अमेरिकन सायको -गडद सामाजिक उपहास

>> Saturday, July 11, 2009

यू लाईक ह्युई लुईस अ‍ॅण्ड द न्यूज ?
पॅट्रीक बेटमन (क्रिश्चन बेल) हातातली पॉप ग्रूपची सी.डी उंचावत सोफ्यावर रेलेलेल्या पॉल अ‍ॅलनला विचारतो. पॉल फारसा शुद्धीत नाही.
दे आर ओके, तो म्हणतो.
यानंतर पॅट्रीक या ग्रुपची थो़डक्यात माहिती देणारं अन् आपली व्यक्तिगत आवड दाखवणारं एक छोटेखानी भाषण सुरू करतो. भाषणादरम्यान कधीतरी तो शेजारच्या खोलीत पडलेला एक रेनकोट घालतो. कसल्याशा औषधाच्या दोन गोळ्या तोंडात टाकतो. तेथेच शेजारी ठेवलेली चकचकीत पात्याची एक कु-हाड बाहेरच्या खोलीत आणून ठेवतो.
एव्हाना काहीतरी विचित्र घडत असल्याची पॉलला शंका आलेली असते . पॅट्रीकने सर्व फर्निचर झाकून जमिनीवर गी वर्तमानपत्रे का पसरली, आणि आता त्याने हा रेनकोट का घातला याचे पॉलला कोडे पडते. तसे तो पॅट्रीकला विचारतोही, पण उत्तरादाखल पॅट्रिक ह्युई लुईसचं एक गाणं जोरदार आवाजात लावतो. इतक्या मोठ्याने की त्यात आवाज दबून जावेत. आता पॉलला रिअ‍ॅक्ट करायला फारसा वेळ न देता, पॅट्रीक कु-हा़ड उचलतो आणि...
मेरी हॅरन दिग्दर्शित अमेरिकन सायको (२०००) हा ब्रेट इस्टन एलिसच्या वादग्रस्त कादंबरीवरचा तितकास वादग्रस्त चित्रपट काही दृश्यांसाठी आक्षेपार्ह ठरलेला. आपल्याकडच्या व्हिडिओ लायब्र-यांमध्येही हा चित्रपट मिळू शकतो. पण अमेरिकन आवृत्तीहून कितीतरी अधिक कात्री लावलेल्या अवस्थेत. अमेरिकन सायको किंवा फाईट क्लबसारख्या चित्रपटांची नेहमी एक गंमत असते. त्यांचा रोख हा मुळात सामाजिक मूल्यांवर टिका करण्याचा असतो. समाज ज्या मार्गावरून जातो आहे, त्या मार्गामध्येच काही गोंधळ आहे असं त्यांना सुचवायचं असतं ते या टिकेला, अर्थात आशयाला. दृश्यांमध्ये केलेली ही काटछाट ही फारशी महत्त्वाची ठरू शकत नाही. कारण आशयाला त्यामुळे धक्का पोहचत नाही. मग अशा परिस्थितीत प्रत्यक्ष महत्त्व नसणा-या गोष्टींना कात्री लावून सेन्सॉर बोर्डांना काय मिळतं ? अर्थात अशा परिस्थितीत ते खरोखर महत्त्वाच्या ठरणा-या विचारप्रवर्तक मुद्यांना ते कात्री लावत नाहीत याबद्दल आपण त्यांचे आभारच मानायला हवेत, असो.
अमेरिकन सायको हा नावाला जागणारा चित्रपट आहे. त्यात मोठ्या प्रमाणात सेक्स अणि व्हायलन्स आहे. बेटमचे लोकांना मारण्याचे मार्ग विविध आहेत, आणि त्यांचा तो सतत न कंटाळता वापर करताना दिसतो. मात्र हे लक्षात घ्यायला हवं की चित्रपट फारसा वास्तवदर्शी नाही. चित्रपटाचा नायक बेटमन याच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट घडतो. फार तपशीलात न जाता मी एवढंच म्हणेन की बेटमन हा निवेदक म्हणून फारसा विश्वसनीय नाही. घडणा-या घटनांकडे पाहतानाही आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मगाशी मी या चित्रपटाच्या जो़डीला फिंचरच्या फाईट क्लबचा उल्लेख केला. मोठ्य़ा प्रमाणात हिंसक दृश्यांसाठी वादग्रस्त ठरलेल्या फाईट क्लबचा नायक हा मुळात स्वतःचं अस्तित्त्व हरवून बसलेला असतो, तो ज्या गोष्टी वापरतो, तीच त्याची ओळख बनलेली. त्याच्या प्रातिनिधिक आयुष्याचा हेतू हा कन्झ्युमर असणे एवढाच. आजच्या समाजाला आलेली यांत्रिकता, खोट्या चेह-यांमागे दडण्याची गरज, समाजरचनेतल्या स्वतःच्या स्थानाविषयी असलेल्या आभासी कल्पना अन् मनात खदखदणारा राग हा फाईट क्लबच्या नायकाचा विशेष. बेटमनची व्यक्तिरेखा तपशिलात फरक करणारी पण काहीशी याच प्रकारची.
दोघांतला मूळ फरक म्हणजे फाईट क्लबचा नायक. माणसाचं माणूसपण पुसून टाकणा-या व्यवस्थेचा बळी आहे आणि अमेरिकन सायकोचा नायक या व्यवस्थेचा एक भाग. तो या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारतो. तर हाही व्यवस्था उचलून धरतो. वेळोवेळी दिसून येतं की बेटमनला ख-या परिस्थितीची कल्पना आहे. मात्र ती बदलणे आवश्यक आहे. यावरच त्याचा विश्वास नाही. बेटमनच्या डोक्यातही राग आहे. मात्र तो व्यवस्थेविषयी नाही. तर राग त्याच्या पुरषी अहंकार अन् मध्येच डोकावणा-या असुरक्षिततेमधून येणारा आहे. त्याच्या हातून घडणा-या गोष्टी या रागाचे दृश्यरुप आहेत. त्या प्रत्यक्षात घ़डताहेत असे मानणे किंवा न मानणे हे प्रत्येक प्रेक्षकाच्या वैयक्तिक मताप्रमाणे बदलू शकते.
अमेरिकन सायकोमधला विनोद हा वेळोवेळी बोचरा, संयत, भडक असा स्वरूप बदलताना दिसतो, मात्र त्यातला उपहास हा नियमितपणे जाणवणारा आहे. डॉर्सिया या जवळपास युरोपिअन रेस्ताँराचे येणारे संदर्भ, प्रत्यक्ष खुनाच्या घटनांमधला टोकाचा भडकपणा, या विशिष्ट वर्गातल्या मंडळींमध्ये वेशभूषेपासून व्हिजिटींग कार्डपर्यंत (बेटमन आणि त्याचे मित्र यांमधील व्हिजिटींग कार्डच्या तुलनेचा प्रसंग, हा चित्रपटातल्या सर्वात स्मरणीय आणि विनोदी प्रसंगातला एक आहे.) असणारा सारखेपणा हे सगळं ज्या पद्धतीने मांडले जाते., त्या मांडणीतच हा उपहास दडलेला आहे. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही, मात्र १९८० च्या दशकातल्या आत्मकेंद्री संस्कृतीचा तिला आधार असल्याचे मी ऐकलेले आहे. माझ्या मते या चित्रपटाला असे विशिष्ट काळाशी जोडणे (काही दृश्य तपशीले वगळता) योग्य होणार नाही. त्याला जे सांगायचे आहे, ते त्या पलीकडले अधिक विस्तृत स्वरूपाचे आहे.
दिवसा आणि रात्री वेगवेगळे चेहरे वागवणारा, श्रीमंत, शीघ्रकोपी आणि हिंसाचाराची तमा न बाळगणारा बेटमन साकारणा-या क्रिश्चन बेलने पुढे जवळजवळ हीच सगळी वैशिष्ट्ये असणारा (मात्र प्रत्यक्ष गुन्हेगार नसणारा) बॅटमॅन साकारावा हा थोडा योगायोगच म्हटला पाहिजे, अगदी नावातल्या सारखेपणासकट. त्याच्या व्यक्तिमत्त्वातच हा गडदपणा दडला असावा. जो आपसूकच या व्यक्तिरेखा जिवंत करायला मदत करतो. आज बॅटमॅन आणि टर्मिनेटर या दोन ब्लॉकबस्टर मालिकांचा नवा चेहरा बनलेल्या बेलला स्टार बनवणारा अमेरिकन सायको हा दशकातल्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक ठरावा.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP