स्लमडॉग मसाला असूनही "टिपिकल बॉलिवूडपट' का नाही? (बॉईल-२)

>> Tuesday, February 10, 2009


स्लमडॉग मिलिअनेअरचं प्रदर्शन हे आपल्या प्रेक्षकांकडून मिक्‍स्ड रिऍक्‍शन्स मिळवणारं ठरेल, याची कल्पना होती आणि झालंही तसंच. मात्र रिऍक्‍शन्समधला चढ-उतार हा केवळ प्रेक्षकांपुरताच मर्यादित नाही, तर समीक्षकांची अवस्थाही काहीशी अशीच आहे.
या तुलनेने छोट्याशा, लो बजेट निर्मितीने प्रमुख चार गोल्डन ग्लोब ऍवॉर्डस मिळवून आणि आता एकदम दहा विभागांमध्ये ऑस्कर नामांकन मिळवून जगभरातल्या लोकांना तर चकित केलं आहेच, वर आपल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप प्रमाणात वाढवून ठेवल्या आहेत. या अपेक्षांचा परिणाम म्हणजे "स्लमडॉग'चा प्रत्येक प्रेक्षक हा चित्रपट कसा असेल, याच्या काही ना काही पूर्वकल्पना डोक्‍यात घेऊनच जातो आणि या कल्पनांचं ओझं त्याच्या मोकळेपणी रसास्वाद घेण्याच्या आड येत असेल यात शंका नाही. असो.
एकूण प्रतिक्रिया पाहता, "हा ग्रेट सिनेमा आहे' इथपासून ते "तो हायली ओव्हररेडेड आहे' इथपर्यंत सर्व प्रकारचे निकाल प्रेक्षकांनी लावल्याचं दिसतं आणि "हा परदेशी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून बनवलेला चित्रपट आहे' इथपासून ते "बॉलिवूडचा आत्मा डॅनी बॉईलला अचूक गवसला आहे' इथपर्यंत सर्व प्रकारचे निष्कर्ष या दरम्यान निघालेले दिसतात. या निकालांच्या अन्‌ निष्कर्षांच्या अनुषंगाने "स्लमडॉग मिलिअनेअर'कडे पाहता, काही प्रश्‍न मनात उभे राहतात.
यातला सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असावा? स्लमडॉग पाहून लक्षात येणारी एक उघड गोष्ट म्हणजे त्याच्या पटकथेत बॉलिवूडच्या मसालापटांमधले अनेक घटक पाहायला मिळतात. आज हा चित्रपट पाहिलेल्या अन्‌ न पाहिलेल्या सर्वांनाच त्याचं थोडक्‍यात कथानक माहीत आहे. जमाल मलिक (देव पटेल) या गरीब मुलाचा "हू वॉन्ट्‌स टू बी ए मिलिनेअर?' मधला सहभाग आणि त्यात विचारल्या गेलेल्या प्रश्‍नांच्या निमित्ताने उलगडत गेलेला त्याचा भूतकाळ दाखवणारा हा चित्रपट ढोबळ रचनेत अन्‌ तपशिलातही अतिशय बॉलिवूडिश आहे. अशक्‍य योगायोग, क्‍लीशे यांना त्याच्या कथेत महत्त्वाचं स्थान आहे. चित्रपटाच्या सुरवातीलाच दाखवण्यात येणाऱ्या KBC स्टाईल प्रश्‍नाने अन्‌ त्याच्या संभाव्य उत्तरांमधून पुढे येणारा अशक्‍य सुखान्त सुचवला जातो आणि बॉलिवूड मसालापटांची एकेक स्टेशनं घेत कथा पुढे सरकायला लागते. लहानपणचं प्रेम, खलनायकांनी घडवलेली तद्दन नाट्यपूर्ण ताटातूट, कोठ्यावरून सुटका, जमाल आणि त्याचा भाऊ सलीम यांच्यात घडणारं परस्परविरोधी प्रवृत्तीचं दर्शन, आठवणीनं जपलेलं प्रेम अन्‌ घेतलेले बदले यातल्या कोणत्याच गोष्टी म्हटलं तर वास्तवाशी सुसंगत नाहीत. थेट शेवटच्या "जय हो' गाण्यापर्यंत हा चित्रपट आपल्या ट्रेडमार्क चित्रप्रकाराची वैशिष्टें मांडतो. मग या चित्रपटात अन्‌ बॉलिवूडच्या इतर कोणत्याही चित्रपटात फरक काय? तर आहे. बॉलिवूडच्या अतिनाट्यपूर्ण शैलीच्या उलट दिशेने जाणारा एक वास्तववादी प्रवाह इथे सतत आढळतो, जो डॅनी बॉईलच्या चित्रपटांशी नातं सांगतो.
डॅनी बॉईलनं फॅन्टसी (ए लाईफ लेस ऑर्डनरी), सायन्स फिक्‍शन (सनशाईन), गुन्हेगारी (शॅलो ग्रेव्ह, ट्रेनस्पॉटिंग) असे अनेक प्रकारचे चित्रपट त्या त्या चित्रप्रकारांच्या सर्व वैशिष्ट्यांसह हाताळले असले तरी त्याचा प्रत्येक चित्रपट हा त्याची स्वतःची काही वैशिष्ट्यं मांडतो. याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रत्येक चित्रपट हा सामान्य माणसांना असामान्य परिस्थितीत आणून सोडणारा अन्‌ त्या परिस्थितीत ती कशी रिऍक्‍ट करतात हे चित्रित करणारा असतो. कथानकाकडे अन्‌ व्यक्तिरेखांकडे पाहण्याची बॉईलची एक तिरकस दृष्टी आहे, जी त्याच्या चित्रपटांना एक विनोदाची झालर आणून जोडते. हा विनोद- ज्याला आपण ब्लॅक ह्यूमर म्हणू, अशा तऱ्हेचा गडद असतो आणि तो कथानकातली सिच्युएशन अन्‌ व्यक्तिरेखांचे स्वभाव या दोन्हीशी निगडित असतो, चिकटवलेला न वाटणारा.
तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हिंसाचार. स्कोर्सेसीने ज्या प्रकारे हॉलिवूडमध्ये राहून हिंसाचाराचं एक प्रक्षोभक रूप घडवत नेलं त्याच प्रकारचा धीट प्रयत्न युरोपीय पार्श्‍वभूमीवर बॉईलने केलेला दिसतो. फरक हा, की स्कोर्सेसीच्या बहुतेक व्यक्तिरेखा या मुळातच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्या असतात. याउलट बॉईलच्या व्यक्तिरेखांचं हिंसा जवळ करणं, हे अपघाती असतं. तिथं सराईतपणा नसून, अचानक आलेली ऊर्मी असते; बऱ्याचदा नाइलाजानं अन्‌ जिवाच्या आकांतानं चढवलेला हल्ला दिसतो.
स्लमडॉग पाहताना जाणवतं, की बॉईलनं इतर चित्रप्रकारांना जशी आपल्या शैलीची जोड देऊन हायब्रीड सिनेमा बनवला, तसाच प्रयत्न त्यानं स्लमडॉगमध्येही केला आहे. बॉलिवूड वैशिष्ट्यांबरोबरच आता सांगितलेली त्याच्या चित्रपटांची आशयाच्या पातळीवरची वैशिष्ट्यं स्लमडॉगमध्ये दिसून येतात. दारिद्य्राचं अंगावर येणारं दर्शन, भिकारी मुलाला आंधळं करण्यासारखे धक्कादायक प्रसंग, पोलिसांनी जमालला टॉर्चर करण्यासारख्या जागाही इथं वेळोवेळी येतात. आशावादी फॅन्टसी आणि जळजळीत वास्तव यांच्याकडे एकत्रितपणे पाहत स्लमडॉग आकार घेतो. त्यामुळेच धक्कादायक प्रसंग अनुभवतानाही प्रेक्षक त्याचं "फीलगुड' असणं विसरू शकत नाही, अन्‌ जमालच्या यशाच्या चढत्या कमानीच्या आनंदात सहभागी होतानाही त्याच्या भूतकाळातले धक्के आपल्या जाणवत राहतात. हे टेक्‍श्चर हा स्लमडॉग मिलिअनेअरचा खरा वेगळेपणा आहे, जो त्याला टिपिकल बॉलिवूडपट बनू देत नाही.
स्लमडॉगचा अपेक्षित प्रेक्षक हा भारताबाहेरचा आहे, हा आणखी एक लोकप्रिय आरोप. माझ्या मते, प्रत्येक चांगला दिग्दर्शक हा स्वतःच्या डोळ्यांसमोरच्या आयडिअल प्रेक्षकासाठी चित्रपट बनवतो आणि तोही स्वतःच्या दृष्टिकोनाशी प्रामाणिक राहून. दिग्दर्शकाची ही शैली प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे जाणण्याची क्षमता असणारा प्रेक्षक हा त्या चित्रपटाचा योग्य प्रेक्षक- तो कोणत्या देशाचा, हा मुद्दा गौण आहे. स्लमडॉगबाबत हा मुद्दा काढला जातो, कारण हा चित्रपट ब्रिटिश दिग्दर्शकाने बनवला, आणि व्यावसायिक चित्रपटांची पंढरी असणाऱ्या हॉलिवूडमध्ये तो सन्मानपात्र ठरला. मात्र ही पारितोषिकं विसरून जर आपण तो बॉईलच्या शैलीशी प्रामाणिक आहे का, या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर उत्तर होकारार्थी मिळेल. त्यामुळे बॉईलचे विचार, त्याची दृष्टी पटणारा प्रेक्षक हा स्लमडॉगचा प्रेक्षक! त्यातला काही भारतात असेल, काही भारताबाहेर.
स्लमडॉगमधल्या दारिद्य्राच्या दर्शनाला आणि "स्लमडॉग' या शब्दाचा झालेला विरोध तर फारच गमतीदार आहे. प्रमुख पात्राची गरिबी आणि या व्यक्तिरेखेचं दबलेलं असणं, "अंडरडॉग' असणं स्लमडॉग या शब्दातून दिसून येतं. ही काही शिवी नाही, त्यामुळे मुळात इथं विरोध करण्याचीच गरज नाही. आता राहिला प्रश्‍न दारिद्य्रदर्शनाचा, तर यातला कुठलाच भाग हा खोटा, रंगवलेला म्हणावासा नाही. गरिबी, मुलांवर येणारी संकटं, दंगली, भिकारी बनवण्याच्या यंत्रणा, वेश्‍या व्यवसाय या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत. आपल्या माहितीच्या आहेत. त्यातल्या अनेक आपण आपल्याच चित्रपटांतून पाहिलेल्याही आहेत. इथलं चित्रण थोडं अधिक थेट असेल; पण त्यामुळे ते खोटं ठरत नाही. त्यातून चित्रपट या व्यक्तिरेखांचा, समाजाच्या या स्तराचा अपमान करू इच्छित नाही. तो त्यातल्याच तिघांना आपले नायक म्हणून उभे करतो. त्यांचा आपापल्या उत्कर्षबिंदूपर्यंतचा प्रवास दाखवतो. मग आपल्याला खटकतं ते नेमकं काय?
स्लमडॉगमधल्या एका व्यक्तिरेखेच्या चित्रणाबद्दलही अनेक आक्षेप घेतले गेलेले मी ऐकतो. ही व्यक्तिरेखा आहे, त्यातल्या नकारात्मक भूमिका करणाऱ्या क्विझ शो होस्टची. अनिल कपूरने उभी केलेली ही व्यक्तिरेखा खरं तर विशेष अशासाठी आहे, की प्रत्यक्ष चित्रपटाचा बराच भाग ती केवळ कार्यक्रमाचं संचालन करते. तिला असलेल्या नकारात्मक छटा पुढे येतात, त्या कॅमेऱ्यापुढे अन्‌ मागे तिने केलेल्या शेरेबाजीतून, टॉयलेटमध्ये घडणाऱ्या एका प्रसंगातून आणि अनिल कपूरच्या मुद्राभिनयातून अतिशय मर्यादित फूटेज अन्‌ संवादातून हा खलप्रवृत्तीचा आविष्कार करणं, हे उत्तम पटकथा/ संवाद/ दिग्दर्शन अन्‌ अभिनयाचं लक्षण आहे. इथं अनेकांचा विरोध आहे तो श्रीमंत टॉक शो होस्टला गरीब जमालबद्दल वाटणाऱ्या इर्ष्येला. या जेलसीचं काय कारण, असा प्रश्‍न हे विरोधक विचारताना दिसतात. गंमत म्हणजे खरोखरच असं एखादं कारण पटकथेनं उपलब्ध करून दिलं असतं (उदाहरणार्थ जमालच्या वडलांच्या मृत्यूला प्रेमकुमार जबाबदार होता वगैरे) तर हीच व्यक्तिरेखा आपण जशीच्या तशी मान्य केली असती. प्रत्यक्षात असे हेवेदावे पाळले जाण्यातला बेगडीपणा नजरेआड करून केवळ समीकरणाच्या पातळीवर पात्रांचा जमाखर्च बसवून. मात्र सायमन ब्युफॉयची पटकथा व्यक्तिरेखेला अधिक जिवंत करते. विरोधाचं कारण हे या व्यक्तीच्या मानसिकतेतच दाखवते. तिची स्वतःची पार्श्‍वभूमी गरिबीतून वर आलेलं असणं, स्वतःच्या आजच्या स्तराचा अभिमान, खालयांनी खालीच राहावं अशी मनाची जडणघडण, ही या मोजक्‍या जागा स्पष्टपणे दाखवून देतात, अन्‌ भूतकाळातली स्वतंत्र कारणं देण्याची गरज भासत नाही. निदान मला तरी भासली नाही.
"स्लमडॉग मिलिअनेअर' डॅनी बॉईलचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे, असं मी नक्कीच म्हणणार नाही. माझ्या दृष्टीनं तरी तो मान गोल्डन ग्लोबदेखील न मिळू शकलेल्या "ट्रेनस्पॉटिंग'कडे जाईल. मात्र स्लमडॉग हा प्रयत्न प्रामाणिक आहे. मला तरी त्यात हिशेबीपणाचा वास येत नाही. त्याची निर्मिती ही दिग्दर्शकाच्या आधीच्या कामाशी सुसंगत आहे. त्याला मिळालेला मानसन्मान अन्‌ त्या निमित्तानं आपल्या चित्रपटसृष्टीकडे वेधलं गेलेलं आंतरराष्ट्रीय चित्रपट जगताचं लक्ष, हा मात्र एक योगायोग आहे. त्यातल्या गरीब पण सज्जन नायकाला अचानक झालेल्या धनलाभासारखाच चांगला पण अनपेक्षित योगायोग!
-गणेश मतकरी

4 comments:

क्षितिज देसाई February 10, 2009 at 11:32 PM  

अतिशय सुंदर व संपूर्ण विश्लेशणात्मक लेख आहे.
अमिताभ ने या चित्रपटाच्या नावाला निषेध केला. त्याच कारण बहुदा अनिल कपूरची भूमिका हे असावं. अनिल कपूर ने यात केबिसी सारख्याच(केबिसी च्या ओरिजिनल) गेम शोच्या होस्ट ची भूमिका केली आहे. अमिताभ ने पुर्वी केबिसी शो गाजवला होता. आपल्या जागेवर दुसरं कोणी आलं तर ते नक्कीच आवडणार नाही. म्हणून तो निषेध असावा.
महत्वाची गोष्ट म्हणजे यात अमिताभ वर आधारित एक प्रश्‍नही आहे. त्या प्रसंगातून आणि त्यापुढया देव पटेल च्या तोंडी असलेल्या संवादातून ("ही इज द मोस्ट फेमस मॅन इन इंडिया")
डॅनी बॉयल अमिताभ ची लोकप्रियता सांगतो. त्यामुळे डॅनी बॉयल अमिताभ ला दुखवू ईच्छित नव्हता हे स्पष्ट होते. म्हणून अमिताभ ने चित्रपटाच्या नावाला उगाच निषेध णकरायला नको होता.

Abhijit Bathe February 11, 2009 at 1:31 PM  

गणेश - लेख चांगला लिहिलायस असं (आत्तातरी) वाटतंय. नुसतं वाटतयच याचं कारण म्हणजे वाचल्या वाचल्या लगेच यावर कमेंट टाकाविशी वाटली. पण ती टाकता येत नाहिए कारण -
१) डॅनी बॉईलचा एकही पिक्चर मी पाहिला नाहिए.
२) विकास स्वरुपचं ’Q & A' मी ३-४ वर्षांपुर्वी वाचायचा प्रयत्न केलेला, पण ते इतकं बोर झालं कि वाचवलं नाही.
३) ’स्लमडॉग’ मी पाच वेळा प्रयत्न करुनही १०-१५ मिनिटांपेक्षा जास्त पाहू शकलो नाहिए.

पण या लेखातुन तु असं लिहितोयस असं वाटलं कि (correct me if I am wrong) पिक्चरबद्दल ’आक्षेप’ घेण्यासारखं काही नाहिए तसंच बॉईलचे इतर पिक्चर पहाता फार ’वरचं’ काही आहे असंही नाही.

Though I will be rooting for it in each catagory - oscars do disappoint in their erratic behavior. It made me feel guilty for rooting for Washington in 'Training Day' when Crowe should have got it for 'Beautiful Mind'. I would have supported 'Monsoon Wedding' if I had seen it rather than 'Lagaan'. I wish I could say they are like filmfares - but they are not.

Anyway before I say too much let me see SM - or it will make me eat my own words! :))

Abhi February 11, 2009 at 8:15 PM  

ek prekshak mhanun ha chitrpat thik aahe, pan ek bhartiya mhanun mala ajibaat avadalela nahi.

mi majhya blog var hyavar ek lihila aahe.

http://maalkauns.blogspot.com/2009/02/blog-post_09.html

प्रत्येक पुढारलेल्या देशमधे गरीबी आहे. काही वर्षांपूर्वी पॅरिस मधे झालेल्या दंगली तुम्हाला माहीत असेलच. पण त्यावर कुठला चित्रपट नाही निघाला.

एक अकरावीतील मुलगी ह्या चित्रपटावर काय म्हणते ते इथे वाचा.

http://pradhanmaithili.blogspot.com/2009/01/why-oskar-is-only-to-slum-dog.html

पण खरे सांगू का, तुमच्या घरात एखादी घाण आहे आणि तुमच्या कडे ती घन सॉफ करण्याचे कामही चालू आहे पण कोणीही तुमच्या घरात घुसून त्याचे छायाचित्रण करून तुमची अब्रू जर चव्हाट्यावर मांडत असेल तर तुम्ही असेच बोलाल का?

मला कोणाच्याही भावना दुखावायाच्या नाहीत. पण या चित्रपटमुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत.

आपला विनीत,
अभी

ganesh February 12, 2009 at 9:46 PM  

thanks kshitij,AB ani abhi,
AB,
basically, i liked slumdog as a normal film, its true to boyles earlier work, and its not supposed to be meaningful or anything.
in the oscar sceenario ,i preffer THE READER in the lot. though i am a fan of fincher, i found buttton quite boring.

abhi,
u should look at art as art and nothing else.its not as if boyle is saying bad things about us and praising his own country. trainspotting prints equally dismal picture of drug addicted youth in UK.it also has a dive in the commode though its a hallucination...
there are several films portaying poverty .for us ,its slumdog, salaam bombay, city of joy. if u r taking offence,slumdog shold be the last because its pure masala fiction.other 2 films are saying this is reality.
children of heaven was not financed by iranian government saying they are exploiting poverty.is it a bad film?
and what about pather panchali, city of god, bicycle thief?

you should see films in the parameter of those films only ,without bringing race ,religion and country. i am sure lot of people think the way u do. but then its not film appreceation...its poiltics!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP