कला आणि उपरोध

>> Saturday, January 31, 2009

पाहिलं तर असं लक्षात येईल की, ठराविक चित्रप्रकारात किंवा जॉनरमध्ये असणा-या चित्रपटांपेक्षा दोन भिन्न चित्रप्रकारांना कवेत घेणारे चित्रपट अधिक लक्षवेधी असतात. त्यांच्या गुणवत्तेत कमीजास्त होण्याची शक्यता जरुर असते, पण हे चित्रपट वेगळे म्हणून लक्षात राहतात, अशा चित्रपटांत चित्रकर्त्यांना काही प्रयोग करून पाहण्याच्या शक्यताही दिसतात.
दिग्दर्शक टेरी झ्विगॉफचा आर्ट स्कूल कॉन्फिडेन्शिअल या प्रकारचा मिश्र चित्रपट आहे. प्रामुख्याने दोन चित्रप्रकारांना यात स्थान मिळालेलं आहे. महाविद्यालयीन जीवनात आधी उपेक्षित असलेल्या नायकाने स्वतःला सिद्ध करून नायिकेला पटवून दाखविणा-या कॉमेडी चित्रपटांचा प्रकार यातला एक आहे, तर दुसरा आहे गुन्हेगारी पट. सिरीअल किलरच्या बळींची वाढती संख्या आणि त्याला शोधण्याची धडपड या दुसऱया प्रकारात येते. प्रमाण पाहिलं तर महाविद्यालयीन कॉमेडीचं प्रमाण हे रहस्यपटाहून खूप अधिक आहे. त्याचा आलेख आणि उत्कर्षबिंदूही अधिक स्पष्टपणे लक्षात येणारा आहे. याउलट हे रहस्य हे काहीसं पार्श्वभूमीला राहून क्वचितच पुढे येणारं आहे. मात्र या उपप्रकाराची जोड आवश्यक आहे ती पटकथेला अधिक गडद बनवण्यासाठी, जे दिग्दर्शकाला अभिप्रेत आहे.
आर्ट स्कूलचा आणखी एक विशेष आहे, तो आजच्या कलाविश्वावर त्यात असणारी टीका. साधी, सरळ कळण्याजोगी कलाकृती म्हणजे निकृष्ट आणि अगम्य, बोजड कलाकृतीच खरी श्रेष्ठ हे मानण्याची एक पद्धत मॉडर्न आर्ट चळवळीनंतर सुरू झाली. खरं तर असे ठोकताळे अभ्यासाशिवाय सहजपणे लावण्यासारखे नाहीत, पण समाजाच्या एका घटकाने ते गृहीत धरले आहेत. या अवास्तव प्रचलित समाजांचा पर्दाफाश करणं दिग्दर्शकाच्या अजेंड्याचा एक भाग आहे.
चित्रपटाचा नायक आहे जेरोम (मॅक्स मिन्गेला) जेरोम हा पारंपरिक शैलीत उत्तम चित्रे काढतो. कला महाविद्यालयात भरती झाल्यावर जेरोमच्या लक्षात येते की, त्याची साधी शैली इथे कोणावरच प्रभाव पाडत नाही. सर्वच कलाक्षेत्रातल्या कुठल्या ना कुठल्या बाबाच्या नादाने आणि आपण सर्वज्ञ असल्याच्या अहंकाराने काय वाटेल ते चित्राच्या नावाखाली खपवतायत आणि कोणालाच यात काही गैर वाटत नाही.
मध्यंतरी जेरोमचं वर्गात मॉडेल म्हणून बसणा-या आँड्रीवर प्रेम बसतं.पण त्याची कला मात्र दिवसेंदिवस मार खायला लागते. सॅन्डिफोर्ड त्याला प्रयोग करून पाहायला सांगतात. पण मुळातच इतर शैलींवर विश्वास नसणारा जेरोम यात कसा यशस्वी होणार ?
दरम्यान, कॅम्पसवर सुरू असलेल्या खूनसत्रातील बळींची संख्या वाढायला लागते आणि पोलीस उघडउघड तपासकार्याला वेग देतात. जेरोमचं आधीच फार बरं न चाललेलं वर्ष आणखीनच खराब होणार याची चिन्ह दिसायला लागतात.
डॅनीअल क्लोजच्या कथानकावर आधारीत असलेल्या (या आधी टेरी झ्विगॉफने केलेला घोस्टवर्डदेखील क्लोजच्याच ग्राफिक नॉव्हेलवर आधारीत होता.) आर्ट स्कूल कॉन्फिडेन्शिअलला विनोदी चित्रपट म्हणता येईल, पण हे लेबल पूर्णतः बरोबर नाही. त्यातला अनेक भाग हा सरळ गंभीर आहे आणि जो विनोदी आहे तोदेखील केवळ हसवण्यासाठी बेतलेला नसून त्याला उपरोधाने काही कटू सत्य मांडायची आहेत. भाबडा विनोद इथे एखादा प्रसंग सोडला तर दिसणार नाही. महाविद्यालयीन चित्रपटांत बहुधा व्यक्तिरेखा या ठराविक टाईपचं प्रतिनिधित्व करणा-या असतात. उदाहरणार्थ ब्युटी क्वीन, चष्मा लावणारी अभ्यासू पण खरी दिसायला चांगली मुलगी, गांगरलेला नवा विद्यार्थी वैगेरे. आर्ट स्कूलमध्येही टाईप आहेत. पण ते इतके ढोबळ नाहीत. त्यांचा खरा आयुष्याशी संबंध काही वेळा विदारक वाटेल इतका अचूक आहे. म्हणजे पाहा, प्रोफेसर सॅन्डीफोर्ड हे पंचवीस एक वर्षे कला शिकवतात. पण ते तिथे आहेत हे बाहेरच्या जगातल्या अपयशामुळे. स्वतःच्या कोणतीही दृष्टी नसलेल्या कलेला ते स्वतःपुरता महत्त्व देतात, पण त्याचवेळी आपली परिस्थिती किती दुर्दैवी आहे ते त्यांना माहीती आहे.
जिमी (जिम ब्रॉडबेन्ट) देखील कडवट झालेला अपयशी कलावंत आहे, आणि विद्रोहाच्या नावाखाली काय वाटेल ते करण्याची त्याची तयारी आहे. जेरोमला स्वतःला चित्रकलेतलं समजतं पण आत्मविश्वास नाही. ब्रॉडवे बॉब (स्टीव बुकेमी) इथे एक हॉटेल चालवतो आणि नव्या टॅलेन्टला प्रथम वाव तो त्यांची चित्रे आपल्या भिंतींवर टांगून देतो. त्याचा माज हा ख-या चित्रपारख्याहून अधिक आहे.
कलाक्षेत्रात दिसून येणारे हे आणि यासारखे इतर टाईप थोड्याफार फरकाने सर्व क्षेत्रात दिसून येतात. मात्र खास कलाक्षेत्रात आढळणारा एक टाईप येथे आहे तो हॉट शॉट, तरुण, यशस्वी, उर्मट चित्रकाराचा. मुलांना काही शिकायला मिळावं म्हणून मुलाखतीसाठी पाचारण केलेला हा चित्रकार कोणाची पत्रास ठेवत नाही. फॅकल्टीला मोडीत काढतो, विद्यार्थ्याचे प्रश्न डावलतो. स्वतःची गुर्मी दाखवतो. मात्र त्याच्या तोंडून येणारं एक विधान आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डोक्यात ठेवण्यासारखं आहे. तो म्हणतो. तुम्हाला थोर कलावंत तरच बनता येईल, जर तुम्ही मुळातच थोर कलावंत असाल. कला शिकवता येत नाही. ती तुमच्यात असते. किंवा नसते. हे विधान फारसं चूक नाही. आर्ट स्कूल ही शिकवतात ती माध्यमं आणि साधनं. इतिहास आणि जागतिक पातळीवरच्या घाडामोडींबद्दलही ते सांगतात. पण गणितासारखा विषय जसा शिकवला जाईल, तशी कला शिकवता येणार नाही. गंमत म्हणजे चित्रपटाचा शेवट हे काही प्रमाणात या विधानाला उत्तर आहे. पूर्णपणे उपरोधिक पण योग्य. या उत्तराला अनुसरून तुमच्यात खरंतर कला असण्याची गरजच नाही. तसा आभास आणि लोकांच्या नजरेत (कोणत्याही भल्याबु-या मार्गाने) येण्याची आणि राहण्याची किमया तुम्हाला जमली की पुरे. आज कलाक्षेत्रात डोकावून पाहिलं, तर हे निरीक्षण किती अचूक आहे हे जरूर लक्षात येईल.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP