के पॅक्स - अवैज्ञानिका

>> Thursday, July 2, 2009

हॉलीवूडचा असला आणि केवीन स्पेसी/जेफ ब्रिजेससारख्या मोठ्या अभिनेत्यांना घेऊन काढलेला असला तरी के-पॅक्स चित्रपट फार लोकप्रिय नाही, निदान माझ्या माहितीप्रमाणे. याचं कारण कदाचित त्याचा एकाच वेळी दोन चित्रप्रकारांत बसण्याच्या (आणि त्यामुळेच दोन्ही चित्रप्रकारांच्या चाहत्यांना एकाच वेळी अस्वस्थ करण्याच्या) अट्टाहासात असेल, कदाचित सायन्स फिक्शनचा कथेला आधार असून, स्पेशल इफेक्टच्या संपूर्ण गैरहजेरीत असेल किंवा कदाचित याहून वेगळंच काही.
के पॅक्स हा प्रॉट (केवीन स्पेसी) या के-पॅक्स नावाच्या ग्रहाहून पृथ्वीवर अवतरलेल्या तथाकथित परग्रहवासीयांची गोष्ट सांगतो. तथाकथित अशासाठी की, प्रत्यक्षात आपल्या कल्पनेत (किंवा आपण पाहिलेल्या चित्रपटात) परग्रहवासी म्हणून जे काही दिसतं किंवा दाखवलं जातं, त्याचा या परग्रहवसीयांशी दुरान्वयेही संबंध नाही. खरं तर तो सांगतो त्याला त्याच्या बोलण्याशिवाय दुसरा कसलाच पुरावा नाही. प्रॉट दिसतोही अगदी माणसासारखा. त्याच्या तसं दिसण्याचा, किंवा आपल्या शंभर प्रकाशवर्षाइतक्या अंतरावरल्या ग्रहापासून पृथ्वीवर येण्यासाठी केलेल्या प्रवासाला तो काही साधी स्पष्टीकरणंही देतो, मात्र विज्ञानाच्या भाषेत ही पडताळून पाहण्यासारखी नाहीत. साहजिकच अशा गोष्टी बोलणा-या माणसाला जिथे दाखल व्हावं लागेल, तिथेच प्रॉट आहे. सायकायाट्रिक इन्स्टिट्यूट आँफ मॅनहॅटनमध्ये किंवा दुस-या शब्दात सांगायचं तर वेड्यांच्या इस्पितळात.
आपल्या ग्रहाबद्दलचा भाग आणि तो खरा असल्याचं शपथेवर सांगण्यापलीकडे प्रॉट अगदी नॉर्मल आहे, त्याला वेडा म्हणण्यासारखं कोणतंच लक्षण त्याच्या वागण्याबोलण्यात नाही. त्याचा डॉक्टर मार्क पॉवेलही (ब्रिजेस) यामुळे अचंबित आहे. त्याशिवाय खगोलशास्त्रावरचं त्याचं ज्ञान हे भल्याभल्या शास्त्रज्ञांना गप्प बसणारं आहे, ज्याचं स्पष्टीकरण त्याला केवळ वेडा समजून मिळत नाही. मार्कचं मन एकाच वेळी दोन प्रकारांनी विचार करतं. हा एखाद्या धक्क्याने कोषात गेलेला, पण मुळात अतिशय हुशार माणूस असावा असं तो एका बाजूने मानतो, पण सुप्तपणे त्याची इच्छा आहे, ती प्रॉटच्या कल्पनाविश्वावर विश्वास ठेवण्याची. आपल्या ज्ञानाचा तोकडेपणा मान्य कऱण्याची आणि आपल्या समजुतीपलीकडे काहीतरी असू शकतं हे समजून घेण्याची.
के-पॅक्सचा बराचसा भाग हा डॉक्टर आणि पेशंट यामधल्या चर्चेवर आधारलेला आहे. या चर्चेत उपस्थित होणारे मुद्दे, कठीण प्रश्नांवर प्रॉटने चुटकीसरशी दिलेली सोपी उत्तरं, दोघांच्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया हा भाग वेधक आणि खरोखर विज्ञानिकांच्या चाहत्यांना रस वाटेलसा आहे. मात्र सायन्स फिक्शन चित्रपटांनी दृष्टीसुखाची सवय प्रेक्षकांना लावून त्यांच्या विचारशक्तीला टाळं मारल्याने त्यातला मोजका प्रेक्षक या केवळ वैचारिक युक्तिवादाला दाद देऊ शकेल.
चित्रपटाचा उरलेला भाग पुन्हा दोन त-हांनी विभागला जातो. प्रॉटचं बरोबरच्या पेशंट्बरोबरचं वागणं आणि डॉक्टरच्या घरचे प्रसंग. हे दोन्ही ट्रॅक त्यामानाने दुय्यम महत्त्वाचे आणि फारसे वेगळे नाहीत. इस्पितळातल्या पेशंट्सचे वेडाचार किंवा अतिशय उद्योगी, कामसू माणसाच्या घरच्यांची नाखुशी या दोन्ही गोष्टी एका परीने सांकेतिक आहेत. अन् आपणही विविध चित्रपटांतून पाहिलेल्या आहेत. मात्र या प्रसंगातून दिग्दर्शक लेन सॉफ्टली एक कथासूत्र पुढे आणतात, जे तितकं नेहमीचं नाही. माणसाला भासणारी संपर्काची गरज कशी वेगवेगळ्या पातळ्यांवर महत्त्वाची आहे, हे इथे दिसून येतं. वेड्यांचा एकटेपणा, विश्वात एकट्याच फिरणा-या प्रॉटचा एकटेपणा आणि डॉक्टरला आपल्या कामामुळे कुटुंबापासून येत जाणारा दुरावा या तीन प्रकारांनी माणसं जग संकुचित करत असलेली दिसतात, आणि त्यांचे एकमेकांच्या संपर्कात येणं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कशा प्रकारे बदलतं हे महत्त्वाचं ठरतं.
जीन ब्रुअर यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रॉट ही ख्रिस्ताची प्रतिमा असल्याचेही सुचित केले जाते. त्याचं मानवाचं रुप असूनही दैवी असणं, साधेपणी राहून सर्वांना मदत करणं, ज्ञानाची कुवत सामान्यांपलीकडली असणं (यातला प्रॉट प्लॅनेटेरिअममध्ये खगोलशास्त्रज्ञांशी चर्चा करतो, तो प्रसंग, उघडच ख्रिस्तचरित्रातल्या एका प्रसंगावरून घेतलेला आहे.) आणि माणूसपणातल्या त्रुटी त्रयस्थपणे सांगणं. या सगळ्या गोष्टी हे स्पष्ट करतात, मात्र ही प्रतिमा स्वाभाविकपणे येईल तिथेच येऊ दिली आहे, तिला कृत्रिमपणे झुकेल येवढं ताणण्यात आलेले नाही.
के पॅक्सचा शेवट आपल्या सायन्स फिक्शन होता का नेमका मनोविश्लेषणात्मक होता हे सांगेल, ही कल्पना हा चित्रपट फोल ठरवतो. लेखक- दिग्दर्शक आपली केस दोन्ही बाजूंनी उभी करतात. प्रॉट माणूस आहे किंवा नाही अशी शंका येत राहावी, असं वातावरण अनेकवार तयार केलं जातं. डॉक्टर थोडी डिटेक्टिव्हगिरी करून हा माणूस कोण असेल, हे शोधण्याचा प्रयत्नदेखील करतो. आणि प्रॉटच्या दुस-या ओळखीच्या जवळही पोचतो. मात्र शेवट हा शंभर टक्के निकाल देण्याचं टाळतो आणि एका संदिग्ध शेवटावर कथानक संपवतो.
या चित्रपटाच्या प्रेक्षकांमध्ये अशी टक्केवारी नक्कीच असेल, जिला या प्रकारची अर्धवट उत्तर आवडत नाहीत. त्यांना त्यांचे चित्रपट संपूर्ण समजावे लागतात. मग हे समजणं ओव्हरसिम्प्लिफाइड असायला त्यांची हरकत नसते. प्रॉटने आपल्या कोषातून बाहेर येऊन आपल्या मानवी ओळखीकडे जावं किंवा सांगितल्याप्रमाणे इस्पितळातून ठरल्यावेळी गायब व्हावं अन् तो परग्रहवासी असल्याचा पुरावा द्यावा, असं रोखठोक उत्तर कदाचित या मंडळींना आवडलं असतं. मात्र के-पॅक्स हे उत्तर देणं टाळतो. या दोन्ही शक्यतांना तो जरुर स्पर्श करतो, पण अखेरचा निष्कर्ष आपल्यावर सोडतो. हा शेवट योग्य आहे. कारण कधीकधी विचारांना चालना मिळणं हे तात्पुरत्या समाधानापेक्षा अधिक महत्वाचं असतं. ते चित्रपटाच्या अनुभवालाही अधिक मोकळं करतं, सुखांताच्या किंवा शोकांताच्या सोईस्कर किना-याला लावून त्याला संकुचित करत नाही.
-गणेश मतकरी

3 comments:

sume_et August 17, 2009 at 6:39 AM  

the movie was queit nice...as u mentioned abt end...i really feel it is thought provoking...recently i saw a movie named "man from earth" which is also very thought provoking...i recommend u must watch this movie which directly comment on Christianity...a must watch

आनंद पत्रे September 11, 2009 at 11:06 AM  

different visual dimension to alien-on-earth concept ...

हेरंब December 9, 2011 at 10:36 PM  

सुपर्ब. खूप आवडला. शेवट किंचित गंडल्यासारखा वाटला. पण एकूण चित्रपट अप्रतिम ! केव्हिन स्पेसी बेस्ट !

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP