व्हाइट - समानता, असमानता !
>> Tuesday, July 14, 2009
विमानतळावरच्या सरकत्या पट्टीवरून फिरणारी एक ट्रंक दिसते. तिचा संदर्भ लागत नाही. हातात चिठ्ठी घेऊन एक जण पत्ता विचारतो. ट्रंक पुन्हा दिसते. हा मनुष्य आता कोर्टसदृश इमारतीच्या पायऱ्या चढतोय. त्याला आकाशात पांढरं कबूतर दिसतं. हा हसतो. पुढे जाणार, तेवढ्यात त्याच्या खांद्यावर ते शिटतं. एका खोलीत बसलेला तो. बायकोला घटस्फोटाचं कारण विचारलं जातं. हा तिच्याकडे बघतो. बायको शांतपणे सांगते, "जमणं शक्य नाही.'
क्रिस्तॉफ किस्लोवस्कीच्या कलर ट्रायालॉजीमधील दुसरी फिल्म "व्हाइट' सुरू होते आणि फ्रेममधल्या पांढऱ्या रंगाचे संदर्भ शोधायला आपली नजर आपसूकच सुरवात करते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वांवर आधारित फ्रान्सची घटना आणि राष्ट्रध्वजातले लाल, पांढरा आणि निळा हे तीन रंग किस्लोवस्कीनं आपल्या चित्रपटांसाठी निवडून रेड, व्हाइट आणि ब्लू या चित्रपटांची निर्मिती केली.
व्यक्तिस्वातंत्र्य, कौटुंबिक पातळीवरचा संघर्ष आणि समतेच्या नावाखाली परस्परांवर सूड घेण्यासाठी केलेल्या अतिरेकाच्या पार्श्वभूमीवर "व्हाइट' हा चित्रपट आपण पाहतो. कॅरोल हा पोलिश नागरिक आहे. तिथे तो हेअर स्टायलिस्ट आहे. त्याची बायको डॉमिनिक ही फ्रेंच आहे. आपला नवरा शारीर प्रेम नीट करू शकत नाही, या कारणासाठी तिला घटस्फोट हवा आहे आणि त्याला तो नकोय. डॉमिनिक घटस्फोट मिळवते आणि फ्रेंच भाषा नीट येत नसलेल्या कॅरोलला अक्षरशः रस्त्यावर आणते. रात्री स्वतःजवळच्या किल्लीनं घरात प्रवेश करून झोपलेल्या कॅरोलला ती उठवते. तो तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो; पण तिला हवंय ते देऊ शकत नाही. ती चिडते. त्याला घराबाहेर हाकलते. घरात स्वतःच आग लावते आणि पोलिसांना फोन करण्याची धमकी देते. कॅरोल खरोखरीच रस्त्यावर येतो.
रस्त्यावर एका कोपऱ्यात पोलिश गाण्याची धून आळवत बसलेल्या कॅरोलला मिकोलाज भेटतो. तोही पोलिश आहे. पैसे मिळविण्यासाठी एका व्यक्तीचा खून करण्याची ऑफर मिकोलाज देतो. कॅरोल अजूनही डॉमिनिकच्या दुःखात आहे. तिचं स्वातंत्र्य त्याला बघवत नाही. तिच्या घरी तो फोन करतो, तेव्हा ती दुसऱ्या पुरुषाबरोबर आहे. "योग्य वेळी फोन केलास,' असं म्हणून ती त्याला मुद्दाम खोलीतले आवाज ऐकवते. कॅरोल चिडून फोन ठेवतो. उरलेले दोन फ्रॅंक मशिनमधून बाहेर येत नाहीत. सगळा राग तिथल्या ऑपरेटरवर काढून तो नाणी परत मिळवतो आणि चित्रपटाच्या सुरवातीला सरकत्या पट्ट्यावर फिरताना दिसलेली सूटकेस आपल्याला परत दिसते.
ही सूटकेस मिकोलाजची आहे. त्याच्याबरोबर ती पोलंडला येत नाही म्हणून तो तक्रार करतो. "त्या सूटकेसमध्ये काय होतं,' असं तिथल्या अधिकाऱ्यानं विचारल्यावर तो उत्तरतो, ""माझा मित्र...'' कफल्लक कॅरोलला त्यानं सूटकेसमधून स्मगल करून आणलंय; पण कॅरोलचा दुर्दैवाचा फेरा चुकलेला नाही. चार चोर नेमकी तीच सूटकेस चोरतात आणि बर्फाळ डोंगरामध्ये नेऊन समान वाटणीसाठी उघडतात. आत कॅरोल आहे! ते चिडून त्याला बदडतात आणि फेकून देतात. कॅरोल कसाबसा आपल्या गावी सलूनपर्यंत पोचतो.
पुढे इकडेतिकडे उद्योग केल्यावर जमिनीच्या व्यवहारासंबंधी चोरून ऐकतो. स्वतःच ती जागा विकत घेतो आणि दसपट भावात विकतो. आता त्याचे दिवस बदलतात. तो मिकोलाजला शोधून काढतो. पैशांसाठी खून करण्याची तयारी दाखवतो. ठरलेल्या ठिकाणी जातो, तर अंधारातून पुन्हा मिकोलाजच बाहेर येतो. खून स्वतःचाच करायचा होता, हे उघड करतो.
खिशात पैसे ठेवलेत, मला मार आणि पैसे घेऊन जा, असं सांगतो. कॅरोल चाप ओढतो, पिस्तुलातून गोळी सुटते, मिकोलाज कोसळतो; पण तो जिवंत आहे. पहिली गोळी खोटी होती. मिकोलाजचा मरण्याचा विचार बदलतो. "तू ठरल्याप्रमाणं खून केला आहेस,' असं कॅरोलला सांगून त्याला तो ठरलेले पैसे देतो. "आपण सगळेच दुःखी असतो,' असं सांगून हसतो. पुढे कॅरोल हेच पैसे वापरून जमिनीचं डील मिळवतो.
डॉमिनिकची आठवण मात्र त्याच्या मनातून जात नाही. शेवटी तिला पोलंडला आणण्यासाठी तो स्वतःच्या मृत्यूचं नाटक करतो. मृत्युपत्रात सगळी मालमत्ता तिच्या नावे करतो. एक प्रेत मिळवून त्याच्यावर अंत्यसंस्कार करवतो आणि आपल्यासाठी रडत असलेल्या डॉमिनिकला अनिमिष नजरेनं चोरून बघतो.
आता चित्रपटात पुन्हा पुन्हा दिसणारा एक शॉट आणखी एकदा दिसतो. डॉमिनिक अंधाऱ्या खोलीचं दार उघडून आत येते.... या वेळी त्याच्या पुढचा शॉट दिसतो. ती आत येऊन दिवा लावते. पलंगावर उघड्या अंगानं कॅरोल बसलाय. ती दचकते. "तू माझ्या अंत्यसंस्कारांमध्ये रडत होतीस,' तो म्हणतो. "तू मेला होतास.' डॉमिनिक उत्तरते. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपतो. "मला हे कधीचं करायचं होतं,' म्हणतो. ते आणिक जवळ येतात. (लाक्षणिक अर्थानं मेलेल्या कॅरोलच्या जवळ जायला डॉमिनिकची हरकत नाहीये.)
बहुधा मेलेल्या कॅरोलबरोबरच त्याचं मृतवत पौरुषत्वही मेलंय. आता नव्या प्रेमळ कॅरोलच्या संगतीत डॉमिनिक खूष आहे. ज्यासाठी घटस्फोट हवा होता, ते कारणच उरलेलं नाही. सकाळ होते. कॅरोल जागेवर नाही. डॉमिनिक त्याला घरभर शोधते. दार वाजतं. कॅरोल असेल म्हणून उघडते; पण पोलिस येतात. संपत्ती हडप करण्यासाठी पूर्वपतीचा खून केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करतात. चर्चमधून बाहेर पडणाऱ्या नवविवाहित डॉमिनिकचा क्लोजअप दिसतो. कॅरोल आणि डॉमिनिक या नवविवाहित जोडप्याचं चुंबन पांढऱ्याशुभ्र फ्रेममध्ये फेडआऊट होतं. एकमेकांच्या स्वातंत्र्याची समाप्ती होते.
कॅरोल आता उघडपणे जगू शकत नाही. कारण जगाच्या दृष्टीनं तो मेलाय आणि डॉमिनिक त्याच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. पुढच्या एका दृश्यात तुरुंगातल्या खिडकीत बसलेल्या डॉमिनिकला कॅरोल दुर्बिणीतून बघतो. आपण आता एकत्र राहू, लग्न करू, अशा अर्थाचे हातवारे ती करते, हे पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. स्वातंत्र्याच्या व्याख्येचं विघटन करून त्याचा अर्थ सांगता सांगता चित्रपट संपतो.
बर्लिन चित्रपट महोत्सवात सिल्व्हर बेअर सन्मानपात्र "व्हाइट'चं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण चित्रपटात बहुतेक सर्व शॉटमध्ये किमान एक तरी पांढऱ्या रंगाचं ऑब्जेक्ट बघायला मिळतं. भविष्यातले अनेक शॉट्स आधीच ऍब्रप्टली येतात. नंतर त्यांचे संदर्भ लागतात. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण कॅमेला अँगल्स आणि शॉट्सचे संदर्भ लावताना दिलेली ट्रीटमेंट लक्षात राहण्यासारखी आहे. अत्यंत असमानतेवर आधारलेलं नातं तोडण्यासाठी असणारी अहमहमिकेची समानता "व्हाइट'मध्ये बघायला मिळते. "व्हाइट' संपतो तो समतेला नात्यांचा नवा आयाम बहाल करूनच.
- प्रसाद नामजोशी