अचानक धनलाभ आणि इतर शोकांतिका (बॉईल-३)

>> Monday, February 23, 2009


डब्लू, डब्लू. जेकब्स यांची एक गोष्ट आहे. मन्कीज पॉ नावाची. यातला माकडाचा पंजा हा चमत्कारी आहे. इच्छापूर्तीचं साधन म्हणून तो वापरला जाऊ शकतो. मात्र यात एक गोमदेखील आहे. या इच्छा अशा भयानक मार्गांनी पू-या होतात, की त्या मागणा-याला पश्चाताप करण्याची वेळ यावी. सध्या आपल्याकडे अचानक लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या दिग्दर्शक डॅनी बॉईलच्या चित्रपटांचा सूर जरी जेकब्स यांच्या गोष्टी इतका टोकाचा नसला तरी तथाकथित चांगल्या घटनांचे दुष्परिणाम हे त्याच्या चित्रपटांत हटकून पाहायला मिळतात.
आजच्या समाजाने तयार केलेल्या क्लॉस्ट्रोफोबिया हा त्याचा आवडीचा विषय आणि या विषयाची गडद मांडणी ही त्याच्या चित्रपटांची ओळख. त्यामुळेच बॉईलच्या चित्रपटांचे सुखांत देखील नव्या अडचणी उभ्या करणारे आणि अपूर्ण असतात. त्याच्या स्लमडॉग मिलीअनेअर बद्दलही हेच म्हणता येईल. एरवी नायकाच्या भावाचा मृत्यू ओढवणारा आणि नायिकेच्या भूतकाळातल्या समस्त खलनायकांना नायकाच्या मागावर येण्यासाठी उद्युक्त करणारा शेवट हा कसला सुखांत ? मात्र ही बॉईलची हातचालाखी आहे. एक क्षण पकडण्याची, जो कथेला सुखांत शेवटाचा आभास देईल, असो.
१९९४ पासून चित्रपटीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या डॅनी बॉईलने चित्रपटांचे अनेक प्रकार हाताळले असले, तरी त्या सर्वांवर त्याने स्वतःचा ठसा सोडलेला दिसतो. अतर्क्य घटनांना सामोरे जाणा-या सामान्य व्यक्तिरेखा, गुन्हेगारी किंवा नात्यांमधले संघर्ष, अशा प्रकारचे गंभीर आशय धरूनही घटनांची जवळ जवळ फार्सिकल म्हणण्य़ासारखी केलेली मांडणी. (ज्यात फार्समधला विनोद देखील अभिप्रेत आहे, पण तो मन प्रसन्न करणारा असेल याची खात्री देता येणार नाही.) कथानकाला विशिष्ट आकार देऊन निश्चित शेवटाकडे नेण्यापेक्षा कथनात आलेली गुंतागुंत आणि फसवा पण चटपटीत शेवट हे त्याचे ट्रेडमार्क त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच पाहायला मिळतात. हा पहिला चित्रपट म्हणजे शॅलो ग्रेव्ह.
अचानक धनलाभ, अन् त्यातून उदभवणारे पेचप्रसंग बॉईलने अनेकदा हाताळले आहेत. दरवेळी ते चित्रपटाच्या केंद्रस्थानी असतीलच असे नाही, मात्र पैशांचा प्लॉट पाइन्ट म्हणून वापर करणं ही त्याची नेहमीची खोड आहे. ट्रेनस्पॉटींग किंवा स्लमडॉगमध्ये याला दुय्यम महत्त्व आहे. मात्र मिलिअन्स आणि शॅलो ग्रेव्हमध्ये याचा वापर महत्त्वाचा पण प्रामुख्याने मॅकगफिन म्हणून आहे. किंवा दुस-या शब्दात सांगायचं तर पात्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, त्यांच्या प्रत्येक हालचालीला कारणीभूत ठरणारा, पण प्रेक्षकांना बिनमहत्त्वाचा.
शॅलो ग्रेव्ह हा एक गडद फार्स आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे इथला विनोद उघड नाही. छुपा, विक्षिप्त, तिरकस आहे. तो एका फ्लॅटमध्ये रहाणा-य़ा तीन मित्रांची अन् त्यांना झालेल्या अचानक धनलाभाची गोष्ट सांगतो. हे तीन मित्र आहेत अँलेक्स (इवान मॅकग्रेगर) हा पत्रकार, ज्युलिएट (केरी फॉक्स) ही डॉक्टर आणि डेव्हिड (क्रिस्टोफर एक्लेस्टन) हा अकाउंटंट. एक मुलगी आणि दोन मुलं असूनही त्यांचे संबंध पूर्ण आणि केवळ मैत्रीचे आहेत. आता या त्रिकुटाला आणखी एकाचा शोध आहे. भाड्यात भागीदार म्हणून अनेकांशी बोलल्यावर ते ह्यूगो नावाच्या माणसाला आपल्यात घ्यायचं ठरवतात. ह्यूगो येतो आणि लगेचच ड्रग ओव्हरडोसने मरतो. बरोबर एक पैशांची भरलेली सुटकेस सोडून. आता जर खरंखुरं पोलिसांना सांगितलं तर पैसे परत करावे लागणार. पण पर्याय काय, तर मृतदेह नष्ट करण्याचा. मग ही मित्रमंडळी मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करतात आणि पैसे ह़ड़प करतात. मात्र त्या क्षणांपासून त्यांचं आयुष्य बदलून जातं ते कायमचं.
शॅलो ग्रेव्हला व्यक्तीपेक्षा घटनांमध्ये आणि कथानक पुढे नेण्यापेक्षा गुंतागुंत वाढविण्यामध्ये अधिक रस आहे. हे चटकन स्पष्ट होणारं आहे. त्यातल्या व्यक्तिरेखा या टाईप्स आहेत. त्यांना खोली नाही. त्यांचा वापरही याप्रकारच्या व्यक्ती अमुक परिस्थितीत सापडल्यावर काय काय होऊ शकेल, या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी केल्यासारखा आहे. मग पटकथा या विविध शक्यता हाताळण्याचे मार्ग शोधताना दिसते. मृत माणूस ड्रग्जने गेला आणि त्याच्याकडे पैसे होते. म्हणजे तो बहुदा गुन्हेगारी वळणाचा असणार. मग तीन घटक पुढे येतात. म्हणजे खलप्रवृत्ती व्यक्ती, अशा माणसांच्या मागावर असलेले पोलीस, आणि मित्रांमधेच बेबनावामुळे वाढत चाललेली दरी, पटकथा प्रामुख्याने या तीन घटकांचा आधार घेते आणि पुढे सरकते. पटकथेचा प्रकार काहीसा एपिसोडीक आहे. जवळजवळ सेल्फ कन्टेन्ड प्रसंग मालिका एकाला एक जोडल्या सारखा, त्यामुळे येणा-या अडचणी कायम राहून तणावाची तीव्रता वाढत जात नाही. तर प्रत्येकवेळी नव्या अडचणी आणि त्यावर शोधलेले नवे उपाय असाच घटनाक्रम राहतो.
शॅलो ग्रेव्ह हा रहस्यपट नाही. त्यामुळे कथानक लपवाछपवीत वेळ काढत नाही. उलट घडणारी प्रत्येक घटना ही प्रेक्षकांसमोर घडते. या प्रकारचं तंत्र अनेकदा हिचकॉकच्या चित्रपटांतही आढळतं, जेव्हा प्रेक्षकांची व्यक्तिरेखांमधली गुंतवणूक त्याच्या शेवटापर्यंत रहस्य टिकवण्याहून अधिक महत्त्वाची वाटते. टीव्हीसाठी काम करीत असताना इन्स्पेक्टर मोर्स मालिकेवर केलेल्या कामाचा बॉईलच्या विषयांमध्ये पुन्हा पुन्हा डोकावणा-या गुन्हेगारी वळणांचा संबंध असावा, कारण विविध चित्रप्रकार हाताळूनही तो या विशिष्ट जागी परत येताना दिसतो. स्लमडॉग हे त्याचं ताजं उदाहरण.त्याचा प्रत्येक चित्रपट हा खास त्याचा असतो. हे नेहमी जाणवतं, कथासूत्रापासून छायाचित्रणापर्यंत अन् पटकथेच्या तपशीलापासून संकलनाच्या स्मार्टनेसपर्यंत सर्वत्र त्याची चाहूल लागत रहाते. शॅलो ग्रेव्ह याला अपवाद नव्हता. अन् स्लमडॉगही.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP