"लव्ह आज कल' -अपुऱ्या पटकथालेखनाचा बळी

>> Friday, August 28, 2009


पटकथा तयार होत असताना, अनेक वेळा पुनर्लेखन केलं जातं. संहितेमधले दोष काढून टाकणं, निवेदनशैली अधिक ओघवती करत नेणं, रचना बंदिस्त करणं, व्यक्तिरेखांमध्ये सर्व प्रकारचे तपशील वाढवत जाणं या सर्वांसाठी पटकथेचे अनेक ड्राफ्ट केले जातात. काम मेहनतीचं असलं, तरी आवश्‍यक असतं. या टप्प्याला घाई करण्यात किंवा फायनल ड्राफ्ट पुरेशा काळजीपूर्वक न पाहण्यात धोका असतो. या वेळी झालेलं दुर्लक्ष पूर्ण चित्रपटावर परिणाम करू शकतं. सैफ अली खानची प्रथम निर्मिती असलेला "लव्ह आज कल' हा अशा अपुऱ्या पटकथालेखनाचा बळी आहे.
"रोमॅंटिक कॉमेडी हा चित्रप्रकार त्या मानानं हुकमी आहे, दर वेळी यात काही ब्रिलिअन्स दाखवणं आवश्‍यक नसतं. नाममात्र कथानक, सहज आवडण्यासारख्या व्यक्तिरेखा, ओळखीचे स्टार्स आणि चलाख संवाद, एवढं भांडवल चित्रपट चालण्यासाठी पुरेसं असतं. एखादं-दुसरं चांगलं गाणं असेल तर सोन्याहून पिवळं.
"लव्ह आज कल'चा मुख्य गोंधळ हा, की तो या माफक अपेक्षांच्या पलीकडे जाऊन काही महत्त्वाकांक्षी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे करताना संकल्पनेचा वेगळेपणा, अन्‌ उत्तम कलादिग्दर्शन / नेपथ्य सोडता, इतर गोष्टी तो पुरेशा मन लावून करत नाही. साहजिकच याचा परिणाम व्हायचा तोच होतो.
चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना तशी हाय कॉन्सेप्ट आहे. म्हणजे चाळीसेक वर्षांपूर्वी आणि आज घडणाऱ्या प्रेमकथांमधला फरक शोधण्याचा हा प्रयत्न आहे. पारंपरिक प्रेमाचा हळुवारपणा, त्यात मनं जुळण्याला असलेलं महत्त्व लग्नसंबंधाला असणारं सर्वोच्च स्थान, अन्‌ तरुण जोडप्याचा त्याकडे पायरी-पायरीनं होणारा प्रवास इथं एका कथानकात आहे. दुसरी कथा आहे आजची, जिथं मनापेक्षा अधिक महत्त्व शरीरांना आहे, आणि जन्मोजन्मीच्या नात्यांवर कोणाचाच विश्‍वास नाही. तुलनेतून शेवटी प्रेमाचं स्वरूप वरवरच्या बदलांपलीकडे जाऊनही कसं बदललेलं नाही, हे दाखवण्याचा दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा प्रयत्न आहे.
हा प्रयत्न पुरा करण्यासाठी त्यांच्याकडे सैफ अन्‌ दीपिका पदुकोणसारखे स्टार्स आहेत; भलंथोरलं बजेट आहे, पुरान्या जमान्यातल्या दिल्लीपासून आजच्या लंडन आणि सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाण्याची मुभा आहे, उत्तम निर्मितीमूल्यांची मदत आहे. नाही आहे ती योग्य रीतीने बांधलेली पटण्यासारखी संहिता.
इथं आजच्या काळातलं जोडपं आहे ते जय (सैफ अलीखान) आणि मीरा (दीपिका पदुकोण). लंडनमध्ये ते एकमेकांबरोबर "स्टेडी' आहेत. एकमेकांवर त्यांचं प्रेम आहे का, हा मुद्दा गौण आहे. कारण चित्रपटाच्या शेवटाशिवाय त्यावर भाष्य होणार नाही. जयला अमेरिकेत करिअर करण्याची महत्त्वाकांक्षा आहे, तर मीराला रेस्टोअरेशनच्या कामासाठी भारतात परतायचंय. अशी "लॉंग डिस्टन्स' प्रेमं यशस्वी होत नाहीतशी खात्री असल्यानं, तसा प्रयत्नही ते (खरं तर तो) करू इच्छित नाहीत. वेगळं होण्याचा निर्णय साजरा करण्यासाठी दिलेल्या पार्टीत त्याची गाठ पडते, ती वीरसिंगशी (वर्तमानात ऋषी कपूर, भूतकाळात पुन्हा सैफ) वीरसिंगला जयकडे पाहून आपला भूतकाळ आठवतो. आणि तो आपल्या अन्‌ हरलीन कौरच्या (ब्राझीलिअन मॉडेल जिजेल मोन्तेरो) प्रेमाची गोष्ट जयला सांगायला सुरवात करतो. पुढचा संपूर्ण चित्रपट हा जय आणि वीरु (ही नावं अशी का असावी याचा चित्रपट कोणतंही स्पष्टीकरण येत नाही. बहुतेक वेळा जे इन जोक्‍स असतात, त्यांना काहीतरी संदर्भ असतो, इथल्या कोणाचाही शोलेशी काही संबंध असलाच, तर तो मला माहीत नाही. कथेच्या दृष्टीनेही त्या अन्‌ या चित्रपटात साम्य नाही) याच्या गोष्टी आळीपाळीने दाखवत राहतो, त्यांच्या त्यांच्या अपेक्षित शेवटापर्यंत.
संहितेवर अजून काम करण्याची गरज असल्याचं माझं म्हणणं आहे, त्याचं कारण आहे कोणत्याही चित्रपटाची कथा सहज उलगडायला हवी असेल, अन्‌ प्रेक्षकांना पटायला हवी असेल, तर तिच्यामध्ये येणाऱ्या घटनांना एक अपरिहार्यता येणं, तिचं स्वतःचं एक तर्कशास्त्र तयार होणं आवश्‍यक असतं. मग चित्रपट कमर्शिअल धर्तीवर असेल, आर्ट फिल्म असेल वा आणखी काही. त्यामुळे फरक पडत नाही. प्रेक्षकाला जर चित्रपट कोणत्या लॉजिकचा आधार घेतो आहे हे लक्षातच आलं नाही, तर तो त्याचं मनातल्या मनात वर्गीकरण करून आपल्या अपेक्षा ठरवू शकत नाही अन्‌ मग गोंधळात पडत राहतो. "लव्ह आज कल'मध्ये थोडं असंच होतं. त्याला मुळात रोमॅंटिक कॉमेडीने घातलेले अलिखित नियम मान्य आहेत, की त्यापलीकडे जाऊन काही अधिक वास्तव कल्पना मांडण्याचा त्याचा विचार आहे, हे स्पष्ट होत नाही.
पटकथेचा उलगडा ज्या सुलिखित टप्प्यांनी होणं आवश्‍यक आहे, तो होताना दिसत नाही. उदाहरणार्थ चित्रपट जय अन्‌ मीरापासून सुरू होतो. वीरसिंग आपली कथा सांगायला घेईपर्यंत त्याच्या भूतकाळाशी आपला काहीच संबंध नाही, मग पहिल्या श्रेयनामावलीदरम्यान आपल्याला तरुण वीरसिंग का दाखवला जावा? शिवाय पुढे ऋषी कपूरने मी तुझ्याचसारखा होतो असं सैफला म्हटल्यावर सैफनं तरुण वीरसिंगची भूमिका करण्यात थोडा तरी मुद्दा आहे, कारण मग आपण दिसण्यातलं साम्य गंभीरपणे न घेता प्रतीकात्मक समजू शकतो. (नाहीतर या दोन पूर्णपणे वेगळ्या भूमिका एका कलाकाराने का कराव्यात?) पण जेव्हा श्रेयनामावलीत जुना सैफ दिसतो, तेव्हा रूपातलं साम्य हे प्रतिकात्मक उरत नाही.
व्यक्तिरेखा किंवा इतर काहीच तपशिलात न उतरणं, ही एका मोठीच अडचण ! चांगल्या पटकथा अन्‌ पर्यायाने चांगले चित्रपट मोजक्‍या प्रसंगात प्रमुख, दुय्यम आणि इतर भूमिका फार स्वच्छपणे उभ्या करताना दिसतात. हल्लीचीच काही उदाहरणं घ्यायची, तर "लक बाय चान्स' किंवा "गुलाल'सारख्या चित्रपटांकडे पाहता येईल. मधूर भांडारकरचे उद्योगविषयक चित्रपट किंवा बराच फापटपसारा असणारे करण जोहरपटही व्यक्तिरेखा अचूक आणि थोडक्‍यात उभ्या करताना दिसतात. "लव्ह आज कल' या बाबतीत काठावरही पास होत नाही. इथं त्यातल्या त्यात जय आणि काही प्रमाणात मीरा उभे राहतात, वीरसिंगची पूर्ण कथाच दिसायला देखणी असून, ठाम उभी राहत नाही. हरलीनचं वीरवर नक्की का प्रेम बसलं कळत नाही. तिच्या घरच्या व्यक्तिरेखा ठळक होत नाहीत. कोणाच्याच वागण्याचं धड स्पष्टीकरण मिळत नाही. मीराचा दुसरा नायक राहुल खन्नासारख्या चांगल्या नटाने रंगवूनही त्याच्या वागण्यामागच्या प्रेरणा दिसत नाहीत. जयची सॅनफ्रान्सिस्कोमधली गोल्डन गेट इन्कॉर्पोरेटेड आणि एका गाण्यात गुंडाळलेली त्याची नोकरी, हा तर फारच विनोदी प्रकार आहे. कोणताही दिग्दर्शक व्यक्तिरेखांच्या आयुष्याचा महत्त्वाच्या कालावधीतच किती बेपर्वा असू शकतो, हे पाहण्याची ही उत्तम संधी आहे. होतकरू दिग्दर्शकांनी चुकवू नये. अभिनयाबद्दल लिहिणं मी सामान्यतः टाळतो. कारण बहुतेक जण त्यावर लिहितात, अन्‌ बहुधा त्यात लिहिण्याजोगं फार काही नसतंही. इथं मात्र नायिकांचा अभिनय हा खासच निराशाजनक आहे. दीपिका पदुकोण आपले संवाद समजून न घेता बोलते, आणि "ओम शांती ओम'पासून चालत आलेली काही ठराविक न्यूट्रल आणि हायपर एक्‍स्प्रेशन देते. हरलीन आणि जो या भूमिका तर अशक्‍य आहेत.. ना त्या नीट लिहिल्या गेल्या आहेत, ना त्या नट्यांना त्या जिवंत करता आल्यात. अभिनेत्रींऐवजी तीन मॉडेल्स घेण्यानं काय परिस्थिती उद्‌भवते हे पाहायलाच हवं. होतकरू दिग्दर्शकांनो, प्लीज नोट !
टु बी फेअर, मी एवढंच म्हणेन, की याहून अधिक वाईट चित्रपट मी पाहिले आहेत, चित्रपट काही मर्यादित प्रमाणात (फार विचार करून डोक्‍याचा भुगा करून न घेतल्यास) करमणूक करतो. मात्र वेळोवेळी (खास करून गंभीर प्रसंगात) हसण्याचा मोह अनावर होण्याची शक्‍यता. तो टाळला तर सहनीय. दिग्दर्शक - निर्मात्यांनी पुढच्या खेपेस अधिक जागरुकपणे संहितेकडे लक्ष दिल्यास उपकार होतील, समीक्षकांवरही अन्‌ प्रेक्षकांवरही.
-गणेश मतकरी

Read more...

वेकिंग लाइफ- स्वप्नजगत

>> Wednesday, August 26, 2009



रिचर्ड लिन्कलेटरच्या बीफोर सनराइझ चित्रपटातील सेलीन ही नायिका म्हणते की, कधी कधी मला वाटतं, म्ही म्हातारी झाली आहे आणि मला माझे तरुणपणाचे दिवस आठवताहेत. माझं आजचं जगणं वास्तवातलं नसून मी त्या आठवणींचाच एक भाग आहे. सेलीन आणि जेसी या बीफोर सनराईझ-बीफोर सनसेटमधल्या प्रमुख व्यक्तिरेखा, त्यांची या कल्पनेवरची चर्चा पुढे चालू ठेवतात ती लिन्कलेटरच्याच वेकिंग लाइफ या चित्रपटातून. इथेही ते आपल्या आयुष्य़ाची तुलना स्वप्नावस्थेशी करतात आणि कदाचित आपला संपूर्ण जन्मच एक स्वप्न असेल अशीही कल्पना करून पाहातात.
या संभाषणाला आणि या विशिष्ट मुद्दयांना वेकिंग लाइफमध्ये फार महत्त्व आहे. कारण आपण पडद्यावर जे पाहतो आहोत त्याचा अर्थ समजून घ्यायला ही चर्चा आपल्याला मदत करते. वेकिंग लाइफ नाव असूनही या चित्रपटाचा जागृतावस्थेशी काहीही संबंध नाही. कारण तो घडतो तो जवळजवळ पूर्णपणे स्वप्नात, आणि हे स्वप्न कुणाचे आहे ते आपल्याला दाखवलं जातं, पण नायकाची (वायली विगिन्स) आपल्याला ओळख करून दिली जात नाही. स्वप्नातही त्याची प्रत्यक्ष भूमिका केवळ श्रोत्याची आहे. संभाषणाची जबाबदारी घेतात ते इतर जण.
हा चित्रपट तीन बाबतीत एरवीच्या चित्रपटांहून संपूर्णपणे वेगळा आहे. पहिली गोष्ट म्हणजे कथेचा पूर्ण अभाव, दुसरी त्याची संवादी रचना आणि तिसरी म्हणजे त्याचं दृश्यरुप.
इथला नायक पाहत असलेलं हे स्वप्न वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते त्याच्या आशयासाठी. त्याचं स्वरूप आहे ते अनेकविध कल्पनांनी भरलेल्या एखाद्या भांडारासारखं. जीवन, तत्त्वज्ञान, संवेदना, प्रेरणा, मृत्यू, लाइफ आफ्टर डेथ, संवाद, विसंवाद, संशोधन, साहित्य अशा अनेक विषयांना तो स्पर्श करतो. नव्याने इथे अनेक व्यक्तिरेखांना भेटतो. त्यांची या सगळ्यांविषयीची मते ऐकतो. ती एकताना त्याला जाणवतं की, या प्रकारचं एका प्रसंगातून दुस-यात फिरणं, ख-या आय़ुष्यात आपल्याला शक्य नाही, म्हणजे कदाचित हे स्वप्न असेल. पण जाणवणं म्हणजे जागं होणं नाही. ते न जमल्याने तो बिचारा स्वप्नातच अडकून पडतो.
वेकिंग लाईफच्या दृश्यशैलीमध्ये बालचित्रपट डोकावतात. लिन्कलेटरने येथे अँनिमेशन तंत्राचा वापर केला आहे. मात्र त्यासाठी केलेले काम हे पूर्णपणे कल्पित नाही. त्याने चित्रपट संपूर्ण चित्रित करून त्याला संगणकात आणून मग अँनिमेटर्सना काम करायला मुभा दिलेली आहे. त्यामुळे दिसणारी पात्रं कमी अधिक प्रमाणात कार्टूनसारखी असली तरी परिणाम हा प्रत्यक्ष चित्रण आणि अँनिमेशन यांच्यामधला आहे. स्वप्नाप्रमाणे भासमय अवस्था तयार करण्याकरीता दिग्दर्शकाने वेगवेगळ्या शैलीचे अँनिमेशन,सतत हालणारी पार्श्वभूमी, रंगसंगतींमध्ये प्रयोग यांसारख्या क्लृप्त्या प्रभावीपणे वापरल्या आहेत.
असं ऐकलंय की, कान महोत्सवात जेव्हा वेकिंग लाइफ दाखविला गेला, तेव्हा दिग्दर्शक रिचर्ड लिन्कलेटर उपस्थित होता. चित्रपट प्रदर्शित करण्याआधी त्याने जाहीर विचारणा केली, की प्रेक्षकांमधील कोणी ड्रग्जघेतले आहे का ? काही हात वर झाले. त्यावर लिन्कलेटरने सांगितले की चित्रपट तुमच्यासाठीच आहे. इतर प्रेक्षकांनी कृपया समजून घ्यावा.
भासमय अवस्थेचं हे विचारप्रवर्तक उल्लेखनीय उदाहरण केवळ दृश्यात्मकतेसाठीच नाही. दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनासाठी, त्यातल्या विचारमालिकेसाठी आणि माध्यमाला बहाल झालेल्या स्वातंत्र्यासाठीदेखील. असं म्हणता येईल की, हा प्रयोग लिन्कलेटरच्या पुढल्या चित्रपटाची पूर्वतयारी म्हणून बनवण्यात आला. प्रसिद्ध कथालेखक फिलिप के डीक यांच्या कादंबरीवर आधारित ए स्कॅनर डार्कलीसाठी त्याला हीच अँनिमेशन शैली वापरायची होती. आणि त्या आधी मेन स्ट्रीम निर्मितीमध्ये ट्रायल-एरर करून पाहाण्यापेक्षा ते एखाद्या लो बजेट आर्ट फिल्ममध्ये करणे केव्हाही अधिक चांगले होते. पण त्यामुळे वेकिंग लाइफचं महत्त्व कमी होत नाही. केवळ या चित्रपटासंदर्भात पाहिले तर हा महत्त्वकांक्षी आणि चपखल प्रयोग आहे. निवेदनाचा सूर आणि शैली एकरूप झाल्याचे याहून चांगले उदाहरण नसेल.
-गणेश मतकरी

Read more...

गाभ्रीचा पाऊस

>> Thursday, August 13, 2009


चांगल्या ग्रामीण समांतर चित्रपटाशी नातं सांगणारा चित्रपट म्हणजे "गाभ्रीचा पाऊस.' उपहासात्मक विनोद ही या चित्रपटाची वेगळी बाजू. विचारप्रवृत्त करणारा सूर, दिग्दर्शकाची उत्तम कामगिरी, उत्कृष्ट अभिनय आणि फोटोग्राफी हे सगळंच कौतुक करण्यासारखं.

हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी चांगलं आहे. गेली काही वर्षं मराठी सिनेमा सुधारण्याच्या अफवा जरूर आहेत; मात्र, क्वचित एखादा वेगळा प्रयत्न सोडता, खरोखर उत्तम म्हणावी, तीही केवळ समीक्षकांच्या किंवा केवळ प्रेक्षकांच्या पसंतीला न उतरता आवडू शकेल, अशी निर्मिती फारच दुर्मिळ होती. या वर्षी मात्र, किमान तीन चित्रपट असे आहेत, जे मराठी चित्रपटामध्ये होत चाललेल्या बदलाचा निश्‍चित पुरावा मानले जाऊ शकतील. हे तीनही चित्रपट त्यांच्या दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. प्रेक्षकाला अमुक आवडतं, तेच दाखवावं, अशी मनाशी अन्‌ त्यांच्या माध्यमाशी तडजोड न करता धीटपणे पडद्यावर आलेल्या या कलाकृती आहेत. त्या आशयघन आहेत. केवळ घटकाभर करमणूक इतक्‍या मर्यादित हेतूवर त्यांचा डोलारा रचलेला नाही. या दिग्दर्शकांतल्या दोघांचे हे पहिलेच प्रयत्न असूनही त्यांची माध्यमावरची पकड अन्‌ तांत्रिक सफाई लक्षात येण्याजोगी आहे. गेला बराच काळ मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाशी एक तडजोड केलेली आहे. विनोद आणि मेलोड्रामा या दोनच विभागांत मराठी सिनेमा बनू शकतो; अन्‌ यातल्या कोणत्याही एका विभागात जो थोड्याफार प्रमाणात यशस्वी होईल, त्याला चांगलं म्हणावं, असा एक समज रूढ झालेला आहे. (इथली यशस्वी शब्दाची व्याख्यादेखील खूपच फ्लेक्‍झिबल आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.) मी ज्या तीन चित्रपटांविषयी बोलतो आहे, त्यांतल्या एकातही या प्रकारची तडजोड आवश्‍यक वाटली नाही. हे चित्रपट म्हणजे परेश मोकाशीचा "हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी', सचिन कुंडलकरचा "गंध' आणि सतीश मनवरचा "गाभ्रीचा पाऊस.'
यातला "गाभ्रीचा पाऊस' मी नुकताच पाहिला. पुण्याच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिकविजेता ठरल्यापासूनच तो चर्चेत होता. पुढे जगभरात अनेक महोत्सवांमध्ये त्याने वर्णी लावल्याचं अन्‌ कौतुकपात्र ठरल्याचंही ऐकून होतो. पाहण्याचा योग मात्र आला, तो हल्लीच. त्याच्या नावाबद्दलचा गैरसमजही तेव्हाच दूर झाला. तोपर्यंत "मृगाचा पाऊस' सारखं हे एखादं पावसाचं विशेषण असल्याचं वाटलं होतं. "गाभ्रीचा' ही पावसाला हासडलेली शिवी असल्याचं मात्र, तो पाहिला तेव्हाच कळून चुकलं.
हा चित्रपट भारतात 1955 च्या पथेर पांचालीपासून चालत आलेल्या चांगल्या ग्रामीण समांतर चित्रपटाशी नातं सांगतो, तरी सत्यजित राय यांनी बनवलेला "पथेर पांचाली' हा तेव्हाच्या भारतीय व्यावसायिक चित्रपटांमध्ये न दिसलेलं काही मांडण्याचा प्रयत्न होता. तो मांडताना त्यांनी घेतलेला विषय अस्सल भारतीय होता. मात्र, त्यांची दृष्टी ही युनिव्हर्सल होती. व्यावसायिक चित्रपटांचे संस्कार न होता, कायम जागतिक चित्रपट पाहिलेल्या राय यांनी तेच संस्कार आपल्या चित्रपटात वापरले आणि एक वेगळा चित्रपट तयार झाला. त्यानंतर व्यावसायिक चौकटीबाहेर काम करणाऱ्या अनेक दिग्दर्शकांनी हाच मार्ग स्वीकारला. "गाभ्रीचा पाऊस' हे या मार्गावरलंच आजचं पाऊल आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गेल्या काही वर्षांमधला आपल्याकडला ज्वलंत प्रश्‍न आहे. आपल्यासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना ज्या हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, ती निश्‍चितच आपल्या राज्यकर्त्यांना लांच्छनास्पद आहे. सरकारने पावसाची अनिश्‍चितता अधिक प्रमाणात असणाऱ्या प्रदेशांमध्ये शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचे अन्य मार्ग विकसित करण्याकडे केलेलं पूर्ण दुर्लक्ष, शेतकऱ्यांना शेती सोडून इतर उद्योग करण्यासारखे दिलेले सल्ले आणि माफक कर्जमाफीसारखी वरवरची मदत, यांमुळे ही परिस्थिती अधिकच बिघडलेली आहे. हवामानाची अस्थिरता, सरकारचं दुर्लक्ष आणि एकजुटीचा अभाव यांमुळे शेतकरी आज ज्या अवस्थेत पोचला आहे, त्या अवस्थेकडे "गाभ्रीचा पाऊस' एक बोचरी नजर टाकतो.
चित्रपट सुरू होतो, तोच एका आत्महत्येपासून. किस्नाच्या (गिरीश कुलकर्णी) शेजारी राहणाऱ्या एका शेतकऱ्यानं निराशेपोटी ही आत्महत्या केलेली असते. ही घटना गावकऱ्यांना नवीन नसते. पण परिस्थितीचं गांभीर्य नव्यानं जाणवून देणारी किस्नाची पत्नी अलका (सोनाली कुलकर्णी) आणि किस्नाची आई (ज्योती सुभाष) यांना ते लगेचच जाणवतं. अलकाला आपल्या नवऱ्यातही ही निराशावादी दृष्टी, असुरक्षिततेची जाणीव दिसायला लागते आणि या दोघी ठरवतात, की किसननं भलतं पाऊल उचलू नये, यासाठी सतत त्याच्यावर नजर ठेवायची. या कामी ताबडतोब नेमणूक केली जाते, ती छोट्या दिनूची (अमन अत्तार). दिनू आपल्या बापाचा माग ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण लवकरच हा प्रयत्न लक्षात येऊन किस्ना अधिकच वैतागतो. वर प्रत्यक्ष अडचणी कमी नसतात. पावसाची काही शाश्‍वती नसते. कर्ज दर वर्षी वाढत असतंच.
तरी किस्ना स्वतः निराशावादी नसतो. शक्‍य तितका या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा, हे त्यानं ठरवलेलं असतं. चालू वर्षातही तो सगळी तयारी करतो, पेरणी करतो; मात्र मोक्‍याला पाऊस येत नाही. आदल्या दोन वर्षांप्रमाणेच वर्ष कोरडं जाणार, असंच दिसायला लागतं. पहिली पेरणी फुकट जाते. पुन्हा ती करायची तर पैशांची अडचण. मग दागिने गहाण ठेवले जातात. शेतीचा जुगार रंगायला लागतो. किस्ना अगदीच निराशेच्या काठावर असताना पाऊस येतो. मात्र, जो येतो, तो थांबायचं नाव काढत नाही, पडतच राहतो. परिस्थिती सुधारण्याची चिन्हं दिसत नाहीत. आधी अडचण असते, ती पाऊस पडत नाही ही, तर आता त्याचं पडत राहणं, हेच शेतकऱ्यांच्या जिवावर उठणार असतं.
"गाभ्रीचा पाऊस'ची सर्वांत वेगळी बाजू म्हणजे, त्यातला उपहासात्मक विनोद. हा विनोद संपूर्ण संहितेत सतत आहे आणि तो शेतकऱ्यांच्या आयुष्यातल्या भीषण वास्तवातल्या विसंगतीवर बोट ठेवत जातो. या सर्व जागांना एक प्रकारच्या युक्तिवादाचं स्वरूप आहे. त्या आपल्याला जे हसू आणतात, ते प्रसन्न म्हणता येणार नाही. उलट त्याला एक असहायतेची दुहेरी झालर आहे. पहिली असहायता आहे, ती या व्यक्तिरेखांची- ज्या आपल्या परिस्थितीवर मात करू शकत नाहीत; तर दुसरी आहे आपली स्वतःची, कारण आपण ही परिस्थिती खरं तर जाणून आहोत. त्यातला निसर्गाचा भाग सोडता, जे राजकारण या परिस्थितीला जबाबदार आहे, तेदेखील आपल्याला माहीत आहे. मात्र, आपणही ते बदलायला असमर्थ आहोत. उदाहरणादाखल आत्महत्या केलेला शेतकरी अन्‌ किस्ना यांच्यातल्या तुलनेनं अलकाचं अस्वस्थ होत जाणं, परिस्थिती अधिकाधिक बिघडत असताना घरी केलेल्या गोडधोड पदार्थांमागचं स्पष्टीकरण, किस्नाजवळच्या शेतातल्या निरुद्योगी शेतकऱ्यानं रिकामा शेतकरी हा कामसू शेतकऱ्यापेक्षा नफ्यात कसा, हे उलगडून दाखवणं, अशा कितीतरी जागा दाखवता येतील. या जागा काही विनोदासाठी तयार करण्यात आलेल्या नाहीत, तर आजचं आपलं वास्तवच किती विक्षिप्त, अनाकलनीय आहे, याची आपल्याला जाणीव करून देण्याचा त्याचा हेतू आहे. हा विनोद आपल्या तोंडात एक कडवट चव मागे सोडतो, त्यामागेही हेच कारण आहे.
शेतकऱ्यांच्या आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य किती दूर आहे, अन्‌ आधुनिकतेचा त्यांच्यापर्यंत पोचणारा कवडसा किती पुसट, वरवरचा अन्‌ निरर्थक आहे, हे चित्रपटात वेळोवेळी दिसून येतं. गावकऱ्यांच्या क्वचित तोंडात येणारे इंग्रजी शब्द, पैसे कर्जाऊ देणाऱ्या सावकाराचं मोबाईल गेम खेळत राहणं, कुठल्याशा रेडिओवर लागलेली रेडिओ मिरचीची अर्थहीन बडबड ही त्याची शहरी आधुनिकतेची ओळख, आपल्या तथाकथित प्रगतीशी आलेला त्यांचा थोडका संबंध, ना त्यांच्या कामी येणारा, ना त्यांची परिस्थिती आपल्यापर्यंत आणून पोचवणारा.
"गाभ्रीचा पाऊस'ने लावलेला आपल्याला विचार करायला भाग पाडणारा सूर, दिग्दर्शकाची पहिलीच महत्त्वाकांक्षी कामगिरी, गावचं वातावरण अचूक पकडणारी सुधीर पलसानेंची फोटोग्राफी, पट्टीच्या अन्‌ नवशिक्‍या सर्वांचाच अभिनय हे सगळंच इथं कौतुक करण्याजोगं आहे. मात्र, मला खटकला (आणि चांगलाच खटकला) तो शेवट. तो काय होता, हे मात्र अर्थातच सांगणार नाही. मात्र, मला तो पटला नाही. त्यामुळे सामाजिक नजरेतून तर निराशावादी विचार पुढे गेलाच, वर व्यक्तिरेखेच्या दृष्टीनंही तो न्याय्य वाटला नाही. तो हवा तितका स्पष्ट नव्हता, असंही काही प्रेक्षकांचं मत ऐकताना वाटून गेलं. तो तसा असेलसं अपेक्षित होतं; मात्र, त्याला जी अपरिहार्यता यायला हवी होती, ती आली असं दिसलं नाही. तरीही शेवटाचा राग पूर्ण चित्रपटावर काढणं योग्य होणार नाही. चित्रपट मला आवडला. शेवटाकडे मी दुर्लक्ष करेन.
"हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी', "गंध' अन्‌ "गाभ्रीचा पाऊस' या तिन्ही चित्रपटांमधून मराठी चित्रपटाची आजची तयारी दिसून येते. मात्र, ही झाली कलाविष्काराच्या पातळीवरची तयारी. वितरणाबाबत किंवा सर्व प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्याबाबत काही प्रश्‍न अजूनही आहेत. त्यांची उत्तरं इतक्‍यात मिळतीलसं नाही. आणि ती मिळेपर्यंत तरी अर्थपूर्ण मराठी चित्रपटाचा पाठपुरावा करणाऱ्या चित्रकर्त्यांची स्थिती ही (आपल्या शेतकऱ्यांइतकी नसली तरी) बिकटच म्हणावी लागेल.
- गणेश मतकरी

Read more...

युद्ध, प्रेम आणि बरंच काही

>> Sunday, August 9, 2009


विन्को बेसाम यांनी दिग्दर्शित केलेल्या "विल नॉट स्टॉप देअर' या चित्रपटात काय आहे विचारण्यापेक्षा काय नाही हे सांगणं कदाचित अधिक सोपं ठरावं. अनेक चित्रप्रकार आणि अनेक विषयांचं हे एक अफलातून मिश्रण आहे.

कार्लोवी वारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मी सहभागी असलेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीच्या ज्युरी मंडळाने विल नॉट स्टॉप देअर' या क्रोएशियन/ सर्बियन चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटांत का केली नाही याला तत्त्वतः अनेक कारणं आहेत. सगळीच कारणं सर्वांना पटतील असं नाही; पण काही निश्‍चित पटतील. स्पर्धांमध्ये अनेकदा वेगवेगळ्या मतांचे, वेगळ्या पार्श्‍वभूमीमधून आलेले लोक या निर्णयप्रक्रियेत सामील असल्याने अनेकदा काही विशिष्ट स्पर्धकांचा बळी गेल्याची उदाहरणं आपण नेहमीच पाहतो.
या चित्रपटाच्या बाबतीत मात्र माझ्या मते तसं झालं नाही. तुलनेनं विजेते स्पर्धक काही ना काही बाबतीत अधिक उजवे नाहीत; परंतु लक्षवेधी जरूर ठरले. परिणामी आम्ही निवडलेल्या तीन चित्रपटांत आम्ही या चित्रपटाची निवड केली नाही. असं असूनही या महोत्सवातल्या सर्वांत आवडलेल्या चित्रपटांविषयी मला जर कोणी विचारलं तर या छोट्याशा यादीत "विल नॉट स्टॉप देअर' जरूर असेल. (विन्को बेसाम यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात काय आहे विचारण्यापेक्षा काय नाही हे सांगणं कदाचित अधिक सोपं ठरावं. अनेक चित्रप्रकार आणि अनेक विषयांचं हे एक अफलातून मिश्रण आहे.)
चित्रपटाची सुरवात एखाद्या विनोदी चित्रपटाला शोभणारी आहे; पण या व्यक्तिरेखा ज्या भेदक राजकीय/ सामाजिक पार्श्‍वभूमीतून पुढे आलेल्या आहेत, त्यांचा पुसटसा निर्देश करणारी, सर्बिया अन्‌ क्रोएशियामध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन्‌ हल्ली संपुष्टात येऊनही विस्मरणात न गेलेल्या युद्धाचा संदर्भ हा इथे महत्त्वाचा आहे; मात्र नक्की किती महत्त्वाचा हे चित्रपट एवढ्यात कळू देणार नाही.
चित्रपटाचा विनोदी बाज टिकवला जातो तो प्रामुख्याने त्यातल्या निवेदकाच्या भूमिकेमुळे. डुरो (प्रेड्राग वुसोविक) हा आहे लो बजेट अश्‍लील चित्रपटात काम करणारा; पण कुटुंबवत्सल अभिनेता. तो सर्बिअन किंवा क्रोएशियन नसल्याने या देशांकडे अन्‌ त्यामुळेच व्यक्तिरेखांकडे त्रयस्थपणे पाहू शकतो. एक दिवस डुरोकडे मार्टिन (इवान हर्सर्ग) हा तरुण निवृत्त सैनिक येतो. त्याला तपास आहे तो डुरोबरोबर "रेड रायडिंग हूड'च्या अश्‍लील आवृत्तीत काम केलेल्या डेसा या सर्बिअन अभिनेत्रीचा (नाडा सार्गिन). डुरो त्याच्या व्यवसायाविषयी अनभिज्ञ पत्नीला मार्टिन आपला नवा मॅनेजर असल्याचं सांगतो अन्‌ त्याला घेऊन आपल्या निर्मात्याची गाठ घेतो. इथे डेसाचा पत्ता तर लागतोच, वर योग्य किमतीला ती विकाऊ असल्याचंही सांगितलं जातं. जगण्याविषयी निरिच्छ अन्‌ सदैव नशेत असलेल्या डेसाला मार्टिन विकत घेतो आणि घरी घेऊन येतो. मूळचाच अबोल मार्टिन डेसाशीही फार बोलत नाही; मात्र तिला चांगलं वागवायला लागतो. एकदा तिला सर्बिआतल्या तिच्या जुन्या घरीही घेऊन जातो.
विनोदी भाग संपून रोमॅंटिक भाग सुरू झाला, तरी प्रेक्षकांनाही मार्टिनच्या हेतूबद्दल डेसाइतकंच कुतूहल असतं; कारण या दोघांची नक्की गाठ कुठे पडली किंवा डेसाला विकत घेण्यासाठी मार्टिननं इतक्‍या सहजपणे पैसे कसे उभे केले, अशा प्रश्‍नांची उत्तरं माहीत नसतात. मग चित्रपट हळूहळू एकेक गोष्ट उघड करायला लागतो. डेसाचं पूर्वीचं आयुष्य, मार्टिनची सरहद्दीवर एका विशिष्ट कामगिरीसाठी असणारी नेमणूक आणि त्याला अतिशय आनंदात असणाऱ्या त्या वेळच्या डेसाचं बंदुकीच्या स्कोपमधून नित्य होणारं दर्शन या सगळ्याला एक आकार यायला लागतो आणि कथेची गुंतागुंत वाढायला लागते.
"विल नॉट स्टॉप देअर'चं प्लॉटिंग ही त्यातली सर्वांत मोठी गंमत आहे. ज्या गतीनं तो चित्रप्रकारांचे रूळ बदलतो, त्याचं सराईत चित्रकर्त्यालाही आश्‍चर्य वाटावं. युद्धाची भेदक पार्श्‍वभूमी, व्यक्तिरेखांच्या भूतकाळाचं रहस्य आणि निवेदकाचा सर्वच घटनांकडे पाहण्याचा निरलस दृष्टिकोन या मात्र चित्रपटातल्या स्थायी गोष्टी आहेत, ज्या सुरवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहतात. प्रत्येकाच्या जीवनातलं पाप- पुण्याचं स्थान आणि पापाचं परिमार्जन करून मोक्ष मिळण्याची शक्‍यता हा विषय चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे, असं म्हणता येईल; मात्र चित्रपटात सतत घडत राहणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतून पडणाऱ्या प्रेक्षकाला त्यात कुठेही उपदेश असल्याचा आभास होण्याची शक्‍यता नाही.
मनोरंजक चित्रपटांमधून गांभीर्याचा आव न आणता सहज केलेलं प्रबोधन हे बऱ्याच वेळा प्रेक्षकांना न जाणवताही त्यांच्या अंतर्मनापर्यंत थेट पोचणारं असतं. त्यामुळे उघड संदेश देणाऱ्या चित्रपटांहून थोडं अधिकच श्रेष्ठ; मात्र या सहजतेला जर सराईतपणाचा वास यायला लागला, तर काही प्रमाणात त्याचा हेतू मागं पडल्यासारखं वाटतं; कारण मग परिचित वाटेला जाणारा चित्रपट प्रेक्षकांच्या अनुभवाला अन्‌ विचारालाही एक मर्यादा घालून देतो. विल नॉट स्टॉप देअरच्या शेवटाकडे काहीसा हा धोका तयार होतो; कारण मग व्यक्तिरेखा स्वतःच मनाला योग्य वाटणारे निर्णय घेणं बंद करून चित्रपटाला सुनिश्‍चित शेवट देण्याच्या तयारीला लागतात. यावर एक शेवटचा उपाय म्हणून दिग्दर्शक कथासूत्र संपल्यावरही चित्रपटाचा अर्धसुखांत शेवट लांबवून पाहतो; मात्र ते काही खरं नाही. हुशार प्रेक्षकांच्या नजरेला नेमका शेवट कोणता हे कळल्याशिवाय राहत नाही; मात्र शेवटाकडच्या काही मिनिटांमुळे मी चित्रपटालाच निकालात काढणार नाही हे निश्‍चित.
या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल दिग्दर्शक ब्रेसान यांच्या काही कल्पना आहेत. त्यातली युद्धाची पार्श्‍वभूमी ही एका परीनं ताजी आहे आणि काही जणांच्या मते आताच या प्रकारचा चित्रपट करणं योग्य नाही. दिग्दर्शक मात्र म्हणतो, की जोपर्यंत जनतेच्या मनावरच्या जखमा भळभळत्या आहेत तोवरच हे विषय मांडणं महत्त्वाचं आहे. त्यातले मुद्दे, आशयाचं गांभीर्य हे या काळातच अधिक जाणवणारं आहे. जेव्हा लोकांना या संघर्षाचा विसर पडेल, ते भावनेच्या आहारी न जाता त्रयस्थपणे हे चित्रपट पाहायला लागतील तेव्हा खरंतर या चित्रपटांची गरजच संपुष्टात येईल. हा दृष्टिकोन 9/11 च्या संहारानंतर पॉल ग्रीन ग्रास (युनायटेड 9-3) किंवा ऑलिव्हर स्टोन (वर्ल्ड ट्रेड सेंटर) यांसारख्या दिग्दर्शकांनी काठाकाठानं न जाता व्यावसायिक चित्रपटांच्या माध्यमातूनच विषयाला थेट तोंड फोडलं त्याची आठवण करून देणारा आहे.
"विल नॉट स्टॉप देअर' आपल्यासाठी म्हणजे "भारतीयांसाठी' अधिकच जवळचा का वाटणारा आहे हे वेगळं सांगायला नकोच. दोन शेजारी देश, त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे चाललेलं युद्ध आणि आलेला कडवटपणा आणि जणू तो विसरण्याचा प्रयत्न करणारी प्रेमकथा ही आपल्याला नक्कीच आपल्या शेजाऱ्यांची आठवण करून देईल यात शंका नाही.
स्पर्धेमध्ये बहुतेक वेळा व्यावसायिक मूल्यं आणि मनोरंजन याला अधिक महत्त्व येणारी निर्मिती ही मागं पडतं आणि अधिक महत्त्वाकांक्षी, अधिक धाडस दाखवणारी किंवा सांकेतिक कथारचनेचा आधार टाळून काही वेगळं करू पाहणारी निर्मितीही पुढे जाते; मात्र स्वतंत्रपणे या निर्मितीदेखील महत्त्वाच्या असू, ठरू शकतात याचं हे एक उदाहरण.
- गणेश मतकरी

Read more...

"हॅंगओव्हर'- अश्‍लील विनोदापलीकडे

>> Wednesday, August 5, 2009


चावट कॉमेडी चित्रपटात दिसणाऱ्या अनेक गोष्टी "हॅंगओव्हर'मध्ये आहेत. मात्र त्या केंद्रस्थानी नाहीत. त्या चित्रपटाचा एक भाग आहेत. मात्र त्यांना विसरून चित्रपटाला अस्तित्व आहे, एक स्वतंत्र दर्जा आहे, हे निश्‍चित.
ट्रेसीचं लग्न पाच तासांवर आलेलं. पण नवरदेव डग आणि त्याच्या मित्रांचा पत्ता नाही. दोन दिवसांपूर्वी बॅचलर पार्टी करायला लास व्हेगसला गेलेली
ही मंडळी अजून परतलेलीच नाहीत. फोन वाजतो. फोनवर डगचा शाळामास्तर मित्र फिल. फिलची अवस्था काही फार बरी नाही. कपडे मळके, ओठातून रक्त येतंय. कुठल्याशा निर्मनुष्य माळावरून तो फोन करतोय. फोन करण्याचा हेतू ट्रेसीला कळवण्याचा, की नवरा मुलगा हरवलाय.
लग्न होईलसं वाटत नाही. दिग्दर्शक टॉड फिलिप्स यांच्या "हॅंगओव्हर' चित्रपटाची ही सुरवात.
प्रेक्षकाला तिथंच गुंतवणारी. चांगली गोष्ट म्हणजे केवळ या चांगल्या सुरवातीतच धन्यता मानून चित्रपट थांबत नाही, तर पुढे शेवटपर्यंत ही
गुंतवणूक शाबूत ठेवतो. मला स्वतःला चावट विनोदावर भर असणाऱ्या कॉमेडीज फार आवडत नाहीत. "देअर इज
समथिंग अबाऊट मेरी' अन्‌ "अमेरिकन पाय' मालिका या प्रचंड लोकप्रिय आहेत आणि त्यांना एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग आहे. मी जाणतो, पण त्यामागचं कारण
काही माझ्या लक्षात आलेलं नाही. बहुतेक वेळा या चित्रपटामध्ये आढळणारा दोष म्हणजे, एकदा का आपल्या विनोदाच्या प्रकारावर अन्‌ हसे मिळवण्यावर
त्याचं लक्ष केंद्रित झालं, की त्यांचा कथानकावरचा ताबा सुटतो आणि चित्रपट आपल्या मुळातच मर्यादित असलेल्या परिणामालाही मुकतो. केवळ
त्यातले विनोद ही त्या चित्रपटांची आठवण उरते. मुळातच कचकड्याच्या असलेल्या त्यातल्या व्यक्तिरेखाही "कॅरीकेचर' या एका शब्दात वर्णन करता
येतात, आणि त्यांचंही त्या करत असणाऱ्या विनोदापलीकडलं असं स्वतंत्र अस्तित्व आकाराला येऊ शकत नाही.
टॉड फिलिप्सचे आधीचे दोन चित्रपट, म्हणजे "ओल्ड स्कूल' आणि "रोड ट्रिप' हे बरेचसे या वर उल्लेखलेल्या चित्रप्रकारात बसणारे होते. "हॅंगओव्हर' या
प्रकारातली बरीच वैशिष्ट्य बाळगूनही त्या प्रकाराच्या मर्यादांवर मात करून दाखवतो. हॅंगओव्हरचा आकार पाहायचा तर हे "रोड मूव्ही' आणि "बडी
मूव्ही' या इतर दोन लोकप्रिय चित्रप्रकारांचं मिश्रण आहे असं म्हणावं लागेल. चित्रपटाचा बराचसा भाग हा यातल्या तीन पात्रांनी केलेला चौथ्याचा
शोध या स्वरूपाचा आहे. या शोधात त्यांना भेटणारे लोक आणि येणारे अनुभव यातून कथानक घडत जातं. मधल्या काळात या तिघांवरही या अनुभवाचा काही एक
परिणाम होतो अन्‌ त्यांच्यामध्ये काही सकारात्मक बदल संभवतो. चित्रपटाचा रचनात्मक आलेख म्हणायचा तर तो एवढाच.
सुरवातीला सांगितल्याप्रमाणे चित्रपट आपल्या विषयाची एक झलक दाखवतो आणि मग दोन दिवस मागे जातो. आता आपल्याला हा हरवणारा नवरदेव डग (जस्टिन
बर्था) प्रत्यक्ष भेटतो. हा आपल्या फिल (ब्रॅडली कूपर) आणि स्ट (एड हेल्मस) या मित्रांबरोबर, आणि ऍलन (झॅक गालिकिआनाकिस) या मेव्हण्याबरोबर
व्हेगासला निघालाय. रात्रभर मजा करून दुसऱ्या दिवशी परतायचा त्यांचा विचार आहे. "सीझर्स पॅलॅस' कसिनोमध्ये एक महागडा सुईट बुक करून सगळे मजा
करायला निघतात, आणि... ...आणि त्याना सकाळी जाग येते. सुईटमध्ये सर्वत्र पसारा झालेला. गोष्टी
फुटलेल्या, फर्निचर अस्ताव्यस्त. एक कोंबडी सर्वत्र फिरतेय. स्टूचा दात पडलेला. बाथरूममध्ये गेलेल्या ऍलनचं स्वागत एक भला थोरला वाघ करतो, आणि
आतल्या खोलीत असतं एक लहान मूल. एव्हाना पूर्ण जाग आलेल्या तिघांच्या लक्षात येतं, की उद्या ज्याचं लग्न आहे त्या डगचा कुठेही पत्ता नाहीये
आणि आदल्या रात्री नक्की काय झालं, हे तिघातल्या एकालाही जरासुद्धा आठवत नाहीये. मग सुरू होतो तो रात्री काय झालं हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न आणि त्याचा
समांतर असा डगचा शोध. अर्थात हा शोधही फार सोपा नसल्याचं यांच्या लवकरत लक्षात येतं. जेव्हा पार्किंग लॉट अटेन्डन्ट त्यांना डगच्या सासऱ्यांच्या
मर्सीडिजऐवजी, पोलिसांची गाडी "त्यांची' म्हणून आणून देतो. "हॅंगओव्हर' ज्या अनेक गोष्टी "योग्य' पद्धतीने करतो, त्यातली पहिली
म्हणजे त्यातल्या व्यक्तिरेखांचं कॅरीकेचर होऊ न देणं. मुळात जर या व्यक्तिरेखेचे पॅटर्न बघितले, तर ते ओळखीचे आहेत. कोणतीही गोष्ट वाकड्यात
जाऊन करणारा, अन्‌ शिक्षकाच्या पेशाला अजिबात न शोभणारा फिल, गर्लफ्रेन्डच्या कह्यात असलेला; पण तिच्या जाचाला कंटाळूनही काही करू न
शकणारा, आपण "डॉक्‍टर' हा किताब लावूनही केवळ "डेन्टीस्ट' असल्याचं शल्य बाळगणारा स्टू, शाळेपासून दोनशे मीटरच्या आत येण्याची परवानगी नसणारा,
एकूणच अनेक गोष्टी संशयास्पद चारित्र्याच्या असूनही एक प्रकारचा भोळसट स्वभाव असणारा ऍलन, या तीनही व्यक्तिरेखा केवळ विनोदासाठी वापरणं अन्‌
त्यांच्यात प्राण फुंकण्याचा अजिबात प्रयत्न न करणं, हे या प्रकारच्या चित्रपटात अपेक्षित आहे. इथं मात्र संहिता, दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही
पातळ्यांवर त्या व्यक्तिरेखा थ्री डिमेन्शनल करण्याचा जोरदार प्रयत्न दिसून येतो. मात्र सर्वाधिक श्रेय अभिनेत्यांकडे जावं. हे तीनही नट
कुठंही समोरच्याला हसवण्यासाठी विनोद करताहेत असं वाटत नाही, तर ती व्यक्ती त्या प्रसंगी कशी वागेल, हे समजून घेण्याचा खराखुरा प्रयत्न इथं
दिसतो आणि हे प्रसंग इतके चमत्कारिक आहेत, की अभिनयाचा कस लागला तर आश्‍चर्य नाही.
दुसरी योग्य गोष्ट म्हणजे तो प्रत्यक्ष रात्रीच्या घटनांवर न उतरता शोधातून उलगडा करणंच पसंत करतो. यामुळे निवेदन हे केवळ नायकांच्या
दृष्टिकोनातूनच होत राहतं. केवळ गोष्ट सांगण्यासाठी तिसऱ्याच माणसाच्या नजरेतून कथानक मांडल्यागत नाही. त्याशिवाय चित्रपटाचं टेक्‍श्चरही एकसंध
राहतं. प्रत्यक्षात काय झालं याची एक थोडक्‍यात झलक चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या श्रेयनामावलीदरम्यान दाखवली जाते. एका परीनं हेही
वैशिष्ट्यपूर्ण. कारण ही रात्र चित्रपटात दिसत नसली तरी यात घडणाऱ्या घटनांचा ती एक महत्त्वपूर्ण भाग आहे. इथल्या पात्रांना हलवत ठेवणारी
प्रेरणा आहे. (हिचकॉकच्या मॅकगफिन संकल्पनेचं हे एक वेगळं रूप म्हणावं लागेल.) त्यामुळे त्या रात्री काय घडलं याचं कुतूहल पात्रांना आहे, तसंच
प्रेक्षकांनाही. हॅंगओव्हरचा एकही प्रेक्षक उभा न राहता ही एन्ड क्रेडिट्‌स पाहून घेतो, यात कसलंच आश्‍चर्य नाही.
हॅंगओव्हरची पटकथा या विशिष्ट परिस्थितीत होऊ शकणाऱ्या अनेक शक्‍यतांचा अक्षरशः कीस पाडून रचण्यात आली आहे. त्यात खरोखर शक्‍यतेच्या कोटीत
बसणाऱ्या घटनांपासून (रात्री हमरस्त्यावर गाडी सोडून निघून जाणं) ते अगदी अशक्‍य घटनांपर्यंत (माईक टायसनच्या घरात शिरून त्याच्या वाघाला पळवणं)
सर्व प्रकार येतात. चित्रपटाच्या तर्कशास्त्राची चौकट पाहता, ते त्या क्षणापुरतं विश्‍वसनीय करणं हे चित्रपटाचं काम आहे, ते तो चोखपणे बजावतो.
मधला जवळ जवळ सलग असणारा धमाल भाग सोडला, तर सुरवात आणि शेवट हे इथं काहीसे सांकेतिक आणि थांबत थांबत जाणारे आहेत. त्यामुळे चित्रपट
व्यवस्थित सुरू व्हायला थोडा वेळ घेतो आणि संपतानाही. मात्र हे करताना तो मधल्या, चित्रपटाचा जीव असलेल्या भागाचा परिणाम कमी करत नाही, हे विशेष.
मी आधी सांगितल्याप्रमाणे चावट कॉमेडीमध्ये हक्कानं दिसणाऱ्या अनेक गोष्टी इथं आहेत. भाषा आणि नग्नता (बहुतेक प्रसंगी पुरुषांची) या
त्यातल्या प्रमुख गोष्टी. शाब्दिक अश्‍लीलता असणारे विनोदही इथं मुबलक आहेत; मात्र या गोष्टी केवळ हॅंगओव्हरची एक बाजू आहे. त्या इथं
केंद्रस्थानी येत नाहीत. त्या चित्रपटाचा एक भाग आहेत; मात्र त्यांना विसरून चित्रपटाला अस्तित्व आहे. या प्रकारचे मोजके चित्रपट गेल्या काही
वर्षांत हळूहळू पण निश्‍चितपणे आपलं डोकं वर काढताना दिसून येताहेत. "नॉक्‍ड; अप,' किंवा "झॅक ऍन्ड मिरी मेक ए पोर्नो' यांसारख्या
चित्रपटांनाही ही अश्‍लील विनोदाची एक बाजू होती. मात्र तेही चित्रपट म्हणून स्वतंत्रपणे दर्जा असणारे होते. त्यांचा गाभा रोमॅंटिक कॉमेडीचा
होता. इथं तो मान वेगळ्या चित्रप्रकाराकडे जातो, एवढंच.
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP