"लव्ह आज कल' -अपुऱ्या पटकथालेखनाचा बळी

>> Friday, August 28, 2009


पटकथा तयार होत असताना, अनेक वेळा पुनर्लेखन केलं जातं. संहितेमधले दोष काढून टाकणं, निवेदनशैली अधिक ओघवती करत नेणं, रचना बंदिस्त करणं, व्यक्तिरेखांमध्ये सर्व प्रकारचे तपशील वाढवत जाणं या सर्वांसाठी पटकथेचे अनेक ड्राफ्ट केले जातात. काम मेहनतीचं असलं, तरी आवश्‍यक असतं. या टप्प्याला घाई करण्यात किंवा फायनल ड्राफ्ट पुरेशा काळजीपूर्वक न पाहण्यात धोका असतो. या वेळी झालेलं दुर्लक्ष पूर्ण चित्रपटावर परिणाम करू शकतं. सैफ अली खानची प्रथम निर्मिती असलेला "लव्ह आज कल' हा अशा अपुऱ्या पटकथालेखनाचा बळी आहे.
"रोमॅंटिक कॉमेडी हा चित्रप्रकार त्या मानानं हुकमी आहे, दर वेळी यात काही ब्रिलिअन्स दाखवणं आवश्‍यक नसतं. नाममात्र कथानक, सहज आवडण्यासारख्या व्यक्तिरेखा, ओळखीचे स्टार्स आणि चलाख संवाद, एवढं भांडवल चित्रपट चालण्यासाठी पुरेसं असतं. एखादं-दुसरं चांगलं गाणं असेल तर सोन्याहून पिवळं.
"लव्ह आज कल'चा मुख्य गोंधळ हा, की तो या माफक अपेक्षांच्या पलीकडे जाऊन काही महत्त्वाकांक्षी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे करताना संकल्पनेचा वेगळेपणा, अन्‌ उत्तम कलादिग्दर्शन / नेपथ्य सोडता, इतर गोष्टी तो पुरेशा मन लावून करत नाही. साहजिकच याचा परिणाम व्हायचा तोच होतो.
चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना तशी हाय कॉन्सेप्ट आहे. म्हणजे चाळीसेक वर्षांपूर्वी आणि आज घडणाऱ्या प्रेमकथांमधला फरक शोधण्याचा हा प्रयत्न आहे. पारंपरिक प्रेमाचा हळुवारपणा, त्यात मनं जुळण्याला असलेलं महत्त्व लग्नसंबंधाला असणारं सर्वोच्च स्थान, अन्‌ तरुण जोडप्याचा त्याकडे पायरी-पायरीनं होणारा प्रवास इथं एका कथानकात आहे. दुसरी कथा आहे आजची, जिथं मनापेक्षा अधिक महत्त्व शरीरांना आहे, आणि जन्मोजन्मीच्या नात्यांवर कोणाचाच विश्‍वास नाही. तुलनेतून शेवटी प्रेमाचं स्वरूप वरवरच्या बदलांपलीकडे जाऊनही कसं बदललेलं नाही, हे दाखवण्याचा दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा प्रयत्न आहे.
हा प्रयत्न पुरा करण्यासाठी त्यांच्याकडे सैफ अन्‌ दीपिका पदुकोणसारखे स्टार्स आहेत; भलंथोरलं बजेट आहे, पुरान्या जमान्यातल्या दिल्लीपासून आजच्या लंडन आणि सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाण्याची मुभा आहे, उत्तम निर्मितीमूल्यांची मदत आहे. नाही आहे ती योग्य रीतीने बांधलेली पटण्यासारखी संहिता.
इथं आजच्या काळातलं जोडपं आहे ते जय (सैफ अलीखान) आणि मीरा (दीपिका पदुकोण). लंडनमध्ये ते एकमेकांबरोबर "स्टेडी' आहेत. एकमेकांवर त्यांचं प्रेम आहे का, हा मुद्दा गौण आहे. कारण चित्रपटाच्या शेवटाशिवाय त्यावर भाष्य होणार नाही. जयला अमेरिकेत करिअर करण्याची महत्त्वाकांक्षा आहे, तर मीराला रेस्टोअरेशनच्या कामासाठी भारतात परतायचंय. अशी "लॉंग डिस्टन्स' प्रेमं यशस्वी होत नाहीतशी खात्री असल्यानं, तसा प्रयत्नही ते (खरं तर तो) करू इच्छित नाहीत. वेगळं होण्याचा निर्णय साजरा करण्यासाठी दिलेल्या पार्टीत त्याची गाठ पडते, ती वीरसिंगशी (वर्तमानात ऋषी कपूर, भूतकाळात पुन्हा सैफ) वीरसिंगला जयकडे पाहून आपला भूतकाळ आठवतो. आणि तो आपल्या अन्‌ हरलीन कौरच्या (ब्राझीलिअन मॉडेल जिजेल मोन्तेरो) प्रेमाची गोष्ट जयला सांगायला सुरवात करतो. पुढचा संपूर्ण चित्रपट हा जय आणि वीरु (ही नावं अशी का असावी याचा चित्रपट कोणतंही स्पष्टीकरण येत नाही. बहुतेक वेळा जे इन जोक्‍स असतात, त्यांना काहीतरी संदर्भ असतो, इथल्या कोणाचाही शोलेशी काही संबंध असलाच, तर तो मला माहीत नाही. कथेच्या दृष्टीनेही त्या अन्‌ या चित्रपटात साम्य नाही) याच्या गोष्टी आळीपाळीने दाखवत राहतो, त्यांच्या त्यांच्या अपेक्षित शेवटापर्यंत.
संहितेवर अजून काम करण्याची गरज असल्याचं माझं म्हणणं आहे, त्याचं कारण आहे कोणत्याही चित्रपटाची कथा सहज उलगडायला हवी असेल, अन्‌ प्रेक्षकांना पटायला हवी असेल, तर तिच्यामध्ये येणाऱ्या घटनांना एक अपरिहार्यता येणं, तिचं स्वतःचं एक तर्कशास्त्र तयार होणं आवश्‍यक असतं. मग चित्रपट कमर्शिअल धर्तीवर असेल, आर्ट फिल्म असेल वा आणखी काही. त्यामुळे फरक पडत नाही. प्रेक्षकाला जर चित्रपट कोणत्या लॉजिकचा आधार घेतो आहे हे लक्षातच आलं नाही, तर तो त्याचं मनातल्या मनात वर्गीकरण करून आपल्या अपेक्षा ठरवू शकत नाही अन्‌ मग गोंधळात पडत राहतो. "लव्ह आज कल'मध्ये थोडं असंच होतं. त्याला मुळात रोमॅंटिक कॉमेडीने घातलेले अलिखित नियम मान्य आहेत, की त्यापलीकडे जाऊन काही अधिक वास्तव कल्पना मांडण्याचा त्याचा विचार आहे, हे स्पष्ट होत नाही.
पटकथेचा उलगडा ज्या सुलिखित टप्प्यांनी होणं आवश्‍यक आहे, तो होताना दिसत नाही. उदाहरणार्थ चित्रपट जय अन्‌ मीरापासून सुरू होतो. वीरसिंग आपली कथा सांगायला घेईपर्यंत त्याच्या भूतकाळाशी आपला काहीच संबंध नाही, मग पहिल्या श्रेयनामावलीदरम्यान आपल्याला तरुण वीरसिंग का दाखवला जावा? शिवाय पुढे ऋषी कपूरने मी तुझ्याचसारखा होतो असं सैफला म्हटल्यावर सैफनं तरुण वीरसिंगची भूमिका करण्यात थोडा तरी मुद्दा आहे, कारण मग आपण दिसण्यातलं साम्य गंभीरपणे न घेता प्रतीकात्मक समजू शकतो. (नाहीतर या दोन पूर्णपणे वेगळ्या भूमिका एका कलाकाराने का कराव्यात?) पण जेव्हा श्रेयनामावलीत जुना सैफ दिसतो, तेव्हा रूपातलं साम्य हे प्रतिकात्मक उरत नाही.
व्यक्तिरेखा किंवा इतर काहीच तपशिलात न उतरणं, ही एका मोठीच अडचण ! चांगल्या पटकथा अन्‌ पर्यायाने चांगले चित्रपट मोजक्‍या प्रसंगात प्रमुख, दुय्यम आणि इतर भूमिका फार स्वच्छपणे उभ्या करताना दिसतात. हल्लीचीच काही उदाहरणं घ्यायची, तर "लक बाय चान्स' किंवा "गुलाल'सारख्या चित्रपटांकडे पाहता येईल. मधूर भांडारकरचे उद्योगविषयक चित्रपट किंवा बराच फापटपसारा असणारे करण जोहरपटही व्यक्तिरेखा अचूक आणि थोडक्‍यात उभ्या करताना दिसतात. "लव्ह आज कल' या बाबतीत काठावरही पास होत नाही. इथं त्यातल्या त्यात जय आणि काही प्रमाणात मीरा उभे राहतात, वीरसिंगची पूर्ण कथाच दिसायला देखणी असून, ठाम उभी राहत नाही. हरलीनचं वीरवर नक्की का प्रेम बसलं कळत नाही. तिच्या घरच्या व्यक्तिरेखा ठळक होत नाहीत. कोणाच्याच वागण्याचं धड स्पष्टीकरण मिळत नाही. मीराचा दुसरा नायक राहुल खन्नासारख्या चांगल्या नटाने रंगवूनही त्याच्या वागण्यामागच्या प्रेरणा दिसत नाहीत. जयची सॅनफ्रान्सिस्कोमधली गोल्डन गेट इन्कॉर्पोरेटेड आणि एका गाण्यात गुंडाळलेली त्याची नोकरी, हा तर फारच विनोदी प्रकार आहे. कोणताही दिग्दर्शक व्यक्तिरेखांच्या आयुष्याचा महत्त्वाच्या कालावधीतच किती बेपर्वा असू शकतो, हे पाहण्याची ही उत्तम संधी आहे. होतकरू दिग्दर्शकांनी चुकवू नये. अभिनयाबद्दल लिहिणं मी सामान्यतः टाळतो. कारण बहुतेक जण त्यावर लिहितात, अन्‌ बहुधा त्यात लिहिण्याजोगं फार काही नसतंही. इथं मात्र नायिकांचा अभिनय हा खासच निराशाजनक आहे. दीपिका पदुकोण आपले संवाद समजून न घेता बोलते, आणि "ओम शांती ओम'पासून चालत आलेली काही ठराविक न्यूट्रल आणि हायपर एक्‍स्प्रेशन देते. हरलीन आणि जो या भूमिका तर अशक्‍य आहेत.. ना त्या नीट लिहिल्या गेल्या आहेत, ना त्या नट्यांना त्या जिवंत करता आल्यात. अभिनेत्रींऐवजी तीन मॉडेल्स घेण्यानं काय परिस्थिती उद्‌भवते हे पाहायलाच हवं. होतकरू दिग्दर्शकांनो, प्लीज नोट !
टु बी फेअर, मी एवढंच म्हणेन, की याहून अधिक वाईट चित्रपट मी पाहिले आहेत, चित्रपट काही मर्यादित प्रमाणात (फार विचार करून डोक्‍याचा भुगा करून न घेतल्यास) करमणूक करतो. मात्र वेळोवेळी (खास करून गंभीर प्रसंगात) हसण्याचा मोह अनावर होण्याची शक्‍यता. तो टाळला तर सहनीय. दिग्दर्शक - निर्मात्यांनी पुढच्या खेपेस अधिक जागरुकपणे संहितेकडे लक्ष दिल्यास उपकार होतील, समीक्षकांवरही अन्‌ प्रेक्षकांवरही.
-गणेश मतकरी

2 comments:

Globe Treader™ - © Kiran Ghag August 31, 2009 at 9:12 PM  

Came across this post through Neelambari's blog follow list.

just wanted to share my post about the song in the movie which I liked...

http://blog.kiranghag.com/2009/08/ajj-din-chadeya.html

Kiran Ghag

Ashish July 17, 2011 at 12:50 PM  

गणेश,
मला हा सिनेमा फार आवडला. समीक्षकांच्या दृष्टीने असतील त्रुटी. इम्तियाझ अलीचे सर्वच सिनेमे खूपच बघणीय आणि श्रवणीय आहेत इथेच अर्धे "पैसे वसूल" होतात.
आणि "मै क्या हू" या गाण्याबद्दल तुमच्या मताशी मी अजिबात सहमत नाही. हा सिनेमा उलट या गाण्यामुळे वेगळा आहे.
बॉलीवूड च्या सिनेमाबद्दल माझी एक तक्रार असते कि काळ दाखवणे त्यांना जमत नाही. २-३ तासांचे चित्रपट असूनही काळ पुढे सरकतोय अशी जाणीव फार कमी आणि न झालीच तरी न पटणारी असते.
_______इम्तियाझ अली त्याला अपवाद आहे. हा माणूस पहिल्यांदा काळ व्यवस्थित दाखवू शकला. एका पाच मिनिटाच्या गाण्यात तो बरेच काही सांगून जातो. सिनेमात एक वर्ष निघून जाते आणि प्रेक्षकांच्या मनातही. असंच प्रयोग त्याने "जब वी मेट" मधल्या "आओगे जब तुम वो साजना" च्या गाण्यात केलं, पण हे गाणं सुंदर असलं तरी "मै क्या हू" चा परिणाम साधत नाही.
______(हा काळाचा निखालस इफेक्ट- "अप" मधले कार्ल आणि एल्लीचे सरलेले आयुष्य ५ मिनिटात दाखवणे हा चमत्कार)

वरच्या किरणचे आभार, मलापण हे गाणे फार आवडते, आणि विशेष करून हे कडवे..

"मांगा जो मेरा है, जाता क्या तेरा है.."

देवाकडे हतबल याचका सारखे जाण्यापेक्षा आपल्या प्रेमाचे अडथळे दूर करायचा बालकाप्रमाणे हट्ट.. काय पॅशनेट प्रेमी आहे तो..

अगदी आपल्या मल्हारवारी सारखे.. "मल्हारवारी मोतीयानं द्यावी भरून नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून.."

आपल्याला काय हवं याची पूर्ण जाणीव आणि त्याची मालकी (ownership) ची (अभावाची नव्हे) भावना आधीच असली तर देवाची नाही म्हणायची काय बिशाद? :)

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP