्जाचा चित्रपट आहे. तो तसा चुकून झालेला नाही, तर चित्रकर्त्यांनी जाणूनबुजून तो बाळबोध बनवलेला आहे. आता महत्त्वाचा प्रश्‍न पडतो तो हा, की मेमेन्टोशी बरोबरी सोडा; पण ज्यांनी मूळ चित्रपट पाहिला नाही, त्यांना तरी हा चित्रपट आवडेल का? खरं तर मलाही हा प्रश्‍न पडलेला आहे. मध्यांतरापर्यंत गजनी पाहून हैराण झाल्यावर शेजारच्या सीटवरच्या माणसाचे गजनी "सॉलिड पिक्‍चर' असल्याचे गौरवोद्‌गार ऐकले, तेव्हाच मला हा प्रश्‍न पडला. तार्किकदृष्ट्या पाहायचं, तर मला स्वतःला मेमेन्टो विसरूनदेखील गजनी आवडणार नाही. त्याचं साधं कारण म्हणजे तो पटण्यासारखी गोष्ट सांगू शकत नाही. त्यातलं रहस्य हे जवळपास रहस्यच नाही आणि इतर तपशील फसवा आहे. संजय-कल्पनाचं प्रेमप्रकरण मला आवडलं; पण गोष्ट प्रेमाची आहे का सूडाची? तरीही अशी शक्‍यता आहे, की अमुक एका प्रमाणात तो प्रेक्षकांना आवडेल. दाक्षिणात्य भडकपणाच्या चाहत्यांना तर आवडेलच; पण त्यातल्या नायकाच्या आजाराने चित्रपटाला आपसूक येणारा वेगळेपणाही काही जणांना आवडेल. त्याची प्रचंड प्रसिद्धी आणि माफक चमत्कृती पाहून त्याला आर्थिक यश मिळेल अशी खात्री वाटते. मात्र आर्थिक यश म्हणजे दर्जा नव्हे.
एखाद्या कल्पनेच्या प्रेमात पडून चित्रपट उचलायचा आणि तो इतका बदलायचा, की मूळ कल्पनाच निष्प्रभ ठरावी, असा आपल्याकडचा पायंडा आहे. "गजनी' हे त्यातलं सर्वांत ताजं उदाहरण. पहिलं नक्कीच नाही, पण अखेरचंही नाही.
- गणेश मतकरी

9 comments:

निल्या January 15, 2009 at 11:21 PM  

आपण (म्हणजे मी पण)मेमेन्टो पाहिला असल्याने आपण गजनीला नावे ठेवणारच. आणि हो इकडे प्रचंड आणि तुफान पैसा कमवण्यात कोणी निवेदन शैली अवघड ठेवूण रिस्क घेणार नाही.मग काय चित्रपट घिसा पिटा होणारच.

मला वाटतं प्रेम प्रकरण छान रंगवलंय. तसं ते तमिळ मध्ये छानच होता. आधी मेमेन्टो पाहिला नंतर तमिळ पाहिला नंतर हिंदी.
हिंदी पाहताना एकही गोष्ट नवी नव्हती पण पहिला पार्ट बोर झाला नाही.

अपेक्षा भंग होतो हे मात्र खरे. शाहरुख च्या प्रेमकथांपेक्षा बरी म्हणायचे आणि पुढे चालायचे.

Abhijit Bathe January 15, 2009 at 11:30 PM  

आपण भेटलो होतो तेव्हा ’मेमेंटो’ बद्दल बोललो होतो का? नसलो तर ऐक - मेमेंटो हा मी पाहिलेला greatest पिक्चर आहे. आणि बरोबर! आपण बोललो होतो त्यावर - कारण मग तु म्हणाला होतास - one of the great म्हणु म्हणुन!
एनीवे - तु थोर आहेस - आख्खा गजनी पाहिल्याबद्दल. मला science fiction आवडत नसल्याने मी पहिल्या पंधरा मिनिटांतच ’incredible hunk' पाशीच पिक्चर सोडुन दिला. पण आमीर आवडत असल्याने मी शिक्षा म्हणुन का होईना - ’गजनी’ आख्खा पहायचा विचार करतोय. कॅसेट आणुन दोन आठवडे झालेत - तिकडे रामु (आमचा कॅसेटवाला - ज्याला आम्ही ’त्या’ रामु-सम समजून रामु म्हणतो) माझ्या नावाने बोंब मारत असेल.
आणी ’मेमेंटो’ उलटा कुठं आहे? शेवट आधी दाखवलाय वगैरे ठीक पण मला तरी तो पिक्चर concentric circles मधे घडतोय कि काय असं वाटतं...एक circle पूर्ण होईतो वाढत जातं, त्याच्या आत दुसरं, तिसरं पहिल्याला छेदतं - व्हायचा तो राडा होत्तो आणि त्याचा अर्थ लावता लावता आपण धन्य/थक्क होतो!

HAREKRISHNAJI January 16, 2009 at 12:00 AM  

I liked your article in Akshar Diwali Ank.

Mukul Joshi January 16, 2009 at 5:50 AM  

मी "मेमेन्टो" चा फॅन आहे, आमीर खान ही मला आवड्तो. पण मी गजनी पाहिला नाही आणि पाहणार ही नाही. शक्यता ज्या वाटल्या त्या तुमच्या ब्लॉग वाचून खर्‍या ठरल्या.

"पण ज्यांनी मूळ चित्रपट पाहिला नाही, त्यांना तरी हा चित्रपट आवडेल का? खरं तर मलाही हा प्रश्‍न पडलेला आहे."
दुर्दैवाने ऊत्तर "हो" असं आहे. आपल्याकडे एकंदरीतच व्यावसायिक यश मिळवणार्‍या चित्रपटाला तो न आवडणं हे कबूल करणं ही "ऊगाच आपण वेगळे आहोत" असं दाखवण्याचा प्रकार मानला जातो. बहुदा त्यामुळे कोरी पाटी घेऊन सिनेमा बघायला फार कमी जातात. तुमच्या शेजारच्या खुर्चीतल्या माणसाला तुम्ही सिनेमा सुरू होण्या आधी विचारलं असतंत तरी तो आवडणार ह्याची त्याने तुम्हाला योग्य खात्री दिली असती.

आपण अतिशय छान समीक्षा करता. काही माहित नसलेल्या दर्जेदार सिनेमांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

ganesh January 17, 2009 at 12:56 AM  

thanks AN,AB, Harekrishnaji, Mukul.
now ,for individual response.

AN, i will not reject SRK altogether. I know that he is one of the most liked and hated stars, but he can carry a film and there are at least 2 of his films which i like immensely .DDLJ and KHNH.for variety of reasons and not only because of him. But i will not ignore his contribution.conversely, though we always consider aamir khan as intelligent actor, he has also given us crap lke mangal pande and atank hi atank just to name two.

AB, memento content wise ulta nahi ahe pan chronologically ulta ahe. Also, me thor ahe yabaddal wadach nahi.gajni sod, me ram gopal warma ki aag suddha akkha baghitlay.tohi swatacha paishane theatre madhe jaun. Baykochya shivya khaat, because she had to endure the torture along with me.

Harekrisnaji, the article you mention about Hollywood and 9/11 is like a follow up on my 2003 article in akshar on the same subject. That time situation was very different. The change we see now called for an update.

Mukul, i think it works both ways. Kahi lok jase wegle watna talnyasathi popular entertainment avadli asa mhantat, tase kahi jan fashion mhanun popular entertainmentla naka muradtat. Personally ,i think its immaterial .there are good and bad films in all kinds of cinema.

bhakit January 20, 2009 at 5:50 AM  

Thanks for visiting my blog. I agree with your reference to the absence of non-linear structure in our movies, but their are notable exceptions like Sooraj ka satwan ghoda by Shyam Benegal. Thanks for the nice article.

Regards,
Bhakit

ganesh January 20, 2009 at 9:43 PM  

thanks bhakit,
i think benegals film and mani ratnam's yuva r the only two examples,and yuva is the only example in popular cinema. let me know if you can think of any other example.we have flashbacks abound but as a structural device they are never used.unless u consider slumdog part indian(at least the device comes from Q and A).maybe the filmmakers unnecessarily doubt our audiences capacity to understand. so we need to have memento in straight line, and reservoir dogs need to be shown with planning and execution of actual robbery.well !!

Unknown November 20, 2009 at 9:19 AM  

What do u think abt 'Checkmate' - Marathi movie?

hrishikesh July 9, 2010 at 6:04 AM  

Memento adhi pahila hota....

mhanun ch Tamil ani Hindi versions ajun hi pahile nahit...... ani pahnar hi nahi... :P

ani Amir Khan chya CHANGLYA films peksha CRAP films jast ahet... :D :)

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP