एक होती राणी

>> Wednesday, February 4, 2009

श्रीमंत घरात वाढलेला नायक आणि गरीब घरची नायिका यांचं प्रेम हा आपला आवडता विषय! आपला म्हणजे आपल्या हिंदी चित्रपटांचा. भिन्न आर्थिक, सामाजिक स्तरांवरच्या या दोन तरुण व्यक्तिमत्त्वांनी एकत्र यायचं, घरच्यांच्या विरोधाला तोंड द्यायचं, लग्न करायचं आणि मग काय, हॅपीली एव्हर आफ्टर आहेच! अर्थात, या हॅपीली एव्हर आफ्टरचा गोंधळ असा असतो, की ते प्रत्यक्षात कधीच येत नाही. वास्तवात ही प्रकरणं किती चिघळू शकतात, याचं टोकाचं उदाहरण म्हणजे ब्रिटिश राजघराण्यातला वारस प्रिन्स चार्ल्स आणि त्याची मध्यमवर्गातून आलेली पत्नी डायना यांचा विवाह.
डायनाचा परिकथेत शोभावा असा विवाह हे ब्रिटिश जनतेसाठी आणि काही प्रमाणात जगभरच्या लोकांसाठीही, अशक्य वाटणारी स्वप्नं प्रत्यक्षात येण्याचंच उदाहरण होतं; मात्र हे स्वप्न टिकलं नाही. सुरवातीचा काही काळ सुखाचा गेल्यावर आणि चार्ल्स-डायनाचे हसरे फोटो पाहायची सवय झाल्यावर, त्यांच्या कुरबुरीही प्रसिद्धिमाध्यमांमधून लोकांपर्यंत पोचायला लागल्या. दोघांचीही स्वतंत्र प्रकरणं बाहेर यायला लागली. राजघराण्याची तीव्र नापसंतीही स्पष्ट दिसायला लागली आणि त्याची पर्वा डायनाला नसल्याचंही समोर आलं. लवकरच डायनानं परिकथेतील राजकन्या या इमेजचा त्याग केला आणि स्त्रीवादी भूमिकेत ती शिरली. घटस्फोटानंतरही डायनाची राजघराण्याला टक्कर देणारी एक स्वतंत्र विचारांची मुक्त स्त्री ही प्रतिमा कायम राहिली आणि लोकांच्या मनातलं तिचं महत्त्व वाढत गेलं. प्रसिद्धिमाध्यमांनी ही प्रतिमा उचलून धरली. तिच्या लहानसहान वागण्याबोलण्याला सामाजिक कार्यांमधल्या सहभागाला, किंवा तिच्याशी नव्यानं जोडल्या जाणाऱ्या नावांनाही महत्त्व दिलं आणि अखेर तिच्या 1997 मधल्या अनपेक्षित अपघाती मृत्यूलाही कारणीभूत ही माध्यमंच ठरली. डायनाचे राजघराण्याबरोबर असलेले संबंध आणि तिची लोकांमधली अमर प्रतिमा ही पार्श्वभूमी एका चित्रपटात वापरली गेलीय. चित्रपटांचं नाव "द क्वीन', दिग्दर्शक स्टीफन फ्रेअर्स.
क्वीनमध्ये डायना ही फक्त पार्श्वभूमीपुरती असली, तरी तिचं हे गैरहजर व्यक्तिमत्त्व चित्रपटातल्या संघर्षाला कारणीभूत आहे आणि तिच्याबद्दल काहीच माहिती नसेल (हे तसं कठीणच!) तर चित्रपट प्रभावहीन वाटेल. चित्रपट घडतो 1997 मध्ये टोनी ब्लेअर पंतप्रधानपदी निवडून आल्यावर काही महिन्यांनी. प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूपासून ते तिच्यावर लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या अंत्यसंस्कारांपर्यंतच्या कालावधीत. यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी (हेलन मिरेन) आणि पंतप्रधान टोनी ब्लेअर, (मायकेल शीन).
बकिंगहॅम पॅलेस आणि 10 डाऊनिंग स्ट्रीट यांसारख्या प्रतिष्ठित घरांमधल्या रहिवाशांना आणि त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये नाट्य शोधणाऱ्या या चित्रपटाला कुठल्या लेखी पुराव्याचा वा साक्षीदाराचा आधार आहे का, हे मी सांगू शकणार नाही; मात्र हे जरूर सांगू शकेन, की दिग्दर्शक कुठंही घटना वादग्रस्त वा अतिरंजित करण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच्या पात्रांना त्याची पूर्ण सहानुभूती आहे. त्यांच्याबद्दल त्याला आदर आहे; पण या पात्रांच्या जनमानसातल्या प्रतिभांनी तो दबून जात नाही.
चित्रपट सुरू होतो, तो टोनी ब्लेअरच्या निवडणूक जिंकण्यापासून. परंपरेप्रमाणे सरकार स्थापन करण्याचा आदेश घेण्याच्या निमित्तानं त्याची राणीशी भेट होते. प्रथमदर्शनी दोघांचंही एकमेकांबद्दल फार बरं मत होत नाही. पटकथा यानंतर उडी घेते ती डायनाच्या मूत्यूपर्यंत. डायनाच्या प्रेमानं हळव्या झालेल्या जनतेला राणीचं अशाप्रसंगी शोक व्यक्त न करणं खटकतं आणि दिवसागणिक जनतेचा संताप वाढायला लागतो. आपल्याला न जुमानणाऱ्या अन् आता राजघराण्याचा भाग न उरलेल्या व्यक्तीला असा जाहीर मान देणं राणीच्या तत्त्वात बसत नाही आणि आपल्या प्रजेचा राग- लोभदेखील समजू न शकणारी राणी या आवेगापुढे हतबल होते. टोनी ब्लेअर मात्र डायनाला पीपल्स प्रिन्सेस म्हणून मान देतो आणि त्याची लोकप्रियता आकाशाला भिडते; मात्र ब्रिटिश राजकारणातला सरकार अन् राजघराण्यातला तोल सांभाळणं फार गरजेचं असतं. तो सांभाळण्याची जबाबदारी न मागताच ब्लेअरवर येऊन पडते आणि स्वतःबरोबरच राणीनं काय करायला हवं याची तो गणितं मांडायला लागतो.
क्वीनला पटकथा आहे, जी चांगली रचलीदेखील आहे; पण कथा म्हटली तर जवळजवळ नाहीच. त्याचा भर आहे तो त्यातल्या दोन प्रमुख व्यक्तिचित्रांवर. राणीसारख्या उत्तुंग स्थानावर विराजमान झालेल्या व्यक्तीच्या भावनाही अखेर कशा मानवीच असतात, असं सांगून दिग्दर्शक राजघराण्याला एक ओळखीचा चेहरा देऊ करतो; मात्र हे करताना तो असं सांगायलाही विसरत नाही, की आज राजा आणि प्रजा यांमध्ये इतकं अंतर आहे, की ते एकमेकांना धड जाणूनही घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत राजघराण्याची कालबाह्यता हादेखील एक मुद्दा उपस्थित होतो; मात्र हा अनेक मुद्द्यांमधला एक. चित्रपटाचा हेतू केवळ या प्रकारची टीका करणं, असा म्हणता येणार नाही.
राणीकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन हा ब्लेअरची व्यक्तिरेखा देऊ करते. तोदेखील आधी राणीला शिष्ट ठरवून मोकळा होतो, मग हळूहळू त्याच्या लक्षात तिच्या असं वागण्यामागची कारणं लक्षात यायला लागतात. मग स्वतःहूनच तो मदतीचा हात पुढं करतो. सुरवातीला ही मदत नाकारली जाऊनही तो आपली बाजू बदलत नाही. त्याच्या या वागण्याला थोडा स्वार्थाचा भागही आहे; पण त्यापलीकडे जाऊन तो राणीच्या शांततेला समजून घेऊ शकतो हेही खरं. त्याच्यामध्ये होणारा बदल हा चित्रपट पाहणाऱ्यांच्या मनात होणाऱ्या दृष्टिबदलाशी समांतर जाणारा आहे.
राणीला जरी डायनाचं वागणं पसंत नसलं, तरी उत्तरार्धात ती एका पातळीवर तिला समजून घेऊ शकते. लोकांचं डायनाला मानणं आणि आपल्यावर आरोप करणं हे मात्र तिला समजून घेता येत नाही. चित्रपटाच्या एरवीच्या वास्तव हाताळणीत एक प्रसंग थोडा प्रतीकात्मक वाटण्याजोगा आहे. यात राणी एकटीच ओढ्यातून जाताना जीप बंद पडते आणि मदतीची वाट पाहत एकट्याच बसलेल्या राणीला रडू आवरत नाही. मनात साचलेलं दुःख बाहेर काढताना तिला इस्टेटीवरचं एक काळवीट दिसतं. त्याच्या सौंदर्यानं आणि मुक्त रूपानं मोहून गेलेली राणी जवळ येणारे बंदुकीचे बार ऐकून त्याला पळवून लावते आणि ते वाचेल अशी आशा करते. इथं तिनं स्वतःशी केलेला शोक हा आपल्या एकाकी परिस्थितीवर केलेला शोक आहे, तर पुढं काळविटाच्या शिकारीनंतर त्याला दिलेला निरोप हा राजघराण्याच्या संपर्कानं बंदी झालेल्या; पण मुक्तीच्या वाटेवर मृत्यू न टाळू शकलेल्या डायनाला दिलेला निरोप आहे. "क्वीन'मधली कथा जरी राणीची असली, तरी ही राणी प्रातिनिधिक आहे. प्रसिद्धीच्या, सत्तेच्या शिखरावर असलेली, लोकांच्या प्रेमाला पात्रं ठरलेली कोणतीही व्यक्ती या जागी पाहता येईल. कालपर्यंत आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला आज आपण नकोसं झाल्याची या व्यक्तीला झालेली जाणीव ही इथं महत्त्वाची आहे. अखेरच्या प्रसंगात राणी टोनी ब्लेअरला देखील या जाणिवेबद्दलच सांगते आणि तुलाही ती सुटणार नाही असा इशाराही देते. गंमत म्हणजे हा इशारा अगदी वेळेवर प्रेक्षकांपुढे आला आहे. एकेकाळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठणाऱ्या ब्लेअरची परिस्थिती आज राणीहून वेगळी नाही. मधल्या काळात त्याची जनता त्याच्यापासून फार दूर गेली आहे.
चरित्रात्मक सामाजिक, सत्यघटनांवर आधारित अशा अनेक लेबलांखाली जाऊ शकणाऱ्या "द क्वीन'ची शैली ही याआधी राजघराण्यावर आलेल्या चित्रपटांहून पुष्कळच वेगळी आहे. ब्रिटिश राजकारणाची या निमित्तानं पाहायला मिळणारी झलकही वेधक आहे; मात्र ही आहे फक्त झलक. प्रत्यक्षात इथं महत्त्व ना राजकारणाला आहे ना राजेशाही थाटाला. ते आहे केवळ माणसांना. परिस्थितीनं एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपलेल्या. असामान्य असूनही आपला सामान्य चेहरा पूर्णपणे विसरू न शकणाऱ्या. "द क्वीन' पाहताना हे लक्षात ठेवलं, तर हा चित्रपट विशेष लक्षवेधी वाटेल.
- गणेश मतकरी

1 comments:

आनंद पत्रे January 15, 2010 at 10:47 AM  

सिनेमा पाहीला, आवडला. तुमचे परिक्षण वाचल्यावर परत काही सिन्स पाहीले आणि जास्तच समजला/आवडला..
राणीचे काळविटाला हुसकवणे समजले नव्हते...
सुरेख निरिक्षण, परिक्षण...धन्यवाद!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP