गाभ्रीचा पाऊस

>> Thursday, August 13, 2009


चांगल्या ग्रामीण समांतर चित्रपटाशी नातं सांगणारा चित्रपट म्हणजे "गाभ्रीचा पाऊस.' उपहासात्मक विनोद ही या चित्रपटाची वेगळी बाजू. विचारप्रवृत्त करणारा सूर, दिग्दर्शकाची उत्तम कामगिरी, उत्कृष्ट अभिनय आणि फोटोग्राफी हे सगळंच कौतुक करण्यासारखं.

हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी चांगलं आहे. गेली काही वर्षं मराठी सिनेमा सुधारण्याच्या अफवा जरूर आहेत; मात्र, क्वचित एखादा वेगळा प्रयत्न सोडता, खरोखर उत्तम म्हणावी, तीही केवळ समीक्षकांच्या किंवा केवळ प्रेक्षकांच्या पसंतीला न उतरता आवडू शकेल, अशी निर्मिती फारच दुर्मिळ होती. या वर्षी मात्र, किमान तीन चित्रपट असे आहेत, जे मराठी चित्रपटामध्ये होत चाललेल्या बदलाचा निश्‍चित पुरावा मानले जाऊ शकतील. हे तीनही चित्रपट त्यांच्या दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. प्रेक्षकाला अमुक आवडतं, तेच दाखवावं, अशी मनाशी अन्‌ त्यांच्या माध्यमाशी तडजोड न करता धीटपणे पडद्यावर आलेल्या या कलाकृती आहेत. त्या आशयघन आहेत. केवळ घटकाभर करमणूक इतक्‍या मर्यादित हेतूवर त्यांचा डोलारा रचलेला नाही. या दिग्दर्शकांतल्या दोघांचे हे पहिलेच प्रयत्न असूनही त्यांची माध्यमावरची पकड अन्‌ तांत्रिक सफाई लक्षात येण्याजोगी आहे. गेला बराच काळ मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाशी एक तडजोड केलेली आहे. विनोद आणि मेलोड्रामा या दोनच विभागांत मराठी सिनेमा बनू शकतो; अन्‌ यातल्या कोणत्याही एका विभागात जो थोड्याफार प्रमाणात यशस्वी होईल, त्याला चांगलं म्हणावं, असा एक समज रूढ झालेला आहे. (इथली यशस्वी शब्दाची व्याख्यादेखील खूपच फ्लेक्‍झिबल आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.) मी ज्या तीन चित्रपटांविषयी बोलतो आहे, त्यांतल्या एकातही या प्रकारची तडजोड आवश्‍यक वाटली नाही. हे चित्रपट म्हणजे परेश मोकाशीचा "हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी', सचिन कुंडलकरचा "गंध' आणि सतीश मनवरचा "गाभ्रीचा पाऊस.'
यातला "गाभ्रीचा पाऊस' मी नुकताच पाहिला. पुण्याच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिकविजेता ठरल्यापासूनच तो चर्चेत होता. पुढे जगभरात अनेक महोत्सवांमध्ये त्याने वर्णी लावल्याचं अन्‌ कौतुकपात्र ठरल्याचंही ऐकून होतो. पाहण्याचा योग मात्र आला, तो हल्लीच. त्याच्या नावाबद्दलचा गैरसमजही तेव्हाच दूर झाला. तोपर्यंत "मृगाचा पाऊस' सारखं हे एखादं पावसाचं विशेषण असल्याचं वाटलं होतं. "गाभ्रीचा' ही पावसाला हासडलेली शिवी असल्याचं मात्र, तो पाहिला तेव्हाच कळून चुकलं.
हा चित्रपट भारतात 1955 च्या पथेर पांचालीपासून चालत आलेल्या चांगल्या ग्रामीण समांतर चित्रपटाशी नातं सांगतो, तरी सत्यजित राय यांनी बनवलेला "पथेर पांचाली' हा तेव्हाच्या भारतीय व्यावसायिक चित्रपटांमध्ये न दिसलेलं काही मांडण्याचा प्रयत्न होता. तो मांडताना त्यांनी घेतलेला विषय अस्सल भारतीय होता. मात्र, त्यांची दृष्टी ही युनिव्हर्सल होती. व्यावसायिक चित्रपटांचे संस्कार न होता, कायम जागतिक चित्रपट पाहिलेल्या राय यांनी तेच संस्कार आपल्या चित्रपटात वापरले आणि एक वेगळा चित्रपट तयार झाला. त्यानंतर व्यावसायिक चौकटीबाहेर काम करणाऱ्या अनेक दिग्दर्शकांनी हाच मार्ग स्वीकारला. "गाभ्रीचा पाऊस' हे या मार्गावरलंच आजचं पाऊल आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गेल्या काही वर्षांमधला आपल्याकडला ज्वलंत प्रश्‍न आहे. आपल्यासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना ज्या हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, ती निश्‍चितच आपल्या राज्यकर्त्यांना लांच्छनास्पद आहे. सरकारने पावसाची अनिश्‍चितता अधिक प्रमाणात असणाऱ्या प्रदेशांमध्ये शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचे अन्य मार्ग विकसित करण्याकडे केलेलं पूर्ण दुर्लक्ष, शेतकऱ्यांना शेती सोडून इतर उद्योग करण्यासारखे दिलेले सल्ले आणि माफक कर्जमाफीसारखी वरवरची मदत, यांमुळे ही परिस्थिती अधिकच बिघडलेली आहे. हवामानाची अस्थिरता, सरकारचं दुर्लक्ष आणि एकजुटीचा अभाव यांमुळे शेतकरी आज ज्या अवस्थेत पोचला आहे, त्या अवस्थेकडे "गाभ्रीचा पाऊस' एक बोचरी नजर टाकतो.
चित्रपट सुरू होतो, तोच एका आत्महत्येपासून. किस्नाच्या (गिरीश कुलकर्णी) शेजारी राहणाऱ्या एका शेतकऱ्यानं निराशेपोटी ही आत्महत्या केलेली असते. ही घटना गावकऱ्यांना नवीन नसते. पण परिस्थितीचं गांभीर्य नव्यानं जाणवून देणारी किस्नाची पत्नी अलका (सोनाली कुलकर्णी) आणि किस्नाची आई (ज्योती सुभाष) यांना ते लगेचच जाणवतं. अलकाला आपल्या नवऱ्यातही ही निराशावादी दृष्टी, असुरक्षिततेची जाणीव दिसायला लागते आणि या दोघी ठरवतात, की किसननं भलतं पाऊल उचलू नये, यासाठी सतत त्याच्यावर नजर ठेवायची. या कामी ताबडतोब नेमणूक केली जाते, ती छोट्या दिनूची (अमन अत्तार). दिनू आपल्या बापाचा माग ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण लवकरच हा प्रयत्न लक्षात येऊन किस्ना अधिकच वैतागतो. वर प्रत्यक्ष अडचणी कमी नसतात. पावसाची काही शाश्‍वती नसते. कर्ज दर वर्षी वाढत असतंच.
तरी किस्ना स्वतः निराशावादी नसतो. शक्‍य तितका या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा, हे त्यानं ठरवलेलं असतं. चालू वर्षातही तो सगळी तयारी करतो, पेरणी करतो; मात्र मोक्‍याला पाऊस येत नाही. आदल्या दोन वर्षांप्रमाणेच वर्ष कोरडं जाणार, असंच दिसायला लागतं. पहिली पेरणी फुकट जाते. पुन्हा ती करायची तर पैशांची अडचण. मग दागिने गहाण ठेवले जातात. शेतीचा जुगार रंगायला लागतो. किस्ना अगदीच निराशेच्या काठावर असताना पाऊस येतो. मात्र, जो येतो, तो थांबायचं नाव काढत नाही, पडतच राहतो. परिस्थिती सुधारण्याची चिन्हं दिसत नाहीत. आधी अडचण असते, ती पाऊस पडत नाही ही, तर आता त्याचं पडत राहणं, हेच शेतकऱ्यांच्या जिवावर उठणार असतं.
"गाभ्रीचा पाऊस'ची सर्वांत वेगळी बाजू म्हणजे, त्यातला उपहासात्मक विनोद. हा विनोद संपूर्ण संहितेत सतत आहे आणि तो शेतकऱ्यांच्या आयुष्यातल्या भीषण वास्तवातल्या विसंगतीवर बोट ठेवत जातो. या सर्व जागांना एक प्रकारच्या युक्तिवादाचं स्वरूप आहे. त्या आपल्याला जे हसू आणतात, ते प्रसन्न म्हणता येणार नाही. उलट त्याला एक असहायतेची दुहेरी झालर आहे. पहिली असहायता आहे, ती या व्यक्तिरेखांची- ज्या आपल्या परिस्थितीवर मात करू शकत नाहीत; तर दुसरी आहे आपली स्वतःची, कारण आपण ही परिस्थिती खरं तर जाणून आहोत. त्यातला निसर्गाचा भाग सोडता, जे राजकारण या परिस्थितीला जबाबदार आहे, तेदेखील आपल्याला माहीत आहे. मात्र, आपणही ते बदलायला असमर्थ आहोत. उदाहरणादाखल आत्महत्या केलेला शेतकरी अन्‌ किस्ना यांच्यातल्या तुलनेनं अलकाचं अस्वस्थ होत जाणं, परिस्थिती अधिकाधिक बिघडत असताना घरी केलेल्या गोडधोड पदार्थांमागचं स्पष्टीकरण, किस्नाजवळच्या शेतातल्या निरुद्योगी शेतकऱ्यानं रिकामा शेतकरी हा कामसू शेतकऱ्यापेक्षा नफ्यात कसा, हे उलगडून दाखवणं, अशा कितीतरी जागा दाखवता येतील. या जागा काही विनोदासाठी तयार करण्यात आलेल्या नाहीत, तर आजचं आपलं वास्तवच किती विक्षिप्त, अनाकलनीय आहे, याची आपल्याला जाणीव करून देण्याचा त्याचा हेतू आहे. हा विनोद आपल्या तोंडात एक कडवट चव मागे सोडतो, त्यामागेही हेच कारण आहे.
शेतकऱ्यांच्या आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य किती दूर आहे, अन्‌ आधुनिकतेचा त्यांच्यापर्यंत पोचणारा कवडसा किती पुसट, वरवरचा अन्‌ निरर्थक आहे, हे चित्रपटात वेळोवेळी दिसून येतं. गावकऱ्यांच्या क्वचित तोंडात येणारे इंग्रजी शब्द, पैसे कर्जाऊ देणाऱ्या सावकाराचं मोबाईल गेम खेळत राहणं, कुठल्याशा रेडिओवर लागलेली रेडिओ मिरचीची अर्थहीन बडबड ही त्याची शहरी आधुनिकतेची ओळख, आपल्या तथाकथित प्रगतीशी आलेला त्यांचा थोडका संबंध, ना त्यांच्या कामी येणारा, ना त्यांची परिस्थिती आपल्यापर्यंत आणून पोचवणारा.
"गाभ्रीचा पाऊस'ने लावलेला आपल्याला विचार करायला भाग पाडणारा सूर, दिग्दर्शकाची पहिलीच महत्त्वाकांक्षी कामगिरी, गावचं वातावरण अचूक पकडणारी सुधीर पलसानेंची फोटोग्राफी, पट्टीच्या अन्‌ नवशिक्‍या सर्वांचाच अभिनय हे सगळंच इथं कौतुक करण्याजोगं आहे. मात्र, मला खटकला (आणि चांगलाच खटकला) तो शेवट. तो काय होता, हे मात्र अर्थातच सांगणार नाही. मात्र, मला तो पटला नाही. त्यामुळे सामाजिक नजरेतून तर निराशावादी विचार पुढे गेलाच, वर व्यक्तिरेखेच्या दृष्टीनंही तो न्याय्य वाटला नाही. तो हवा तितका स्पष्ट नव्हता, असंही काही प्रेक्षकांचं मत ऐकताना वाटून गेलं. तो तसा असेलसं अपेक्षित होतं; मात्र, त्याला जी अपरिहार्यता यायला हवी होती, ती आली असं दिसलं नाही. तरीही शेवटाचा राग पूर्ण चित्रपटावर काढणं योग्य होणार नाही. चित्रपट मला आवडला. शेवटाकडे मी दुर्लक्ष करेन.
"हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी', "गंध' अन्‌ "गाभ्रीचा पाऊस' या तिन्ही चित्रपटांमधून मराठी चित्रपटाची आजची तयारी दिसून येते. मात्र, ही झाली कलाविष्काराच्या पातळीवरची तयारी. वितरणाबाबत किंवा सर्व प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्याबाबत काही प्रश्‍न अजूनही आहेत. त्यांची उत्तरं इतक्‍यात मिळतीलसं नाही. आणि ती मिळेपर्यंत तरी अर्थपूर्ण मराठी चित्रपटाचा पाठपुरावा करणाऱ्या चित्रकर्त्यांची स्थिती ही (आपल्या शेतकऱ्यांइतकी नसली तरी) बिकटच म्हणावी लागेल.
- गणेश मतकरी

2 comments:

Meghana Bhuskute November 14, 2009 at 10:50 AM  

आत्ताच ’गाभ्रीचा पाऊस’ पाहिला.
प्रतिक्रिया देताच येत नाही, अशी कडवट चव राहते खरी मनात.
शेवट काहीसा निराशावादी आहे. पण तो असायला हवा तितका संदिग्ध आहे, असंही वाटलं.
---
शेवट माहीत करून घ्यायचा नसेल तर पुढे वाचू नका.
---

अशी ना तशी - आत्महत्त्याच ती. न पटणारी गोष्ट करावी लागणं. तीही निष्क्रिय शेजार्‍याचा सल्ला ऐकून. जीव गेला काय नि राहिला काय. ही भेदक गोष्ट फार नेमकी पोचवली त्या शेवटानं.
आता गंध आणि फॅक्टरी.

Unknown January 29, 2010 at 8:13 AM  

must watch, heart touching movie showing troubles in farmers life and his culture, struggle...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP