नोव्हेंबर- विचाराला चालना देणारा प्रश्न

>> Sunday, January 10, 2010नीट, लक्षपूर्वक पहा. काय दिसतंय? काय ऐकू येतंय? आवाज येतोय, तो जोरात होणा-या श्वासोच्छवासांचा धाप लागल्यासारखा. पडद्यावर दिसणारी चौकट स्पष्ट नाही. आऊटफोकस. कदाचित छतावरचा दिवा, जमिनीवर झोपलेल्या माणसाला दिसावा तसं काहीतरी दाखवणारी. पुढची चौकटही अस्पष्ट. एक दोन फ्रेम्सनंतर एक कॅलेंडर दिसतं. त्यावर तारीख स्पष्ट दिसणारी. सात तारीख, नोव्हेंबर महिन्यातली. या सर्व सुस्पष्ट/अंधूक तुकड्या-आवाजांमधून अधेमधे श्रेयनामावली सुरू. ती संपताच काही वेळ सांकेतिक निवेदनपद्धती सुरू होते. ही `नोव्हेंबर`ची सुरुवात. एका गाडीतून दोघंजण चाललेली. रात्र. तिचं नाव सोफी (कोर्टनी कॉक्स), त्याचं ह्यू (जेम्स ल ग्रोस). ती गाडी थांबविते. नुकतंच जेवण होऊनही, तिला अजून थोडी भूक आहे. ती ह्यूला काहीतरी खायला आणायला सांगते. ह्यू उतरून शेजारच्या दुकानात शिरतो. ह्यू या दुकानातून बाहेर येत नाही. गल्ला चोरायला आलेल्या भुरट्या चोराच्या गोळीला तो बळी पडतो. आणि सोफीचं आयुष्य बदलून जातं.
इथपर्यंत ठिक. म्हणजे कथेमध्ये दुर्बोधता नाही. सर्व्हायवर गिल्ट नावाचा जो प्रकार ९/११नंतर खास लोकप्रिय झालाय, त्याची सोफी बळी असणार,असं पुढल्या टप्प्याकडे पाहता स्पष्ट व्हावं. या टप्प्यावर सोफी आपलं रोजचं , फोटोग्राफी शिकवण्याचं काम सुरू ठेवते. तिला जगण्यात उत्साह वाटावा यासाठी प्रयत्न करणा-या आईला तोंड देते, अगदी सायकिअ‍ॅट्रिसला सुद्धा भेटते. (एव्हाना आपण श्रेयनामावली दरम्यान ऐकलेली पाहिलेली दृश्य विसरायला लागलेलो असतो. पण नाही, आपण विसरलो तरी ती दृश्य आपल्याला विसरणार नाहीत. चित्रपट संपण्याआधी त्यांची आपली गाठभेट पुन्हा होईलच.
सोफीच्या आय़ुष्यात आता एक वेगळंच वळण येतं. आपल्या फोटोग्राफीच्या वर्गात तिला एक स्लाईड मिळते. स्लाईडमध्ये रात्र, समोर दिसणारं ह्यू चा बळी घेणारं दुकान, अन दुकानाबाहेर थांबलेली सोफीची गाडी. दुकानाच्या काचेमागे अस्पष्ट दिसणारी व्यक्ती, कदाचित ह्यूदेखील असेल.
तसं असेल तर हा फोटो गुन्ह्याच्या वेळी, काहीच क्षण आधी काढलेला. पण कोणी? गुन्हेगाराशी या फोटोचा संबंध आहे, का इतर कोणी तो घेतला? आणि या वर्गात तो कसा आला?
विचार करून डोकं भणभणायला लागल्यावर सोफी पोलिसांना बोलावते, आणि ही स्लाईड कोणी डेव्हलप केली याचा छडा लावायला सांगते.छडा लागतो पण अनपेक्षित. स्लाईड स्वतः सोफीनेच डेव्हलप केलेली असते. अर्थात फोटोही तिनेच काढलेला असणार.
साधारण या वेळेपासून `नोव्हेंबर` सांकेतिक मार्ग सोडतो आणि मुक्त विहार करायला लागतो. सात नोव्हेंबरच्या घटनांकडे तर तो पुन्हा वळतोच वर त्या जशा घडल्या तशाच पुन्हा दाखवण्याचं बंधन स्वतःवर ठेवत नाही. त्या कशा आणि कोणत्या प्रकारे घडू शकल्या असत्या याकडे नजर टाकतो. डिनायल, डिस्पेअर आणि अ‍ॅक्सेप्टन्स या शीर्षकांखाली वेगवेगळे कलर टोन्स,सोफीच्या विविध मनस्थिती, वास्तवाचं किंचित बदलतं रूप घेऊन तो तीन आवृत्त्यांमध्ये यातल्या प्रमुख घटनांचीच वेगवेगळी रुपं मांडतो.
बेन्जमीन ब्रॅन्डने लिहिलेल्या आणि ग्रेग हॅरीसने दिग्दर्शित केलेल्या नोव्हेंबरचा काही तर्कशुद्ध शेवट आहे का, असा प्रश्न इथे कोणालाही पडणं साहजिकच आहे. आता इथे तर्कशुद्ध हा शब्द महत्वाचा.
तर्कशुद्ध म्हणायचं तर कोणत्या दृष्टीने, काऱण वास्तववादी दृष्टीकोनातून पाहता यात घडणा-या सत्तर टक्के गोष्टी या तर्काला धरून नाहीत. मात्र प्रत्येक चित्रपटाचं स्वतःचं तर्कशास्त्र असतं, जे तो पटकथेच्या तपशीलांबरोबर घडवत नेत असतो. नोव्हेंबर तेच करतो. श्रेयनामावलीत दिसणारे तपशील, इतर आवृत्त्यांमधून सुचवलेली दिशा, लहानमोठ्या प्रसंगांना फुटणारे फाटे या सर्व गोष्टी एका विशिष्ट स्पष्टीकरणाकडे निर्देश करतात. या सर्वांपलीकडे जाणारा एक क्लू दडलेला आहे. तो चित्रकर्त्यांनी वापरलेल्या शीर्षकांमध्ये. एलिझाबेथ क्युबर-रॉसच्या १९६९ सालच्या `ऑन डेथ अ‍ॅण्ड डाईंग` पुस्तकात दुःख अन् मृत्यूला तोंड देताना लोक ज्या टप्प्यांवरून प्रवास करतात,त्याविषयी लिहिलं आहे. डिनायल, अ‍ॅन्गर, बार्गेनिंग, डिप्रेशन,अ‍ॅक्सेप्टन्स हे ते टप्पे. नोव्हेंबरमध्ये यातल्या पहिल्या अन् अखेरच्या टप्प्यांचा वापर शीर्षकांसाठी त्याच क्रमाने करणं, हा योगायोग वाटत नाही. क्युब्लर-रॉस मॉडेल नावाने ओळखल्या जाणा-या फाईव्ह स्टेजेस आँफ ग्रीफ चित्रपटातल्या इतर आशयाशी अन् अखेरच्या प्रसंगाशी जोडल्या तर चित्रपटाला, त्याने आखून घेतलेल्या चौकटीत स्पष्ट उत्तर आहे, असं म्हणता येईल.
आणि ज्या त्या गोष्टीत उत्तर मिळायला हवं असं थोडंच आहे. प्रश्न जर पुरेसा विचाराला चालना देणारा असला, तर उत्तरांची अपेक्षा न करताही समाधान मानता येईलच. नोव्हेंबरला असं समाधान देणारा प्रश्न समजायलाही काही हरकत नाही.
-गणेश मतकरी.

11 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) January 11, 2010 at 9:32 PM  

हा चित्रपट मागवावा लागेल. माझ्याकडे नाहीए. तुमच्याकडून चित्रपट परिक्षणाच्या कितीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.

ganesh January 12, 2010 at 8:05 AM  

thats an interestingly weird comment. normally parikshan vachun cinemacha changlya goshti kalna apekshit asta. parikshanacha nahi. anyway ,thanks. do see it, its a very interesting film.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) January 12, 2010 at 10:04 PM  

सिनेमा वाईट कसा बनला आहे, हे देखील परिक्षणातूनच कळतं. तुम्ही फसलेल्या चित्रपटांचंही परिक्षण केलेले आहे. केवळ तुमच्या परिक्षणामुळे तो फसलेला चित्रपट पहाण्याचीही इच्छा झाली. ’चित्रपट पहा’ असं न सांगताही एखाद्याच्या मनात चित्रपटाविषयी, त्यातही फसलेला चित्रपट पहाण्याविषयी उत्सुकता निर्माण करणे ही निश्चितच एक कला आहे. ही कला फार थोड्या जणांना जमते. तुमचं परिक्षण म्हणेज केवळ चित्रपटाची कथा नसते. त्यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव असतो. ’मस्त पिक्चर आहे. बघ.’ असं म्हणणं वेगळं आणि चित्रपटाचं परिक्षण लिहिणं वेगळं. तुमच्या प्रत्येक परिक्षणात काही ना काही तरी निराळं असतं, जे शिकण्यासारखं नक्कीच आहे. मी माझ्या ब्लॉगवर ’सिनेमा सिनेमा’ सदरात मेमोअर्स ऑफ अ गेईशा या चित्रपटाचं परिक्षण लिहिलं आहे. लिंक मुद्दामच देत नाही. अवश्य वाचा. तिथे आणखीन दोन-तीन चित्रपटांची परिक्षणं आहेत, तीही जमल्यास वाचा आणि काही चुकलं असेल किंवा भाषा जास्तच अलंकारिक झाली असेल, तर सांगा.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) January 12, 2010 at 10:04 PM  

हा चित्रपट अजून शोधतेय.

. January 12, 2010 at 10:42 PM  

रा. रा. पॅरेडेसो,
टॅक्सीचे तीन भाग पाहिले.
आवडले.
हा तसा ऍक्शनपट.
(आमची आवड हाणामारीच्या सिनेमापर्यंतच. त्यापुढे काही गेले (उदाहरणार्थ नोव्हेंबर) की आमच्या दोन्ही मेंदूंची शंभर शकले होऊन आमच्याच पायाशी पडली म्हणून समजा!)
पण त्यास जी तंतोतंत विनोदाची फोडणी दिलेली आहे, ती अफलातून.
आम्हांस तो विनोद पाहून मराठीतील रा. रा. अशोकमामा, रा. रा. लक्ष्मीकांत ते रा. रा. मकरंद, रा. रा. भरत, रा. रा. केदार शिंदे येथपर्यंतचा विनोद आठवला व आम्हांस वाटले, या सर्वांस त्या टॅक्सीत बसवून थेट फ्रान्सला पाठवून द्यावे.
येथे आम्ही हिंदीबद्दल काहीही बोलत नाहीये, याची आपण नोंद घेतलीच असेल.
(आम्हांस येथे आणखी एक प्रश्न पडलाय. की बोवा, मराठीतील सर्व विनोदवीर नेहमी वरच्या पट्टतीच का बरे बोलत असतात? मागच्या रांगेतील प्रेक्षकांनाही आपले संवाद ऐकू जावेत असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असेल, तर मात्र आपले काहीसुदिक म्हणणे नाही!!)
- बापू

ganesh January 13, 2010 at 8:45 PM  

hi KK,
thanks for the lot of compliments. will see your blog.
and where exactly are you trying to find november? net?
maybe paradeso can suggest a physical location...

Kanchan Karai (Mogaraafulalaa) January 14, 2010 at 6:22 AM  

November is N.A. on the net. Going to purchase a CD if not available thre then I have to search in CD Library Shop.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) January 16, 2010 at 2:20 AM  

नोव्हेंबर कुठेच मिळत नाहीये. :-((
कुठे मिळेल हे सांगू शकाल का?

सिनेमा पॅरेडेसो January 19, 2010 at 1:21 AM  

कांचन कराई,

नोव्हेंबर सध्या मार्केटमधून पूर्णपणे गायब झाला आहे. दोन वर्षांपूर्वी तुरळक कलेक्शन्समध्ये आणि सिंगल प्रिंटमध्ये उपलब्ध होता. पुन्हा येण्याची शक्यता आहे. आल्यास जागेसह कळवतो.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) January 22, 2010 at 1:05 AM  

जरूर कळवा. मी दोन दिवसांपूर्वी वॉर्डन रोडजवळ जे क्रॉसवर्ड आहे, त्याच्या जवळ एक व्हिडीओ लायब्ररी आहे, तिथे जाऊन चौकशी केली होती. त्याने आहे म्हणून सांगितलं होतं पण तिकडे लायब्ररी लावणं मलाच महागात गेलं असतं. मला वाटतं, तो चित्रपट उपलब्ध नाहीये तर मी विकत घेऊन टाकते ऍमेझॉनवरून.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) April 17, 2010 at 3:30 AM  

नोव्हेंबर मिळाला, पाहिला. पहिल्या वेळेस डोक्यावरून गेला कारण अर्धा वेळ मी काय झालंय, हे इतरांना सांगत बसले होते. त्यात एकच घटना तीन निरनिराळ्या स्तरांवर पुन्हा पहताना बारकावे निसटले. पण एकूणच नोव्हेंबर डोक्याला भारी होता.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP