गंधः काळाची पावले ओळखून...

>> Sunday, January 31, 2010

मिळालेल्या पारितोषिकांची संख्या अन् प्रतिष्ठा ही सर्वच चित्रपटांच्या दर्जाची खूणगाठ म्हणून उपयोगी पडेल अशी खात्री देता येत नाही. तरीही सर्वसामान्य प्रेक्षकाला ठळकपणे त्यावर्षीच्या लक्षवेधी चित्रपटांकडे घेऊन जाण्याकरिता या पुरस्कारांचा उपयोग होतो, हेदेखील खरं. यावर्षी अशा वलयांकित ठरलेल्या चित्रपटांतलं एक महत्त्वाचं नाव म्हणून सचिन कुंडलकरच्या ‘गंध’कडे पाहता येईल. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत ‘सर्वोत्कृष्ट पटकथा व ध्वनी’ अशा दोन विभागांत ‘गंध’ निवडण्यात आला आहे. सचिन कुंडलकर हे नाव आपल्याला परिचित आहे, असायला हवं. मराठी चित्रपटांना आलेल्या सुगीच्या दिवसांची जाहिरात आपण अनेक दिवस ऐकतो आहोत. मात्र, केवळ तिकीट खिडकीचे हिशेब अन् विषय किंवा सादरीकरणातली चमत्कृती यांच्या सापळ्यात न अडकता मनापासून काही वेगळं करणारा दिग्दर्शक आज आपल्याला हवा आहे. खरोखरच ते करून दाखविणाऱ्या मोजक्या दिग्दर्शकांच्या यादीत सचिनचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. (उमेश कुलकर्णी वगळता या यादीतल्या सतीश मनवर, परेश मोकाशी, रेणुका शहाणे या अन्य मंडळींनी एकेकच चित्रपट केलेला आहे. त्यांचं अधिक काम प्रकाशात आलं की मराठी चित्रपटसृष्टी अर्थपूर्ण आणि आव्हानात्मक चित्रपटांकडे किती प्रमाणात लक्ष देते, हे स्पष्ट होईल; आणि तिचं भवितव्यदेखील!)
सचिनने आजवर तीन चित्रपट केले आहेत. ‘रेस्टॉरंट’, गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा ‘निरोप’ आणि ‘गंध’! या तिन्ही चित्रपटांकडे पाहून एक स्पष्ट होतं की, या लेखक-दिग्दर्शकाला कथानकाहून अधिक रस व्यक्तिरेखांमध्ये आहे. त्याच्या तिन्ही संहिता आणि त्याची दिग्दर्शकीय कामगिरी ही या एका महत्त्वाच्या मुद्दय़ाशी सुसंगत असल्याचं त्याचे चित्रपट पाहून लक्षात येईल.
पडद्यावर चटकन् गोष्टी घडवत राहावं, सतत पात्रांना कुठल्याशा पूर्वनियोजित दिशेने ढकलत राहावं असं त्याला वाटत नाही. याउलट, एकदा का व्यक्तिरेखा पुरेशा ताकदीने घडवल्या, की मग तो त्यांना वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य बहाल करतो. सचिनची पात्रं लेखकाची, दिग्दर्शकाची मर्जी सांभाळताना दिसत नाहीत. त्यांची तीच- आपल्याला योग्य त्या गतीने अन् पद्धतीने वाटचाल करताना दिसून येतात.
या पाश्र्वभूमीवर ‘गंध’ला पटकथेचं पारितोषिक मिळणं हे फार महत्त्वाचं वाटतं. ते महत्त्वाचं वाटायला आणखीही एक कारण आहे. आपल्याकडे पटकथेकडे पाहण्याची एक सरळसोट दृष्टी आहे. तिला जसे कथनशैलीत केलेले प्रयोग मानवत नाहीत, तसेच चित्रपटाच्या मूलभूत आकारात, आराखडय़ात केलेले बदलदेखील पसंत पडत नाहीत. कालांतराने अन् मल्टिप्लेक्सच्या गरजांप्रमाणे चित्रपटांची लांबी कमी झाली असली तरी चित्रपटाचा अपेक्षित आलेख बदललेला दिसत नाही, त्याची रचना बदललेली दिसत नाही.
‘गंध’मध्ये असा एक रचनात्मक बदल आहे. विदेशी चित्रपटांमध्ये तो सवयीला असला तरी आजवरच्या मराठी चित्रपटीय परंपरेला तो छेद देणारा आहे. ‘गंध’ हा सलग एकच एक गोष्ट सांगणारा चित्रपट नाही, तर तो तीन कथांचा संच आहे. या तीन कथांमधल्या व्यक्तिरेखा, त्यांचं बोलणं-चालणं, आवडीनिवडी या परस्परांहून पराकोटीच्या भिन्न आहेत. मात्र, त्यांना जोडणारं एक सूत्र या तीनही गोष्टींमध्ये दिसून येतं; आणि ते म्हणजे गंध किंवा वास.
सामान्यत: या प्रकारे स्वतंत्र गोष्टी असणाऱ्या चित्रपटांचा एक प्रॉब्लेम असतो. तो म्हणजे- स्वतंत्र व्यक्तिरेखा अन् आलेख असल्याने या गोष्टींचा परिणामही स्वतंत्र अन् मर्यादित असतो. त्यामुळे अनेकदा प्रेक्षकाला पूर्ण लांबीचा चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळत नाही. ‘गंध’ मात्र हे आव्हान स्वीकारतो, अन् बऱ्याच प्रमाणात एकसंध म्हणण्यासारखा परिणामही देतो. इथे हे जमणं खासच कठीण आहे, ते या कथांच्या संपूर्णपणे वेगळ्या पाश्र्वभूमींमुळे! पुणेरी मध्यमवर्गीय, आधुनिक शहरी अन् खेडवळ कोकणी अशी या कथांमधली वातावरणे आहेत. या व्यक्तिरेखांचे व्यवसाय, राहणीमान, सामाजिक अन् आर्थिक स्तर यांमध्ये काहीच साम्य नाही. तरीही परिणामाला वजन येतं ते दिग्दर्शकीय सातत्यानं, कथानकांच्या स्वरूपात अन् आशयात येणाऱ्या साधम्र्यानं आणि प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या उत्तम नटसंचानं. इथल्या कथांची वृत्ती कधी गंभीर, कधी विनोदी अशी वेगवेगळ्या प्रकारची असली, तरी परिणामांत त्या तुल्यबळ राहतात.
इथली प्रत्येक कथा ही टिपिकल चांगल्या लघुकथेच्या शैलीप्रमाणेच एकेका सिच्युएशनभोवती रचली जाते. आधी पुरेशी ‘बॅक स्टोरी’ गृहीत धरून पहिल्या कथेत ही बॅक स्टोरी अधिक जागा व्यापते. मात्र, पुढल्या दोन कथा या मुख्यत: वर्तमानातल्या अडचणींशीच निगडीत राहतात, अन् भूतकाळाचे संदर्भ लागतील तेव्हा वापरतात. साहजिकच घडणाऱ्या घटना या जुजबी टप्प्यांचा वापर करतात.. खूप काही घडवण्याच्या नादी न लागता! मात्र, हे टप्पे कथेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरतात.. प्रेक्षकाला गुंतवून ठेवणारे!
‘लग्नाच्या वयाची मुलगी’मध्ये वीणाच्या (अमृता सुभाष) लग्नाच्या खटपटीचे प्रयत्न आणि तिचं मंगेशकरवर (गिरीश कुलकर्णी) बसत गेलेलं प्रेम हा भाग येतो. ‘औषधं घेणारा माणूस’मध्ये एड्सग्रस्त फॅशन फोटोग्राफर (मिलिंद सोमण) आणि त्याची विभक्त पत्नी (सोनाली कुलकर्णी) यांची दोन वर्षांनंतर झालेली भेट दिसते. तर ‘बाजूला बसलेली बाई’मध्ये घरातल्या गडबडीच्या वातावरणात भावनेनं गुंतूनही नाइलाजाने त्यातून राहायला बाहेर पडलेल्या जानकीची (नीना कुलकर्णी) भावनिक आंदोलनं दिसतात.
संहितेच्या दृष्टीने या कथांची वीण अन् त्यांचं केंद्रस्थानी असणाऱ्या विषयाशी जोडलं जाणं पक्कं असलं, तरी त्या प्रत्यक्ष पडद्यावर येताना जी इतर तांत्रिक अंगांची मदत लागते, ती अनेकदा खास महत्त्वाची; अन् ढोबळ परिणामकारकतेसाठी तपशिलाकडे पाठ फिरवण्याची प्रथा प्रचलित आहे, जी सचिनच्या फळीच्या दिग्दर्शकांनी जाणूनबुजून टाळलेली दिसते. त्यामुळेच मग कलादिग्दर्शन, छायाचित्रण (अमल चौधरी), ध्वनीयोजना (पुरस्कारप्राप्त प्रमोद जे. थॉमस) यासारख्या गोष्टी संयतपणे, पण नेमक्या वापरल्या जातात. हा नेमकेपणाच चित्रपटाला स्वत:चं असं टेक्श्चर आणून देतो.
सचिन कुंडलकरचे आधीचे दोन चित्रपट अन् ‘गंध’ यांत एक महत्त्वाचा फरक आहे. ‘रेस्टॉरन्ट’ वा ‘निरोप’पेक्षा हा चित्रपट अधिक आकलनशील आहे. दिग्दर्शकाची व्यक्तिगत छाप त्यावर जरूर आहे. मात्र, सर्व थरांतल्या प्रेक्षकांशी सहज संवाद साधेलशी त्याची वृत्ती आहे. शेवटी चित्रपट कितीही अर्थपूर्ण असला तरी स्वत:च्या कवचात राहण्यात मुद्दा नसतो, तो प्रेक्षकांपर्यंत पोहचणं हेच सर्वाधिक महत्त्वाचं असतं. तसं होऊ शकलं तरच चित्रपटाचा प्रभाव दूरगामी अन् चित्रपटसृष्टीत होणारा बदल अधोरेखित करणारा ठरू शकतो. ‘गंध’ हा बदलता प्रवाह फार आधीच ओळखतो. अन् त्यामुळेच तो मिळालेले पुरस्कार सार्थ ठरवणारा आहे.

-गणेश मतकरी


(रविवार, ३१ जानेवारी २०१० -लोकसत्तातून)

4 comments:

Alhad Mahabal February 1, 2010 at 9:47 AM  

wow!
मिलिंद सोमण- सोनाली कुलकर्णीचा रोमान्स आणि अमृता सुभाषच्या टॉवेल डान्सपेक्षाही सबळ कारणं तुम्ही दिलीयत.

नक्की बघणार!
alhadmahabal.wordpress.com

Abhijit Bathe February 1, 2010 at 6:52 PM  

GM - I guess u r supposed to take the first comment as a compliment! :))))

P.S. - What did Renuka Shahane direct?

ganesh February 1, 2010 at 9:25 PM  

hahaha.
yes. i believe so.
she directed a film called rita based on her mothers (shanta gokhle)novel

Vandana Khare July 15, 2010 at 9:45 PM  

I have been waiting for GANDH to release in Mumbai.online release seems to be good option.
Ganesh, have U written about RITA? can U plz give link?

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP